२१.
बांगडीचा हात न्हाई देत काकनाला
बंधुजी चला पुढल्या दुकानाला.
२२.
वैराळ्दादा बैस सोप्याच्या पायरी
मैना गेलीया बाहेरी
२३.
हौस मला मोठी नागमोडी कांकनाची
बयाच्या गावापाशी वाडी वसली वैराळाची
२४.
हिरवा कारला वैराळाच्या बैलावरी
बंधु बैसला पारावरी, माझा छंद नानापरी
२५.
वैराळदादा बैस ,सोप्याच्या साउलीला
बया गवळणीला विनविते माऊलीला.
२६
बारीक बांगडी हातात शिलका भारी
राधा हौदाला पाणी भरी.
2७.
वैराळदादा तुझ माझ काय नात?
चुडयाकारण दिला हात
२८.
बारीक बांगडी फुटली काचेची
हौशाच्या जीवावर उद्या भरीन पाचेची
२९,
सांगून धाडते दूरदेशीच्या कासाराला
मैना जायाची सासर्याला.
३०.
अंबुर डाळिंबी भल्याभल्याला लावी बट्टा
राजवर्खीचा दर मोठा
३१
माडीवर माडी वर कासाराची आस्था
बांगडी ल्यायले बोरीबंदर सात रस्ता
३२
वैराळशेजारी शिंपीदादा देई पाल
चोळॊपरीस चुडा लाल
३३.
हात भरीला काकनान माय बघे खालवर
न्हाई जोडीचा बिलवर
३४.
नागमोडी बिलवर, बारा आन्याला ल्याले जोडी
हौशा भरतार हंसत चंची सोडी
३५
अबुर डाळिंबी कशान पिचकली
गोर्या हाता दृष्ट झाली .
३६.
हात भरुन बांगडया मागं पाटलीचा थाट
गुजर माझ्या बाई लेन्याचा परिपाठ
३७.
कांकन ल्याला गेले माझ्या हाताची कांब रुंद
बिलवरामंदी लेते बाजुबंद.
३८.
गोंडाळ माझ हात बयाच्या नदरेत
कापीव बिलवर बांधीते पदरात.
३९.
गोंडाळ माझ हात बंधुच्य सपना
सोन्याचे बिल्लोर , मला धाडीले टपालांत
४०.
वैराळ्दादा भर बिलवरांमदी छंदु
मोल द्यायाचा माझा बंधु