श्री कृष्ण शिष्टाई नंतर, सामोपचाराचे मार्ग संपल्यावर ते महाभारती, अखेरीस युध्दास तयार होतात. कौरव-पांडवांचे सैन्य युध्दभुमिवर लढण्यासाठी जमते. योध्दा अर्जुनही निघतो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करीत अर्जुनाचा रथ समरांगणाकडे वळवितात. तोच तो रणधुरंधर अर्जुन दोन्ही पक्षाचे सैन्य निरीक्षण करण्याची इच्छा, सारथी भगवान श्रीकृष्णांजवळ प्रदर्शित करतो. युध्दाभिमुख दोन्ही सैन्याचे मध्यावर रथ उभा केला असता त्यासुबुध्दी वीर अर्जुनाला दोन्ही पक्षांतील सैन्यामध्ये आपले जवळचे नातेवाईक, मित्र, सोयरे, गुरु सर्वच युध्दात जीवन पणास लावण्या हेतू सज्ज झालेले दिसतात. तेव्हा अचानक तो शत्रुतापन अर्जुन आपल्या मनाची, तसेच शरीराची सर्व शक्ती हरपून बसतो. भावूक मनाने, भ्रमित मोहग्रस्त होऊन तो आपला स्वधर्म, क्षात्रधर्म, विसरुन, भारावलेल्या मनाने युध्द करण्याचा आपला संकल्पच वृथा आहे. असे ठाम समजून, युध्द करणे नाकारतो. एवढेच नाही तर तो श्रीकृष्णाला युध्द करणे अयोग्य कसे हे सांगत युध्द न करण्याचा त्याचा संकल्प धर्म्य आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करतो. युध्दामुळे आपल्याकडून स्वबांधवांची हत्या होणार, त्यामुळे मित्र द्रोह कसा, कुलनाश कसा, कुलघात कसा, हे सांगत त्याचा संभाव्य परिणाम, त्यायोगे पाप कसे लागेल, इत्यादी ज्ञान त्या श्रीकृष्ण परमात्म्यास पाजु लागतो. आणि अखेरीस खरोखरच धनुष्यबाण टाकुन देऊन, विषादाने खिन्न होऊन श्रीकृष्णापुढे खाली बसतो. हा असा गीतेचा प्रारंभ ! जणु हा योगायोगच ! श्री व्यासांना सर्व जगाला विषादमुक्त करण्याहेतु महर्षि व्यासांनी ह्या अर्जुन विषाद योगाद्वारे जगाला उपदेशामृत पाजण्यासाठी केलेला हा गीतेचा प्रपंच ! सकल भ्रमित जीवांना मोहातून वाचवून, स्वधर्माची, आपल्या कर्तव्याची, जाण करुन देण्याकरीता श्रीकृष्णार्जुन संवादाद्वारे श्री व्यासांचे हे गीता प्रयोजन आणि सर्वसामान्य मराठी जनास हे गीतोपनिषद, गीता ज्ञान प्राप्त व्हावे ह्या हेतुने गोपाळाने केलेले हे `गोपाल गीत' ज्ञानामृत पायस' म्हणजे हा गीतानुवाद मराठीत आपणास सादर.
`गोपाल गीत' अपूर्व, अमृत पायस,
पायस प्राशना सुमति-पार्थ-पाडस ।
पाडस ते उपनिषीद-गायीचे जणु,
जणु दोहीता, तयाते, गोपाल नन्दनु ॥