उदकवहस्त्रोतस् - तृष्णा

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


व्याख्या
सततं य: पिबेद्वारि न तृप्तिमधिगच्छति ।
पुन: काड्क्षति तोयं च तं तृष्णार्दितमादिशेत् ॥
सु.उ. ४८, ३ पान ७५०

वरचेवर पाणी पीत राहूनहि समाधान होत नाहीं, पुन:पुन: पाणी पिण्याची इच्छा होत राहातेच. या स्थितीस तृष्णा असें म्हणतात.

स्वभाव
सामान्यत: हा व्याधि सौम्य स्वरुपाचा असतो. चरकाचा टीकाकार `पंचानां चिकित्सितं' या पदावर टीका लिहीत असतांना म्हणतो कीं
पञ्चानामिति वचनेन पञ्चनामपि चिकित्साविषयत्वं दर्शयति,
नहि कासश्वासवदसाध्यत्वं कस्याश्चिदत्रेत्यर्थ:
टीका. च. चि, २२, ३ पान १३०७

मार्ग
अभ्यंतर

प्रकार
चरकानें तृष्णेचें पांच प्रकार मानले आहेत ते असे : वातज, पित्तज, आमज, क्षयज, उपसर्गज. या शिवाय त्यानें अन्नज, मद्यज आणि शीतस्नानज असे कारणभेदोत्पन्न तीन तृष्णाप्रकार नामोल्लेखपूर्वक वर्णिलें असून वातज, पित्तज प्रकारांतच त्यांचा अंतर्भाव करण्यास सांगितले आहेत. वाग्भटानें तृष्णेचे सहा प्रकार सांगितले आहेत.

वातात्पित्तात्कफात्तृष्णा: सन्निपाताद्रसक्षययात् ।
षष्ठी स्यादुपसर्गाच्च ॥
वातादिभि: पञ्चतृष्णा: स्यु: । षष्ठी स्यादुपसर्गाच्च्य ।
उपादानादेव षट्‍सड्खयाया लब्धत्वात् षष्ठीत्येतद्वचनं नियमार्थम् ।
आमोद्‍भवाद्या या वक्ष्यमाणातृष्णास्ता: सर्वास्तृष्णानां षटत्वं
नातिक्रामन्ति, वातपित्तजत्वात् । प्रायेण तासामास्वेवान्तर्भाव: ।
सटीक वा. नि. ५ ४५ पान ४८३

वातज, पित्तज, कफज, सान्निपातज, रसक्षयज, उपसर्गज असे सहा प्रकार होतात. वाग्भटानें आमोद्‍भवा अन्नजा, शीतस्नानजा, मद्यजा यांचा उल्लेख केला आहे. पण त्या वातपित्तज पित्तज व कफज तृष्णेमध्यें अंतर्भूत होतात असें सांगितलें आहे. सुश्रुतानें तृष्णेचे सात प्रकार सांगितले आहेत.

तिस्त्र: स्मृतास्ता: क्षतजा चतुर्थी क्षयात्तथाऽन्याऽऽमसमुद्‍भवा च ।
स्यात् सप्तमी भक्तनिमित्तजा तु निबोध लिड्गान्यनुपूर्वशस्तु ॥
तृष्णासंख्यामाह-तिस्त्र इत्यादि ।
तिस्त्र इति वातपित्तकफै: यद्यपि कफस्य स्तैमित्यात्तृष्णाजनकत्वं
न संभवति, तथाऽपि वृद्ध: श्लेष्मा यदा वातं पित्तेन सह आवृणोति
तदा ताभ्यां संशोष्यमाणस्तृष्णां जनयति । ता इति तृष्णा :
क्षतजा व्रणनिमित्ता ।
चतुर्थीति चतुर्थग्रहणाद्यानां चतसृणां तृष्णानां सुखसाध्यत्वं
रसक्षयामसमुद्‍भवयोर्दु:साध्यत्वं च बोधयति ।
क्षयात् रसक्षयात् `रसक्षयाद्या क्षयसंभवा सा' इति वक्ष्यमाणवचनात् ।
अन्या अपरा । आमसमुद्‍भवा अजीर्णजाता ।
भुक्तनिमित्तजा चेति स्निग्धादिभोजननिमित्ता ।
यद्यपि तन्त्रान्तरे पञ्चैव तृष्णा निर्दिष्टा:, तथाऽ-
प्यत्र निदानभेदेन चिकित्साभेदात् सप्त निर्दिष्टा: ।
या च या स्वभावजा तस्या अत्रानधिकार: स्वस्स्थोजस्करचिकि-
त्सितविषयत्वात्; या च बुभूक्षाप्रभवा सा ज्वराधिकारे
सम्यग्लड्घनलक्षणत्वेनोक्ता, तस्या अप्यनधिकारत्वेना-
गणनं; या च पित्तज्वरलिड्गत्वेन कथिता सा पैत्तिकायाम-
वरुद्धा या च पानजा सा क्षयजायामवरुद्धेति; अतो न
संख्यातिरेक: ।
निबोध जानीहि । अनुपूर्वश: यथाक्रमेण ।
केचित् `लिड्गानि तासां शृणु सौषधानि' इति पठन्ति ।
सटिक सु.उ. ४८-६ पान ७५०

वातज, पित्तज, कफज, क्षतज, क्षयज, आमज, अन्नज, असे तृष्णेचे सात प्रकार सुश्रुतमतानें होतात त्या त्या ग्रंथावरील टीकाकारानें तो तो प्रस्तुत ग्रंथ प्रधान मानून इतर प्रकारांचा त्या त्या विभागामध्यें समन्वय केला आहे व आपला ग्रंथ सर्व समावेशक असल्याचें दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. या समावेशनाच्या पद्धतीशीं आमचा विरोध नाहीं. चरकाचें टीकेत शारीर आणि मानस असे तृष्णेचे भेद उल्लेखिले आहेत.

हेतु -
क्षोभाद्‍भयाच्छ्रमादपि शोकात्क्रोदाद्विलड्घनान्मद्यात् ।
क्षाराम्ललवणकटुकोष्णरुक्षशुष्कान्नसेवाभि: ॥
धातुक्षयगदकर्षणवमनाद्यतियोगसूर्यसंतापै: ।
च.चि. २२-४, ४५ पान १३०७-८

क्षोभ [दोष धातु मलांच्या वा अवयवांच्या प्रकृत स्थितीमध्यें (स्वरुपत: कर्मत:) खळबळ उत्पन्न होणें] भय, श्रम, शोक, क्रोध, लंघन, मद्यसेवन, क्षार, अम्ल, लवण, कटु, उष्ण, रुक्ष, शुष्क, अति स्निग्ध, अति गुरु अशा स्वरुपाचें अन्न सेवन करणें; धातूंचा (विशेषत: द्रव धातूंचा) क्षय होणें, निरनिराळ्या रोगांनीं कृश होणें, वमनाचा अतियोग होणें, ऊन लागणें (आगीजवळ बसणें) या कारणांनीं तृष्णारोग उत्पन्न होतो.

संप्राप्ति
पित्तानिलौ प्रवृद्धौ सौम्यान्धातूंश्च शोषयत: ।
रसवाहिनीश्च नालीर्जिह्वामूलगलतालुक्लोम्न: ॥
संशोष्य नृणां देहे कुरुतस्तृष्णां महाबलवेतौ ।
सौम्यान् धातूनिति कफरसोदकानि सोमगुणातिरिक्तानि ।
प्रदूषयत इति शोषणेन दूषयत: । क्लोम्न इति द्वितीया-
बहुवचनान्तम् ।
देहे इत्यनेन एतासां तृष्णानां शारीरत्व दर्शयति ।
या हि मानसी तृष्णा सा शारीर `इच्छाद्वेषात्मिका
तृष्णा सुखदु:खात् प्रवर्तते (शा.अ.१) इत्यादावुक्ता;
इयं तु देहाश्रयदोषकारणा सती देहजवेति भाव: ।
स्वाभाविक तृष्णायामपि वातपित्त आरम्भके एव,
तत्किं साऽप्यत्र न गृह्यते ? मैवं, तस्या उचितद्रवपानेनैवाभिप्रितेन
प्रशमादिह अस्वाभाविकव्याधिप्रकरणे नाधिकार इति हृदि कृत्वा ।
सटीक च. चि. २२-५, ६ पान १३०८

आदाय पित्तं पवनो ह्युदीर्ण ओजोवहां संजनयोद्धि तृष्णाम् ।
शिरोगत: स्थाननिरुद्धवेगो हृत्क्लोम संतापयते ततस्तृद्‍ ॥
काश्यप भोजनकल्पाध्याय पान २०३

वायू शिरामध्यें येऊन प्रकुपित होतो व पित्ताचें उदीरण करतो असे हे प्रकुपित वात पित्त, क्लोम, जिह्वामूळ, गल तालु या अवयवांतील रसवाहिनीच्या आश्रयानें सौम्य असा जो आप्‍ धातु त्यांचें शोषण करतात. कश्यपाने संप्राप्ति सांगताना शिराचा उल्लेख केला आहे हे महत्वाचे समजले पाहिजे.

अब्धातु: देहस्थं कुपित: पवनो यदा विशोषयति ।
तस्मिञशुष्के शुष्यत्यबलस्तृष्यत्यथ विशुष्यन् ॥
च.चि. २२-७ पान १३०९

पीतं पीतं हि जलं शोषयतस्तावतो न याति शमम् ।
च.चि. २२-११ पान १३०९

वायूमुळें शरीरांतील अप्‍ धातु शुष्क होतो. त्यामुळें शोष उत्पन्न होतो व बल कमी होत जातें. वरचेवर पाणी प्यालें असतां तेंहि वातपित्ताच्या प्रभावामुळें शुष्क होते व त्यामुळें पाणी पिऊनही तहान भागत नाहीं.

नाग्निं विना हि तर्ष: पवनाद्वा, तौ हि शोषणे हेत् ।
अब्धातारितिवृद्धावपांक्षये तृष्यते नरो हि ॥
च.चि. २२-१९ पान १३१०

पित्त (अग्नि) आणि वात हेच दोष तृष्णेच्या संप्राप्तींतील सामान्यघटक आहेत. अप्‍ धातूचें शोषण यांच्यामुळेंच होते व या शोषणाचा परिणाम तृष्णे मध्यें होतो. उदकवस्त्रोतसामध्यें पित्त व वात या दोन दोषांमुळें तृष्णेचा उद्भव होतो. तृष्णेचे अधिष्ठान जिह्वां, तालु कंठ क्लोम याठिकाणीं असतें. संचारामध्यें शिर, उर, त्वक् हे अवयवहि समाविष्ट होतात.

पूर्वरुप
प्राग्रूपं मुखशोष:, स्वलक्षणं सर्वदा-म्बुकामित्वम् ।
तृष्णानां सर्वासां लिड्गानां लाघवमपाय: ॥
तृष्णाप्राग्रूपमाह-प्राग्रूपमित्यादि । प्राग्रूपकथने एव मध्ये तृष्णा-
नामव्यभिचारिलक्षणमाहस्वलक्षणमित्यादि ।
स्वलक्षणमित्यव्यभिचारिलक्षणं; यथा ज्वरस्य संताप:, श्वयथोरुत्सेध: ।
पुन: प्रकृतं प्रागूपमाह - लिड्गानां लाघवमपाय इति ।
लिड्गानां वक्ष्यमाणवातादिज तृष्णालिड्गानां लाघवमल्पत्वं
केषांचिच्चाभाव: पूर्णरुपं तष्णानामित्यर्थ: ।
तेन पूर्वरुपावस्थायां वक्ष्यमाणलक्षणानि कानिचिन्न भवन्त्येव,
यानि च भवन्ति तान्यल्पतयाऽस्फुटानि भवति ।
उक्तं च-`अव्यक्तं लक्षणं तस्या: पूर्वरुपामिति स्मृतम्' इति ।
किंवा यदेतत् `प्राग्रुपं मुखशोष: स्वलक्षणं सर्वदाम्बुकामित्वं'
एततं प्राग्रूपं स्वलक्षणं च तृष्णानां; तेन मुखशोषाम्बुकामित्वे
स्वलक्षणे तथा पूर्वरुपे च भवत:, पूर्वरुपावस्थायां त्वप्रबले
मुखशोषाम्बुकामित्वे ज्ञेये ।
ये तु `प्रागूपं मुखशोष: स्वरक्षय: सर्वदाऽम्बुकामित्वम्' इति पठन्ति,
तेषां मते तृष्णाया; स्वलक्षणं नोक्तं स्यात् ।
उक्तं च हारीतेऽपि तृष्णास्वलक्षणं - ``स्वलक्षणं
तु तृष्णानां सर्वदाऽम्बुपिपासिता' इति ।
किंवा मुखशोषस्वरक्षये एव पूर्वरुपं, सर्वदाम्बुकामित्वं च स्वलक्षणं,
लिड्गानां च लाघवं रोगरुपायास्तृष्णाया अपायो गमनमित्यर्थ:,
अयमेव तृष्णाव्युपरमो यद्वक्ष्यमाणलिड्गानाल्पत्वं;
सर्वथोच्छेदो हि तृष्णालक्षणानां न भवत्येव, सहजतृष्णा-
ग्रस्तत्वेनैतल्लक्षणानामल्पमात्रतयाऽवस्थानात् ।
लिड्गानां लाघवमाशूत्पाद:, स च अपायो मरणमिति कृत्वा तृष्णा-
नामसाध्यतालक्षणमीदमुच्यते, तन्नातिमनोहरम् ।
सटीक च. चि. २२-८ पान १३०८

चरकानें तृष्णेचें पूर्वरुप म्हणून मुखशोष व स्वरक्षय (पाठभेदाप्रमाणें) एवढीं दोनच लक्षणें सांगितलीं आहेत. टीकाकारानि निरनिराळ्या पद्धतीनें चरकाच्या वचनाचें अर्थ लावले आहेत त्यावरुन पुढें उल्लेखलेल्या लक्षणांचें अल्पत्व असणें हेंहि तृष्णेचे पूर्वरुप आहे असें म्हणतां येते. सुश्रुतांप्रमाणें तालु, ओष्ठ, कंठ या ठिकाणीं विशेष स्वरुपानें कोरडेपणा जाणवतो (वापि तोद या पाठभेदाप्रमाणें) टोंचल्यासारख्या वेदना होतात. उकडते मोह, भ्रम, प्रलाप अशीं लक्षणें दिसतात.

रुपें
तासां सामान्यलक्षणम् ।
मुखशोषो जलातृप्तिरन्नद्वेष: स्वरक्षय: ॥
कण्ठौष्ठजिह्वाकार्कश्यं जिह्वानिष्कर्मणं क्लम: ।
प्रलापाश्चित्तविभ्रंशस्तृड्ग्रहोक्तास्तथाऽऽमया: ॥
मुखशोषादिकं तृड्ग्रहोक्तामयपर्यन्तं निर्दिष्टं तासां
तृष्णानां सामान्यलक्षणम् ।
तृड्ग्रहोक्ता: रोगानुत्पादनीयोक्ता: (हृ. सू.अ. ४/१०)
शोषाड्गसादबाधिर्यादय: । स. टीका सामान्यरुपमाह
तासामिति ।
तृड्ग्रहोक्ता: ``शोषाड्गसादबाधिर्यसम्मोहभ्रमहृद्गदा:''
तृष्णाया निग्रहात् (हृ.सू.अ.४/१०) इत्युक्ता: ।
वा.नि. ५-४८,४९ आ.र. टीकेसह. पान ४८३

सर्वदेहभ्रमोत्कम्पतापतृड्दाहमोहकृत् ।
वा.नि. ५-४६ पान ४८३

सुश्रुतानें सांगितलेलीं पूर्वरुपांतील लक्षणें विशेष व्यक्त स्वरुपांत प्रगट होतात. तोंड कोरडें पडतें. पाणी पिऊन समाधान होत नाही. अन्न नकोसें वाटतें. आवाज ओढल्यासारखा होतो. कंठ, जिह्वा या अवयवांना खरखरीतपणा येतो. अंग गळून गेल्यासारखें वाटतें. ऐकूं येत नाहीं (स्पर्श समजत नाहीं) अंधारी येतें. व्याधीचें स्वरुप गंभीर असल्यास बडबडणें, चित्त ताळ्यावर न राहाणें, चक्कर येणें, हृदयामध्यें शूल उप्तन्न होणें. सर्वागांत कोरडेपणा जाणवणें, जीभ बाहेर पडणे अशीं लक्षणें होतात.

वातज तृष्णा
निद्रानाश: शिरसो भ्रमस्तथा शुष्कविरसमुखता च ।
स्त्रोतोऽवरोध इति च स्यालिड्गं वाततृष्णाया: ॥
च.चि. २२-१२ पान १३०९

शुष्कास्यता मारुतसंभवाया तोदस्तथा शंखशिर:सु चापि ॥
स्त्रोतोनिरोधो विरसं च वक्त्रं शीताभिरद‍भिश्च विवृद्धिमेति ॥
वातजतृष्णालक्षणमाह - शुष्कास्यता मारुतसंभवायामित्यादि
शुष्कास्यता मुखशोष: । शड्खशिर:स शड्खयो: शिरसि चेत्यर्थ: ।
स्त्रोतोनिरोध: कर्णस्त्रोतोनिरोध: । विरसं विरुद्धरसम् ।
एति प्राप्नोति । केचित् `शुष्कास्यता' इत्यत्र `क्षामास्यता'
इति पठित्वा वक्तुं चर्वयितुं चासामार्थ्यमिति व्याख्यानयन्ति ।
`शड्खशिर:सु चापि' इत्यत्र `शड्खशिरोगलेषु' इति केचित् पठन्ति ।
सटीक सु.उ. ४८-८ पान ७५१

तोंड कोरडें व बेचव होतें. झोंप येत नाहीं. डोक्यामध्ये फिरल्यासारखें होतें. शंख शिर, या ठिकाणीं वेदना होतात. ऐकूं येत नाहीं. बोलणें आणि चावणें या क्रिया नीट करतां येत नाहींत. घसा दुखतो. गार पाण्यानीं तहान वाढते अशी लक्षणें होतात.
=================
पित्तज तृष्णा
पित्तं मतमाग्नेयं कुपितं चेत्तापयत्यपां धातुम् ।
संतप्त: स हि जनयेतृष्णां दाहोल्बणां नृणाम् ॥
तिक्तास्यत्वं शिरसो दाह: शीताभिनन्दिता मूर्च्छा ।
पीताक्षिमूत्रवर्चस्त्वमाकृति: पित्ततृष्णया: ॥
पित्तमित्यादिना पित्तजामाह - । शरीरसंख्याशारीरे
पित्तमाप्यमुक्तं `यद्‍द्रवसरस्निग्धमन्दमृदुपिच्छिलं रस-
रुधिरवसाकफपित्तमूत्रस्वेदादि तदाप्यं रसो रसनं च'
(शा.अ.७) इत्यनेन, तथा तत्रेव `यत्पित्तमूष्मा यो,
या च शरीरे भा:, तत्सर्वमाग्नेयम् इत्यनेन द्वयात्मकत्वं
पित्तस्य यद्यप्युक्तं, तथाऽप्याग्नेयाकारत्वाद्‍ बाहुल्यात् पित्त-
माग्नेयमेवेति दर्शयन्नाह - पित्तं मतमाग्नेयमिति; द्वयात्मकत्वे
ऽपि च पित्तस्याग्नेयांशप्रधान्यात्; अन्यत्रापि सौम्याग्नेय
वायव्यविकारभेदे पैत्तिकविकारा आग्नेयत्वेन गृहीता एव ।
संतप्त: स हीति स अब्धातु: संतप्त: ।
`संतप्तं हि' इति पाठपक्षे पित्तमेव जनयेदिति योज्यम् ।
यदाऽब्धातुर्जनयति तदा पित्तसंतप्त एव जनयतीति पित्तस्यैव
कर्तृत्वम् ।
सटीक च.चि. २२-१३, १४ पान १३०९

पित्तान्मूर्च्छास्यतिक्तता ।
रक्षेक्षणत्वं प्रततं शोषो दाहोऽतिधूमक: ॥
वा.नि. ५-५१ पृ. ४८३

अग्निगुणप्रधान पित्तामुळें अप्‍धातु संतप्त होतो व त्यामुळें जी तृष्णा उत्पन्न होते तिच्यामध्यें उष्णता व दाह हीं लक्षणें विशेष असतात. तसेंच तोंड कडू पडतें, डोक्यामध्यें आग होते. गार पदार्थ हवेसें वाटतात, कोरड अति प्रमाणांत व सतत असते डोळे, मूत्र, मल, त्वचा पीतवर्ण होतात; डोळे लाल होतात. तोंडातून वाफा येतात. (घुसमटल्यासारखें होतें), मूर्च्छा येते. आप्य म्हणुन जरी पित्ताचा क्वचित् उल्लेख असला तरी मुख्यत्वे पित्त हें अग्नेयच आहे. असें टीकाकाराने म्हटलें आहे.

तीक्ष्णोष्णरुक्षभावान्मद्यं पित्तानिलौ प्रकोपयति ।
शोषयतोऽपां धातुं तावेव हि मद्यशीलानाम् ॥
तप्तास्विव सिकतासु हि तोयमाशु शुष्यति क्षिप्तम् ।
तेषां संतप्तानां हिमजलपानाद्भवति शर्म ॥
च.चि. २२-२१, २२ पान १३११

मद्यपानामुळें उत्पन्न होणारीं तृष्णा ही पित्तप्रधान तृष्णाच असते. मद्य हें आपल्या तीक्ष्ण, उष्ण, रुक्ष गुणानें पित्त वातांचा प्रकोप करते व त्यामुळें अप्‍ धातूचें शोषण तृष्णा उप्तन्न होते. तापलेल्या वाळूवर टाकलेलें पाणी, टाकलें होते कां नाहीं असें वाटावें त्याप्रमाणें या तृष्णेनें होतें. पाण्यानें येथें ओलावाहि उत्पन्न होत नाहीं, थंडगार पाणी प्याल्यानें क्षणमात्र (थोडेसें) बरें वाटतें.

उष्णक्लान्तस्य सहसा शीताम्भो भजतस्तृषम् ।
ऊष्मा उर्द्धो गत: कोष्ठं यां कुर्यात्पित्तजैव सा ॥
वा.नि. ५-५५ पान ४८४

शिशिरस्नातस्योष्मा रुद्ध: कोष्ठं प्रपद्य तर्षयति ।
तस्मान्नोष्णक्लान्तो भजेत सहसा जलं शीतम् ॥
शीतस्नानजामन्तर्भायवयन्नाह - शिशिरेत्यादि ।
शिशिरं शीतम् । ऊष्मा रुद्ध इति शीतस्पर्शजलेन
बहिनिर्गच्छन् रोमकूपैरुष्माऽवरुद्ध: प्रतीपिकृत:;
एतेनस्यापि पित्तजत्वमुक्तम् ।
सहसेत्यनेने विश्रम्य शीतजलसेवायां न तथाविधा
तृष्णां भवतीति दर्शयति ।
सटीक च. चि. २२-२३ पान १३११

उष्णतेमुळें त्रस्त झाल्यावर त्याच स्थितींत लगेच गार पाण्यानें एकदम स्नान केलें असतां त्वचेंतील स्वेदवहस्त्रोतसें संकोचित होतात व त्यांच्या रोधामुळें अग्नि कोष्ठामध्यें कोंडला जाऊन उत्पन्न करतो.
==========================
आमजा तृष्णा
तृष्णा याऽमप्रभवा साऽप्याग्नेयाऽऽमपित्तजनितत्वात् ।
लिड्गं तस्याश्चारुचिराध्मानकफप्रसेकौ च ॥
तृष्णेत्यादिनाऽऽमजामाह - । आमशब्देन चेह लक्षणया
आमसमानचिकित्सित आमसमान लक्षणश्च कफोऽपि गृह्यते
तेनामभवाया: व्युत्पादनेन कफजाऽपि सुश्रुतोक्ता गृहीतैवेह ।
साऽप्याग्नेयेत्यनेन पूर्वपरिज्ञातं सर्वासां वातपित्तजन्यत्वं
समुन्नयति । वातश्च तृष्णाकारणत्वेनोक्तोऽप्यत्राप्रधानं,
पित्तमेव तु प्रधानमितीह वाताकथनादुन्नीयते ।
अन्यत्राप्युक्तं - `दर्शनं पक्तिरुष्मा च क्षुतृष्णा देहमार्दवम् ।
प्रभाप्रसादौ मेधा च पित्तकर्माविकारजं' (सू.अ. १८)
इति । आमपित्तजनितत्वादित्यर्थ: ।
सटीक च.चि. २२-१५ पान १३१०

कफावृताभ्यामनिलानलाभ्यां कफोऽपि शुष्क: प्रकरोति तृष्णाम् ।
निद्रा गुरुत्वं मधुरास्यता च तथाऽर्दित: शुष्यति चातिमात्रम् ॥
कण्ठोपलेपो मुखपिच्छिलत्वं शीतज्वरश्छर्दिररोचकश्च ।
कफात्मिकायां गुरुगात्रता च शाखासु शोफस्त्वविपाक एव ॥
एतानि रुपाणि भवन्ति तस्यां तयाऽर्दित: काड्क्षति नाति चाम्भ: ॥
सु.उ. ४८-१०, ११ पान ७५१

त्रिदोषलिड्गाऽऽमसमुद्भवा च हृच्छूलनिष्ठीवनसादयुक्ता ॥
आमजतृष्णालक्षणमाह - त्रिदोषलिड्गामसमुद्भवेत्यादि ।
त्रिदोषलिड्गा दोषत्रयलिड्गयुक्ता, अजीर्णतो दोषत्रयकोपात् ।
निष्ठीवनं थुग्‍थुगिका । साद: अड्गग्लानि: ।
सटीक सु.उ. ४८-१४

स्निग्धं तथाऽम्लं लवणं च भुक्तं गुर्वन्नमेवातितृषां करोति ॥
भक्तजतृष्णालक्षणमाह-स्निग्धं तथाऽम्लमित्यादि ।
तृषां तृष्णाम् । एषा कफात्, वातपित्ते तु सर्वास्वपि कारणे ।
सटीक सु.उ. ४८-१४५ पान ७५१ - ५२

गुर्वन्नपय: स्नेहै: संमूर्च्छद्भिर्विदाहकाले च ।
यस्तृष्यतेद्‍ वृतमार्गे तत्राप्यनिलानलौ हेतु ॥
च.चि. २२-२०, पान १३१०-११

गुरु, स्निग्ध, अम्ल, लवण असें अन्न अधिक प्रमाणांत सेवन केलें असतां अन्नाचा विदाह होऊन तृष्णा उत्पन्न होते. या स्थितींत अरुचि, आध्मान, हृदशूल, थकवा वाटणें व कफप्रसेक हीं लक्षणें उत्पन्न होतात. अन्नाचा आम तयार झाल्यास त्यानें कफाचा प्रकोप होतो. हा कफ वात पित्तानें रुद्ध होऊन शुष्क होतो व त्यामुळें उत्पन्न झालेल्या स्त्रोतोरोधानें तृष्णा उत्पन्न होते. या स्थितींत तोड गोड व चिकट होते. झोप येते, अंग जड झाल्यासारखें वाटतें, घशामध्ये कफ चिकटल्यासारखा वाटतो. उलटी होते, तोंडाला चव नसते, थंडी वाजून ताप भरल्यासारखा वाटतो. कफाचा प्रकोप अधिक असल्यास अवयव जड होतात व हातापायावर सूज येते. अन्न पचत नाहीं. एका वेळीं फार पाणी प्यावेसें वाटत नाहीं.
============================
कफज तृष्णा
सुश्रुताच्या टीकाकारानें उल्लेखिल्याप्रमाणें माधवनिदानकारानें कफज तृष्णा वेगळ्या पाठभेदानें वर्णिली आहे.

बाष्पावरोधात्कफसंवृतेऽग्नौ तृष्णा बलासेन भवेत्तथा तु ।
निद्रा गुरुत्वं मधुरास्यता च तृष्णार्दित: शुष्यति चातिमात्रम् ॥
श्लेष्मजामाह - बाष्पेत्यादि । स्वकारणकुपितेन कफेनो-
परिष्टादाच्छादितेऽन्तरग्नौ कफावरुद्धबाष्पेण पावकोष्मणाऽ
धोगतेनाम्बुवहस्त्रोत:शोषणात् कफजा तृष्णा भवति ।
ननु कफजा तृष्णाऽनुपपन्ना ? कफस्य वृद्धस्य केवलं-
द्रव्यस्य पिपासाकर्तृत्वायोगात्, वातपित्तयोरेव तृष्णाकर्तृत्वे-
नोक्तत्वात् ।
यदुक्तं,-पित्तं सवातं कुपितं नराणां' इत्यादि चरकेप्युक्तं, -
नाग्नेर्विना तर्ष: सवातं कुपितं नराणां' इत्यादि चरकेप्युक्तं,-
नाग्नेर्विना तर्ष: पवनाद्वा, तौ हि शोषणे हेतू'
(च.चि.स्था.अ.२२) इति । सुश्रुतेऽप्युक्तं, -
``मद्यस्याग्नेयवायव्यगुणावम्बुवहानि तु ।
स्त्रोतांसि शोषयेयातां ततस्तृष्णा प्रजायते (सु.उ.तं.अ.४७) इति ।
अत आह-तथेति । उक्तप्रकारेण कफादग्नेर्बाष्पावरोधादिना,
नतु स्वगुणेन; अत एव चरके कफजा तृष्णा न पठितैव,
सुश्रुतेन तु चिकित्साभेदार्थ पठिता, हारितेनापि सपत्तेनैव
श्लेष्मणा तृष्णा पठिता न तु केवलेन ।
यदाह - `` स्वाद्वम्ललवणार्जीणै: कुद्ध: श्लेष्मा सहोष्मणा ।
प्रपद्याम्बुवहं स्त्रोतस्तृष्णां संजयनेद्‍नृणाम् ॥
शिरसो गौरवं तन्द्रा माधुर्यं वदनस्य च ।
भक्तद्वेष: प्रसेकश्च निद्राधिक्यं तथैव च ॥
एतेर्लिड्गैर्विजानीयात्तृष्णां कफसमुद्‍भवाम्-इति ।
मा.नि. तृष्णा ५ म. टीकेसह पान १५८

कफ स्वत:च अवगुणात्मक व द्रव असल्यामुळें तो स्वत: स्वतंत्रपणें तृष्णा रोग उत्पन्न करुं शकत नाहीं. चरकानेंहि यामुळेंच कफज तृष्णा सांगितलेली नाहीं. पित्त व वात हे दोन दोषच तृष्णेच्या उत्पत्तीस कारणीभूत असतात.प्रकुपित झालेल्या कफामुळें अग्नीचा अवरोध होतो व त्यामुळें पुढें तृष्णा उत्पन्न होते.हारितादि ग्रंथकारांनीं यामुळेंच कफाबरोबर पित्ताचाहि उल्लेख केला आहे. कफानें अवरुद्ध झालेल्या अग्नीचा परिणाम म्हणून ज़री शोष हें लक्षण उत्पन्न होत असलें तरी सर्व शरीरभर दिसणारीं लक्षणें मात्र वर उल्लेखिल्याप्रमाणें कफप्रधान असतात. आमज तृष्णेच्या वर्णनांत ही लक्षणें आलीच आहेत.
==================
क्षयजा तृष्णा
देहो रसजोऽम्बुभवो रसश्च तस्य कयाच्च तृष्येत्तु ।
दीनस्वर: प्रताम्यन्संशुष्कहृदयगलतालु: ॥
देहो रसज इत्यादिना क्षयजामह ।
आहाररसात् सर्वधातुपोषको धातुरस उत्पद्यते, स च
रसो देहपोषकोऽम्बुभव इति आप्य इत्यर्थ ।
तस्य क्षयादिति रसक्षयात् तृष्यते, रसक्षयादम्बुक्षयो
भवति, तेन चाम्बुक्षयेण पुरुष: पानीयप्रार्थनारुपतृष्णया
युक्तो भवतीति युक्तमिति दर्शयति उक्तं हि
सुश्रुते `दोषधातुमलक्षीणो बलक्षीणोऽपि मानव: ।
स्वयोनिवर्धनं यत्तदन्नपानं प्रकांक्षति (सू.स्. अ. १५) इति ।
इहापि चोक्तम् `तस्य क्षयाच्च तृष्येत्तु इति ।
सटिक. च.चि. २२-१६ पान १३१०

रसक्षयाद्या क्षयजा मता सा तयाऽर्दित: शुष्यति दह्यते च ।
अत्यर्थमाकाड्क्षति चापि तोयं तां सन्निपातादिति केचिदाहु: ॥
रसक्षयोक्तानि च लक्षणानि तस्यामशेषेण भिषग्व्यवस्येत् ॥
रसक्षयाच्च क्षयजेत्यादि । मता कथिता । आकाड्क्षति
अभिलषति । तां सन्निपातादिति तदनुपशयात् ।
परमतमप्रतिषिद्धम् अनुमतं । रसक्षयोक्तानि लक्षणानि
`रसक्षये हृत्पीडा कम्प: इत्यादीनि ।
`रसक्षयोक्तानि, इति केचित् पठन्ति ।
तस्यां क्षयजतृष्णायाम् । व्यवस्येत् जानीयात् ।
सटीक सु.उ. ४८-१३ पान ७५१

सर्व शरीराचे धातुसंतर्पण अप्‍प्रधान अशा रसामुळें होतें. हा रस ज्यावेळें लंघनादि कारणांनीं क्षीण होतो त्यावेळीं तृष्णारोग उप्तन्न होतो. यामध्यें स्वर क्षीण होतो, अंधेरी येते, छातीमध्यें ओढ लागते, उर, कंठ, तालु या ठिकाणीं कोरड पडते. रसक्षयाची इतर लक्षणेंहि दिसतात. कंप, ग्लानी, हृत्पीडा, श्रम, रुक्षता हे विकार होतात. व्याधी सान्निपातिक आहे असें कांहीं म्हणतात. कारण दिवसभर (सर्व दोषांच्या कालामध्यें) जलप्राशन केलें असतांहि या तृष्णेचा उपक्षम होत नाहीं.
====================

उपसर्गजा तृष्णा
भवति खलु योपसर्गात् तृष्णा सा शोषीणी कष्टा ।
ज्वरमेहक्षयशोषश्वासाद्युपसृष्टदेहानाम् ।
भवतीत्यादिनोपसर्गजामाह । उपसर्गदिति ज्वराद्युपद्रव्यात्,
ज्वराद्युपद्रवरुपतयेति यावत् । कष्टेति कष्टसाध्या ।
एवं प्राक्सूत्रितवातपित्तामाम्बुक्षयोपसर्गात्मिका: पञ्च तृष्णा
व्याहृता: ।
अत्रैव सुश्रुतोक्ता कफजा आमजायामवरुद्धा, क्षतजा
उपसर्गात्मिकायामवरुद्धा, अन्नजा चामजायामेवान्तर्भावनीया ।
सटीक च.चि. २२-१७ पान १३१०

क्षतस्य रुक्शोणितनिर्गमाभ्यां तृष्णां चतुर्थी क्षतजा मता तु ॥
तयाऽभिभूतस्य निशादिनानि गच्छन्ति दु:खं पिबतोऽपि तोयम् ॥
सु.उ. ४८-१२ पान ७५१

दीर्घरोगोपर्सगत:
वा.नि. ५-५७

निरनिराळ्या व्याधींनीं पीडित झाल्यामुळें तृष्णा हा रोग उत्पन्न होतो. पुढील व्याधींमध्यें तृष्णा हा उपद्रव प्रामुख्यानें आढळतो. ज्वर, प्रमेह, राजयक्ष्मा व्यवायषोदादिविकार, श्वास, कास, अतिसार, ग्रहणी, प्रवाहिका, इतरहि चिरकालानुबंधी विकारांत तृष्णा होते. ही उपद्रवीभूत तृष्णा कष्टदायक असते. सुश्रुतानें व्रणामुळें होणारी तृष्णा वर्णन केली आहे. चरकाच्या टीकाकाराच्या मताप्रमाणें ती उपसर्गज होय. व्रणाच्या वेदनामुळें व अतिरक्तस्त्राव झाल्यामुळें, तृष्णा उत्पन्न होते. रोगी रात्रंदिवस अस्वस्थ असतो.

वृद्धी-स्थान-क्षय

तृष्णा वाढली असतां पाणी पिऊन पोट फुगलें तरी मुख-कंठाचा शोष जात नाहीं. शिर:शूल, श्वास, कास, भ्रम हीं लक्षणें वाढत जातात. वरचेवर पाणी पिण्याची इच्छा कायम रहाते.

लिंगानां लाघवं अपाय: ।

तृष्णेमध्यें उल्लेखिलेल्या लक्षणांची तीव्रता कमी होत जाते व बरीचशी लक्षणें नाहींशीहि होतात. पाणी पिण्याची इच्छा कमी कमी होत जाऊन थोड्याशा पाण्यानेंहि तहान भागते.

उपद्रव
ज्वरो मोह: क्षय: कास: श्वासो बाधिर्यमेव च ।
बहिर्निर्गतजिह्वत्वं सप्तैते तृडुपद्रवा: ॥
यो.र. तृष्णा पान ३९४.

ज्वर, मोह, क्षय, कास, श्वास, बाधिर्य, जीभ बाहेर येणें हे विकार तृष्णेचे उपद्रव म्हणून होतात.

उदर्क
(बाधिर्य) बहिरेपणा, स्वरभेद, कास.

साध्यासाध्य विवेक
बहुतेक तृष्णा सामान्यत: साध्य आहे.

सर्वास्ततिप्रसक्ता रोगकृशाणां वमिप्रसक्तानाम् ।
घोरोपद्रवयुक्तास्तृष्णा मरणाय विज्ञेया ॥
च.चि. २२-१८ पान १३१०

ताल्वोष्ठकण्ठस्य तु तोददाहा: सन्तापमोहभ्रम: विप्रलापा: ।
सर्वाणि रुपाणि भवन्ति तासां मृत्युर्हि काले तु विशेषतो हि ।
क्षीणं विभिन्नं बधिरं तृषार्त विवर्जयेन्निर्गतजिह्वमाशु ॥
रो.य. तृष्णा. पान ३९४

तृषा, सारखी वाढत असेल, सारख्या उलटया होत असतील, (रसक्षय मूर्च्छा यासारखे) घोर उपद्रव उत्पन्न होतील, कंठ, तालु, ओष्ठ यामध्यें दाह व शूल उत्पन्न होईल, सर्व शरीर संतप्त होईल. मोह, भ्रम, प्रलाप हीं लक्षणें असतील, रोगी अत्यंत कृश होईल, बहिरेपणा येईल, जीभ बाहेर पडेल वा तृष्णेची म्हणून सांगितलेली सर्वच्या सर्व रुपें प्रकट होतील तर तृष्णा हा व्याधी असाध्य होतो लिंगाना लाघवं अपाय: या वचनाचा टीकाकाराने एक वेगळाच अर्थ सुचविला आहे तो असा `सर्व लक्षणें त्वरित उत्पन्न झाली तर मृत्यु येतो' कांहीवेळां तृष्णेत असे घडते हे खरे त्यामुळें लक्षणोत्पत्ति त्वरित होणें हे असाध्यतेचे निदानपक्षीं कष्टसाध्यतेचे तरी द्योतक आहेच.

चिकित्सा सूत्रे
तृष्णातिवृद्धावुदरे च पूर्णं संछर्दयेन्मागाधिकोदेन ।
विलोमसंचारहितं विधेयं स्याद्‍दाडिमाम्रातकमातुलुड्गै: ।
सुवर्णरौप्यादिभिरग्नितप्तैर्लोष्टै: कृतं वा सिकतोपलैर्वा ।
जलं सुखोष्णं शमयेच्च तृष्णां सशर्करं क्षौद्रयुतं हिमं वा ।
मधुयुक्तं जलं शीतं पिबेदाकण्ठमातुर: ।
पश्चाद्वमेदशेषं तत् तृष्णा तेन प्रशाम्यति ॥
यो.र. तृष्णा पान ३९४, ३९५.

सिद्धेऽम्भस्यग्निनिभां कृष्णमृदं कृष्णसिकतां वा ।
तप्तानि नवकपालान्यथवा निर्वाप्य पाययेताऽच्छम् ।
च.चि. २२-५४ पान १३१३.

तृष्णेसाठीं मध व पाणी आकंठ पिऊन ओकावें किंवा पिप्पली सिद्ध जलाचें वमन द्यावें. दाडिम, (आंबाडा) महाळुंग या द्रव्यांनीं अनुलोमन करावें. काळीं माती वा नवीन कोरें खापर लाल होईपर्यंत तापवून पाण्यामध्यें विझवावें आणि वरील निव्वळ स्वच्छ पाणी पिण्यास द्यावें. सुवर्ण रौप्य तापवून पाण्यामध्यें पुन्हां पुन्हां विझवावें व तें पाणी साखर व मध घालून वरचेवर पिण्यास द्यावें.

द्रव्यें-द्राक्षा, दाडिम, आमलकी, यष्टीमधु, पिंपळी, सुंठ, निंबू. सूतशेखर, प्रवाळ, मौक्तिक, चंद्रकला, द्राक्षासव, उशीरासव.

आहार
फळरस, पन्ही,शीत जल, पेया, मंड.

पथ्यापथ
उष्ण सेवा व उष्ण अन्न वर्ज्य करावें.

N/A

References : N/A
Last Updated : July 22, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP