श्री किसनगिरी विजय - अध्याय आठवा
देवगडचे श्री किसनगिरी महाराज यांचा जन्म सन १९०७ साली झाला आणि त्यांनी १९८३ साली समाधी घेतली.
श्री गणेशाय नम: । श्री हनुमंताय नम: । जयजयाजी कपीश्वरा । नमन माझे साष्टांगी ॥१॥
आता नमिता लासुरवासिनी । सौभाग्यवंत सुवासिनी । चुडा तूज भरवुनी । सौभाग्य आपुले रक्षिती ॥२॥
संकटी घेऊनी अवतार । राक्षस मारीले महाथोर । पुष्पे फेकिती तुजवर । स्वर्गलोकीचे देवगण ॥३॥
आता नेवासे गांव पुण्य नगरी । जेथ प्रगटली ज्ञानेश्वरी । तियेची प्रतिमा जगावरी ॥ आत्मरुपे झळकती ॥४॥
अर्धनारी नटेश्वर । नटला तेथ ईश्वर । मोहिनी मायारुप मनोहर । अमृत रक्षिण्य्या प्रगटाली ॥५॥
प्रवरेतटी मध्यमेश्वर । जुनाटलिंग हे साचार । भारताच्या मध्यावर । ठिकाण असे हे अदभूत ॥६॥
तेथे मनोहर नाथ बाबांचा आश्रय । तेथे तयांनी बहु केले श्रम । सृष्टीसौंदर्य अनुपम । वाढविले योग्याने ॥७॥
पुढे लहान खेडे पिंपरी । तेथे रामेश्वराची पायरी । तेथे साधु किसनगिरी । भेट देऊनिया गेले ॥८॥
विजया दशमीच्या मुहूर्ती । उदयास आली ही मूर्ती । तेथून नासिकेतास स्फूर्ती । स्थापना तियेची करविली ॥९॥
नित्य सेवा निरंतर । नेम घडला साचार । प्रसन्न होवोनी रघुवर । किसनगिरीचे चरित्र कथियेले ॥१०॥
असो पैलतीरी बहिरवाडी क्षेत्र । मागे सांगितले हे पुण्यपवित्र । स्थान हे मध्यधारात । काशी प्रवाह वाहतसे ॥११॥
हेच पुढे देवगड क्षेत्र । प्रवराकाठचे तीर्थ पवित्र । अगस्तीचे स्थान निवांत । पैलतीरावरी असे ॥१२॥
तेथून पुढे क्षेत्र टोक्यासी । प्रवरा भेटली गंगामाईसी । प्रवरा संगम त्या वस्तीसी । ऐसे नांव पाचारिले ॥१३॥
टोक्याचे महामंदिर । तेथे दैवत पंचलिंगेश्वर । सरितेच्या संगमावर । शिव प्रभू जागृत असे ॥१४॥
अतिभव्य शिवालय । घाट रचना अदभूत होय । पवित्र हे देवालय । जगी ख्याती असे याची ॥१५॥
पूर्वी तया ठिकाणी । अफाट शिवरात्र भरुनी । लाखो भाविक जन येउनी । संगमी स्नान करीतसे ॥१६॥
तेथून पैलतीरावर । ठिकाण असे मुक्तेश्वर । नयन रम्य मनोहर । शोभा तयासी दिसतसे ॥१७॥
एकदा त्या ठिकाणी । गंगागिर नामे साधूंनी । महायाग मांडूनी । अन्नदान बहु करविले ॥१८॥
तोषविले देवांस । सुखविले संतजनांस । त्रैलोकीच्या पांडूरंगास । आवडे सोहळा भक्तांचा ॥१९॥
तेथ एक घटना घड्ली । तुपाची कमतरता भासली । मग गंगेची प्रार्थना केली । गंगागीर साधूने ॥२०॥
हे माते गंगे गोदावरी । कृपा करी गे मजवरी । तुपाच्या दोन घागरी । यज्ञकामी देसी कां ? ॥२१॥
तूं जगाची जननी । संकट पडता भक्तालागुनी ॥ माते तेथे प्रगट होवोनी । लाज राखी भक्ताची ॥२२॥
तरी कां माझी भक्ती खरी । प्रगट होई झड्करी । ऐसी विनवणी केली । गंगागिरी साधूंनी ॥२३॥
काय झाला चमत्कार । पात्रात बुडविली घागर । उचलूनि घेता बाहेर । तूप काठोकाठ भरले ॥२४॥
मग दुसरी बुडवुनी । काठावरती घेउनी । तिच्याहाती युप भरूनी । वर आले तेधवा ॥२५॥
जयजयकार गर्जती जन । यज्ञ झाला पुण्य पावन । गंगामायीचे दर्शन । जनलोकांस लाभले ॥२६॥
तैसेच हे देवगडा क्षेत्र । भास्करगिरी दात्तक पुत्र जमऊनी भक्तगण एकत्र । दत्तयाग करावया ॥२७॥
जम उनी नेमस्त मंडळी । गुरुदास बोले तये वेळी । नेम उनी सेवक मंडळी । यागारंभा मांडिला ॥२८॥
या पंचक्रोशी क्षेत्रात । दत्ताचे स्थान अद्भूत । नाना दैवते तिथे वसत । किसनगिरीच्या भक्तिने ॥२९॥
गर्भगिरीच्या माथ्यावरी । गोरक्ष मच्छिंद्र मावंदे करी । सकल देवांस पाचारी । गणागंधर्वासहित ॥३०॥
याग करिता प्रभू प्रसन्न । वरूणराज सोडी पर्जन्य । पिकते बहु अन्नधान्य ॥ राज्यात सुख लाभे ते ॥३१॥
तरू ता यागास काशीचे ब्राह्मण । पाचारिले दोन शते पंचदश । भव्ययाग मंड्प उभारुन । शोभिवंत केला असे ॥३२॥
तंबु राहुटया दिल्या बहुत । संतमेळा जमला अदभूत । श्री ज्ञानेश्वरी पारायण तयात । सोय बहुत केली असे ॥३३॥
सप्तदिन याग सोहळा । बहुत जमला भाविक मेळा । एकीकडे पाकशाळा । अन्नदाने भरली असे ॥३४॥
गांवोगांवीचे भाविक जन । टाकिती माधुकरी आणून । ऐसा याग सोहळा पाहून । जन आश्रर्य करिताती ॥३५॥
कुणी धान्य आणूनि टाकिती । कुणी द्रव्याची मदत देती । श्रीकिसनगीरीचे गुण गाती । धन्य गुरुशिष्य म्हणतसे ॥३६॥
हरीभक्त परायण । महाज्ञानी संतजन । नाचनाचुनी करिती कीर्तन । भक्तमंडळी समोर ॥३७॥
पाहा भोजनाच्या पंगती ॥ चालु असे दिवसराती । इकडे ब्रह्माण स्वाहा म्हणती ॥ यागकुंडासमोर ॥३८॥
आदिवासी जन दंग होउनी । किसनगिरीच्या ओव्या गाउनी । ढमढम ढोलक वाजवूनी । नृत्या करिती आनंदे ॥३९॥
याग मंड्पी नरनारी । हात जोडूनी घालती फेरी । मुखी बोले रामकृष्णहरी । टाळमृदंग गर्जताती ॥४०॥
आसपासचे गावकरी । भोजनाची सोय करी । तरुण युवक शाळकरी । श्रम बहुत घेताती ॥४१।\
किर्तनात रंगले जन । भक्त विख्यात पाऊली करुन । टाळकरी फेरा धरुन । कुणी फुगडी खेळती ॥४२॥
सात दिवसाचे सप्तरंग । भाविकां घडला संतसंग । पुण्यभूमीचे सर्व अंग । नामघोषे गर्जले ॥४३॥
इकडे प्रवरेकाठी । भक्तजनांची बहुदाटी ॥ तीर्थस्नान करण्यासाठी । गर्दी एकच झाली असे ॥४४॥
प्रवरामायीचे महात्म्य । वर्णिले प्रथमाध्यायात । सारांशरुपी थोडक्यात । भक्तजनांस सांगितले ॥४५॥
प्रवरा तीर्थ पुण्यपावन । चित्त होईल समाधान । सात्विक भावना सद्गुण । भरला अंगी तियेच्या ॥४६॥
गुरुपुत्र भास्करगिरी । शोभे मेळयात दिनकर । उघडूनिया ज्ञानभांडार । भक्तजनांसी वाटतसे ॥४७॥
ब्राह्मणांस वस्त्रदाने । दिली इच्छेप्रमाणे । गुरुआज्ञे दक्षणा देऊन । बोलाविले तयांसी ॥४८॥
तरू यागारंभापासून । संत गोटीराम बाबा येऊन । तयांच्या सहकार्यानं । सांगता झाली यज्ञाची ॥४९॥
तयांनी येथे येउनी । व्यवस्थित मांडणी करुनी । तयाच्याची अधिकाराने । पावन केले यागांस ॥५०॥
याग जाहला संपन्न । क्षेत्र झाले पुण्यपावन । पंचक्रोशीचे दुबळेपण ॥ नाश पावले प्रसादे ॥५१॥
मेघराजाची कृपा झाली । बहुत धनधान्य पिकळी । धरनी माता बहु नट्ली । सुकाळ झाला चोहीकडे ॥५२॥
आसपास गांविचे जन । गुरुदासाचे वर्णिती गुण । म्हणे तयाच्या कृपेकरुन । भक्तिमार्ग गवसला ॥५३॥
संत तेथे देव वसे । तेथे काही न्य़ून नसे । जनकल्याणास्तव कष्टतसे । संत महात्मे या जगी ॥५४॥
युगायुगाच्या ठिकाणी । ईश्वरी अवतार होऊनी । कुणी महायोगी होऊनी । खडतर मार्ग अवतरती ॥५५॥
कुणी होऊनी संत । जगास ज्ञानबोध सांगत । आणि मुक्ति महात्म्य वाढवित । सत्य मार्ग धरुनिया ॥५६॥
परमेश्वर एकच आहे । त्यासी सर्वत्र जो पाहे । तोचि खरा ज्ञानी आहे । हेचि संत सांगती ॥५७॥
अनन्य भक्ति करुन । पापीसुध्दा जाती तरुन । कित्येक गेले उध्दरुन । भक्तिमार्ग धरुनिया ॥५८॥
परमेश्वराचा भक्त जो होई । त्याचा नाश कधी नाही । तो सर्व अंगे पाही । आपुलिया निजभक्तांसी ॥५९॥
जरी योग साधना करणे । त्याने अंगी योग्यता मिळविणे । सद्गुरुंच्या प्रसादाने । सर्व सफल होत असे ॥६०॥
सगुणाची उपासना । हा सोपा मार्ग भक्तिसाधना । कठिण निर्गुणोपासना । मुमुक्षूस ना सांपडे ॥६१॥
पुढे करावी कथा श्रवण । प्रत्यक्ष पंचमुख दशवदन । देवगड क्षेत्री प्रगटून । किसनगिरीस भेटले ॥६२॥
टोक्याचे क्षेत्र महान । त्यासी आले अवघडपण । चहुयुगादिचे स्थळ पुरातन । सिध्देश्वर नामाभिधान त्यासी ॥६३॥
शिव भक्ताचा भुकेला । म्हणोनि अनन्यभक्ती प्रगटला । किसनगिरीने ओळखला । म्हने दया केली आम्हावरी ॥६४॥
मग पंचमुखाची स्थापना करुनी । केली मंदिराची उभारणी । भक्त तेथे येउनी । शिवरात्र सोहळा करिताती ॥६५॥
गोदातटीचे सिध्देश्वर । प्रगटले तेथ उमावर ॥ प्रवरेकाठी बहु सुंदएर । मन रमले देवाचे ॥६६॥
तेथे गोदामायीचे जल । प्रवरेत स्थिरावले निर्मल । शिवराणा भक्तवल्लभ । चैतन्यरुपे स्थिरावला ॥६७॥
पुण्यक्षेत्री देव वसती । हे केवळ भक्त जाणती । जरी घेतली आत्मप्रचीति । तरी ती सिध्दच होईल ॥६८॥
पुढिल अध्यायाचे कथन । ह्या आत्मप्रचितिची खूण । शंकाकुशंका जाती निरसून । चमत्कार अदभीऊत ऐकोनी ॥६९॥
इति श्री नासिकेतरचित । श्री किसनगिरी बाबांचे चरित्र ॥ गंगेसम असे पवित्र । अष्टमोऽध्याय गोड: ॥७०॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 25, 2019
TOP