व्याख्या
उदर हें शरीरांतील एका स्थूल अशा अवयवविशेषाला दिलेलें एक व्यावहारिक असें नांव आहे. वरती उरोस्थी व खालीं भगास्थि, मध्यें नाभी, व दोन्ही बाजूला कुक्षी पार्श्व यांचा पर्शुकांशीं असलेल्या संबंधापर्यंत पसरलेला जो दृश्य विभाग त्यास उदर असें म्हणतात. या `उदर' भागावरच विशेषत: उत्सेध उत्पन्न होतो म्हणून व्याधीलाहि `उदर' हें नांव प्राप्त झालें आहे.
स्वभाव
उदर हा व्याधी दारुण आहे. त्याचें वर्णन चरकानें व्याधि-वर्णनाच्या आरंभींच रोगी डोळ्यापुढें उभा राहील असें केलें आहे.
भगवन्नुदरैर्दु:खैर्द्दश्यन्ते ह्यर्दिता नरा: ।
शुष्कवक्त्रा: कृशैर्गात्रैराध्मातोदरकुक्षय: ॥
प्रनष्टाग्निबलाहारा: सर्वचेष्टास्वनीश्वरा: ।
दीना: प्रतिक्रियाभावाज्जहतोऽसूननाथवत् ॥
च.चि. १३-५, ६ पान ११३६
मार्ग
अभ्यंतर मार्ग.
प्रकार
पृथग्दोषै: समस्तैश्च प्लीहाबद्धक्षतोदकै: ।
संभवन्त्युदराण्यष्टौ -
च.चि. १३-२२ पान ११३७ - ३८
वातज, पित्तज, कफज, सान्निपातिक+दूष्योत्तर, प्लीहोदर+यकृतोदुदर, बद्धगुदोदर, छिद्रोदर, दकोदर, असे उदराचे आठ प्रकार आहेत.
हेतु अत्युष्णलवणक्षारविदाह्यम्लगराशनात् ।
मिथ्यासंसर्जनाद्रूक्षविरुद्धाशुचिभोजनात् ॥
प्लीहार्शोग्रहणीदोषकर्शनात् कर्मविभ्रमात् ।
क्लिष्टानामप्रतीकाराद्रौक्ष्याद्वेगविधारणत् ॥
स्त्रोतसां दूषणादामात् संक्षोभादतिपूरणात् ।
अर्शोबालकृद्रोधादन्त्रस्फुटनभेदनात् ॥
अतिसंचितदोषाणां पापं कर्म च कुर्वताम् ।
उदराण्युपजायन्ते मन्दाग्नीनां विशेषत: ॥
च.चि. १३-१२ ते १५ पान ११३७
अतिशय उष्ण, लवण, क्षार, विदाही, अम्ल, गरविषयुक्त, रुक्ष, विरुद्ध, अस्वच्छ, असें अन्न खाल्ल्यामुळें, पंचकर्मादींनीं शोधन झाल्यानंतर अन्नसेवनाचा विशिष्ट असा संसर्जन क्रम न पाळल्यामुळें, प्लीहा, अर्श, ग्रहणीदुष्टी, याचा परिणाम म्हणून शरीर वा शरीरावयव दुर्बल झाल्यामुळें, पंचकर्मादि उपचार योग्यत्या प्रकारानें न केल्यामुळें, निरनिराळ्या व्याधींनीं शरीर पीडित झाले असून त्यावर करावयाचे ते उपचार न केल्यानें, कोणत्याहि कारणांनीं शरीराचें रुक्षण झाल्यामुळें, वेगांचा रोध केल्यामुळें, आम, संक्षोम, अति पूरण (फार भरणें) अर्श, आगंतू शल्य, मलावष्टंभ, आंत्रस्फुटन व भेदन अशा कारणांनीं (उदराशीं संबद्ध असलेल्या) स्त्रोतसांची दुष्टी झाल्यामुळें, दोषांची संचिती शरीरांत अधिक झाल्यामुळें (पाप कर्मामुळे) विशेषत: अग्नि मंद असलेल्या व्यक्तीस उदर व्याधी उत्पन्न होतो. सर्व उदर रोगाचें सामान्य म्हणून हें निदान सांगितलें असले तरी प्रकारभेदानें विशेषविशेषरीत्या व्याध्युत्पत्तीस कारणीभूत होणारीं अपथ्यें यामध्येंहि समाविष्ट आहेतच.
संप्राप्ति
अग्निदोषान्मनुष्याणां रोगसड्घा: पृथग्विधा: ।
मलवृद्ध्या प्रवर्तन्ते विशेषेणोदराणि तु ।
मन्देऽग्नौ मलिनैर्भुक्तैरपाकाद्दोषसंचय: ।
प्राण्याग्न्यपानान् संदूष्य मार्गान्नू दध्वाऽधरोत्तरान् ॥
त्वड्मासान्तरमागत्य कुक्षिमाध्मापयेद् भृशम् ।
जनयत्युदरं ।
च.चि. १३-९ ते ११ पान ११३६
रुद्ध्वा स्वेदाम्बुवाहीनि दोषा: स्त्रोतांसि संचिता: ।
प्राण्याग्न्यपानान् संदूष्य जनयन्त्युदरं नृणाम् ॥
च.चि.१३-२० पान ११३७
उर्ध्वाधो धातवो रुद्ध्वा वाहिनीरम्बुवाहिनी: ।
प्राणाग्न्यपानान् सन्दूष्य कुर्युस्त्वड्मांससन्धिगा: ॥
आध्माप्य कुक्षिमुदरम् ।
वा.नि.१२-२ पान ५१३
रोगा: सर्वेऽपि मन्देऽग्नौ सुतरामुदराणि तु ।
अर्जीर्णान्मलिनैश्चान्नैर्जायन्ते मलसञ्चयात् ॥
वा.नि. १२-१ पान ५१३
यस्य वात: प्रकुपितस्त्वड्गमांसान्तरमाश्रित: ।
शोफं संजनयेत् कुक्षावुदरं तस्य जायते ॥
च.सू. १८-३८ पान २२७-२८
अग्निमांद्यामुळें व ग्रहणी या अवयवाच्या वैगुण्यामुळें शरीरामध्यें उत्पन्न होणारा रसधातु निर्मल शुद्ध स्वरुपामध्यें उत्पन्न होत नाहीं. त्यामुळें स्त्रोतसांतून रसाचें वहन चांगलें न झाल्यानें स्त्रोतसें हळूं हळूं अवरुद्ध होत जातात. आम आणि स्त्रोतोरोध यांच्या परस्परावलंबित्वानें शरीरांतील दोषांचा संचय वाढत जातो, त्याचा परिणाम प्राण, अग्नि आणि अपान, याच्यावर होऊन हे भाव विकृत होतात. स्वभावत:च त्यांच्या कर्मातहि वैगुण्य उत्पन्न होतें. त्यामुळें स्त्रोतोरोधाची प्रवृत्ती अधिक स्पष्ट होते. दोष ऊर्ध्व, अध, अशा सर्व स्वेदवह, अंबुवह स्त्रोतसांमध्यें संचित होऊं लागतात. व्याधीच्या स्वभावामुळें इतर अवयवांतील स्त्रोतसांपेक्षां उदरांतील स्त्रोतसांच्यावर विशेष परिणाम होतो व तेथें झालेल्या दोषसंचितीमुळें आध्मान, गौरव अशीं लक्षणें उदर, कुक्षी भागीं दिसूं लागतात. उदकवह स्त्रोतोदुष्टीचा परिणाम उदरांतील अभ्यंतर त्वचेवर झालेल्या परिणामामुळें उदरवृद्धि विशेष स्पष्ट होऊं लागते. संप्राप्तिदृष्टया शोथ आणि उदर यांचें साम्य आहे. शोथाचा स्थानसंश्रय हा बाह्य त्वचेमध्यें असतो तर उदराचा स्थानसंश्रय हा अभ्यंतर त्वचेच्या ठिकाणीं असतो. उदर रोगांतील दोषांचा त्वग्मांसांतराश्रय हा बाह्य नसून कुक्षींतील आहे आणि वायू हा त्याच्या सामान्य संप्राप्तींतील एक प्रेरक आहे. उदरव्याधीच्या प्रकारनिरपेक्ष अशा दोन अवस्था आहेत. पहिली अजातोदकावस्था व दुसरी जातोदकावस्था.
अजातोदकावस्था
अजातशोथमरुणं सशब्दं नातिमारिकम् ।
सदा गुडगुडायच्च सिराजालगवाक्षितम् ॥
नाभिं विष्टभ्य पायौ तु वेगं कृत्वा प्रणश्यति ।
हृन्नाभिवड्क्षणकटीगुदप्रत्येकशूलिन: ॥
कर्कशं सृजतो वातं नातिमन्दे च पावके ।
लोलस्याविरसे चास्ये मूत्रेऽल्पे संहते विषि ॥
अजाताम्बुलक्षणमाह - अजातशोथमित्यादि ।
नातिभारिकमिति नातिगुरुणा भारेण युक्तम् ।
नाभिं विष्टभ्येति नाभिं स्तम्भयित्वा ।
कृत्वा वेगमिति पुरीषवातवेगं कृत्वा, वात-
पुरीषं विसृज्येति यावत् । प्रणश्यतीति लीनं भवति ।
कर्कशमिति वेगवन्तं; सृजत् इति वातं सरत: ।
सटिक च. चि. १३-५५ ते ५७ पान ११४३
उदरामध्यें उदरस्थ स्त्रोतसांचा नुसताच क्षोभ होतो. दोषसंचिति होऊं लागते. वायूचें अनुलोमन कार्य विकृत होतें. अशा स्थितींत (प्रत्यक्ष जलसंचिति होण्यापूर्वी) जीं लक्षणें असतात ती अजातोदकावस्था या नांवानें सांगितलीं आहेत. या अवस्थेमध्यें उदरामध्यें जलसंचिति प्रत्ययास येत नाहीं. वर्ण किंचित् रक्त, कृष्ण, अरुण असा असतो. (विशेषत: उदरावरील त्वचेचा वर्ण) शोथ विशेष असत नाहीं, जडपणाहि तितकासा जाणवत नाहीं. पोटामध्यें नेहमी `गुडगुड' असा आवाज होतो. पोटावरील सिरांचीं जाळी स्पष्टपणें दिसतात. संचित झालेला वायू नाभि प्रदेशीं व आंत्र या अवयवामध्यें एक प्रकारचा स्तंभ (जखडले जाणें) उत्पन्न करुन त्या अवयवांना क्षुब्ध करतो. मधूनच वायूचे वेग येतात व गुदमार्गानें कर्कश आवाज करीत त्याचें नि:सरण होतें. वात संचित होऊन तो गतिमान होतो, त्यावेळीं हृदय, नाभि, वंक्षण (जांघा) कटी; गुद या अवयवांमध्यें वेदना उत्पन्न होतात. वाताचें अनुलोमन नीट होत नसल्यामुळें अल्पमुत्रता व मलबद्धता हीं लक्षणें उत्पन्न होतात. खा खा सुटते. अग्नि तितका मंद झालेला नसतो व तोंडाची चवहि विशेष गेलेली नसते.
हीं `अजातोकावस्था' वातोदर व क्वचित् `यकृत दाल्युदर या उदरांच्या प्रकार विशेषामध्यें जितकी स्पष्टपणें प्रत्ययास येते तितकी उदराच्या इतर प्रकारामध्यें स्पष्ट आढळत नाहीं. उदरांचे इतर जे प्रकार आढळतात ते बहुधा जातोदकावस्था आल्यावरच वैद्याकडे येतात. अजातोदकावस्थेंतील लक्षणांचा विचार करतां त्या सर्व लक्षणांच्यामागें वाताची विकृति महत्त्वाची असते असें दिसतें. अर्थात् इतर प्रकारच्या उदरामध्यें त्याच्या प्रतियोगितेमुळें वायूच्या विकृतीचीं लक्षणें व्यक्त स्वरुपांत न दिसणें स्वाभाविक आहे.
जातोकावस्था
उपेक्षितानां ह्येषां दोषा: स्वस्थनादप्रवृत्ता: परिपाकाद्द्रवी-
भूता: सन्धीन् स्त्रोतांसि चोपक्लेदयन्ति, स्वेदश्च बाह्येषु
स्त्रोतसु प्रतिहतगतिस्तिर्यगवतिष्ठमानस्तदेवोदकमाप्याययति,
तत्र पिच्छोत्पत्तौ मण्डलमुदरं गुरु स्तिमितमाकोठितम-
शब्दं मृदुस्पर्शमपगतराजीकमाक्रान्तं नाभ्यामेवोपसर्पति ।
ततोऽनन्तरमुदकप्रादुर्भाव: । तस्य रुपाणि कुक्षेरतिमात्र-
वृद्धि: सिरान्तर्धानगमनम्, उदकपूर्णदृतिसंक्षोभसंस्पर्शत्वं च ॥
च.चि. १३-४८ पान ११४१
कोष्ठादुपसेन्हवदन्नसारो नि:सृत्य दुष्टोऽनिलवेगनुन्न: ॥
त्वच: समुन्नस्य शनै: समन्ताद्विवर्धमानो जठरं करोति ॥
सु.नि. ७-६ पान २९५
साधारणां संप्राप्तिं दर्शयनाह - कोष्ठादित्यादि । अन्नसारो रस: ।
कोष्ठान्नि:सृत्येदि कोष्ठशब्देनाहारपाकाधारो रसदोष-
मूत्रपुरीषविभागाश्रयो ग्रहण्यभिधान उच्यते, तत्रैव साराख्य-
रसविभागात् ।
कथं पुनरेतत् कोष्टादन्त्राणां रन्ध्राभावादन्नरसस्य नि:सरणमित्याह
उपस्नेहवत् ।
नूतनघटादुपस्नेहो यथाऽणुभिर्बहि: स्त्रोतोभिर्बहि:स्त्रवद् दृश्यत तद्वत् ।
यद्येवं नित्यमेवोदराणां संप्राप्ति: प्राप्नोति, उपस्नेहेन सततमेवान्न-
रसस्य बहिर्निर्गमनात्; नैतदस्ति, उदरारम्भकदोषदूषित
शरीरस्य रसस्वेदाम्बुवहानां स्त्रोतसां दुष्टे; दुष्टेश्चैतेषां संवृत्त-
मुखत्वेन विनिवृत्तमुखत्वेन ।
सु. नि. ७-६ टीका (न्यायचंद्रिका टीका पान २९५-२९६
अत एव सर्वाड्गकार्श्यमुदरिणामुदरस्य पुन: पूर्णतैव ।
तस्य दूषस्य दोषान् विना विकारकारिता नास्तीत्याह -
अनिलवेग नुन्नस्त्वच: समुन्नम्येति । वृद्धेरयं हेतु: ।
स्त्रवन् समन्तादन्नसारोऽभिवर्धमानो जठरमुदरं करोति ।
तदुक्तं चरके `मन्देऽग्नौ मलिनैर्भुक्तैरपाकाद्दोषसंचय:
(च.चि. अ. १३) इत्यादि ।
सु.नि. ७-६ (न्यायचंद्रिका टीका) पान २९६
उपेक्षया च सर्वेषु दोषा: स्वस्थानतश्च्युता: ।
पाकाद्द्रवा द्रवीकुर्यु: सन्धिस्त्रोतोमुख्यान्यपि ॥
स्वेदश्च बाह्यस्त्रोत:सु विहतस्तिर्यगास्थित: ।
तदेवोदकमाप्याय्य पिच्छां कुर्यात्तदा भवेत् ।
गुरुदरं स्थिरं वृत्तमाहतं च न शब्दवत् ।
मृदु व्यपेतराजीकं नाभ्यां स्पृष्टं च सर्पति ॥
तदनूदकजन्मास्मिन्कुक्षिवृद्धिस्ततोऽधिकम् ।
सिरान्तर्धानमुदकजठरोक्तं च लक्षणम् ॥
उपेक्षया अचिकित्सनात् । सर्वेषूदरेषु दोषा: वातपित्तकफा:
स्वस्थानत: आत्मीयात् स्थानात्, च्युता: स्थानान्तरं गता:
तथा पाकाद्धेतोस्ते दोषा द्रवा अधिकं द्रवीकुर्यु: सन्धि-
स्त्रोतोमुख्यान्यपि ।
सन्धयश्च स्त्रोतोमुखानि च सन्धिस्त्रोतोमुखानि द्वाराणि ।
न केवलं स्वयं दोषा द्रवत्वं गता: यावत्सन्धि स्त्रोतोमुखान्यपि
द्रवीकुर्यु: इत्यपिशब्दार्थ: ।
स्वेदश्च बाह्यस्त्रोत:सु संवृतेषु विहतो निरुद्ध:, तिर्यगास्थित:-
तिर्यक् प्रवृतश्च, तदेवोदकं प्राक् कुक्षौ वृद्धिं गतमाप्याय्य
वृद्धिं गमयित्वा, पिच्छां कुर्यात् । तदा भवेद्गुरुदरं स्थिरं
अचलं, वृत्तंवर्तुलं, च । तथाऽऽहतं च पाण्यादिना न शब्दवत्
न शब्दयुक्तम्, तथा मृदु अकठिनम् तथा व्यपेता राज्यो-
यस्मात् तद्व्यपेतराजीकं स्यात् । नाभ्यां च सत् सर्पति-
प्रसारि सम्पद्यते । तदनु ततोऽनन्तरम्, अस्मिन उदराख्ये
व्याधौ, उदकजन्म-जलसम्भव : । तत: अनन्तरं, अधिकं
कृत्वा कुक्षिवृद्धिर्भवेत् । तथा, सिरान्तर्धानं सिराणामदर्शनम् ।
कितमदेव लक्षणम ? नेत्याह उदकजठरोक्तं च लक्षणम् ।
न केवलं यद्धुनैवोक्तं लक्षणम्, यावज्जलोदरोक्तं चेति
चशब्दस्यार्थ: ।
सटीक वा. नि. १२-४० ते ४३ पान ५१६-१७
उदर व्याधि अज तोदकावस्थेमध्यें असतांना, कारणीभूतदोषांची योग्य ती चिकित्सा केली गेली नाहीं, त्यांची उपेक्षा झाली किंवा चिकित्सेला लवकर दाद न देण्याइतकें दोषांचें बल मुळांतच अधिक असलें तर सर्वच उदरामध्यें जातोदकावस्था (जलसंचित होण्याची स्तिति) प्राप्त होते. स्त्रोतसामध्यें संचित झालेले दोष पित्ताच्या वा शरीरोष्म्याच्या परिणामामुळें स्वत: द्रवीभूत होतातच पण ज्या स्त्रोतसामध्यें त्यांची प्रथम संचिती होते त्या स्त्रोतसांनाहि तें संक्षुब्ध करतात. स्त्रोतसें क्लिन्न होतात. स्वेदवहस्त्रोतसांचा रोध आधींच झाला असल्यामुळें तेथील `आप्' धातू विमार्गग होऊन उदरांतील संक्षुब्ध स्त्रोतसांतील संचित दोषांना अधिकच वाढवितो. त्यामुळें एक तर्हेच्या पिच्छिलद्रव्यांनीं सर्व अंतर्गत सिरा व्याप्त होतात. शोथाच्या संप्राप्तीसारखीच घटना याहि ठिकाणीं घडते. पिच्छेनें सूक्ष्मातिसूक्ष्म सिरांचा सर्व उदरस्थानीं अवरोध झाला असल्यामुळें पोटाचा आकार अधिक गोल होतो, तें जड होतें, स्थिर झाल्यासारखें वाटतें. अंगुलींनीं आकोटन करुन पाहिलें असतांना पूर्वीपेक्षां जड ध्वनी येतो. उदर स्पर्शाला मृदु पण भरल्यासारखें लागतें. उदरावरील, अजातोदकावस्थेंत व्यक्त असलेल्या सिरा या नाहींशा होऊं लागतात. ही स्थिती जातोदकावस्थेच्या जणूं पूर्वरुपासारखीच असते.
अत्र जलजन्मपूर्वरुपं पिच्छोत्पद्यते, तेन पिच्छोत्पत्तिलक्षण-
मेव तावदाह ।
पिच्छासदृशो भाग: पिच्छा; अन्ये तु भक्तमण्डसदृशीं पिच्छामाहु: ।
टीका च.चि. १३-४९ पान ११४२
ही पिच्छिलोत्पत्तीची स्थिती अल्प काळ राहून नंतर उदरांतील पिशवीसारख्या पृथुल स्त्रोतसामध्यें उपस्नेहन न्यायानें रसवाहीसिरांतून उदक पाझरुन जलसंचिति होऊं लागते. संचित झालेल्या दोषांनीं रस वाहिन्यांच्या मुखांनाहि (द्रव्यत्व) पातळपणा आला असल्यामुळें उदक पाझरणें सहज शक्य होते. ही संचिती ज्या स्त्रोतसांमध्यें होते तें स्त्रोतस् आशयाच्या वा निकेताच्या स्वरुपाचें असून त्याचें कार्य आंत्रादि अवयवांना संवृत करण्याचें, झांकण्याचें असतें. पेशीच्या स्वरुपाचा हा अवयव आहे. यांत ज्यावेळीं जल संचिंती होते त्यावेळीं उदराचा आकार पुष्कळच वाढतो. सिरा जवळ जवळ दिसतच नाहींत आणि पाण्यानीं भरलेल्या पखालीचा, टिचकी मारली असतां या अंगुलीनी आकोटन केलें असतां ज्या स्वरुपाचा स्पर्श लागतो, तसा स्पर्श जातोदकावस्थेंतील, उदकाचाहि लागतो.
पूर्वरुप
क्षुन्नाश: स्वाद्वतिस्निग्धगुर्वन्नं पच्यते चिरात् ।
भुक्तं विदह्यते सर्व जीर्णाजीर्ण न वेत्ति च ॥
सहते नातिसौहित्यमीषच्छोफश्च पादयो: ।
शश्वद्बलक्षयोऽल्पेऽपि व्यायामे श्वासमृच्छति ॥
वृद्धि: पुरीषनिचयो रुक्षोदावर्तहेतुका ।
बस्तिसन्धौ रुगाध्मानं वर्धते पाटयते पि च ॥
आतन्यते न जठरमपि लघ्वल्पभोजनात् ।
राजीजन्म वलीनाश इति लिड्गं भविष्यताम् ॥
क्षुन्नाश इत्यादिना पूर्वरुपाभिधानम् । स्वाद्वादीनां यद्यपि
कटुकाद्यपेक्षया चिरेणैव पाको भवति; तथाऽपीह चिरादिति
पदेनात्यर्थ चिरादित्यभिधीयते । जीर्णाजीर्ण न वेत्ति चेति
वातजन्यत्वाज्ञेयम् ।
`रुक्षोदावर्तहेतुका' इत्यत्र `बद्धोदावर्तहेतुका' इति वा पाठ: ।
बस्तिसन्धाविति बस्तिना समं यत्र शरीरेतर देशसंबन्धस्तत्र ।
आतन्यते इति विस्तीर्यते । राजी व्यक्ता सिरा ।
सटिक च.चि. १३-१६ ते १९ पान ११३७
तत्पूर्वरुपं बलवर्णकांक्षावलीविनाशो जठरे हि राज्य: ।
जीर्णापरिज्ञानविदाहवत्यो बस्तौ रुज: पादगतश्च शोफ: ॥
सु.नि.७-७ पान २९६
भूक लागत नाहीं, मधुर, स्निग्ध, गुरु असे पदार्थ पचण्यास नेहमीपेक्षांहि अधिक वेळ लागतो. अन्न विदग्ध होते, त्यामुळें जळजळणें हें लक्षण आढळतें. अन्न पचले वा न पचले तरी पोटामध्यें विशेष स्वरुपाच्या संवेदना जाणवत नाहींत. एक प्रकारची स्तब्धता जाणवत असते. जेवण थोडेसें जरी जास्त झालें तरी तें ओझें झाल्यासारखें होते. पायावर किंचित सूज येते. बल सारखें उणावत जातें. थोडयाशा हालचालीनींहि दम लागतो. पुरीषाचें प्रमाण वाढतें. रुक्षतेमुळें व वायूच्या प्रतिलोमतेनें मलावष्टंभ होतो. बस्ति या अवयवाच्या भोंवती जे जे शरीर अवयव आहेत तेथें दुखतें (पक्वाशय, वंक्षण, नाभीच्या खालचा भाग, वृषण), आध्मान वाढत जातें, त्यामुळें फाटल्यासारख्या वेदना होतात. हलके अन्न थोडया प्रमाणांत खाल्लें तरी पोटाला तडस लागते. उदरावर प्रकृत स्थितीमध्यें असलेल्या वली नाहींशा होतात व सिरा व्यक्त होऊं लागतात. शरीराची कांती व वर्ण विकृत होते. उदराच्या पूर्वरुपामधें हीं लक्षणें उत्पन्न होतात.
रुपें
कुक्षेराध्मानमाटोप: शोफ: पादकरस्य च ।
मन्दोऽग्नि: श्लक्ष्णगण्डत्वं कार्श्य चोदरलक्षणम् ॥
च.चि. १२-२१ पान ११३७
गुल्माकृतिव्यञ्जितलक्षणानि
कुर्वन्ति घोराण्युदराणि दोषा: ।
सु.नि. ७-५ पान २९५
आध्मानं गमनेऽशक्तिदौर्बल्यं दुर्बलाग्निता ।
शोथ: सदनमड्गानां सड्गो वातपुरीषयो: ॥
दाहस्तन्द्रा च सर्वेषु जठरेषु भवन्ति हि ।
मा.नि. उदर ४ पान २६८
आध्मान, पोटांत गुडगुडणें, चालतांना अवघडल्यासारखें वाटणें, अशक्तपणा वाटणें; अग्नि दुर्बल होणें, हातापायावर सूज येणें, वात, मुत्र, पुरीष यांचा संग असणें (किंवा अल्प प्रवृत्ती असणें), गाल तुकतुकीत होणें, शरीर कृश होणें [ही कृशता उर, गल, बाहू, उरु, (मांडया), नितंब या ठिकाणीं विशेष दिसते. इतर ठिकाणीं आरंभापासूनच बहुधा शोथ असल्यामुळें तेथील मांस क्षय तितका स्पष्ट दिसत नाहीं.] अंग गळून गेल्यासारखें वाटणें, दाह व तंद्रा हीं लक्षणें उदराच्या रुपामध्यें होतात. गुल्म लक्षणांशी उदर लक्षणांचें सादृश्य असतें. उदराच्या पूर्वरुपांत म्हणून सांगितलेलीं लक्षणें हींहि उदराची सामान्य लक्षणें म्हणून दिसतात. तसेंच अजातोदक अवस्थेंची म्हणून जीं लक्षणें सांगितली आहेत त्यांतील लक्षणेंहि उदराच्या सामान्य लक्षणांत विचारांत घेतली पाहिजेत.
वातोदर
रुक्षाल्पभोजनायासवेगोदावर्तकर्शनै: ।
वायु: प्रकुपित: कुक्षिहृद्वस्तिगुदमार्गग: ॥
हत्वाऽग्निं कफमुद्धूय तेन रुद्धगतिस्तत: ।
आचिनोत्युदरं जन्तोस्त्वड्मांसान्तरमाश्रित: ॥
च.चि. १३-२३, २४ पान ११३८
तत्र वातोदरे शोफ: पाणिपानुष्ककुक्षिषु ।
कुक्षिपार्श्वोदरकटीपृष्ठरुक् पर्वभेदनम् ॥
शुष्ककासोऽड्गमर्दोऽधोगुरुता मलसड्ग्रह: ।
श्यावारुणत्वगादित्वमकस्मावृद्धिह्वासवत् ॥
सतोदभेदमुदरं तनुकृष्णसिराततम् ।
आध्मातदृतिवच्छब्दमाहतं प्रकरोति च ॥
वायुश्चात्र सरुक्शब्दो विचरेत्सर्वतोगति: ।
वा.नि. १२-१२ ते १५ पान ५१४
उदरविपाटण, उदावर्त, कार्श्य, दौर्बल्य, अरोचक अविपाक ।
च.चि.१३-२५
रुक्षादि कारणांनीं प्रकुपित झालेला वायू हृदय, कुक्षी, वा बस्ति गुद या स्थानामध्यें प्रकुपित होऊन अग्निमांद्य करतो. कफाचें उदीरण करतो व त्यामुळें रुद्धगति होऊन उदर व्याधी उत्पन्न करतो. वातानें उप्तन्न झालेल्या या उदरामध्यें हातपाय, कुक्षी, वृषण यावर सूज येणें, कुक्षी शूल, पार्श्वशूल, कटिपृष्ठांचा शूल होणें, पेरी वा सांधे यामध्यें फुटल्यासारख्या वेदना होणें, कोरडा खोकला येणें, अंग दुखणें, खालचा भाग जड वाटणें, वातमूत्रपुरीष यांचा संग होणें, उदरचा आकार अनियमितपणें एकाएकीं लहान मोठा होणें, डोळे, नख, त्वचा मुख, मूत्र, पुरीष यांचा वर्ण श्याव वा अरुण होणें, पोटामध्यें टोंचल्यासारख्या, फुटल्यासारख्या वेदना होणें, पोटावर उठून दिसणार्या सिरा बारीक व काळसर असणें, पोट वाजवून पाहिलें असतां वारा भरलेल्या पखालीप्रमाणें आवाज होणें, वायूचा सर्व उदरामध्यें सशूल, सशब्द संचार होणें हीं लक्षणें होतात.
पित्तोदर
कट्वम्ललवणात्युष्णतीक्ष्णाग्न्यातपसेवनै: ।
विदाह्यध्यशनाजीर्णैश्चाशु पित्तं समाचितम् ॥
प्राप्यनिलकफौ रुद्ध्वा मार्गमुन्मार्गमास्थितम् ।
निहत्यामाशये वह्निं जनयत्युदरं तत: ।
च.चि. १३-२६, २७ पान ११३८
पित्तोदरे ज्वरो मूर्च्छा दाहस्तृट् कटुकास्यता ।
भ्रमोऽतिसार: पीतत्वं त्वगादावुदरं हरित् ॥
पीतताम्रसिरानद्धं सस्वेदं सोष्म दह्यते ।
धूमायति मृदुस्पर्श क्षिप्रपाकं प्रदूयते ॥
वा.नि. १२-१६, १७ पान ५१४
नील हारिद्र हारित सिरावनद्धम् ।
च.चि. १३-२८
ज्वर, मूर्च्छा, दाह, तृष्णा, तोंड कडू होणें, भ्रम, अतिसार, मुख, नख, नेत्र, मूत्र, पुरीष यांचा वर्ण पिवळा, हिरवट वा हळदीसारखी छटा असलेला होणें, पोटावर उमटून दिसणार्या सिराहि निळसर, पिवळसर, हळदट, तांबुस वर्णाच्या असतात. पोटाचा स्पर्श मऊ लागतो. जातोदकावस्था फार लवकर येणें व जलसंचिंतीची प्रवृत्तींहि अधिक असणें, घाम येणें. उकडणें, घुसमटणें, आग होणें दुखणें, त्वचेवर चिकटपणा वाटणें (क्लिद्यते) हीं लक्षणें पित्तोदरामध्यें असतात.
कफोदर
अव्यायामदिवास्वप्नस्वाद्वतिस्निग्धपिच्छिलै: ।
दधिदुग्धौदकानूपमांसैश्चाप्यतिसेवितै: ॥
क्रूद्धेन श्लेष्मणा स्त्रोत: स्वावृतेष्वावृतोऽनिल: ।
तमेवपीडयन् कुर्यादुदरं बहिरन्त्रग: ॥
च.चि. १३-२९, ३० पान ११३९
श्लेष्मोदरेऽड्गसदनं स्वाप: श्वयथुगौरवम् ।
निद्रोत्क्लेशारुचिश्वासकासशुक्लत्वगादिता ॥
उदरं स्तिमितं श्लष्णं शुक्लराजीततं महत् ।
चिराभिवृद्धिकठिनं शीतस्पर्श गुरु स्थिरम् ॥
वा.नि. १२-१८, १९ पान ५१४
अविपाक, अंगमर्द, ----- शोफ ।
च.चि. १३-३१
अव्यायामादि व अभिष्यंदी कारणांनीं प्रकुपित झालेला कफ स्त्रोतोरोध करुन वायूचा मार्ग आवृत करतो त्यामुळें वाताच्या प्रेरणेनीं आंत्राच्या बाहेरच्या बाजूस दोष संचिती होऊन उदर उत्पन्न होतें. अंग जड होणें, अंग दुखणें, अंग गळून जाणें, स्पर्शज्ञान कमी होणें, हात, पाय, वृषण, मांडया यांवर सूज येणें, घशाशीं येणें, कास, श्वास हीं लक्षणें असणें, निद्रा अधिक येणें, मुख, नेत्र, नख, त्वचा, मूत्र व पुरीष यांचा वर्ण पांढरा असणें, उदरावर दिसणार्या सिरा श्वेतवर्ण असणें, उदराचा आकार कठीण, शीत व श्लक्ष्ण असणें, उदराचा आकार फार सावकाश वाढणें, उदर घट्ट, न हालणारें असें असणें हीं लक्षणें कफोदरामध्यें उत्पन्न होतात.
त्रिदोष जन्य उदर (दूष्योदर)
दुर्बलाग्नेरपथ्यामविरोधिगुरुभोजनै: ।
स्त्रीदत्तश्चैश्च रजोरोमविण्मूत्रास्थिनखादिभि: ॥
विषैश्च मन्दैर्वाताद्या: कुपिता: संचयं त्रय: ।
शनै: कोष्ठि प्रकर्वन्तो जनयन्त्युदरं नृणाम् ॥
च.चि. १३-३२, ३३ पान ११३९
स्त्रियोऽन्नपानं नखरोममूत्र विडार्तवैर्युक्तमसाधुवृत्ता: ॥
यस्मै प्रयच्छन्त्यरयो गरांश्च दुष्टाम्बुदूषीविषसेवनाद्वा ॥
तेनाशु रक्तं कुपिताश्च दोषा: कुर्वन्ति घोरं जठरं त्रिलिड्गम् ॥
तच्छीतवाताभ्रसमुद्भवेषु विशेषत: कुप्यति दह्यते च
स चातुरो मूर्च्छति संप्रसक्तं पाण्डु: कृश: शुष्यति
तृष्णया च ॥ प्रकीर्तितं दूष्युदरं तु घोरं ।
सन्निपातोदरमाह - स्त्रिय इत्यादि । स्त्रियोऽन्नपानं नखरोममूत्र-
विडार्तवयुक्तं यस्मै पुरुषाय प्रयच्छन्ति ददति ।
किं भूता स्त्रिय: ? असाधुवृत्ता दुराचारा: ।
स्त्रीग्रहणमत्रोपलक्षणं, तेनान्येऽपि सन्निहिता अविवेकिनो ग्राह्या: ।
अरय: शत्रव: । गरान् कृत्रिमविषाणि यस्मै प्रयच्छन्ति ।
दुष्टाम्बु सविषमत्स्यादिसंबन्धात् । विषमेव दावाग्निवातातपाद्यभिभवेन
मन्दतां गतं विषपीतस्य वा विषं दूषीविषं; तेन नखरोमादिना
विषकल्पेन गरेण दूषीविषेण वाऽऽशु शीघ्रं रक्तं कुपितमिति बोद्धव्यम् ।
त्रिलिड्गं वातपित्तश्लेष्मलिड्गम् । संप्रसक्तं निरन्तरम् ।
दूष्युदरमिति यदेव सान्निपातिकोदरं तदेव दूष्यदरम् एतेन न संख्यातिरेक: ।
घोरं तदेव भयानकं, पुनर्घोरं कष्टकारि ।
सु.नि. ७-११ ते १३ पान २९६ [नि.सं.टीकेसहित]
दुर्बल अग्नि असलेल्या व्यक्तीनें अपथ्यकर आमस्वरुप विरोधिगुणयुक्त व गुरु अशीं द्रव्यें भक्षण केलीं किंवा नख, रोम, मूत्र, पुरीष, आर्तव, दुष्ट जल गरविष, दूषिविष यांनीं युक्त असे पदार्थ या ना त्या कारणानें खाण्यांत आले म्हणजे तीनहि दोष प्रकुपित होऊन रक्ताला दुष्ट करतात आणि उदर व्याधी उत्पन्न होतो. यामध्यें तीनहि दोषांचीं लक्षणें दिसतात. यांतील लक्षणांचा प्रकोप शीत-वात-कालीं वा ढग आले असतांना अधिक होतो. मूर्च्छा, शोष, भ्रम, कृशता, दाह हीं लक्षणें या उदरामध्यें विशेष स्वरुपांत आढळतात. याच सान्निपातिक उदराला, `दूष्युदर' असेंहि म्हणतात. (दूष्योदर)
प्लीहोदर आणि यकृद्दाल्युदर
अत्याशितस्य सड्क्षोभाद्यानयानादिचेष्टितै: ।
अतिव्यवायकर्माध्ववमनव्याधिकर्षनै: ॥
वामपार्श्वाश्रित: प्लीहाच्युत: स्थानाद्विवर्धते ।
शोणितं वा रसादिभ्यो विवृद्धं तं विवर्धयेत् ॥
सोऽष्ठीलेवातिकठिन: प्राक् तत्: कर्मपृष्ठवत् ।
क्रमेण वर्धमानश्च कुक्षावुदरमावहेत् ।
श्वासकासापिपासास्यवैरस्याध्मानरुग्ज्वरै: ।
पाण्डुत्वमूर्च्छाछर्दीभिर्दाहमोहैश्च संयुतम् ॥
अरुणाभं विवर्ण वा नीलहारिद्रराजिमत् ।
वा.नि.१२-२२ ते २६ पान ५१५
उदावर्तरुजानाहैर्मोहतृड्दहनज्वरै: ।
गौरवारुचिकाठिन्यौर्विद्यात्तत्र मलान् क्रमात् ॥
वा.नि.१२-२७ पान ५१५
प्लीहोदरं कीर्तयतो निबोध ॥
विदाह्यभिष्यन्दिरतस्य जन्तो: प्रदुष्टमत्यर्थमसृक् कफश्च ।
प्लीहाभिवृद्धिं कुरुत; प्रवृद्धौ प्लीहोत्थमेतज्जठरं वदन्ति ॥
तद्वामपार्श्वे परिवृद्धिमेति विशेषत: सीदति चातुरोऽत्र ।
मन्दज्वराग्नि: कफपित्तलिड्गैरुपद्रुत: क्षीणबलोऽतिपाण्डु: ॥
सव्यान्यपार्श्वे यकृति प्रवृद्धे ज्ञेयं यकृद्दाल्युदरं तदेव ।
प्लीहोदरमाह - प्लीहेत्यादि । असृक्कफश्चेत्यसृग्दुष्टयैव तत्तु-
ल्यकारणतया पित्तदुष्टिरप्युच्यते, विदाहिना रक्तं पित्तं च
दूष्यते, अत एव पश्चात् वक्ष्यति, कफपित्तलिड्गैरुपद्रुत: इति ।
अत्र पित्तस्य लिड्गं मन्दज्वर:, कफस्य लिड्गं मन्दा-
ग्नित्वमिति गदाधर: । प्लीहोदर एव यकृद्दाल्युदरस्याव-
रोधं दर्शयन्नाह - सव्यान्यपार्श्व इत्यादि ।
सव्यान्यपार्श्वे दक्षिणपार्श्वे । तदेवेति तादृशमेव, प्लीहोदरसममेव
न विलक्षणमित्यर्थ: ।
यकृद्दालयति दोषैर्भेदयतीति यकृद्दाल्युदरम् ।
मा.नि. उदर १५ ते १७ पान २७१ म. टीकेसह
अधिक खाणें झाल्यानंतर हिसके बसणार्या वाहनांतून प्रवास केला किंवा फार हालचाल केली, किंवा अतिव्याय, अतिव्यायाम, भारवहन मार्गक्रमण वमनादि शोधनोपचार, व्याधी, पीडा यामुळें कर्षण झालें किंवा निरनिराळ्या कारणांनीं रक्तदुष्टी झाली तर डाव्या बाजूस असलेला प्लीहा हा अवयव आपल्या स्थानापासून च्युत होतो व वाढतो तो उपेक्षेनें कासवाच्या पाठीसारखा टणक, पसरटा व मोठा होत जाऊन सर्व उदरास व्यापतो आणि जठरांतील अवयव अग्नीचें अधिष्ठान यांना देऊन उदर उत्पन्न करतो. (क्रमेण कुक्षीं जठरं अग्न्यधिष्ठानं च परिक्षिपन् उदरं अभिनिर्वर्तयति ।
च.चि.१३-३७
या व्याधीमुळें अग्निमांद्य, अरुचि, अविपाक, श्वास, तृष्णा, आध्मान, ज्वर, कोष्ठ, शूल, पर्वभेद, अंगमर्द, मलमूत्रवातसंग, तम:प्रवेश, पांडु मूर्च्छा, दाह, मोह, कृशता हीं लक्षणें दिसतात. बल अगदीं क्षीण होतें. पांडुता फार असते. कफपित्ताची इतर लक्षणें दिसतात. बल अगदीं क्षीण होतें. पांडुता फार असते. कफपित्ताची इतर लक्षणें आढळतात. [संप्राप्तीमध्यें रक्त आणि कफ यांची दुष्टी विशेष स्वरुपाची असल्यामुळें टीकाकारानें म्हटल्याप्रमाणें मंदाग्नी व मंदज्वर एवढीच दोन लक्षणें न घेतां इतरहि लक्षणें कफपित्तलिंगैरुपद्रुत: ।' या वचनानें घ्यावींत असें आम्हांस वाटतें.]
प्लीहा निर्वेदन: श्वेतकठिन: स्थूल एव च ।
महापरिग्रह: शीतश्लेष्मसंभव इष्यते ॥
सज्वर: सपिपासश्च स्वेदनस्तीववेदन: ।
पीतमात्रो विशेषेण प्लीहा पैत्तिक उच्यते ॥
नित्यमानद्धकोष्ठश्च नित्योदावर्तपीडित: ।
वेदनाभि: परीतश्च प्लीहा वातिक उच्यते ॥
क्लमोऽतिदाह: संमोहो वैवर्ण्य गात्रगौरवम् ।
रक्तोदरं भ्रमो मूर्च्छा ज्ञेयं रक्तजलक्षणम् ॥
योगरत्नाकर उदर पान ५८३
योगरत्नाकरानें व वंगसेनानें प्लीहोदराचेहि वातज, पित्तज, कफज व रक्तज असे चार प्रकार सांगितले आहेत. या प्लीहोदरामध्यें दोषांचें प्राधान्य असेल त्याप्रमाणें वातानें उदावर्त वेदना, आध्मान, पित्तानें मोह, तृष्णा, दाह, स्वेद, ज्वर-कफानें जडपणा, अरुचि आणि कठिणता रक्तामुळें दाह मोह भ्रम मूर्च्छा स्पर्शासहत्व हीं लक्षणें असतात. प्लीहेप्रमाणेंच त्याच कारणांनीं उजव्या बाजूला असलेल्या यकृत या अवयवाचीहि दुष्टी होऊन प्लीहोदरांतील लक्षणांनीं युक्त असा यकृतदाल्युदर हा व्याधी उत्पन्न होतो. यकृतदाल्युदर हा व्याधी प्लीहोदरापेक्षा अधिक प्रमाणांत आढळतो. लहान मुलामध्यें त्याचेंप्रमाण अधिक दिसतें. मोठया माणसांमध्यें रक्तदुष्टीच्या कारणामध्यें मद्यपान हें एक विशेष कारण असतें व त्यामुळें उत्पन्न झालेले यकृत् दाल्युदर आढळतें.
दफोदर
स्नेहपीतस्य मन्दाग्ने: क्षीणस्यातिकृशस्य वा ।
अत्यम्बुपानान्नष्टेऽग्नौ मारुत: क्लोम्नि संस्थित: ॥
स्त्रोत:सु रुद्धमार्गेषु कफश्चोदकमूर्च्छित: ।
वर्धयेतां तदेवाम्बु स्वस्थानादुदराय तौ ॥
च.चि. १३-४५, ४६ पान ११४१
प्रवृत्तस्नेहपानादे: सहसाऽऽमाम्बुपायिन: ।
अत्यम्बुपानान्दमन्दाग्ने: क्षीणस्यातिकृशस्य वा ॥
रुद्ध्वाऽम्बुमार्गानिल: कफश्च जलमूर्च्छित: ।
वर्धयेतां तदेवाम्बु तत्स्थानादुदराश्रितौ ॥
तत: स्यादुदरं तृष्णागुदस्त्रुतिरुजान्वितम् ।
कासश्वासारुचियुतं नानावर्णसिराततम् ॥
तोयपूर्णदृतिस्पर्शशब्दप्रक्षोभवेपथु ।
दकोदरं महत्स्निग्धं स्थिरमावृत्तनाभि तत् ॥
वा.नि.१२-३६ ते ३९ पान ५१६
दकोदरं कीर्तयतो निबोध ।
य: स्नेहपीतोऽप्यनुवासितो वा वान्तो विरिक्तोऽप्यथवा निरुढ: ॥
पिबेज्जलं शीतलमाशु तस्य स्त्रोतांसि दूष्यन्ति हि तद्वहानि ।
स्नेहोपलिप्तेष्वथवाऽपि तेषु दकोदरं पूर्ववदभ्युपैति ॥
स्निग्धं महत्तत्परिवृत्तनाभि समाततं पूर्णमिवाम्बुना च ।
यथा दृति: क्षुभ्यति कम्पते च शब्दायते चापि दकोदरं तत् ॥
उत्पत्तिविशिष्टं दकोदरमाहं - य: स्नेहपीत इत्यादि ।
स्नेहपीत इति कर्तरि क्त:, तेन स्नेहं पीतवानित्यर्थ: ।
दूष्यतीति स्वकर्मसु दुष्टानि भवन्ति । तद्वहानि उदकवहानि ।
तेष्विति उदकवहस्त्रोत:सु । पूर्ववदिति यथापूर्वमुक्तम् ।
अन्नरस उपस्नेहन्यायेन बहिर्नि:सृत्योदरं जनयतीत्यर्थ
इति जेज्जट: ।
गदाधरस्त्वाह - क्षतास्त्रोदर यथा अधोनाभेरुदरामिवृद्धिर्गुदस्त्रावश्च
तथा जलोदरऽपि भवतीति । ननु, सर्वेषामेवोपस्नेहन्यायेन
बहिर्नि:सृतान्नरस मूलत्वात् कथमनुदकत्वं ? नैवं, तेषु हि प्रथमतो
नातिमन्दत्वादग्नेरन्नरसस्याल्पत्वाच्चानुदकत्वं, अल्पत्वेन तद्व्यपदे-
शात्; अत्र तु प्रागेव भूरिजलोत्पत्तिरिति विशेष: ।
समाततं वेदनया विस्तार्यमाणमिवोदरं भवति ।
यथा दृति: क्षुभ्यतीति दृतिरिव जलपूर्णा क्षुभ्यतीति,
अन्तर्जलचलमिवधत्ते । शब्दायते गुडगुडायते ।
मा.नि. उदर २२ ते २४ पान २७३
दफोदरं दर्शयन्नाह - य: स्नेहपीत इत्यादि । य: शीतलमाशु
जलं पिबेत् तस्य स्नेहपानानुवासिनोऽन्त:-स्नेहावलिप्त-
स्त्रोतसोऽतिशयवती स्त्रोतोदुष्टि: स्यात्; वान्तविरिक्तनिरु-
ढाणामतिरिक्तभावेन विवृतस्त्रोतसां पूर्वकर्मप्रधानकर्ममन्दा-
ग्नीनामत्यम्बुसेवया सलिलवहस्त्रोतसां क्लोममूलानां दुष्टि
रभ्युपेयात् । दकोदरे एव संप्राप्तिविकल्पं दर्शयन्नाह-स्नेहो-
पलिप्तेष्वित्यादि । अथवा विनाऽपि स्नेहादिपानशीतलस-
लिलसेवाकृतामुदरस्त्रोतोदुष्टि:, स्नेहोपल्प्तेष्यथवाऽपि तेषु
स्त्रोतसु दकोदरमभ्युपेति । पूर्ववदिति पूर्ववत् क्षतान्त्रोदरे
यथा सलिलस्याधोगामित्वादधोनाभेरुदराभिनिर्वृति: ।
तदुक्तं जलोदरे एव चरके ``तस्य रुपाणि अन्नेऽनाकांक्षा
पिपासा गुदस्त्राव:'' इत्यादि ।
स्त्रोतसां दुष्टत्वेन बहिरुपस्नेहेन जलनि:सरणं सर्वेष्वेव समम् ।
पूर्ववच्छब्दस्यान्य एवार्थो न पुनर्व्याख्यात: ।
सु.नि. ७-२३ न्या. चं. टीका पान २९८
ज्यानें पुष्कळ स्नेहपान केलें आहे, वमन-विरेचन बस्ति यानें ज्याच्या शरीराचें शोधन झालें आहे, ज्याचा अग्नि अतिशय मंद झाला आहे, जो लंघनादि कारणांनीं मेद, मांस, क्षीण होऊन अतिशय कृश झाला आहे, वा निरनिराळ्या व्याधींनीं क्षीण होऊन अतिशय कृश झाला आहे, वा निरनिराळ्या व्याधींनीं क्षीण दुर्बल झाला आहे असा माणूस जर एकदम गार पाणी पुष्कळ प्रमाणांत प्राशन करील तर वायु व कफ हे त्या जलपानानें प्रकुपित होऊन कोष्ठांत (क्लोमांत) स्थानसंश्रय करुन दकोदर हा व्याधी उत्पन्न करतात. तृष्णा, गुदांतून स्त्राव होणें, वेदना होणें, श्वास, कास, अरुची शूल, दौर्बल्य हीं लक्षणें दिसतात. पोटावर उमटून दिसणार्या सिरा निरनिराळ्या रंगाच्या असतात. उदराचा स्पर्श पाण्यानें भरलेल्या पखालीसारखा असतो. अंगुलीनें ताडन वा आकोटन करुन पाहिलें असतां आंतील संचित जलावर आघातानें उत्पन्न झालेल्या तरंगाचे चंचलस्पर्श बाहेरुनहि जाणवतात. शब्दहि जड असा येतो. कित्येक वेळीं हालचालीबरोबर वा कुशी बदलली असतांना आंतील संचित जलाचें डुचमळणें शब्दानें वा स्पर्शानें प्रत्ययास येते. पोटाचा आकार इतर उदरांच्यापेक्षां मोठा असतो. उदर हें स्निग्ध दिसतें. तें स्थिर असतें (झालेली वाढ लवकर कमी होत नाहीं.) नाभी उन्नत होते. अशीं लक्षणें दकोदरामध्यें असतात. जातोदकावस्था व दकोदर यामध्यें भेद असा कीं ज्या दोषांचे तें उदर असेल त्याप्रमाणें दोषलक्षणें जातोदकावस्थेंतील उदरांत दिसतात. दकोदरामध्यें उदराचीं लक्षणें व सजलावस्था एकदमच प्रकट होते. इतरांत जातोदकावस्थेपूर्वीचा कांहीं काल तरी जलसंचिती नाहीं असा असतो.
(७) छिद्रोद्र
(८) बद्ध गुदोदर
या व्याधींचे वर्णन आमच्या `शल्य शालाक्यतंत्र' या ग्रंथामध्यें पहावें.
वृद्धि स्थान क्षय
शोथ, उदराचा आकार, कृशता, दौर्बल्य हीं लक्षणें वाढत जाणें हें व्याधीच्या वृद्धीचें द्योतक आहे. आध्मान, अग्निमांद्य आणि जलप्रतीति टिकून राहाणें हें व्याधीचे स्थितिदर्शक आहे. उदरपरीघ उणावणें, शोथ नष्ट होणें, विरेचनानें वा विस्त्रावणानें काढून टाकलेलें जल पुन्हां न भरणें, अग्नि प्रदीप्त होणें, कृशता कमी होणें, शक्ती वाढणें, व त्वचेचें स्वरुप प्रकृत होऊं लागणेंहें व्याधी क्षय पावत असल्याचें लक्षण आहे. रुग्ण सामान्य आहार घेत असतांनाहि व विरेचनादि उपचार चालूं नसतानांहि जर वर्षाहून अधिक कालपर्यंत शोथ उदरवृद्धि हीं लक्षणें अल्प प्रमाणांतहि प्रकट झालीं नाहींत, आणि पोटाला तडस लागणें हें लक्षण मुळींच नसलें तर रोगी व्याधी मुक्त झाला असें समजावें.
चिकित्सा संदर्भानें लक्षणें
गुल्म, श्वास, कृमी, पांडु, कामला (च.चि.१३-८५)
शोथ, वातविष्टंभ, गुल्म, अर्श, (च.चि.१३-११४)
भगंदर, पांडु, श्वास, कास, गलग्रह, हृद्रोग, ग्रहणी, कुष्ठ, अग्निमांद्य, ज्वर, अजीर्ण, विट्संग, आनद्धवात, परिकर्तिका,
(च.चि.१३-१३० ते ३२)
हृद्रोग, शोथ, गुल्म,प्लीहा, अर्श, विसूचिका, उदावर्त, वाताष्टिला, (च.चि.१३-१६१)
पार्श्वशूल, हृद्ग्रह, उपस्तंभ (वात विबंध) (वा.चि. १५-४५)
तूनि, प्रतितूनि, (वा.चि. १५-७३)
प्रमेह, (वा.चि.१५-९२)
यक्ष्मा, मूत्रकृच्छ्र, अपस्मार (वंगसेन उदर १०२ पान ५१४)
पीनस, अर्धांगवात, विषमज्वर (वंगसेन १६० उदर पान ५१९)
उपद्रव
तदाऽतुरमुपद्रवा: स्पृशन्ति-छर्द्यतीसारतमकतृष्णाश्वास
कासहिक्कादौर्बल्यपार्श्वशूलारुचिस्वरभेदमूत्रसड्गादय:
तथाविधमचिकित्स्यं विद्यादिति ।
च.चि. १३-४९ पान ११४२
छर्दी, अतिसार, तम, तृष्णा, श्वास, कास, हिक्का, दौर्बल्य, पार्श्वशूल, अरुचि, स्वरभेद, मुत्र संग (इत्यादि) उपद्रव उदरामध्यें होतात.
उदर्क
अग्निमांद्य, सौहित्यं न सहते ।
अग्निमंद होते. थोडेसे अधिक खाल्ले तरी तडस लागते.
साध्यासाध्य विवेक
जन्मनैवोदरं सर्व प्राय: कृच्छ्रतमं मतम् ।
बलिनस्तदजाताम्बु यत्नसाध्यं नवोत्थितम् ॥
पक्षाब्दद्धगुदं तूर्ध्व सर्व जातोदकं तथा ।
प्रायो भवत्यभावाय छिद्रान्त्रं चोदरं नृणाम् ॥
मा.नि.उदर-२५,२६ पान २७४
शूनाक्षं कुटिलोपस्थमुपक्लिन्नतनुत्वचम् ।
बलशोणितमांसाग्निपरिक्षीणं च वर्जयेत् ॥
पार्श्वभड्गान्नविद्वेषशोथातीसारपीडितम् ।
विरिक्तं चाप्युदरिणं पूर्यमाणं विवर्जयेत् ॥
मा.नि. उदर-२७-२८ पान २७४
वातात्पित्तात्कफात् प्लीह्न: सन्निपात्तथोदकात् ।
परं परं कृच्छ्रतममुदरं भिषगादिशेत् ॥
च.चि.१३-५० पान ११४२
उदर हा व्याधी बहुधा कृच्छ्रसाध्य असा आहे. रोगी बलवान् असेल, जलसंचिती स्थिर झालेली नसेल, आणि रोगाची उत्पति नुकतीच झालेली असेल तर व्याधी प्रयत्नानें साध्य होतो. वातज, पित्तज, कफज, यकृत प्लीहज, सन्निपातज आणि उदकज. उदर क्रमानें अधिकाधिक कष्टसाध्य आहेत. जातोदक अवस्था बहुधा असाध्य असते; यांतहि विरेचनानें वा विस्त्रावणानें काढून टाकलेलें जल पुन्हां पुन्हां भरत असल्यास व्याधी असाध्य समजावा. डोळ्यावर शोथ आला आहे. शिस्न वांकडे झालेलें आहे. त्वचा पातळ व चिकट ओलसर झालेली आहे. बल, रक्त, मांस, अग्नि, यांचा अतिशय क्षय झाला आहे असा उदरी हा असाध्य होतो.
रिष्ट लक्षणें
श्वयथु: सर्वमर्मोत्थ: श्वासो हिक्काऽरुचि: सतृट् ।
मूर्च्छा च्छर्दिरतीसारो निहन्त्युदरिणं नरम् ॥
च.चि. १३-५३ पान ११४२
मर्म स्थानीं सूज येणें, श्वास, अरुचि हिक्का, तृष्णा मूर्च्छा, छर्दी, अतिसार हीं लक्षणें उत्पन्न होणें हें उदररोग्यास मारक असतें. मर्मस्थानीं येणारी सूज बाह्य व आभ्यंतर अशी दोनहि प्रकारची असते हा आभ्यंतर शोथ लक्षणानुमेय आहे.
चिकित्सा सूत्रें
वातोदरं बलवत: पूर्व स्नेहैरुपाचरेत् ।
स्निग्धाय स्वेदिताड्गाय दद्यात् स्नेहविरेचनम् ॥
हृते दोषे परिम्लानं वेष्टयेद्वाससोदरम् ।
तथाऽस्यानवकाशत्वाद्वायुर्नाध्मापयेत्पुन: ॥
दोषातिमात्रोपचयात् स्त्रोतोमार्गनिरोधनात् ।
संभवत्युदरं तस्मान्नित्यमेव विरेचयेत् ॥
च.चि. १३-५९ ते ६१
अविरेच्यं तु यं विद्याद्दुर्बलं स्थविरं शिशुम् ।
सुकुमारं प्रकृत्याऽल्पदोषं वाऽथोल्बणानिलम् ।
तं भिषक् शमनै: सर्पिर्यूषमांसरसौदनै: ।
बस्त्यभ्यड्गानुवासैश्च क्षीरैश्चोपाचरेद्बुध: ।
च.चि. १३-६६, ६६ पान ११४३-४४
वातोदराचा रोगी बलवान असतांना प्रथम स्वेदन करावें नंतर (एरंड तेलासारखे) स्निग्ध विरेचन द्यावें. दोषांचें शोधन होऊन उदराचा आकार कमी होत जाईल त्याप्रमाणें पोटाभोंवतीं घट्ट वस्त्रानें पटबंध करावा नाहीं तर शिथिल झालेल्या स्त्रोतसामध्यें पुन्हां वातप्रकोप होऊन उदरवृद्धि होते. उदर हे स्त्रोतसांचा मार्ग अवरुद्ध झाल्यामुळें व दोषांच्या अति प्रमाणांतील संचितीमुळें उत्पन्न होत असल्यानें उदर रोगाला प्रत्येक दिवशीं विरेचन देणें आवश्यक असतें. दुर्बल, वृद्ध, लहान मूल,सुकुमार प्रकृतीचे, दोष अतिशय अल्प असलेले वा एकांत वात दोषाचें प्राधान्य असलेले असें रुग्ण असल्यास त्यांच्या शोधनासाठीं बस्तीचा उपयोग करावा आणि शामनासाठीं सिद्धघृत यूष मांसरस, क्षीर, आणि सिद्ध ओदन वापरावें. (औषधांनीं सिद्ध केलेला भात)
पित्तोदरे तु बलिनं विरेचयेत् ।
दुर्बलं त्वनुवास्यादौ शोधयेत् क्षीरबस्तिना ॥
संजातबलकायाग्निं पुन: स्निग्धं विरेचयेत् ।
पयसा सत्रिवृत्कलेकेनोरुवूकश्रृतेन वा ॥
सातलात्रायमाणाभ्यां श्रृतेनारग्वधेन वा ।
सकफे वा समूत्रेण सवाते तिक्तसर्पिषा ॥
पुन: क्षीरप्रयोगं च बस्तिकर्म विरेचनम् ।
क्रमेण ध्रुवमातिष्ठन् युक्त: पित्तोदरं जयेत् ।
च.चि. १३-६८ ते ७१ पान ११४
पित्तोदरी बलवान असल्यास, प्रथम विरेचन द्यावें. दुर्बल असल्यास अनुवासन बस्ती व नंतर क्षीरबस्ती वापरावा. उपचारानें अग्नीचें बल थोडें वाढल्यानंतर त्रिवृत् (निशोत्तर) वा एरंड बीज, शिकेकायीं, त्रायमाण, आरग्वध यांनीं सिद्ध केलेल्या दुधानें स्निग्ध असें विरेचन द्यावें. पित्ताबरोबर कफाचा अनुबंध असल्यास दूध व गोमूत्र द्यावें. वाताचा अनुबंध असल्यास दूध व गोमूत्र द्यावें. वाताचा अनुबंध असल्यास तिक्त द्रव्यांनीं सिद्ध केलेलें तूप व दूध विरेचनासाठीं द्यावे.
अशा रितीनें दूध; बस्ति व विरेचन यांचा उपयोग पित्तोदरांत क्रमाक्रमानें पुन: पुन: करावा.
स्निग्धं स्विन्नं विशुद्धं तु कफोदरिणमातुरम् ।
संसर्जयेत्कटुक्षारयुक्तैरन्नै: कफापहै: ॥
गोमूत्रारिष्टपानैश्च चूर्णायस्कृतिभिस्तथा ।
सक्षारैस्तैलपानैश्च शमयेत्तु कफोदरम् ॥
च.चि. १३-७२, ७३ पान ११४४
कफोदरी रुग्णाला प्रथम स्नेह स्वेद देऊन (अल्प प्रमाणांत) मग शोधन द्यावें. (वमन देऊं नये) विरेचनानंतर कटु, क्षार, युक्त कफघ्न अशा अन्नानें संसर्जन क्रम करावा. गोमूत्र, आसवारिष्ट, कफघ्न द्रव्यांचीं चूर्णे, अयस्कृति, क्षार सिद्ध तैल अशा औषधांनीं उपचार करावें. सन्निपातोपचारासाठीं सर्वच दोषांच्या दृष्टीनें उपचार करावे.
लिड्गै: प्लीह्यधिकान् दृष्ट्वा रक्तं चापि स्वलक्षणै: ।
चिकित्सां संप्रकुर्वीत यथादोषं यथाबलम् ॥
स्नेहं स्वेदं विरेकं च निरुहमनुवासनम् ।
समीक्ष्य कारयेद्बाहौ वामे वा व्यधयेत्सिराम् ॥
च.चि. १३-७६,७७ पान ११४५
प्लीहोदरामध्यें निरनिराळ्या दोषांच्या प्रकोपाचीं लक्षणें व रक्तदुष्टीचीं लक्षणें विचारांत घेऊन तदनुरोधानें चिकित्सा करावी. स्नेह, स्वेद, विरेचन, निरुह, अनुवासन यांचा यथायोग्या प्रयोग करावा. आणि डाव्या हातांतील कोपराच्या ठिकाणी (आंतील बाजूस) सिरांचा व्यध करावा.
अपां दोषहराण्यादौ प्रदद्यादुदकोदरे ।
मूत्रयुक्तानि तीक्ष्णानि विविधक्षारवन्ति च ॥
दीपनीयै: कफध्नैश्च तमाहारैरुपाचरेत् ।
द्रवेभ्यश्चोदकादिभ्यो नियच्छेदनुपूर्वश: ॥
च.चि. १३-९३,९४ पान ११४७
दकोदरावर आप् धातुची दुष्टी नाहींशी करणारे उपचार करावे. मूत्रयुक्त तीक्ष्ण असे विविध क्षार द्यावें. कफघ्न दीपनीय असा आहार द्यावा. जलपान व द्रव द्रव्यें बंद करावीं.
तथा जातोदकं सर्वमुदरं व्यधयेद्भिषक् ।
वामपार्श्वे त्वधो नाभेर्नाडीं दत्त्वा च गालयेत् ॥
विस्त्राव्य च विमृद्यैतद्वेष्टयेद्वाससोदरम् ।
तथा बस्तिविरेकाद्यैर्म्लार्नं सर्व च वेष्टयेत् ॥
नि:स्त्रुते लड्घित: पेयामस्नेहवलवणां पिबेत् ।
अत: परं तु षण्मासान् क्षीरवृत्तिर्भवेन्नर: ।
त्रीन् मासान् पयसा पेयां पिबेत्रींश्चापि भोजयेत् ।
शामाकं कोरदूषं वा क्षीरेणालवणं लघु ॥
नर: संवत्सरेणैवं जयेत् प्राप्तं जलोदरम् ।
प्रयोगाणां च सर्वेषामनु क्षीरं प्रयोजयेत् ॥
दोषानुबन्धरक्षार्थ बलस्थैर्यार्थमेव च ।
प्रयोगापचिताड्गानां हितं हृदरिणां पय: ॥
सर्वधातुक्षयार्तानां देवानाममृतं यथा ।
च.चि. १३-१८९ ते १९४ पान ११५६-५७
उदरामध्यें जलसंचिती अतिशय असतांना व्रीहिमुख शस्त्रानें नाभीच्या डावीकडे खालीं व्यध करुन जलनिर्हरण करावें. विस्त्रावण विरेक वा बस्ती यांनी जलाचें शोधन झालें असतां आकारानें लहान झालेल्या उदराचें वस्त्रानें घट्ट वेष्टन करावें. एका वेळीं सर्व जल काढू नये. जलनिर्हरणानंतर लवणरहित व स्नेहरहित पेया घ्यावी. जल संचिती नाहींशी झाल्यानंतर सहा महिनेपर्यंत केवळ दुधावर रहावें. नंतर तीन महिने पेया व दूध अन्न म्हणून घ्यावें. पुढचे तीन महिने दुधाबरोबर श्यामाक कोरदुष (वरी, नाचणी यासारखी क्षुद्र तृण धान्यें) मीठरहित सेवन करावींत. अशा रीतीनें एक वर्षभर दक्षतेनें वागलें असतां उदर नाहींसा होतो. उदरावर केलेल्या कोणत्याही प्रयोगानंतर दूध प्राशन करावें. त्यामुळें दोषांचा अनुबंध पुन्हां होत नाहीं. रोग्याचें बल टिकतें. विरेचनादि उपचारांनीं कृश झालेल्या शरीराचें पोषण होतें. उदरांतील धातुक्षय झालेल्या स्थितींत दूध जणूं अमृतासारखें आहे.
सर्वमेवोदरं प्रायो दोषसंघातजं मतम् ।
तस्मात् त्रिदोषशमनीं क्रियां सर्वत्र कारयेत् ॥
दोषै: कुक्षौ हि संपूर्णे वह्निर्मन्दत्वमृच्छति ।
तस्माद्भोज्यानि भोज्यानि दीपनानि लघूनि च ॥
च.चि. १३-९५,९६ पान ११४७
उदर हे बहुधा सर्व दोषांच्या संघातामुळें उत्पन्न होत असल्यामुळें कोणत्याहि उदरावर करावयाच्या क्रिया या त्रिदोषशामक असाव्या. दोषांनीं कोष्ठ भरलेला असल्यामुळें अग्नीला मंदता आलेली असते. यासाठीं जो आहार घ्यावयाचा तो लघु आणि दीपन गुणांनीं युक्त असा असावा.
कल्प
इंद्रावरुणि, निशोत्तर, कुटकी, दंती, स्नुहि, जयपाळ, एरंड, गोमूत्र, शिलाजतु, भल्लातक इच्छाभेदी, अश्वकंचुकी, नाराचरस, आरोग्यवर्धिनी नवायसचूर्ण त्रिकटुचूर्ण, लोहपर्पटी, पंचकोलासव, भल्लातकासव.
अन्न
रक्तशालीन्यवान्मुद्गाञ्जाड्गलांश्च मृगद्विजान् ॥
पयोमूत्रासवारिष्टान्मधुसीधुं तथा सुराम् ।
यवागूमोदनं वाऽपि यूषैरद्याद्रसैरपि ॥
मन्दाम्लस्नेहकटुभि: पञ्चमूलोपसाधितै: ।
औदकानूपजं मांसं शाकं पिष्टकृतं तिलान् ॥
व्यायामाध्वदिवास्वप्नं यानयानं च वर्जयेत् ।
तथोष्णलवणाम्लानि विदाहीनि गुरुणि च ॥
नाद्यादन्नानि जठरी तोयपानं च वर्जयेत् ।
च.चि. १३-९८ ते १०० पान ११४७
नाचणी, वरी, बाजरी, ज्वारी, जुने जाड तांदूळ, मूग, दूध, आसवारिष्ट्म जांगल मांस.
विहार
व्यायामे, चालणें, दिवसा झोंपणें, आणि वाहनांत बसून प्रवास करणें वर्ज्य करावें. विश्रांति घ्यावी.
अपथ्य
गुरु विदाही लवणयुक्त अम्ल अभिष्यंदी उष्ण, अति स्निग्ध, ग्राम्य औदकानूप मांस वर्ज्य करावे.