गोष्ट अठ्ठावीसावी

संस्कृत नीतिकथांमध्ये पंचतंत्र कथांचे प्रथम स्थान मानले जाते.

The fascinating stories told by Vishnu Sharma, called Panchatantra.


गोष्ट अठ्ठावीसावी

ज्याचे जे असे, त्याच्यापाशीच ते वसे.

एका गावी सागरदत्त नावाचा एक कंजूष वाणी राहात होता. त्याच्या बुद्धिवान् व वाचनाची आवड असलेल्या मुलाने एक मौल्यवान ग्रंथ बरीच किंमत मोजून विकत घेतला. त्या वाण्याला ही गोष्ट कळताच तो त्याच्यावर भडकून म्हणाला, 'घरबुडव्या ! ग्रंथासाठी एवढा पैसा खर्च करायचा ? चालता हो घरातून. घरातून बाहेर हाकलून दिल्यावर तुझ्यावर रस्तोरस्ती फिरून भीक मागण्याची पाळी येणार आहे, हे लक्षात ठेव.'

मुलगा म्हणाला, 'बाबा, तुमची आज्ञाच आहे, तर मी घरातून जातो. पण तुम्ही म्हणता तशी, मला भीकच मागावी लागेल असे मात्र नाही. कुणी सांगावं ? एखाद् वेळी रस्त्याच्या बाजूला बसून लोकांकडून भिक्षेचा स्वीकार करण्याऐवजी मी सिंहासनावर बसून लोकांकडून येणारे नजराणेसुद्धा स्वीकारीन. कारण ज्याला जे मिळायचे असते ते त्याला मिळतेच मिळते.' असे म्हणून तो मुलगा घराबाहेर पडला.

मग भटकत भटकत तो एका नगरात गेला. कुणी त्याला 'तू कुठून आलास ?' असे विचारले की तो 'प्राक्तनपुराहून' असे उत्तर देई. कुणी त्याला 'तुझं नाव काय ?' असा सवाल केला की, तो 'भाग्यदत्त' असा जबाब देई.

एके दिवशी त्या नगरातील एका महोत्सवाला देशोदेशीचे राजे व राजकुमार आले होते. त्या नगरात राहणारी चंद्रावती नावाची तरुण व सुस्वरूप राजकन्या हीसुद्धा आपल्या एका दासीसह तो उत्सव पाहायला गेली होती. मध्येच तिचे लक्ष एका अत्यंत देखण्या व रुबाबदार तरुणाकडे गेले आणि 'हाच आपला पती व्हावा, ' असे तिच्या मनात आले.

तिने लगेच आपल्या दासीसंगे त्याला आपले मनोगत कळविले व भेटीसाठी गुपचूप रात्री राजवाड्यातील आपल्या महालात येण्याबद्दल विनविले. राजवाड्याच्या दर्शनी बाजूला शिपायाचा खडा पहारा असल्याने, वाड्याच्या उजव्या कुशीकडील पहिल्या मजल्यावरच्या महालाच्या खिडकीतून खाली एक जाड दोरखंड सोडले जाईल व त्याच्या आधारानेच चंद्रावतीदेवींच्या महालात जाता येईल, असेही त्या दासीने त्या राजकुमाराला सांगितले. ही राजकन्या आपल्याला अगदी हवी तशीच आहे, असा विचार करून, त्या राजकुमारानेही तिच्याकडे येण्याचे मान्य केले. परंतु रात्री प्रत्यक्ष त्या राजकन्येकडे जाण्याची वेळ झाली असता, तो स्वतःशी म्हणाला, 'चंद्रावतीचा पिता हा सम्राट असून, आपला पिता हा त्याचा मांडलिक आहे. मग एका अर्थी तिचा पती आपला स्वामी असताना आणि गुरू, मित्र, स्वामी किंवा सेवक यांच्या घरातील स्त्रियांकडे पापदृष्टीने पाहाणे हे धर्माविरुद्ध असताना, चंद्रावतीकडे जाणे अयोग्य आहे का ?' मनात असा विचार येताच, त्या राजकुमाराने तिच्याकडे जाण्याचा बेत रद्द केला.

योगायोगाने त्याच रात्री भाग्यदत्त हा वाड्यावरून चालला होता. त्याने त्या वाड्याच्या पहिल्या मजल्यावरच्या खिडकीतून खाली लोंबत असलेला दोरखंड पाहिला. तो मनात म्हणाला, 'ज्या अर्थी हा दोरखंड मुद्दाम खाली सोडला आहे, त्या अर्थी तो तसा मुद्दाम लोंबत ठेवण्याचा राजाचा काहीतरी हेतु असावा, हे स्पष्ट आहे. आपण चढून वर जायला काय हरकत आहे?' असे म्हणून तो राजाचा हेतु जाणून घेण्यासाठी त्या दोराच्या आधारे वर चढला आणि राजकन्येच्या महालात शिरला.

'आपला प्रियकरच आला आहे,' अशा समजुतीने चंद्रावतीने त्याचे अत्यानंदाने स्वागत केले. पण नंतर 'हा तो नव्हे' हे तिला उमजून आले. परंतु त्याच्या वागण्याने व बोलण्याने ती प्रभावित झाली. तिने त्याची माहिती काढली. 'आपल्याला हा तरुण, पती म्हणून आवडत असला, तरी हा एका साध्या वाण्याचा मुलगा असल्याने आपले वडील व विवाहाला मान्यता देणार नाहीत,' असे तिला वाटले. म्हणून तिने त्याला त्याच दोरीच्या आधारे निघून जाण्याची विनंती केली.

त्या महालातून खाली उतरल्यावर भाग्यदत्ताने ती उरलेली सर्व रात्र एका धर्मशाळेत घालविली आणि सकाळ होताच, भराभर प्रातर्विधी उरकून पुन्हा त्या नगरीतून फिरायला सुरुवात केली.

फिरता फिरता भाग्यदत्ताला, शृंगारलेल्या हत्तीवर बसलेला 'वरकीर्ती' नावाचा एक नवरदेव वर्‍हाडी मंडळींसह वधूपक्षाच्या वाड्याकडे चाललेला दिसला. तेवढ्यात एकाएकी काय झाले न कळे - तो हत्ती पिसाळला व चीत्कारत धावू लागला. त्याच्यावर बसलेल्या नवरदेवाने कशीबशी उडी मारून दूर पळ काढला. वर्‍हाडीमंडळींची ही पळापळ झाली. माहूत तर कुठल्याकुठे फेकला गेला ! भाग्यदत्त मात्र त्या हत्तीला आवरण्यासाठी त्याच्यापाठोपाठ धावू लागला.

योगायोगाने तो हत्ती रस्त्यालगत असलेल्या वधूपक्षाकडील मंडपाच्या प्रवेशद्वारापाशी गेला. तिथे नवरीमुलगी हाती पुष्पमाला घेऊन वराची वाट पाहात उभी होती. आता हा हत्ती तिला तुडवून मंडपात घुसणार, असे पाहून भाग्यदत्त एकदम त्या हत्तीच्या समोर उभा राहिला व ओरडून त्याला म्हणाला, 'हे गजश्रेष्ठा ! अरे सर्व पशूंमध्ये तू बुद्धिमान् ना ? मग तुला या नवर्‍यामुलीला तुडवून, या मंडपात चालू असलेल्या मंगलाचे अमंगल करणे पसंत पडेल का ? नाही ना ? मग शांत हो.' आणि काय चमत्कार ! भाग्यदत्ताचे हे शब्द ऐकून हत्ती एकदम स्तब्ध उभा राहिला ! आणि दुसर्‍याच क्षणी त्या नवरीने आपला प्राणरक्षक म्हणून भाग्यदत्ताच्या गळ्यात तो पुष्पहार घातला.

तिच्या पित्याला तिची ही कृती योग्यच वाटली व त्याने मंडपातल्या भटजींना वराच्या आसनावर भाग्यदत्ताला बसवून विवाहविधी सुरू करण्याची सूचना केली. पण तेवढ्यात सैरावैरा पळून गेलेला नवरदेव व त्याची वर्‍हाडी मंडळी मंडपात आली व नवर्‍यामुलीचे लग्न दुसर्‍याच कुठल्या तरुणाशी होत असल्याचे पाहून वधूपित्याशी कडाडून भांडू लागली.

त्याच वेळी त्या रस्त्याने राजकन्या चंद्रावतीसह राजा व राणी रथातून देवदर्शनाला चालली होती. मांडवात चाललेला गदारोळ ऐकून राजाने सारथ्याला रथ थांबवायला सांगून, घडलेला प्रकार समजून घेतला, व अतो संबंधितांना म्हणाला, 'या मुलीचे लग्न जरी वरकीर्तीशी ठरले असले, तरी हिला भाग्यदत्ताने वाचविले आहे व शिवाय हिच्याही मनात त्याच्याशीच लग्न करायचे आहे, तेव्हा हिच्या इच्छेला मान द्यायलाच हवा.'

पित्याने याप्रमाणे निर्णय देताच, त्याच वेळी मागे येऊन उभी राहिलेली चंद्रावती पुढे झाली आणि आदल्या रात्री घडलेली हकीगत पित्याच्या कानात सांगून नंतर उघड म्हणाली, 'पिताश्री, लग्नाच्या बाबतीत मुलीच्या इच्छेला मान द्यायलाच हवा, असं तुम्हीच नुकतेच म्हणालात ना ? मग या नवर्‍यामुलीच्या अगोदर मी या भाग्यवंतांना मनाने वरले असल्याने, खरे तर तिच्याऐवजी माझेच लग्न त्यांच्याशी झाले पाहिजे.'

राजा म्हणाला, 'ठीक आहे. भाग्यदत्ताचं लग्न दोघींशीही होईल. मला मुलगा नसल्याने, माझ्या पश्चात् तोच या राज्याचा राजा होईल आणि तुम्ही दोघीही त्याच्या राण्या व्हाल व सुखाने नांदाल.' आणि खरोखरच तसे झाले. मग राजा झाल्यावर भाग्यदत्ताने आपल्या आईवडिलांनाही आपल्याजवळ रहायला आणले व त्यांचे पुढले जीवन अतिशय सुखाचे झाले.'

ही गोष्ट मंथरक व लघुपतनक यांना सांगून हिरण्यक म्हणाला, 'मित्रांनो, एकतर 'माझ्या नशिबात जे असेल ते मला मिळेलच मिळेल' यावर माझा विश्वास आहे आणि दुसरे म्हणजे तुमच्यासारख्या मित्रांचे सहाय्य मला लाभले आहे, मग मला निराश होण्याचे काय कारण ?

मंथरक म्हणाला, 'हिरण्यका, अरे आम्ही तुला काय सहाय्य करणार ? खरं तर तुझ्यासारखा विचार व ज्ञानी मित्र आम्हाला मिळाला म्हणून आम्हालाच मोठा आधार वाटू लागला आहे. कारण खर्‍या मित्राविषयी असं म्हटलं जातं ना ?-

आपत्काले तु सम्प्राप्ते यन्मित्रं मित्रमेव तत् ।

वृद्धिकाले तु सम्प्राप्ते दुर्जनोऽपि सुह्रद् भवेत् ॥

(संकटाच्या वेळी जो मित्र म्हणून टिकून राहतो, तोच खरा मित्र. भरभराटीच्या काळात काय, एखादा दुष्टसुद्धा मित्र होऊ शकतो.)

मंथरक पुढे बोलू लागला, 'हिरण्यका, तुझ्यासारख्याला मी काय शिकवावे ? तरीही एक गोष्ट तुला सांगतो की, संपत्ती किंवा वैभव यांना लोक देतात तेवढे महत्त्व जीवनात नक्कीच नाही. म्हटलंच आहे ना ?-

अभ्रच्छाया खलप्रीतिः सिद्धमन्नं च योषितः ।

किंचित् कालोपभोग्यानि यौवनानि धनानि च ॥

(ढगाची सावली, दुर्जनाचे प्रेम, शिजवलेले अन्न, तरुण स्त्रिया, त्याचप्रमाणे तारुण्य व संपत्ती यांच्यापासून फार थोडा वेळ आनंद घेता येतो.)

मंथरक पुढे म्हणाला, 'त्यातून संपत्ती ही तर तशी फारच त्रासदायक आहे. ती मिळवताना, खर्च करताना, तिचे रक्षण करताना, अशा प्रत्येक वेळी वाट्याला यातनाच येतात. इतकेही करून समजा ती वाट्याला आली, तरी तिचा उपभोग घेण्याची व तिचे दान करण्याची अक्कल हवी ना ? नाहीतर नुसता धनाचा साठा करून पदरात काय पडणार आहे ? म्हणून तर त्या सोमिलिक कोष्ट्याने देवापाशी 'तू मला संपत्तीचा उपभोग घेणारा स्वामी कर' असा वर मागितला ना ?'

'ती गोष्ट काय आहे ?' असे लघुपतनक व हिरण्यक या दोघांनाही विचारले असता मंथरक म्हणाला, 'ऐका-

N/A

References : N/A
Last Updated : February 08, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP