यत् पादाब्जरज: स्पर्शादरजस्कं मनो भवेत् ।
स एव गुरुनाथो मे कृपासिंधु: प्रसीदताम् ॥१॥
ज्याच्या चरणरजाच्या स्पर्शाने मनुष्याचे अंत:करण रजोगुणरहित होते, तो माझा कृपासागर गुरु मजवर प्रसन्न होवो.
अर्था ये सिद्धसिद्धान्तपद्धतौ सुनिरुपिता; ।
संग्रहं तनुते तेषां कश्चितश्रीकृष्णतुष्टये ॥२॥
सिद्धासिद्धान्तपद्धतीमध्ये जे विषय उत्तम रीतीने सांगितले आहेत त्यांचा संग्रह श्रीकृष्ण संतुष्ट व्हावा किंवा श्रीकृष्णाला माझ्याविषयी प्रेम वाटावे म्हणून मी करीत आहे.
पिण्डसम्भवविचारसंविदाधारतत्परसैक्यभूमय: ।
तीक्ष्णाधीभिरवधूत इत्ययं दर्शित: खलु निरुप्य संग्रह: ॥३॥
पिंडाचा संभव, विचार, संवित्, म्हणजे ज्ञान किंवा शक्ती, आधार तदंतर्गत रसांची एकत्वभूमी, तसेच अवधूताचे लक्षण इत्यादि गोष्टींचे निरुपण करुन तैलबुद्धीच्या विद्वानांनी त्याचा विवेचनपूर्वक संग्रह केला आहे.
कार्य्यकारणकर्तृत्वं यदा नास्ति कुलाकुलम् ।
अव्यक्तं परमं तत्त्वं स्वयं नाम तदा भवेत् ॥४॥
जेव्हा कार्य, कारण व कर्तृत्व या त्रिपुटीचा लय होतो आणि कुल व अकुल हे दोन्ही नाहीसे होतात तेव्हा अव्यक्त असे परमश्रेष्ठ तत्त्व स्वत:हून प्रकट होते. (याचा अर्थ असा की, कुल म्हणजे शक्ती व अकुल म्हणजे शिव हे दोन्ही जेव्हा सहस्त्रारात एकरस किंवा समरस होतात म्हणजे या दोहोंचे जेव्हा सामरस्य होते तेव्हा स्वयंवेद्य आत्मरुप स्वत: प्रकट होते. "कुलं शक्तिरिति प्रोक्तमकुलं शिव उच्यते" असे "सौभाग्यभास्कर" ग्रंथांत म्हटले आहे. या ग्रंथातच कुल शब्दाचा योगकारक अर्थ देताना असे म्हटले आहे की, ‘कु’ चा अर्थ पृथ्वी आहे व ‘ल’ चा अर्थ लीन होणे असा आहे. मूलाधार चक्रात पृथ्वीतत्त्व असल्यामुळे त्या चक्राला कुल म्हणतात. सुषुम्नानाडीचे शेवटचे टोक मूलाधारातच येऊन मिळालेले आहे. या सुषुम्नेमधूना ऊर्ध्वगामी होऊन कुंडलिनी शक्ती सहस्त्रारचक्रात परमशिवाशी सामरस्य प्राप्त करते. यामुळे लक्षणा वृत्तीने सुषुम्नानाडीलाही ‘कुल’ असे म्हटले जाते. "तत्त्वसार" नावाच्या ग्रंथात कुंडलिनी हे शक्तिरुप आहे असे सांगितले आहे. शक्ती ही सृष्टी आहे व सृष्टी ही कुंडलिनी आहे असे पुढे आचार्य बलभद्रांनी याच ग्रंथातील ४थ्या अध्यायाच्या ३० व्या श्लोकात कथन केले आहे. यामुळेच कुंडलिनीला कुलकुंडलिनी असे म्हटले जाते. शिवाचे नाव अकुल असणे उचितच आहे; कारण त्याला आदि, अन्त, कुल,गोत्र इत्यादि काही नाही. या ग्रंथाच्या ४ थ्या अध्यायातील १०-११ व्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे शिव हा अन्यत्र, अखण्ड, अद्वय, अविनश्वर, धर्महीन व निरंग असल्यामुळे त्याला अकुल म्हटले जाते.)
तस्यावस्थामात्रधर्माधर्मिणीति प्रसिद्धिभाक् ।
निजा शक्तिरभूत् तस्या औन्मुख्यांका परोत्थिता ॥५॥
तत: स्पंदनमात्रा स्यादपरेति स्मृता तत: ।
सूक्ष्माहन्तार्धार्धमात्रा चिच्छिलाकुण्डलिन्यत: ॥६॥
त्या अव्यक्ततत्वाची परा व अपरा अशी दोन नावे प्रसिद्ध आहेत. त्यापैकी पराख्य तत्व पुढीलप्रमाणे आहे. परतत्व हे केवळ अवस्थान म्हणजे अस्तित्व याच स्वरुपाचे आहे. अस्तित्व हाच परतत्त्वरुप शक्तीचा धर्म असून अशीच तिची प्रसिद्धी आहे. तिचे स्वरुप असल्याचे शास्त्रीय जगतात सर्वविश्रुत आहे. हीच तिची निजशक्ती आहे. या शक्तीतूनच व उन्मुखत्वलक्षणाची दुसरी शक्ती निर्माण किंवा प्रकट झाली. तो स्पंदनरुप आहे तिला अपरा असे नाव आहे. तिच्या ठिकाणी सूक्ष्म अहंता म्हणजे अहंकार अर्धार्धमात्रा म्हणजे अगदी सूक्ष्म किंवा कमी प्रमाणात आहे. चैतन्य हा तिचा स्वभाव अर्थात् शील आहे. तिला कुंडलिनी असे नाव आहे.
निराकृतित्वान्नित्वान्निरन्ततया तथा ।
निष्पंदत्वान्निरुत्थत्वान्निजा: पंचगुणा: स्मृता: ॥७॥
निजाशक्ती कुंडलिनीचे पाच गुण सांगितले आहेत. तिचा पहिला गुण निराकृतित्व म्हणजे आकृतिरहित असणे हा आहे. दुसरा गुण नित्यत्व म्हणजे शाश्वत असणे असा आहे. तिसरा गुण निरंतरता म्हणजे अंतरहित, सतत किंवा सारखे असणे हा आहे. चवथा गुण निष्पंदत्व म्हणजे स्पंदन किंवा हालचाल नसणे हा आहे व पाचवा गुण निरुत्थत्व म्हणजे उत्थान नसणे हा आहे.
अस्तित्वमप्रमेयत्वमभिन्नत्वमनन्तता ।
अव्यक्तततेति पंच स्यु: परायां सम्मता गुणा: ॥८॥
(कुंडलिनी शक्ती परा व अपरा अशा दोन प्रकारची आहे. प्रथम परावस्थेचे गुण सांगतात.) पराशक्ती कुंडलिनीचे पाच गुण आहेत. अस्तित्व, अप्रमेयत्व म्हणजे कोणत्याही ज्ञानाला विषय न होणे किंवा ती सिद्ध करणे किंवा तिचे प्रकटीकरण करणे; (कारण ही शक्ती अप्रमेय म्हणजे अपरिमित, पुष्कळ, दुर्ज्ञेय, अगाध व अमर्याद आहे.) अभिन्नत्व म्हणजे पृथक्त्वाने अगर वेगळेपणाने न भासणे, अनंतत्व म्हणजे शेवट नसणे आणि अव्यक्तता म्हणजे व्यक्त किंवा प्रकट न होणे.
स्फुरत्ता स्फारतायुक्ता स्फुटता तथा ।
स्फूर्तिरेवं पंचगुणा अयरायामपि स्मृता: ॥९॥
अपराशक्ती कुंडलिनीचेही पाच गुण आहेत. स्फुरण पावणे,विस्तृत होणे,स्पष्टत्व असणे,प्रकट होणे व स्फूर्ती म्हणजे उत्साहयुक्तत्व असणे होय. (या अपराशक्तीकडूनच तिच्या या गुणांमुळे सृष्टीची किंवा पिंडब्रह्मांडाची उभारणी होते किंवा हे गुण म्हणजेच उभारणी होय.)
निरन्तरत्वं नैरंश्यं नैश्चल्यं निश्चयत्वकम् ।
निर्विकल्पत्वमेव स्यात् सूक्ष्माया गुणपंचकम६ ॥१०॥
या कुंडलिनी शक्तीच्या सूक्ष्मा नावाच्या तत्त्वाचे पाच गुण असे आहेत. निरंतरता म्हणजे सातत्य, अंशराहित्य म्हणजे भरीव किंवा परिपूर्ण असणे, अचांचल्य म्हणजे चंचल नसणे, निश्चयत्व म्हणजे ठामपणा किंवा संघातरहितता, निर्विकल्प म्हणजे प्रकार, भेद किंवा संशय नसणे होय. अर्थात् विशेषणरहितता होय.
पूर्णत्वं प्रतिबिंबत्वं तथा प्रकृतिरुपता ।
प्रत्यड्मुखत्वमौच्चल्यं पञ्चैते भोगिनां गुणा: ॥११॥
भोगी म्हणजे जीवाचे अर्थात् जीवरुप कुंडलिनी शक्तीचेही पाच गुण आहेत. पूर्णता, प्रतिबिंबता, प्रकृतीशी एकरुपता, प्रत्यड्मुखता म्हणजे मूळ स्वरुपापासून तोंड उलट फिरविलेले असणे अर्थात् प्रपंचवृत्ती असणे व औच्चल्य म्हणजे उच्चलता किंवा ऊर्ध्वगतीमुळे वर उसळणे होय.
शक्तिपंचकसंभूतपंचविंशतिसंश्रयात् ।
परपिंडसमुत्पत्ति: सिद्धान्तज्ञै: समीरिता ॥१२॥
निजा, परा, अपरा, सूक्ष्मा व भोगी (जीवांतर्गत कुंडलिनी ) या पाच शक्तींपासून उद्भूत झालेल्या पंचवीस गुणांच्या (प्रत्येक शक्तीचे पाच गुण) आश्रयाने परपिंडाची उत्पत्ती होते असे सिद्धांततज्ञांनी सांगितले आहे.
उक्तं च -
निजा पराऽपरा सूक्ष्मा कुंडली तासु पंचधा ।
शक्तिचक्रक्रमेणैव जात: पिंड: पर: शिवे ॥१३॥
असे म्ह्टले आहे की - (शिव पार्वतीला उद्देशून म्हणतात) हे शिवे ! पार्वती !! निजा, परा, अपरा, सूक्ष्मा व कुंडलिनी या पूर्वी सांगितलेल्या पाच शक्ती आहेत. यातील शक्तिचक्राच्या क्रमानेच परपिंड उत्पन्न झाला.
ततोऽस्तितापूर्वमर्चिर्मात्रं स्यादपरं परम् ।
तत्स्वसंवेदनाभासमुत्पन्नं परमं पदम् ॥१४॥
त्यानंतर अस्तित्वाने युक्त असे तेजज्वालारुप दुसरे एक तत्त्व निर्माण झाले. तेच ज्ञानाभास किंवा चेतनाभास उत्पन्न करणारे परमपद होय.
स्वेच्छामात्रं तत: शून्यं सत्तामात्रं निरंजनम् ।
तस्मात्तत: स्वसाक्षादभू: परमत्पदं मतम् ॥१५॥
त्या परमपदापासून केवळ स्वेच्छारुप तत्त्व उत्पन्न झाले. त्यापासून शून्यतत्त्व निर्माण झाले. त्या शून्यतत्त्वापासून सत्तामात्र निरंजनतत्व निर्माण झाले व त्यापासून साक्षात् परमात्मतत्त्व निर्माण झाले.
अकलत्वासंशयत्वानुपमतत्वान्यपारता ।
अमरत्वमिति प्रोक्ता गुणा: पंचापरे पदे ॥१६॥
अपरतत्त्वाचे अकलतत्त्व म्हणजे कला किंवा अवयवराहित्य, संशयरहितत्व,अनुपमत्व म्हणजे एकमेवाद्वितीयत्व, अन्यपरत्व म्हणजे त्याच्यासारखा दुसरा नसणे व अमरत्व, असे पाच गुण आहेत.
नि:कलत्वमलोलत्वमसंख्येयाक्षयत्वेक ।
अभिन्नतेति पंचोक्ता गुणा: स्यु: परमे पदे ॥१७॥
परमतत्त्वाचे निष्कलत्व म्हणजे अंशराहित्य, अनासक्तत्व म्हणजे आसक्तीरहितता, असंख्येयत्व म्हणजे अपरिमितता, अक्षयत्व म्हणजे कायमपणा व अभिन्नत्व म्हणजे एकसंधता, असे पाच गुण आहेत.
नीलता पूर्णता मूर्च्छा उन्मनी लयतेत्यमी ।
शून्ये पंच गुणा: प्रोक्ता: सिद्धसिद्धान्तवेदिभि: ॥१८॥
शून्यतत्त्वाचे नीलत्व म्हणजे निळेपणा,पूर्णता म्हणजे व्यापकपणा,मूर्च्छा म्हणजे मिसळणे, संहारणी होणे अर्थात् महाप्रलयात सर्व संसाराचा शून्यतत्वात एकभावाने लय होणे, उन्मनी म्हणजे सहजावस्था अर्थात् सदैव स्वरुपानुभवात निमग्न राहणे व लयत्व म्हणजे कारणात कार्याचा प्रलय होणे, हे पाच गुण सिद्धसिद्धान्तवेत्त्या विद्वानांनी सांगितले आहेत.
सहजत्वं सामरस्यं सत्यत्वं सावधानता ।
सर्वगत्वमिति प्रोक्ता गुणा: पंच निरंजने ॥१९॥
निरंजनतत्वाचे सहजपणा, समरसता, सत्यता म्हणजे शाश्वत अस्तित्व किंवा त्रिकालाबाधित्व, सावधानता म्हणजे भ्रम व प्रमादादि दोषराहित्य अर्थात् समाहितत्व व सर्वगत्व म्हणजे सर्व ठिकाणी जाण्याची शक्ती किंवा सर्व ठिकाणी विद्यमान असणे,असे पाच गुण आहेत.
अभयत्वमभेद्यत्वमच्छेद्यत्वमनाश्यता ।
अशोष्यत्वमिति प्रोक्ता गुणा: पंच परात्मनि ॥२०॥
परमात्मतत्वाचे निर्भयता, अभेद्यत्व म्हणजे अभिन्नता अर्थात् अनेक उपाधींनी भेद दिसले तरी वास्तविक भेद नसणे, अच्छेद्यत्व म्हणजे अविच्छिन्नता अर्थात् परमात्मतत्वाला अवयव नसल्यामुळे छेदनाने त्याचा उच्छेद होत नाही किंवा तो छेदला जात नाही,अविनाशत्व म्हणजे जो अविनाशी किंवा अमर आहे अर्थात् त्याचा कोणीही नाश करु शकत नाही व अशोष्यत्व म्हणजे या तत्त्वाचे कोणीही शोषण करु शकत नाही, असे पाच गुण आहेत.
