भगवद्गीतास्तोत्र - अध्याय आठवा

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥७५४६॥

पूर्व प्रसंगांत परमहंस योग । निवेदी श्रीरंग आत्मलाभें ॥१॥
परी प्रसंगांतीं ऐकिलें पार्थिवें । अध्यात्म बरवें अधीभूत ॥२॥
गूढ न समजे यास्तव आशंका । घेऊनी आशंका घे तूं झाडा ॥३॥
ते सप्त प्रश्न एका मागें एक । ऐका सकळीक भावीक हो ॥४॥
ऐका महाराज राज मुगुटांत । जोडोनीयां हात विनवितों ॥५॥
देवराया काय ब्रह्म तें सांगावें । तैसेंच बोलावें आध्यात्म ही ॥६॥
पुरुषोत्तमा कर्म कशास ह्मणावें । अधिभूत बरवें तैसें सांग ॥७॥
अधिदैवत त्या संस्कारुनी बोले । वर्म न कळलें बोले तुका ॥८॥

॥७५४७॥
अधियज्ञ कैसा कोणता ह्मणावा । देहीं या जाणावा कैसा आह्मी ॥१॥
जाणावासि कैसा प्राणाच्या प्रयाणीं । प्रत्यक्ष काहाणी हस्तीं लाभे ॥२॥
सुज्ञ जे तयांनीं विचारपंथानें । यावें मधुसूदनें बोलावें हे ॥३॥
तुका ह्मणे प्रश्न सात अर्जुनाचे । हंस सत्याब्धीचे हेलावे हे ॥४॥

॥७५४८॥
हांसोनी बोलिलो कर्त्ता जो जगाचा । आमुच्या लाभाचा संशयो हा ॥१॥
शुद्धब्रह्म जे तें ह्मणावें अक्षर । अध्यात्म प्रकार भावें बोले ॥२॥
भूतभौतिकांची जे कांहीं उत्पत्ती । सृष्टी करी जे तें कर्म जें कां ॥३॥
तुका ह्मणे श्रोतीं व्हावें सावधान । करावें चिंतन भगवंताचें ॥४॥

॥७५४९॥
अधि भूताक्षर तनू हा विकार । जीएवात्मा प्रखर् अधिदैव ॥१॥
बिंब त्याच प्रभें प्रतिबिंब न्यायें । अधियज्ञ होये याच देहीं ॥२॥
तुका ह्मणे आतां सांगेल अंतर । न धरुनी दूर सज्जनासी ॥३॥

॥७५५०॥
मातेंच प्रयाणीं जीवीं धरुनियां । देह सोडिलीया नामस्मरणें ॥१॥
जाय प्राण न या मद्रूपावांचूनी । विश्रांती नयनीं आढळेना ॥२॥
संशय कायसा कांकणा आरसा । पाहाणें धारसा लागली या ॥३॥
तुका ह्मणे नामें झाला गज मुक्त । प्राणी ते अशक्त उद्धरेची ॥४॥

॥७५५१॥
जें जें आणीक ही ध्यान । अंती त्दृदयीं धरुन ॥१॥
देह त्यागिला जयानें । जाय पाहे तो तीं स्थानें ॥२॥
एक रंगलें अंतर । आत्मा तेथेम धरी थार ॥३॥
तुका ह्मणे येह परी । वासनेच्या करीं दोरी ॥४॥

॥७५५२॥
तस्मात तूं सर्वदा पार्था । मातें स्मर भाव पंथा ॥१॥
युद्ध नि:शंक करावें । मज हृदयीं सांठवावें ॥२॥
बुद्धि आल्या आमुचे ठायीं । मुक्त होसी संशय कायी ॥३॥
निश्चयें पावसी माते ॥ तुका शरण अनन्यातें ॥४॥

॥७५५३॥
अगा अभ्यासाचा योग । दृढ आसलीया चांग ॥१॥
मग अन्यत्र मार्गात । पार्था न जाती महंत ॥२॥
मनें ऐसिया कसवटी ॥ दिव्य पुरुषीं घाली मिठी ॥३॥
पावे सतत चिन्मात्र । तुकीं एक चिंतन मात्र ॥४॥

॥७५५४॥
अरे पुराण सर्वज्ञ । प्रदायक फलाभिज्ञ ॥१॥
स्मरेल जो सूक्ष्म दीपा । अतींद्रिय आत्मरुपा ॥२॥
अतर्क्यत्व गुणें रुपीं । धरी विश्व झाला लोपी ॥३॥
भानु प्रकाशुनी तमीं । तुका अव्यक्तचि व्योमीं ॥४॥

॥७५५५॥
प्राण प्रयाणीं या मना । आवरोनि रे अर्जुना ॥१॥
मद्भक्तिच्या योगबळें । करुनी प्राणें एक मेळें ॥२॥
निज भ्रुव चक्र चक्र युग । भेदी पावे ज्योतिर्लिंग ॥३॥
दिव्य पुरुषा अनादी । तुका समर्पिला पदीं ॥४॥

॥७५५६॥
जे कां अक्षर बोलती । वेद संत जयाप्रती ॥१॥
यती वीतरागी ज्यांत । निघती धरुनी गुरुहात ॥२॥
अहो इच्छूनीयां जगीं । त्यागें लागेल या मार्गी ॥३॥
त्याची प्राप्ती सांगों तुज । तुकया निरोधावें बीज ॥४॥

॥७५५७॥
कोंडोनियां नव द्वारें । नेमी जाणे प्रत्याहारें ॥१॥
मन हृदयीं कोंडोनी ॥ प्राण मस्तकीं धरुनी ॥२॥
योग धारणा अनुष्टी । तुका नोहे कांहीं कष्टी ॥३॥

॥७५५८॥
हें एकाक्षर ब्रह्म । वेदशास्त्रांत उत्तम ॥१॥
असा जपे मातें स्मरे । काया वाचा श्रद्धाद्वारें ॥२॥
जाय अर्चिरादि मार्गी । एकट दुजा न संसर्गी ॥३॥
तया ब्रह्मया सह गती ॥ तुका ह्मणे मुक्त होती ॥४॥

॥७५५९॥
नव्हे इतरा सारिखा । ऐसा जाणुनीयां सखा ॥१॥
चित्तीं चिंती सदा स्मरे । वत्स धेनुसी हुंबरे ॥२॥
पार्था सुलभ मी त्याला । रक्षी अंतर बाह्याला ॥३॥
नित्य योजिला योगीं जो । तुका ह्मणे त्यासी भजों ॥४॥

॥७५६०॥
मज पावोनीयां जन्मा । न फिरेच ज्याचा प्रेमा ॥१॥
घर दु:खाचें नश्वर । देह अपवित्रची थोर ॥२॥
न पावती पुन्हा संत । पाहा या चोरांचा संघात ॥३॥
थोर पावले जे गती । तुका वर्णी पुढत पुढती ॥४॥

॥७५६१॥
अरे अर्जुना पुनरा । वृत्ती नेम चराचरा ॥१॥
विधिलोकादीकींहुनी । उसळती येणीं जाणीं ॥२॥
परी मातें पावलीया । कोण फिरेल कौंतेया ॥३॥
पुन्हा जन्मा नये तुका । कधीं पाहावया लोका ॥४॥

॥७५६२॥
युगें हजार एकें दिवसें । ह्मणती येतसे सहजे ॥१॥
रात्री तैसीच विधिची । जे सृष्टिची बुडवण ॥२॥
गेले जाणती तेथें जे । सुखभोजें भोगाया ॥१॥
क्रम मुक्त्यर्थ राहिले । तुकीं न आले तुकयाच्या ॥४॥

॥७५६३॥
व्यक्ति प्रकृति पासुनी । तूं सज्ञानी जाणसी ॥१॥
विधि दिनागमीं होती । आपुल्या चित्तीं वोळखे ॥२॥
या तत्वीं प्रकृती लीना । कांहीं वासना न ठेवी ॥३॥
निशा आरंभितां होती । तुका प्रकृति निवेदी ॥४॥

॥७५६४॥
तोचि हा ग्रामभूतां । ब्रह्मसत्ता झाला जो ॥१॥
होतो होऊनी नासतो । मी पाहातों नित्यानी ॥२॥
लीन अवश हा रात्रीं । तृणपत्रीं बीजेसीं ॥३॥
पुन्हा दिनारंभीं होतो । व्यापार तो ह्मणे तुका ॥४॥

॥७५६५॥
सत्ता निराकार तया । विकार तया नसे जी ॥१॥
भूतां प्रकृतीहुनी । सृष्टी भुवनीं ना दिसे ॥२॥
निराळी जे सर्वांभूतीं । आहे वस्ती आगम ॥३॥
विश्व नासतां न नासे । तुका वसे अव्यक्तीं ॥४॥

॥७५६६॥
निराकार जें अक्षर । नसे क्षर प्रळयांत ॥१॥
बोलिली ती श्रेष्ट गती । पुना वृत्ती परिच्छिन्न ॥२॥
न येति तेथें जे गेले । साधन गेले साधुनी ॥३॥
माझें धाम तेंची तुका । पाडी चीरा चौर्‍यायशीं ॥४॥

॥७५६७॥
तो तो अद्वैत भक्तीनें । कीं प्रीतीनें हृदयींच्या ॥१॥
पार्था पाविजे पुरुषें । छंदोत्कषें विवेकें ॥२॥
हीं भूतें जया स्वरुपीं । लीन व्यापी लहरी ॥३॥
ज्याणें व्यापिलें हें जग । निरुद्वेग आसुनी ॥४॥
तुका म्हणे माहात्म्य अंतीं । रमापती बोलतो ॥५॥

॥७५६८॥
ज्या काळीं न पुन्हा जन्म । ऐसें वर्म एक आहे ॥१॥
योगी होतां ही जन्मतो । तो सांगतो अवधारी ॥२॥
देवताही सांगूं क्रमें नेणों प्रेमें वंचुगा ॥३॥
मार्गी भेटती भावेंची । ऐके तेचि म्हणे तुका ॥४॥

॥७५६९॥
पावक ज्योत हृदयांत । हे जागृत असावी ॥१॥
दिनपक्ष शुक्लमास । षट्‍पूर्णास जे येती ॥२॥
उत्तरायण हा मार्ग । पायीं स्वर्ग जात्यासी ॥३॥
तुका ह्मणे वेदवेत्ते । विधिलोकातें पावती ॥४॥

॥७५७०॥
धूमो राति कृष्णपक्ष । मास साक्ष तेवींच ॥१॥
दक्षिणायन चंद्रामृत । झाल्या प्राप्त यद्यपी ॥२॥
योगी पूर्ण तरी फीरे । हे कां वीरें चुकेना ॥३॥
तुका ह्मणे प्रसिद्ध हें । मार्गद्वय निर्मिले ॥४॥

॥७५७१॥
शुक्ल कृष्ण गती ऐश्या । दोनी सांगितल्या जैश्या ॥
इतर नव्हति गा तैशा । पैं बोलाया आधारु ॥१॥
जेणें पंथ हा पाहाणें । तरो न भरोसे घेणे ॥
वोळखती पैं शाहाणे । बर्‍या शाश्वत पार्थिवा ॥२॥
अर्चिला पहिला पंथ । तो तरी नव्हेगा अनाथ ॥
कीर्ती ठेवुनी सनाथ । पणें साधु पैं गेले ॥३॥
ते न येति घेऊं जन्म । दुसरीचें खोटें कर्म ॥
तुका ह्मणे खरें काम । तरी घ्यावें पदरांत ॥४॥

॥७५७२॥
जाणोनि माझ्या मतें । मार्ग दोनी हे आईते ॥
वोळखीजे बुद्धिवंतें । गती किंवा अवगती ॥१॥
परी हे अज्ञाना प्रसंग । आत्मयोगीं तो नि:संग ॥
त्यासी न पडे व्यासंग । ऊर्ध्व अधर्मी ज्ञात्याला ॥२॥
ययालागीं बहुतां परी । आम्ही शिक्षिलें उत्तरीं ॥
अर्जुना तस्मात तरीं । खुण अंतरी दह्रुनी ॥३॥
योग युक्तीनें साधीरे । मग जनन व्याधीरे ॥
तुज सखया न बाधीरे । तुका वदला निश्चयें ॥४॥

॥७५७३॥
वेदामध्यें पाहाताना । तैसें तपही अर्जुना ॥
अथवा विधियुक्त हें वना । करितां फळ जें जोडे ॥१॥
दशदानें महादानें । भूमिकन्या शय्यादानें ॥
सद्यवारक अवदाने । पुण्य जें कां अर्पीती ॥२॥
अतिक्रमी जाणुनियां ॥ सर्व मातें आणुनियां ॥
राहे अलिप्त त्या वायां । गेला ह्मणेल कोण गा ॥३॥
नाशवंत सांडी सारे । योगी चढे साक्षात्कारें ॥
तें आद्य परंपरा रे । तुका मग्न ज्यामाजी ॥४॥

॥७५७४॥
ऐसी अष्टम प्रसंगीं । गति नेमी तूं सारंगी ॥
साधकास कळे अंगीं । सुख ऐसें भोगाया ॥१॥
आहो योगी श्रेष्ठ त्यांत । जो कां हरि रुपीं संतत ॥
त्याची वर्णियेली ख्यात । याच अष्टम अध्यायीं ॥२॥
पुढें नवम ऐकावा । ज्यांत देवो सांपडावा ॥
तुका ह्मणे आह्मा बरवा । ज्या वर्णनीं आनंदु ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : June 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP