सैनीक आम्ही पेशाचे, हिंदभूमिचे, नव्यारक्ताचे ।
चहुकडे आमुचा हो संसार, मायभू रक्षण हा ललकार । जी ऽ
प्रांगणीं आम्हा, जमविले, मनीं ठरविले, शस्त्र हाति दिले ।
सांगती लढण्यां व्हा तैयार, बाहुबल मर्दुमकी दिसणार ॥
जी जी जी जी
ऐकतां स्फुर्ति अंगात, शूरवीरांत, शब्दमुखि येत ।
थरथरे ओठावरि संचार, `हर हर महादेव घुमणार ॥ जी ऽ
कधि राजस्थानीं, वाळवंटि तापतां ।
वैर्यावरि पाऊस, गोळ्यांचा बरसता ।
सीमेवरि गनिमां हरवुनिया पलवितां
`कुलदैवत' गर्जोनि मारिली, मुसंडि गनिमावरीं ।
चारिली धूळ, हटवुनी पुरी ॥ जी ऽ
`शौर्यचक्र' संपादन केले, यांत्रिक तोफांवरीं ।
चिंधडया उडवुनि वरचेवरीं ॥ जी ऽ
कितीक पडले धारातीर्थी, वैर्याचे लष्करी ।
शिपायी शस्त्र सज्ज धारी ॥ जी ऽ
हिमलयाच्या शिखर सीमेला, गनिम भिडू लागला ।
सियाचिन् लक्ष्य भेदु लागला ॥ जी ऽ
बर्फ चहुकडे, रक्त गोठवी, हिमपातीं वादळे ।
तुडवुनी `आगे बढती' दळे ॥ जी ऽ
बांधुनि मोर्चे, दडुनि खंदकीं, झोकिति हातगोळे ।
अकस्मित दुस्मन मागें पळें ॥ जी ऽ
तुटूनि पडतीं, मर्द मराठे, अंगि रक्त सळसळें ।
दावि रणि, `बारुदी वादळे' ॥ जी ऽ
प्राणवायु कमीपडे, घ्यावयां श्वास, परीं त्यां ध्यास ।
जिवाचा घास, दुश्मनाचा ॥
पर्वा न करीं त्या क्षणीं, प्राणवायूचा ॥ जी ऽ
कर्णकटू आवाज खंदकीं, घे गनिमाची जान ।
मराठे होऊनिया बेभान ॥ जी ऽ
`गारद झाली गमीन पलटण,' सुभेदार बोलिले ।
गडयानो ठाणे हातीं आले ॥ जी ऽ
`विशिष्ट सेना पदक' लाभले, बहादुरी समरीं ।
आत्मविश्वास गड्यांच्या उरीं ॥ जी ऽ
संग्राम जिंकुनी पलटण खाली आली ।
पत्रातुनि गावांकडची ओढ लागली ।
वाचूनि `आबादी' उत्सुकता वाढली ।
सखि घरची, नेत्रांपुढे छबी चमकली ।
तो निरोप घेतां, आसु नयनि टपकली ।
आशिर्वाद बाबांचा कोणां, माता आठवे कुणा ।
बोल बाळाचे कानीं, कुणां ॥ जी ऽ
दिवस उगवती, मावळतीं, ऐकतां अशीं बहादुरी ।
हुकुम ये `बढो फ्रंट काश्मिरी' ॥ जी ऽ
करा बोलणी, संधि व्हावयां, भेटू' उच्चस्थरीं ।
टाकितो डाव पुढें वैरीं ॥ जी ऽ
आव आणुनी विश्वासाचा, कपट खेळि अंतरीं ।
करायां घात, आघाता करीं ॥ जी ऽ
हातघाइच्या मर्दुमुकीच्या लढाईत `बलिदान' ।
अर्पुनी हिंदभूस दे प्राण ॥ जी ऽ
समरांत करुनिया मात, जबर घणघात ।
फोडुनी रणगाडे चिलखती, चालकां अस्मानीं धाडिती ॥
हा जवान, याला ओळखतां कां तुम्ही ? ।
शिवबाची मावळ सेना जी, जमवुनीं ।
`स्वातंत्र्य' शिंग फुंकिले, आणि तोरणीं ।
दे साद, मायभूमीत, अशिर्वच देत, भवानी माता ।
ते पूर्वज यांचे, त्यांचा हाच मराठा ॥ जी ऽ
हा मर्दमावळा युवक, घेत ही शपथ, द्यावयां साथ ।
समरि उडि घेई ।
वैर्यास पळाया करीत हा भुइ थोडी ॥ जी ऽ
हिंदभु देत जरि हाक, शत्रुसी धाक, करिल दमछाक ।
मराठा युवक - लढवय्ये येति अनेक ॥ जी ऽ
कुलदैवत मायभवानी, कसम ही ।
करु पुरा, गनिम बरसाद, आण ही ।
पर्वा न जिवाची करणें, जाण ही ।
हिमाचलांपासूनि दक्षिणीं कन्यादेवी वरीं ।
उगारी हात, होई घणघात, कलम क्षणिं होत ।
खास तो उडेल, वरचेवरीं ।
पुरी करि, कसम, अशी बहादुरी ॥ जी ऽ
या पराक्रमाचे पोवाडे, गोपाळ डफावरि गाउनिया दे ताल ।
सवंगडया सोबत खंजिरि चाळ ।
झंकार, जवानां देइ विक्रमी स्थान, हिंदवी शान, बढतसे मान ।
उजळेल पहा दुनियेत, दिपवील, मराठा जगतीं हा संकेत ॥ जी ऽ