अस्सल आणि इतर प्रतींचा अधिक तपशील

श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला.


प्रस्तुत आवृत्तीच्या पार्श्वभूमिकेच्या विवेचनांत आम्हीं नमूद केल्याप्रमाणें, श्रीसिद्धचरित्राची अस्सल प्रत मिळविण्याच्या प्रयत्नांत असतांना, शिळा छाप आवृत्तीखेरीज उपलब्ध झालेल्या आणखी कांहीं हस्तलिखित पोथ्यांसंबंधी येथें अधिक तपशील देत आहोंत. प्रथम मूळ पोथीचा इतिहास आणि अनुषंगिक माहिती देऊन त्यानंतर अन्य प्रतीसंबंधीं लिहिलें आहे.

(१)
श्रीगजानन-मूलाधार प्रत - अस्सल पोथी श्रीसिद्धचरित्र हा ओवीबद्ध ग्रंथ श्रीरामचंद्रयोगी तिकोटेकर महाराजांचें इच्छेवरुन व आज्ञेनें, त्यांचे एक शिष्य पूज्य श्रीपतिनाथ यांनीं सदुगुरुंचे हयातींतच शके १८०१ ते १८०५ या मुदतींत, गुरुस्थानीय ज्येष्ठ गुरुभगिनी पू. गोदामाई कीर्तने (आईसाहेब) यांचे मार्गदर्शनाखालीं लिहून पुरा केला. सदर पोथीच्या प्रथमाध्यायांत श्रीपतींनीं स्वत:च्या मातापित्यांचीं नांवें व थोडीशी स्वत:बद्दलची माहिती दिली आहे. तसेंच पुढील कांहीं अध्यायांतूनही प्रसंगानुरोधानें आत्मवृत्त कथन केले आहे. शिवाय पोथी रचनेंसंबंधींही माहितीपर उल्लेख केले आहेत व ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. अडतिसाव्या अध्यायांतील उपसंहाराच्या ओव्यांतून श्रीपति लिहितात. ``शालिवाहन शके १८०१ मध्यें, कोल्हापूरांत असतांना श्रीगुरुस्वामींनीं ग्रंथ लिहिण्याची आज्ञा केली ..... श्रीसद्गुरुकृपेनें ग्रंथ पूर्ण झाला. या ग्रंथाचें आद्यन्त लेखन `गजाननानें' केलें ...... मी पिशाच्य लिपींत (मोडी लिपींत) ओव्या लिहीत असे. त्यांत गोदावरी `शोध करीत असत' म्हणजे दुरुस्ती, सुधारणा करीत असत आणि नंतर शुद्धाशुद्ध पाहून `गजानन' बाळबोध लिपींत ग्रंथ लिहून काढी ...... ``यापरी त्याचे पायींची वहाण; । सर्वा नमन करीतसे ॥१९५॥ अ.३८'' येथेंसंदर्भापुरतें ज्या ओव्यांचें अवतरण दिलें आहे त्यावरुन असें दिसून येईल कीं श्रीपतिनाथांनीं लिहिलेल्या मोडी लिपींतील ओव्यांवरुन `गजानन' नामक व्यक्तीनें तयार केलेली बाळबोध लिपीची प्रत हीच `श्रीसिद्ध प्रत हीच `श्रीसिद्धचरित्र ग्रंथाची' अगदीं मूळ, अस्सल प्रत होय. हे गजानन म्हणजे कोण ? याबद्दल अधिक खुलासा दुर्दैवानें मूळ ग्रंथांत किंवा अन्यत्र कोठें मिळत नाहीं. सिद्धचरित्राची ही अस्सल पोथी अनेक वर्षांपासून श्रीगुरुभक्त श्री. न. ग. कुलकर्णी (कारदगेकर) यांचे संग्रहीं असून ते सध्यां सांगली शहरांत, श्रीगणपति मंदिरानजीक `पीठ भाग सिटी सर्वे नं. ८२९' या ठिकाणीं राहतात. प्रात:स्मरणीय साध्वी पूज्य गुंडाक्का (यांना शिष्यमंडळी गुंडा महाराज असेंही म्हणत असत) यांचा श्री. कुलकर्णी यांसी मंत्रोपदेश आहे.
दि. ११ जून १९६९ रोजीं सदर श्री. न.ग. कुलकर्णी यांनी श्रीस्वामीच्या नांवें सेवा मंडळाकडे जे पत्र पाठविले त्यांत सिद्धचरित्राच्या या अस्सल प्रतिसंबंधी फार महत्त्वाचा इतिहास नमूद केला आहे तो त्यांचे शब्दांत वाचलेला अधिक बरा ! ``श्रीसिद्धचरित्र पुन्हा छापून प्रसिद्ध करण्याचे कार्य आपण चालू केले आहे. हे सर्वांना लाभदायक आहे. सन १९२० ते २३ सालीं आम्ही विजापुरास असल्यापासून प्रत्येक उत्सवाचे वेळी `श्री गुंडू माउली महाराज' यांचेसमोर (पोथी छापणेबद्दल) चर्चा व्हायची परंतु पुढाकार घेणेस कोणीच तयार नव्हते आतां त्याचा योग आला असून लौकरच प्रसिद्धीचे कार्य होईल अशी आशा आहे. आपलेकडील पोथी (म्हणजे सेवामंडळाच्या आवृत्तीच्या पार्श्वभूमिकेत नमूद केलेली, मुद्रणप्रत तयार होण्यापूर्वीच कोल्हापूरच्या एका सांप्रदायिकांनी स्वत:पाशी आहे असें पत्र लिहून नंतर कार्यासाठी मंडळाचे स्वाधीन केलेली नक्कल प्रत) माझे थोरले बंधु कै. भगवंतराव यांनी लिहिलेली आहे. ते सन १९६१ जून दि. २० इसवीत्त वारले. आमचेकडे आलेला ग्रंथ श्रीसद्गुरु गुरुमाउली गुंडुमाउली यांनीं आमचे कुलगुरु कै. अनंतराव व त्यांच्या पत्नी कै. आबुताई यांना दिला व त्या उभयतांनी माझेकडे दिला. आम्ही तिघांनी विजापूर मुक्कामीं असतांनाच `श्रीगुंडा माउलीचेकडोन उपदेश घेतला. आपण जें छापण्याचे काम करीत आहात त्यास माझी पूर्ण अनुमति आहे. आपणाला आणखी कांहीं माहिती पाहिजे असल्यास कळवावे. शक्यतो माझ्या आठवणीप्रमाणें पुरवीत आहे.'' वरील पत्रांत महत्त्वाची माहिती मिळते. या अस्सल पोथीचें मुद्रण व्हावें अशी पू. गुंडाक्का यांची १९२० सालापासून तीव्र मनीषा होती हेही स्पष्ट होत आहे. वरील मजकूरांत कंस करुन लिहिलेंली वाक्यें मूळ पत्रांत नसून; आम्ही वाचकांच्या सोयीसाठीं स्पष्टीकरणार्थ घातली आहेत. श्रीसिद्धचरित्राच्या ह्या अस्सल प्रतीसंबंधीं अधिक तपशील मिळवितांना कोल्हापूर येथें आम्हांला अशीही माहिती मिळाली कीं सदर अस्सल पोथी श्रीपतींनीं संपूर्ण लिहून श्रीसद्गुरु तिकोटेकर महाराजांस समर्पण केल्यानंतर ती पोथी श्रीमहाराजांजवळ असे. विजापूर येथे श्रींची महासमाधि झाल्यानंतर ही अस्सल प्रत महाराजांच्या सुकन्या व शिष्या पू. गुंडाक्का यांचेजवळ स्वाभाविकपणें राहिली. पूज्य गुंडाक्काचा जरी विवाह झाला होता तरी फारच. अल्पकाळांतील पतिनिधनामुळें त्या माहेरीं आपल्या थोर पित्याजवळ राहात असत. ``पांगेरी' येथें त्यांचें सासर होतें. पांगेरीपासून `कारदगा' हे गांव जवळ आहे. करदगा येथें कोणी `मामी' नांवाच्या गुंडाक्कांच्या अनुग्रहीत होत्या, गुंडाक्का विजापुराहून अधूनमधून कारदगा येथें जात असत. व ह्या मामींकडे त्यांचा कांहीं दिवस मुक्कामही होई. श्रीसिद्धचरित्राची अस्सल पोथी गुंडाक्कांपाशी नेहमी असायची तीच पोथी पूज्य गुंडाक्कांनी कारदगा येथें मामींकडे ठेवली. ती कारदग्यांस कां ठेवली याचे कारण समजूं शकलें नाहीं. हा अस्सल ग्रंथ हल्लीं सांगलीस असलेल्या कारदगेकर कुलकर्णी यांचेकडे कसा आला तें त्यांनीं, वर नमूद केलेल्या पत्रांत स्पष्ट केलेंच आहे. सारांश, वास्तविक जी पोथी श्रीतिकोटेकर महाराजांच्या वंशजांकडे विजापूर मठांतून प्रवास करीत करीत श्री. न.ग. कुलकर्णी यांचेकडे आली. श्रीसिद्धचरित्राच्या ह्या अस्सल पोथीचा उल्लेख आम्हीं या ठिकाणीं `श्रीगजानन-मुलाधार प्रत' असा करीत आहोंत व पुढेंही याच संज्ञेने सदर ग्रंथाचा उल्लेख होईल. ही संज्ञा निश्चित करण्याचीं दोन तीन कारणें येथें स्पष्ट करणें अस्थानीं होणार नाहीं.
(१)
सांप्रदायिक उपदेशपद्धतीच्या विवरणांत, या पोथींत कांहीं स्थळीं योगमार्गातील षट्‍ चक्रांचा उल्लेख आला आहे या चक्रांपैकी मूलाधार चक्राची देवता `श्रीगजानन' आहे हें नव्याने सांगावयास नको. या प्रतीच्या उल्लेखांत श्रीगजानन-मूलाधार हे शब्द येणें अर्थात्‍ सुसंगत ठरते.
(२)
अडतिसाव्या अध्यायाचे शेवटीं `श्रीगजाननानें बालबोध लिपींत' ग्रंथ उतरला असें खुद्द श्रीपतिनाथांनींच नमूद केले आहे. साहजिक श्रीपतींबरोबर या `श्रीगजाननाचें' उपकृति स्मरणही सदर नांवांत होते.
(३)
आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे ही पोथी म्हणजे `सेवा मंडळातर्फे प्रकाशित होणार्‍या छापील पोथीचा मूळ आधार आहे' व तें ध्वनित करण्यासाठीं, आम्ही योजलेल्या संज्ञेत `मूलाधार' शब्द समर्पक ठरतो. श्रीज्ञानेश्वरी, श्रीगुरुचरित्र यांसारख्या वरदी पोथ्यांच्या ज्यावेळीं अनेक प्रती मिळतात व त्यांचा अभ्यास आवश्यक ठरतो त्यावेळीं व्यक्तीच्या अगर गांवाच्या नांवानें ती पोथी उल्लेखण्याचा प्रघात आहे. उदाहरणार्थ, कुंटे प्रत, कडगंची प्रत वगैरे. या रुढीला अनुसरुन सिद्धचरित्राच्या अस्सल पोथीला अन्वर्थक संज्ञा ठरवावी असाही विचार झाला; पण त्या संज्ञा सर्वार्थानें' चपखल' वाटल्या नाहींत. याचेंही थोडें स्पष्टीकरण देतों. वास्तविक ही पोथी श्रीमहाराजांच्या समाधिस्थानीं, त्यांच्या वंशजांकडे विजापूर येथें असणें स्वाभाविक होते. तसें असतें तर `विजापूर प्रत' असें सुटसुटीत देतां आलें असते. ह्या पोथीचा सध्यांचा मुक्काम लक्षांत घेतां, `सांगली' प्रत असा निर्देश होऊं शकतो; पण तो अन्वर्थक नाहीं. श्रीगुरुभक्त न.ग. कुलकर्णी हे कदाचित् यापुढें सांगलींतून अन्यत्र गेले तर `सांगली प्रत' ही संज्ञा नुसती अपुरी तर नव्हेच पण पुढे पांच पन्नास वर्षांनीं वाचकांना संभ्रमांत टाकेल. श्री. कुलकर्णी हे, समजा कायमचे सांगलीला राहिले तरी सांगली येथें या परंपरेचा मठ, आश्रम वगैरे नाहीं अगर स्वत: श्रीनरहरपंत हेही संप्रदाय चालवीत नाहींत. सारांश, विजापूर प्रत किंवा सांगली प्रत ह्या दोन्ही संज्ञा, या कारणांनीं बाजूस पडूण आम्ही `श्रीगजानन मूलाधार प्रत' हें नामाभिधान अस्सल प्रतीस निश्चित केलें. श्रीगजानन - मूलाधार प्रतीचें लेखी स्वरुप वाचकांना प्रत्यक्ष दिसावे म्हणून पोथीच्या एका पृष्ठाचें छायाचित्र या आवृत्तींत छापले आहे. त्यावरुन ८०/९० वर्षापूर्वीचें हस्ताक्षर, शब्दांची रुपें (प्रबोत्ध, वत्छा इ.) यांची चांगली ओळख होते. याच हस्ताक्षरांत पोथीचे सुमारे सदतीस अध्याय लिहिलेले आढळतात. अडतीस ते चाळीस अध्यायांतील अक्षर जुन्या वळणांचेंच पण अधिक रेखीव व अधिक ठाशीव आहे. अध्याय दुसरा मात्र अगदीं अर्वाचीन, निळ्या शाईनें लिहिलेला आहे. यांबंधीं श्री.न.ग.कुलकर्णी यांस समक्ष भेटींत ते म्हणाले ``छापखाने नुकतेच सुरूं झाले होते अशा त्या काळांत, सद्गुरुंचा प्रसाद म्हणून किंवा हस्तलिखीत पोथी ज्या सांप्रदायिकांकडे असे, त्या व्यक्तीकडून प्रसादरुपानें सबंध पोथी किंवा निदान कांहीं अध्याय तरी मिळावेत अशी एक मनोवृत्ति होती. गुरुस्थानीय व्यक्तीही तसा प्रसाद देत असत (श्रीदत्तविभूति प.प. वासुदेवानंद सरस्वतींचे एकमेव, दण्डी, शिष्य प.प. दीक्षितस्वामी आपल्या पूजेंतल्या मूर्तीदेखील शिष्यप्रेमाखातर प्रसाद म्हणून देत असत हें प्रसिद्ध आहे. संपादक)  ``ह्या प्रवृत्तीमुळें, सदर हस्तलिखित (`श्रीगजाननमूलाधार) प्रतींत कांहीं अध्याय वेगळ्या अक्षरांत सांपडतात. अलीकडच्या काळांतही कोणीतरी दुसर्‍या अध्यायाचीं पृष्ठें आपल्या अक्षरांत लिहून ठेवून, मूळचा अध्याय प्रसादार्थ नेला. व्यक्तीचें नांव आतां स्मरणांत नाहीं.''
येथून पुढें कांहीं नक्कल प्रतीसंबंधीं माहिती देत आहोंत. आवश्यक तेथें सविस्तर खुलासा केला आहे. नव्या पिढींतील सांप्रदायिकांना हा क्वचित्‍ पाल्हाळ वाटला तरी `इतिहास' म्हणून त्यांना हा विस्तार महत्त्वाचा आहे. आणखीही विशेष कारण म्हणजे प्रत्यक्ष श्रीतिकोटेकर महाराज, श्रीपतिनाथ, श्रीगजानन, `कृष्णसुत म्हणजे ``गोदुताई कीर्तने' इत्यादि व्यक्ति आज हयात नसल्या तरी लहानपणीं गोदूताईंना पाहिलेले, कृष्णसुत म्हणजे खंडो कृष्ण उर्फ बाबा गर्दे यांना पाहिलेले किंवा त्यांच्याशी परिचय असलेले, तसेंच पू. गुंडाक्का यांचेकडूनमंत्रदीक्षा मिळालेले असे कांहीं सज्जन, वयोवृद्ध सांप्रदायिक स्त्रीपुरुष कोल्हापूर, विजापूर व अन्यत्रही आहेत. ही सर्व वडील मंडळी आतां सत्तरी ओलांडून ऐंशी वर्षाकडे वाटचाल करीत आहेत. निदान त्यांच्या तरी हयातींत जुना इतिहास, पुनर्मुद्रणाच्या निमित्तानें नोंदवावा याच उद्देशानें पुढे नक्कलप्रतीसंबंधी आवश्यक तेथें विस्तारानें लिहीत आहोंत.

(२)
बंधु-त्रय प्रत-नक्कल पोथी कोडोलीकर - जोशी या वैदिक घराण्यांतील श्री. विश्वंभर, दत्तात्रेय व शिवराम या श्रीधरपंतांच्या तिघा पुत्रांनीं म्हणजेच तिघा कोडोलीकर बंधूंनीं `श्रीगजानन मूलाधार प्रतीवरुन' ही नक्कल प्रत तयार केली. या प्रतीचा निर्देश आम्ही येथें व पुढें `बंधु-त्रय प्रत' असा केला आहे. श्री विश्वंभर श्रीधर कोडोलीकर हे संप्रदायांतील एक सद्गुरुपदस्थ साधुपुरुष असून ते पूज्य बापूमहाराज किंवा विश्वंभर महाराज असे ओळखले जात. यांच्या वाडवडिलांनीं पंढरीची वारी केली. श्रीपांडुरंगाची अनन्य उपासना केली. त्या भक्तीचें फलस्वरुप श्रीबापूमहाराज होत अशी त्यांच्या शिष्यवर्गांत श्रद्धा आहे. ते उत्तम वैदिक व ज्योतिषी होते. पूर्वायुष्यांत श्रीविश्वंभरमहाराजांनीं गायत्री पुरश्चरणें केली. बापूजी ब्रह्मचारी होते. त्यांना साध्वी गुंडाक्काकडून राजयोग दीक्षा मिळाली होती. जत्रट येथील बाबामहाराजांनीं त्यांचा अभ्यास पूर्ण करुन घेतला. श्रीबापूमहाराजांचें बहुतेक वास्तव्य निपाणी येथें झाले. बेळगांव, कोल्हापूर हीं शहरें व आसपासच्या परिसरांतही त्यांचा शिषवर्ग आहे. ते स्वत: कीर्तन फार उत्तम करीत असत. कोल्हापूरांतील दत्तविभूति श्रीसमर्थ बालमुकूंद महाराज यांचाही उत्तरायुष्यांत बापूजींना विशेष सलगीचा सहवास घडला. श्रीबापू महाराज दि. २७ जून १९६४ या दिवशीं कोल्हापूर येथें समाधिस्थ झाले. विश्वंभर महाराजांचें दोघे धाकटे बंधु हयात असून पैकीं श्री. दत्तोपंत सध्यां कोल्हापुरांत स्थायिक आहेत. हे मांगूर येथें शिक्षक होते. यांना श्रीरघुनाथ महाराज (हल्लीचे तिकोटेकर महाराजांचे वंशज) यांचा सांप्रदायिक अनुग्रह आहे. तिसरे बंधु श्री. शिवरामपंत सत्तर वर्षाचे असून यांना मात्र बापूजींप्रमाणें पूज्य गुंडाक्काचा मंत्रोपदेश आहे. शिवरामपंत सध्यां कर्‍हाड शहरापासून १८/२० मैल अंतरावर असलेल्या `कडेगाव' या गावांत राहतात. `बंधुत्रय प्रत' यांचेच संग्रहीं आहे. ते मधून मधून बंधु दत्तोपंतांकडे येतात. श्रीरामचंद्रयोगी महाराजांचे चरणीं अनन्य निष्ठा ठेवून, महाराजांच्या कृपेचे अलौकिक अनुभव घेत शिवरामपंत कडेगांवी मोठया समाधानांत असतात. सदर तिन्ही कोडोलीकर बंधूंनीं मिळून `श्रीगजानन मुलाधार' पोथीची एक नक्कल इ.स. १९३० साली केली. ती नक्कल प्रत हल्लीं कडेगांवला आहे हें वर लिहिलेंच आहे. या प्रतींत अर्थातच तिघां बंधूचें हस्ताक्षर आहे. आम्हांला अस्सल पोथी (श्रीगजानना मूलाधार प्रत) मिळण्यापूर्वी तिचे शोधांत असतांना श्री. शिवरामपंत कोल्हापूरला आले होते. अस्सल प्रत हल्ली कोठें आहे तें आपणास माहीत नाहीं' असें त्यांनीं व दत्तोपंतांनीं त्यावेळी आम्हांस सांगितले होते. श्रीगजानन मूलाधार प्रत ही पांवसला दाखवून आणल्यानंतर कोडोलीकर बंधुंनीही पाहावी अशी इच्छा झाली. शिवरामपंतांना गुरुकृपेचे विशेष अनुभव असल्यानें त्यांनाही या मूळ पोथीच्या पुनर्दर्शनाचा आनंद मिळावा असें वाटत होते. आश्चर्याची गोष्ट अशी की, कोल्हापूरला अन्य कारणांसाठी एक आठवडयानें येण्याचा त्यांचा बेत असूनही श्रीरामचंद्रयोगी महाराजांनीं दृष्टान्त देऊन त्यांना ताबडतोब कोल्हापुरीं पाठविले. श्रीगजानन मूलाधार प्रत उघडून पाहतांक्षणींच ``हीच सिद्धचरित्राची अस्सल पोथी ! याच पोथीवरुन आम्हीं बंधुंनीं नक्कल उतरली'' अशीं वाक्यें त्यांचे मुखांतून आली. ग्रंथाच्या`मौलिकतेवर'' त्यांच्या मुखानें श्रीरामचंद्रयोगी तिकोटेकर महाराजांनींच शिक्कामोर्तब केले असें वाटून फार समाधान झालें. याहीपेक्षां पोथीच्या अस्सलपणाचा इ.स. १८८३ च्या वाँटरमार्कचा जो पुरावा मिळाला तो केवळ अजोड आहे व त्याचा उल्लेख पुर्वी केलाच आहे. अशा रीतीने, अस्सल पोथीची पहिली नक्कल करणारे ज्येष्ठ सांप्रदायिक, म्हणून या, कोडोलीकर बंधूंचें छायाचित्र आम्ही कृतज्ञतेनें ग्रंथांत समाविष्ट केलें आहे. `बंधुत्रय' नक्कल प्रतीचीं दोन वैशिष्ट्यें येथें सांगणें आवश्यक आहे. श्रीगजानन मुलाधार प्रतींत सात आठ स्थळीं ओव्यांतील एक संबंध अगर अर्धा चरण सापडत नाहीं. श्रीपतींच्या मोडी ओव्या उतरवून घेतांना हें स्पष्ट आहे. प्रस्तुत नक्कल प्रतींत या सर्व ओव्या पूर्णतेला आणल्या आहेत. शिळा छाप पोथींत `ओव्यांचे चरण गळले आहेत' असा प्रमाद आढळत नाहीं. १९३० सालीं ही नक्कल करतांना, तिघां बंधूंजवळ शिळा छाप पोथी असून तीवरुन त्यांनीं गळलेले चरण पुरे असावेत. सदर नक्कल प्रतींत श्रीगजानन मूलाधार प्रतींतील एकूण सर्व ओव्या (शिळा छापेपेक्षां सुमारे दोनशें) आहेतच. शिवाय श्रीरामचंद्र महाराजविरचित दोन पदें एका अध्यायांत उतरली आहेत. आणि कलशाध्याय चाळीसमध्येंमहाराजांनींच ओव्या, श्लोक, पदें या रुपानें सद्गुरु महादेवनाथांची केलेली स्तुति - हा भाग अंतर्भूत केला आहे. असे आढळते. पद्यें व चाळिसाव्या अध्यायांतील तिकोटेकरविरचित स्तुति यांचा समावेश करतां यावा या उद्देशानें त्या त्या ठिकाणच्या प्रासंगिक ओवींत `श्रीगजानन-मूलाधार' पोथीच्या मूळ पाठांत बदल केला आहे. या संदर्भात कोल्हापूर येथें शिवरामपंतांना पृच्छा करतां ते म्हणाले ``आमचे ज्येष्ठ बंधु पुज्य बापूमहाराज यांना श्रीरामचंद्रमहाराजांनीच आदेश दिल्यानें, महाराजांचें वाड्मय त्यांनीं नक्कल प्रतींत समाविष्ट केले. त्यासाठीं संबंधित मूळ ओवी-पाठांत शब्द बदलले.'' श्रीशिवरामपंतांचें वय, श्रद्धाळू वृत्ति, उत्कट गुरुभक्ति यामुळें या स्पष्टीकरणानंतर त्यांच्याशीं साधक बाधक चर्चा आम्हीं केली नाहीं. या मुद्याची जास्त चिकित्सा करणें शक्य आहे परंतु ती येथें अप्रस्तुत आहे. तात्पर्य इतकेंच कीं श्रीगजानन मूलाधार प्रतींतील पाठ व ओवीसंख्या आम्हीं प्रमाणभूत मानल्यानें, बंधु त्रय प्रतींतील अधिक मजकूर मूळ संहितेंत समाविष्ट केला नाहीं. मात्र हें वाड्मय श्रीतिकोटेकर महाराजांचेंच असल्यानें तें `परिशिष्ट' रुपानें या ग्रंथांत स्वतंत्र घातलें आहे.

(३)
भगवंतराव प्रत - नक्कल पोथी: -
श्रीगजानन मूलाधार प्रत हल्लीं ज्यांचेपाशीं आहे त्या सांगली येथील नरहरपंत कुलकर्णी (कारदगेकर) यांचे भगवंतराव नामक ज्येष्ठ बंधु होते. त्यांचे हस्ताक्षर सुरेख असल्यानें आणि कोडोलीकर बंधूंच्या सात्त्विक संगतींत राहण्याचा योग आल्यानें श्रीभगवंतराव यांनाही पोथीची एक हस्तलिखित प्रत करण्याची इच्छा झाली. हल्लीं कडेगांवीं असलेल्या `बंधु त्रय' नक्कल प्रतीवरुन कै. भगवंतराव यांनीं इ.स. १९४० सालीं हस्तलिखित प्रत तयार केली. या पोथीस आम्हीं `भगवंतराव' प्रत हें नामाभिधान निश्चित केलें आहे. सदर नकलेचे शेवटीं, जरुरी भासल्यानें भगवंतराव यांनीं सप्ताह पद्धतीनें पोथीचे पारायण करण्यासाठी अध्यायाम्ची विभागणी करुन सांप्रदायिकांसाठीं सोय करुन ठेवली आहे हें विशेष उल्लेखनीय ! भगवंतराव प्रत कोल्हापुरांतील श्री. दत्तोपंत कोडोलीकर यांचे संग्रहीं आहे. श्रीबापू महाराजांचे एक अनुग्रहीत श्रीगुरुभक्त अनंतराव पतकी यांचा व दत्तोपंतांचा कैक वर्षे अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध असल्यानें सदर हस्तलिखित प्राय: श्री पतकी यांचेकडेच असते. सेवा मंडळाच्या प्रतीची पार्श्वभूमि स्पष्ट करतांना आम्ही ज्यांचा मोघम उल्लेख केला आहे ते सांप्रदायिक सज्जन म्हणजे हे अनंतराव पतकी होत. शिळा छाप पोथीवरुन मुद्रण प्रत होणार असें समजतांच पतकींनीं कळकळीनें पत्र लिहून सदर नक्कल प्रतीसंबंधीचा तपशील कळवला व प्रत्यक्ष भेटींत मुद्रण प्रत लेखकाजवळ ही नक्कल-पोथी सुपूर्त केली.

(४) दाभोळकर प्रत (बेळगांव) -
नक्कल पोथी ही आणखी एक नक्कल प्रत सध्यां श्री हरिभाऊ लक्ष्मण दाभोळकर, नानावाडी, बेळगांव यांचे संग्रहीं आहे. श्री. दाभोळकर हे कै. बापूमहाराज कोडोलीकर यांचे अनुग्रहीत असून स्वत:च्या उपयोगासाठीं, `भगवंतराव' प्रतीवरुन एका स्नेह्याकडून त्यांनीं एक नक्कल प्रत कांहीं वर्षापूर्वी तयार करवून घेतली आहे असें समजते.

(५) सरदेसाई प्रत (कोल्हापूर) -
नक्कल पोथी (शिळा छापेची नक्कल) शिळा छाप आवृत्तीची ही नक्कल प्रत `श्री.एस.व्ही. सरदेसाई' १२१७ शिवाजी पेठ, कोल्हापूर, यांचे संग्रहांतील आहे. अल्पकाळ ही नक्कल अवलोकन करण्यास मिळाली होती. शिळा छाप पोथीची प्रत असल्यानें, श्रीगजानन मुलाधार प्रतीपेक्षां सुमारे दोनशे ओव्या यांत स्वाभाविक कमी आढळतात. ही नक्कल एकाच व्यक्तीनें आद्यन्त लिहिली असून अक्षराची धाटणी अलीकडच्या काळांतील आहे. शाईदेखील साधी निळी आहे. नकलेच्या सुरुवातीस अगर शेवटीं प्रतलेखनाचा काळ नोंदविलेला नाहीं; तथापि या बांधीव पुस्तकांत सिद्धचरित्राचे पढे श्रीरामगीता म्हणून ओवीबद्ध प्रकरणाची नक्कल केलेली दिसते. त्याच आरंभीं मात्र २९ जुलै १९५३ अशी तारीख दिसते. यावरुन रामगीतेपूर्वी वर्ष दोन वर्षे सिद्धचरित्राची नक्कल केली असावी असें अनुमान होतें. अस्तु.

(६) शिळा छाप आवृत्ति - छापील पोथी :
सेवा मंडळास उपलब्ध झालेल्या सर्व हस्तलिखित प्रतींची वरीलप्रमाणें नोंद केल्यानंतर प्रस्तुत ग्रंथाची जी शिळा छाप आवृत्तीची पोथी मिळते, त्या आवृत्तीसंबंधीं आणखी कांहीं, कोल्हापूरांत मिळालेली परंपरागत माहिती व प्रत्यक्ष पोथीच्या स्वरुपाबद्दल येथें तपशील देत आहोंत. सदर यादींत या पोथीचा उल्लेख जरी अखेरी येत असला तरी पहिली मुद्रित आवृत्ति म्हणून शिळा छापेचें महत्त्व अनन्यसाधारण आहे. मिळालेल्या सगळ्या हस्तलिखितांचा क्रमानें परिचय या विभागांत शेवटीं दिला आहे इतकेंच !  शिळा छाप पोथीचें मूळ हस्तलिखित मिळविण्याच्या खटपटींत असतां कोल्हापूर येथें, मातोश्री गोदामाय कीर्तने, यांचेसंबंधीं जी कांहीं माहिती मिळाली ती छापील पोथीच्या संदर्भात महत्वाची आहे म्हणून येथें तत्संबंधीं उपलब्ध तपशील नोंदवीत आहोंत. तसेंच आणखीही हकीकती ग्रथित केल्या आहेत. प्रात:स्मरणीय साध्वी गोदामाई कीर्तने या तिकोटेकर महाराजांच्या अत्यंत मर्जीतल्या आणि साधनेच्या प्रांतांत सर्वोच्च स्थिति प्राप्त झालेल्या थोर शिष्या होत्या. त्यांच्या यौगिक सामर्थ्याचे कांहीं अनुभवही लोकांना येत असत. गुरुपरंपरेचा उपास्य ग्रंथ म्हणून त्या श्रीज्ञानेश्वरीचें नेहमीं पठण चिंतन करीत. शिवाय प्रत्यक्ष अनुभवसंपन्न असल्यामुळें ह्या आनंदाचा लाभ इतरही जिज्ञासूंना मिळावा म्हणून त्या पुढें ज्ञानेश्वरीवर निरुपणेंही करुं लागल्या. हीं प्रवचनें हें नंतर नित्यकर्मच झाले. भल्या सकाळीं पुरुषांसाठीं आणि दुपारीं केवळ महिलावर्गाकरितां गोदामाई ज्ञानेश्वरी सांगत अशी ऐकीव माहिती मिळते. एवढी गोष्ट निश्चित कीं त्यांच्या अनुभवाच्या वक्तृत्वावर लुब्ध होऊन, त्या काळांतील अनेक पंडित मंडळी तसेच संस्थानचे न्यायाधीशांसारखे उच्चपदस्थ लोक जिज्ञासू वृत्तीनें श्रवणांस जात. नंतर ज्यांना शंकराचार्य पीठावर आरुढ होण्याचा योग आला ते `पित्रे' नामक कोणी पंडितवर्य पूर्वाश्रमीं आईसाहेबांची ज्ञानेश्वरी ऐकण्यास जात असत. पूज्य गोदामाईच्या प्रवचनास जाणार्‍या मंडळींची बौद्धिक उंची लक्षांत घेतली म्हणजे जसा आईच्या पारमार्थिक अधिकाराचा आवांका लक्षांत येतो तसाच या श्रोतेमंडळींच्या सामाजिक प्रतिष्ठेचा व त्या काळांतील संस्थानी वैभवाचा थोडा विचार केला तर श्रीसिद्धचरित्राची छापील प्रत प्रसिद्ध होण्याचा सुयोग का व कसा आला असावा त्याचेंही अनुमान बांधणें शक्य वाटतें. प्रवचनें ऐकलीं म्हणून कांहीं द्रव्य देणें, मठ आश्रम बांधून देणे हें व्रतस्थ गोदावरी मातोश्रीच्या बाबतींत शक्य नव्हते. तेव्हां अन्य कांहीं रुपानें त्यांना प्रसन्नता वाटेल अशी सेवा करावी असा श्रोतेमंडळींतील कृतज्ञ आणि हुद्देदार मंडळींनीम विचार केला असावा. पूज्य आईच्या जिव्हाळ्याचे ग्रंथ दोन. श्रीज्ञानेश्वरी आणि सिद्धचरित्र ! तेव्हां त्यांच्याच देखरेखीखालीं तयार झालेल्या सिद्धचरित्र पोथीची छपाई करावी या कल्पनेनें मूळ धरुन, परिणामी शके, १८१० मध्यें, आर्थिक जबाबदारी उपरोक्त बडया मंडळींनीम स्वीकारुन शिळा छाप आवृत्ति प्रसिद्ध केली. हें आमचें अनुमान आहे. सिद्धचरित्राची अस्सल पोथी सद्गुरु तिकोटेकर महाराजांकडून त्यांच्याच कन्या व शिष्या पू. गुंडाक्का यांचेकडे गेली हें आपण पाहिलेंच आहे. तरीदेखील ग्रंथ तयार होतांच त्याची लगेच एक नक्कल प्रत गोदामाईंनी कोणाकडून तरी करवून घेऊन स्वत:कडे ठेवली असली पाहिजे. कारण एकतर हा गुरुसंप्रदायाचा ग्रंथ आणि तो खुद्द गोदामाईंच्याच मार्गदर्शनानें तयार झालेला. तेव्हां छापखान्याच्या अभावीं (निदान पुष्कळ छापखाने निघाले नव्हते त्या काळीं) गोदामाईंनीं सिद्धचरित्राची एक नक्कल प्रत, मूळ लेखनकाळांत करवून घेतली असली पाहिजे. श्रीसिद्धचरित्राच्या छापील प्रतीचें मूळ हस्तलिखित मिळाले असते म्हणजे `अनुमान' प्रमाणावर इतकें अवलंबून राहावे लागले नसते हें उघडच आहे. शिळा छाप पोथींत मूळ (श्रीगजानन मूलाधार) पोथीपेक्षां सुमारे दोनशें ओव्या कमी कां छापल्या गेल्या याबतींत मात्र `तर्काची दिठी पांगुळे' । असें म्हणून स्तब्ध राहावे लागते. शिळा छाप पोथींत नसलेल्या ह्या ओव्या सेवा मंडळाच्या प्रस्तुत आवृत्तींत तारका चिन्हानें दर्शविल्या आहेत. कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध पंडित व चिकित्सक लेखनामुळें महाराष्ट्रांतील विद्वज्जनांत सुप्रतिष्ठित असे वयोवृद्ध सज्जन पं० बाळाचार्य खुपेरकर यांची कांहीं सांप्रदायिकांनीं भेट घेतली. पूज्य गोदामाई, सिद्धचरित्र इ. विषयी त्यांना जुन्या काळांतील कांहीं माहिती असावी या कल्पनेनें भेटीस गेलेल्या मंडळींना खालील आशयाचा तपशील मिळाला. पुढील मजकुरांतील शब्द आमचे; आशय शास्त्रीबोवांचा. ``साध्वी गोदामाई ज्ञानेश्वरीवर अधिकारवाणीनें निरुपणें करीत असत व कोल्हापुरांतील विद्वान, प्रतिष्ठित मंडळी श्रवणास जात हें मला माहित आहे. मी स्वत: पाहिलेंही आहे. त्यावेळीं मी अगदीं तरुण वयाचा होतो त्यामुळें श्रोता म्हणून तेथें उपस्थित राहिल्याची आठवण नाहीं. मात्र त्या प्रवचनाचे संस्कार खोल उमटले होते आणि म्हणूनच, महाराष्ट्र सरकारने श्रीज्ञानेश्वरीची आवृत्ति छापण्याचे कामीं नेमलेल्या मंडळाचा सदस्य या नात्यानें ज्या अनेक पोथ्या आम्हीं मिळविल्या त्यांत पूज्य गोदूताईजवळ असलेली ज्ञानेश्वरीची प्रत मुद्दाम मिळविली होती.
``पूज्य गोदामाईचे बंधू श्रीपतराव कीर्तने हे होत. ते कोर्टांत कारकून होते. माझा श्रीपतरावांशी स्नेहसंबंध होता. त४ए व मी समवयस्क होतो. त्या वयांत संस्कृत अध्ययनाकडे माझा ओढा असल्यानें, जरी गोदामाईचें दर्शन होत असे तरी अध्यात्मशास्त्र किंवा परमार्थसाधना या दृष्टीनें माझें गोदामाईंकडे अधिकारी साध्वी म्हणून लक्ष गेले नाहीं. ``श्रीसिद्धचरित्र या ग्रंथाबद्दल मला कांहीही माहिती नाहीं. हा ग्रंथ श्रीपति म्हणजे श्रीपतराव कीर्तने यांनीं लिहिला एतद्‍विषयीही कांहीं तपशील मला ज्ञात नाहीं.'' अस्तु. छापील पोथी कोल्हापूर येथें शके १८१० मध्यें, कोणा मंत्री नामक गृहस्थांच्या शिळा छाप छापखान्यांत छापली गेली. हा छापखाना हल्लीं कोल्हापूरला अस्तित्वांत नाहीं. प्रेसचें नांव `ज्ञानसागर छापखाना' असे होतें. प्रत्यक्ष पोथीचें मुद्रण सुबक शिळा छाप टाइपांत केलें असून ग्रंथाचे शेवटीं, पूज्य गोदावरी मातोश्रींनीं रचलेली सद्गुरुंची आरती दिली आहे. तसेंच प्रत्येक अध्यायापुढें ओवीसंख्या नोंदविलेली एक जंत्रीही शेवटी दिली आहे. छापील पोथीचे अध्याय चाळीस असून एकूण ओवीसंख्या ४९५१ (चार हजार नऊशे एकावन्न) अशी छापली आहे. श्रीगजानन मूलाधार प्रतीशीं, या छापील आवृत्तीची रुजवात घेत असतां ज्या गोष्टी दृष्टीत्पत्तीस आल्या त्या येथें नमूद करीत आहोत.
(१) छापील प्रतींतील शब्दांचीं रुपें आज आपण वापरतो तशीच आहेत.
(२) बहुतेक प्रत्येक अध्यायाचे आरंभीं `श्रीगणेशायनम:' नंतर `त्रिकुटवासी सद्गुरु राम माउली समर्थ' आणि `प्रणवरुपिनी करवीरनिवासिनी गोदाई प्रसन्ना वरदास्तु' असें वंदन केलेलें आढलते व अध्यायसमाप्तीनंतर पुन: गोदाई प्रसन्ना वरदास्तु ``आई, आई'' वगैरे शब्द दिसतात.
(३) अस्सल प्रतीपेक्षां १०/१२ ओव्या वेगळ्या व अधिक आहेत. त्या आमच्या आवृत्तींत त्या त्या पृष्ठाखालीं तळटीपेंत दिल्या आहेत.
(४) अस्सल प्रतींतील सुमारे दोनशे ओव्या छापील प्रतींत नाहींत.
(५) अस्सल प्रतींत ज्याप्रमाणें श्रीतिकोटेकर महाराजांची पदें, ओव्या, श्लोक वगैरे वाड्मय नाहीं तसें तें छापील पोथींतही नाहीं.
(६) बरेचसे संस्कृत शब्दही शुद्ध स्वरुपांत सांपडतात.
(७) छापील पोथींतील अनेक ओव्यांतून भिन्न पाठ मिळतात.
(८) ओव्यांतील एक किंवा अर्धा चरण गळला असें दिसत नाहीं.
(९) सप्ताह पद्धतीनें ओव्यांनी अध्यायवार विभागणी करुन तयार केलेलें कोष्टक अस्सल प्रतीप्रमाणेंच छापील प्रतींतही नाहीं.

N/A

References : N/A
Last Updated : March 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP