वृत्तम् ॥१॥
हें अधिकारसूत्र असून ह्यापुढें हें शास्त्र संपेपर्यंत ह्याचा अधिकार आहे; म्हणून ह्या पुढच्या छन्दांचें नांव नियमानें वृत्त असें जाणावे. ह्यांचे पाद व्यवस्थित असल्यानें त्याना पद्य असेंही म्हणतात. ह्या पूर्वीच्या वैदिक पद्यांना छन्द व आर्या वगैरे लौकिक वृत्तांना जाति अशी संज्ञा आहे. ॥१॥
सममर्धसमं विषमं च ॥२॥
वृत्त हें सम, अर्धसम व विषम अशा तीन प्रकारचें असतें. ज्याचे चारही चरण सारखे असतात तें समवृत्त होय. ह्याचे तनुमध्या वगैरे प्रकार पुढें येतील. ज्याचीं अर्धे सारखीं असतात म्हणजे पहिला व तिसरा पाद आणि दुसरा व चौथा पाद सारखे असतात तें अर्धसमवृत्त होय. ज्याचे चारी पाद निरनिराळ्या स्वरुपाचे असतात तें विषमवृत्त असें जाणावें. ॥२॥
समं तावत्कृत्व: कृतमर्धसमम् ॥६॥
एकाद्या गायत्री वगैरे छन्दांतील समवृत्तांच्या एकंदर संख्येला तिनेंच गुणून गुणाकार येईल तेवढी त्या छन्दांतील अर्धसमवृत्तांची संख्या होय. जसें, षडक्षरी गायत्री छन्दांत प्रस्तारानें ६४ समवृत्तें संभवतात, तो प्रकार पुढें आठव्या प्रस्ताराध्यायांत येईल. असो. त्या चौसष्ट संख्येला तिनेंच गुणलें असतां गुणाकार ४०९६ येतो. तेवढीं षडक्षरपाद गायत्रीछन्दांतील अर्धसमवृत्तें जाणावीं. ॥३॥
विषमं च ॥४॥
येथें ‘तावत्कृत्व: कृतमर्धसमम्’ येवढया पदांची अनुवृत्ति आहे. सूत्रार्थ. अर्धसमवृत्तांच्या एकंदर संख्येला तिनेंच गुणून जो गुणाकार येतो तेवढी अक्षरांच्या पादांतील विषमवृत्तांची संख्या होते. जसें, वर लिहिल्याप्रमाणें गायत्रीछन्दांतील अर्धसमवृत्तें ४०९६ आलीं. त्या संख्येला तिनेंच पुन्हां गुणलें असतां, गुणाकार १,६७,७७,२१६ येतो; ही षडक्षरपाद गायत्रीच्या एकंदर संभवणार्या विषमवृत्तांची संख्या झाली. परंतु ह्या दोन्ही संख्या मिश्र आहेत म्हणून विशेष कार्य सांगतात. ॥४॥
राश्यूनम् ॥५॥
वरच्याप्रमाणें केलेल्या गुणाकारांनीं एकंदर अर्घसम व विषमवृत्तांची संख्या येते ती मिश्र येते म्हणजे तिच्यांत क्रमानें समवृत्तांची व अर्धसमवृत्तांची संख्या मिसळली असते म्हणून गुण्यराशि गुणाकारांतून वजा करावा म्हणजे शुद्ध अर्धसमांची व शुद्ध विषमांची संख्या निघेल. ह्या करितां ४०९६ ह्या मिश्रसंख्येंतून गायत्री छन्दांतील ६४ शुद्ध समवृत्तें वजा करावीं म्हणजे ४०३२ हींच उरलेली खरीं गायत्रीचीं अर्धसमवृत्तें होत. तसेंच विषमवृत्तांच्या १,६७,७७,२१६ ह्या गुणाकारांतून ४०९६ ह्या गुण्यराशि वजा करुन उरलेलीं १,६७,७३,१२० हींच गायत्रींतील खरीं विषमवृत्तें होत. असेंच सर्व छन्दांतील वृत्तसंख्यांविषयीं समजावें. ॥५॥
ग्लिति समानी ॥६॥
येथें ‘पादस्यानुष्टुत् वक्त्रम्’ ह्या पुढें येणार्या सूत्रांतून अनुष्टुव् हे पद अपकर्षानें आणावें. सुत्रार्थ. ज्या वृत्तांत गलगल अशा गणक्रमानें अनुष्टुव् सारखे अष्टाक्षरी चार पाद संपतील त्या वृत्ताचें नांव समानी होय. म्हणजे अष्टाक्षरी चार पाद असून ‘रामनाम पुण्यधाम’ असा गुरुलघूंचा क्रम पाहिजे. ॥६॥
ल्गिति प्रमाणी ॥७॥
येथेंही पूर्वसूत्राप्रमाणेंच अनुष्टुव् हें पद अपकर्षानें आणावें. असो. ज्या वृत्तांत ‘उमावरा शिवाहरा’ असा लघुगुरुंचा क्रम असलेले अष्टाक्षरी चार पाद असतात त्याचें नांव प्रमाणी होय. ॥७॥
वितानमन्यत् ॥८॥
ह्या दोहोंपेक्षां कोणत्याही निराळ्या क्रमानें, अष्टाक्षरी चार पाद संपणारें जें वृत्त त्याचें नांव वितान होय. ॥८॥
पादस्यानुष्टुब् वक्त्रम् ॥९॥
हें अधिकारसूत्र असून त्यांतील ‘पादस्य’ ह्या पदाची अनुवृत्ति हा पांचवा अध्याय संपेपर्यंत जाते, व अनुष्टुब् वक्त्रम् ह्या पदांची अनुवृत्ति पदचतुरुर्ध्ववृत्तपर्यंत जते. ॥९॥
न प्रथमात्सनौ ॥१०॥
ह्यापुढें सांगावयाच्या अष्टाक्षरपादाच्या वक्त्रजातींच्या वृत्तांमध्यें पहिल्या वर्णापुढें लागलीच सगण (॥ ऽ) व नगण
(॥ ।) रचूं नये. ॥१०॥
द्वितीय चतुर्थयोरश्च ॥११॥
येथें सूत्रस्थ चकारानें पूर्वसूत्राची अनुवृत्ति होते म्हणून, दुसर्या व चौथ्या पादांत तर, प्रथमाक्षरापुढें स, न व रगणही (ऽ । ऽ) घालूं नये असा सूत्रार्थ होतो. अथात् वरचा केवळ स, न निषेध पहिल्या व तिसर्या पादांनाच लागू आहे. ॥११॥
वान्यत् ॥१२॥
वर सांगितलेले दोन निषेध वगळून इतर म य त वगैरे सहा गण पर्यायानें स्वेच्छेनें प्रथमाक्षरापुढें घालावे. समानीपासून पुढचे सर्व अक्षरच्छन्द असल्यानें, आतां ह्यापुढें मयरसतजभनलग हे पहिल्या अध्यायांत सांगितलेले प्रारंभीचे गणच घ्यावयाचे आहेत. आर्या वगैरे केवळ लौकिकवृत्तांत उपयोगी पडणार्या चातुर्मात्रिक मात्रागणांची ह्यापुढें जरुर पडणार नाहीं. ॥१२॥
यश्चतुर्थात् ॥१३॥
पूर्वोक्ताशिवाय ह्या वक्त्रसंज्ञक वृत्तांत चौथ्या अक्षरापुढें यगण (। ऽ ऽ) अवश्य असावा. उदाहरण. ‘वंदूं महेश्वरा आतां हिमालयसुतानाथा । चरणी ठेविता माथा साधी जो सकला स्वार्था ॥ स्वकृत वगैरे वगैरे. मराठींतील ओवी वगैरे पद्यप्रकार हा वक्त्रापैकीच असून कांहीं फेरफारानें बनले आहेत. मात्र मराठींत संस्कृतांतील रसालंकार वगैरे इतर काव्यशोभा आणण्यास बराच प्रयास पडत असल्यानें, ती उणीव भरुन काढण्याकरितां व कवितेचें स्वरुप साजरें करण्याकरितां संस्कृतानुष्टुभाप्रमाणें निरनुप्रास न लिहितां, साधारण वृत्तांतही निदान एखादातरी अनुप्रास (सारखा वर्ण) प्रत्येक पादाच्या शेवटीं घालण्याचा प्रघात पडला असावा असें वाटतें. ॥१३॥
पथ्या युजो ज् ॥१४॥
येथें ‘चतुर्थात्’ हें पद अनुवृत्तीनें येतें. असो. ह्या अष्टाक्षरी वक्त्रजातींत समपादांमध्यें (युज:,२,४) चौथ्या अक्षरापुढें यगण नसून जगण असल्यास त्याचें नांव पथ्या होय. उदाहरणें वाड्मयांत शोधावीं किंवा प्रस्तार (लघुगुरुविन्यास) मांडून त्याच्या साहाय्यानें नवीन रचावीं. ॥१४॥
विपरीतैकीयम् ॥१५॥
कित्येकांच्या मतानें, वरच्या उलट म्हणजे विषमपदांत (१/३) चौथ्या अक्षरापुढें जगण असल्यास तीच पथ्या होते. ॥१५॥
चपलाऽयुजो न् ॥१६॥
येथें ‘चतुर्थात्’ ह्या पदाची अनुवृत्ति करुन सूत्रार्थ. जेव्हां विषमपादांत चौथ्या अक्षरापुढें नगण असून समपादांत चतुर्थवर्णापुढें पूर्वोक्त सामान्य लक्षणानें आलेला यगणच असतो, तेव्हां त्या अनुष्टुब् वक्त्राचें नांव चपला होय. मागें आर्याभेदांतही चपला ही संज्ञा आली आहे. ॥१६॥
विपुला युग्ल: सप्तम: ॥१७॥
हें सूत्र पुढें येणार्या पदचतुरुर्ध्ववृत्तापर्यन्त अनुवृत्तीनें अधिकारसूत्रही आहे. यश्चतुर्थात् ह्या सूत्रानें यगण सामान्यत: सांगितला आहे. त्याचा हा अपवाद आहे. सूत्रार्थ. ज्या वक्त्रांत समपादांत सातवा वर्ण लच (।) असतो त्याचें नांव विपुला होय. हें मागें गेलेल्या पथ्येच्या लक्षणांतच अन्तर्भूत होत आहे; तथापि त्या वृत्ताचेंच हें प्रकारविशेषांत प्रसिद्ध नामान्तर आहे असें समजावें; शिवाय ह्यापुढच्या सूत्रांतूनही ह्याची अनुवृत्ति आवश्यक असल्यामुळेंही येथील विपुला हें पद व्यर्थ नाहीं. मागें आर्याप्रकरनांतही विपुला नाम गेलें आहे. ॥१७॥
सर्वत: सैतवस्य ॥१८॥
सैतव ऋषीच्या मतानें सर्वच (सम व विषम) पादांमध्यें सातवा वर्ण लघु असेल ती विपुला होय. ॥१८॥
भ्रौ न्तौ च ॥१९॥
येथें मागच्या निरनिराळ्या सूत्रांतून ‘अयुज:’ विपुला युग्ल: सप्तम:’ व ‘चतुर्थात्’ ह्या पदाची अनुवृत्ति करावी.
सूत्रार्थ: - विषमपादांमध्यें, चतुर्थवर्णापुढें सामान्यत: प्राप्त होणार्या यगणाचा बाध करुन, भ, र, न, त ह्या चोहोंपैकी कोणता तरी गण असेल व समपादांत सातवें अक्षर लघुरुप अवश्य असेल तर तेंहि वक्त्र विपुलासंज्ञक होय. ह्या सर्व वृत्तांचीं उदाहरणें, सर्व इतिहासपुराणांतील व काव्यग्रन्थांतील अनुष्टुप् छन्दांत हजारों भरलीं आहेत. ह्या विपुलांचे विकल्प व मिश्रप्रकार नांवांप्रमाणेंच असंख्य असून त्यांचे प्रयोगही फार आहेत. त्यांचा निर्देश सामान्यत: अनुष्टुप् ह्या नांवानेंच करितात. सर्व विपुलांत चौथा वर्ण गुरु असतो, असा सामान्य नियम दिसतो. ॥१९॥
प्रतिपादं चतुर्वध्द्या पदचतुरुर्ध्वम् ॥२०॥
अनुष्टुप् वृत्ताच्या पुढच्या पुढच्या पादांतून कृमानें चार चार अक्षरें वाढत गेलीं असतां त्या वृत्ताचें नांव, पदचतुरुर्ध्व असतें. म्हणजे प्रथम पादांत आठ वर्ण, दुसर्यांत बारा, तिसर्यांत सोळा, व चौथ्यांत वीस वर्ण असतात असें जाणावें. ह्या सूत्रांत विशेषबोधक पद कांहीच नसल्यामुळें लघुगुरुंचा नियम कांहीं नाहीं. ॥२०॥
गावन्त अपीड: ॥२१॥
येथें पादस्य हें पद सामान्याधिकारानें प्राप्त होतें. असो, वरच्या सूत्राप्रमाणें वाढते पाद असून प्रत्येक पादाच्या शेवटीं दोन गुरुवर्ण असल्यास त्या वृत्ताचें नांव आपीड होय. ह्यामध्यें अन्तीं दोन गुरुंचा नियम करुन त्यापूर्वीचीं इतर सर्व अक्षरें लघु असावीं असें सूचित केलें आहे. म्हणून, ‘अनुदिन भज रामा, सकल विबुधमुनिसुखधामा,’ अशाप्रकारचे चरण रचावे. ॥२१॥
आदौ चेत्प्रत्यापीड: ॥२२॥
वरच्याप्रमाणेंच चार चार अक्षरांनीं वाढते पाद असून त्यांत शेवटीं दोन गुरु न घालतां, प्रत्येक पादाच्या प्रारंभीच दोन दोन गुरुवर्ण असून पुढचे सर्व लघु घातले असतील तर त्या वृत्ताचें नांव प्रत्यापीड होय. उदाहरण, ‘सेवा गुरुहरिहर, नाशा सम कलुषतिमिरभर’ । असे पाद रचावे. ॥२२॥
प्रत्यापीडो गावादौ च ॥२३॥
येथें चकारानें ‘अन्ते’ ह्या पदाची अनुवृत्ति होते. सूत्रार्थ: - वरच्या प्रमाणेंच वाढते पाद असून त्याच्या आरंभीं व शेवटीं दोन दोन गुरु व मध्यें सर्व लघुवर्ण अशी स्थिति असल्यास त्या वृत्ताचें नांवहि प्रत्यापीडच होय. जसें, ‘वंदा सतत मुकुंदा’ अशा प्रकारचे पाद रचावे. असो, ह्याप्रमाणें प्रत्यापीड दोन प्रकारचा आहे. ॥२३॥
प्रथमस्य विपर्यासे मञ्जरी लवल्यमृतधारा: ॥२४॥
येथें आपीडपदाचे ग्रहण निवृत्त झाल्यानें (आपीड=तुरा) दोन गुरुशिवाय इतर सर्व लघुच पाहिजेत हाहि नियम गेला. तथापि सामान्य वाढत्या पादांच्या पदचतुरुर्ध्वाची अनुवृत्ति आहेच. सूत्रार्थ:- पदचतुरुर्ध्वाच्या पहिल्या पादाची दुसर्या, तिसर्या किंवा चौथ्या पादाशीं उलटापालट केल्यास ती वृत्तें क्रमानें मञ्जरी, लवली व अमृतधारा ह्या नांवांची होतील. म्हणजे पदचतुरुर्ध्वाचा पहिला पाद द्वादशाक्षरी व दुसरा अष्टाक्षरी रचल्यास त्याचें नांव मञ्जरी. पहिला वाद सोळा अक्षरांचा व तिसरा अष्टाक्षरी केल्यास तिचें नांव लवली व पहिला पाद वीस अक्षरांचा व चौथा आठ अक्षरांचा रचल्यास तिचें नांव अमृतधारा असें जाणावें. ॥२४॥
उद्गतामेकत: सूजौ स्लौ, न्सौ ज्गौ, भ्नौ ज्लौग्, स्जौ स्जौग ॥२५॥
येथें ‘पाद:’ ह्या सामान्याधिकाराची अनुवृत्ति आहे. सूत्रार्थ:- जिच्या चारी पादांत अनुक्रमानें; सजसल, नसजग, भनजलग आणि सजसजग, असे गन येतात ती उद्गता असें जाणावें. म्हणजे पहिल्या दोन पादांत दहा दहा अक्षरें, तिसर्यांत अकरा व चौथ्यांत तेरा अक्षरें भरतात. ‘एकत:’ ह्या सूत्रस्थपदानें पहिला चरण दुसर्याशीं जोडून म्हणावा असा अर्थ होतो. ॥२५॥
तृतीयस्य सौरभकं र्नौं भ्गौ ॥२६॥
तिसर्या पादाचे चरण भ न ज ल ग नसून र न भ ग हे असले व इतर चरण उद्गतेप्रमाणेंच असले तर तें सौरभक नांवाचें वृत्त होतें. ॥२६॥
ललितं नौ सौ ॥२७॥
येथें ‘तृतीयस्’ अनुवृत्त आहे. सूत्रार्थ:- उद्गतेच्याच तृतीयपादांत न न स स असे गण असून इतर तसेच असल्यास तें ललित नांवाचें वृत्त होतें. ॥२७॥
उपस्थितप्रचुपितं पृथगाद्यं स्मौ ज्भौ गौ, स्नौ ज्रौग् नौस्, नौन् ज्यौ ॥२८॥
ज्या वृत्ताच्या चारी पादांत अनुक्रमानें, स म ज भ ग ग, स न ज र ग, न न स आणि न न ज य असे गण असून पहिला चरण उद्गतेप्रमाणें दुसर्या चरणाला जोडून म्हणता नाहींत, तें उपस्थित प्रचुपित ह्या नांवाचें वृत्त होतें ॥२८॥
वर्धमानं नौ स्नौ न्सौ ॥२९॥
येथें मागून तृतीयस्य ह्या पदाची अनुवृत्ति करुन सूत्रार्थ देतों. उपस्थितप्रचुपिताच्याच तिसर्या पादांत न न स ऐवजीं न न स न न स असे सहा गण असल्यास त्या वृत्ताचें नांव वर्धमान होय. ॥२९॥
शुद्धविराड्ऋषभं त्ज्र: ॥३०॥
उपस्थितप्रचुपिताच्याच तिसर्या पादांत न न स नसून, त ज र असे गण असतील तर त्या वृत्ताचें नांव शुद्धविराड्ऋषभ असें होतें. ॥३०॥
अर्धे ॥३१॥
ह्यापूर्वी पादांतून कमीजास्त अक्षरें असलेलीं कांहीं विषमवृत्तें सांगितलीं. आतां नियमित अक्षरांचीं वृत्तें सांगण्यास प्रारंभ करतात. सूत्रार्थ :- आतां ह्यापुढें जे गण सांगितले जातील ते पद्याच्या अर्धात म्हणजे दोन दोन पादांत मिळून समजावे. एकेका पादाचे नाहींत. पद्याचें उत्तरार्धही पूर्वार्धाप्रमाणेंच असतें. ‘अर्धे’ हा अर्धसमवृत्तांचा अधिकार ह्यापुढें हा पांचवा अध्याय संपेपर्यंत आहे. ॥३१॥
उपचित्रकं सौ स्लौग् भौ भ्गौग् ॥३२॥
ज्याच्या पहिल्या पादांत स स स ल ग व दुसर्या पादांत भ भ भ ग ग असे गण एका पद्मार्धात असतात, व दुसरें अर्धही ह्याच क्रमाचें असतें, तें उपचित्रक वृत्त होय. जसें, ‘हरिच्या चरणाब्जयुगीं सदा, हो रत मानव ! शाश्वतशोधा ।’ अशाप्रकारचीं अर्धे रचावीं ॥३२॥
द्रुतमध्या भौ भ्गौग्, न्जौ ज्यौ ॥३३॥
जिच्या एका अर्धात, दोन पादांत अनुक्रमानें, भ भ भ ग ग आणि न ज ज य असे गण असतात ती द्रुतमध्या होय. दुसर्या पादाच्या प्रारंभीं चार लघुवर्न असल्यानें मध्यभाग द्रुत म्हणजे जलद उच्चारला जातो, अशा ह्या रीतीनें नांवाला अन्वर्थताही दिसते. ॥३३॥
वेगवती सौ स्गौ, भौ भ्गौग् ॥३४॥
जिच्या पहिल्या पादांत, स स स ग व दुसर्या पादांत भ भ भ ग ग अशीं अर्धे असतात ती वेगवती होय. ॥३४॥
भद्रविराट् त्जौ र्गौ, म्सौ ज्गौ ग् ॥३५॥
ज्या वृत्ताच्या एकेका अर्धात, तजरग आणि मसजगग असे गण क्रमानें दोन्ही पादांत येतात तें, भद्रविराट् ह्या नांवाचें वृत्त होय. ॥३५॥
केतुमती स्जौ स्गौ, भ्रौ न्गौ ग् ॥३६॥
जिच्या अर्धात अनुक्रमानें, दोन्ही पादांमध्यें सजसग व भरनगग असे गण असतात ती केतुमती होय.
आख्यानिकी तौ ज्गौग्, ज्तौ ज्गौग् ॥३७॥
जिच्या एकेका अर्धात, ततजगग व जतजगग असे गण क्रमानें दोन्ही पादांत असतात तिचें नांव आख्यानिकी समजावें. ॥३७॥
विपरीताख्यानिकी ज्तौ ज्गौग्, तौ ज्गौग् ॥३८॥
जिच्या अर्धाच्या दोन्ही पादांत अनुक्रमानें जतजगग व ततजगग असे गण असतात ती विपरीताख्यानिकी जाणावी. ॥३८॥
हरिणप्लुता सौ स्लौग् न्भौ भ्रौ ॥३९॥
ज्या वृत्ताच्या अर्धाच्या दोन्ही पादांत, अनुक्रमानें सससलग आणि नभभर असे गण असतात त्याचें नांव हरिणप्लुता होय. हरिणाच्या उड्या मारीत धांवण्याप्रमाणें गणाक्षरांत उतार व चढ भासत असल्यामुळें हें नांव अन्वर्थकही आहे. ॥३९॥
अपरवक्त्रं नौलौंग्, न्जौ ज्रौ ॥४०॥
जिच्या अर्धाच्या दोन्ही पादांत क्रमानें ननरय आणि नजजर असे गण असतात त्याचे नांव अपरवक्त्र होय. ॥४०॥
पुष्पिताग्रा नौर्यो न्जौ जौंग् ॥४१॥
जिच्या अर्धाच्या दोन्ही पादांत क्रमानें ननरय आणि नजजरग हे गण व उत्तरार्धही तसेंच ती पुष्पिताग्रा होय. ॥४१॥
यवमती जौं जौं ज्रौ ज्रौग् ॥४२॥
जिच्या अर्धात रजरज आणि जरजरग असे गण अनुक्रमानें दोन्ही पादांत असतात तिचें नांव यममती समजावें. ॥४२॥
शिखैकोनत्रिंशदेकत्रिंशदन्ते ग् ॥४३॥
जिच्या पहिल्या पादांत प्रथम अठ्ठावीस लघु व एकोणतिसावा एकच गुरु असून दुसर्या पादांत प्रथम तीस लघु व शेवटीं एकतिसावा एकच गुरु असतो. अशा रीतीनें साठ वर्णांचें एक अर्ध असून उत्तरार्धही असेंच असतें, तिचें नांव शिखा होय. शेवटचा एकच गुरु हा शिखेच्या (शेंडीच्या) गांठीप्रमाणेंच भासतो. मागें चौथ्या अध्यायाच्या उपान्त्यसूत्रांत चूलिकावृत्त सांगितलें तिच्या दोन्ही अर्धात क्रमानें एकोणतीस व एकतीस मात्रा सांगितल्या आहेत व येथें मात्रा नसून अक्षरें सांगितलीं आहेत व तींही एकेका अर्धात नसून एकेका पादांत आहेत हें लक्षांत धरावें.
खञ्जा महत्ययुजि इति ॥४४॥
वरच्या शिखेप्रमाणेंच सर्व रचना परंतु त्यांपैकीं पहिला व तिसरा (अयुज्) पाद मोठा म्हणजे एकतीस अक्षरांचा असून दुसरा व चौथा एकोणतीस अक्षरांचा अशी उलटापालट केल्यास त्या वृत्ताचें नांव खञ्जा होतें. शेवटच्या इति शब्दानें येथें पांचवा अध्याय संपला हें सुचविलें. ॥४४॥