नव वर्षाची गुढया-तोरणे, उभारुनि जगतात ।
नवक्रांतीचे शिंग फुंकुनीं, भेरि घुमवु विश्वांत ॥
कशांस पुसतां कूळ ऋषींचे ।
बुध्दिहीन वा सुबध्द यांचे ।
कुबेर किंवा अकिंचनांचे ।
एक मनानें, एक सुरानें, धर्म एकला मानवता हा,
उमटू दे पडसाद ॥
उंच महालीं, धनपति नरवर ।
चंद्रमौलि, तेथेंच पथांवर ।
त्यांस निवारा, या उघडयावर ।
जिवा शिवाला, दोघांच्याही वसन, भूक, देहांत ॥
रविकर तळपे, घेत शिरावर ।
धर्मबिंदु गाळोनीं, दिनभर ।
न्याहारींस जरि, कांदा भाकर ।
गोड करोनीं, शेत पिकवितो, उपकार ना स्वप्नांत ॥
कामकरी, ओझे पाठीवर ।
शरिर राबते, कधी न कुरबुर ।
श्रावण धारा, शिशिर शाहरा ।
घरधनीण अन् कच्ची-बच्ची, पोशित लावुनि हात ॥
धर्म नव्हे, कर्तव्य कर्म हे ।
माणुसकी - नवजात वर्म हे ।
जात - पात गणगोत, विसर ते ।
विश्व एकता, वाढवुनीया, `मानवता' धर्मात ॥
नव क्रांतीचे, शिगफुंकुनी, भेरि घुमवु विश्वात ।