हनुमान जयंती - मारुती-चरित्र-सार

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


मारोनियां वाली, सुग्रीवासी राजा । करोनियां बोजा, संधि केला ॥१॥
रामासी सहाय्य सुग्रीवे करणे । भार्या सोडविणे राघवाची ॥२॥
ऐसा समय झाला सुग्रीव रामाचा । कार्यभाग साचा मारुतीचा ॥३॥
सकळ कारणी अंजनीचा सुत । रामाचे इंगित तोचि जाणे ॥४॥
सीतेते शोधाया धाडिती वानर । कोणालागी पार गवसेना ॥५॥
अंजनिच्या सुते सीताशुद्धि केली । लंका ते जाळिली रावणाची ॥६॥
परक्रम थोर अतुल शौर्य धैर्य । अवर्ण्यचि वीर्य त्याचे जाणा ॥७॥
एकला जाउनि रावणा भेडसावी । काय त्याची वर्णावी थोर सत्ता ॥८॥
सेतु बांधण्यासि हाच मुख्य कपी । परम प्रतापी बळी हाच ॥९॥
राक्षसांसी भीति याचीच दारुण । पुच्छाते वेष्टुन मारीतसे ॥१०॥
येणे कुंभकर्ण उचलोनि दाविला । उत्साह भरविला वानरांत ॥११॥
येणे लक्षुमण स्कंधासी वाहोनी । झुंजविले रणी रावणिसां ॥१२॥
मारविला येणे अजिक्य इंद्रजित । महिमा अतर्कित याचा असे "॥१३॥
राघव-शत्रुने लक्ष्मण पाडीला । रामराया झाला महाशोक ॥१४॥
सूर्योदयापूर्वी उपाय लक्ष्मणा । नाही तरी मरणा ठेवियेले ॥१५॥
परी या वीराने वल्ली आणियेल्या । वृत्ति हंसविल्या संकलांच्या ॥१६॥
उठविला लक्ष्मण रामपश्चप्राण । ऐसा महाप्राण मारुती हा ॥१७॥
धन्य धन्य धन्य धन्य त्याचे यश । जयासी सुरेश सेविताती ॥१८॥
जेथे तेथे रामकार्यात मारुती । त्याची काय निवृत्ति वदावी ती ॥१९॥
अहिमहि रावण, रामलक्षुमणा । घालोनि मायावरणा, नेती जेव्हा ॥२०॥
पाताळांत गेला दैत्य भैरव हा । दैत्यां भय मह सदा जाचे ॥२१॥
मनुष्य-भक्षक तयांची जे देवी । तिजला कांपवी भयानक ॥२२॥
घातले देवीते दही दूध सारे । खातसे निर्धारे आपणची ॥२३॥
रामलक्षुमण हाती सांपडतां । तयांची सिद्धता सर्व केली ॥२४॥
धनुष्य बाण तयां आणोनियां देत । संहार करित राक्षसांचा ॥२५॥
रामे अहिमहि राक्षस मारिले । पाताळ शुद्ध केले रामजीने ॥२६॥
परी त्यांत याचा थोर पराक्रम । वानी स्वये राम, नि मुखी ॥२७॥
विनायक म्हणे मारुती रामाचा । राम मारुतीचा ऐसा योग ॥२८॥

N/A

References : N/A
Last Updated : January 26, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP