॥ योग भुमिका ॥
`सांख्य योग' हा जणु संख्य मध्ये-युध्दामध्ये युध्दभुमिवर व्यासांनी निर्माण केलेला योगायोग ! एक भाव संघर्ष ! हा अध्याय म्हणजे गीतेचा सारच ! गणितातील संख्यांच्या गुणतुलनेत, विषयाचे बृहदत्व विषद केलेला सांख्य प्रसंग, एक मुल्यात्मक संघर्ष योग. अर्जुन श्रीकृष्णाला शरण जाऊन त्याचे शिष्यत्व पत्करतो. अर्जुनाचे निमित्त करुन, हा उपदेश सर्व जीवांना, (नुसत्या एकटया) अर्जुनाचे गुरु नव्हे, तर जणु सर्व जगाचे जगद्गुरु श्रीकृष्ण ह्या अध्यायात सर्वानाच उपदेश करीत आहेत. अर्जुनाचे हृदय दौर्बल्य, भ्याडपणा नष्ट करण्याकरिता, अर्जुनाचे निमित्ताने जगाला ज्ञान देण्याचा श्री व्यासांचा हा स्तुत्य प्रयत्न ! नाशवंत शरीर आणि त्यातील अविनाशी शाश्वत आत्मा ह्याची व्याख्या आणि दोहोंतील मूलभुत अंतर दाखवित उपदेशाला, श्री भगवंत प्रारंभ करतात. आत्म्याचे देहांतरण, देहाची स्थिती, आत्म्याचे स्वरुप, त्याचा अविनाशीपणा, सविस्तर सांगत अर्जुन आपल्या स्वधर्मापासून विचलित होऊ नये म्हणून श्री भगवान कसोशिने प्रयत्न करतात. ते त्याचे दुष्परिणाम, दुष्कीर्ति स्वर्गाची अ - प्राप्ती आणि युध्दांत वीर - गतिला, गेल्यास स्वर्गप्राप्ती व जिंकल्यावर सुखप्राप्ती कशी ? हे सांगत कर्म करणे हेच आपल्या हातात आहे. त्याच्या फलाची अपेक्षा करणे, आपल्या अधिकारात नाही, असे सांगुन धर्म्यकर्म (कर्तव्य) करण्या प्रवृत्त करतात. त्यानंतर लागोपाठ त्यास `बुध्दियोगाची' विश्लेषण करीत, सर्वत्र समबुध्दिचा आग्रह धरीत, फलानिरासक्त कर्म करण्यास उपदेशितात. असे साधल्यावर बुध्दि स्थिर होते. व समाधि स्थितिप्रत जाण्यास, अयोग्य चंचलत्व नष्ट होते. त्याच्याहि पुढे जाऊन अर्जुनाने विचारल्यावरुन स्थितप्रज्ञाची व्याख्या, त्याचे लक्षण, वर्तन इत्यादि सुस्पष्ट करतात. स्थितप्रज्ञाने इंद्रिय निग्रह मनोनिग्रहाने, कामक्रोध मोहादि षड् रिपुपासून दूर राहिल्यास `भगवद् प्रसाद' कसा मिळतो, त्यायोगे समाधान, मन:शांती मिळून शेवटी पुरुषाला `ब्राह्मी स्थिती' प्राप्त होते. की जी, ह्या योगाचे अंतीम लक्ष आहे. त्यामुळे मोहातून पुरुष, पार होऊन शेवटी मोक्ष पदाला जातो. आपणही ती स्थिती गोपाल गीताद्वारे प्राप्त करुया...
हीच रे, पार्था स्थिती ती ब्राह्मी,
लाभता जी, मोहती न कोणी ।
राहता अंतकाली हिच्यात,
ब्रह्म निर्वाण, मुक्ति ती प्राप्त ॥
(७७ गो.गी.)