व्याख्या
प्रवाहमाणस्य प्रवाहिका
सु.उ. ४०-१३८ टीका
मल प्रवृत्तीच्या वेळीं पुष्कळ कुंथावें लागते म्हणून `प्रवाहण', `कुंथणें' ज्या व्याधीमध्यें विशेष असतें त्यास `प्रवाहिका' हें नांव दिलें आहे.
स्वभाव
बहुधा अदारुण व चिरकारी
मार्ग
अभ्यंतर मार्ग
प्रकार
वातज, पित्तज, कफज आणि रक्तज असे चार प्रकार होतात. चरकामध्यें प्रवाहिका असा स्वतंत्र व्याधी उल्लेखिलेला नाहीं. वातकफामुळें उत्पन्न होणारा अतिसाराचाच तो एक अवस्था-विशेष मानलेला आहे. त्यामुळें चिकित्सा सांगत असतांना या अवस्थेचा चरकानें उल्लेख केला आहे. स्वरुपभेदामुळें प्रवाहिका निस्तानिका असा एक पर्याय शब्द देतो.
अ.सं.सू. ६ पान ४१
निदान
अतिसाराप्रमाणें विशेषत: अध्यशन, अजीर्ण, दुष्ट असें अन्नपान हीं कारणें प्रवाहिका व्याधी उत्पन्न करतात. रुक्ष, स्निग्ध, अशीं द्रव्यें एकदम सेवन केलीं असतांहि प्रवाहिका हा व्याधी होतो.
संप्राप्ति
वायु: प्रवृद्धो निचितं बलासं नुदत्यधस्तादहिताशनस्य ।
प्रवाहतोऽल्पं बहुशो मलाक्तं प्रवाहिकां तां प्रवदन्ति तज्ज्ञा: ॥
अथ द्रवसरणादामपक्वलक्षणयोगात्प्रवाहिकातीसारयो: साधर्म्य,
अतोऽतीसाराधिकारे प्रवाहिकासंप्राप्तिमाह - वायुरित्यादि ।
अतीसारे नानाविधद्रवधातुसरणं, प्रवाहिकायां तु कफमात्रसरणमिति मेद: ।
निचितं बलासमहिताशनस्य संचितं कफं, मलाक्तं पुरीषसहितं, वायुर्वात:,
अधस्तान्नुदति गुदेन पातयति ।
प्रवाहत; प्रवाहणं कुर्वत: । भोजादौ त्वियं विस्त्रंसीति नाम्ना पठयते,
पराशरे त्वन्तर्ग्रन्थिरिति, हारीतस्तु निश्चारकाख्यामेतां पठति ।
यदाह - `प्रवाहिकेति सा ज्ञेया कैश्चिन्निश्चारकस्तु स:'' इति ।
मा.नि. अतिसार २१ - म. टीकेसह पान ७९-८०
पक्वाशयाच्या उत्तर भागामध्यें संचित झालेला कफ प्रकुपित वायुमुळें बलानें खालीं ढकलला जातो, कफ हा चिकट असल्यामुळें तो लवकर सुटत नाहीं. त्यामुळें बरेंअ कुंथल्यानंतर थोडीशीं मलप्रवृत्ति होते.
उद्भव
क्लेदक कफ व अग्नीची दुष्टी होऊन आमाशयांत उद्भव होतो. पक्वाशय हें अधिष्ठान आहे. व्याधीचा संचार अंबुवह स्त्रोतसांना व्यापून असतो.
पूर्वरुपें
पक्वाशय भागीं शूल `कृतेऽपि अकृतसंज्ञता'
रुपें
नाभीच्या अधोभागीं शूल, खूप कुंथावें लागणें, मलप्रवृत्तीमध्यें मलाचा जवळ जवळ अभावच असणें, मल बेडका थुंकल्याप्रमाणें केवळ कफयुक्त असणें, वरचेवर मलप्रवृत्ती होणें, मलप्रवृत्ती झाली तर पुन्हां होईल असें वाटणें, पिंडिकोद्वेष्टन अशीं लक्षणें होतात.
प्रवाहिका वातकृता सशूला पित्तात् सदाहा सकफा कफाच्च ॥
सशोणिता शोणितसंभवा तु ता: स्नेहरुक्षप्रभवा मतास्तु ॥
तासामतीसारवदादिशेच्च लिड्गं क्रमं चामविपक्वतां च ॥
वातादिभेदेन प्रवाहिकामाह - प्रवाहिका वातकृतेत्यादि ।
स्नेहरुक्षप्रभवा इति स्नेहरुक्षाभ्यां प्रभवो यासाम तास्तथा,
एतच्च प्रायिकम् । ता: प्रवाहिका: । तासामित्यादि ।
तासां प्रवाहिकाणां; यद्यपि वातादिभेदेन प्रागेव प्रवाहिकाणां
लक्षणमुक्तं तथाऽप्यतीसारवदादिशेच्च लिड्गमित्यभिधान-
मधिकलिड्गज्ञापनार्थम् । क्रमं कियाक्रमम् । आमविपक्वताम्
आमतां विपक्वतां चेत्यर्थ: ।
सटिक सु. ४९.१३९ पान ७०६
वातज प्रवाहिका
विबद्धमतिसार्यते सशूलपिच्छमल्पाल्पं बहूश: स प्रवाहिकम् ।
च.चि. १९-३४
प्रवाहण व शूल हीं लक्षणें जास्त असतात. मलप्रवृत्तींतून पडणारा कफ फेनिल असतो
पित्तज प्रवाहिका
मलप्रवृत्तीचे वेळीं दाह व तृष्णा हें लक्षण असतें. मलप्रवृत्तीचे वेळीं पडणारा कफ अल्प, द्रव व पीतवर्ण असतो.
कफज प्रवाहिका
मलप्रवृत्तीचे वेळीं पडणारा कफ घन, गुरु, पिच्छिल व प्रभूत असतो.
रक्तज प्रवाहिका
सरक्तपिच्छ: ------ ।
च.चि. १९-५१३
मलप्रवृत्तेचे वेळीं सरक्त व सकफ अशी प्रवृत्ति होते. थकवा लवकर येतो, तहान लागते.
वृद्धि स्थान क्षय
व्याधि वाढला तर मलाचें प्रमाण व वेगांची संख्या वाढते. पिंडिकोव्देष्टन व रसक्षयाची लक्षणें व्यक्त होतात.
प्रवाहिका हा अतिसारापेक्षां चिरकारी स्वरुपाचा व्याधी आहे. बरेंच दिवसपर्यंत सकफ (वा सरक्त) अशी मलप्रवृत्ती शूलयुक्त होत रहाते. प्रवाहणहि करावें लागतेंच. व्याधी कमी होत जाईल तशी `कृतेऽपि अकृत संज्ञता' हें लक्षण नाहीसें होत जातें. फार कुंथावें लागत नाहीं. मल प्रकृत होऊं लागतो.
निवृत्तीचीं लक्षणें
अतिसाराप्रमाणेंच.
उपद्रव
पांडु, गुदभ्रंश, अतिसार, यकृत्प्लीहावृद्धि उदर (छिद्रोदर) गुल्म.
उदर्क
गुदभ्रंश, शूल, अग्निमांद्य, यकृत्वृद्धि, कुक्षिशूल
साध्यासाध्य विवेक
रस क्षयाचीं लक्षणें दिसूं लागल्यास व्याधि असाध्य होतो व लक्षणांचा विचार अतिसाराप्रमाणेंच असतो. विशेषत: `असंवृतगुदता' अंगमर्द, तृष्णा, कुक्षीशूल, बहुवेग हीं लक्षणें प्रवाहिकेची असाध्य लक्षणें होत.
रिष्ट लक्षणें
अतिसाराप्रमाणेंच-विशेषत: रसक्षय, सर्वांगशोथ, मूर्च्छा, पांडु ही होत.
चिकित्सासूत्रें
अतिसाराच्या आमावस्थेमध्यें ग्राही औषधें देऊं नयेत असा निषेध सांगितला आहे. दोष बाहेर जाणें अवश्यक ग्राही स्तंभन औषधानें ते शरीरांतच राहिल्यास शोथ, पांडु, प्लीहा, यकृत, यांची दुष्टी कुष्ठ, गुल्म, उदर, ज्वर, दंडालसक, आध्मान, ग्रहणी, अर्श असे व्याधी उत्पन्न होतात म्हणून सांगितलें आहे.
(च.चि. १९-२०)
आमावस्थेंमध्यें अनुलोमन वा विरेचन औषधें देण्यास जी परिस्थिती असावी लागते तिचें वर्णन करतांना मलप्रवृत्तीला अनुलक्षून स्तोकं स्तोकं, विबद्धं, सपिच्छं, मुहुर्मुहु: असे शब्द वापरले आहेत. हें लक्षांत घेतलें म्हणजे अतिसारापेक्षां `प्रवाहिका' या व्याधीसच अनुलक्षून ही शोधनाची चिकित्सा सांगितली असली पाहिजे असें वाटतें. चरकानें प्रवाहिका असा वेगळा व्याधी सांगितला नसल्यानें, त्यानें अतिसार या व्याधीचें विशिष्ट स्वरुप गुदेन बहु द्रव सरणं अतीसार: प्रवाहिकायां तु कफमात्रनि:सरणं । (मा.नि.म.टीका) लक्षांत घेतलें नसणें स्वाभाविक आहे. आज आपण सुश्रुत, माधवनिदानादि ग्रंथकाराप्रमाणें प्रवाहिका हा वेगळा व्याधी मानीत आहोंत. स्वाभाविकच आमवस्थेंत संग्रहण देऊं नये; अनुलोमन द्यावें; हें चिकित्सासूत्र अतिसारापेक्षांहि विशेषेंकरुन प्रवाहिके करितांच सांगितलें आहे असें अधिक निश्चितपणें म्हणूं शकतो. दोष दूष्य व संप्राप्तीचा विचार करितां तें योग्य असेंच आहे. पक्वाशय हें प्रवाहिकेचें अधिष्ठान आहे. मूत्ररुपानें जलाचें शोषण या ठिकाणींच होत असतें. कफ हा द्रव धातू दुष्ट होऊन या ठिकाणीं संचित होतो. तो जर शोधनानें निघून गेला नाहीं तर रस गत होऊन सर्व शरीरांत नानाविध विकृती उत्पन्न करतो. कफाच्या स्निग्ध, पिच्छिल स्त्यान गुणांमुळें त्याचें स्वभावत:च शोधन होणें हें फार अवघड असते. संप्राप्तींतील महत्त्वाचा घटक वायू कफ बाहेर काढून टाकण्यास प्रवाहणरुपांत प्रेरणा देत असला तरी वायूच्या रुक्ष गुणानें कफाची स्त्यानता वाढण्यासच मदत होत असते. दुष्ट कफाचें शोधन झालें नाहीं म्हणजे अवयवहि अधिकाधिक दुष्ट होत जातो आणि संचितदोष सर्व शरीरभर निरनिराळ्या स्वरुपाच्या विकृती उत्पन्न करतात त्याची यादी वर उल्लेखिलेली आहेच. यासाठीं एरंडस्नेह, हरीतकी, पिच्छाबस्ती यांचा उपयोग करावा.
विबद्धवातवर्चास्तु बहुशूलप्रवाहिक: ।
सरक्तपिच्छस्तृष्णार्त: क्षीरसौहित्यमर्हति ॥
च.चि. १९-५१ पान १२७६
अल्पाल्पं बहुशो रक्तं सशूलमुपवेश्यते ।
यदा वायुर्विबधश्च कृच्छ्रं चरति वा न वा ॥
पिच्छाबस्तिं तदा तस्य यथोक्तमुपकल्पयेत् ॥
प्रपौण्डरीकसिद्धेन सर्पिषा चानुवासयेत् ॥
प्रायशो दुर्बलगुदाश्चिरकालातिसारिण: ।
तस्मादभीक्ष्णशस्तेषां गुदे स्नेहं प्रयोजयेत् ॥
च.चि. १९-९७, ते ९९ पान १२८०
स्वे स्थाने मारुतोऽवश्यं वर्धते कफसंक्षये ।
स वृद्ध: सहसा हन्यात्तस्मात्तं त्वरया जयेत् ॥
संप्रति सर्वातिसारेषु पक्वाशयव्यापकत्वेन वायुरवश्यं वृद्धो
भवति, स चाशुकारितया त्वरया जेतव्य इति दर्शयन्नाह
स्वे स्थाने इत्यादि । कफसंक्षयादित्यनेन कफसंक्षये रुक्ष-
शरीरतया वायु: कुप्यति, श्लेष्मशोणिते वृद्धे तदुपस्नेहित-
शरीरे वायुर्निवृत्तप्रसरो भवतीति ।
सटिक च. चि. १९-१२५ पान १२८३
मलप्रवृत्ती अडखळत होणें, शूल असणें, प्रवाहण करावे लागणें, मलाचें स्वरुप सरक्त व पिच्छिल असणें अशा स्थितींत यथेच्छ दूध प्यावें. हें दूध शक्यतो वातघ्न द्रव्यांनीं सिद्ध केलेलें असावें. या स्थितीमध्यें पिच्छाबस्तीचाहि उपयोग होतो. पुष्कळ दिवसपर्यंत दिवसांतून अनेक वेळां मलप्रवृत्ती झाल्यामुळें गुदाला दुर्बलता येते त्यासाठीं गुदभागीं पिचु अभ्यंग अनुवासन या स्वरुपामध्यें स्नेहन करावें वातघ्न वा पित्तघ्न अशा द्रव्यांनीं सिद्ध केलेल्या तैलाचा वा घृताचा पिचु ठेवावा. यासाठीं चुक्र तैलाचा उपयोग चांगला होतो. शोधनादि उपायांनीं संचित कफ नष्ट झाल्यानंतर संप्राप्तिंतील मूळ प्रेरक वायू हा अधिक प्रकुपित होण्याची शक्यता असते. यासाठीं वाताचें शमन करणारे उपचार अवश्य अवलंबिले पाहिजेत.
धात्वन्तरोपमर्देद्धश्चलो व्यापी स्वधामग: ।
तैलं मन्दानलस्यापि युक्त्या शर्मकरं परम् ॥
वाय्वाशये सतैले हि बिम्बिसी नावतिष्ठते ।
वायुमपेक्ष्यान्ये पित्तश्लेष्मादयो - धात्वन्तरा:, तेषामुपमर्द:
अन्यथाभाव:, तेन इद्ध: - उद्धत:, चलो - वाय्वाख्य:, स
व्यापी-सकलशरीरव्यापनशीलोऽपि, स्वधामग: पक्वाशयस्य:
तत्राधिक्येन तस्य वृत्ते:, अस्यामवस्थायामस्याती-
सारिणस्तैलं मन्दानलस्यापि युक्त्या योगविशेषेण, परं-
अतिशयेन, शर्मकरम् रोगस्य दु:खहेतो: शमनात् ।
अपिशब्दात्किमु दीप्ताग्नरेतेसारिणो न सुखकरं भवति ?
अत्रैव हेतुमाह - वाय्वाशये - पक्वाशयाख्ये, सतैले बिम्बिसी-
प्रवाहिका, नावतिष्ठते स्थितिं न प्राप्नोति ।
सटीक वा.चि. ९-४६ पान ६५९
कफ पित्तांच्या विकृतीमुळें वायु प्रकुपित होतो. त्याची दुष्टी पक्वाशयामध्यें विशेषानें असली तरी तो चलगुणाचा व सर्व शरीराला व्यापणारा असा असतो. यासाठीं तैल प्रयोगानें त्याचें युक्तीनें शमन करावें. पक्वाशयाचें तेलानें पुरेसे स्नेहन केलें असतां बिंबिशी (प्रवाहिका) हा व्याधी तेथे राहूं शकत नाहीं.
कल्प
अतिसाराप्रमाणें.