तत्त्वपंचकमाख्यातमाद्यपिण्डस्य पिण्डतै: ।
एवं तथा गुणा: प्रोक्ता: पंचविंशतिसंख्यका: ।
सगुणै: समवेतैस्तैरादिपिंड: समुद्भवेत् ॥२१॥
पंडितांनी आद्यपिंडाची पाच तत्त्वे व पंचवीस गुण सांगितले आहेत. या सर्व गुणांच्या समवायाने म्हणजे समुदायापासून किंवा समवाय-नित्य संबंधाने आदि म्हणजे पहिला पिंड उत्पन्न होतो.
आदेस्तु परमानंद: प्रबोध: स्यात्ततस्तत: ॥
भवेच्चिदुदयस्तस्मात् प्रकाश: सोऽमित्यत: ॥२२॥
त्या आदिपिंडापासून परमानंद, त्यापासून प्रबोध, त्यापासून चित्, त्यापासून प्रकाश व त्यापासून सोऽहं असे पाच पदार्थ निर्माण झाले.
उदय: स्यात्तथोल्लासोऽवभासोऽथ विकाशनम् ॥
प्रभेति स्युर्गुणा: पंच प्रबोधस्य प्रकीर्त्तिता: ॥२३॥
प्रबोधाचे उदय म्हणजे उत्पत्ती किंवा उत्पन्न होणे, उल्लास म्हणजे चित्ताची प्रफुल्लता, अवभास म्हणजे ज्ञान, विकाशन म्हणजे विशेष उजळून दिसणे आणि प्रभा म्हणजे तेज किंवा फुलाप्रमाणे उमलणे किंवा प्रकाश, हे पाच गुण आहेत.
निष्पंदहर्षावुन्माद: स्पदो नित्यसुखं तथा ॥
इति पंच गुणा: प्रोक्ता: परमानंदसंज्ञके ॥२४॥
सदभावोऽत्र विचारश्च कर्तृत्वं ज्ञातृता तथा ॥
स्वातंत्र्यमिति पंचैव गुणाश्चिदुदयस्य च ॥२५॥
चिदुदयाचे सद्भाव म्हणजे नेहमी राहणे, विचार म्हणजे नित्यानित्यवस्तुविवेक, कर्तृत्व म्हणजे कर्तेपण किंवा कार्याचा स्वभाव, ज्ञातृत्व म्हणजे जाणण्याचा स्वभाव व स्वातंत्र्य म्हणजे दुसर्याच्या अधीन न राहणे, हे पाच गुण आहेत.
निर्विकारत्वनैष्कल्ये सद्बोध: समता तथा ॥
विश्रांतिरेव संप्रोक्तं प्रकाशगुणपंचकम् ॥२६॥
प्रकाशाचे निर्विकारत्व म्हणजे उत्पत्ती, स्थिती, लय इत्यादि विकारांचा अभाव, निष्कलत्व म्हणजे अवयवादि नसणे, सद्बोध म्हणजे उत्तम उपदेश, समता म्हणजे सर्वत्र एकरुपाने राहणे व विश्रांती म्हणजे विषयांपासून निवृत्ती किंवा दूर होणे, हे पाच गुण आहेत.
अहन्ताऽखण्डितैश्वर्य्य स्वानुभूति: समर्थता ॥
सर्वज्ञतेति पंचोक्ता सोऽहंभावगुणा इमे ॥२७॥
सोऽहंभावाचे अहंता म्हणजे सर्वत्र अहंभाव अर्थात् मीच सर्व ठिकाणी व्यापक रुपाने आहे, अखडैश्वर्य म्हणजे अणिमादिक सिद्धीचे अखंड ऐश्वर्य, स्वानुभूती म्हणजे सर्वत्र आत्मा आहे अशी अनुभूती अर्थात् प्राण्यांना आपल्यासारखे पाहणे, समर्थता म्हणणे सामर्थ्य अर्थात् स्थूल व सूक्ष्म पदार्थांना प्रत्यक्ष करण्याची योग्यता व सर्वज्ञता म्हणजे सर्वकालिक अर्थात् त्रिकलाबाधित ज्ञानाची शक्ती, असे पाच गुण आहेत.
इत्याद्यपिंड: संपृक्त: तत्त्वपंचकगैर्गुणै: ॥
पंचविंशतिसंख्याकैरिमैरेव समुत्थित: ॥२८॥
आद्यादभून्महाकाशं ततो जातो महानिल:
तस्मात्तेजो महत्तस्मानमहत् कं तन् महाधरा ॥२९॥
आद्यपिंड हा या पाच तत्वांनी व त्यांच्या पंचवीस गुणांनीच अद्भुत किंवा उत्पन्न झाला व आकारास आला. त्या आद्यपिंडापासून महाकाश निर्माण झाले व त्या महाकाशापासून महावायू निर्माण झाला. त्या महावायूपासून महातेज, त्या महातेजापासून महाजल व त्या महाजलापासून महाधरा म्हणजे मोठी अशी स्थूल पृथ्वी निर्माण झाली.
अवकाशं अछिद्रत्वमस्पृश्यत्वं तथा रव: ॥
नीलवर्ण इति प्रोक्ता गुणा: पंच महांबरे ॥३०॥
महाकाशाचे अवकाश म्हणजे पोकळी अर्थात् सर्व मूर्त पदार्थांचा आश्रय, अछिद्र म्हणजे ज्याला छिद्र नाही किंवा ज्याचा छेद होऊ शकत नाही असे, अस्पृशत्व म्हणजे स्पर्शरहितत्त्व अर्थात् ज्याला शिवता येत नाही असे, शब्द म्हणजे आवाज किंवा ध्वनी व नीलवर्ण म्हणजे निळेपणा, हे पाच गुण सांगितले आहेत.
संचारश्चालनं स्पंद: शोषणं धूम्रवर्णता ॥
इमे पंच गुणा: प्रोक्ता महावायौ मनीषिभि: ॥३१॥
महावायूचे संचार करणे म्हणजे सर्वत्र फिरणे, संचालन म्हणजे हलविणे, स्पंदन म्हणजे हलणे किंवा स्पंदित होणे, शोषण म्हणजे शुष्क करणे किंवा सुकविणे व धूम्रवर्णता म्हणजे धुरासारखे रुप असणे, असे पाच गुण विचारवंतांनी सांगितले आहेत.
दाहकत्वं पावकत्वं सूक्ष्मत्वं रुपभासिता ॥
रक्तवर्णत्वमेवं स्यु: गुणा: पंच महानिले ॥३२॥
महातेजाचे किंवा अग्नीचे दाहकत्व म्हणजे जाळणे किंवा दाह उत्पन्न करणे, पावकत्व म्हणजे पावन किंवा पवित्र करणे, सूक्ष्मत्व म्हणजे सूक्ष्मपणा आणणे, रुपभासिता म्हणजे रुपावभासन करणे अर्थात् रुप आहे असे भासविणे व रक्तवर्णत्व म्हणजे लाल रंग असणे, असे पाच गुण आहेत.
प्रवाहाप्यायनरसद्रवाश्च श्वेतवर्णता ।
इमे पंच गुणा: प्रोक्ता महावारिणी पंडितै: ॥३३॥
महाजलाचे प्रवाह म्हणजे वेग, आप्यायन म्हणजे वाढणे, पुष्ट करणे किंवा तरंगांच्या द्वारा वर उसळणे, रसत्व म्हणजे स्वाद, द्रवत्व म्हणजे विरघळणे व श्वेतवर्णत्व म्हणजे पांढरेपणा, हे पाच गुण आहेत असे पंडितांनी सांगितले आहे.
स्थूलत्वनानाकृतिते काठिन्यं गंधपीतते ।
इति पंच गुणा: प्रोक्ता महामह्यां महर्षिभि: ॥३४॥
महापृथ्वीचे स्थूलता म्हणजे मोठेपणा, नानाकृती म्हणजे अनेक आकारत्व अर्थात् पर्वत, नद्या, वृक्ष, लता इत्यादि रुपांनी व समविषम भेदाने पृथ्वीचे अनेक आकार दृष्टीस पडणे, काठिण्य म्हणजे कठिणपणा किंवा कडकपणा, गंध म्हणजे वास व पीतवर्णत्व म्हणजे पिवळेपणा, हे पाच गुण आहेत असे महर्षीचे प्रतिपादन आहे.
इति साकारपिंडस्य तत्त्वपंचकमिष्यते ।
पंचविंशतिसंख्याका गुणास्तैमिलितै: शिव: ॥३५॥
अशा आकारयुक्त पिंडाचे तत्त्वपंचक व त्यांचे पंचवीस गुण सांगितले. हे सर्व गुण मिळून शिव झाला.
शिवाद्भैरव एतस्मात् श्रीकण्ठोऽत: सदाशिव: ।
ईश्वरोऽस्माद्रुद्र आसीत्तत्तो विष्णुस्ततो विधि: ॥३६॥
त्या शिवापासून भैरव, भैरवापासून श्रीकंठ, श्रीकंठापासून सदाशिव, सदाशिवापासून ईश्वर, ईश्वरापासून रुद्र, रुद्रापासून विष्णू व विष्णूपासून विधी म्हणजे ब्रह्मदेव झाला.
महासाकारपिंडस्य मूर्त्यष्टकमिदं स्मृतम् ।
ब्रह्मण: प्राककृतं दृष्टवा नरनार्य्यात्मपिंडकम् ॥३७॥
साकार झालेल्या महापिंडाच्या या आठ मूर्ती आहेत. त्या ब्रह्मदेवापासून स्त्रीपुरुषरुप हे शरीर निर्माण झाले.
पंचपंचात्मकं तच्च शरीरमिदमुच्यते ।
अस्थित्वड:मांसलोमानि नाड्य: पृथ्व्यंशका इमे ॥३८॥
हे शरीर पंचवीस तत्त्वांचे आहे. हे पूर्वी केलेल्या कर्मानुरुप निर्मिले गेले आहे. शरीरातील अस्थी, त्वचा, मांस, केस व नाड्या म्हणजे शिरा ह्या सर्व गोष्टी पृथ्वीचा अंश होत.
लालामूत्रे असृकस्वेदौ शुक्रनित्यंशका अपाम् ।
क्षुधातृषालस्यनिद्राकान्तयोंऽशा विभावसो: ॥३९॥
शरीरातील लाळ मूत्र रयत, घाम व शुक्र हे जलाचे अंश आहेत म्हणजे जलापासून त्यांची निर्मिती झाली आणि भूक, तहान, आळस, निद्रा व कांती हे अग्नीचे अंश आहेत म्हणजे अग्नीपासून त्यांची निर्मिती झाली.
धावनं चलनं रोध: प्रसाराकुंचने तथा ।
वाय्वंशा उदिता एते पंच सिद्धान्तवेदिभि: ॥४०॥
धावणे, हलणे किंवा चलनवलन, अडविणे किंवा थांबविणे, प्रसरण व आकुंचन या पाच गोष्टी शरीरातील वायूच्या अंशामुळे होतात असे सिद्धान्तवेत्त्यांनी सांगितले आहे.
रागद्वेषो भयं लज्जा मोह एवं नभोगुणा: ।
इति प्राकृतपिण्डे स्यु: पंचभूतानि तद्गुणा: ॥४१॥
राग म्हणजे अनुराग किंवा प्रेम अर्थात् धन, पुत्र, स्त्री इत्यादि भोग्य विषयातील आसक्ती, द्वेष म्हणजे अप्रीती किंवा वैर अर्थात् प्रतिकूल पदार्थावर प्रेम नसणे, भीती, लज्जा, मोह म्हणजे अज्ञान अर्थात् वस्तूच्या सम्यक् स्वरुपाची माहिती नसणे हे शरीरातील आकाशाचे गुण किंवा अंश आहेत. अशा रीतीने प्राकृत म्हणजे प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या पिंडात म्हणजे देहात पंचमहाभूते व त्यांचे गुण किंवा अंश आहेत.
मनो बुद्धिरहंकारश्चितं चैतन्यमित्यथ ।
सिद्धसिद्धांन्तगैरुक्तमन्त:करणपंचकम् ॥४२॥
मन, बुद्धी, अहंकार, चित्त व चैतन्य असे अंत:करणपंचक (किंवा आतील इंद्रियांची पंचकडी) सिद्धसिद्धान्ततज्ज्ञांनी सांगितली आहे.
संकल्पश्च विकल्पश्च जडता मूर्च्छना तथा ।
मननं चेति संप्रोक्ता गुणा: स्यु: पंच मानसा: ॥४३॥
संकल्प म्हणजे एखादी वस्तू मिळण्याची इच्छा किंवा आशा, विकल्प म्हणजे संदेह किंवा संशयात्मक ज्ञान, जडता म्हणजे मंदपणा अर्थात् ग्रहण बुद्धीचा अभाव,मूर्च्छना म्हणजे मूढता किंवा मनाची अचेत अवस्था व मनन म्हणजे तर्कपूर्वक विचार करणे किंवा चिंतन करणे, हे मनाचे पाच गुण होत.
विवेकवैराग्य परा प्रशांतिक्षमा गुणा बुद्धिगता भवन्ति ।
मानो ममत्वं सुख:दु:खमोहा गुणा इमेहं कृतिवर्तिन: स्यु: ॥४४॥
विवेक म्हणजे वस्तूच्या स्वरुपाचा यथार्थ निश्चिय किंवा योग्यायोग्य विचारशक्ती, वैराग्य म्हणजे विषयसक्ती अर्थात् इहलोक व परलोकातील विषयांबद्दल चित्तात थोडीही आसक्ती नसणे किंवा हे सर्व विषय चित्तातून दूर होणे अगर विषयांबद्दल चित्त पूर्ण शांत होणे, शांती म्हणजे चित्तात चांचल्यादि दोष न राहणे व क्षमा म्हणजे दण्ड करण्याची शक्ती असतानाही अपराध सहन करणे, हे पाच गुण बुद्धीचे होत किंवा हे पाच गुण बुद्धीमध्ये राहतात. मान म्हणजे मोठेपणा मिळण्याची इच्छा,ममत्व म्हणजे वस्तूबद्दल आपुलकी किंवा माझेपणा,सुख,दु:ख व मोह म्हणजे मूढता, हे अहंकाराचे पाच गुण आहेत.
मतिर्धृति: संस्मृतिरुत्कृतिश्च स्वीकार इत्थं खलु पंच चैत्ता: ।
चैतन्यनिष्ठास्तु विमर्षहर्षो धैर्य गुणाश्चिन्तननि:स्पृहत्वे ॥४५॥
मती म्हणजे इच्छा, धृती म्हणजे धैर्य किंवा नियमन, संस्मृती म्हणजे संस्मरण किंवा संस्काराने उत्पन्न होणारे ज्ञान, उत्कृती म्हणजे ऊर्ध्वंकृती अर्थात् सहस्त्राराकडे जाण्याची कृती किंवा स्वभाव व स्वीकार म्हणजे ग्रहण करणे किंवा जाणणे, हे चित्ताचे पाच गुण आहेत. विमर्ष म्हणजे विशेष विचार,हर्ष म्हणजे आनंदी वृती, धैर्य चिंतन म्हणजे ध्यान व नि:स्पृहत्व म्हणजे निरिच्छता अर्थात् संसारातील भोगात आसक्त न होणे, हे पाच गुण किंवा धर्म चैतन्याच्या म्हणजे अंत:करणाच्या ठिकाणी असतात.
अंत:करणधर्मा ये त एते संप्रदर्शिता: ।
सत्त्वं रजस्तम: कालो जीवश्च कुलपंचकम् ॥४६॥
अशा प्रकारे मागे सांगितल्याप्रमाणे एकाच अंत:करणाचे वृत्तिभेदद्वारा मन, बुद्धी, अहंकार, चित्त व चैतन्य असे पाच विभाग करुन प्रत्येकाचे पाच गुण सांगून एकंदर पंचवीस गुणांचे निरुपण केले. सत्त्व, रज व तम हे तीन गुण आणि काल व जीव यांना कुलपंचक असे म्हणतात. (भाव, मन, बुद्धी व इंद्रिय इत्यादींच्या संचलनात यांची प्रधानता असते. त्यामुळे या पाचांना कुल म्हणजे प्रधान असे म्हटले आहे.)
दया धर्म: क्रिया भक्ति: श्रद्धेत्थं सत्त्वणा गुणा: ।
दानं भोगश्च शृंगार: स्वार्थादाने रजोगुणा: ॥४७॥
दया म्हणजे कारुण्य किंवा प्राणिमात्रावर कृपा करणे, धर्म म्हणजे नित्यनैमित्तिक कर्म अर्थात् सदाचार प्रवृत्ती, क्रिया म्हणजे देवताविषयक ध्यान, उपासना, मनन, चिंतनादि, भक्ती म्हणजे सर्व आचार-विचार किंवा धर्माधर्म भगवंताला अर्पण करणे व त्याच्या विस्मरणाने परमव्याकुळ होणे आणि श्रद्धा म्हणजे वेदादि वाक्यांवर विश्वास किंवा या लोकांव्यतिरिक्त परलोक इत्यादीही आहे अशी असणे हे सत्त्वाचे पाच गुण आहेत. दान म्हणजे भावी फलाच्या आशेने शुभ देश व काळ पाहून सत्पात्राचा विचार करुन यथाशक्ती धन, अन्न, वस्त्रादीचे केलेले दान, भोग म्हणजे सुंदर रुप, रस,गंध व स्त्री आदि विषयांमध्ये रममाण होण्याची इच्छा, शृंगार म्हणजे वस्त्र, भूषणादींनी शरीर सजविण्याची व नटण्याची इच्छा, स्वार्थ व आदान म्हणजे घेण्याची प्रवृत्ती अर्थात् दुसर्याच्या हानीचा विचार न करता किंवा त्याकडे लक्ष न देता फक्त आपल्या भोगाकरिताच वस्तू ग्रहण करणे, हे पाच रजोगुण आहेत.
मोहप्रमादौ निद्रा च हिंसाक्रौर्ये तमोगुणा: ।
विवाद: कलह: शोको बंधो वंचनमेव च ॥
एवं पंच गुणा: प्रोक्ता: कालस्य मुनिपुंगवै: ॥४८॥
मोह म्हणजे अज्ञान, प्रमाद म्हणजे असावधानता किंवा चुका, निद्रा, हिंसा व क्रूरता हे पाच तमोगुण आहेत. विवाद म्हणजे निष्कारण वादविवाद किंवा व्यर्थ कथन, कलह म्हणजे भांडण, शोक म्हणजे दु:ख किंवा संताप, बंध म्हणजे आपण जीवरुपाने संसारात अडकून पडलो आहोत अशी दृढ भावना व वंचना म्हणजे फसवेगिरी किंवा ढोंगीपणा, हे पाच गुण मुनिश्रेष्ठांनी कालाचे आहेत म्हणून सांगितले आहे.
जाग्रत्स्वप्नसुषुप्तितुर्य्यकतुरीयाऽतीतसंज्ञा गुणा: ।
जीवस्था इह कीर्तिता इति भवेजजीवेऽपि तत्पंचकम् ॥४९॥
जागृती म्हणजे इंद्रियजन्य ज्ञानाची अवस्था, स्वप्न म्हणजे बाह्य इंद्रिये शिथिल झाल्यावर वासनाद्वारा मनात अनेक वस्तूचे ज्ञान होणे, सुषुप्ती म्हणजे बाह्य इंद्रिये व मन यांच्या द्वारा ज्ञान होत नाही अशी गाढ झोप, तुरीयावस्था म्हणजे आपल्या आत्मस्वरुपाविषयीची एकाग्र चित्तवृत्ती अर्थात् ज्यावेळी अविद्येचे भान होणार नाही व द्वैतप्रपंचाचीही प्रतीती होणार नाही; मात्र केवळ आत्मविषयक मानसिक वृत्तीचा प्रवाह ज्या अवस्थेत असेल अशी जीवाची अवस्था व तुरीयातीतावस्था म्हणजे निर्विकल्प समाधी अर्थात् अंत:करणाच्या किंवा चित्ताच्या सर्व वृतींचा निरोध, असे जीवाचे पाच गुण आहेत.
इच्छा कर्म विमोहिनी प्रकृतियुक् वाक् चेति पंचाऽपि ते ।
व्यक्ताख्याधरशक्तिपंचगुणा: सन्तीति सिद्धान्तवाक् ॥५०॥
इच्छा कर्म विमोहिनी म्हणजे विशेष रीतीने मोहित किंवा आकृष्ट होणे, प्रकृती व वाणी हे व्यक्तनामक सामान्यशक्तीचे पाच गुण सिद्धांनी सिद्धांतवाणीने सांगितले आहेत.
उन्मेषो वासना वीप्सा चिंता चेष्टैच्चिका गुणा: ॥५१॥
उन्मेष म्हणजे प्रतिभा किंवा प्रातिभज्ञानाचे प्रकटीकरण अर्थात् इच्छारुपी कुंडलिनी शक्तीच्या जागृतीमुळे होणारे अंतर्ज्ञानाचे प्रकटीकरण किवा विकास, वासना म्हणजे भोगाची इच्छा, वीप्सा म्हणजे विशेष अपेक्षा, चिंता म्हणजे इष्टवस्तुप्राप्तीचा शोध अर्थात् अमुक वस्तू मला प्राप्त होणे शक्य आहे असे मनातील ध्यान व चेष्टा म्हणजे शरीरव्यापार किंवा क्रिया असे इच्छेचे पाच गुण आहेत.
स्मृत्युद्यमोद्वेगकार्य्यनिश्चयकारिणी क्रिया ।
मदमात्सर्यकपटकर्त्तव्यासत्यसंज्ञका: ॥५२॥
स्मृती म्हणजे स्मरण, उद्योग म्हणजे कार्याचा व्यापार, उद्वेग म्हणजे उदासीनता, कार्यनिश्चय व कर्म असे क्रियेचे पाच गुण (सिध्दांतवाद्यांनी) सांगितले आहेत. मद म्हणजे अभिमान, मात्सर्य म्हणजे दुसर्याची उन्नती सहन न होणे किंवा मत्सर, कपट म्हणजे ढोंग, अकर्तव्य म्हणजे आपले कर्तव्य न करणे व असत्य, हे मायेचे पाच गुण आहेत.
प्राकृता मायिका आशा तृष्णा कांक्षा स्पृहा मृषा ।
परास्ति पश्यंत्यथ मध्यमा च वैखर्य्यपीष्टाक्षरमातृका च ।
एते गुणा वाचि भवंति पंच प्रपंचनिर्मुक्तजनोपदिष्टा: ॥५३॥
आशा म्हणजे पुढील वस्तूची इच्छा, तृष्णा म्हणजे आपल्याजवळ असलेल्या भोगसाधनेपेक्षा अधिक भोगसाधनांची अपेक्षा, कांक्षा म्हणजे एखादी वस्तू आपल्याजवळ नेहमी राहावी अशी इच्छा, स्पृहा म्हणजे एखादी वस्तू आपल्यालाच मिळावी अशी अपेक्षा व मृषा म्हणजे असत्य किंवा मिथ्या अगर खोट्या वस्तूची इच्छा किंवा तत्संबंधी प्रतिपादन हे प्रकृतीचे किंवा मायेचे पाच गुण आहेत. परा म्हणजे मूलाधार चक्रात राहणारी, निर्विकल्प समाधीच्या द्वारा जाणली जाणारी व जेथे मनाची गती पोहोचू शकत नाही अशी अत्यंत श्रेष्ठ वाणी होय. पश्यंती म्हणजे जेव्हा परावाक् नाभिप्रदेशात येऊन स्थूल वर्णरुप धारण करते तेव्हा तिचे नाव पश्यंती होते. या पश्यंती वाणीशी मनाचाही संबंध राहतो. त्यामुळे योगी या पश्यंती वाणीला सविकल्प समाधीच्या द्वारा जाणून घेतो. मध्यमा म्हणजे ही पश्यंती वाणी हृदयामध्ये अधिकच स्थूल होऊन जेव्हा ती अकारादि वर्णसमुदाय व पदरुप धारण करते तेव्हा तिचे नाव मध्यमा होते. वैखरी म्हणजे मध्यमा वाणी जेव्हा मस्तकातून परत येऊन कंठ, दात, तालू, ओठ इत्यादींच्या आघाताने शब्दरुपाने प्रकट होते तेव्हा तिला वैखरी वाणी म्हणतात व अष्टाक्षरमातृका म्हणजे मातृका शक्ती ही अष्ट वर्गात प्रविष्ट होऊन ब्राह्मी आदि योगिनीरुप ग्रहण करते. समुदित रुपात या शक्तीलाच अष्टकेश्वरी असे म्हणतात. ब्रह्माणी, माहेश्वरी,ऐंद्री,कौमारी, वैष्णवी, वाराही, चामुण्डा व महालक्ष्मी ही अष्टमातृकांची नावे आहेत. अ, क, च, ट, त, प, य, श हे त्याचे अष्टवर्ग आहेत.
पंचविंशतिरेते स्युर्व्यक्तिशक्तिगुणा इह ।
कामकर्माग्निचंद्रार्का: प्रत्यक्षकृतिहेतव: ॥५४॥
(अशा प्रकारे व्यक्तिरुप पाच शक्तीचे वर्णन झाले. प्रत्येक व्यक्तिशक्तीतील पाच पाच गुणांचे वर्णन करुन) व्यक्तिशक्तीचे असे पंचवीस गुण या ठिकाणी सांगितले आहेत. काम, कर्म,अग्नी, चंद्र व सूर्य हे प्रत्यक्ष क्रियेला म्हणजे शरीर प्राप्तीला कारणीभूत असे (आणखी) पाच पदार्थ आहेत.
रति प्रीतिलीलातुरत्वाभिलाषा गुणा: पंच कामे वसन्तीत्यणंति ।
शुभ चाशुभं कीर्त्त्यकीर्त्ती तथेच्छागता: कर्मणि ब्रह्मनिष्ठास्तथा ते ॥५५॥
रती म्हणजे स्त्रीबद्दलचे प्रेम, प्रीती म्हणजे सुखसाधनाबद्दल प्रेम, लीला म्हणजे क्रीडा, आतुरता म्हणजे एखादी वस्तू आपल्याला लवकर मिळण्याची इच्छा व अभिलाषा म्हणजे कामना किंवा इच्छा हे पाच गुण कामाच्या ठिकाणी आहेत. शुभ, अशुभ, कीर्ती, अपकीर्ती किंवा अकीर्ती व इच्छा या गुणांचे वास्तव्य कर्मामध्ये आहे असे ब्रह्मनिष्ठ म्हणतात.
उल्लोलकल्लोलसमुच्चलत्वप्रोत्मादवत्यूर्मिविशेषवत्य: ।
विलेपयन्ती लहरीविलोला विलेलिहानप्रसरा प्रवृति: ॥५६॥
स्त्रवन्तिका नामवती प्रवाहा सौम्या प्रसन्नेति कला: सुधांशो: ।
उदीरता षोडश तस्य चान्या न वृत्तिसंज्ञामृतनाम तस्या: ॥५७॥
उल्लोलवती म्हणजे तरल किंवा चंचल, कल्लोलिनी म्हणजे मोठ्या तरंगांच्या आकाराची, समुच्चलत्ववती म्हणजे वर जाणारी, प्रोन्मादवती म्हणजे स्त्री-पुरुषांना विषेश रीतीने कामोन्मत्त करणारी,ऊर्मिविशेषवती म्हणजे विशेष उर्मी उत्पन्न करणारी, विलेपयन्ती म्हणजे अंगाला चर्चिणारी किंवा लावणारी, लहरी म्हणजे वक्रगतीने लहरणारी, विलोला म्हणजे विशेष चंचल रुपाची, विलेलिहान म्हणजे रसादीना चाटणारी, प्रसरा म्हणजे पसरणारी, प्रवृत्ती म्हणजे प्राण्यांच्या ठिकाणी हर्षशोकादि उत्पन्न करणारी व पिंडबह्मांडाची प्रवृत्ती करणारी, स्त्रवन्तिका म्हणजे पाझरणारी, नामवती म्हणजे नाम असणारी, प्रवाहा म्हणजे वस्तूला म्हणजे चंद्रकांत इत्यादि मण्यांना पाझर फोडून तो वर सोमरसाचा वर्षाव करणारी व प्रसन्नता म्हणजे सर्व वस्तूंना निर्मळ करणारी अगर स्वत:अ निर्मळ रुपाची अशा चंद्राच्या सोळा कला आहेत. या सोळा कलांच्या पलीकडे असलेली व कोणत्याही वृत्तींनी युक्त नसलेली अशी अमृत नावाची चंद्राची सतरावी कला आहे.
तापिनी ग्रासिनी क्रूरा क्रूंचनी शोषणी तथा ।
बोधिनी घस्मराकर्षिण्यर्थसन्तुष्टिवर्द्धिनी ॥५८॥
ऊर्मिरेखा किरणिनी प्रभावत्यंशुमालिन: ।
इमा कला द्वादश स्युरन्याप्यस्ति प्रकाशिका ॥५९॥
तापिनी म्हणजे तापविणारी किंवा तप करणारी, ग्रासिनी म्हणजे अंधकाराचा नाश करणारी अगर अंधकार गिळणारी, क्रूरा म्हणजे अत्यंत उग्र अर्थात् आपल्या तेजाने फुलादींना सुकविणारी, क्रुंचनी म्हणजे अर्थात् संकोच किंवा आकुंचन करणारी, शोषणी म्हणजे पाणी इत्यादि सुकविणारी किंवा त्यांचे आकर्षण करणारी, बोधिनी म्हणजे कमलादि पुष्पे उमलविणारी, धस्मरा म्हणजे स्मरणरुप ज्ञान उत्पन्न करणारी, आकर्षिणी म्हणजे पृथ्वीवरील पाणी इत्यादि आपल्याकडे खेचणारी, अर्थसंतुष्टवर्धिनी म्हणजे सर्वार्थाने सर्व प्राण्यांचा संतोष वाढविणारी, ऊर्मिरेखा म्हणजे प्राण्यांच्या आयुष्याचे मोजमाप करणारी, किरणवती म्हणजे किरणांचा विस्तार करणारी व प्रभावती म्हणजे प्रकाश करणारी, अशा सूर्याच्या बारा कला असून प्रकाशिका म्हणजे स्वत:चा प्रकाश करणारी ही सूर्याची स्वत:ची अशी तेरावी स्वतंत्र कला आहे.
वीजिनी दीपिका ज्वाला विस्फुलिंगा प्रचंडिका ।
पाचिका रौद्रिका दाहा रोचिनी शोषिणीति ता: ॥६०॥
कला दश भवन्त्यग्नेर्ज्योतिर्निजकला परा ।
इति प्रत्यक्षकारिणो गुणा: स्यु: सिद्धसंमता: ॥६१॥
वीजिनी म्हणजे सूर्य, दीपिका म्हणजे प्रकाशित करणारी, ज्वाला म्हणजे अग्नीच्या शिखा, विस्फुलिंगा म्हणजे अग्नीच्या ठिणग्या उधळणारी, प्रचंडिका म्हणजे अत्यंत उग्र रुप धारण करणारी, पाचिका म्हणजे शिजविणारी व पचविणारी, रौद्रिका म्हणजे रुद्रासारखे भयंकर रुप असलेली, दाहा म्हणजे काष्ठादि इंधन जाळणारी, रोचिनी म्हणजे तेजस्वी, दीप्तिमान, चकचकीत, प्रकाशित करणारी व सुंदर आणि शोषिणी म्हणजे शोषण करणारी, सुकविणारी किंवा वाळविणारी अगर भस्म करणारी. अशा अग्नीच्या दहा कला असून ज्योती नावाची त्याची स्वत:ची अशी अकरावी श्रेष्ठ कला आहे. अशा प्रकारे सिद्धांना संमत असलेले हे प्रत्यक्षकारी गुण सांगितले आहेत. (येथपर्यंत वर सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्षकरण व त्यांच्या प्रत्येकाचे पाच पाच गुणांचे निरुपण मिळून पंचवीस गुणांचे अर्थात् कलांच्या समूहाचे वर्णन झाले.)
द्वाराणि द्वादशोक्तानि नाडीनां यानि तान्यथ ।
दर्श्यन्ते सिद्धसिद्धान्तनिर्णीतानि यथामतम् ॥६२॥
नाड्यांची दहा द्वारे व नाड्यांचे वर्णन सिद्धसिद्धान्तवेत्यांनी निर्णयपूर्वक अशा प्रकारे केले आहे.
इडापिंगले नासिकारंध्रगे द्वे सुषुम्णा भवेत्तालुमूलेजरंध्रम् ।
समे तावधीकृत्य गांधारिकाख्या तथा हस्तिजिहवा श्रवोयुग्मके स्यात् ॥६३॥
इडा म्हणजे वास किंवा चंद्र अर्थात् डाव्या नाकपुडीतून जाणारी नाडी व पिंगला म्हणजे दक्षिण किंवा सूर्य अर्थात् उजव्या नाकपुडीतून जाणारी किंवा वाहणारी नाडी होय. अशा या दोन्ही नाकपुड्यातून जाणार्या दोन नाड्या आहेत म्हणजे नासापुटात त्यांचे स्थान आहे. या दोन नाड्यांच्यामध्ये सुषुम्ना नावाची ब्रह्मनाडी आहे. ती मूलाधारातून निघून मेरुदंडद्वारा तालुमार्गाने ब्रह्मरंध्रापर्यंत जाते. तालुमूलातील ब्रह्मरंध्र हे सुषुम्नेचे स्थान आहे (किंवा शक्तीला शिवाशी समरस होण्याकरिता मोकळे द्वार आहे.) गांधारी व हस्तिजिह्ववा या नाड्याही मूलकंदापासून निघून आपापल्या स्थानांमधून जात जात शेवटी दोन्ही कानांच्या द्वारा वाहतात किंवा प्रगट होतात.
भवेच्छंखिनी लिंगवक्त्रादिदंडाध्वनापद्मजद्वारमाप्ताथ पूषा ।
तथालम्बुषा चक्षुषो: संतगास्यग्रगा स्यात्पयस्विन्यपाने कुहूश्च ॥६४॥
शंखिनी नाडी मूलकंदापासून निघून लिंगद्वारात राहते किंवा लिंगद्वारा प्रकट होते व सुमेरु दंडमार्गाने किंवा स्वरमार्गाने ब्रह्मद्वारापर्यंत वाहते. पूषा व अलंबुषा या दोन नाड्या मूलकंदापासून निघून आपापल्या स्थानातून जात जात शेवटी डाव्या व उजव्या नेत्रातून किंवा नेत्राच्या द्वारा प्रकट होतात किंवा वाहतात. या प्रकारे पयस्विनी नाडी मुखाच्या किंवा जिव्हेच्या रुपाने प्रकट होऊन वाहते व कुहू नावाची नाडी गुदद्वाराने प्रकट होऊन वाहते.
दश नाड्यो दशद्वारवर्तिन्य इति कीर्तिता: ।
द्वासप्ततिसहस्त्राणि नाड्योऽन्या रोमकूपगा: ॥६५॥
अशी ही दहा नाड्यांची दहा द्वारे सांगितलेली प्रसिद्ध आहेत. शिवाय ७२ हजार नाड्या रोमकूपासून निघालेल्या आहेत. अर्थात् मूलकंदापासून निघून या सर्व नाड्या सर्व शरीरात पसरलेल्या आहेत.)
हृदि प्राणो गुदेऽपानो नाभिगामी समानक ।
उदान: कंठनिलयो व्यानस्तालुसमाश्रय: ॥६६॥
हृदयात प्राणवायू, गुदस्थानी अपानवायू, नाभिस्थानी समानवायू, कंठाच्या ठिकाणी उदानवायू व टाळूच्या ठिकाणी व्यानवायू राहतो. (हे मुख्य पंचप्राण आहेत.)
सर्वांगव्यापको नाग: कूर्मोऽक्ष्णि कृकलो नसि ।
देवदतो मुखाग्रस्थ: कंठाध: स्याद्धनंजय: ॥६७॥
नागवावू सर्वांगव्यापी असून कूर्मवायू डोळ्यांमध्ये, कृकलवायू नाकामध्ये, देवदत्तवायू मुखाच्या अग्रभागामध्ये व कंठाच्या खालील भागात धनंजयवायू राहतो. (हे पाच उपप्राण आहेत.)
आहारकांक्षक: पूर्वो द्वितीय: स्तंभकुंभक: ।
तृतीये दीपनं पाकस्तुर्ये नाडीविशोधनम् ॥६८॥
प्राणवायू हा आहाराची अपेक्षा करतो अपानवायू हा स्तंभन करणारा म्हणजे कुंभकाला साहाय्य करणारा आहे. तिसरा समानवायू हा अग्नी प्रदीप्त करणारा अर्थात् जठराग्नीला उद्दीप्त करुन अन्नाचे पचन करणारा आहे. चवथा उदानवायू हा नाड्यांची शुद्धी करणारा आहे.
आप्यायनं रुचिश्वैव पंचमेऽशनजल्पने ।
मोडनोच्चाटने षष्ठे मेषोन्मेषौ च सप्तमे ॥६९॥
पाचवा व्यानवायू हा देहपुष्टी, रुची,अन्नभक्षण व भाषण या गोष्टी करणारा आहे. सहाव्या नागवायूमुळे शरीराचे उत्प्रेक्षण व भाषण या गोष्टी करणारा आहे. सहाव्या नागवायूमुळे शरीराचे उत्प्रेक्षण म्हणजे उसळणे किंवा उडी मारणे, मोटन म्हणजे बाकदार होणे किंवा वाकणे व सांध्यांची घडी वगैरे होणे या क्रिया होतात. सातव्या कूर्मवायूमुळे डोळ्यांची उघडझाप होते.
क्षुदुद्गारावष्टमे स्तां जृंभणं नवमे भवेत् ।
दशमे नादघोषौ तु स्युरेते दश वायव: ॥७०॥
आठव्या कृकल वायूमुळे भूक लागते व त्यामुळेच ढेकरा येतात. (हा प्राणवायूचा मदतनीस आहे.) देवदत्तवायूमुळे जांभई येते. धनंजयवायूमुळे नाद व घोष अर्थात् अव्यक्त शब्द उत्पन्न होतात. (हा कंठात राहून उदानवायूला मदत करतो.) याप्रमाणे दहा वायूंची स्थाने व कामे आहेत.
अवलोकनपिण्डस्य समुत्पत्तिरितीरिता ।
नरनारीरुपमाहुरिदमेव मुनीश्वरा: ॥७१॥
आपल्याला दिसणार्या किंवा प्रत्यक्ष होणार्या पिंडाची अगर देहाची उत्पत्ती अशी सांगितली आहे. स्त्री व पुरुष यांचे हे रुप आहे. असे मुनीश्वर म्हणतात.
गर्भपिण्डसमुत्पत्तिमथ वक्ष्यामि संमताम् ।
ऋतौ स्त्रीतरयोर्योगे जीवो बिंदुरजाधयात् ॥७२॥
आता शास्त्रसंमत अशी गर्भपिंडोत्पत्ती सांगतो. ऋतुकाली स्त्रीपुरुषांचा संगम होऊन रज व शुक्र यांच्या आश्रयाने जीव स्त्री शरीरात येतो.
पूर्वस्मिन् कलिलं ततो रविदिनै: स्याद् बुद्बुदाभं तत: ।
पक्षाद्गोलकसन्निभं कठिनताभाडमासमात्राद्भवेत् ॥
तद्द्वंद्वेन शिरस्त्रिभि: करपदाद्यं स्याच्चतुर्भि: श्रुती ।
नेत्रे घ्राणगुदास्यमेढ्रकमथो पृष्ठोवरं पंचभि: ॥७३॥
आरंभी स्त्रीच्या गर्भातील जीवाला कललावस्था म्हणजे लांबट बुडबुड्याच्या आकृतीसारखा आकार मिळतो किंवा या जीवाची सुरुवातीला कलल म्हणजे फेसासारखी अवस्था असते. नंतर क्रमश:च सात दिवसांनी तो गोलाकार होतो. नंतर त्या मिश्रणाला काठिण्य यावयास एक महिन्याचा काळ जावा लागतो. दोन महिन्यांनी या गोलाकार पिंडाला मस्तक येते. तिसर्या महिन्यात हात,पाय, इत्यादि अवयव उत्पन्न होतात. चवथ्या महिन्यात कान, डोळे, नाक, गुदा, मुख व मेढ्र म्हणजे मूत्रेंद्रिय येते. पाचव्या महिन्यात पाठ व पोट उत्पन्न होते किंवा तयार होते.
षडभिगत्रिरुहाणि सप्तभिरथो त्याच्चेतनालक्षणा -।
न्यष्टाभिर्यदि जायते सुविरहस्तत्तत्त्वलाभस्तत: ॥
मासेज्ञो दशमेऽथ योनिसमयाच्छुक्राधिकत्वे पुमान् ।
शुक्रस्याधिकतान्वये तु वनिता साम्ये तयो: क्लीबक: ॥७४॥
सहाव्या महिन्यात नखे, केस व रोमादि हे उत्पन्न होतात. नंतर सातव्या महिन्यात गर्भाच्या ठिकाणी चैतन्य येते. (हे अगोदर असतेच पण सातव्या महिन्यापासून चेतनाज्ञान आधिक्याने जाणवते.) आठव्या महिन्यात त्याची उत्पत्ती झालीच तर प्राय: ते जगत नाही. त्यानंतर (नवव्या महिन्यात) गर्भाला स्थैर्य लाभते. दहाव्या महिन्यात योनिद्वारे जीवाची, गर्भाची किंवा बालकाची उत्पती होते. स्त्रीपुरुष संयोगानंतर स्त्रीच्या गर्भाशयात शुक्राचे आधिक्य झाल्यास पुरुष शरीर, स्त्रीच्या रजाची अधिकता झाल्यास स्त्री शरीर व शुक्ररजांचे प्रमाण समान झाल्यास नपुंसक शरीराची उत्पत्ती होते.
अन्योन्यचित्तप्रतिकूलभावात् स्त्रीपुंसयोर्वामनकुब्जखंजा: ।
अंधादयोंगाविनिपीडना स्याद्रेतोविभावात्सुतयुग्मता च ॥७५॥
विषयसेवनकाली, रतीकाली किंवा संभोगकाली पतीपत्नीच्या चित्तात प्रतिकूल भावना असेल किंवा ते चिंतायुक्त असतील तर ठेंगणा, कुबडा व लंगडा असा जीव किंवा पिंड जन्माला येतो. रतीसमयी अवयवांचे अयोग्य निपीडनादि झाल्यास अपत्याला अंधादि अवस्था येते. संभोगसमयी योनीत पडणार्या वीर्यात विभाग पडल्यास युग्म गर्भोत्पत्ती अर्थात् जुळी मुले किंवा आवळेजावळे होते.
शुक्रं सार्द्धपलत्रयं निगदितं रक्तं पलाविंशति: ।
तस्यार्द्ध खलु मेदसोरविपला मज्जा शतं मांसकम् ॥
पित्तं रावणवक्त्रसंसितपलं षष्ट्युत्तरा स्याच्छत -।
त्रय्यन्थामथ संधयस्तुदुपमा: सार्द्धत्रिकोट्य: कचा: ॥७६॥
(शरीरातील द्रव्यांची प्रमाणे या श्लोकात पुढीलप्रमाणे सांगितली आहेत.) शुक्र ३॥, रक्त २० तोळे, मेद १० तोळे, मज्जा १२ तोळे, मास १०० तोळे, पित्त १० तोळे, ३६० अस्थी, तितक्याच संधी व ३॥ कोटी केस या शरीरात असतात.
मज्जास्थिमेदांसि सशुक्रकाणि भवन्ति वीर्य्याज्जनकस्य पुत्रे ।
मांसासृजी गात्ररुहाणि वात: पित्तं कफस्तद्द्वययोगत: स्यात् ॥७७॥
मज्जा, अस्थी,मेद व शुक्र हे पदार्थ पित्याच्या वीर्यामुळे पुत्रामध्ये उत्पन्न होतात आणि मांस, रक्त, केस, वात, पित्त व कफ हे पदार्थ दोघांच्या (माता-पित्यांच्या) संयोगाने उत्पन्न होतात.
दशधातुमयो देह इत्थं भवति निश्चित: ।
गर्भपिंडोत्पत्तिरेवं सिद्धसिद्धांन्तसंमता ॥७८॥
अशा रीतीने हा देह दहा धातूंनी युक्त आहे हे निश्चित ठरले आहे. याच प्रकारे गर्भपिण्डाची उत्पत्ती होत असून ती सिद्धसिद्धान्तसंमत आहे.
॥इति सिद्धसिद्धान्तसंग्रहे षडविधपिण्डोत्पत्तीचा प्रथम उपदेश आहे.