कुसुमाग्रज या टोपणनावाने श्री. विष्णू वामन शिरवाडकर (१९१२-१९९९) यांनी मराठीत लेखन केले. ते एक प्रतिभासंपन्न, मानवतावादी, कथा, कादंबरीकार आणि नाट्यलेखक होत.
कुसुमाग्रज उत्तम समिक्षाकार म्हणून मान्यता पावले होते. कुसुमाग्रजांचे ’विशाखा’, ’जीवनलहरी’, ’किनारा’, ’स्वगत’, ’वादळवेल’ इ. नाटके, तर ’कल्पनेच्या तीरावर’, ’जान्हवी’ या कादंबर्या प्रकाशित आहेत. त्यांचे ’प्रतिसाद’ हे ललितलेखन छान पतिसाद देऊन जाते. आशावादातून आलेली सार्वकालिक विचारांची भव्य सामाजिक दृष्टी, निसर्ग आणि प्रेमभावना यांचा तरल काव्यात्मक बौद्धिक आविष्कार, ओजस्वी रचना ही त्यांच्या काव्याची प्रमुख वैशिष्ट्ये होत. ’ज्ञानपीठ’ या साहित्यातील सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले. इ.स. १९६४ मध्ये मडगाव महाराष्ट्र येथे पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
कुसुमाग्रजांच्या प्रत्येक विचारात, लेखनात स्वातंत्र्य आणि समता यांवर आधारित अधिष्टित जीवनमूल्यांची आश्वासकता असते. ओजस्वी रचना, मानवतेने ओतप्रोत ही त्यांच्या काव्याची प्रमुख वैशिष्ट्ये. जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेला आशावाद त्यांच्या रचनांतून स्पष्टपणे जाणवतो.
कुसुमाग्रजांच्या ’नटसम्राट’ नाटकाने मानवाच्या आयुष्यातील उत्तरकाळ, वृद्धत्वाला न्याय मिळवून दिला.