सिद्धसिद्धांन्तसंग्रह - पंचमोपदेश

काशीचे पण्डित बलभद्र यांनी १८व्या शतकाच्या शेवटी  सिद्ध-सिद्धांत पद्धति ग्रंथ संक्षिप्त करून सिद्ध सिद्धांत संग्रह नामक ग्रंथ लिहीला होता.


मम रसकरणं यदाम्यथाहं परमपदाखिलपिंडयोरिदानीम्‍ ॥
यदनुभवबलेन योगनिष्ठा इतरपदेषु गतस्पृहा भवंति ॥१॥
यानंतर परमपद-मोक्ष आणि सर्व प्राणिदेह यांच्या एकरुपतेविषयी मी वर्णन करुन सांगतो. या अनुभवाच्या बलाने योगिसाधक इतर स्वर्गसंसारादि सौख्यांविषयी निरिच्छ होतात.

परपिंडसुखं स्वपिंडकांतं प्रथमोक्तक्रमतो विधाय चित्ते ।
परमेण पदेन तस्य कुर्य्याद्रससाम्यं मतिमान्‍ गुरुक्तिदृष्टया ॥२॥
पूर्वप्रकरणात सांगितल्याप्रमाणे, दुसर्‍या देहातील सुख आपल्या देहातही आहे, असा भाव चित्तात ठसवून त्या चित्ताचा म्हणजे कुंडलिनी शक्तीचा परमपदाच्या रसास्वादाशी समत्वलाभ साधावा म्हणजे सामरस्य घडून यावे, यासाठी सांप्रदायिक गुरुवचनाची अर्थात्‍ शब्दद्वारा होणार्‍या शक्तिपाताची नितांत आवश्यकता आहे.

परमं पदमात्मवेद्यमेकं निखिलात्यन्तविभासि मात्रमुक्तम्‍ ॥
अयमर्थ उदाहृतोऽस्ति दृष्टो जठराख्याधरसंहितानिबंधे ॥३॥
परमपदाचे ज्ञान हे स्वसंवेद्य म्हणजे स्वत:च स्वत: जाणण्यास योग्य असे आहे व ते पदच सर्वांचे आभासक म्हणजे पिंडब्रह्मांडाच्या उभारणीचा भास दाखविणारे आहे. जठराख्याधरसंहिता निबंधात हाच अर्थ उद्‍धृत केला आहे.

यथा -
यत्र बुद्धिर्मनो नास्ति सत्ता संवित्परा कला ।
ऊहापोहौ न तर्कश्च वाचा तत्र करोति किम्‍ ॥४॥
ते असे आहे. ती संविदूप श्रेष्ठ कुंडलिनी शक्ती अशी आहे की, जेथे बुद्धी, मन, ऊहापोह व तर्क यांचे काहीच चालत नाही; तेथे या वाणीचे कथाच काय ?

वाडमात्राद्‍ गुरुणा सम्यक्‍ कथं तत्पदमीर्य्यते ।
तस्मादुक्तं शिवेनैव स्वसंवेद्यं परं पदम्‍ ॥५॥ इति ॥
गुरुने केवळ वाणीने (म्हणजे ज्या वाणीत अर्थात्‍ शब्दात शक्तिपाताचे म्हणजे शब्दद्वारा शक्तिसंक्रमणाने अनादि आत्मसत्तारुप कुंडलिनी शक्ती जागृत करुन, तिचे सुषुम्नामार्गाने ऊर्ध्वचालन करुन, सहस्त्रारात शिवाशी सामरस्य घडवून आणण्याचे सामर्थ्य नसेल अशा वाणीने) सांगून त्या पदाचे ज्ञान कसे होईल ? याचे उत्तर होणार नाही असेच आहे. म्हणूनच श्रीशिवाने ते पद स्वसंवेद्य आहे असे म्हटले आहे.

नानाविचारचातुर्य्यचर्चाधिक्यादनाश्रयात्‍ ।
निरुपाधितयोपाधिशून्यत्वात्तत्स्ववेद्यता ॥६॥
ही चित्‍शक्ती कुंडलिनी स्वसंवेद्य कशी आहे याबद्दलची कारण परंपरा पुढीलप्रमाणे आहे. या कुंडलिनी शक्तिविषयी अनेकविध विचारचातुर्याने बरीचशी चर्चा झाली असूनही ही शक्ती अनाकलनीयच राहिली. त्याचप्रमाणे या कुंडलिनी शक्तीला दुसर्‍या कुणाचाही आधार नाही; (कारण ही शक्तीच सर्वांना आधारभूत आहे.) हिला कसलीही उपाधी नाही; कारण ही शक्ती सर्व उपाधीपासून मुक्त आहे. या सर्व कारणांमुळे ही कुंडलिनी शक्ती स्वसंवेद्य आहे.

पारंपर्य्याप्तसन्मार्गदर्शने यस्य योग्यता ।
स गुरुर्भवति श्रीमानात्मविश्रामकारणम्‍ ॥७॥
परंपरेने प्राप्त असलेल्या सन्मार्गाचे ज्ञान करुन देण्याची म्हणजे परंपरेने प्राप्त झालेल्या शक्तिपाताच्या सामर्थ्याने शक्तिसंक्रमणद्वारा शिष्यशक्तिप्रबोधनाची ज्याची योग्यता असेल तोच गुरुपदवीस योग्य होय; कारण तोच या जडजीवाला आत्मविश्रांती प्राप्त करुन देऊ शकतो किंवा कारणीभूत होतो.

तेन संदर्शिते मार्गे स्वसंवेद्यस्य दर्शनम्‍ ।
भवतीति गुरुं देवभावेन परिचिंतयेत्‍ ॥८॥
तशा गुरुमाउलीने दाखविलेल्या मार्गानेच म्हणजे अंत:शक्तीच्या उद्‍बुद्ध साधनाधारानेच स्वसंवेद्य आत्मस्वरुपाचे दर्शन अर्थात्‍ ज्ञान होते; म्हणून त्या गुरुमाउलीचे देवभावनेने नेहमी चिंतन करावे.

तद्‍दृकसरोजकरुणार्द्रकटाक्षपातात्‍
स्वात्मैकवेद्यकतया मुनिभि: स्वपिंडम्‍ ॥
सर्वं स्वसिद्धिफलवर्गमपास्य लब्धनैरुत्थ्यत:
समरसं क्रियते कृतार्थै: ॥९॥
सद्‍गुरुंच्या नेत्रकमलांच्या दयार्द्रकटाक्षपाताने म्हणजे दृक्‍दीक्षीने होणार्‍या शक्तिपाताने योगसाधक मुनिलोकांनी स्वात्मज्ञानाने नानाविध अणिमादि सिद्धींचे फल दूर सारुन स्वचित्ताचे म्हणजे मूलाधारस्थ कुंडलिनी शक्तीचे निरुत्थान म्हणजे सुषुम्नेतील नि:शेष उत्थान म्हणजे चालन किंवा ऊर्ध्वगमन साधून स्वपिंडाला म्हणजे जागृत कुंडलिनी शक्तीला आत्म्याशी समरस करुन कृतकृत्यता साधली आहे व यापुढेही साधतील.

सिद्धान्तमेतमनुशास्य निरुत्थितिश्री-
लाभाभ्युपायकथनं कुरुतेऽथ यत्नम्‍ ।
स्वस्वाशयप्रलयकर्ममुखानुसंधे -
रावेशतो भवति कश्चन तत्र नैज: ॥१०॥
एखादाच साधक या सिद्धांताल आत्मसात करुन निरुत्थानरुपी ऐश्वर्यलाभासाठी म्हणजे जागृत शक्तीमुळे प्राप्त होणार्‍या महान्‍ ऐश्वर्य प्राप्तीसाठी किंवा निरुत्थान स्थितीच्या ज्ञानासाठी प्रयत्न करतो. या साधकाच्या स्वत:च्या अंत:करणाची निर्मनस्क स्थिती किंवा निश्चलता त्याला त्याच्या पूर्वकर्मानुसंधानाच्या ज्ञानावेशाने साधते.

निजावेशान्नित्यंनिबिडतमनैरुत्थ्यविधिव-
न्महानंदावस्था स्फुरति वितता कापि सततम्‍ ।
तत: संविन्नित्यामलसुखचमत्कारगमक-
प्रकाशप्रोद्बोधो यदनुभवतो भेदविरह: ॥११॥
नेहमी निजावेश साधू लागला म्हणजे सुषुम्नेत कुंडलिनी शक्तीचे चालन होऊ लागले की, अत्यंत घोरतम अंधकाराच्या अवस्थेपासून जीवाचे नि:शेष उत्थान होते. (म्हणजेच जीवाला प्रकाशाची किंवा ज्ञानाची प्राप्ती होते.) अशा प्रकारे दृढ किंवा गाढ असे चित्ताचे अनुत्थान साधल्यामुळे जीवाला निरतिशय आनंदावस्थेचा लाभ होतो, म्हणजे त्या आनंदाचे नेहमी स्फुरण होत राहते. त्यानंतर ज्ञानाच्या सातत्यामुळे निर्मलानंदरुपी चमत्काराचे गमक म्हणून ज्ञानप्रकाशाचा उदय होतो व त्यामुळे जीव आणि परमात्मा यांच्यातील भेददृष्टी दूर होते म्हणजे सहस्त्रारात शिवशक्तीचे मीलन किंवा सामरस्य होऊन अद्वैतसिद्धी होते.

साक्षात्तयास्य कलनात्‍ स्फुरति प्रकामं
चैतन्यभासकमभिन्नमपारमंके ।
पुंस: पदं परमनाम समभ्युदेति
यस्यानुभूतिबलतो निजपिंडवित्ति: ॥१२॥
असा साक्षात्कार वरचेवर होऊ लागला की, चैतन्याचे, आभासक असे भेदरहित किंवा अभिन्न ज्ञान नेहमी स्फुरते व ते करतलातील आवळ्याप्रमाणे आपल्या अधीन होऊन राह्ते. त्यामुळे त्या साधकामध्ये परमपद-मोक्षाचा अभ्युदय होऊ लागतो व त्या ज्ञानबलाने त्याला स्वपिंडाचे म्हणजे देहाचे किंवा शरीराचे अथवा कुंडलिनी शक्तीचे यथायोग्य ज्ञान होते.

विज्ञाय पिंडमथ सम्यगिति प्रकारा-
दारात्पदे परमनामनि तद्‍ विधाय ।
ऐक्यं विधाय निजरश्मिपरावृतात्मा -
श्वभ्याससून्मिषिरुदेति ततो द्वितीया ॥१३॥
अशा रीतीने पिंडाचे म्हणजे अनादि आत्मसत्तारुप कुंडलिनी शक्तीचे उत्तम ज्ञान झाल्यानंतर परमपदाच्या ठिकाणी तिचे ऐक्य करुन ज्ञानवृत्ती अंतर्मुख करण्याचा अभ्यास वारंवार केल्यास उन्मेष उदय पावतो. ही दुसरी अवस्था होय.

तदुन्मेषप्रत्याहरणभवमाहु: समरस-
क्रियाभूतं यस्मान्निजकिरणपुंजं निजतया ।
प्रपश्यन्तस्तस्मान्निखिलमनुसंधाय मुनय: ।
स्वरुपेऽगीकृत्य स्वत: फलसिद्धयै व्यवस्थिता: ॥१४॥
याच उन्मेषाचा प्रत्याहार समरसतेला उत्पन्न करतो व सामरस्यक्रियेपासून ज्ञानप्रकाशाचा पुंज किंवा समुदाय उत्पन्न होतो. मुनी याच ज्ञानाला आत्मस्वरुपाच्या ठिकाणी अंगीकृत किंवा विलीन करुन स्वत: फलसिद्धीसाठी उद्युक्त होतात.

मुनीनां पिंडसंसिद्धौ सिद्धय: संति संन्निधौ ।
एतमर्थं विनिश्चित्य कश्चिश्छ्‍लोकेन चोक्तवान्‍ ॥१५॥
मुनींना म्हणजे योगिजनसाधकांना पिंडसिद्धी अर्थात्‍ कुंडलिनी शक्तीचे सुषुम्नाचालन व नि:शेष उत्थान प्राप्त झाले की, नानाविध सिद्धी त्यांना हस्तगत झाल्याप्रमाणेच आहेत. हाच अर्थ श्लोकाधारे सांगितला आहे.

यस्मिन्‍ ज्ञाते जगत्सर्वं प्रसिद्धं भाति लीलया ।
सिद्धय: स्वयमायांति तस्माज्ज्ञेयं परं पदम्‍ ॥१६॥
जे जाणले असता सर्व जगताचे सहजच अनायासे ज्ञान होते व सिद्धी स्वत: त्याच्याकडे येतात म्हणून परमपदाचे ज्ञान करुन घेणे आवश्यक आहे.

सहजं संयमयुतं सोपायं साद्वयं क्रमात्‍ ।
ज्ञानं संसाधयेतच्च स्वविश्रांतिरितीरितम्‍ ॥१७॥
सहज, ससंयम, सोपाय व साद्वय अशी ज्ञानाची चार विशेषणे क्रमश सांगितली आहेत. या ज्ञानाची सिद्धी झाली म्हणजे मानवाला पूर्ण विश्रांतीचा लाभ होतो अर्थात्‍ त्याची सर्व धावपळ थांबते.

विश्वातीत: परेशानो विश्वरुपेण तिष्ठति ।
इत्येकं सहजं त्वन्यद्विश्वस्यात्मनि दर्शनम्‍ ॥१८॥
परमेश्वर हा सर्व विश्वातीत असून विश्वरुपाने राहिला आहे. हे एक सहज ज्ञान होय व आत्म्याच्या ठिकाणी सर्व विश्व पाहणे किंवा विश्वात आत्मा पाहणे हेही दुसरे तितकेच सहज ज्ञान होय.
प्रस्फुरद्रूपवृत्तीनां कृत्वा संयममात्मनि ।
यद्धारणं यदेवात्र ससंयममिति स्मृतम्‍ ॥१९॥
प्रकर्षाने अर्थात्‍ उत्कटत्वाने स्फुरणरुप म्हणजे स्फुरणाच्या रुपाने उसळणार्‍या वृत्तींचा आत्मरुपात संयम करुन त्याना तेथेच धारण करणे हेच ससंयम ज्ञान होय.

प्रकाशमयमात्मानं स्वयमेव स्वरुक्त: ।
एकीकृत्य सदा लौल्यात्स्थिति: सोपायशब्दभाक्‍ ॥२०॥
प्रकाशमय आत्म्याला स्वत:च स्वरुपात एकरुप करुन नेहमी त्याच अपेक्षेत अर्थात्‍ अवस्थेत राहणे यालाच सोपाय ज्ञान म्हणतात.

अजातिमत्त्वदृक्‍ प्राज्ञै: द्वितीयमिति स्मृतम्‍ ।
चत्वार एते भावा: स्यु: परमोदयहेतव: ॥२१॥
बुद्धिमान लोकांनी हे ज्ञान जातिजन्मादिरहित आहे अशा समजुतीला साद्वय असे संबोधिले आहे. या ज्ञानाच्या चार अवस्था परम-उदयाला साद्वय असे संबोधिले आहे. या ज्ञानाच्या चार अवस्था परम-उदयाला कारणीभूत आहेत.

तथा च परमो योगी सुतृप्तो निर्विकल्पक: ।
सदा निरुत्थापनया तिष्ठतीति प्रसिद्धयति ॥२२॥
हे ज्ञान आत्मसात्‍ केलेला योगी पूर्णतृप्त, निर्विकल्प म्हणजे संकल्परहित, स्थिरचित्त अर्थात्‍ कुंडलिनी शक्तीच्या नि:शेष उत्थापनाने सहस्त्रारात शिवाशी समरस झालेला व सिद्धसिद्धी प्राप्त झालेला असा होतो.

परमस्य पदस्याप्तौ साधनं केनचित्‍ पुरा ।
यत्र श्लोकाष्टके प्रोक्तं तदिदं दृश्यतामिह ॥२३॥
पूर्वी कोणा एका सिद्धाने परमपदप्राप्त्यर्थ आठ श्लोकांनी साधने सांगितली आहेत. ती पुढीलप्रमाणे होत.

सहजं स्वात्मसंवित्ति: संयम: सर्वनिग्रह: ।
सोपायं स्वस्वविश्रांतिरद्वैतं परमं पदम्‍ ॥२४॥
सहज, स्वात्मसंवित्ती अर्थात्‍ स्वत:च्या आत्मशक्तीने युक्त, संयम, सर्वनिग्रह, सोपाय, स्वत:च स्वत:त विश्रांती घेणारे व अद्वैत असे हे परमपद आहे.

ज्ञात्वैवं सद्‍गुरोर्वक्त्रान्नान्यथा शास्त्रकोटिभि: ।
न कर्तृत्वान्न विज्ञानान्न बलाद्वेदपाठनात्‍ ॥२५॥
हे परमपद केवळ गुरुमुखानेच म्हणजे श्रीसद्‍गुरुमुखातून निसृत झालेल्या शब्दांच्या द्वारा होणार्‍या शक्तिपाताने किंवा शक्तिसंक्रमणाने होणार्‍या कुंडलिनी शक्तीच्या उत्थानानेच समजू शकते. अनेक प्रकारच्या शास्त्राध्ययनाने, स्वकर्तृत्वाने, विज्ञानाने, सामर्थ्याने, वेदपठनाने किंवा इतर कोणत्याही उपायाने हे समजू शकत नाही.

न ज्ञानान्न च वै लक्ष्यात्कर्त्राभ्यासान्न वासनात्‍ ।
न वैराग्यान्न नैराशाद्‍ घटनात्प्राणधारणात्‍ ॥२६॥
ज्ञानाने, वैलक्षण्याने, कर्माभ्यासाने, अपेक्षा केल्याने, वैराग्याने, नैराश्याने, कायक्लेशाने व प्राणायामाने हे परमपद प्राप्त होऊ शकत नाही.

न मुद्राधारणाद्वा स्यान्न मौनवचनाश्रयात्‍ ।
औदासेन्यान्न निर्वाणान्न कायक्लेशमोचनात्‍ ॥२७॥
मुद्रा धारणाने, मौनव्रताने, उदासीनतेने, देहत्यागाने व अहिंसावृत्तीने हे परमपद समजत नाही.

न दास्यान्न च संदेशान्न नानाव्रतधारणात्‍ ।
न षड्‍दर्शनवेषादिधारनान्न च मुण्डनात्‍ ॥२८॥
सेवावृत्तीने, उपदेशाने, अनेक व्रतानुष्ठानाने, षड्‍दर्शनाध्ययनाने, वेष धारणाने व नुसते मुंडन केल्याने हे परमपद प्राप्त होऊ शकत नाही.

नानन्तोपाययत्नेभ्य: प्राप्यते परमं पदम्‍ ।
गुरुदृकपातमात्राणां हठानां सत्यवादिनाम्‍ ॥२९॥
कथनाद्‍ दृष्टिपाताद्वा सान्निध्याद्वावलोकनात्‍ ।
प्रसादात्सद्‍गुरो: सम्यक्‍ प्राप्यते परमं पदम्‍ ॥३०॥
अनंत उपाय व प्रयत्नांनी ते परमपद मिळत नाही. श्रीसद्‍गुरुंच्या दृष्टीचा पात ज्यांच्यावर झाला आहे म्हणजे दृग्दीक्षेने शक्तिपात होऊन ज्यांची कुंडलिनी शक्ती जागृत झाली आहे अशा ह्ठयोग्यांना (‘ह’ म्हणजे चंद्रनाडी व ‘ठ’ म्हणजे सूर्यनाडी होय. शक्तिजागृतीमुळे चंद्र व सूर्य नाडयातील म्हणजे इडापिंगलेतील प्राणांची संसारात्मक बहिर्तती संपून सुषुम्नेतील अंतर्गती सुरु होते. अर्थात्‍ चंद्रसूर्याचे किंवा इडापिंगलेचे सुषुम्नेत एकीकरण होते. अर्थात्‍ चंद्रसूयाचे किंवा इडापिंगलेचे सुषुम्नेत एकीकरण होते. असे एकीकरण होणे यालाच हठयोग म्हणतात.) व सत्यवादी साधकांना हे ज्ञान गुरुने सांगताच म्हणजे शब्ददीक्षा होताच, कृपा व अलोकन करताच म्हणजे दृग्दीक्षा देताच, गुरुसान्निध्यात राहिल्याने त्याच्याकडून होणार्‍या शक्तिसंक्रमणामुळे, गुरुच्या दर्शनाने व गुरुच्या प्रसन्नतेने उत्तमरीतीने प्राप्त होते.

अन्वयव्यतिरेकाभ्यां सार्द्धश्लोकद्वयोक्तित: ।
श्रीगुरोर्लक्षणं प्राह यज्ज्ञानामुच्यते भयात्‍ ॥३१॥
सम्यागानंदजननं सद्‍गुरु: सोऽभिधीयते ।
निमिषार्द्ध तदर्द्धं वा यद्वाक्यस्यावलोकनात्‍ ।
आत्मानं स्थिरमाप्नोति तस्मै श्रीगुरवे नम: ॥इति॥३२॥
पुढील अडीच श्लोकांनी अन्वय-व्यतिरेकाने श्रीगुरुचे लक्षण सांगतात. ज्या ज्ञानाने मनुष्य निर्भय होतो (असे ज्ञानादान करणारा) व जो निरतिशय आनंद मिळवून देतो त्याला सद्‍गुरु म्हणावे. ज्याच्या उपदेशवाक्याचे पळभर वा अर्धपळ (सेकंदभर) जरी मनन केले; तरी चित्ताची स्थिरता प्राप्त होते. अर्थात्‍ सदूगुरुच्या शब्दाचे किंवा मंत्राचे स्मरण केल्याबरोबर तत्स्वरुप कुंडलिनी शक्तीचे सुषुम्नेत चालन होऊन प्राण म्हणजेच चित्त स्थिर होते. अशा सद्‍गुरुला नमस्कार असो.

नानाविकल्पविश्रांतिं कथनात्कुरुते तु य: ।
सद्‍गुरु: स तु विज्ञेयो न तु मिथ्याविकल्पक: ॥३३॥
जो आपल्या एका वाक्यासरशी म्हणजे शब्ददीक्षा देऊन तद्‍द्वारा होणार्‍या शक्तिसंक्रमणाने शिष्याची अनादि, निद्रिस्त आत्मसत्तारुप कुंडलिनी शक्ती जागृत करुन अर्थात्‍ संसाररुपी बहिर्मुख गती थांबवून शिष्याच्या अनेक विकल्पांना दूर झुगारुन देऊ शकतो तोच सद्‍गुरु जाणावा. खोटया कल्पना करणारा कधीही सद्‍गुरु होऊ शकत नाही.

परमपदमधिगन्तुमुत्सुकानां यदमलदृक्‍करुणाकटाक्षमाला ।
जयति दृढतराधिरोहणश्री: परमनिधि: स ममास्ति देशिकेंद्र: ॥३४॥
परमपदावर आरुढ होण्यासाठी उत्सुक असणार्‍यांना ज्याची निर्मल करुणार्द्रदृष्टी त्या स्थानाची प्राप्ती करुन देते त्या ज्ञानसागर अशा माझ्या सद्‍गुरुवरांचा जयजयकार असो.

सम्यक्‍चैतन्यविश्रांतेरुपदेशस्तु सम्मतम्‍ ।
यथा स्यात्सामरस्याख्यं तत्परं परमं पदम्‍ ॥३५॥
ज्याचा उपदेश म्हणजे शक्तिपातदीक्षा चित्तविश्रांती देणारी व समरसतारुप परमपदाला पोहोचविणारी आहे तोच सद्‍गुरु किंवा उपदेश सर्वशास्त्रसंमत होय.

यत्कारुण्यविलोकनादपि भवच्चिद्विश्रम: पारद: ।
तस्मिन्‍ श्रीकरुणासुधारसनिधौ चेतोऽस्तु मग्नं गुरौ ।
नान्यस्मिन्बहुवादतर्कमकरोच्छालातिभीतिप्रदे ।
दुर्भेदभ्रमधारकेऽतिकठिने क्षारोदधौ लौकिके ॥३६॥
ज्याच्या केवळ करुणार्द्रदृष्टीने आत्मविश्रांती मिळते व साधक भवसागरातून परतीराला जाऊ शकतो त्या कारुण्यामृतसागर सद्‍गुरुच्या ठिकाणी माझे चित्त डुंबून राहो. लौकिक अर्थात्‍ शक्तिपातविद्या न जाणणारा अपंपरायुक्त गुरु हा नानाविध तर्कवितर्कांचे जाळे पसरविणारा, भवभीती उत्पन्न करणारा, भवभ्रम दूर न करणारा, कठीण अंत:करणाचा व क्षारसमुद्रासारखा असतो. तो मला संमत नाही किंवा आवडत नाही.

उपदेशो निगरणपदवाच्यतयोच्यते ।
तत्‍ करोति यतस्तस्माद्‍ गुरुरित्यभिधीयते ॥३७॥
पद, वाक्य व प्रमाणादिकांनी शिष्याच्या संशयाचा निरास करण म्हणजेच गुरुपदेश होय अशा (शब्दब्रह्मानिष्णात) उपदेशकालाच गुरु ही संज्ञा आहे.

गुरुदोषगुणनिरुपणपुर:सरं गुरुसेवाफलं
विंशतिश्लोकै: कश्चिदाह-
गुरुचे गुण-दोषनिरुपणपूर्वक गुरुसेवा इत्यादिकांचे फल वीस श्लोकांनी सांगतात-

ज्ञानहीनो गुरुस्त्याज्यो मिथ्यावादी विकल्पक: ।
स्वविश्रातिं न जानाति परेषां स करोति किम्‍ ॥३८॥
ज्ञानहीन, खोटेनाटे सांगणारा व संशयी असा गुरु त्याज्य होय. जो आत्मविश्रांती जाणत नाही तो दुसर्‍याला समर्थ होऊ शकतो.

विकल्पजागराद्‍ घोराच्चिन्ताकाले न दुस्तरात्‍ ।
प्रपंचवासनावर्त्तात्कालजालसमाकुलात्‍ ॥४०॥
वासनालहरीवेगात्स्वस्थस्तारयितुं क्षम: ।
स्वस्थैर्येणोपदेशेन लीनोत्थानेन तत्क्षणात्‍ ॥४१॥
विकल्परुप भयंकर अजगरापासून, दुस्तर चिंतेतून, सांसारिक वासनांच्या भोवर्‍यातून, कालाच्या जाळ्याने व्याप्त अशा भवसागरातून व वासनारुप लाटांच्या तडाख्यातून चित्त स्थिर होईल असा उपदेश करुन म्हणजे शक्तिपाताने शिष्याची ज्ञानशक्ती कुंडलिनी जागृत करुन जो शिष्याला ज्ञानदान करुन तारु शकतो अर्थात्‍ शक्तिरुपाने असणार्‍या जीवाला सुषुम्नामार्गाने नेऊन सहस्त्रारात शिवाशी एका क्षणात लीन किंवा समरस करु शकतो तोच सद्‍गुरु होय.

परानंदमयो भूत्वा निश्चय: स्थिरतां व्रजेत्‍ ।
कुलानि कोटिकोटीनां तारयत्येव तत्क्षणात्‍ ॥४२॥
परमानंदमय झाल्याने निश्चयाला स्थिरता येते. त्यामुळे कोटीकोटी कुलांचा उद्धार थोड्याच वेळात होतो.

धारयत्येव दृकपातात्कथनाद्वावलोकनात्‍ ।
तारणेच्छुर्वरं दत्ते स्वस्वरुपे स्थिरो भव ॥४३॥
कृपादृष्टीने अर्थात्‍ दृग्दीक्षेने, उपदेशाने म्हणजे शब्ददीक्षेने व केवळ अवलोकनाने म्हणजे कृपादीक्षेने अर्थात्‍ संकल्पनाने तारक गुरु शिष्यावर शक्तिपात करुन त्याला स्वस्वरुपी स्थिर हो असा वर देतात.

अतोऽसौ मुच्यते शिष्यो जन्मसंसारबंधनात्‍ ।
अतस्त्वं सद्‍गुरुं साक्षात्‍ त्रिकालमभिवादयेत्‍ ॥४४॥
उपरोक्त प्रकारांपैकी कोणत्याही एक प्रकाराने होणार्‍या शक्तिपातयोगदीक्षेमुळे साधक जन्मसंसारबंधनातून मुक्त होतो. याकरिता सद्‍गुरुस त्रिकाल सादर अभिवादन करावे.

सर्वांगप्रणिपातेन शिक्षां कृत्वा गुरुर्भवेत्‍ ।
किमत्र बहुनोक्तेन शास्त्रकोटिशतेन च ॥४५॥
साष्टांग प्रणिपातपूर्वक गुरुची सेवा करावी. कोटीकोटी शास्त्रात सांगितलेल्या या गोष्टीविषयी विशेष काही सांगण्याची आवश्यकताच नाही.

लब्धविश्रामवित्तानां योगिनां दृढचेतसाम्‍ ।
स्वस्वमध्यनिमग्नानां निरुत्थानां विशेषत: ॥४६॥
निमिषार्द्धात्‍ स्फुटं भाति दुर्लभं परमं पदम्‍ ।
तस्मिंपिंडे भवेल्लीनं सहसा नात्र संशय: ॥४७॥
ज्यांना विश्रामधन मिळाले आहे, जे योगिसाधक दृढ किंवा स्थिरचित्त झाले आहेत व जे आत्मस्वरुपात निमग्न असतात अशा साधकदशेतील योग्यांना एका निमषार्धात दुर्लभ अशा परमपदाचे भान होते व ते भान पिंडज्ञानात म्हणजे जागृत कुंडलिनी शक्तीने सहस्त्रारात समरसतापूर्वक धारण केलेल्या शिवस्वरुपात मिळून जाते हे नि:संशय समजावे.

लीने पिंडे भवेद्योगी सर्वज्ञ: सिद्धिपारग: ।
इच्छावेगी स्वयं कर्त्ता लीलयैवाजरामर: ॥४८॥
पिंडज्ञान अर्थात्‍ पिंड म्हणजे शरीर व पिंड म्हणजे शक्ती असे दोन अर्थ असल्यामुळे शरीरज्ञान व शक्तिज्ञान झाले की, योगी सर्व जाणू शकतो. सर्व सिद्धी त्याला मिळतात. तो स्वेच्छेने वाटेल त्या ठिकाणी वेगाने जाऊ शकतो, वाटेल ते करु शकतो आणि सहजच सदा तरूण व चिरंजीव होऊ शकतो.

अवध्यो देवदैत्यानां क्रीडते भैरवो यथा ।
इत्येवं निश्चयो योऽसौ क्रमादाप्नोति लीलया ॥४९॥
असा साधक भैरवाप्रमाणे अर्थात्‍ श्रीशिवाप्रमाणे देव-दैत्यांना अवध्य होतो व त्यांच्याप्रमाणेच आनंदात राहतो हे नि:संशय होय. त्याला अत्यंत लीलेने क्रमश: पुढील गोष्टींची प्राप्ती होते.

असाध्या: सिद्धय: सर्वा: सत्यमीश्वरभाषितम्‍ ।
प्रथमे रोगनिर्मुक्त: सर्वलोकप्रियो भवेत्‍ ॥५०॥
अशा साधकाला दुर्लभ सिद्धींचीही प्राप्ती होते असे ईश्वराने सांगितले आहे. (यापुढे वर्षवारीने मिळणारी फळे सांगतात.) योगिसाधक पहिल्या संवत्सरात निरोगी होतो व सर्व लोकांचा तो आवडता होतो.

कांक्षते दर्शनं तस्य स्वात्मा गूढस्य नित्यश: ।
द्वितीये वत्सरे काव्यं कुरुते तत्त्वभाषया ॥५१॥
अशा साधकाच्या दर्शनाची लोक इच्छा करतात व प्रतिदिनी त्याला गूढ आत्म्याचा अधिकाधिक प्रकाश प्राप्त होत जातो. हा साधक दुसर्‍या वर्षी तत्त्ववर्णनात्मक काव्य करु शकतो.

प्रजायते दिव्ययोगी दूरश्रावी न संशय: ।
वाक्‍सिद्धि: पंचमे वर्षे परकायप्रवेशनम्‍ ॥५२॥
या दिव्य योग्याला दूरश्रवणसिद्धी प्राप्त होते यात संशय नाही. पाचव्या वर्षी त्याला वाक्‍सिद्धी व परकायप्रवेशाची सिद्धी प्राप्त होते.

षडभिर्न छिद्यते शस्त्रैर्वज्रपातैर्न भिद्यते ।
वायुवेगो क्षितित्यागी दूरदर्शी च सप्तमे ॥५३॥
अशा योगिसाधकाचा सहाव्या वर्षी सस्त्रादिकांनी व वज्रादिकांनी छेद-भेद होऊ शकत नाही. सातव्या वर्षी तो वायुसमान वेगवान्‍, आकाशगामी व दूरचे पाहणारा असा होऊ शकतो.

महासिद्धयष्टकं सम्यगष्टमे वत्सरे भवेत्‍ ।
नवमे वज्रकाय: स्यात्‍ खेचरो दिकचरो भवेत्‍ ॥५४॥
आठव्या वर्षी त्याला अणिमादि अष्टसिद्धी प्राप्त होतात. नवव्या वर्षी तो वज्रशरीरी होतो. त्याचप्रमाणे आकाशात गमन करण्याची व दिशांमध्ये संचार करण्याची अशा दोन्ही सिद्धी त्याला नवव्या वर्षीच मिळतात.

दशमे पवनाद्वेगी यत्रेच्छा तत्र गच्छति ।
सम्यगेकादशे वर्षे सर्वज्ञ: सिद्धिभाग्‍ भवेत्‍ ॥५५॥
असा योगिसाधक दहाव्या वर्षी वायूपेक्षा वेगाने जाणारा होतो व वाटेल त्या ठिकाणी स्वेच्छासंचार करु शकतो. अकराव्या वर्षी तो सर्वज्ञ होतो व त्याला सर्व सिद्धी मिळतात.

द्वादशे शिवतुल्योऽसौ कर्त्ता हर्त्ता स्वयं भवेत्‍ ।
त्रैलोक्ये पूज्यते सिद्ध: सत्यं भैरवभाषितम्‍ ॥५६॥
बाराव्या वर्षी हा योगिसाधक स्वत:च श्रीशिवासारखा सर्व कर्ता व हर्ता असा सर्वशक्तिमान्‍ होतो. असा सिद्ध त्रैलोक्यात सर्वांना वंद्य व पूज्य होतो. भैरवाचे म्हणजे शिवाचे हे म्हणणे नितांत सत्य आहे.

एवं द्वादशवर्षे तु सिद्धयोगी महाबल: ।
जायते सद्‍गुरो: पादप्रसादान्नात्र संशय: ॥५७॥
या रीतीने बारा वर्षात सद्‍गुरुचरणांच्या कृपाप्रसादाने तो साधक सिद्धयोगी व महाशक्तिशाली होतो हे निश्चित होय.

अनुबुभूषति योनिजविश्रमं स गुरुपादसरोरुहमाश्रयेत्‍ ।
तदनुसंसरणात्परमं पदं समरसीकरणं च न दूरत: ॥५८॥
ज्याला आत्मस्वरुपात विश्रांतीची अपेक्षा आहे त्याने श्रीगुरुचरणकमलाश्रय करावा. श्रीसद्‍गुरुचरणकमलांचे अनुसरण करणार्‍याला परमपदलाभ व आत्मसमरसता दूर नाही; कारण ती सहज साध्य आहे.

अनन्यभावेन निरुत्थितिश्रीलाभेन चांचल्यविधूननेन ।
अवस्थिति: श्रीकरुणासुधाब्धिगुरुप्रसादाद्‍भवतीति सत्यम्‍ ॥५९॥
अनन्यभावाने म्हणजे करुणेच्या अमृताचा सागर असलेल्या गुरुच्या प्रसादाने अर्थात्‍ शक्तिपातयोगदीक्षेने प्राप्त झालेल्या कुंडलिनी शक्तीच्या नि:शेष उत्थानामुळे चित्तस्थैर्यरुप संपत्तिलाभाने साधकाला आनंदत राहता येते हे त्रिवार सत्य होय.
॥ इति सिद्धसिद्धांतसंग्रहे पिंडपरमपदयो: समरसकरणं
नाम पंचमोपदेश: ॥
या रीतीने सिद्धसिद्धांतसंग्रहातील पिंड म्हणजे कुंडलिनी शक्ती व परमपद म्हणजे शिव यांचे सामरस्यप्रतिपादक पंचमोपदेश समाप्त झाला.

N/A

References : N/A
Last Updated : January 24, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP