अभंग - ८३३१ ते ८३४०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥८३३१॥
साहि शास्त्रांतरीं । तो परमात्मा श्रीहरी ॥
दशरथाचे घरीं । क्रीडतो राम ॥१॥
सदाशिवाचें निज ध्येय । वाल्मीकाचें निज गुह्य ॥
भिल्लटीचीं फळें खाय । श्रीरघुनाथ माझा ॥२॥
योगियांचे निज मनीं । नातुडे जाण चिंतनीं ॥
वानरांचे कानीं । गोष्टी सांगे श्रीराम ॥३॥
चरणीं शिळेतें उद्धरी । नामें गणिकेसी तारी ॥
तो कोळियांचे घरीं । पाहुणा आला श्रीराम ॥४॥
क्षण एक सुरवरां । तो रिसां आणि वानरां ॥
सकल चराचरा । क्षेम देतसे राम ॥५॥
राम सांवळा सगुण । राम योगियांचें ध्यान ॥
राम राजीवलोचन । तुका चरण वंदितो ॥६॥

॥८३३२॥
राम जिवाचें जीवन । रामदासांचें चिंतन ॥१॥
भक्तिभावाचा अंकीत । पूर्णपणें रघुनाथ ॥२॥
राम दिनांचा दयाळ । राम पतीतां कृपाळ ॥३॥
तुका ह्मणे माझा स्वामी । आवडीनें वसे नामीं ॥४॥

॥८३३३॥
आलियासी छळी वादी । दुर्बुद्धी सर्वांगीं ॥१॥
राजद्वारीं अपमान । थोर सान ब्राह्मण ॥२॥
राजा वागवितो भीड । तैसी चाड छळाया ॥३॥
तुका ह्मणे भुंके सुनें । ठाया नेणें ठावें तें ॥४॥

॥८३३४॥
नामाचे पवाडे कांरे । दवडीसी । कांरे विसरसी पवाडे हे ॥१॥
खणखणा हाणी खड्ग प्रल्हादासी । न रुपे अंगासी किंचित ही ॥२॥
रामकृष्णहरी ऐसी मारी हाक । तेणें पडे धाक बळियासी ॥३॥
ऐसीं हीं समर्थ ऐसीये कीर्त्तींची । आवडी तुकयाचीं भेटी देई ॥४॥

॥८३३५॥
अमंगळ वाणी वदे मुखें । छळी देखें भाविकां ॥१॥
अविचारी सदा मस्ती । पाय वस्ती सांचिलें ॥२॥
भलतें मुखें बडबडी । बुद्धि कुडी न संडी ॥३॥
जनां देखतां वाटे भय । केश डोय वाढवी ॥४॥
तुका ह्मणे व्हावें दुरी । तोंडावरी थुंकोनी ॥५॥

॥८३३६॥
उच्चारिल नाम कंस वैरभावें । म्हणुनियां जीव कृष्ण केला ॥१॥
कृष्णरुप त्यासी दिसे अवघें जन । पाहे तंव आपण कृष्ण झाला ॥२॥
पाहिलें दर्पणीं आधील्या सुखासी । चतुर्भुज त्यासी तोचि झाला ॥३॥
झाली कृष्णरुप कन्या पुत्रभाज । तुका म्हणे राज्य सैन्य लोक ॥४॥

॥८३३७॥
करुनी विनंती आज्ञा वंदूं माथां । फिरोनी मागुता आलों गृहा ॥१॥
सारिलें भोजन स्वस्थ केलें मन । होते कोण कोण स्वकीय लोक ॥२॥
केली वारावार आपुला वेव्हार । अवघा संसार निरसिला ॥३॥
तुका ह्मणें झाली जीवासी निश्चिती । कराया श्रीपती आलों सेवा ॥४॥

॥८३३८॥
धरोनियां हात माझा विठ्ठलानें । संतांहातीं तेणें दिलें मज ॥१॥
दयावंत संत हिरोनियां घेती । अंतरीं दुर्मती सकळ ही ॥२॥
आपुले मुखींचा प्रसाद जो शेष । माझिया जिवास देती स्वयें ॥३॥
तुका ह्मणे दीन निवालों अंतरीं । जन्म मृत्यु फेरी नेली संतीं ॥४॥

॥८३३९॥
कोणापासी सांगूं संसाराचें दु:ख । पापियासि सुख फार वाटे ॥१॥
स्त्रियेची संगती मुर्खासीचे फार । परी हा संसार मज नको ॥२॥
मुक्त करी मज संसारापासोन । धरितों चरण चित्त भावें ॥३॥
सोसवेना मज नित्य नर्कवास । झालों मी उदास पांडुरंगा ॥४॥
काय तुझी आह्मी केली होती चोरी । घालोनी संसारीं दवडीलें ॥५॥
तुका ह्मणे विठू जें केलें तें बरें । आतां पुरे पुरे संसार हा ॥६॥

॥८३४०॥
गुरुकुळाचिया पादुका मस्तकीं । धरीन कौतुकी प्रेमभरें ॥१॥
गुरुकुळाचिया दारींचा कुतरा । होईन संसारा जन्मोजन्मीं ॥२॥
गुरुनाम मुखीं गाईन आवडी । जेणें मायावेडी तोडलीसे ॥३॥
तुका ह्मणे माझें धन गुरुपाय । दाखविली माय पांडुरंग ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : August 01, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP