हरिविजय - अध्याय ११
श्रीधरांसारखा भगवंताच्या भक्तिप्रेमात न्हाऊन गेलेला अजोड कवी, गोपालकृष्णाच्या अति गोड लीलांचे वर्णन करतो, तेव्हा काय बहार येते.
श्रीगणेशाय नमः ॥
जय जय इंदिरावरा श्रीरंगा ॥ निजजनहृत्पद्मनीलभृंगा ॥ अज अजिता अव्यंगा ॥ सकलरंगातीत तूं ॥१॥
नीलग्रीवभूषणारिरोहणा ॥ पयोब्धिहृदयरत्नमनमोहना ॥ सरसिजोद्भवजनका नीलवर्णा ॥ सप्तावरणांवेगळा तूं ॥२॥
अनंतकोटिकामसुंदरा ॥ सकलरंगचालका परम उदारा ॥ अमला पराभारतीअगोचरा ॥ निर्विकारा निर्द्वंद्वा ॥३॥
भवनागविदारकपंचानना ॥ विद्वज्जनमनमांदुसरत्ना ॥ नाकळसी पंचास्याच्या ध्याना ॥ सकलकल्याणनिकेतना तूं ॥४॥
दुर्जनदानवकुलनिकृंतना ॥ अरिवर्गप्रतापभंजना ॥ गहनमायाविपिनदहना ॥ तमनाशना ज्ञानसूर्या ॥५॥
अगम्य तूं दशशतनयना ॥ न वर्णवसी दशशतवदना ॥ दशशतहस्ताचियां किरणां ॥ नाढळसी तूं शोधितां ॥६॥
निकटभीमातटविहारा ॥ आदिपुरुषा श्रीदिगंबरा ॥ ब्रह्मानंदा श्रीधरवरा ॥ पुढें चरित्र चालवीं ॥७॥
दशमाध्यायाच्या अंतीं कथा ॥ हरीसी स्तवोनि नारदपिता ॥ गोपवत्सें देऊनि मागुता ॥ निजस्थानासी पावला ॥८॥
यावरी प्रातःकाळीं एके दिवशीं ॥ गोगोप घेऊनि वैकुंठविलासी ॥ आला तमारिकन्यातीरासी ॥ लावण्यराशि जगदात्मा ॥९॥
उष्णकाल वसंतमास ॥ मध्यान्हासी आला चंडांश ॥ त्याच्या करप्रतापें सकलांस ॥ तृषा विशेष वाढली ॥१०॥
धांवती गाईंचे कळप ॥ कृतांत भगिनीतीरासमीप ॥ पया र्हदीं कालिया दुष्ट सर्प ॥ महादुर्मति वसे तेथें ॥११॥
जगद्वंद्यास टाकूनि मागें ॥ गोगोप पुढें धांवती वेगें ॥ हरि समीप नसतां कर्मभोगें ॥ प्राप्त झालें दुःख पैं ॥१२॥
सेवितांचि यमुनाजीवन ॥ गोगोप झाले गतप्राण ॥ यमानुजातीरीं मृत्युशयन ॥ सकळीं केलें एकदां ॥१३॥
दुरावतां धराधरतनुशयन ॥ अकल्पित विघ्नें पडती दारुण ॥ यालागीं कमलपत्राक्षाचे चरण ॥ न विसंबावे सर्वदा ॥१४॥
हातीं वंशवाद्य घेऊन ॥ तेथें पावला पद्माक्षीरमण ॥ तंव ते अनाथ प्रेतें होवोन ॥ गोगोपाल पडियेले ॥१५॥
ऐसें देखोनि कृपार्णवें ॥ निजवल्लभें कमलाधवें ॥ करुणाकरें विलोकितां आघवे ॥ निद्रिस्तापरी उठती ॥१६॥
अनंतब्रह्मांडींचे प्राणी ॥ जीववी जो कृपावलोकनीं ॥ तेणें गोप धेनु तेच क्षणीं ॥ कृपाकटाक्षें उठविलीं हो ॥१७॥
मग उठोनि ते वेळां ॥ तटस्थ विलोकिती तमालनीला ॥ म्हणती याचे हातीं जीवनकला ॥ सकल जीवांच्या असती हो ॥१८॥
आम्ही प्राशितां विषजीवन ॥ समस्त पडिलों कुणपें होऊन ॥ येणें कृपेचें करुनि निकेतन ॥ आमुचे प्राण रक्षिले ॥१९॥
असो मनीं विचारी जगदात्मा ॥ कालिंदीर्हदीं हा दुष्टात्मा ॥ यास दवडावें न करावी क्षमा ॥ तरीच सर्वां सुख होय ॥२०॥
परमदुष्ट हा अहि साचार ॥ सळसळां पुढें यमुनेचें नीर ॥ जिकडे उदकावरुनि जाय समीर ॥ तिकडे संहार चराचरजीवा ॥२१॥
अंतरिक्षें द्विज जातां उडोन ॥ मृत्यु पावती चडफडोन ॥ कालियानयनींचा पेटतां अग्न ॥ वनें जळोनि भस्म होतीं ॥२२॥
तेथींचा जिकडे जाय प्रभंजन ॥ तिकडे वृक्ष जाती जळोन ॥ मग तें कोण प्राशील जीवन ॥ स्पर्शही जाण न करवे ॥२३॥
त्याच डोहीं येऊन ॥ कालिया वसावया काय कारन ॥ पूर्वीं सर्व उरग मिळोन ॥ माधववहना शरण गेले ॥२४॥
म्हणती तूं आमुचा संहार करिसी ॥ तरी अभय देईं एक आम्हांसी ॥ तवं सुपर्ण म्हणे प्रतिवर्षीं ॥ पूजा नेमेंसीं पैं देणें ॥२५॥
सर्वीं मान्य केलें वचनासी ॥ भाद्रपदशुद्ध पंचमीचे दिवसीं ॥ आदरें पूजावें विनायकासी ॥ तरीच सर्पासी निर्भय ॥२६॥
एक रथभरी अन्न ॥ त्यावरी एक उरग ठेवून ॥ देती खगपतीस नेऊन ॥ नेमेंकरुन प्रतिवर्षीं ॥२७॥
तों हा कालिया मदें करुन ॥ न पूजी अरुणानुजालागून ॥ तें विहंगोत्तमें एकोन ॥ म्हणे जिवें मारीन कालिया ॥२८॥
अंडजप्रभुभेणें लपावया ॥ ठाव कोठें न मिळे कालिया ॥ तों यमुनाडोहीं त्या पक्षिवर्या ॥ शाप होता पूर्वींचा ॥२९॥
यमुनाजीवनींचे मत्स्य काढोनी ॥ उरगरिपु भक्षीं अनुदिनीं ॥ तों तेथें सौभरी नामें महामुनी ॥ भानुजातीरी तप करी ॥३०॥
मत्स्य अवघे मिळोन ॥ सौभारीस गेले शरण ॥ म्हणती तूं साधु येथें असोन ॥ आम्हांलागून गरुड मारी ॥३१॥
मग मत्स्यकैवारें वदे सौभर ॥ येथींच्या जीवना स्पर्शतां खगेंद्र ॥ तत्काळ मृत्यु पावेला साचार ॥ ऐकोनि मत्स्य सर्व तोषले
॥३२॥
तें विष्णुवहनें जाणोन ॥ पुनः त्यजिलें तें स्थान ॥ त्या र्हदीं कालिया म्हणून ॥ राहिला येऊन द्विजेंद्रभयें ॥३३॥
असो ऐसा दुष्ट अही ॥ नेत्र उघडोनि जिकडे पाही ॥ वृक्षवनें जळती सर्वही ॥ पाषाणही उलती हो ॥३४॥
एक कदंबवृक्ष राहिला ॥ वरकड वृक्षांचा संहार जाहला ॥ तरी त्यावरी पूर्वीं खगपति बैसला ॥ सुधारघट नेतां हो ॥३५॥
घट ठेविला होता पलमात्र ॥ तेणें अमर झाला तरुवर ॥ यालागीं कालियाविष दुर्धर ॥ न जाळी त्या कदंबा ॥३६॥
सिंहावलोकनें तत्त्वताम ॥ श्रोते हो परिसा मागील कथा ॥ यमुनातीरीं जगत्पित्याचा पिता ॥ उठवीं प्रेतें सकलही ॥३७॥
मनांत इच्छी स्कंदतातमित्र ॥ हा काढावा येथूनि अमित्र ॥ म्हणोनि कदंबावरी श्रीधर ॥ चढे साचार तेधवां ॥३८॥
उदयाचलावरी सहस्त्रकार ॥ तैसा दिसे क्षीराब्धिजावर ॥ कीं ऐरावतारुढ सहस्त्रनेत्र ॥ त्रिभुवनेश्वर तैसा दिसे ॥३९॥
तो वैकुंठींचा सुकुमार ॥ श्यामसुंदर नन्दकुमर ॥ कदंबावरी श्रीधर ॥ दीनोद्धार शोभतसे ॥४०॥
कालियामर्दन आरंभिलें जेव्हां ॥ सहा वर्षांची मूर्ति तेव्हां ॥ ऊर्ध्ववदनें कमलाधवा ॥ गोप सर्व विलोकिती ॥४१॥
परम सुवास पीतवसन ॥ दृढ कशिलें स्वकरेंकरुन ॥ सुरंग पदर खोवून ॥ मुक्तमाळा सांवरिल्या ॥४२॥
कटिसूत्र सरसाविलें ॥ कर्णीं रुळती दिव्य कुंडलें ॥ आकर्णपर्यंत नेत्रोत्पलें ॥ मुख विकासिलें सुहास्य ॥४३॥
सुनीळ रसें ओतिले अखंड ॥ तैसे आजानुबाहु दंड ॥ ते बळें वाजवूनि प्रचंड ॥ हांक फोडिली तेधवां ॥४४॥
तों वैकुंठींचा वेल्हाळ ॥ सुकुमारतनु तमालनीळ ॥ उडी घातली तत्काळ ॥ गोप सकळ पाहती ॥४५॥
उडीसरसें जीवन त्या वेळे ॥ शतधनुष्य उंच गेलें ॥ कल्लोळ तीरास आदळले ॥ विषनीराचे तेधवां ॥४६॥
परम अद्भुत केलें गोपाळें ॥ अदितिसुत सकळ धांवले ॥ विमानारुढ पाहों लागले ॥ अद्भुत कर्तव्य हरीचें ॥४७॥
मृडानीसहित मदनदहन ॥ शचीसहित सहस्त्रनयन ॥ सावित्रीसहित कमलासन ॥ कौतुक पाहों धांविन्नले ॥४८॥
मित्रकन्याजीवनीं जगज्जीवन ॥ भुजदंड आफळी क्रोधायमान ॥ परम दारुण घोष ऐकोन ॥ धांवे दुर्जन अही तो ॥४९॥
महाकपटी सर्प काळा ॥ शत फणा ताठरा विशाळा ॥ धुधुःकारासरशा ज्वाळा ॥ महाकराळा उठती पैं ॥५०॥
नेत्रीं देखिला जगन्मोहन ॥ मायाचक्रचालक शुद्धचैतन्य ॥ जें मीनकेतनारीचें देवतार्चन ॥ सनकादिक ध्याती जया ॥५१॥
सनकादिकांच्या हृदयसंपुटीं ॥ जे का पहुडे मूर्ति गोमटी ॥ पद्मोद्भव आणि धूर्जटी ॥ वाहती मुकुटीं आज्ञा ज्याची ॥५२॥
असो ऐसिया मुरमर्दना ॥ राजीवनेत्रा सुपर्णवहना ॥ कालिया देखोनि व्रजभूषणा ॥ धांवोनि डंखी वर्मस्थळीं ॥५३॥
दंश करुनि स्थळीं स्थळीं ॥ वेढे घालूनि आंवळिलें ॥ सच्चिदानंदतनू सांवळी ॥ आच्छा दिली काळसर्पें ॥५४॥
जो विद्वज्जनमानसमराळ ॥ अनंतकल्याणदायक घननीळ ॥ जो पुराणपुरुष भक्तवत्सला ॥ सर्पें सकळ आंवळिला ॥५५॥
राहूनें ग्रासिला वासरमणी ॥ केतु रमाबंधूस झांकी गगनीं ॥ कीं ईश्वरास माया वेष्टूनी ॥ आपुली करणी दावीत ॥५६॥
कीं पूर्वी दंशराथात्मजांसी ॥ पाकशासनशत्रु बांधी नागपाशीं ॥ तैसें कालियानें जदद्वंद्यासी ॥ वेढे घालूनि आंवळिलें ॥५७॥
भुजंगें वेष्टिला परमपुरुष ॥ न हाले न बोले हृषीकेश ॥ लीलावतारी जगन्निवास ॥ लीला भक्तांस दावीतसे ॥५८॥
ऐसा देखताम श्रीपती ॥ गोप गाई तीरीं पाहती ॥ महाआक्रोशें हांक देती ॥ हृदय पिटिती धबधबां ॥५९॥
गगनीं पाहती निर्जर ॥ देवललना देखती समग्र ॥ त्यांच्या नेत्रीं वाहे नीर ॥ शोक अपार जाची तयां ॥६०॥
तटस्थ पाहती नयनीं ॥ भुजंगें वेष्टिला चक्रपाणी ॥ त्या दुःखेंकरुनि धरणी ॥ उलों पाहे तेधवां ॥६१॥
हा यमुनेसी जाहला वृत्तांत ॥ गोकुळीं काय वर्तली मात ॥ दुश्चिन्हें परम अद्भुत ॥ जाणवती लोकांतें ॥६२॥
चपला पडती कडकडोन ॥ अद्भुत सुटला प्रभंजन ॥ उडुगण पावती पतन ॥ लोक शोकें विव्हळ ॥६३॥
कांपों लागली धरित्री॥ उगेच अश्रु येती जननेत्रीं ॥ कलाहीन नरनारी ॥ भय अंतरीं वाटतसे ॥६४॥
कमलापतीची जननी ॥ परम विव्हळ शोकेंकरुनी ॥ तिडकूं लागले स्तन दोन्ही ॥ अश्रु नयनी वाहती ॥६५॥
मिळाले गौळी गोपी समस्त ॥ नंदही धांवे भयभीत ॥ यशोदा बाहेर आली धांवत ॥ रोहिणी येत लवलाहें ॥६६॥
घरीच होता संकर्षण ॥ बाहेर आली धांवोन ॥ यशोदा म्हणे जगज्जीवन ॥ कोण्या वनांत गेला रे ॥६७॥
सांडूनियां घरदार ॥ वनांत जाती लोक समग्र ॥ बाळें संगती जाती सत्वर ॥ श्यामसुंदर पहावया ॥६८॥
वृद्धें सांडूनि देहगेह आशा ॥ पाहों इच्छिती परमपुरुषा ॥ म्हणती काय जाहलें हृषीकेशा ॥ कोण्या वनीं पाहावें ॥६९॥
तों ध्वजवज्ररेखाचिन्ह ॥ हरिपदमुद्रा देखती जन ॥ भोंवतीं गोपदें सधन ॥ पुढें गोचरण उमटले ॥७०॥
जिकडे उमटले गाईंचे खूर ॥ त्याच पंथें गेला मुरहर ॥ जैसे वेदश्रुतींचे भार ॥ स्वरुप निर्धार दाविती ॥७१॥
असो नंद यशोदा सकळ जन ॥ आले यमुनातीरा धांवोन ॥ तंव तेथें गोप शोकेंकरुन ॥ मूर्च्छा येऊन पडताती ॥७२॥
तों भुजंगें वेष्टिला वनमाळी ॥ सर्वीं देखिला तेचि वेळीं ॥ एकचि हांक तेव्हां जाहली ॥ तो शोक वर्णिला नव जाय ॥७३॥
यशोदा म्हणे गा कान्हया ॥ आतां तुज कोठें पाहें तान्हया ॥ बा रे धांव कां लवलाह्या ॥ विसांविया गोपाळा ॥७४॥
स्तनीं दाटलासे पान्हा ॥ कोणास पाजूं राजीवनयना ॥ माझिया पाडसा मनमोहना ॥ निजवदना दावीं रें ॥७५॥
धांव धांव गे माझे कान्हाई ॥ सांवळे सुकुमारे सखेबाई ॥ उदार डोळसे कृष्णबाई ॥ कोणे ठायीं पाहूं तूं तेम ॥७६॥
दधि दुग्ध तूं सर्व खासी साई ॥ राजसा मी तुज न बोलें कांहीं ॥ पाडसा एकदां भेट देईं ॥ धांवोनियां मज आतां ॥७७॥
तुझ म्यां बांधिलें उखळासी ॥ म्हणवून सखया रुसलासी ॥ आग लागो माझिया हातांसी ॥ श्रीकृष्णासी बांधिलें म्यां ॥७८॥
काय काय आठवूं बा रे तव गुण ॥ उर्वी न पुरे करितां लेखन ॥ सकळ गोपी शोकेंकरुन ॥ मस्तकें अवनीं आपटिती ॥७९॥
एक वक्षःस्थळें पिटिती ॥ एक दीर्घस्वरें हांक देती ॥ नंदाचे नेत्रीं अश्रु वाहती ॥ पडे क्षिती मूर्च्छित ॥८०॥
हंबरडा फोडोनि बोभति गाई ॥ अश्रु वाहती नेत्रीं पाहीं ॥ यशोदा म्हणे आतां सर्वही ॥ प्राण देऊं तेथेंचि ॥८१॥
सकळ स्त्रियांसमवेत कृष्णमाया ॥ चालिली डोहामाजी प्रवेशावया ॥ तंव बळिराम आडवा येऊनियां ॥ म्हणे ऐका गोष्टी एक ॥८२॥
त्रिभुवननायक हा वनमाळी ॥ त्यास भय नाहीं कदाकाळीं ॥ कृतांतही कांपे चळवळीं ॥ कृष्णप्रताप देखतां ॥८३॥
बळिभद्राचें वचन ऐकोनी ॥ सकळांसौख्य वाटे मनीं ॥ त्याच्या वचनीं विश्वास धरुनी ॥ तटस्थ नयनी पाहती ॥८४॥
असो इकडे कालिंदीजीवनीं ॥ कालियें हरि बांधिला आंवळोनी ॥ यावरी श्रीकृष्ण प्रतापतरणी ॥ काय करिता जाहला ॥८५॥
दृढ वेढें घातलें भुजंगें ॥ शरीर फुगविलें रमारंगें ॥ कालियादेह तडतडी वेगें ॥ वेढें काढिले तेधवां ॥८६॥
जरी क्षणभरी न काढिता वेढे ॥ तरी ठायीं ठायीं होते तुकडे ॥ महाविखारें त्या प्रचंडें ॥ भयें वेढे काढिले ॥८७॥
हरीस सांडूनि ते वेळां ॥ भुजंग जाहला हो वेगळा ॥ भडभडां गरळज्वाळा ॥ मुखावाटे सोडीतसे ॥८८॥
मडकें भाजलें जैसे तप्त ॥ जैसे नेत्र दुष्टाचे आरक्त ॥ नासिकाद्वारें उष्ण श्वास सोडीत ॥ प्रळयाग्नीच्या शिखा जैशा ॥८९॥
जिव्हा सुळसुळीत दुधडा ॥ शतफणा कराळ प्रचंडा ॥ पर्वतश्रृंगें जेवीं दाढा ॥ दंत तीक्ष्ण तयाचे ॥९०॥
परम भ्यासुर अधरप्रांत ॥ ते जिव्हेनें क्षणक्षणां चाटीत ॥ करकरां क्रोधें दांत खात ॥ हरीस लक्षोनि सक्रोध ॥९१॥
क्रोधें थरथरां अंग कांपत ॥ नेत्र गरगरां भोवंडीत ॥ पुढें दंश करावया जपत ॥ मग रमानाथ काय करी ॥९२॥
सहा वर्षांची मूर्ति होय ॥ पुरुषार्थ ब्रह्मांडीं न समाय ॥ झेपा घालोनि लवलाहें ॥ धरिला भुजंगम पुढती तो ॥९३॥
आधीं गरगरां भोंवंडूनी ॥ बळें आफळी यमुनाजीवनीं ॥ निर्भय निःशंक चक्रपाणी ॥ वेदपुराणी वंद्य जो ॥९४॥
जो उरगांचा काळ पूर्ण ॥ त्यावरी बैसोनि करी गमन ॥ तो हा पुराण पूतनाप्राणहरण ॥ जन्ममरण त्या नाहीं ॥९५॥
क्षणक्षणां आफळूनि सर्प ॥ हरिला समूळ बलप्रताप ॥ गळाला दुर्जनाचा दर्प ॥ जाहलें भ्रमित अंग पैं ॥९६॥
जवेंचि शिरीं पाय देऊनि भगवंतें ॥ पुच्छ धरिलें वामहस्तें ॥ तांडवनृत्य श्रीजगन्नाथें ॥ आरंभिलें तेधवां ॥९७॥
निजपदघातेंकरुनी ॥ शतफणा लववी मोक्षदानी ॥ सप्त तालसांवरुनी ॥ नृत्य करी भगवंत ॥९८॥
जो क्षीराब्धिशायी वैकुंठविहारी ॥ तो चपळ नृत्य करी कालियाफणांवरी ॥ फणा लववी यमुनानीरीं ॥ श्वास उदरीं न समाय ॥९९॥
चुकवूनि पळों पाहे भुजंग ॥ परी न सोडी भक्तभवभंग ॥ जो कां फणांवरी व्यंग ॥ टांच हाणोनि तुडवीतसे ॥१००॥
जो सर्वांतरात्मा भगवान ॥ जो कां पूर्णब्रह्म सनातन ॥ तो कालियाशिरीं नृत्य करुन ॥ पाहतां भक्त सुखी होती ॥१॥
नृत्य करी भगवंत ॥ गोकुळींचे जन तटस्थ पाहात ॥ विमानीं सुरवर विस्मित ॥ न हालत नेत्रपातीं ॥२॥
आनंदें टाळ विणे वाजविती ॥ मृदंगवाद्यें झणत्कारिती ॥ एक करटाळिया पिटिती ॥ नृत्यगति पाहोनियां ॥३॥
मदनमनोहर वेधक मूर्ती ॥ कल्याणदायक अगाध कीर्ती ॥ पहावया अष्टनायिका धांवती ॥ विस्मित होती किन्नर ॥४॥
नृत्य करितां भगवंत ॥ वांकीं नेपुरें रुणझुणत ॥ सुरंग पीतांबर रुळत ॥ कटिमेखळा झळके वरी ॥५॥
हस्तसंकेत दावी वनमाळी ॥ मुद्रिका झळकती दशांगुळीं ॥ दिव्य पदक वक्षःस्थळीं ॥ मुक्तामाळा डोलती ॥६॥
मंदस्मित सुहास्यवदन ॥ आकर्ण विराजती राजीवनयन ॥ कर्णी कुंडलें देदीप्यमान ॥ निढळीं केशर झळकतसे ॥७॥
रत्नजडित मुकुट माथां ॥ ऐसी मूर्ति नृत्य करितां ॥ नानागती नाचतां नाचतां ॥ चक्राकार दिसतसे ॥८॥
मग दिव्य सुमनांचे संभार ॥ वर्षताती सकल निर्जर ॥ देखोनि मूर्ति मनोहर ॥ देवांगना वेधल्या ॥९॥
म्हणती तनुमनधनेंसीं अभिमान ॥ सांडावा यावरुनि ओवाळून ॥ अनंत जन्मींचें तपाचरण ॥ तरीच जगज्जीवन प्राप्त होय ॥११०॥
असो नृत्य करितां त्रिभुवनपती ॥ टाळ मृदंग देव वांजविती ॥ कालियाचे प्राण निघों पाहती ॥ सकल शक्ति आकर्षिल्या ॥११॥
मुखीं शोणित वाहत ॥ उरग पडिला मूर्च्छित ॥ विराली अहंकृति समस्त ॥ गर्वरहित झाला कालिया ॥१२॥
श्वासोच्छ्वास सोडावया ॥ जंव शिर जाय उचलावया ॥ हरी तें टांचें रगडूनियां ॥ पुन्हां हालवेनासें करी ॥१३॥
भुजंग आठवी श्रीजगन्निवासा ॥ धांव धांव बापा पुराणपुरुषा ॥ जगत्पालका रमाविलासा ॥ सोडवीं दासासी येथूनियां ॥१४॥
मी करितों ज्याचिया स्मरणा ॥ तो शिरीं नाचतो समजेना ॥ त्रिभुवनाचा भार सोसेना ॥ प्राण सोडूं पहातसे ॥१५॥
अनंत ब्रह्माडें ज्याचें पोटीं ॥ तो मस्तकीं नाचे जगजेठी ॥ असो कालिया होऊनि कष्टी ॥ मूर्च्छागत पडियेला ॥१६॥
मग त्या भुजंगाच्या नितंबिनी ॥ करीं रत्नदीप आरत्या घेऊनी ॥ शरण येती तेचि क्षणीं ॥ भक्तवल्लभा हरीतें ॥१७॥
देव करिती स्तुतीतें ॥ शिवविरिंचिआदि गाती ज्यातें ॥ हें कळलें नागकन्यातें ॥ कीं जगदात्मा हाचि पैं ॥१८॥
कालिया झाला भ्रम मूर्च्छित ॥ जवळी असतां नेणे भगवंत ॥ सुर विमानीं स्तुति करीत ॥ तेंही श्रवणीं पडेना ॥१९॥
शरण आल्या आपुल्या स्त्रिया ॥ हेंही न समजेचि कालिया ॥ केवळ मूढदशा पावोनियां ॥ जगत्पतीस नेणेचि ॥१२०॥
जैसें जवळीं दिव्यरत्न असोनी ॥ अंधासी कदा न दिसे नयनीं ॥ कीं पिशाचास न समजे मनीं ॥ आपण कोण आहों तें ॥२१॥
कीं जो सुषुप्तिडोहीं बुडाला ॥ त्यास सहस्त्राक्ष प्रसन्न होऊं जरी आला ॥ परी न कळे जैसें त्याला ॥ तैसें झालें कालियातें ॥२२॥
असो देखोनि शारंगपाणी ॥ शरण येती भुजंगकामिनी ॥ गेल्या देह विसरोनी ॥ पतिभयें अति विव्हळ ॥२३॥
न सांवरती कबरीभार ॥ गळोनि पडती अलंकार ॥ ढळले वक्षःस्थळींचे पदर ॥ विव्हळ शरीर जाहलें ॥२४॥
एकीचीं लेंकुरें करिती स्तनपाना ॥ ते युवती दावी जगन्मोहना ॥ कीं लेंकुरें देखोनि व्रजभूषणा ॥ कृपा येईल म्हणोनि ॥२५॥
एक पसरोनि अंचळा ॥ चुडेदान मागती तमालनीळा ॥ अश्रु वाहती एकीच्या डोळां ॥ करुणा गोपाळा दाविती ॥२६॥
एकी उभ्या ठाकती बद्धाजळी ॥ एकी दृढ लागती चरणकमळीं ॥ एकी काकुळती येती वनमाळी ॥ दे म्हणती पतिदान ॥२७॥
श्रीकृष्णपदकमळांवरी ॥ उरगंतनया झाल्या भ्रमरी ॥ तेथींचा मकरंद अंतरीं ॥ सांठविती प्रीतीनें ॥२८॥
एक करिती स्तवना ॥ ब्रह्मानंदा जगज्जीवना ॥ दीनवत्सलापीतवसना ॥ सकटमर्दना श्रीहरे ॥२९॥
हे सिंधुजापति जगन्निवासा ॥ हे योगिमानसराजहंसा ॥ हे घोर अविद्यावनहुताशा ॥ परमपुरुषा विलासिया ॥१३०॥
हे गोपीमानसचकोरचंद्रा ॥ सच्चिदानंदा आनंदभद्रा ॥ हे समरधीरा प्रतापरुद्रा ॥ मन्मथजनका जगद्गुरो ॥३१॥
बाळक करी बहुत अन्याय ॥ परी क्षमा करी निजमाय ॥ महादुर्जन हा अहि निर्दय ॥ तव पदरजंउद्धरला ॥३२॥
जे दुसर्याचा करुं इच्छिती घात ॥ त्यांस शासनकर्ता तूं जगन्नाथ ॥ परी येणें पूर्वीं तप बहुत ॥ किती केलें न कळे तें ॥३३॥
बहुत केलें पुरश्चरण ॥ कीं साधिलें पंचाग्निसाधन ॥ कीं केलें सद्गुरुभजन ॥ साधुसेवा प्रीतीनें ॥३४॥
कीं ब्रह्मचर्य आचरला ॥ कीं वानप्रस्थधर्मीं राहिला ॥ कीं चतुर्थाश्रम अवलंबिला ॥ तरी पावला पद तुझें ॥३५॥
तुझ्या आंगींची चित्कळा ॥ तेचि चरणीं राहिली कमला ॥ तिजपरीस भाग्यें आगळा ॥ कालिया आम्हां वाटतो ॥३६॥
एवढा अन्याय करुनि क्षमा ॥ वज्रचुडेदान देईं आम्हां ॥ हा तों परम मूढ दुष्टात्मा ॥ तुझा महिमा नेणेचि ॥३७॥
हे अनंत ब्रह्मांडपाळका ॥ देवशिखामणि गजरक्षका ॥ येवढा अन्याय कमलानायका ॥ घालीं पोटांत आतांचि ॥३८॥
भृगूनें तुज मारिली लात ॥ परी तूं जगदात्मा पूर्ण शांत ॥ तैसे अन्याय याचे समस्त ॥ क्षमा करीं गोविंदा ॥३९॥
ऐशा उरगकन्याविनविती ॥ अहिशिरीं नाचे जगत्पती ॥ तों कालियाचे प्राण निघों पाहती ॥ नेत्रीं तंद्री लागली हो ॥१४०॥
देखोनियां अंतसमया ॥ करुणा भाकिती भोगितनया ॥ करुणालया यादवराया ॥ प्राण जाती कीं याचे ॥४१॥
हरीपुढें पदर पसरिती ॥ करिती नाना काकुळती ॥ दीनवदनें मुख विलोकिती ॥ दीनबंधूचें तेधवां ॥४२॥
अहा श्रीकृष्णा आत्मयारामा ॥ प्रेतदशा आली भुजंगोत्तमा ॥ आमुची निराशा सर्वोत्तमा ॥ झाली आतां येथूनियां ॥४३॥
आम्ही भणंगें अनाथ दीन देख ॥ पतिप्राणाची मागतों भीक ॥ तूं उदार जगत्पालक ॥ कां कृपणता धरियेली ॥४४॥
स्वामी त्वां ध्रुवास अढळपद दिधलें ॥ शक्रारिजनकानुजा त्वांचि स्थापिलें ॥ आतां कृपण चित्त कां केलें ॥ ब्रीद आपुलें सांभाळीं ॥४५॥
ऐसी ऐकूनि करुणा ॥ कृपा उपजली व्रजभूषणा ॥ पुरें करुनि कालियामर्दना ॥ भक्तवचना पाळिले ॥४६॥
सर्प मूर्च्छागत जाहला ॥ तैसाचि पायें परत लोटिला ॥ जयजयकार करीत ते वेळां ॥ नागकन्या ओंवाळिती ॥४७॥
तव कालिया अत्यंत क्षीण ॥ हळूच उघडोनि पाहे नयन ॥ तों देव विमानीं करिती स्तवन ॥ तें श्रवणीं ऐके भुजंग ॥४८॥
वैकुंठनाथ हा परमात्मा ॥ तेव्हां कळलें भुजंगमा ॥ स्तवावया वैकुंठधामा ॥ तत्काळ जाहला नररुप ॥४९॥
जैसें व्यथाभूत बाळक जाण ॥ वदे मंजुळ मंजुळ वचन ॥ तैसे भुजंग हरिपद धरुन ॥ करी स्तवन तेधवां ॥१५०॥
जय जय यादवकुलतिलका ॥ नंदकुमारा व्रजपालका ॥ त्रैलोक्यनाथा चित्तचालका ॥ शरणागता रक्षीं तूं ॥५१॥
प्राण्याचे जे जे जैसे संस्कार ॥ चराचर जीव नाना विकार ॥ ते ते सुटती निर्धार ॥ जातिस्वभावेंकरुनियां ॥५२॥
तुवां सकळ जाती निर्मोनी ॥ आम्हांस घातलें सर्पयोनीं ॥ महातामस पापखाणी ॥ सदा मनीं द्वेष वाढे ॥५३॥
वेष्टिलें बहुत कामक्रोधें ॥ नागविलें मत्सरदंभमदें ॥ यालागीं तुझीं चरणारविंदें ॥ भ्रमेंकरुनि नोळखों जी ॥५४॥
अहा लागली प्रपंचाची गोडी ॥ पायीं ठोकिली अज्ञानबेडी ॥ फेरे फिरतां जाहलों वेडीं ॥ न भजों आवडीं कदा तूतें ॥५५॥
हरि म्हणे कालियाला ॥ बहुत न बोलें वेळ जाहला ॥ तूं परिवारेंसीं येचि वेळां ॥ जाय सत्वर सागराप्रति ॥५६॥
जरी उरगरिपुभेणें पाहीं ॥ तूं लपलासी यमुनाडोहीं ॥ तुज आतां तो न करी कांहीं ॥ सुखी राहें येथूनियां ॥५७॥
माझ्या पदमुद्रा तुझें शिरीं ॥ यालागीं खगेंद्र तुज न मारी ॥ मम वरें त्या सागरीं ॥ सुखें राहें कालिया ॥५८॥
तुज म्यां केलें शासन ॥ ही लीला गाती जे अनुदिन ॥ त्यांस तुम्हीं न डंखावें पूर्ण ॥ पळावें उठोन देखतां ॥५९॥
हे कालियामर्दनकथा सत्य ॥ त्रिकाल जो पुढे पुण्यवंत ॥ त्याचे दृष्टीनेंचि त्वरित ॥ महाविष उतरेल ॥१६०॥
कालियामर्दनपुस्तक ॥ जो गृहीं संग्रही भाविक ॥ तें गृह सोडूनि तात्कालिक ॥ सर्प जाती तेथोनियां ॥६१॥
जेणें ऐकिलें कालियामर्दन ॥ त्यास काळ करुं न शके बंधन ॥ मग कैंचें सर्पदंशाचें विघ्न ॥ त्यासी बाधक होईल ॥६२॥
जो सर्प आज्ञा न मानी प्रमाण ॥ त्याचें मस्तक होईल चूर्ण ॥ असो कालिया आज्ञा वंदून ॥ करी पूजन हरीचें ॥६३॥
अर्पूनि षोडशोपचार पूजा ॥ प्रदक्षिणा करी गरुडध्वजा ॥ म्हणे लक्ष्मीविलासा महाराजा ॥ कृपा बहुत असो दे ॥६४॥
ऐसें बोलोनि सहपरिवारें ॥ विखार सागरा गेला त्वरें ॥ यमुना अमृतमय नीरें ॥ वाहो लागली ते क्षणीं ॥६५॥
जैसा परीस झगटतां पूर्ण ॥ लोह होय तत्काळ सुवर्ण ॥ कीं मित्रकुल भूषणपदरजेंकरुन ॥ विरिंचितनया उद्धरली ॥६६॥
त्याचपरी हो श्रीदीननाथें ॥ शुद्ध केलें यमुनार्हदातें ॥ मुरली वाजविली स्वहस्तें ॥ ऐलतीरा आला जगद्गुरु ॥६७॥
म्हणती आला आला वनमाळी ॥ पूर्ण ब्रह्मानंद जाहला ते वेळीं॥ दुंदभी गर्जती निराळीं ॥ सुमनें भूतळीं वर्षती ॥६८॥
समीप देखोनि अनंता ॥ सद्गदित जाहली माता ॥ धांवोनि भेटली जगन्नाथा ॥ दृष्टांत आतां काय देऊं ॥६९॥
चतुर्दश वर्षें वनीं क्रमून ॥ अयोध्येसी आला रघुनंदन ॥ कौसल्या माता धांवोन ॥ तैसाचि कृष्ण आलिंगिला ॥१७०॥
पाहोनियां कृष्णवदना ॥ स्तनीं दर्दरोनि फुटला पान्हा ॥ आडवे घेवोनि जगन्मोहना ॥ प्रेमें माया न सोडी ॥७१॥
नेत्रीं सुटल्या अश्रुधारा ॥ तेणें अभिषेक जाहला श्यामसुंदरा ॥ म्हणे माझिया सांवळ्या श्रीधरा ॥ कैसा वाचोनि आलासी ॥७२॥
जैसें कृपणाचें ठेवणें चुकलें ॥ तें बहु श्रमतां सांपडलें॥ कीं जहाज बुडतां कडे लागलें ॥ तैसें जाहलें मायेसी ॥७३॥
कीं चोरीं मारितां अरण्यांत ॥ एकाएकीं धांवणें धांवत ॥ त्याच्या सुखासी नसे अंत ॥ तैसें जाहलें मायेसी ॥७४॥
कीं प्राण जातां एकाएकीं ॥ सुधारस घातला मुखीं ॥ तो प्राणी जैसा होय सुखी ॥ तैसें मायेसी जाहलें ॥७५॥
कीं वणव्यामाजी जळतां ॥ घन वर्षे कां अवचिता ॥ तैसें देखतां श्रीकृष्णनाथा ॥ जाहलीं माता सुखी ते ॥७६॥
मातेच्या चरणांवरी ॥ नमन करी मधुकैटभारी ॥ तों नंद येऊनि झडकरी ॥ हृदयीं धरीं श्रीरंगा ॥७७॥
नंद हृदयीं ऐसें भावित ॥ कीं त्रिभुवनीं मीच भाग्यवंत ॥ नंद आनंदें नाचत ॥ सुख गगनांत न समाये ॥७८॥
की शक्तीनें भेदिला सुमित्रासुत ॥ औषधि घेऊनि आला हनुमंत ॥ अनुज उठतां आनंदें रघुनाथ ॥ नंद आनंदे त्यापरी ॥७९॥
कीं साधूनि मंत्र संजीवनी ॥ गुरुसुत आला परतोनी ॥ जेवीं सहस्त्राक्ष भेटे धांवोनी ॥ नंदाचें मनीं तेवीं वाटे ॥१८०॥
असो हरीनें नमिलें नंदातें ॥ तों बळिराम धांवे भेटावयातें ॥ हांसो आलें संकर्षणातें ॥ हरिमुखातें पाहोनियां ॥८१॥
तरी कां संकर्षण हांसिन्नला ॥ काय तो अर्थ सुचविला ॥ कीं म्यां शोक नाहीं केला ॥ प्रताप अद्भुत जाणोनि ॥८२॥
कृतांतासही शासनकर्ता ॥ मग शोक कां करावा वृथा ॥ आदि अंत मध्य पहातां ॥ तुजपरता कोण असे ॥८३॥
देखोनियां त्रिभुवनायका ॥ प्रेमें सद्गदित झाल्या गोपिका ॥ आंगीं तटतटिल्या कंचुका ॥ हर्ष पोटीं न समाये ॥८४॥
दंडकडीं रत्नजडित ॥ मणगटापाशीं तीं दाटत ॥ गोपी येऊनि चरणीं लागत ॥ ब्रह्मानंदेंकरुनियां ॥८५॥
सकळ गौळियां लहानथोरां ॥ भेटला परात्परसोयरा ॥ जो दुर्लभ सकळ सुरवरां ॥ सुलभ झाला तो गोकुळीं ॥८६॥
तंव अस्तमाना गेला गभस्ती ॥ तेथेंचि लोकीं केली वस्ती ॥ सकळ निद्रार्णवीं निमग्न होती ॥ चिंता चित्तीं नसेचि पैं ॥८७॥
अस्ताचळा जाताम वासरमणी ॥ द्विज बैसती स्थळीं येऊनी ॥ मिलिंद वारिजकोशीं प्रवेशूनी ॥ आमोदातें सेविती ॥८८॥
तरुण जे जे विषयपर ॥ त्यांचें हृदयीं चंचरे पंचशर ॥ रात्र झाली दोन प्रहर ॥ श्वापदें दुधर्र बाहती ॥८९॥
परम दाटली घोर रजनी ॥ द्विजांच्या उठती नाना ध्वनी ॥ रिसें वाघुळा मिठी घालूनी ॥ वृक्षडाहाळिये लोंबती ॥१९०॥
वनदेवता गंधर्व यक्षिणी ॥ गोंधळ घालिती महावनीं ॥ आसरा जाज्वल्यरुप दाऊनी ॥ तेच क्षणीं गुप्त होती ॥९१॥
नाना वल्लींचे भंबाळ ॥ दिसतीं अवचितेंचि कल्लोळ ॥॥ प्रेतगण मिळाले सकळ ॥ भ्यासुर केवळ दिसतीं पैं ॥९२॥
विकार करिती भूतें प्रेतें ॥ छळिती अमंगळ अपवित्रातें ॥ दिवाभीतांचे घुंघाट तेथें ॥ पिंगळे थोर किलबिलती ॥९३॥
भालुवा भुंकती क्षणक्षणीं ॥ टिटवे शब्द करिती गगनीं ॥ करुणास्वरेंकरुनी ॥ चक्रवाकें बाहती ॥९४॥
चंद्रकुमुदिनी विकासती ॥ भ्रमर तेथें पाहों येती ॥ उरग बाहेर निघती ॥ सैर हिंडती चहूंकडे ॥९५॥
निधानें चरावया निघती ॥ क्षणक्षणां प्रभा दाविती ॥ सभाग्यास बोलाविती ॥ येऊं म्हणती गृहा तुझ्या ॥९६॥
तंव तो वसंत ऋतु उष्णकाल ॥ वनें वाळूनि गेलीं सकळ ॥ पूर्वींच कालियाचा मुखानळ ॥ जाळीत होता वनातें ॥९७॥
तों अद्भुत वात सुटला ॥ अग्नि गौळियांवरी परतला ॥ सभोंवतीं वेढा पडिला ॥ आंत झांकळिला पर्वत ॥९८॥
आकाश कवळिलें ज्वाळें ॥ तडतडां फुटती वेळूनळे ॥ पाळती पक्षियांचे पाळे ॥ आहाळोनि माजीं पडताती ॥९९॥
एकाएकीं निदसुरे गौळी ॥ आरडत उठती ते वेळीं ॥ तों आकाश झांकिलें अग्निकल्लोळीं ॥ ठाव नाहीं पळावया ॥२००॥
जाग्या झाल्या गौळिणी ॥ हडबडोनि उठे नंदराणी ॥ म्हणे कोठें लपवूं चक्रपाणी ॥ देईं मेदिनी ठाव आतां ॥१॥
गौळी गौळिणी करिती चिंता ॥ आमुचे प्राण जावोत आतां ॥ परी कैसें करावें कृष्णनाथा ॥ वांचेल कैसा नेणवे ॥२॥
गौळी करिती थोर धांवा ॥ धांवें वैकुंठपते कमलाधवा ॥ विश्वव्यापका केशवा ॥ कृष्ण आमुचा वांचवीं ॥३॥
दीनवदनें हांक फोडिती ॥ ज्वाळा आल्या आल्या म्हणती ॥ एकावरी एक पडती ॥ दुर्धरगति ही ओढवली ॥४॥
मायेनें हरि धरिला हृदयीं ॥ म्हणे कृष्णा वांचवा रे या समयीं ॥ पळावया ठाव नाहीं ॥ धांव लवलाही भगवंता ॥५॥
देखोनि तयांची करुणा ॥ कृपा उपजली कमलनयना ॥ सांगे अवघ्या व्रजजनां ॥ झांका नयनां समस्तही ॥६॥
हरिवदनीं विश्वास धरुनी ॥ नेत्र झांकिले समस्त जनीं ॥ ब्रह्मांडनायक त्याची करणी ॥ शिवविरिंचींसी कळेना ॥७॥
असंभाव्य पसरिलें वदन ॥ जो विराट्स्वरुपी भगवान ॥ द्वादशगांवें महाअग्न ॥ न लगतां क्षण गिळियेला ॥८॥
मागुती झाला सहा वर्षांचा ॥ साही शास्त्रां न कळे अंत ज्याचा ॥ हरि सकळांस वदे वाचा ॥ नेत्र उघडा सर्वही ॥९॥
सकळीं उघडिले नयन ॥ अणुमात्र कोठें न दिसे अग्न ॥ गौळी भेटती हरीस येऊन ॥ म्हणती महिमा न कळे तुझा ॥२१०॥
तों सवेंचि झाली प्रभात ॥ जान्हवीवरुन येत वात दानवगुरु उदय दावत ॥ अरुण प्रकाशे पाहीं पां ॥११॥
कीं पूर्वदिशेनें मुख धुतलें ॥ आरक्त कुंकुम निढळीं रेखिलें ॥ उडुगणतेज हरपलें ॥ ज्ञानें निसरलें अज्ञान जेवीं॥१२॥
पक्षी उडोनि चालिले ॥ भ्रमर कमळांतूनि मुक्त झाले ॥ तस्कर ठायीं ठायीं लपाले ॥ हिंडों लागले श्रेष्ठ पैं ॥१३॥
निजगृहास येऊनि जार ॥ मांडिला दांभिक आचार ॥ जे स्मशानीं जप करणार ॥ कुटिल नर पळतासी ॥१४॥
कुक्कुट काग बाहती ॥ चिमण्या ठायीं ठायीं गुजगुजती ॥ अग्निहोत्री स्नान करिती ॥ होम द्यावयाकारणें ॥१५॥
कापडी तीर्थपंथें जाती ॥ भक्तप्रातःस्मरणें गर्जती ॥ वैष्णव विष्णूतें चिंतिती ॥ शैव ध्याती शिवातें ॥१६॥
हातीं घेऊनि अर्ध्यजल ॥ सौर पाहती सूर्यमंडल ॥ गाणपत्य परम सुशील ॥ गणपतीतें चिंतिती ॥१७॥
शाक्त चिंतिती शक्तीतें ॥ गुरुभक्त आठविती गुरुचरणांतें ॥ विद्यार्थी नानापरींचे एकचित्तें ॥ विद्याभ्यास करिताती ॥१८॥
गृहींगृहींच्या ललना उठती ॥ अंग प्रक्षालूनि कुंकुमें रेखिती ॥ सडासंमार्जनें करुनि निश्चितीं ॥ घालिती रंगमाळा ॥१९॥
करुनियां गोदोहन ॥ वेगीं आरंभिती घुसळण ॥ असो उदय पावला सहस्त्रकिरण ॥ गौळी तेथूनि निघाले ॥२२०॥
घेऊनियां तमालनीळा ॥ समस्त चालिले मग गोकुळा ॥ वाद्यांचा गजर ते वेळां ॥ अति जाहला सधन पैं ॥२१॥
मोहरी पांवे मृदुंग ॥ डफडीं सनया उपांग ॥ मिरवत जातसे श्रीरंग ॥ नंदयशोदेस हित पैं ॥२२॥
कृष्णावरी पालवछत्रेम ॥ गौळी धरिती अत्यादरें ॥ चंद्रप्रभेऐसीं चामरें ॥ एक वरि धरिताती ॥२३॥
सहा वर्षांची मूर्ती ॥ केली अद्भुत त्रिभुवनीं कीर्ती ॥ कर्णीं कुंडलें ढाळ देती ॥ नयन विकासती आकर्ण ॥२४॥
कपाळीं त्रिपुंड्र रेखिला ॥ सर्वांगीं चंदन चर्चिला ॥ चिमणीच मुरली सांवळा ॥ चिमण्या स्वरें वाजवीत ॥२५॥
पुढें चिमणे गोप मिळोनी ॥ हुंबरी घालिती छंदेंकरुनी ॥ एक सामोर्या येती गौळणी ॥ आरत्या घेऊनी हरीतें ॥२६॥
यशोदा करी निंबलोण ॥ हरी घेतला कडे उचलोन ॥ गृहीं प्रवेशले शेषनारायण ॥ धन्य भाग्य नंदाचें ॥२७॥
हरीचे अवतार सर्व उत्तम ॥ परी ये अवतारींचें जें कर्म ॥ अत्यद्भुत लीला परम ॥ जे न वर्णवे शेषातें ॥२८॥
दिवसदिवसाप्रती ॥ अद्भुत लीला अद्भुत कीर्ती ॥ शिणल्या व्यासादिकांच्या मती ॥ तेथें मी पामर काय वर्णूं ॥२९॥
ऐसा थोर पवाडा दाविला ॥ केवळ काळ कालिया मर्दिला ॥ द्वादश गांवें अग्नि गिळिला ॥ वांचवूनियां सकळांसी ॥२३०॥
कलियुगीं भवनदीपूर ॥ अत्यंत दाटला दुर्धर ॥ हरिविजयग्रंथ थोर ॥ नौका तेथें तरावया ॥३१॥
भाविक हो धांवा लौकरी ॥ सत्वर बैसा या नौकेवरी ॥ प्रेमाचा ध्वज निर्धारीं ॥ अति सतेज फडकत ॥३२॥
ही नाव परतीरा न्यावया त्वरित ॥ नावडी तेथें सद्गुरुनाथ ॥ तो ब्रह्मानंद स्वामी समर्थ ॥ भीमातीरविहारी जो ॥३३॥
ब्रह्मानंदस्वामीचे चरण ॥ हेंचि कमळ सुवासिक पूर्ण ॥ तेथें श्रीधर भ्रमर रिघोन ॥ मकरंद पूर्ण सेवीत ॥३४॥
इति श्रीहरिविजयग्रंथ ॥ संमत हरिवंश भागवत ॥ प्रेमळ परिसोत पंडित ॥ एकादशाध्याय गोड हा ॥२३५॥
श्रीकृष्णार्पणमस्तु॥अध्याय॥११॥ओव्या॥२३५॥
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2008
TOP