अभंग - ८४११ ते ८४२०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥८४११॥
प्रेमळाची वार्ता । ती अनुवादूं पंडुसुता ॥
ती मानूं परम दैवता । पदही माथां वंदूं त्याचे ॥१॥
प्रेमळ वेष दिसतो वेडा । सुंदर बाबदेचा खडा ॥
जिकडे घातला तिकडे गोडा । न करी पीडा कोणासी ॥२॥
मृदु नवनीताचा गोळा । आंत बाहेर कोंवळा ॥
सज्जन दुर्जनाचा पाळा । समान बाळासारिखा ॥३॥
आपपराची ओळखी । मोडून टाकी मेली निकी ॥
सदा अंतर स्वात्मसुखी । नाम मुखीं उच्चारीं ॥४॥
ऐशियाची बहु लुटार । वाचे वर्णावी ही सार ॥
उद्धवा सांगे शारंगधर । कथा ही सार जुनाट ॥५॥
हीं सहा चिन्हें पाही । एका कदुर्वीच्या ठायीं ॥
धन्य धन्य ज्याची मायी । पर उपकार सोई अवतरली ॥६॥
सद्गुरुकृपा झाली नीति । तेचि झाले सदा सुखी ॥
तुका ह्मणे बोलतां सुखीं । रोमांच सुर मी उभारिले ॥७॥
॥८४१२॥
व्यास वाल्मिकी हे मुनी । वापी कूप भरलें पाणी ।
बाहेर नये प्रयत्नांवाचुनी । दोर शेंदणी केलिया ॥१॥
धन्य पुंडलीक परोपकारी । केली क्षेत्राची ते दोरी ॥
माता पित सेवा सेवा निरधारी । आणिला हरी सन्निध ॥२॥
बैसावया सम दृष्टी । भाकेस गोण उभा पाठी ॥
मौन्य कर ठेवुनियां कटी । सुख संतोषें आनंदें ॥३॥
देवा सुटली चळवळ । कोणी सखे नाहीं जवळ ॥
भक्त गेले हे भूपाळ । न गमे काळ सुखाचा ॥४॥
हरी विचारी मानसीं । गेले बदरीकाश्रमासी ॥
प्रार्थीतसे उद्धवासी । चल पंढरीसी जिवलगा ॥५॥
उद्धव ह्मणे कमळापती । नको गर्भवास स्थिति ॥
तुझे पाय आठउनी चित्तीं ॥ दिवस रात्रीं संतोषे ॥६॥
माझे अवतार हे जनीं । तीर्थव्रताचे जे खाणी ॥
विशाळी राहती पद्मसुमनीं । पुसा जाऊनी तियेसी ॥७॥
हरी येऊनियां तेथें । मधुर उत्तरें प्रार्थीत ॥
जगा उपकार करी त्वरित । भक्तिपंथें लावावें ॥८॥
तूं तर जगत्रयजननी । तुझें नाम मुख्य जनीं ॥
उद्धव नाम घोषाची खाणी । नामदेव ह्मणुनी नाम तया ॥९॥
ऐसें बोलुनी तात्काळीं । तोडुनी घेतली सुमनकळी ॥
मस्तकीं ठेवियली मौळी । आला तात्काळीं पंढरी ॥१०॥
जैसा शिवमस्तकीं गंगाओघ । तैसी धरली पांडुरंगे ॥
उद्धवा चळवळ सुटली अंगें । तो भाग न साहे रवीचा ॥११॥
पांच वर्षाची गोरटी । पुढें आणिली जगजेठी ॥
मागें उद्धव नामा पाठी । आला मोटी तात्काळीं ॥१२॥
दामाशेटी गोणाईची भक्ति । फळा आली त्वरित गति ॥
तुका ह्मणे भाक पाहिलीच होती । केली संतीं पावन ॥१३॥
॥८४१३॥
धन्य धन्य शिंपी नामा । धन्य धन्य ज्याच्या नेमा ॥
धन्य जनी दासीचा प्रेमा । मेघ:शामा भुलविला ॥१॥
उभारिला भक्ति हा झेंडा । नाम निशाण भडके तोंडा ॥
संत हाटीं अपार फंडा । मूळ बीज गुंडा ब्रम्हींचा ॥२॥
प्रथम घेऊं जातां भेटी । ताक कण्या भरली वाटी ॥
लावी देवाजीच्या ओठीं । जेवीं जगजेठी ह्मणुनियां ॥३॥
जेवीं जेवीं बा मुरारी । माता वाट पाहे घरीं ॥
विलंब न लावी तरी । ग्रास करीं घेई कां ॥४॥
तुझे हात गुंतले जघनीं । ह्मणोनी ग्रास घालितों वदनीं ॥
खरकटें अंगावर सांडोनी । पीतांबर घाणी होतसे ॥५॥
एक दोन तीन ग्रास । घालतांना होतो नाश ॥
न जेवितां जगदीश । होती क्लेश जिवलगा ॥६॥
सुखापासून फिरवितां ग्रास । नाहीं चाखिला म्यां रस ॥
तुज काम आला रोष । काय दोष आचरलों ॥७॥
लोटिल्या पक्वान्नाच्या राशी । दांतीं कण्या मागोनी खासी ॥
आतां काय थोरपण आलें कुसी । हृषीकेशी अनंता ॥८॥
गेलों विदुराच्या घरीं । जेवलों भाज्या आणि भाकरी ॥
भाक दिलीस माझे करीं । निज निर्धारीं चालवीन ॥९॥
मी तों होतों निर्विकारी । कारण माझें पंढरी ॥
ओढिली प्रेमसूत्राची दोरी । ह्मणोनी पोरी आली येथें ॥१०॥
माझी जिवलग ही जनी । पुढें ओढली व्यसनीं ॥
ह्मणुनियां स्थानीं । चक्रपाणी आलों मी ॥११॥
लहान ह्मणोनी जेवीनास । घातली निश्चयाची कांस ॥
परतोनी न जाय घरास । करीन नाश देहाचा ॥१२॥
मागें सरोनियां करीं । धडक मारी पायांवरी ॥
चळवळ कांपत असे हरी । मस्तक करीं धरियलें ॥१३॥
लावोनियां नेत्रपात । कंठीं बाष्प तैं दाटत ॥
देह कोरडे करों पाहत । अंगीं रोमांच उभारिले ॥१४॥
गजबजला जगजेठी । कवळून धरियेला पोटीं ॥
जिवलगा नको पाहों तुटी । देई भेटी सत्वरी ॥१५॥
नामा लक्षी येरे साठीं । दहा अवतार धरिले नेटीं ॥
हिंडतसें तुझे पाठीं । नको तुटी पाहूं कीं ॥१६॥
नामा मौनें राहत । देवा आले अश्रुपात ॥
हरी सांगे रुक्मिणीतें । समजावी यातें जिवलगे ॥१७॥
रुक्मिणी ह्मणे चक्रपाणी । कण्या खाव्या ह्या चाटोनी ॥
आडवा वोसंगा घेऊनी । जगत्रयजननी कुरवाळी ॥१८॥
आडवा घेउनी भक्तराणा । मुखीं घालितसे स्तना ॥
पाजितसे प्रेमपान्हा । आवडे मना आनंदें ॥१९॥
सावध करुनी प्रेमप्रीति । तिघें बैसोनी कण्या खाती ॥
कोणी वर्णावी ही ख्याती । प्रेमळाची ॥२०॥
जें न कळे ब्रह्मासी । प्राप्त नाहीं प्रद्युम्नासी ॥
तें पाजिलें नाम्यासी । प्रेमरसें आनंदें ॥२१॥
तें तें भरलें पोटीं । ह्मणोनी संकल्प शत कोटी ॥
तुका ह्मणे पूर्णता नेटीं । शेष शेवटीं आली येथें ॥२२॥
॥८४१४॥
नाम नाहीं मुखीं नाइके श्रवणीं । तया कां जननी प्रसवली ॥१॥
प्रसवली परी झाला भूमीभार । तया दंड थोर कुंभपाक ॥२॥
असिपत्रावरी तयासी टाकिती । पायीं चालविती तप्त भुमी ॥३॥
चौर्यासी योनी नर्क महा घोर । टाकिती भीतर अभक्तांसी ॥४॥
तुका ह्मणे कांहीं करा सोडवण । आठवा चरण गोविंदाचे ॥५॥
॥८४१५॥
मुखीं ब्राह्मण जन्मले । बाहुपासून राजे झाले ॥१॥
उरी वैशवर्ण पाहीं । शूद्र चरणाचे ठायीं ॥२॥
गुडघ्यापासून ब्रह्मचारी । गृहस्थ पायीं अवधारी ॥३॥
सन्यासी तो झाला माथां । वक्षस्थळ वानप्रस्था ॥४॥
तुका ह्मणे भेद । ऐसें बोलियला वेद ॥५॥
॥८४१६॥
गुरु करावा पाहुनी । दया क्षमा ज्याचे मनीं ॥१॥
तो हा ज्ञानाचा पुतळा । पाय वंदूं वेळोवेळां ॥२॥
सम दृष्टी सर्वावरी । पुण्यशील ब्रह्मचारी ॥३॥
तुका ह्मणे मुक्ताफळ । फुगा नव्हे तो केवळ ॥४॥
॥८४१७॥
राम जप करी सांव । आरोग्य झालें सर्व अंग ॥१॥
नाम जप करी ब्रह्मा । तो तंव अनुसरला कर्मा ॥२॥
नाम जप करी वेद । तो मौन्यें झाला स्तब्ध ॥३॥
तुका ह्मणे नाम जपतां । मौन न रहावें सर्वथा ॥४॥
॥८४१८॥
ज्याचे मुखीं राम नाम । त्याचें सांगा मजला काम ॥१॥
ज्याचें घरीं पारायण । त्याची मजुरी करीन ॥२॥
ज्यासी पंढरीची वारी । त्याची सांगा मज चाकरी ॥३॥
तुह्मी अवघे जन चला । त्याचे हातीं द्या हो मला ॥४॥
तुका ह्मणे घाला भीड । त्याला जगाची आवड ॥५॥
॥८४१९॥
दर्कदार ह्क्कदार । संतांमाजी सौदागर ॥१॥
सनद शिक्याचें पत्र । गर्जताती अहोरात्र ॥२॥
दामशेटी देशमुख । प्रत्यक्ष श्रीहरीचें मुख ।
नामा शिरकारी शिक्का शोभे । जनाईपाठीं शुद्ध मोर्तब ॥४॥
निवृत्तीराज श्रेष्ठ शुद्ध । मजपाशीं सकळ आद ॥५॥
देशपांडया ज्ञानराज । त्याचे रुमालीं निज बीज ॥६॥
काकु मडका पाटील भला । जाट धनाजी चौगुला ॥७॥
चांगदेव कुळकर्णी । वर्षे चौदाशांची धणी ॥८॥
मुक्ताई करी तपासणी । खरें खोटें निवडा दोन्ही ॥९॥
सरकार दत्त जनार्दन । एकनाथ दिवाण ॥१०॥
कबीर खंबीर हवलदार । रामनामाची ताकीद थोर ॥
चोखा महार वेसकर । फांटा मारी वाकीवर ॥१२॥
नरहरी सोनार पोतदार । एक पारखीचा निर्धार ॥१३॥
तुका तेथील नाईक वाणी । मोडी भद्राईच्या खोडी ॥१४॥
॥८४२०॥
नमस्कार कीर्तन रंगा । संत श्रोते भाविक लिंगा ॥
प्रेम चढो माझिया अंगा । देह नि:संगा होवोनियां ॥१॥
आरंभीं नमितों दैवता । कुळीचें कुळस्वामिणी आतां ॥
मुख्य सद्गुरु तो दाता । चरणीं माथां जयाच्या ॥२॥
चंडी विनायक मारुती । बहिरी हरीहराच्या मुर्ती ॥
ब्रह्मरुप ब्रह्मींच्या मुर्ती । आदि शक्ती आदि माया ॥३॥
चोखोबा माझा गणपती । राधाई झारीण सरस्वती ॥
गोरोबा बलभीम मारुती । अगाध कीर्ति जयाची ॥४॥
सांवता माझा काळबहिरी । उदर चिरोनियां करीं ॥५॥
पोटीं सांठविला हरी । निज निश्चयें ॥५॥
आदिनाथ निवृत्तीनाथ । ज्ञानराज महा विष्णुची ज्योत ॥
सोपान ब्रह्मरुप मूर्त । आदि शक्ति मुक्ताई ॥६॥
नवविध भक्ति नवविध रत्न । आरंभीं करितों स्तवन ॥
तुका ह्मणे आलो शरण । करितों नमन सेवेसी ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : August 01, 2019
TOP