झिम्म्याची गाणी - संग्रह ४

श्रावणात माहेरी आल्यावर माहेरवाशीण झिम्मा घालताना ही गाणी म्हणतात.


१.

लोटझाड केली बाई पाण्याला गेली

इसारली माझी जोडवी ग सई न्हाई मला

कळल माझ्या सासूला ग मारली बाई मला

धावल्यात माझ्या दिराला ग दिना बाई मला

लोटझाड केली बाई पाण्याला गेली

इसरल्या माझ्या साकळ्या ग सई न्हाई मला

धावल्यात माझ्या दिराला ग दीना ती मला

कळल माझ्या सासूला ग मारीली मला

२.

सासुरवाशीण पाण्याला गेली

मगर मास्यान घागर नेली

साखळ्या देते दाजी

घागर काढून द्या जी

साकळ्या नको वैनी

घागर गेली पौनी

सासुरवाशीण पाण्याला गेली

मगर मास्यान घागर नेली

पैंजण देते दाजी

घागर काढून द्या जी

पैंजण नको वैनी

घागर गेली पौनी

३.

सासर्‍याच्या वाट कुच कुच काट

कोन पावना आला ग सई, हुः हुः

सासरा पावना आला ग सई, हुः हुः

काय घेऊन आला ग सई, हुः हुः

साखळ्या घेऊन आला ग सई, हुः हुः

नाही मी साखळ्या लियाची, हुः हुः

नाही मी गाडीत बसायची, हुः हुः

नाही मी सासर्‍या जायाची हुः हुः

४.

पंचमीच्या सणाला बंदू आला नियाला

बाई बंदू आला नियाला

जाऊ काय जी म्हायारला

तपकीर वडत्याला आत्तीईनू जाऊ काय जी म्हायारला

मला काय विचारती ग विचार तूझ्या सासर्‍याला

चिलीम वडत्याला मामाजींनू जाऊ काय जी म्हायारला

मला काय विचारती ग विचार तुझ्या दिराला

भांग पाडत्याल्या दाजीबानू जाऊ काई जी म्हायारला

मला काय विचारती ग विचार तुझ्या जावला

सैपाक करत्याल्या जाऊबाई जाऊ काई जी म्हायारला

मला काय विचारती ग विचार तुझ्या पतीला

आरशात बगत्याल्या पतींनो जाऊ काई जी म्हायारला

दोन दिवसाच्या बोलीन ग जाऊद्या राणी म्हायारला

५.

नणंद पावणी आली या तीला बसाया का टाकीना

असल तीत फाटक बोतार घेऊन का बसना

नणंद पावणी आलीया तीला पाणी का देईना

असल तीथ फुटका तांब्या घेऊन का पिईना

नणंद पावणी आलीया तीला जेवाई का वाढीना

आसल बुटीत शिळपाक घेऊन का खाईना

नणंद पावणी आलीया तीला पातळ का घेईना

आसल तीथ फाटक लुगड घेऊन का नेसना

नणंद पावणी आलीया तीन घालवत का जाई ना

आसल तीथ लंगडा घोडा बसून का जाईना

६.

दारी टिपूर चांदण भावज दिवा लाव ग

नणंद जाती सासर्‍या काय तो आनंद दाव ग

हाई इसाच लुगड नंदजोग न्हाई ग

दारी टिपूर चांदण भावज दिवा लाव ग

नणंद निघाली सासर्‍या काय तो आनंद दाव ग

हाई इसाच डोरल नंद जोग न्हाई ग

दारी टिपूर चांदण भावज दिवा लाव ग

नणंद निघाली सासर्‍या काय तो आनंद दाव ग

आहे ईसाची जोडवी नंदजोगी न्हाईत ग.....

७.

आंदण द्यावे भाऊराया काय देऊ भैनाबाई

तुझ्या दारातील जाई हाट पूरीव माझे आई

आंदण द्यावे भाऊराया काय देऊ भैनाबाई

तुझ्या दारातला चाफा हाट पूरव माझ्या बापा

आंदण द्यावे भाऊराया काय देऊ भैनाबाई

तुझ्या दारातला मक्का हाट पुरव माझे आक्का

आंदण द्यावे भाऊराया काय देऊ भैनाबाई

तुझ्या हातातला खवा हाट पूरव माझ्या भावा

आंदण द्यावे भाऊराया काय देऊ भैनाबाई

तुझ्या शेतातली भाजी हाट पूरव माझी आजी

८.

आग सकूबाई ग सासरा बोलवितोयी ग

तंबाकू बिंबाकू ऒढत आसल

चिलीम बिलीम घावत नसल

हुडकाई मला बोलवत आसल

येत नाही म्हणून सांग ग

आग सकूबाई ग दीर बोलवितोयी ग

भांग बिंग पाडत असल

फनी त्याला घावत नसल

हुडकाई मला लावत असल

येत नाही म्हणून सांग ग

आग सकूबाई ग सासू बोलवितीया ग

तपकीर बिपकीर ओढत असल

डबी तिला घावत नसल

हुडकाई मला लावत असल

येत नाही म्हणून सांग ग

आग सकूबाई ग नणंद बोलवितीया ग

गडयीन तिची आली असल

सुपली तीला घावत नसल

हुडकाई मला लावत असल

येत नाही म्हणून सांग ग

आग सकूबाई ग जावू तुला बोलवितीया ग

भाक्री बिक्री करत असल

कारट तिच रडत आसल

मलाच घे म्हणत असल

येत नाही म्हणून सांग ग

आग सकूबाई ग पती तुझा बोलवितोय ग

अंघोळ बिंगोळ केली असल

अरशातबिरशात बघत असल

त्यात मी त्येला दिसत आसल

येते म्हणून सांग ग

९.

ताटात वाटी, वाटीत दही, तिथे आमचे मामंजी जेवत होते

मामांजी मामंजी म्हणत होते बाई ग

बंधु आले नियाला धाडीता का नाही हो

सोन्याचा डेरा चांदीची रवी

तिथ आमच्या आत्याबाई ताक करत होत्या

आत्याबाई, आत्याबाई, म्हणत होते बाई ग

बंधु आले नियाला धाडीता का नाही हो

सोन्याची सुपली मोत्यांनी गुंफली

तिथ आमच्या दिवाणसाब खेळत होत्या

दिवाणसाब, दिवाणसाब, म्हणत होते बाई ग

बंधु आले नियाला धाडीता का नाही हो

सोन्याचा दांडू चांदीची विटी

तिथ आमचे रावसाब खेळत होते

रावसाब, रावसाब, म्हणत होते बाई ग

बंधु आले नियाला धाडीता का नाही हो

सोन्याची चूल गीलवी फरशी

तिथे आमच्या बाईसाब सैपाक करत होत्या

बाईसाब, बाईसाब, म्हणत होते बाई ग

बंधु आले नियाला धाडीता का नाही हो

सोन्याची दौत चांदीची लेखनी

तिथ आमचे पतिराज लिहीत होते

पतिराज, पतिराज, म्हणत होते बाई ग

बंधु आले नियाला धाडीता का नाही हो

आणा फणी घाला वेणी

जाऊ दे राणी माहेराला

१०.

घुंबर पोरी घूंबर ॥ घुंबर कशी घालू ॥

आडूशाला लाडू ॥ दहीभात वाढू ॥

आईबापाला सांगत हुते ग सांगत हुते ॥

नको देऊसा गडकर्‍याला ग गडकर्‍याला ॥

आपण बसल्यात घरामंदी ग घरामंदी ॥

मला धाडत्यात पाण्याला ग पाण्याला ॥

खडे बोचत्यात पायायाला ग पायायाला ॥

आसू येतया डोळ्यायाला ग डोळ्यायाला ॥

घुंबर पोरी घुंबर घुंबर ॥ कशी घालू ॥

आडूशाला लाडू ॥ दहीभात वाढू ॥

आई बापाला सांगत हुते ग सांगत हुते ॥

नको देऊसा मास्तराला ग मास्तराला ॥

आपण बसल्यात खुर्चीवरी ग शाळेमंदी ॥

मला धाडत्यात भांगलणीला ग भांगलणीला...... ॥

११.

लेकी तुझे डोहाळे कशा ग वरी

आई, आंब्याच्या घोसा ग वरी

आंब्याच घोस चौरंगी बैस

लेकी तुझे डोहाळे कशा ग वरी

आई, कारल्याच्या घोसा ग वरी

कारल्याचे घोस चौरंगी बैस

लेकी तुझे डोहाळे कशा ग वरी

आई, वाळकीच्या घोसा ग वरी

वाळकीचा घोस चौरंगी बैस.....

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP