भगवद्गीतास्तोत्र - अध्याय दुसरा
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥७२८२॥
श्री गुरुव्यासाचा शिष्या सद्विद्येचा । धृतराष्ट्र खेदाचा तोषदानी ॥१॥
बोले राया देव उघड अपूर्व । तरीं हे वैभव भोक्ता होसी ॥२॥
कृपेनें व्यापीला सांडित अश्रुला । येथें पार्थ भ्याला विषादानें ॥३॥
मग मधुरिपू शांतवी अमूपू । शांत व्हावें वपू तुका ह्मणे ॥४॥
॥७२८३॥
बोले भगवान योग्या जो निधान । कसें कश्मलपण तुज आलें ॥१॥
उदेलें विषमीं न लागे सत्कर्मी । जेणें राहावें धार्मी अकीर्तीच्या ॥२॥
जोडी नरकासी हे दिसे आह्मासी । त्यागी बुद्धि ऐसी तुका ह्मणे ॥३॥
॥७२८४॥
पार्था षंढ होणें नको लाजिर्वाणें । तुज पूर्णपणें बाधक जें ॥१॥
द्वाड हे कल्पना तूज हे साजेना । तुछ त्यागी रणालागीं । ऊठ ॥२॥
लंडीपण परंतपा हे त्यागी पां । मार्ग धरी सोपा वडीलांचा ॥३॥
तुका ह्मणे देवो बोलतां सद्भावो । वदे महा बाहो पुढें ऐका ॥४॥
॥७२८५॥
कैसा भीष्मद्रोणा भांडो जगजीवना । ज्यांसी बोलवेना विपरीत ॥१॥
त्यांसी बाणवरी वर्षोनि समरीं । पाडों धरेवरी घडे कैसें ॥२॥
तुका ह्मणे माया जीवीं झोंबलीया । विसरला क्रिया कौरवांच्या ॥३॥
॥७२८६॥
न मारीं गाया वडिलां गुरुतें । भिक्षा खाणें मातें श्रेय वाटे ॥१॥
द्रव्यलाभें घात करावा या लोकीं । जेणें सर्वा मुखीं निंद्य व्हावें ॥२॥
यांच्या रक्तें भोग माखुनी भोगावे । भक्षी मांसासवें मद्य जैसें ॥३॥
नको रे दयाळा घालुं या अकर्मी । सुखी तूझे नामीं तुका म्हणे ॥४॥
॥७२८७॥
आह्मी जिंकूं बरें तेंच आम्हा देवा । किंवा मेल्या जीवा मोक्षपद ॥१॥
दोन्ही मार्ग त्यानें जरी मारुं यांस । तथापी प्राणास चिरंजीव ॥२॥
वांचों बहू काळ वंशवृद्धि करुं । न इच्छूं वेव्हारु तुका ह्मणे ॥३॥
॥७२८८॥
या धर्माच्या श्रमें बुद्धि मूढ झालों । तुज शरण आलों जगदीशा ॥१॥
श्रीरंगा कल्याण ज्या माजी असेल । तोचि वदें बोल आदराचा ॥२॥
स्वामी सद्गुरु हो शिष्या मी तुमचा । धारक शिक्षेचा तुका ह्मणे ॥३॥
॥७२८९॥
न तें दिसे कांहीं मम शोकनाशक । जो शोक शोषक इंद्रियांसी ॥१॥
समृद्धि राज्याची त्रिदशेंद्र लक्ष्मी । पावेन तरीं मी सुखी नव्हे ॥२॥
तुका दास विनवी अगा पुरुषोत्तमा । बोलतों तें क्षमा अपराध ॥३॥
॥७२९०॥
संजय ह्मणे राया हृषीकेशाप्रती । केली हे विनंती गुडाकेशें ॥१॥
शेवटीं वचन बोले हें चि पार्थ । युद्ध आत्मस्वार्थ न करीं मी ॥२॥
गोविंदाचें पदीं ठेविला मस्तक । जन्माचें सार्थक तुका ह्मणे ॥३॥
॥७२९१॥
त्यातें हृषीकेश हांसोनी बोलिला । विस्मय दाटला अभ्यंतरीं ॥१॥
विषाद जाणोनी कळवळिला हरी । बोलेंची उद्धरी संशयातें ॥२॥
सैन्यद्वयामाजी संवादती दोघे । तुका ह्मणे जगा तारावया ॥३॥
॥७२९२॥
मेघगंभीररवें बोले रमानाथ । अयोग्य हा पंथ शोक दीसे ॥१॥
आह्मी जें बोलावें तें तंव राहिलें । पांडित्य निघालें तुह्मापून ॥२॥
पांडित्य बोलसी शोकही करिसी । परि गा नेणसी निजहित ॥३॥
मेल्या जीत्या माजी शोका नेदी चित्त । तो मान्य पंडित तुका ह्मणे ॥४॥
॥७२९३॥
कधीं कोणे काळीं न होतों जी आह्मी । येथें कधीं तुह्मी नसाल कीं ॥१॥
हे राजे ह्या सेना ऐसे आप्त वर्ग । नव्हता प्रसंग समराचा ॥२॥
पुढें नाश झाल्या कोणीच उरेना । सृष्टी हे रचना जाय क्षया ॥३॥
तुका ह्मणे देव अनादि सांगतो । नित्यची वर्णितो खळची हा ॥३॥
॥७२९४॥
जीवास शरीरीं जैसें बाळपण । सवेंची तारुण्य अवस्था हे ॥१॥
पुढें तैसे वृद्ध गळें देहशक्ती । पुढें मृत्यु प्राप्ती ठेविलीसे ॥२॥
पुन्हा यम जाची पुन्हा जन्मा येणे । हें घडें रीतीनें अचुक कीं ॥३॥
तैसी देहांतर प्राप्ति ओळखावी । मोहेना पदवी धैर्ये तुका ॥४॥
॥७२९५॥
ऐके आतां पार्था सुखदु:ख दोन । देती विषयपान कर्णा जेव्हां ॥१॥
याचिलागीं नाश उत्पत्ती सोसावी । भारता ऐकावी नीती माझी ॥२॥
तुका ह्मणे देवो एक गूज सांगें । जेणें साधु अंगें पावे खूणा ॥३॥
॥७२९६॥
पैंगा नदेतील व्यथा । जया पुरुषा समर्था ॥१॥
सम भावना आरंभा । उत्तम नरीं पुरुषर्षभा ॥२॥
दु:खीं एक भावो । तोच मोक्षपुरीं रावो ॥३॥
आणिक सांगणें तें कांहीं । तुका वदे उरलें नाहीं ॥४॥
॥७२९७॥
असद्देहन जो नित्य । जीव सन्नतो अनित्य ॥१॥
दोहींचें तत्व या दोंत । ब्रह्म देख तत्वज्ञानें ॥२॥
तुका करितो प्रार्थना । झणी ह्मणाल उमजेना ॥३॥
॥७२९८॥
नाशारहित जाणा तेंची । जग व्यापी सत्ता त्याची ॥१॥
वार्त्ता तयाची कोणाला । नसे ठाऊकी जनाला ॥२॥
त्याचा नाश या जीवानें । नव्हे कोटी ही साधनें ॥३॥
मग शोक अविनाशाचा । तुका ह्मणे मिथ्या वाचा ॥४॥
॥७२९९॥
देह नाशवंत पुरे । जीव ज्ञानसा चोखा रे ॥१॥
अंश ब्रह्मीचा तो नित्य । नव्हे कधीं ही असत्य ॥२॥
अविनाशी अप्रमेय । जाणुनि युद्ध करी स्वयें ॥३॥
तुका ह्मणे हा विकल्प । धरिल्या बाधील गा पाप ॥४॥
॥७३००॥
भेदवादी यांचें मत ॥ मारी ह्मणती ते नेमांत ॥१॥
चार्वाकाचें ज्ञान खोटें । मेले ह्मणती अवचटे ॥२॥
परी नेणती दोघेही । न तो मारी ह्मणे कांहीं ॥३॥
तुका विनवितो संतां । चित्त देणें अपूर्वता ॥४॥
॥७३०१॥
नव्हे जन्मची जयासी ॥ तया मृत्यु केवीं ग्रासी ॥१॥
कधीं देहाचे संगती ॥ नेणे येणेजाण्याप्रती ॥२॥
देहासंगे असतां नाहीं ॥ हेंचि त्याचें नवल पाही ॥३॥
अज नित्य शाश्वत तो ॥ देहें दृश्यें गवसेना तो ॥४॥
मारितां ही मारवेना ॥ तुका ह्मणे या पुराणा ॥५॥
॥७३०२॥
पूर्वोक्त याच्या लक्षणा । पुरुष जाणे विचक्षणा ॥१॥
येर्हवीं या प्रकृतीला ॥ मारी कोण वेगळाला ॥२॥
मारितो कैसा आतां ॥ तुका विनवीतो श्रोतां ॥३॥
॥७३०३॥
वस्त्रें जुनी त्यागुनियां ॥ नवीं घेणें पांघरावया ॥१॥
शरीराचे तेच भावें ॥ येथें चैतन्यें वागावें ॥२॥
जीर्ण देह त्यागे दुजा । तुका ह्मणे याच काजा ॥३॥
॥७३०४॥
याला न तोडिती शस्त्रें । वन्ही जाळीना शिखाग्रें ॥१॥
न पाणी बुडवी यासी । वायु न उडवी बळेंसी ॥२॥
शुष्क वातें अणुगर्भू । हा तो नित्यच स्वयंभू ॥३॥
सत्तामात्रें या निराळा । तुका म्हणे धन्य कळा ॥४॥
॥७३०५॥
छेदावया न हा योग्य । यत्न अग्रीचा अयोग्य ॥१॥
नसे सुकला हा कधीं । भिजला नाहीं काय बाधी ॥२॥
स्थाणुपरी स्थिर सवीं । नित्याचळ भरली उर्वी ॥३॥
अचंचळ रुप ज्याचें । तुकया ध्यान लागे त्याचें ॥४॥
॥७३०६॥
ज्यासी आकारचि नाहीं । त्याचें चिंतन तें कायी ॥१॥
जेथें द्वैत हें शीरेना । निर्विकार हेंचि जाणा ॥२॥
त्या कारणें यासि असे । शोक न धरी मानसें ॥३॥
केला शोक फळ काय । तुका ह्मणे वायां जाय ॥४॥
॥७३०७॥
आतां देहासवें होतो । जरी मरतो मानिशी ॥१॥
तरी तुज महाबाहो । शोकग्रहो नसावा ॥२॥
सर्व जाण तयांच्या राया । पाहे हृदयां शोधोनी ॥३॥
तुका ह्मणे कृपावंता । दास चिंता तुज आहे ॥४॥
॥७३०८॥
जन्मा आलिया मरण । टाळी कोण अर्जुना ॥१॥
मृत्युपाठि लागे जन्म । कोण नेम ढांसळी ॥२॥
परिहारा जे विरहित नेदी चित्त त्या शोकीं ॥३॥
तुका ह्मणे जे अयोग्य । होय भोग्य कोठोनी ॥४॥
॥७३०९॥
भूतजाति आदि एक । प्रकाशक अव्यक्त ॥१॥
मध्य व्यक्त याचा भाव । जो स्वभाव मृगजळीं ॥२॥
लय अव्यक्तीं नेमिला । खेद आला तुज कैसा ॥३॥
उगी त्या चित्त वेदना । तुकया ध्याना ते नये ॥४॥
॥७३१०॥
कोणी पाहती आश्चर्ये । निज धर्मे साटोपें ॥१॥
कोणी आश्चर्यातें बोले । निके भले मन देती ॥२॥
कोणी आश्चर्यया ऐके । वार्ता पिके मोक्षाची ॥३॥
कोणी नेणती ऐकुनी । ऐसी काहणी ह्मणे तुका ॥४॥
॥७३११॥
देहधारी न हा बद्ध । जो अबद्ध यमासी ॥१॥
सर्व देहांत भारता । पूर्ण सत्ता चिन्मय ॥२॥
भूतें तरीं नाशवंत । खेद करीत कशाचा ॥३॥
नव्हेसि अर्जूना तूं योग्य । भवअरोग्य तुकया ॥४॥
॥७३१२॥
स्वधर्म पाहोनि कृपा । आली बापा ये वेळे ॥१॥
तीर हें योग्य नव्हे दया । पतनीं काया घालील ॥२॥
धर्मयुद्धारे वांचुनीं । श्रेय ये स्थानीं दिसेना ॥३॥
क्षत्रियाचे क्षात्र धर्म । तुका वर्मेनिवेदी ॥४॥
॥७३१३॥
अर्जिल्याविण झालें हें । पुरत्या पाहे दृष्टीनें ॥१॥
द्वार उघडे स्वर्गाचें । भाग्य साचें म्हणोनी ॥२॥
सुखी निर्भय तें ऐसें । क्षत्रिय हर्षे रणांगणीं ॥३॥
लाभ म्हणे तुकयाला । हाच आला जन्माचा ॥४॥
॥७३१४॥
आतां याच धर्मयुद्धीं । दृढ बुद्धि सोडिली ॥१॥
न भांडेन म्हणोनियां । छंद वांयां घेतला ॥२॥
तरी सत्कीर्ति जाउनी । निंदा जनीं पावसी ॥३॥
तुका म्हणे आनंदती । पाप हातीं धरलिया ॥४॥
॥७३१५॥
तुझी अपकीर्त्ती लोक । हे चंद्रार्क वाणीती ॥१॥
पुरुष जो कीर्त्तिमान्य । त्या अमान्य हे गोष्टी ॥२॥
मरण बरें एक वेळां । परी जिव्हाळा हा खोटा ॥३॥
तुका ह्मणे येथें निंद्य । तेथें वंद्य होईना ॥४॥
॥७३१६॥
भयें गेला रे पळाला । पार्थ भ्याला आह्मासी ॥१॥
हांसतील महारथी । अर्थ स्वार्था नाडू हा ॥२॥
महारथी नाम तुझें । सांडेल वोझें ब्रीदाचें ॥३॥
तुका याच पंथें मान्य । घेसी अन्य लाघव ॥४॥
॥७३१७॥
बोलों न येती ते बोल । शस्त्रें खोल भेदिती ॥१॥
बहु रिपु पार्थ तुज । देती लाज मनस्वी ॥२॥
प्रताप तो निखंडूनी । विटंबणी चाळीती ॥३॥
दु:ख कोणत्या परतें । जें तुकयातें सुख दे ॥४॥
॥७३१८॥
मेल्या येथें स्वर्गवास । हा तो मोडिला उल्हास ॥
आला वांटा स्वकर्मास । तो कोणास भंगेना ॥१॥
नाहीं तरी भुजातेजें । जिंकिलिया कुरुराजे ॥
भूमंडळीचें भोगीजे । सर्व सुख नित्यानी ॥२॥
ययालागीं शोक त्यागी । उठे धैर्य बळें अंगीं ॥
झुंझाचिये सेलभागी । अधिकारी तूं होई ॥३॥
तुका ह्मणे भूमिभार । उतरावा हा निर्धार ॥
यास्तव अनुभवसार । देवो त्यास निवेदी ॥४॥
॥७३१९॥
प्रीति धरिल्या जें पावे । सुख तेथें गा संभवे ॥
विषय वियोगीं हे लावे । दु:खार्णव लहरी ॥१॥
दोहीं समबुद्धी धरी । लाभालाभ तपासरी ॥
मग तूं सुखें युद्ध करी । पाप माथां आदळेना ॥२॥
निर्विकल्प तो नि:संगु । नि:संगीच अनुभवु ॥
तुका ह्मणे चांगू । निजमोक्ष आतुडे ॥३॥
॥७३२०॥
बोलिलों येथें अर्जुना । सांख्य बुद्धी हेची जाणा ॥
सर्वाविशी तूं देखणा । हित घेई आपुलें ॥१॥
योगीं बुद्धि धनुर्धरा । जींत बहुतसे विचारा ॥
त्यांत देइ कर्णद्वारा । जें स्वहित सर्वाचें ॥२॥
अहो प्रत्यक्ष कर्मयोगें । योगीं रचा अंतरंगें ॥
धुवंग ने घेणें जग । तारावया बुद्धी तें ॥३॥
आतां तिच्या संगतीनें । कर्मबंधें मुक्त होणें ॥
तुका ह्मणे सावधपणें । बुद्धिवंतें ऐकावीं ॥४॥
॥७३२१॥
विघ्नें छळितां पूर्ण । दिसो येतें येथें गौण ॥
मिथ्या प्रत्यवायपण । नास्तिकत्वें उडेल ॥१॥
महा भयातेंही नाशी । भुतां जेविं देवलसी ॥
कीजे स्वल्प ईश्वरासीं । अर्पिल्याचीं हें फळ ॥२॥
तुका ह्मणे दीनानाथ । हीन दीन पाहुनि पार्थ ॥
दया करोनि परमार्थ । हातीं त्याच्या देतसे ॥३॥
॥७३२२॥
निश्चयाची ऐक बुद्धी । जे का वारक उपाधी ॥
यया मार्गामधीं । ऐक कुरुनंदना ॥१॥
बहु शाखा भवरुखा । छाया शीतळ स्वात्मिका ॥
जे ते अनंत कामुका । बुजवणि जाहाली ॥२॥
तुका म्हणे बुद्धियोगें । साधक तरती निजांगें ॥
कोणी कुबुद्धी कुसंगें । प्राणीमात्र बुडाले ॥३॥
॥७३२३॥
मूढ उद्बोधनीं प्रीती । वेदीं गर्जिन्नल्या श्रुती ॥
साधन योगाच्या हातीं । स्वर्ग फूल अर्पीती ॥१॥
चाळवले बहु गेले । मुखीं फळ तें मानिलें ॥
ते वेदवादीं रतले । नाहीं पाहिले अनुभव ॥२॥
स्वर्गा परतें नाहीं सुख । ऐसे पावले मूढ देख ॥
तुका देवापासीं सुख । अक्षयाचें मागत ॥३॥
॥७३२४॥
थोरा कर्मे साधे धनें । जन साधिती साधनें ॥
नावेक होत्या मार्गानें । द्विज वृंदे चालिलीं ॥१॥
भोग भोग्य गती अशा । मत्स्य लुब्ध गळा मिषा ॥
स्वर्ग पर पैं दुराशा । जन्म कर्म फळद्रूप ॥२॥
तुका ह्मणे वास नेला । भोग गोडी अशेषाला ॥
सुख जाय मग शोकाला । प्राप्त होणें अखंड ॥३॥
॥७३२५॥
भोगाभ्यासें भाग्य दिसे । सक्त होई मानसें ॥
जैसें सकामासी पिसे । पैं नारीचें लागलें ॥१॥
हरिली कामनेनें बुद्धि । उरों नेदी आत्मशुद्धि ॥
हिवें पिडला तो कधीं । प्रावरणासि सोडिना ॥२॥
मग समता समाधींत । बुद्धि घालूं नेदी हात ॥
तुका म्हणे प्रेत । काय जाणें अमृता ॥३॥
॥७३२६॥
कामिक चित्ताचें रंजन । वेद बोलिला वचन ॥
परी विषय ते सान । मानिता चि पोससी ॥१॥
पार्था निष्काम होय तूं । माझें वाक्य धरुनी तूं ॥
जैसा निर्द्वद्व निश्चितू । नित्य सत्व न सोडी ॥२॥
आत्मवेत्ता होऊनियां । त्यागी कल्पनीक माया ॥
तुका म्हणे काया । काळ जैसा सांडवी ॥३॥
॥७३२७॥
स्वल्पोदकीं जें जें कार्य पैं उपजे । तें तेंच निपजे डोहामाजी ॥१॥
वेदक्रिया काम्य उद्भवे नियम्य । तें तें घडे साम्य ब्रम्हबोधीं ॥२॥
ब्रम्हीं जो ब्रम्हज्ञ सुखी तो सर्वज्ञ । तुका म्हणे प्राज्ञ पुढें ऐका ॥३॥
॥७३२८॥
अधिकार कर्मी तूं तें आहे पार्था । परी न सर्वथा फळीं त्याच्या ॥१॥
कंटाळुन जरी त्याग कर्मी धरी । ते या धरेवरी अयोग्य कीं ॥२॥
झणी फळ आशा धरीसी वीरेशा । तुका म्हणे नाशा कारण हें ॥३॥
॥७३२९॥
सिद्धि गेले कर्म तरी ना संभ्रम । आणि उपोपरम जाचूं नेदी ॥१॥
ऐसें करी चित्त कर्म आचरत । फळीं त्याचा हेत न ठेवूनी ॥२॥
योगस्थ करावें समत्वीं भरावें । तुका म्हणे व्हावें जीवन्मुक्त ॥३॥
॥७३३०॥
बुद्धि योगाहून कर्म योग सान । धनंजया ज्ञान बुझें ऐसें ॥१॥
पाहे रक्षक या बुद्धि कुरुराया । तुच्छ कर्मे तूं या टाकी फळें ॥२॥
प्रकृतीवांचूनी भांबावले ज्ञानी । तुका म्हणे ज्यांनीं आटाआटी ॥३॥
॥७३३१॥
जितां पापपुण्य नाशी बुद्धिगुणें । ज्याची पैं अगण्य सद्वासना ॥१॥
ह्मणोनी पांडवा बुद्धियोगघ्यावा । कर्मी अनुभवा कुशळत्वें ॥२॥
येणे मार्गे जाणें कर्मासी तोडणें । आनंद भोगणे ह्मणे तुका ॥३॥
॥७३३२॥
शास्त्रज्ञ जे बुद्धीयुक्त पैं विशुद्धी । कर्मफळ विधी सोडूनियां ॥१॥
प्रपंचबंधन विवेकें तोडून । पावती निर्वाण निर्दोषीक ॥२॥
तुका ह्मणे देव ज्ञानाचा अनुभव । सुगम हे ठेव साधकाची ॥३॥
॥७३३३॥
अज्ञान मोहमय व्याप्त चित्त स्वयें । तेव्हां तेज पाहे तेच बुद्धि ॥१॥
मग श्रुताश्रुत भोगाची प्रतीत । झाल्या प्राप्त होत वैराग्य तें ॥२॥
तुका ह्मणे प्राण पश्चात्तापाविण । न देखे निर्गुण वैराग्य तें ॥३॥
॥७३३४॥
फळांच्या श्रवणें बुद्धि शिणे । तेणें मेळवणें निरंतर ॥१॥
ते शुद्ध व्हावया समाधी आलीया । जेव्हां कां विसांया बुद्धि येते ॥२॥
तेव्हां तूं पावसी माझिया योगासी । देव अर्जुनासी ऐसें बोले ॥३॥
ऐकावया चित्त एकाग्र मारुत । तुका ह्मणे मात धन्य झाली ॥४॥
॥७३३५॥
बोले पांडुपुत्र देवासी उत्तर । सांगा कोण नर स्थितप्रज्ञ ॥१॥
जो कां समाधिस्थ सर्वदा नेमस्त । केशवा प्रशस्त बोलावे जी ॥२॥
वागतो या जगीं कैसा हो प्रसंगीं । तुका ह्मणे उगी निगी कैसी ॥३॥
॥७३३६॥
अगा ये अर्जुना सावधान मना । जेणें या कामना टाकियेल्या ॥१॥
स्वरुपीं मानस तोषलें सुरस । निधी पायाळास तयारीतीं ॥२॥
स्थितप्रज्ञ तोची ह्मणूं सव्यसाची । समाधी जयाची अखंडीत ॥३॥
आनंदे भरीत सर्वकाळ चित्त । तुका ह्मणे स्थितप्रज्ञ ऐसा ॥४॥
॥७३३७॥
न दु:ख मानसीं उद्विग्न होईना । सुखेंही वांछीना श्रम सोसे ॥१॥
आस्था न धरीच आसोनीयां आनी । कामक्रोध मनीं भयातीत ॥२॥
स्थितबुद्धि मूनी तयास ह्मणावें ॥ तुका म्हणे पावे महासुख ॥३
॥७३३८॥
सर्वा देहीं प्राण समान त्यापरी । नाठवें अंतरी गुण दोष ॥१॥
बर्यावाईटाचा घे तूं अनुभव । होऊं नेदी जीव कासावीस ॥२॥
मुखें उच्चारीता तोचि प्रज्ञावंत । प्रतिष्ठा पावत म्हणे तुका ॥३॥
॥७३३९॥
कूर्म जैसा भावरोधी शरीराचा । तैसा इंद्रियांचा मेळू धरी ॥१॥
अवरोनि असे ऐसा जो योगीया । प्रज्ञा त्याची तया प्रतिष्ठीत ॥२॥
पर्वकाळीं दान सुकृत दात्याचें । तैसें प्रपंचाचे तुका मानी ॥३॥
॥७३४०॥
योगी वीतरागी त्याचें एक मन ॥ भोग नसतां जाण वासना हे ॥१॥
जरी आसे तरी ब्रम्हात्म दर्शनीं । मुक्त येथें ज्ञानीं होऊं सरती ॥२॥
तुका म्हणे मन झालीया निश्चळ । तेंचि तें केवल परब्रम्ह ॥३॥
॥७३४१॥
आत्मज्ञानी नर जो पूर्ण प्रयत्नी । कौंतेया जी ध्यानीं माझ्यारुपीं ॥१॥
परि इंद्रियांसी विसांवला जरी । तरी ते अघोरीं घालतील ॥२॥
तुका ह्मणे मन इंद्रीयां स्वाधीन । म्हणोनि साधन विघ्न पावे ॥३॥
॥७३४२॥
तया मनालागीं आवरोनि आसे । युक्तराज तसे मत्पर जे ॥१॥
इंद्रियेंहि वश ज्याला पैं असती । त्याची प्रतिष्ठित प्रज्ञा होय ॥२॥
तुका म्हणे येथें कुसंग नसावा । तेणेंचि पावावा निज मोक्ष ॥३॥
॥७३४३॥
चिंती विषयांला उपजे वासना । भोग हा पुरेना विषयाचा ॥१॥
तो या कामालागी उत्पन्न करितो । काम तो निर्मितो क्रोधरुपा ॥२॥
तुका म्हणे बीजापासुनी अंकुर । होती हा विस्तार येच परी ॥३॥
॥७३४४॥
क्रोधें देहात्मता बुद्धि हे उपजे । मोहें कवळी जे अंत:कर्ण ॥१॥
तेथुनियां आत्मस्मृतिभ्रंश जाण । स्मृतिभ्रंशें जाण बुद्धिनाश ॥२॥
मग तेथुनियां पूर्ववतमूढ । होतसे सदृढ म्हणे तुका ॥३॥
॥७३४५॥
रागद्वेषावीण इंद्रियें स्वाधीन । तरी तेणें मन सोडवेना ।
घेतसे विषय परि विशुद्धात्मा ।प्रसादीं महिमा पावेल तो ॥२॥
हरिहरां मन झालें जें अर्पण । तुका ह्मणे पूर्ण प्रसाद तो ॥३॥
॥७३४६॥
प्रसादें याचिया सर्व दु:खा नाश । पावे अविनाश महा सुख ॥१॥
प्रसन्न ते बुद्धी चित्ताची आयती । पावे तो महंती प्रतिष्ठेची ॥२॥
शीघ्र तया सर्व लाभे महा लाभ । तुका ह्मणे स्तंभ सुकृताचा ॥३॥
॥७३४७॥
अयुक्त तो त्याला नसे बुद्धि पार्था । ध्यानाचिया पंथा जावों नेणें ॥१॥
ध्यान नाहीं तेथें शांति ही वसेना । सुख आठवेना अशांतासी ॥२॥
तळमळी चित्त कैंचे त्याचें हीत । तुका ह्मणे अंत सद्विद्येसी ॥३॥
॥७३४८॥
इंद्रियें वर्ततां जे कां । मना देती मोकळिका ॥१॥
तयाचि रे मग बुद्धी । हरोनि नेत देहशुद्धी ॥२॥
वारा लागलीया नाव । पावो नेणें पैल ठाव ॥३॥
तुका ह्मणे साधकानें । बोध मानीजे सुखानें ॥४॥
॥७३४९॥
तस्मात इंद्रियें । सर्व ज्याची मनोमयें ॥१॥
विषया पासोनी । जो बैसला आटोपोनी ॥२॥
महाबाहो प्रज्ञा त्याची । महिमा पावे प्रतिष्ठेची ॥३॥
तुका ह्मणे आतां । लाभ घेणें सावध श्रोता ॥४॥
॥७३५०॥
ब्रह्मीं लीन त्याची राती । जेथें लोक हे वागती ॥१॥
जागा जेथें साधु राहे । तेथें लोक झोंपी जाये ॥२॥
विषयीं सावध जन । तेथें याचें भ्रांत मन ॥३॥
तुका विनवी थोडिये । सुख जोडणें जोडिये ॥४॥
॥७३५१॥
नाना उदक श्रव । पाहे उदकाचा ठाव ॥१॥
तरि मर्यादा न सांडी । पृथ्वी राखीतो कोरडी ॥२॥
तैसे भोग भोगी सारे । मस्त नोहे अविचारें ॥३॥
निष्कामाचें पावे फळ । जरी कुटुंबी केवळ ॥४॥
शांति बाणे त्याचे अंगीं । शिव वेष्टित भुजंगी ॥५॥
अविषम ते पदवी । तुकया समची भोगावी ॥६॥
॥७३५२॥
सर्व भोग विषयाचे । सुख थुंकूनी कामाचे ॥१॥
भोग भोगी निस्पृहाचे । आत्मानंद पदवीचे ॥२॥
परि मी आणी माझें । दोनी नातळती वोझें ॥३॥
ज्ञानी शांतिस पावतो । तुका ह्मणे मम गुरु तो ॥४॥
॥७३५३॥
हे तो ब्रह्मींची राहाटी । पाहे पार्था ज्ञानदिठीं ॥१॥
इचें घर पावलिया । मोह शिवेना हृदया ॥२॥
अंत झाला इच्या संगीं । सायुज्यास पावे अंगीं ॥३॥
तुका म्हणे वाट । केली सुलभ हे नीट ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : June 18, 2019
TOP