श्रीसिद्धचरित्रांत वर्णिलेली गुरुशिष्य परंपरा भगवान् आदिनाथ शंकरांपासून निर्माण होऊन, श्रीरामचंद्र तिकोटेकर महाराजांपर्यंत व पुढें एका शाखेनें पांवसनिवासी सद्गुरु श्रीस्वरुपानंद स्वामींपर्यंत आली असली तरी श्रीज्ञानदेवांपासून देवनाथांकडून ही परंपरा पुन: चालूं होतांना मध्यंतरीं कांहीं शतकांचा काल गेला होता. श्रीज्ञानेश्वरमहाराज शिष्यपरंपरेनें नाथपंथांतील होते आणि आहेत. तथापि `गोरक्ष जालिंदर चर्पटाश्च, अडबंग कानीफ .....' इत्यादि श्लोकांत वर्णिलेल्या नाथसिद्धांचीं चरित्रें आणि जगदुद्धाराची पद्धति व श्रीज्ञानेश्वरमाउलींचें अवतारकार्य यांत, सिद्धांच्या इच्छेमुळेंच, फरक आढळतो. अंतरंगांत गुरुपदिष्ट सोऽहं बोधाच्या निदिध्यासांत राहून, जगताला ज्ञानेश्वर महाराजांनीं श्रीविठ्ठल उपासना, पंढरीची वारी, नामस्मरण या पंथाला लावले. निरंतर मार्गदर्शनासाठीं ज्ञानदेवीसारखा अनुपमेय ग्रंथ जगास दिला. माउलीचें वागणें `मार्गाधारें वर्तावे । विश्व हें मोहरें लावावे । अलौकिक नोहावे । लोकांप्रति ॥'
या त्यांच्याच श्रीमुखांतील ओवीप्रमाणे होते. या सर्व कारणांनीं ते `ज्ञाननाथ' म्हणून न गाजतां, त्यांचें `श्रीज्ञानेश्वर माउली' हेंच नामाभिधान नामदेवादि संतांनीं रुढ केले. या परिच्छेदांतून सूत्ररुपानें व्यक्त केलेल्या विचारांवर पुष्कळ विस्तारानें लिहिणें शक्य आहे. ही प्रस्तावना येथें करण्याचें कारण हेंच कीं सिद्धचरित्रांत श्रीज्ञानेश्वर महाराजांपासून पुढें अखंड, आजतागायत चालूं राहिलेल्या गुरुशिष्यपरंपरेंत ज्ञानेश्वरी हा एकच उपास्य ग्रंथ मानला गेला. श्रीदेव-चूडामण, गुंडामहाराज, नागपूरकर महाराज, महादेवनाथ, तिकोटेकर महाराज व पुढें श्रीविश्वनाथ महाराज, श्रीगणेशनाथ आणि सद्गुरु स्वरुपनाथ ऊर्फ स्वामी स्वरुपानंद यांच्या सर्वांच्या पठनचिंतनांत एकच ग्रंथराज असे व तो म्हणजे ज्ञानेश्वरी. याचा अर्थ इतर वेदवाड्मय, वेदानुकूल शास्त्रग्रंथ, अन्य साधुसंतांचे ग्रंथ हे महात्मे मानीत नसत असा करणें हें अत्यंत बालिशपणाचें किंबहुना मूढलक्षण ठरेल ! अशी ही ज्ञानेश्वरीची वाड्मयसेवा `गुरुसंप्रदायधर्मा' प्रमाणें पोथी लेखक श्रीपतिनाथ, आई व कृष्णसुत या तिघांनींही दीर्घकाल केल्यानें, प्रस्तुत पोथींत अनेक स्थळीं, वेगवेगळ्या पैलूंतून ज्ञानेशांच्या अनुकरणाच्या खुणा दिसतात त्यापैकीं कांहीं येथें पाहूं. पुढें नोंदविलेले शब्द हे ज्ञानेश्वरींत अर्थानें आले आहेत त्याच अर्थानें सिद्धचरित्राम्त योजलेले आहेत. पहा : आयणी, गौल्य, थिल्लर, सुवर्म, हळुवट, सुखासन, पद्मकर, चेइरा, नातुडर्णे, अशेख, कडसणी, त्रिशुद्धि, डुडुळ, भांगार, डगरु, लवडसवडी इ. `शुद्ध पुण्य, पुयपंक' हे शब्द तर खास ज्ञानेशांचेच ! आणखी कांहीं वाक्प्रयोग पहा : धैर्याचा महाहुडा, प्रेमाचा पडिभर, दिठी झोंबणें, गुरुगुह्याचा सौरस, शांतीचा पुतळा, योगसुखाचे सोहळे, वार्षीय मेघजाळ वगैरे. ओवीचरणाच्या अन्त्यांक्षरांत उकार जोडणें हें ज्ञानदेवांच्या काळीं ग्रांथिक भाषेंत रुढ होते. माउलींच्या ज्ञानेश्वरीपूर्वी महानुभाव पंथाच्या कवींच्या ओव्यांतूनही हा पडताळा येतो. ज्या चरणाचे अंतीं मुळांत `तरु, गुरु' यासारखे उकारान्त शब्द असतात तेथें उरलेल्या चरणांचे शेवटचें अक्षरही उकार घेऊन येते. `पडिभर' `आकार' हे शब्द पदिभरु आकारु असें ज्ञानेश्वरींत येतात. परंतु सूक्ष्मपणें पाहिल्यास असे उकारान्त शब्द मूळ पुलिंगी आहेत असें दिसेल. नपुंसकलिंगी किंवा स्त्रीलिंगी शब्दाच्या अन्त्याक्षराला उकार मुद्दाम जोडलेला ज्ञानदेवींत सांपडणें अशक्यप्राय म्हटलें तरी चालेल. पांखरु, गुरुं हे शब्द नपुंसकलिंगी खरे; पण शब्दाचें मूळ रुपच आहे. श्रीसिद्धचरित्रांतील पुष्कळ ओव्यांतील चरणांची अन्त्याक्षरें उकारान्त आहेत. व हे ज्ञानदेवांचें अनुकरण होय हें उघड आहे. मात्र तीनही चरणाचे अंतीं पुलिंगी शब्द नसूनही श्रीपतींनीं अन्त्याक्षरास उकार लावलेला आढळतो. किंवा एका चरणाचे अन्तीं `मेरु' सारखा उकारान्त शब्द आहे म्हणून उरलेल्या चरणांतील `सासर' (नपुं) `खार' (स्त्री) असे शब्दही श्रीपतींनीं `सासरु', खारु, अशा शैलींत लिहिलेले दिसतात.
सेवा मंडळाच्या या आवृत्तींत आम्ही शक्यतों सर्व शब्दांचे, लिंगविचार न करतां, उकार कायम ठेवले आहेत. परंतु कांहीं ठिकाणीं ज्ञानेश्वरींतील उकाराचें धोरणाप्रमाणें नपुंसकलिंगी व स्त्रीलिंगी शब्दांतील अन्त्याक्षराचे उकार गाळलेले दिसतील. या पोथींतील कांहीं ओवीचरणावर ज्ञानेश्वरींतील ओव्यांचा ठसा उमटलेला दिसतो. `मज विदेहा देह धरणें ।' `त्रिशुद्धी आन नोहे ॥' किंबहुना म्हणे यदुवीर । तो (भक्त) आत्माचि मी शरीर ।' इत्यादि. पुढील दोन ओव्या पहा " जे शिष्य पूर्ण होतां । सुख निपजे सद्गुरुचित्ता । तें तोचि एक तत्त्वतां । जाणों शके ॥३३॥
कां जे शिशु स्तनपान । देखोनि होय समाधान । तें मातेवांचोनि आन । कवण जाणे ॥३४॥
अ २२ या दोन ओव्यांतून, ज्ञानेश्वरींतील आठव्या अध्यायांतील `देखा बालकाचिया घणी घाइजे । कां शिष्याचेनि जाहलेपणें होइजे । हें सद्गुरुचि एकलेनि जाणिजे । कां प्रसवितया ॥५५॥
या ओवीची सोज्वळ छाया स्पष्ट दिसून येतें. वोखद, विख, अशेख या शब्दांत, मुळांतील `ष' चा `ख' हा जसा ज्ञानेश्वरींत दिसतो तसाच सिद्धचरित्रांतही लिहिलेला आहे. सदैव हा शब्द हल्लीं `नेहमीं, सदोदित' या अर्थी आपण वापरतों. ज्ञानदेवांचे काळीं सदैव हा शब्द `दैवासहित म्हणजे देववान्' या अर्थानें योजीत असत. सिद्धचरित्रांतही `दैववान्' याच अर्थी हा शब्द आला आहे. ती (अवस्था) सदैवास प्राप्त होतां । मुमुक्षुता साच मानूं ॥
आणखी एकच पैलू दर्शवन हा भाग आटोपूं. सद्गुरुंनी प्रिय शिष्याला आलिंगन देऊन हा भाग आटोपूं. सद्गुरुंनीं प्रिय शिष्याला आलिंगन देऊन शक्तिपात करणें, या पद्धतीचे उल्लेख ज्ञानेश्वरींत `कृष्णार्जुन' या गुरुशिष्यांच्या संदर्भात ( व एकनाथी भागवतांत `श्रीकृष्ण उद्धव' या गुरुशिष्यांचे संदर्भात) पाहावयास मिळतात. `मग सावळा सकंकणु । बाहु पसरोनि दक्षिणु । आलिंगिला स्वशरणु । भक्तराजु ॥' ही एक सहज आठवलेली ओवी येथें लिहितों. श्रीसिद्धचरित्रांतील असे तीन उल्लेख खालीं देत आहोत. `अहो आलिंगिनाचें मिष । करोनि, ओपिला निजचौरस । तदा श्रीपतीचा उल्हास । आब्रह्मभुवनासी दाटला ॥४४॥
अ ३९ .....' बाप सप्रेम खेंव व्याज । करोनि, वोपिले स्वानंदभोज । ' १८६ ॥४०॥ तसेंच' निजालिंगनीं मेळविला ॥ मेळवोनि केला अचल अढळ । ' २५२ । अ ४०' ॥' सिद्धचरित्रांतील ज्ञानेश्वरी ही अशी आहे.