१
राम म्हनुं राम, राम माझ्या कंठीच कारलं
सद गळ्यामंदी वागवीलं
२
राम म्हनु राम, राम माझा गुरू भाऊ
त्येच्या नांवानं कुडी वैकुंठाला जाऊ
३
राम म्हनु राम, राम माझा मैतर
त्येच नांव घेतां ध्याई झाली पवितर
४
सत्तेनारायण पूजा माझ्या वाडयामंदी होती
आणि मला चंडाळ झोप येती
५
बाळाबाईला द्यावी कृष्णाकडेच्या भाग्यवंता
जनालोकाचं तीरथं, तुझा धुन्याचा पानोठा
६
काय पुन्य केलं, तुम्ही नाशिकच्या बाया
अंगुळीला गोदावरी दरसनाला रामराया
७
जीवाला माझ्या जड, येती कोन सेनापती
रामाच्या रथामंदी उभं, ईश्वर- पारवती
८
जीवाला माझ्या जड, येत्यात कोन दोघं
म्होर शंकर , गिरीजा मागं
९
संसाराचा गाडा ओढतां ओढवेना
हात लावावा नारायेणा
१०
आळंदी देहूला इंद्रायणी मारी झापा
सोपानकाका तुझ्या समाधीवर चाफा
११
कृष्णापंचगंगेचा संगम कुठं झाला
द्त्तमहाराजांनी औदुंबरी वास केला
१२
पंचगंगेपरीस कृष्णाबाई किती धीट
जाते द्त्तगुरूच्या पायावरी नीट
१३
सयानु पाहू चला वाडी गावीचा न्हानीधोंडा
द्त्ताच्या अंगुळीला आला पंचगंगेचा लोंढा
१४
पहाटेच्या पारामंदी कृष्णाबाई झोपी गेली
रामाच्या अंगुळीला मारूतीनं जागी केली
१५
चला सयानु पाहूं, वई देशाचा दंडक
सत्याची कृष्णाबाई वर सोन्याचा मंडप
१६
कृष्णाबाई बोले, कोयना उशीर कां ग झाला
आले लोटीत झाडपाला
१७
देवामंदी देव महाबळ कपटी
वाईदेशामंदी कृष्णा लाविली एकटी
१८
कृष्णाबाई बोले कोयना अवखळ बहिणी
थीर चालावे माझावाणी
१९
बारा वर्षानी बहीण भागीरथी आली
कृष्णा उठून भेटली, कोयना हुंदक्यानं दाटली
२०
वडील कृष्णाबाई धाकुटी भागिरथी
दोघांची झाली भेटी, बारा वर्षाच्या कन्यागती
२१
किती सांगुं बाई वाडी गांवची नवलाई
घाटाखालुन वाहे कृष्णाबाई
२२
भरली कृष्णाबाई कोयना आली नीट
कर्हाडाला झाला संगम प्रीती दाट
२३
रूसली कृष्णाबाई निघाली वाईदेशा
महाबळेश्वर कंथ, समजवीतो कसा
२४
कृष्णाबाई बोले , कोयना अवखळ तुझ्या लाटा
तुझ्यापायी मला लागतसे बट्टा
२५
दृष्ट ही ग झाली, अनुसयेच्या बाळाला
विसुबंदाचं रोप कृष्णाबाईच्या घोळाला