मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|भगवद्गीतास्तोत्र| अध्याय दहावा भगवद्गीतास्तोत्र नमन अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा भगवद्गीतास्तोत्र - अध्याय दहावा तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhanggitamarathisanttukaramअभंगगीतातुक्राराममराठीसंत अध्याय दहावा Translation - भाषांतर ॥७६१०॥अहो ऐका विद्वज्जना । संत चतुर सज्जना ॥१॥ माझी दुर्बळाची मती । मान करा ठेउनि प्रीती ॥२॥जेणें रंजे तुमचें चित्त । नसे साहित्याचा हात ॥३॥बहु पंडितां पुढारी । लाजे अर्षिका वैखरी ॥४॥आतां लागले जे कासे । नये सांडू त्या प्रकाशें ॥५॥बाळ मित्र रंक गोष्टी । देवें ऐकिल्या गोमटी ॥६॥येथें वाटे शालजोडी । तेथें केतुली घोंगडी ॥७॥तुमचें केणें कापूराचें । माझें तेणें कापूसाचें ॥८॥जेथें खवळलें रणशूर । त्यांत गारयाचा बडिवार ॥९॥परी ईश्वरा करितां । मज सांपडली गीता ॥१०॥तिच्या संगें अंगीकार । केला तरी द्यावा थार ॥११॥आतां देवाचाही देव । बोलें दशमी वासुदेव ॥१२॥कीं किरिटी पुना ऐक । बोल माझा हा रसीक ॥१३॥तुझ्या हितालागीं वदें । नात्या मीसें अंतरिं नांदे ॥१४॥हितयज्ञाचें जाणीव । प्रीती मानिसी स्वभाव ॥१५॥तुका ह्मणे भवार्थिया । देव बोलला कौंतेया ॥१६॥॥७६११॥पार्था देव इंद्रादिक । अथवा ऋषींचे नायक ॥१॥आमचा प्राद्रुर्भाव यातें । न समजला निगममंतें ॥२॥कीं मी देवा महर्षीचा । आदिकारण सर्वांचा ॥३॥तुका ह्मणे बीजास्तव । झाला तरु नेणें देव ॥४॥॥७६१२॥सुज्ञ त्यास आह्मीं ह्मणूं । माझें माहात्म्य लागे वर्णू ॥१॥अज अनादित्वें ईश । मुख्य सर्वा जो सर्वेश ॥२॥मनुष्यांत बंधांतुनी । तो सुटला तूं हें मानी ॥३॥तोंड देखलीच गोष्ट । नव्हे तुकया नेदु कष्ट ॥४॥॥७६१३॥आतां सत्पुरुष कैसा । जगीं मान्य सांगूं तैसा ॥१॥बुद्धि ज्ञान क्षमा सत्य । निज शांतीची आगत्य ॥२॥करी इंद्रियनिग्रहो । चंद्र कळे ग्रासुनि राहो ॥३॥मोहनाश सुख दु:खे । जन्ममृत्यु भयें हरिखें ॥४॥तुका करीतो वीनंती । कृष्ण सांगे कमळापती ॥५॥॥७६१४॥तप दान दया साम्य । तुष्टी कीर्ती अकीर्ति गम्य ॥१॥होती मजची पासूनी । ऋतु जैसे नभस्थानीं ॥२॥भूतांचे ही पृथक् भाव । लहरी प्रती सिंधुठाव ॥३॥तैसें खेळणें ययाचें । अंतीं आमुच्या तुकयाचें ॥४॥॥७६१५॥कौशिक भारद्वाजादिक । सप्तऋषी वेकर्णिक ॥चौघे मनु मिळुनी एक । अकरा झाले संख्येनें ॥१॥सनक सनंदन थोर । बुध सूर्य सनत्कुमार ॥मानस पुत्र हे साचार । पै धात्याचे वोळखे ॥२॥पूर्वी झाले हेम ऋत्य । त्याग सर्वाचा विरक्त ॥परी पाहतां जांची शक्त । प्रजा ज्यांच्या लोकीं या ॥३॥तुका ह्मणे आणिक एक । श्लोक ब्रह्मांडनायक ॥बोलेल तो पुण्यश्लोक । सावधान ऐकिजे ॥४॥॥७६१६॥एवं विभूति योगांस । कीं मी आत्मा यां सर्वास ॥व्यापुनि वेगळ्यापणास । जो जाणेल जाणता ॥१॥तोच कोणे एके वेळें । येउनियां स्वरुपीं मिळे ॥हें ही नको हृदयशाळे । टाक मुद्रा तयाची ॥२॥ह्मणउनी अचला अन्ययें । माते योजुनी संशय ॥तुकयाची कृपा होय । तो शुक ऐसा अनुभवी ॥३॥॥७६१७॥नाहीं मजवीण कांहीं । उदका वीण रस नाहीं ॥बरे विचारुनियां पाहीं । मी उद्भव सर्वाचा ॥१॥मजपासुनी सर्वही । भार भूताचळा मही ॥शेष केला कूर्म तोही । आहे वराह आधारें ॥२॥त्यास ही धर्म मूळलिंग । स्तंभ त्याचा आहे संग ॥पुढें न सुचे जग । ह्मणती आधार अच्युत ॥३॥ऐसे जाणोनि भजती । अभिज्ञाची अति प्रीति ॥तुका विनवीतां चित्तीं । संशय उडे परिवारें ॥४॥॥७६१८॥सर्व साधनाच्या कळा । प्राणचित्त हे चपळा ॥स्थिरावल्या एक पळा । मग उणें तें काय ॥१॥यास माझा बोध दावी । वळे तरी युक्त बरवी ॥ना तरी आस्था सोडावी । सुखें घ्यावी मन्नामें ॥२॥मग मी काळची काळाचा ॥ ग्रास करीन खळांचा ॥परी आत्मिक स्थळाचा । नेदी पडों अंतर ॥३॥मग वर्णिती सर्वदा । गाती मन्नामसंपदा ॥कोणी नाचें संवादा । ऐकोनी तुकयाच्या ॥४॥॥७६१९॥तयां ऐसा सदा युक्त । जेवीं कौरवीं देवव्रत ॥प्रपंचीं असोनी विरक्त । श्रेष्ठ माथा वंदिती ॥१॥प्रीतीपूर्वक भजनासी । केल्या ह्मणसी काय देसी ॥तरी बुद्धि योगा कैसी । वृद्धि करितों हें नवल ॥२॥मज जेणें कां पावती । ऐसी अचळ करितो मती ॥तुका या अंगीं प्रळय गती । लागेनाच सर्वथा ॥३॥॥७६२०॥योग कृपेचा खडतर । नासत तमाचा अंधार ॥ज्ञान दिवा शुद्ध आकार । सुखें हातीं वागवी ॥१॥जें अज्ञान जडद्वाड । भ्रांति लावीतें कवाड ॥मग न दिसे महा गाढ । मध्यरात्रीं अमावासी ॥२॥मग ज्ञानार्क झळकतां । तमां पळवी दिगंता ॥तैं गा सौख्याचा मागता । तुका झाला होता कीं ॥३॥॥७६२१॥अर्जुन बोले विनयें भावें । कांहीं वाक्य आईकावें ॥एक अपराध स्वभावें । आमुचा आम्हा वाटतो ॥१॥तोचि बोलूं न दाखवूं । राखो कायसा आपाउ ॥जेणें घेतलासे जीवु । तो कालज्वर टाळावा ॥२॥परब्रह्म अधिष्ठान । तुझें अत्यंत पावन । आत्मा शाश्वत निधान । आलें येथें कळोनी ॥३॥आदि देहीं दिव्य मूर्ति । अज प्रभुवरा कीर्ती ॥मातें समजली धृती । तुकया वैश्या सारखी ॥४॥॥७६२२॥या रितीं ह्मणती तुतें । घेउनी श्रुतीचीं संमतें ॥ऋषी राजर्षि सहीते । नारदादि देवऋषी ॥१॥देवल व्यास असित । स्वयें येउनी सांगत ॥उमजलें जया हीत । संजया ऐसें आमुचें ॥२॥परी काळसर्प डसे । तनू व्यापिली सारांशें ॥ नये समज उद्देशें । आतां तुका गहिंवरे ॥३॥॥७६२३॥हें अजीच वाटे सत्य । पहिली ना धरुं अगत्य ॥गाणें ऐको उपांगीत । नादीं जीव ठेउनी ॥१॥तुह्मावरी भाव कैसा । जीवलगू सुत्दृद जैसा ॥आज उमटला ठसा । परब्रह्मा तव मुखें ॥२॥हे भगवन् तुझी व्यक्ती । दैत्य दानव नेणती ॥तेथें आमुचा पाड कीती । तुका तरी मनुष्य ॥३॥॥७६२४॥स्व प्रकाशाचें रुप । अंगें होसी स्वयंरुप ॥सर्व जाणतयांचा भूप । पुरुषोत्तम पुरुषीं ॥१॥भूतपाळक भूतेशा । देवदेव जगपरेशा ॥आमुची पुरविजे आशा । हेच इच्छा तव मनीं ॥२॥वसुदेव बंदिस्तव । निवटिला दैत्यराव ॥मज वाटे वासुदेव । झाला मज करितां ॥३॥मोहबंदीं पडिलों होतों । मग कृपें मुक्त झालों तो ॥तुका वरदें तरला तो । गुरुदास हें वाणूं ॥४॥॥७६२५॥तुझ्या विभूती ज्या दिव्य ह्मणताती । पांगली सकीर्ती महीपृष्टीं ॥१॥अशेष आद्यवी मातें निरुपवी । यश तूं गोसांवी संपादी हें ॥२॥विभूतीनें लोक व्यापूनी हे देख । असतोसी व्यापक सदोदित ॥३॥तुकया आनंद सांगतां संवाद । कीं प्राप्तीवरद तो हे सुखी ॥४॥॥७६२६॥कैसें योगेश्वरा तुतें या अंतरा । चिंतूनी संसारा मुक्त होणें ॥१॥सदा मी चिंतीतों तुज ठावा आहे तो । आहेसी सांग तूं कोण्या रुपें ॥२॥योग्य या चिंतनीं जेणें मोक्ष दानीं । तें स्थूल ध्यानीं प्रगटी देवा ॥३॥शेषासी न कळे तुकी अगम्य लीळें । अंथरुणीं बळे याच लाजा ॥४॥॥७६२७॥विस्तारें आपुला योग हा संचिला । ह्मणसी नाहीं दिला कोणापुढें ॥१॥परी मी अनन्य जाणुनी अमान्य । केल्या हें जघन्य बाधी तुज ॥२॥जनार्दना विभुती वदाव्या मागुती । कांजे नव्हे तृप्ती श्रवणामृतें ॥३॥अमृत अमर करी गणती वर । तुझी अगोचर कृपासुधा ॥४॥आतां अर्जुनाची आशंका जीवींची । फेडीती कृष्णाची पूर्ण दया ॥५॥तोची शब्द ऐका सावध करी तुका । व्यापार लटीका सोडा ह्मणे ॥६॥॥७६२८॥हर्षे कृष्ण ह्मणे दिव्या ह्या जाणणें । विभूती स्वमनें प्रकाशीतों ॥१॥तुतें या आपुल्या ऐशा सांगीतल्या । होतील ऐकील्या नाहीं ऐशा ॥२॥प्रत्यक्ष पाहासी साक्षात्कार घेसी । परी नसे त्यांसी आदी अंत ॥३॥सांगेन मुख्यत्वें परिसे निजसत्वें । तुकया धन्यत्वें नांवाजूनी ॥४॥॥७६२९॥विभूती मुख्य मी आत्मा नर स्वामी । नीळी माते व्योमीं व्यापे जैसी ॥१॥सर्वांच्या आशयीं स्फुरे सर्वा ठायीं । रिक्तपण नाहीं अणुभर ॥२॥आदि जो जडांच्या मध्यांत युक्तीच्या । वैष्णव शक्तीच्या आधारें ह्या ॥३॥घटाला मृत्तिका जेवीं व्यापी ऐका । तैसा आत्मा तुका एकवीध ॥४॥ ॥७६३०॥अदिती आदित्य प्रसवली सत्य । बारावा सांप्रत अहं विष्णु ॥१॥दृश्य ज्योती यांत सूर्य मी साक्षात । तरी प्रकाशित पृथ्वी पटा ॥२॥मरीची मरुत चंद्र ताराकांत । औषधीं पोशीत रश्मिस्पर्शे ॥३॥क्षय कलंकानी गेला जरी व्यापुनी । सदाशिव मुध्नीं विराजला ॥४॥॥७६३१॥सर्वा वेदांमाजी सामवेद आजी । प्रगटला तेजीं माझ्या रुपीं ॥१॥इंद्र जो देवांचा व्यापार भुवनांचा । शास्ता दानवांचा वज्री तो मीं ॥२॥मीषें इंद्रिय यामीं वावरे मन स्वामी । अनिवार नामीं अंशें माझ्या ॥३॥आतां भूताकृती यामाजी प्रतीती । बोले गोपीपती तुका ह्मणे ॥४॥॥७६३२॥रुद्रांत शंकर यक्षांत कुबेर । वसुमध्यें थोर पावके मी ॥१॥शिखरिमाजी मेरु बोले जगद्गुरु । आहे ज्याचा भारु पृथ्वी मानी ॥२॥उतरें उत्तरे सुर भार न ठरे । दक्षिण हि द्यारे क्षेत्रासह ॥३॥मग आगस्तिसी स्थापिलें वेगेसी । तुकया धरेसी धीर झाला ॥४॥॥७६३३॥पुरुहुतीं श्रेष्ठ पुरोहित वरिष्ठ । देव गुरु ज्येष्ठ अंश माझा ॥१॥तरी तेतीस कोटी घालूनि पदिं मोठीं । नीजहीत गोष्टी विचारीती ॥२॥आतां पार्थ स्वामी कार्तिक अग्र्यमी । सेनापतींत मी ह्मणवीतों ॥३॥सरोवरीं सिंधु ह्मणवी दीनबंधु । जेणें दीला वेधु तुकयासी ॥४॥॥७६३४॥महर्षीत भृगू देव ह्मणे सांगूं । ज्याच्या क्रोधीं वागूं शांतिरुपें ॥१॥वाणींत प्रणव अक्षर स्वभाव । बोले वासुदेव ऐक्य रुपें ॥२॥यज्ञीं जप यज्ञ जाण मी सुयज्ञ । पावती अभिज्ञ वांछित मी ॥३॥अचळीं हिमालय मीच स्वयें होय । तुकयासी ठाय सांपडला ॥४॥॥७६३५॥सर्व ही वृक्षांत राया पिंपळ थोर । माझाच आकार मूर्तिमय ॥१॥देवर्षीत मीच झालों गा नारद । कीर्तनाचा छंद वाढावया ॥२॥कलह लाऊनी पाहातों कौतुक । क्रोध त्रिपुरांतक ज्याचा नये ॥३॥देवदैत्यां सम मान्य गुरु जैसा । कंस कृष्ण तैसा राखों जाणे ॥४॥आतां चित्ररथ मीच गंधर्वात । कपील सिद्धांत तुका आला ॥५॥॥७६३६॥उच्चै:श्रवा अश्वीं झाला क्षीराब्धींत । गर्जी ऐरावत मीच होय ॥१॥नरांत भूपाळ मी होय अर्जुना । अकर्म शासना नैय्यायिकीं ॥२॥राजनिंदा केली तें मातें लागतें । मच्छाप बाधा ते प्राणी पावें ॥३॥तुका ह्मणे राज्य आह्मा त्रिभुवनीचें । सहज निंदकाचें तोंड काळें ॥४॥॥७६३७॥आयुधीं मी वज्र करीं गिरी चूर । तेजें ज्या थरार धरा कांपे ॥१॥अंगवात धाके शेष जिव्हा काढी । चंद्र दैत्यमठीं जीता होय ॥२॥एवढा प्रताप दधीची ऋषीचा । त्याचीया हाडांचा दंभो लिहा ॥३॥धेनु कामधेनू संतानांत काम । सर्पी तुका नाम वासूकीतो ॥४॥॥७६३८॥जळजंतुमाजी ह्मणवीतों वरुण । शेष मी आपण नागजातीं ॥१॥ह्मणूनी अवतारें रक्षितों पाठीसीं । मजहूनि गुणेसीं आगळा जो ॥२॥पितृगणांमाजी अर्यमा ह्मणवितों । भाग सर्व देतों पितरांसी ॥३॥निग्रहकर्त्यांत यम ह्मणवीतों । ज्यासी लोक भीतो तुका ह्मणे ॥४॥॥७६३९॥दैत्यांत प्रर्हाद मीच रक्षपाळ । चाळणारा काळ मीच झालों ॥१॥श्वापदांत सिंह तैसाच खगेंद्र । पक्ष्यांत पक्षींद्र रुप माझें ॥२॥शेषाही अधीक भक्ती गरुडाची । तैसीच आमची तुका ह्मणे ॥३॥॥७६४०॥उडती त्यांत वायू शस्त्र पाणियांत । जानकीचा कांत राम तो मी ॥१॥मत्स्यांत मगर नद्यांत जान्हवी । रुपें वोळखावीं माझ्याठायीं ॥२॥तरीच मस्तकीं घेऊनी स्वर्धुनी । शिव आनंदवनीं विराजला ॥३॥कलियुगीं नाम तारक हरीचें । तैसें भागीरथीचे जीवन तुका ॥४॥॥७६४१॥आद्यंत तयां तत्व सृष्टीचा पांडवा । मध्य ही मी तेव्हां प्रकाशांत ॥१॥ऐसें जाणे खुणें विद्यातें अध्यात्म । ह्मणवि पुरुषोत्तम विद्येमाजी ॥२॥तत्ववेत्त्यांमाजी तत्त्व ह्मणवीतों । ज्यामाजी विरतो तुका स्वयें ॥३॥॥७६४२॥अक्षरीं अकार मीच धनंजया । समासी सखया द्वंद्वनामी ॥१॥नित्य जो कां काळ मी स्वयें गोपाळ । आधार सबळ सर्वाचा मी ॥२॥सर्वी सर्व मूखीं तृप्त अन्नदाता । जीवा वांचवीता मीच तुका ॥३॥॥७६४३॥मरण मी जीवां संहर्ता जयांची । जेथें जाणीवेची कळा लोपे ॥१॥जन्म मी ह्मणूनी होतों पुत्रोत्सव । रंक हो कां राव सुखसम ॥२॥नारींत स्त्रीलिंगीं कीर्ति जे श्रीवाणी । जेणें गुणें प्राणी महत्वा ये ॥३॥स्मृति प्रज्ञा धृती क्षमा तुकारामीं । पावला आरामीं निरंतर ॥४॥॥७६४४॥सामवेदीं जाण बृहत्साम सूत्र । विचाराचें पात्र तेंही मीच ॥१॥छंदीगायत्री जे नाम मी पांडवा । मासांत जाणावा मार्गशीर्ष ॥२॥ऋतूंत वसंत वर्णी ज्यासी व्यास । तुका ह्मणे त्रास कळीकाळा ॥३॥॥७६४५॥कपटयांमाजी द्यूत तें मीच साक्षात । चोरी बाजारांत न वारवे ॥१॥तेजस्वी पुरुषांत तेज तें माझेंची । कां जे समर्थाची सत्ता नाहीं ॥२॥आतां जयो तेवीं निश्चय ही मीच । दिवसंदिवस उंच कळा चढे ॥३॥सत्ववंतीं सत्व माझेंच पांडवा । जगांनीं जाचावा स्वस्थ तुका ॥४॥॥७६४६॥कृष्णिवंशीं वासुदेव । तो मी ह्मणे देवराव ॥१॥ज्याचे अचाट पवाडे । वर्णनी शुक व्यास वेडे ॥२॥विधिशक्रां अगोचर । नंदगोष्ठांगणीं ईश्वर ॥३॥असो पांच पांडवांत । धनंजय तूं साक्षात ॥४॥तापसवेषें बहिण नेली । आमुची मर्जी न पां कलली ॥५॥कां जे दोघांचें एकत्व । मुनींत व्यास तेवीं तत्व ॥६॥कविमाजी शुक्र जो कां । तोही मीच मानी तुका ॥७॥॥७६४७॥दंदकर्त्यामध्यें दंड । तो मी ह्मणोनी प्रचंड ॥१॥जी कीं न्याय मार्गी नीती । तेही मच्छक्ती नीरुती ॥२॥परेचें जें गुह्य मौन । मीच न जाणें ईशान ॥३॥आतां ज्ञान जें ज्ञानीयां । ज्ञानेश्वरु वंद्य ठायां ॥४॥तुका ह्मणे ऐसे रीतीं । सांगूनियां भगवंती ॥५॥॥७६४८॥जें नित्य सर्वही भूतां । बीज ते मी पांडुसुता ॥१॥न घडे मीं मजवीण । चराचरांचें कारण ॥२॥मातें मूढ न वोळखे । पैं मी सर्वासी पारिखे ॥३॥तुकी उतरे आमुचें । एक मानस तुकयांचें ॥४॥॥७६४९॥झाल्या मजचीपासुनी । दिव्य ह्मणो त्या लागूनी ॥१॥माझ्या विभूतींचा अंत । परंतपा जाणे मात ॥२॥हा तो विभूतीविस्तार । पाहों न शके दिनकर ॥३॥म्यां वर्णिला संक्षेपें । ऐक तुकया आक्षेपें ॥४॥॥७६५०॥आतां जे कां भाग्यवंत । प्राणी होत श्रीमंत ॥१॥ठसा दैवाचा प्रगटे । सुख सिंधुचि विश्वीं दाटे ॥२॥तो तो प्राणी कीर्तीमान जाणे मीच भगवान ॥३॥आहे तेजोशसंभव । तरी तुकयाचा भाव ॥४॥॥७६५१॥आतां बहुतां या ज्ञानें । फांटा भरिजेल मनें ॥१॥किती अर्जुना जाणसी । श्रम नदी उतरसी ॥२॥जें कां उतरलें अधिष्ठुनी । एक अंशें हें जगमानी ॥३॥तुका वदला किंचित । झाला विस्तार बहुत ॥४॥॥७६५२॥झाला प्रसंग समाप्त । कृष्ण अर्जुना संमत ॥१॥योग शास्त्र खरें दिसे । माया भंजन शस्त्र असे ॥२॥येथें विभूती वर्णील्या । अर्जुना अंगीं विस्तारल्या ॥३॥आतां पुढें चमत्कारें । तुका बोलेल आदरें ॥४॥ N/A References : N/A Last Updated : June 18, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP