केकावली - प्रसंग ४

केकावली हे उत्कृष्ट वीणाकाव्य तसेच ध्वनीकाव्य आहे. केकावलीतील मुख्य रस भक्ति असून करून रस त्याचा अंगभूत आहे.


म्हणे-स्वकृतिच्या उणे किमपि एक वर्णी न हो;

असे तुज कधी बरे विगतशंक वर्णीन हो !

असेचि अशि आवडी, करिसि कां न अत्यादर ?

स्वभक्तसुरपादपा ! हरि ! नसेचि सत्या दर ॥६१॥

ध्रुव स्तवनि आवडी धरि, म्हणोनि अत्यादरे

तुम्ही करुनि दाविली, शिवुनि गल्ल सत्या दरे ।

तसे मज करा, करांबुज धरा शिरी मावरा !

वराभयपरा ! पराक्रमपटो ! मना आवरा ॥६२॥

करांबुज असो. नसे उचित त्यास मी पामर;

प्रणाम करिती पदाप्रतिहि सन्मुनी सामर; ।

पदाब्जरजही जगत्रयनमस्क्रियाभाजन;

प्रसादचतुरा ! कसा तरि करा बरा हा जन ॥६३॥

तुम्ही करुनि दाविला ध्रुव कृतार्थ जैसा दरे,

तसेचि जरि योजिले तुमचिया मनें सादरे, ।

असो; विहित ते करा; परि बरोबरी त्यासवे

नसे उचित; तो महाप्रभळ, वंदिजे वासवे ॥६४॥

किती वय ? कसे तप प्रखर ? काय विश्वास तो ?

ध्रुव ध्रुव खरा; स्तवा उचित होय विश्वास तो; ।

कशी तुळितसा तुम्ही प्रकट मेरुशी मोहरी ?

प्रसाद करितां उणे अधिक नाठवा, हो ! हरी ! ॥६५॥

प्रभुत्व तरि हेच की करुनि दे कृपा दान ते,

स्वसाम्य यदुपार्जने मिरविजे स्वपादानते, ।

प्रसाद मग काय तो? जरि निवारिना लाघवा ?

कसे दशमुखानुजा विसरलां ! अहो ! राघवा ! ॥६६॥

असो वरि कसा तरी, विमल भाव ज्याचा, करा

तयावरि दया; पचे वर, असाचि द्या चाकरा ।

वृथाचि गमते दिले, बहुहि, जे न दासा जिरे;

पुसोनि अधिकार द्या; सुकर ते सदा साजिरे ॥६७॥

प्रसन्न बहु होतसां, परि कराल हो ! बावरे

शिवापरि वरासवे ह्रदय, हे न हो बा ! वरे; ।

असा वृक कृतघ्न हे न कळले कसे हो ! हरा ?

भला जगविला तुम्ही भवमहाहिचा मोहरा ॥६८॥

भजे सुदृढनिश्चये द्विजकुमारक क्षीरधी,

तया करि तुम्हीच द्या मदनमारक ! क्षीरधी; ।

उदारपण ते बरे, सुखवि जे सुपात्रा सदा;

दिले अमृत पन्नगा, तशि खळी कृपा त्रासदा ॥६९॥

अतिप्रिय, सुखप्रद, प्रथम तूं मुदंभोद या

मयूरह्रदया; तुझी क्षण विटो न शंभो ! दया; ।

उदारपण वानिले; अजि ! गुरूपहासा बळे

कसे करिल लेकरू ? निपट हे पहा साबळे ॥७०॥

(हरिहरांचे अभिन्नत्व.)

तुम्हा हरिहरांत ज्या दिसतसे, दिसो; ’वास्तव’

प्रबुद्ध म्हणती ’नसे तिळहि भेद;’ मी यास्तव ।

म्हणे मनि, ’यथार्थ जे स्वमत वर्णिती शैव ते

न; वैष्णव दुराग्रही; परम मुख्य ही दैवते.’ ॥७१॥

म्हणे क्षण पुरांतक, क्षण मुरांतक; ब्राह्मणा

मला जरि म्हणाल वा ! तरि विशंक लुब्रा म्हणा; ।

तुम्हां शिव, शिवा तुम्ही भजतसां; शुक, व्यास हा

सदर्थ वदले; पुरातन कथा, न नव्या, सहा. ॥७२॥

(व्यासस्तवन)

तुझाचि अवतार तो सुत पराशराचा; वळे,

तदुक्तिस जन; प्रभो ! जरि निजेमधे चावळे ।

तरि, त्रिभुवनेश्वरा ! तव विशुद्ध नामावली

मुखी प्रकट होय, जी करि सुखी जना मावली ॥७३॥

(भगवन्नाममाहात्म्य)

तुझे कुशळ नाम बा ! हळुहळू मना आकळी;

दुरत्यय असा महा खळहि त्यास भी हा कळी; ।

हरि व्यसन पाप हे बहु कशास ?

कायाधवा-परि त्वरित भेटवी तुजहि, योगमायाधवा ! ॥७४॥

तुम्हांसमचि हे गुणे; अणु उणे नसे नाम; हा

दिसे अधिकही, तसा गुण तुला असेना महा; ।

सदैव भलत्यासही सुलभ; आणखी गायका

छळी न, न अधोगति क्षणहि दे जगन्नायका ! ॥७५॥

(बळीभक्ताचा छळ व त्याची सहनशीलता.)

छळी नृप बळी बळी, तरिच तो नसे आटला;

गमे बहु भला मला न, सकळांसही वाटला;

परीक्षक करी, तसे जडहि सोशिते हेमही;

न केवळ विरोचनात्मज तरे पदे, हे मही ॥७६॥

(भक्तच्छळाची आवश्यकता)

असा न करिता जरी छल, तरी प्रभो ! तो भली

सुकीर्ति कशि पावता कविसभा जिणे शोभली ? ।

पदी उपजती नदी कशि? कशी त्रिलोकी सती

अशा अतुल मौक्तिकावलिविणे बरी दिसती ? ॥७७॥

(छळ सोसण्याविषयी कवीचे असामर्थ्य)

नको छळ; अधीर मी; तशि न कीर्ति हो; चामरे

नृपासि उचिते; वृथा, मिरविली जरी पामरे; ।

अकीर्तिच असो, रुचे तुज कशी व्रजी कांबळी ?

असे न समजा कसे? वरिल हारिला कां बळी ?॥७८॥

छळाल कृपणासि कां ? अजि ! दयानिधे ! कांपिती

भटासि भट संगरी, परि न कातरा दापिती; ।

कराल तितुकी कृपा बहु; अहो ! शरण्या ! तमी

बुडोनि शरणागत श्रमतसे अरण्यात मी ॥७९॥

(रामावतारस्मरण-रामवनवास)

मुखासि जव पातली ’श्रम’, ’अरण्य’ ऐशी पदे,

निजस्मृतिस जाहली विषय ती तव श्रीपदे,

गुरुक्तिस करावया सफळ, जानकीजीवना !

धरासुरतपःफळे त्वरित धावली जी वना ॥८०॥

N/A

References : N/A
Last Updated : August 19, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP