सार्थपिड्गलछन्द:सूत्र -अध्याय पहिला

सार्थपिड्गलछन्द:सूत्र


"ब्राह्मणेन निष्कारणक: षडड्गो वेदोऽध्येयो ज्ञेयश्च" म्हणजे ब्राह्मणानें निष्कामबुद्धीनें शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छन्द व ज्यौतिष ह्या साही अंगांसह वेदाचें अध्ययन करावें व त्याचा अर्थ जाणावा अशी वेदाची आज्ञा आहे. अर्थात्‍ वेदाच्या पठनादिकांप्रमाणेंच वेदाड्गाच्याही पठनादिकांमध्यें पुण्यफल असून शिवाय वेदाच्या अर्थाचें ज्ञान व यज्ञादि कर्माची सांगसिद्धि यांनाही वेदाड्गांचें ज्ञान अवश्य आहे; त्यांवाचून त्यांची सिद्धत्सा होणार नाहीं. " यो ह वा अविदितार्षेयच्छन्दोदैवतविनियोगेन ब्राह्मणेन मन्त्रेण याजयति वाध्यापयति वा स स्थाणुं वर्च्छति गर्त वा पद्यते वा प्रमीयते पापीयान्भवति यातयामान्यस्य च्छन्दांसि भवन्ति" असें सामवेदाच्या छन्दोगब्राह्मणांत म्हटले आहे. ह्याचा अर्थ जो यजमान, ज्याला मन्त्रांचे ऋषि, छन्द, दैवत व विनियोग (उपयोग) ह्यांचें ज्ञान नाहीं, अशा ब्राह्मणाकडून समन्त्रक यजन करवितो तो, अथवा अध्यापन करवितो तो, अज्ञानी अशा वृक्षयोनींत जन्माला जातो; किंवा खाड्यात पडतो अथवा नाश पावतो किंवा अत्यन्त पापी होतो व त्यानें अध्ययन केलेली छन्दस्‍ (वेदमन्त्र) नीरस अर्थात्‍ फलहीन होतात; म्हणून यज्ञादिकर्मामध्यें योजिल्या जाणार्‍या मन्त्रांनां साफल्य येण्याकरितां वैदिक छन्दांच्या ज्ञानाची अत्यन्त आवश्यकता आहे. त्याचप्रमाणें काव्यें हीं, कीर्ति, द्रव्यलाभ, व्यवहारज्ञान, पापनिवारण व परमाल्हाद इत्यादि फलांनीं पुरुषार्थाचींच साधनें असल्यामुळें त्यांच्या ज्ञानाकरितां लौकिकछन्दांचें (वृत्तांचें) ज्ञानही आवश्यक आहे म्हणून, सर्व लोकांवर उपकार करण्याकरितां, त्यांना वैदिक व लौकिक छन्दांचें ज्ञान थोडक्यांत व्हावें ह्या उद्देशानें, परमकारूणिक अशा श्रीपिड्गलनागाचार्यानें हें छन्द:शास्त्र रचिलें आहे. हल्लींच्या प्रचलित वेदषडड्गांमध्यें ह्या पिड्गच्छन्दाचीच गणना आहे. ह्यावर भट्टहलायुधाची संस्कृत वृत्ति (टीका) फार उत्तम असून सुप्रसिद्ध आहे. त्या वृत्तीला अनुसरुनच मी ह्यापुढें, महाराष्ट्रभाषेमध्यें त्या पिड्गलछन्दसूत्रांचा सविस्तर अर्थ देणार आहें.

भाषाप्रचारांत छन्द:शब्दाचा मुख्यार्थ ‘वेद’ असा आहे, परंतु ह्या शास्त्रांत छन्दस्‍ म्हणजे वृत्तें, पद्यांच्या चाली असा अर्थ समजावा. पूर्वी देवांनीं असुरांना समजूं नये म्हणून आपल्या यज्ञादि विधींचे, त्यांत (छन्दांत) रचून छादन (आच्छादन) केलें म्हणून त्यांना छंदस्‍ असें नांव आलें अशी छन्दस्‍ शब्दाची वैदिक व्युत्पत्ति आहे. हल्लींसुद्धां गद्यापेक्षां पद्यामध्यें अर्थ गूढ रहातो असा अनुभव आहे. असो. पाणिनीच्या व्याकरणानें त्याच्या पूर्वीची ऐन्द्रादिक व्याकरणें मागें पडलीं, त्याप्रमाणें ह्या पिड्गलच्छन्दानें त्याच्या पूर्वीचे इतर छन्दोग्रन्थ मागें पडले आहेत. प्रचलित वैदिकांच्या पाठांत, प्रारंभीं ‘मयरस०’ वगैरेपासून ‘त्रिविरामं०’ ही कारिका संपेपर्यंत एकंदर सहा, हलायुधाच्या वृत्तीमधील कारिका अधिक म्हटल्या जात आहेत व घातल्या आहेत; परंतु खरा शास्त्रारंभ ‘धी श्री स्त्रीम्‍’ ह्या सूत्रापासूनच आहे. हें ह्या कारिका वाचतांच ध्यानांत येतें. ह्या कारिकांनीं पुढें येणार्‍या कांही सूत्रांचा अर्थच सांगितला असल्यानें पुढच्या विवरणांत पुनरुक्ति भासेल; तथापि प्रचलित वैदिक पाठास अनुसरुन व पुढें येणार्‍या गणसूत्रांच्या अर्थज्ञानासही सोपेपणा येईल म्हणून त्या कारिकांचे अर्थही अन्वयांसह प्रथमत: देतों.

मयरसतजभनलगसंमितं भ्रमति वाड्मयं जगति यस्य ॥
सजयति पिड्गलनाग: शिवप्रसादाद्विशुद्धमति: ॥१॥
अन्वय: -
मयरसतजभनलगसंमितं यस्य वाड्मयं जगति भ्रमति, स: शिवप्रसादद्विशुद्धमति: पिड्गलनाग: जयति ॥
मयरसतजभनलग ह्या दहा गणांनीं मोजिलेलें ज्याचें छन्द:शास्त्ररुपी वाड्मय, ह्या जगांत सर्वत्र संचार करीत आहे; तो श्रीशंकराच्या प्रसादानें अत्यन्त शुद्धबुद्धि झालेला पिड्गलनाग (छन्द:सूत्रकार) सर्वत्र विजय पावत आहे; म्हणजे व्यवहारांत त्याच्याच छन्द:शास्त्राचा सर्वत्र उत्कर्ष आहे ॥१॥
आतां दुसर्‍या व तिसर्‍या आर्येनें छन्दोवृत्तिकार भट्टहलायुध गणांचें वर्णन करतात. ह्या शास्त्रांत पुढें जी वृत्तें (छन्दस्‍) सांगावयाचीं आहेत त्यांचे अवयव समजण्याकरितां, जे ठराविक अक्षरांचे समुदाय मानिले आहेत त्यांना ह्या ग्रंथांत गण असें नांव आहे.

त्रिगुरुं विद्धि मकारं लघ्वादिसमन्वितं यकाराख्यम्‍ ॥
लघुमध्यमं तु रेफं सकारमन्ते गुरुनिबद्धम्‍ ॥२॥
अन्वय: -
(त्वम्‍) मकारं त्रिगुरुं विद्धि,यकाराख्यं लघ्वादिसमन्वितं (विद्धि), रेफं तु लघुमध्यमं (विद्धि) सकारं (च) अन्ते गुरुनिबद्धं (विद्धि॥
हे पाठका, तीन गुरुस्वरांनीं युक्त तो मगण, आरंभीं एक लघु (र्‍हस्व)  व पुढें दोन गुरु तो यगण, मागें व पुढें एकेक गुरु असून मध्यें एक लघु असतो तो रगण, व प्रथम दोन लघु असून शेवटीं एका गुरुनें युक्त तोइ सगण असें तूं समज ॥२॥

लघ्वन्त्यं हि तकारं जकारमुभयोर्लघुं विजानीयात्‍ ॥
आदिगुरुं च भकारं नकारमिह पैड्गले त्रिलघुम्‍ ॥३॥
अन्वय: -
इहं पैड्गलं तकारं लघ्वन्त्यं हि विजानीयात्‍, जकारम्‍ उभयो: लघुं (विजानीयात्‍) भकारं आदिगुरुं, नकारं (च) त्रिलघुं (विजानीयात्‍) ।
ह्या पिड्गलाच्या शास्त्रांत, प्रथम दोन गुरु असून शेवटीं एक लघु असलेला तो तगण, मध्यें गुरुस्वर असून त्याच्या दोन्ही बाजूस एकेक लघुस्वर असतो तो जगण, आधीं एक गुरु असून पुढें दोन्ही लघु असल्यास तो भगण आणि तीनहि लघुस्वर असलेला तो नगण असें जाणावें ॥३॥
आतां चौथ्या कारिकेनें पुढें सूत्रामधून येणार्‍या लघु व गुरु ह्या संज्ञांचा निर्णय सांगतात: -

दीर्घं संयोगपरं प्लुतस्वरं व्यञ्जनान्तमूष्मान्तम्‍ ॥
सानुस्वारं च गुरुं क्वचिदवसानेऽपि लघ्वन्त्यम्‍ ॥४॥
अन्वय: -
दीर्घ, संयोगपरं, प्लुतस्वरं, व्यञ्जनान्तम्‍, ऊष्मान्तम्‍, सानुस्वारं च गुरुं (विजानीयात्‍) क्वचित्‍ अवसाने अन्त्यं लघु अपि (गुरुभवति) ॥
दीर्घ, जोडाक्षर (संयुक्त व्यंजन) पुढें असलेला र्‍हस्व, प्लुतस्वर (त्रिमात्र) आणि व्यञ्जन, विसर्ग किंवा अनुस्वार पुढें असलेला र्‍हस्व स्वर; ह्यांनां गुरु समजावें. तसेंच क्वचित्‍ स्थलीं पुढें कोणताहि वर्ण नसलेल्या पदाच्या शेवटचा लघुही गुरु होतो ॥४॥
वृत्तिकार भट्टलायुध पुन्हां ५ व्या कारिकेनें त्या गणांचेच संक्षेपानें वर्णन करितात.

आदिमध्यावसानेषु यरता यान्ति लाघवम्‍ ॥
भजसा गौरवं यान्ति मनौ तु गुरुलाघवम्‍ ॥५॥
अन्वय:-
यरता: (क्रमात्‍) आदिमध्यावसानेषु लाघवं यान्ति भजसा गौरवं यान्ति, मनौ तु (क्रमात्‍) गुरुलाघवं (यात:).
प्रत्येक गण तीन अक्षरांचा असतो हें लक्षांत ठेवावें. तसेंच स्वरशास्त्राप्रमाणें ह्या छन्दशास्त्रांत देखील शब्दांतलें स्वरच गणांच्या व्यवहारांत मुख्य आहेत; म्हणून ह्या कारिकेंतील आठ गण तीन अक्षरांनीं म्हणजे तीन स्वरांनीं युक्त असतात असें जाणावें.

कारिकार्थ: -
यरत हे तीन गण क्रमानें; आरंभीं, मध्यें व शेवटीं लघुस्वरानें युक्त असतात म्हणजे य आद्यलघु, र मध्यलघु आणि त अन्त्यलघु असतो. तसेंच भजस हे गण आरंभीं, मध्यें व शेवटीं गुरुवर्णानें युक्त असतात. म्हणजे भ आद्यगुरु, ज मध्यगुरु व स अन्त्यगुरु असतो. ‘म’ व ‘न’ हे दोन गण क्रमानें सर्वगुरु (त्रिगुरु) व सर्वलघु (त्रिलघु) असतात. ॥५॥

आतां सहाव्या करिकेनें ह्यापुढें येणार्‍या छन्द:सूत्रांचें स्वरुप व प्रयोजन थोडक्यांत सांगतात.

त्रिविरामं दर्शवर्णं षण्मात्रमुवाच पिड्गल: सूत्रम्‍ ॥
छन्दोवर्गपदार्थप्रत्ययहेतोश्च शास्त्रादौ ॥६॥
अन्वय: -
पिड्गल: शास्त्रादौ छन्दोवर्गपदार्थप्रत्ययहेतो: त्रिविरामं दशवर्ण षण्मात्रं च सूत्रम्‍ उवाच ॥
श्रीमान्‍ पिड्गलाचार्य, तीन यति (विश्राम) मयरसतजभनलग हे दहा वर्ण व सहा मात्रा ह्यांनी युक्त असलेलें हें छन्द:सूत्र, शास्त्रादिक ग्रंथांमध्यें, छन्दांच्या समुदायांचें व त्यांच्या अवयव वगैरेंचें ज्ञान होण्याकरितां सांगता झाला ॥६॥

आतां ह्यापुढें, प्रत्यक्ष पिड्गलनागाच्या छन्दसूत्रांचें विवरण द्यावयाचें आहे. त्याकरितां प्रथम थोडीशी सूत्रभाषेची माहिती देणें अवश्य आहे. पूर्वीच्या परिस्थितीस अनुसरुन प्राचीन कालचे महर्षि आपलीं शास्त्रें, पठन व लेखन वगैरेंच्या सौकर्याकरितां, संक्षिप्त परंतु संदेहरहित अशा नियमांनीं लिहीत असत; ते नियमच सूत्रें होत. हीं सूत्रें विस्तारानें लहान असल्यामुळें पाठ करण्यास व लक्षांत रहाण्यास सोपीं असून त्यांनीं शास्त्रांचें मुख्य सिद्धांत डोळ्यांसमोर उभे राहातात. ह्यांची भाषा फार साधी असते. सूत्रामध्यें लाघव (आटपशीरपणा) येण्याकरितां सूत्रकार बहुधा दिलेल्या पदांची वारंवार आवृत्ति करीत नाहीत तर सूत्रार्धाच्या पूर्णतेकरितां जरुरी असलेलीं पदें मागच्या किंवा पुढच्या जवळच्या सूत्रांतून अध्याहृत आणतात; अथवा एकशेषसमासाच्या प्रमाणें त्याच सूत्राची पुनरावृत्ति - अर्थात्‍ गृहीत धरितात, व हे प्रकार गुरुपरंपरेनें जाणले जातात. ह्यांपैकीं मागच्या सूत्रांतील पदें पुढें आणण्यास अनुवृत्ति, पुढच्या सूत्रांतलें पद घेण्यास अपकर्ष, व पुन:पठनास अनुवृत्ति, पुढच्या सूत्रांतलें पद घेण्यास अपकर्ष, व पुन:पठनास आवृत्ति अशा शास्त्रीय परंपरेच्या संज्ञा आहेत. ह्यापुढें पिड्गल सूत्रांच्या किंवा बहुधा कोणत्याही सूत्रांच्या ज्ञानास ही माहिती अवश्य लक्षांत ठेवली पाहिजे. असो. पूर्वी सांगितलेल्या कारणास्तव हें छन्द:शास्त्र लिहिण्यास प्रवृत्त झालेले श्रीपिड्गलाचार्य, सोप्या युक्तीनें शास्त्रज्ञान होण्याकरितां, ह्या शास्त्रांतील संज्ञा व परिभाषा प्रथम सांगतात.

धीश्रीस्त्रीम्‍ ॥१॥
हे पहिल्या अध्यांतलें पहिलें सूत्र आहे. यांत उपलक्षणार्थ म्हणजे उदाहरणार्थ घेतलेले तीन गुरुस्वर संज्ञि असून म्‍ ही त्या गणाची संज्ञा आहे; म्हणजे धी श्री स्त्री अशीं तीन गुरु अक्षरें (स्वर) क्रमानें आलीं असतां तो मगण होय. स्वरशास्त्राप्रमाणेंच छन्द:शास्त्रांत फक्त स्वरांचेंच महत्त्व आहे, व्यञ्जनें फक्त र्‍हस्वाला गुरुत्व देण्यापुरतीच उपयोगीं आहेत असें मानलें जातें. हें मागें पांचव्या करिकेच्या विवरणांत एकदां प्रसंगानें लिहिलेंच आहे. असो. ह्या मगणाप्रमाणेंच गुरुलघूंचे उपलक्षण व ‘य’ वगैरे संज्ञा पुढच्या गणबोधक सूत्रांत आहेत असें जाणावें. ह्या गणांचे उपयोग ‘विद्युन्माला’ वगैरे पुढें येणार्‍या अक्षरगणवृत्तांत होतात. ह्या गणसूत्रांमध्यें धी स्त्री वगैरेच अक्षरें देण्याचें कारण काय, हें पुढें सर्व गणसूत्रें संपल्यावर सांगूं.

वरासाय्‍ ॥२॥
हें दुसरें सूत्र. ह्यानें आद्यलघु म्हणजे पहिलें र्‍हस्व व पुढचीं दोन अक्षरें गुरु असलेल्या अक्षरपत्रिकाचें नांव यगण असें सांगितलें आहे.

कागुहार्‍ ॥३॥
ह्या सूत्रानें लघुगुरुंचे उपलक्षण सुचवून मध्यगुरु तो रगण असें समजून येतें.

वसुधास्‍ ॥४॥
ह्या सूत्रावरुन अन्त्यगुरु असलेलें त्रिक तो सगण असें समजून येतें.

सा ते कत्‍ ॥५॥
ह्या त्रिकाप्रमाणें अन्त्यलघु, असा तीन वर्णाचा समुदाय तो तगण जाणावा.

कदासज्‍ ॥६॥
ह्याप्रमाणें मध्यगुरु तो जगण जाणावा.

किंवदभ्‍ ॥७॥
ह्याप्रमाणें आद्यगुरु तो भगण जाणावा, असें सूचित होतें.

नहसन्‍ ॥८॥
ह्या सूत्राप्रमाणें केवळ तीन लघु तो न म्हणजे नगण असें उपलक्षण केलें जातें. ह्या सूत्रांतून घेतलेलीं अक्षरें लघुगुरुंच्या उपलक्षणार्थ आहेत.

गृल्‍ ॥९॥
ह्या व पुढच्या सूत्रानें एकाक्षरगणाचीच संज्ञा सांगितली आहे. ‘गृ’ हें र्‍हस्व अशा एका अक्षराचें उपलक्षक आहे, म्हणून केवळ एकटया र्‍हस्व अक्षराची संज्ञा ल आहे. (ल म्हणजे लघु होय.) असा ह्या सूत्राचा अर्थ आहे.

गन्ते ॥१०॥
ह्या सूत्रांत मागच्या सूत्रांतून ‘गृ’ हें अक्षर अनुवृत्तीनें येतें व ह्या सूत्रांतील ग्‍ चा अर्थ गुरु असा आहे म्हणून गृसारखें एकमात्रिक र्‍हस्व अक्षर, पद्यचरणाच्या अंतीं (अन्ते=शेवटीं) असतां तं ग्‍ म्हणजे गुरुसंज्ञक होतें; असा सूत्रार्थ होतो. परंतु ‘ग्लिति समानी’ वगैरे पुढें येणार्‍या सूत्राप्रमाणें, क्वचित्‍ स्थलीं मात्र लकाराच्या विशेषविधीमुळें ह्या पादान्तीच्या गुरुत्वाचा बाध होतो. म्हणून तशा स्थलीं मात्र पादान्तलघूला गुरुसंज्ञा होत नाहीं. इतरत्र होते. कारण सर्वसाधारण नियमाचा (उत्सर्गसूत्र) विशेषसूत्रानें म्हणजे अपवादकानें बाध होतो असा शास्त्रीय नियम आहे. आतां ह्यावर कोणी म्हणेल कीं, पाणिनीच्या व्याकरणशास्त्रांत अशी (गन्ते) पादान्तीच्या लघूला गुरुसंज्ञा केली नाहीं, म्हणून हें सूत्र योग्य नाहीं, तर ह्याचें उत्तर असें कीं पाणिनीच्या शास्त्रांत अशा संज्ञेचा कांहीं उपयोग नाहीं म्हणून त्यानें संज्ञा केली नसली तरीही छन्द:शास्त्रांत ह्या संज्ञेची अपेक्षा आहे; म्हणून छन्द:सूत्रकाराला ही संज्ञा करणें भाग पडलें. शिवाय पिड्गलनागही स्वतंत्र सूत्रकार आहे. तो सर्वाशीं परावलंबी असणें शक्य नाहीं. असो. आणखी गुरुसंज्ञेच्या विधानाकरितां पुढचे सूत्र रचिलें आहे.

ध्रादिपर: ॥११॥
ह्या सूत्रांतही र्‍हस्वाक्षराचें उपलक्षण असणार्‍या गृची व ग्‍ची अनुवृत्ति वरच्या दोन सूत्रांतून येथें केली आहे व यांतील ध्र हें अक्षर जोडाक्षरांचें म्हणजे संयुक्त व्यञ्जनाचें उपलक्षक आहे, आणि आदिशब्दानें, विसर्ग, अनुस्वार, जिव्हामूलीय व उपध्मानीय ह्यांचे ग्रहण आहे. क ख ह्यांच्या पूर्वीच्या अर्धविसर्गाचें नांव जिव्हामूलीय आणि पफ ह्यांच्या पूर्वीच्या अर्धविसर्गाचें नांव उपध्मानीय आहे. हें आमच्या वेदाड्गशिक्षार्थामध्यें, (शिक्षार्थ श्लो.५ पहा) उदाहरणें देऊन विशेष स्पष्ट केलें आहे. असो. एकंदरींत जोडाक्षर, विसर्ग, अनुस्वार, किंवा अर्धविसर्ग पुढें असलेलें ह्रस्व अक्षरही, ह्या छंद:शास्त्रांत गुरुसंज्ञक होतें, असा ह्या सूत्राचा अर्थ होतो.

हे ॥१२॥
ह्या सूत्रांतही वरच्या सूत्रांप्रमाणेंच ग्‍ची अनुवृत्ति असून ‘हे’ हें अक्षर द्विमात्राचें (दीर्घ) उपलक्षक आहे; म्हणून दीर्घ अक्षर (हे सारखे) गुरुसंज्ञक (ग्‍) होय असा सूत्रार्थ होतो.

लौ स: ॥१३॥
ह्या मधल्या स: (तो) ह्या पदानें प्रकरणप्राप्त ग्‍चें ग्रहण आहे म्हणून तो गुरु दोन लघूंच्या बरोबर (लौ) असतो, असा सूत्रार्थ आहे. तात्पर्य, लघूंच्या उच्चारापेक्षां गुरुच्चाराला दुप्पट वेळ लागतो. लघु एकमात्रिक व गुरु द्विमात्र हेंच ह्या सूत्रानें सांगितलें.

ग्लौ ॥१४॥
हें अधिकारसूत्र असून हें छन्द:शास्त्र संपेपर्यंत ह्यापुढें ह्या सूत्राचा अधिकार आहे. ‘स्वदेशे वाक्यार्थाभाववत्त्वे सति उत्तरसूत्रैकवाक्यतया लक्ष्यसंस्कारजनकत्वमधिकारत्वम्‍’ हें अधिकाराचें लक्षण आहे. ह्याचा अर्थ: -
शास्त्राच्या ज्या स्थानीं सूत्राचें पठन केलें असेल तेथें त्याचा वाक्यार्थ न होतां पुढच्या सूत्रांशी एकवाक्यता होऊन जें उदाहरणें साधण्यास उपयोगीं पडतें तें अधिकारसूत्र होय. म्हणून यापुढें ‘गायत्र्या वसव:’ वगैरे सूत्रांतून जेथें विशेष गण सांगितले नसतील तेथें, हें अधिकारसूत्र जातें व आठ ग्‍ ल्‍ मिळून एक गायत्रीचा पाद होतो; असे अर्थ करण्यास उपयोगीं पडतें.

अष्टौ वसव: इति ॥१५॥
ह्या शास्त्रांत वसु हें पद जेथें येईल तेथें त्याचा अर्थ आठ वर्ण असा घ्यावा. कारण वेदपुराणादिक ग्रन्थांतून वसूंची संख्या आठच मानिली आहे. शेवटच्या इतिपदानें (इति = अशाप्रकारें) हें सूत्र वसूप्रमाणें रुद्र, अंग वगैरे इतर लौकिक संज्ञांचेंही उपलक्षक आहे, असें समजतें. म्हणजे रुद्र ११, अंक ९, वेद ४ ज्यांची संख्या निश्चित आहे अशा अर्थाचे वाचक जे शब्द त्यांचाही ह्या शास्त्रांत वसुपदाप्रमाणें उपयोग केला आहे; म्हणून रुद्र म्हणजे ११, समुद्र म्हणजे चार, ऋतु म्हणजे सहा, वगैरे प्रसिद्धसंख्यांकपदांचे अर्थ जाणावे. तन्त्र (एकांतूनच अनेक अर्थ काढणें), आवृत्ति किंवा एकशेषद्वंद्व ह्यांचा स्वीकार केल्यामुळें ह्या सूत्राच्या शेवटीं इतिपद आहे; त्यानेंच या शास्त्राचा पहिला अध्याय येथें संपला असेंही सूचित होतें. कारण इति शब्दाचा अर्थ प्रकार आहे तसाच समाप्ति हाही आहे. आतां ज्याप्रमाणें नाटकादिकांच्या प्रारंभीं नांदीश्लोकामध्यें पुढें येणार्‍या संपूर्णकथेचा अर्थ संक्षिपानें सूचित केला असतो, त्याप्रमाणें ‘धी श्री स्त्रीम’ वगैरे मागें व्याख्यान केलेल्या सूत्रांत धी श्री वगैरे अक्षरें घालण्यांत अर्थान्तरही सूचित केलें आहे तें, पूर्वी प्रतिज्ञा केल्याप्रमाणें आतां येथें लिहितों. अध्ययनापासून धी म्हणजे शास्त्रीय बुद्धि प्राप्त होते. ज्याजवळ धी त्याला श्री म्हणजे संपत्ती मिळते; व ज्याच्याजवळ श्री त्याला स्त्री मिळते व सुखदायक होते. कारण गृहस्थाश्रमाची सुस्थिति द्रव्यमूलकच आहे. असा पहिल्या संज्ञासूत्रानें सूचित होणारा अर्थ आहे म्हणून, अर्थकामांचे (श्री व स्त्री) साधन असणारी ती धी वरा म्हणजे सर्वांहून श्रेष्ठ आहे असें वरासा ह्या सूत्रानें सूत्रकार आपल्या शिष्याला सूचित करतो. हें ऐकून शिष्य विचारतो, ‘हे गुरो ! ‘का गुहा’ तसल्या त्या धीचें गुप्तस्थान कोठें आहे.’ येथें गुहा हा शब्द स्थानवाचक घेतला आहे. असो. नंतर गुरु ह्याचें उत्तर देतात ‘वसुधा’ म्हणजे ही पृथ्वीच त्या धीचें स्थान आहे अर्थात्‍ ह्या पृथ्वीवरच ती धी साध्य आहे, काळजी करुं नको.’ पुन्हां शिष्य विचारतो, ‘सा ते क’ म्हणजे ती आपण सांगितलेली बुद्धि वसुधेवर तरी कोठें मिळेल ?" गुरु ह्याचें उत्तर उत्तर, "दोन सूत्रें" (गृ हे) मिळवून देतात. ‘गृहे’ म्हणजे घरांतच येथें, विद्यार्थ्याला विद्येचा लाभ होईल." पुन्हां शिष्य विचारतो, "कदां स’ म्हणजे तो धीलाभेच्छु पुरुष तिला केव्हां मिळवूम शकतो ?" त्यावर गुरुंचें उत्तर, " ‘ध्रादिपर:’ म्हणजे तो शिष्य जेव्हां विद्येचें धारण (धृ=धारण) अर्थग्रहण, आवृत्ति वगैरे कृत्यांत तत्पर होईल तेव्हांच धीला मिळवील." पुन्हा शिष्याचा प्रश्न, " ‘किं वद’ महाराज, मनुष्य काय करीत असतांना बुद्धि मिळवील तें सांगा." ह्यावर गुरु म्हणतात, " ‘न हस’ म्हणजे विद्याग्रहणकालीं तूं हंसूं खिदळूं नको. ‘गृल्‍’ (गृणन्‍ लघु:) ‘गन्ते’ म्हणजे पठन करीत असतां (गृणन्‍) जो लघु म्हणजे नम्र असतो तोच शिष्य अध्ययनाच्या अन्तीं गुरु होतो म्हणजे विद्वत्तेचें गौरव मिळवून इतरांचा गुरु होण्यास समर्थ होतो, असाही दुसरा अर्थ संभवतो. असो. असा ह्या पहिल्या बारा सूत्रांचा विद्वत्परंपरागत गर्भितार्थ आहे. तो उपदेशकारक असून चांगला जमतही आहे म्हणून येथें आम्ही दिला आहे. येथें गणांच्या संज्ञा व स्वरुपें सांगितलेला, पिड्गलछन्द:सूत्राचा हा पहिला अध्याय समाप्त झाला. ह्यामध्यें एकंदर पंधरा सूत्रें आहेत.

N/A

References : N/A
Last Updated : September 24, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP