हरिविजय - अध्याय ३६

श्रीधरांसारखा भगवंताच्या भक्तिप्रेमात न्हाऊन गेलेला अजोड कवी, गोपालकृष्णाच्या अति गोड लीलांचे वर्णन करतो, तेव्हा काय बहार येते.


श्रीगणेशाय नमः ॥

ओं नमो सद्‌गुरु अवधूता ॥ परब्रह्मा अपरिमिता ॥ पुराणपुरुषा अव्यक्ता ॥ मायातीता अगम्या ॥१॥

आदिपुरुषा विश्वंभरा ॥ अवयवरहिता दिगंबरा ॥ सदानंदरुपा निर्विकारा ॥ आत्मयारामा कृपानिधे ॥२॥

अमलरुपा परमगंभीरा ॥ ब्रह्मानंदा परात्परा ॥ सहजानंदा अगोचरा ॥ कल्याणवासा जगद्‌गुरो ॥३॥

पूर्णानंदा अपरिमिता ॥ दत्तात्रेया षड्‌विकाररहिता ॥ ब्रह्मानंदा ज्ञानभरिता ॥ भीमातीरविलासिया ॥४॥

रुक्मिणीहृदयाज्बमधुकरा ॥ दाक्षायणीवरप्रिया मनोहरा ॥ पांडवकैवारिया दीनोद्धारा ॥ शिशुपाळांतका श्रीपते ॥५॥

पंचत्रिंशति अध्यायीं कथा परिकर ॥ छेदूनि शिशुपाळाचें शिर ॥ विजयी जाहला श्रीकरधर ॥ धर्मरक्षक परमात्मा ॥६॥

आतां छत्तिसावा बहु सुरस ॥ हरिविजयाचा पूर्ण कळस ॥ जो भोजनाच्या शेवटीं गोड ग्रास ॥ तैसा विशेष छत्तिसावा ॥७॥

छत्तिसावे अध्यायीं ग्रंथ आघवा ॥ परी मुकुटमणि छत्तिसावा ॥ तो भक्तजनीं परिसावा ॥ प्रेमादरेंकरुनियां ॥८॥

द्वारकेसी नांदतां रुक्मिणीरमण ॥ तों पुढें आलें सूर्यग्रहण ॥ कुरुक्षेत्रासी जावें म्हणोन ॥ निश्चय केला श्रीवल्लभें ॥९॥

तों यापूर्वींच बळिभद्र ॥ गोकुळासी पाठवी यादवेंद्र ॥ जो महाबळिया भोगींद्र ॥ धराघर अवतरला ॥१०॥

गोकुळासी जाऊनि रोहिणीसुत ॥ यशोदा नंद गौळी समस्त ॥ तयांसी भेटला रेवतीप्राणनाथ ॥ सौख्य अदभुत समस्तां ॥११॥

चार मासपर्यंत ॥ बळिभद्र राहिला स्वस्थ ॥ श्रीकृष्णप्रताप अद्‌भुत ॥ जाहला तो समस्त सांगितला ॥१२॥

मथुरेहूनि गेला कृष्णनाथ ॥ कोण कोण मारिले दैत्य॥ कैशा अष्टविनायका झाल्या प्राप्त ॥ आणि सोळा सहस्त्र कामिनी ॥१३॥

तें चरित्र मुळींहून ॥ सांगे बळिभद्र आपण ॥ कैसा जाहला राजसूययज्ञ ॥ कैसा शिशुपाळ मारिला ॥१४॥

तीं चरित्रें ऐकतां श्रवणीं ॥ तटस्थ होती गौळी गौळणी ॥ म्हणती ऐसा पुराणपुरुष चक्रपाणी ॥ कैं आम्हांलागूनि भेटेल ॥१५॥

बळिभद्र नित्य वनासी जाय ॥ विलोकी हरीचे क्रीडाठाय ॥ कुंजवनीं क्रीडा केली पाहें ॥ गडियांसमवेत हलधरें ॥१६॥

तों माध्यान्हासी आला चंडकिरण ॥ जलक्रीडा करुं इच्छी संकर्षण ॥ यमुना दूर होती तेथून ॥ तीस रेवतीरमण बोलावी ॥१७॥

म्हणे आलीकडे येईं सूर्यनंदिनी ॥ तों ते वाहे निजछंदेंकरुनी ॥ बळिराम क्षोभला ते क्षणीं ॥ नांगर घालूनि ओढिली ॥१८॥

ओघ मुरडोनि सगळा ॥ आपणाकडे रामें आणिला ॥ गगनीं देव पाहती डोळां ॥ नवल गोपाळां वाटतसे ॥१९॥

जलक्रीडा करुनि बळिभद्र ॥ गोकुळासी आला सत्वर ॥ चार मास झालिया हलधर ॥ जाता जाहला द्वारकेसी ॥२०॥

संपूर्ण गोकुळींचें वर्तमान ॥ कृष्णासी सांगे रेवतीरमण ॥ तों पुढें ग्रहणयात्रेसी जगज्जीवन ॥ निघता जाहला कुरुक्षेत्रासी ॥२१॥

निघाले छप्पन्न कोटी यादव ॥ उग्रसेन बळिभद्र वसुदेव ॥ प्रद्युम्न अनिरुद्ध अक्रूर उद्धव ॥ सांब भानुमंत निघाले ॥२२॥

रुक्मिणीसहित अष्टनायिका ॥ निघाल्या सोळा सहस्त्र गोपिका ॥ चतुरंगदळ देखा ॥ सिद्ध जाहलें ते काळीं ॥२३॥

लागले वाद्यांचे गजर ॥ असंभाव्य चालिला दळभार ॥ कृष्णनायिका समग्र ॥ सुखासनीं आरुढल्या ॥२४॥

रेवती देवकी रोहिणी ॥ सत्यभामा कालिंदी रुक्मिणी ॥ ज्यांचिया वहनापुढें कनकवेत्रपाणी ॥ लक्षावधि धांवती ॥२५॥

ओळीनें चालिले पर्वत ॥ तैसे गजभार येती डोलत ॥ त्यांवर यादव बैसले रणपंडित ॥ कृतांतही भीत तयांतें ॥२६॥

पुढें चालती पायदळभार ॥ मागें तुरंग चालती सत्वर ॥ त्यांचे पाठीमागें कुंजर ॥ किंकाट करीत जाताती ॥२७॥

श्रीकृष्णाचे भद्रजाती ॥ शुंडादंड ऊर्ध्व करिती ॥ वाटे आकाश कवळों पाहती ॥ हिरे दांती जडियेले ॥२८॥

त्यांचे पाठीमागें रथांचे भार ॥ निजरथीं विराजे यादवेंद्र ॥ जो कोटि अनंगांहूनि सुंदर ॥ लावण्यसागर श्रीहरि ॥२९॥

देशोदेशींचे नृपती ॥ निजभारेंसीं सवें चालती ॥ दाटी जाहली हरीभोंवतीं ॥ वारी नसे दर्शना ॥३०॥

राजयांचे मुकुट रत्‍नजडित ॥ त्यांसहित कृष्णपदीं नमित ॥ एक एका मुकुट आदळत ॥ रत्‍नें विखुरत सभोंवतीं ॥३१॥

जैसा सौदामिनीचा एकमेळ ॥ तैसे मुकुट दिसती तेजाळ ॥ पहावयालागीं घननीळ ॥ मंडपघसणी होतसे ॥३२॥

निजभारेंसीं कौरव पांडव ॥ तेही येते जाहले सर्व ॥ भीष्म द्रोण भक्तराव ॥ विदुरंही पातला ॥३३॥

तों इंद्रादि देव ते क्षणीं ॥ पाहों इच्छिती चक्रपाणी ॥ तों हरीभोंवतीं नृपांची दाटणी ॥ वारी दर्शना नव्हेचि ॥३४॥

पहावया हरिवदनचंद्र ॥ सर्वांचे नेत्र जाहले चकोर ॥ योगी तापसी मुनीश्वर ॥ तेहीष मुरहर पाहों येती ॥३५॥

आला इतुक्यांसमवेत मुरारी ॥ येऊनि उतरला कुरुक्षेत्रीं ॥ शिबिरें उभीं केलीं ते अवसरीं ॥ सोळा सहस्त्र पृथक्‌ पृथक्‌ ॥३६॥

पुढें लक्षूनि जान्हवीतीर ॥ निजभारें उतरले नृपवर ॥ तों पूर्वींच श्रीकृष्णें दूत सत्वर ॥ गोकुळवासी धाडिला होता ॥३७॥

यशोदा नंद गोपिका गौळी ॥ यात्रेसी पातले तये वेळीं ॥ बाळपणींचे सखे सकळी ॥ येत जाहलें हरिदर्शना ॥३८॥

असंख्य गौळी आनंदेंकरुन ॥ निघाले गोरसकावडी भरुन ॥ पुढें गोपाळ पांवे घेऊन ॥ आनंदेंकरुन नाचती ॥३९॥

मृदंग टाळ घुमरी घाई ॥ मोहर्‍या घुमर्‍या बाजे सनई ॥ हरीची बाळलीला गाती नवलाई ॥ येती लवलाहीं गोपाळ ॥४०॥

चित्रविचित्र घोंगडी ॥ पांघुरले कृष्णाचे गडी ॥ एक नाचती कडोविकडी ॥ हांसती घडिघडी स्वानंदें ॥४१॥

श्रीकृष्णासी जाणविती दूत ॥ कीं गोकुळवासी आले समस्त ॥ श्रीनिवास झाला आनंदभरित ॥ वेगें सांगत रुक्मिणीसी ॥४२॥

माझीं मातापितरें दोन्ही ॥ बाळमित्र आले गोकुळींहूनी ॥ मज ते आवडती बहुत रुक्मिणी ॥ बळिरामाहूनी अधिक पैं ॥४३॥

रुक्मिणीसहित कृष्णप्रिया समग्र ॥ सिद्ध जाहल्या पहावया सर्व ॥ गौळियांसी यादवेंद्र ॥ कैसा भेटतो म्हणवूनि ॥४४॥

तों लक्षानुलक्ष गाडे ॥ गौळियांचे धांवती वेगाढे ॥ वरी गोपिका बैसल्या निवाडें ॥ हरिलीला गात येती ॥४५॥

तों हरीचे सवंगडे समग्र ॥ त्यांपुढें आले गोपिकांचे भार ॥ त्यांसंमुख जाहला यादवेंद्र ॥ हरिनायिका समग्र पाहती ॥४६॥

घवघवीत देदीप्यमान ॥ गोपांनीं देखिला जगज्जीवन ॥ समस्तीं घातलें लोटांगण ॥ प्रेमेंकरुन स्फुंदती ॥४७॥

तितुक्यांसही कैवल्यदानी ॥ भेटे तेव्हां प्रेमेंकरुनी ॥ गोपाळ म्हणती चक्रपाणी ॥ तुझी करणी कळली आम्हां ॥४८॥

तुझी बाळपणींहूनि प्रकृती ॥ आम्हांसी ठाउकीच जगत्पती ॥ आमुचीं मनें चोरुनि निश्चितीं ॥ घेऊनि श्रीपती गेलासी पैं ॥४९॥

तूं परम नाटकी चित्तचोर ॥ तुझा विश्वास नाहीं अणुमात्र ॥ तुज भाग्य आलें थोर ॥ बाळमित्र विसरलासी ॥५०॥

आमुच्या संगतीनें जगज्जीवना ॥ गाई राखिल्या तुवां मनमोहना ॥ तूं यशोदेचा तान्हा ॥ आम्ही कान्हा म्हणवूनि बाहूं ॥५१॥

गाई राखितां हृषीकेशी ॥ तूं आम्हांसांगातें जेविसी ॥ आमुच्या शिदोर्‍या ठकवूनि खासी ॥ न लाजसी तोचि कीं तूं ॥५२॥

हुतुतू हमामा हुमली ॥ आम्हांसीं घालिसी वनमाळी ॥ तुज बुक्यांवरि सकळीं ॥ डाई लागलिया मारुं गडया ॥५३॥

कृष्णा तूं मोठा चोर होसी ॥ तुज मायेनें बांधिलें उखळीसी ॥ तेव्हां उद्धरिलें यमलार्जुनां दोघांसी ॥ आठवतें कीं हृषीकेशा ॥५४॥

कृष्णा तुज भाग्य आलें थोर ॥ येर्‍हवीं तूं नंदाचा किशोर ॥ तुझ्या गोकुळींच्या खोडी समग्र ॥ न वर्णवती शेषातें ॥५५॥

वासुरें चारितां गोविंदा ॥ वळत्या न देसी तूं कदा ॥ मग तुज मारुं आम्ही मुकुंदा ॥ तें तुज आठवतें कीं ॥५६॥

आमुच्या शिदोर्‍या एकत्र करुनी ॥ काला वांटिसी तूं चक्रपाणी ॥ तैं तूं आंबिल ताक घटघटोनी ॥ पीत होतासी गोपाळा ॥५७॥

आतां बहुत जाहलासी सुकुमार ॥ तें विसरालासी तूं समग्र ॥ अरे तूं परम होसी निष्ठुर ॥ माया अणुमात्र नाहीं तूतें ॥५८॥

तैं तुझे अंगासी माखे शेण ॥ आतां चर्चिला उत्तम चंदन ॥ तेव्हां धांवसी घोंगडी पांघरुन ॥ पीतवसन आतां झळके ॥५९॥

तैं मयूरपिच्छें शिरीं शोभत ॥ आतां रत्‍नकिरीट विराजत ॥ तैं गुंजांचे हार डोलत ॥ आतां कौस्तुभपदकें झळकती ॥६०॥

तें तूं विसरलासी गोपाळा ॥ आतां भाग्य आलें घननीळा ॥ ऐकतां कृष्णनायिका वेळोवेळां ॥ हांसती रुक्मिणीसहित पैं ॥६१॥

एक गोपाळ म्हणे हृषीकेशी ॥ जैं तुं काळियाच्या डोहीं बुडलासी ॥ आम्हीं गोंगाट त्या समयासी ॥ हरि केला तुजकारणें ॥६२॥

आमुचा गोंगाट ऐकतां भेणें ॥ मग तुज सोडिलें काळियानें ॥ आम्हीं तुज वांचविलें प्राणें ॥ ऐकतां कृष्णें हास्य केलें ॥६३॥

शिळाधारीं इंद्र वर्षला ॥ आम्हींच मग गोवर्धन उचलिला ॥ तुवां एकटीच अंगोळी गोपाळा ॥ लावूनि ठकविसी आम्हांतें ॥६४॥

ऐशा संवगडियांच्या गोष्टी ॥ ऐकतां तोषला जगजेठी ॥ तों आल्या गोकुळींच्या गोरटी ॥ देखिल्या दृष्टीं कृष्णनाथें ॥६५॥

परम सुंदर लावण्यखाणी ॥ किंवा उतरल्या सौदामिनी ॥ किंवा आल्या स्वर्गाहूनी ॥ देवांगना साक्षात ॥६६॥

तटस्थ पाहती कृष्णनायिका ॥ म्हणती धन्य गोकुळींच्या गोपिका ॥ परम सुकुमार लावण्यलतिका ॥ वैकुंठनायका भाळल्या ॥६७॥

असो गोकुळींच्या युवती ॥ कृष्णचरण दृढ धारिणी ॥ सप्रेम कृष्णासी भेटती ॥ प्रेम चित्तीं न समाये ॥६८॥

म्हणती वेधका वनमाळी ॥ आम्हांसी टाकूनि गोकुळीं ॥ तुम्हीं द्वारका वसविली ॥ नाहीं दिधली भेटी कदा ॥६९॥

असो गोपिकांचें करुनि समाधान ॥ गौळियांसी भेटला श्रीकृष्ण ॥ तों नंदयशोदा देखतां दुरोन ॥ धांवोनि चरण हरि धरी ॥७०॥

तो पुराणपुरुष जगत्पाळक ॥ यशोदेचें पदी ठेवी मस्तक ॥ येरीनें हरीचे धरोन हस्तक ॥ क्षेमालिंगन पैं दीधलें ॥७१॥

यशोदेचे पयोधर ॥ तेथें पान्हा फुटला सत्वर ॥ ज्यांतील अमृत क्षीराब्धिजावर ॥ बाळपणीं प्याला असे ॥७२॥

यशोदा म्हणे राजीवनेत्रा ॥ निराळवर्णा कोमलगात्रा ॥ मज सांडूनि सुकुमारा ॥ बहुत दिवस गेलासी ॥७३॥

कृष्णा तुजविण एक क्षण ॥ झाला आम्हांसी पहा युगासमान ॥ हरि तुझी बाळलीला आठवून ॥ आम्हीं प्राण रक्षिले ॥७४॥

उखळीं बांधिलें तुज हृषीकेशी॥ म्हणोनि मजवरी रुमलासी ॥ मज टाकूनि परदेशीं ॥ तूं द्वारकेसी वसतोस पैं ॥७५॥

श्रीकृष्ण म्हणे जननीलागून ॥ तुम्हांपासीं लागलें माझें मन ॥ तों नंद आला जवळी धांवोन ॥ कृष्णें चरण वंदिले ॥७६॥

कमलोद्भवाचा जनिता ॥ तेणें आलिंगिला नंद पिता ॥ म्हणे सखया श्रीकृष्णनाथा ॥ दूर टाकिलें आम्हांतें ॥७७॥

असो हातीं धरुनि नंदयशोदेसी ॥ आणिलीं वसुदेवदेवकीपाशीं ॥ क्षेमालिंगनें एकमेकासी ॥ प्रेमादरें देती तेव्हां ॥७८॥

तों अष्टनायिका आल्या धांवोनी ॥ आणि सोळा सहस्त्र नितंबिनी ॥ दृढ लागती यशोदेचे चरणीं ॥ मस्तक ठेविती आदरें ॥७९॥

सोळा सहस्त्रांमाजी पट्टराणी ॥ लावण्यखाणी मन्मथजननी ॥ तिनें यशोदेचे चरणीं ॥ मस्तक ठेविला आदरें ॥८०॥

यशोदेनें रुक्मिणी हृदयीं धरिली ॥ आनंद न माये दिग्मंडळीं ॥ जैसी कौसल्येनें सीता आलिंगिली ॥ तैसीच रीति झाली येथें ॥८१॥

असो धावरी ग्रहणीं करुनि स्नान ॥ कृष्णें यात्रा केली सांग दान ॥ आनकदुंदुभि उग्रसेन ॥ भिन्न भिन्न दानें देती ॥८२॥

अमर्याद भांडार फोडून ॥ सुखी केले याचकांचें सदा तृप्त मन ॥ हरिवदन पाहतां ॥८३॥

गोकुळींचे जन आले ॥ तितुके श्रीकृष्णें गौरविले ॥ दिव्य वस्त्राभरणीं ते वेळे ॥ पूजिले गोवळें गोपाळे ॥८४॥

रुक्मिणी म्हणे यादवेंद्रा ॥ बंधूंची बरवी पूजा करा ॥ माझा हेत आजि पुरला खरा ॥ संवगडे तुमचे पाहूनि ॥८५॥

दिव्य वस्त्रें अलंकार जे चांगले ॥ गोकुळींच्या गोपीकांसी ते वेळे ॥ स्वहस्तें दीधले घननीळें ॥ देखतां हांसों आलें रुक्मिणीसी ॥८६॥

श्रीकृष्णासी म्हणे ते वेळां ॥ बरव्या गौरवा जी गोपीबाळा ॥ आपुली पूर्व ओळखी सांभाळा ॥ केला सोहळा जो बाळपणीं ॥८७॥

ऐकतां रुक्मिणीच्या वचना ॥ हांसा आलें जगन्मोहना ॥ सत्यभामादि सोळा सहस्त्र ललना ॥ हांसती तेव्हां आनंदें ॥८८॥

नंदयशोदेचें पूजन ॥ आपण करीत श्रीकृष्ण ॥ बहुत अलंकार धन ॥ नंदयशोदेसी समर्पिलें ॥८९॥

कृष्णनायिका समग्र ॥ यशोदेसी देती वस्त्रें अलंकार ॥ श्रीकृष्णाचे पुत्रपौत्र ॥ यशोदेसी भेटले ॥९०॥

देवकी म्हणे यशोदेलागून ॥ त्वां देखिलें हरीचें बाळपण ॥ कृष्णासी करविलें स्तनपान ॥ तूंचि धन्य त्रिभुवनीं ॥९१॥

कंसें आपटिलीं सहा बाळें ॥ कृष्णाऐसीं सुंदर सांवळें ॥ सांगतां देवकीसी रुदन आलें ॥ दुःख आठवलें बंदिशाळेचें ॥९२॥

देवकि म्हणे यदुवीरा ॥ तुवां गुरुपुत्र आणिला माघारा ॥ तुजहुनि ज्येष्ठ सुकुमारा ॥ कंसें पूर्वीं मारिलीं ॥९३॥

तीं माझीं मज आणूनी ॥ सत्वर भेटवीं चक्रपाणी ॥ मग बोले कैवल्यदानी ॥ देवकीप्रति तेधवां ॥९४॥

माते आतांचि पाहें नवल ॥ तुज भेटवितों साही बाळें ॥ यमासी आज्ञा करी घननीळ ॥ तेणें तत्काळ आणिलीं ॥९५॥

साही बाळें आणूनी ॥ देवकीपुढें देत मोक्षदानी ॥ आश्चर्य करिती दोघीजणी ॥ देवकी आणि यशोदा ॥९६॥

साही बाळें ते वेळीं ॥ देवकीनें हृदयीं धरिलीं ॥ जन आश्चर्य करिती सकळी ॥ अद्‌भुत करणी केली हो ॥९७॥

पंक्तीं घेऊनि गोकुळींचे जन ॥ श्रीकृष्णें सारिलें भोजन ॥ पांच रात्रीं तेथें क्रमून ॥ सुख दिधलें समस्तां ॥९८॥

याउपरी श्रीकृष्णाची आज्ञा घेऊन ॥ नंद यशोदा गौळीजन ॥ गोकुळासी गेले परतोन ॥ श्रीकृष्णासी आठवीत ॥९९॥

सकळ दळभारेंसीं मधुसूदन ॥ द्वारकेसी आला परतोन ॥ ग्रहणयात्रा जाहली संपूर्ण ॥ ब्रह्मानंदेकरुनियां ॥१००॥

यावरी एके दिनीं कृष्णसुत ॥ वनक्रीडेसी गेले समस्त ॥ कंदुक खेळत खेळत ॥ अरण्यांत धांवती ॥१॥

कंदुक खेळतां उसळला ॥ महाकूपामाजी पडिला ॥ सकळ यादव ते वेळां ॥ कूपाआंत विलोकिती ॥२॥

आंत किंचित नसे नीर ॥ माजी सरड पडिला पर्वताकार ॥ महाविशाळ भयंकर ॥ उघडूनि नेत्र विलोकित ॥३॥

यादव म्हणती जन्मवरी पाहीं ॥ एवढा सरड देखिला नाहीं ॥ एक धांवूनि लवलाहीं ॥ कृष्णासी सांगती नवल हें ॥४॥

बळसहित कमलावर ॥ तेथें पहावया आले सत्वर ॥ कूपामाजी कौस्तुभधर ॥ पाहे सादर विलोकूनि ॥५॥

कृष्णदृष्टी पडतां साचार ॥ तत्काळ जाहला त्याचा ऊद्धार ॥ पावोनियां दिव्य शरीर ॥ कूपाबाहेर पातला ॥६॥

जो ब्रह्मादिकां वंद्य पूर्ण ॥ क्षीराब्धिवासी नारायण ॥ त्याचे धरिले दृढ चरण ॥ प्रेमेंकरुन तयानें ॥७॥

उभा ठाकला जोडूनि कर ॥ मग तयासी पुसे श्रीधर ॥ तूं कोण येथें सांग वीर ॥ काय प्रत्यत्तर बोले तो ॥८॥

म्हणे माझें नांव नृग नृपवर ॥ पुण्यपंथें वर्ततां साचार ॥ मध्यें एक अपाय घडला थोर ॥ जाहला कहर मजवरी ॥९॥

एक्या महापर्वकाळीं ॥ ब्राह्मन बोलावूनि सकळी ॥ तयांसी सहस्त्र गोदानें अर्पिलीं ॥ सवत्स विधिप्रकारें ॥११०॥

पूजामान पावोनि ब्राह्मण ॥ गेले आश्रमासी गाई घेऊन ॥ त्यांत एक्या ऋषीची गाय पळोन ॥ आली कळपांत आमुच्या ॥११॥

तों दुसरे दिवशीं करुनि स्नान ॥ आणिक एक ब्राह्मनालागून ॥ तेचि गाय दिधली नेणोन ॥ मग तो ब्राह्मण आला पहावया ॥१२॥

तेणें येऊनि ती गाय धरिली ॥ म्हणे हे माझी पळोनि आली ॥ ब्राह्मण म्हणे मज आतां दिधली ॥ मी न सोडीं सर्वथा ॥१३॥

एकासीं एक भांडती ब्राह्मण ॥ म्यां धरिले दोघांचे चरण ॥ पहिल्या ब्राह्मणासी सहस्त्रगोदान ॥ द्यावया सिद्ध जाहलों ॥१४॥

तो म्हणे मी न घेईं सर्वथा ॥ माझीच मज देईं आतां ॥ तों दुसर्‍या ब्राह्मणासी प्रार्थितां ॥ तोही सर्वथा नायके ॥१५॥

दोघेही विप्र भांडतां ॥ न राहतीच राहवितां ॥ दोघे क्षोभोनि कृष्णनाथा ॥ मज शापशस्त्रें ताडिलें ॥१६॥

म्हणती महासरड होऊन ॥ कृपामाजी पडें बहुत दिन ॥ म्यां धरिले त्यांचे चरण ॥ मागुती वचन बोलिले ॥१७॥

पुढें अवतरेल श्रीकृष्ण ॥ जो पूर्णब्रह्म सनातन ॥ त्याची दृष्टी पडतां उद्धरोन ॥ जासील तेव्हां स्वर्गातें ॥१८॥

यादवांसी म्हणे कृष्णनाथ ॥ पाहा अन्याय तरी किंचित ॥ केवढा जाहला अनर्थ ॥ पुण्यपुरुषा रायातें ॥१९॥

यालागीं ब्राह्मणांसी भिऊन ॥ वर्ता तुम्ही सावधान ॥ हें असो तत्काळ विमान ॥ रायाकारणें पातलें ॥१२०॥

नमस्कारुनि हरीचे चरण ॥ नृगराजा गेला उद्धरोन ॥ हरिपदप्रसादेकरुन ॥ इंद्रभुवनीं राहिला ॥२१॥

द्वारकेंत प्रवेशला कृष्णनाथ ॥ तों भेटीसी आला वीर पार्थ ॥ चतुर रणपंडित सुभद्राकांत ॥ आवडे बहुत श्रीकृष्ण ॥२२॥

श्रीकृष्णें आवडी करुन ॥ हृदयीं आलिंगिला अर्जुन ॥ परम प्रीति दोघांलागून ॥ पंक्तीसी भोजन शेजारीं ॥२३॥

एका आसनीं दोघांसी बैसणें ॥ एके तल्पकीं निद्रा करणें ॥ गुह्य गोष्टी बोलणें ॥ दोघांजणीं एकांतीं ॥२४॥

तों द्वारकेमाजी एक ब्राह्मण ॥ त्याचीं आठ बाळें गेलीं सटवोन ॥ मागुती स्त्री प्रसूत होऊन ॥ नववा पुत्र जाहला ॥२५॥

ब्राह्मण श्रीरंगाजवळी आला ॥ बाळांचा वृत्तांत सांगितला ॥ हरि जे पांचवे दिवसीं पुत्र जातात याला ॥ उपाय मजला सांगा कांहीं ॥२६॥

आतां स्त्री जाहली प्रसूत ॥ एवढा तरि राखें सुत ॥ तों गर्वें बोले वीर पार्थ ॥ मी रक्षीन बाळ तुझें ॥२७॥

ब्राह्मणाच्या घरासी आला अर्जुन ॥ म्हणे मी बाळकाचा रक्षीन प्राण ॥ यम काय उभे चिरीन ॥ निजसामर्थ्येंकरुनियां ॥२८॥

मी असतां सामर्थ्यवंत ॥ काय करितील यमदूत ॥ कैसा सटवेल विप्राचा सुत ॥ तो आजि सत्य पाहेन मी ॥२९॥

जरी या बाळाचा जाईल प्राण ॥ तरी मीही अग्निकाष्ठें भक्षीन ॥ ऐसा करुनियां पण ॥ रक्षी अर्जुन सभोंवतें ॥१३०॥

विप्राच्या गृहावरुनि थोर ॥ दृढ रचिलें बाणांचें मंदिर ॥ दिव्य मंत्र जपोनि सत्वर ॥ दिग्बंधन पार्थ करी ॥३१॥

धनुष्यासी लावूनि बाण ॥ द्वारीं रक्षीत अर्जुन ॥ तों प्रवर्तला पांचवा दिन ॥ गेला प्राण बाळकाचा ॥३२॥

जननी पिटी वक्षःस्थळ ॥ अहा रे अर्जुना सटवलें बाळ ॥ पार्थ क्षोभला प्रबळ ॥ गेला तत्काळ यमपुरीं ॥३३॥

यमासी पुसे वृत्तांत ॥ तो म्हणे नवही बाळें येथ ॥ म्यां आणिलीं नाहीं सत्य ॥ जाण यथार्थ कपिध्वजा ॥३४॥

बाळकाकारणें ते वळे ॥ स्वर्ग मृत्यु पाताळ शोधिले ॥ चौदा लोकांत झाडे घेतले ॥ परी बाळें न सांपडती ॥३५॥

आला द्वारकेसी परतोन ॥ मग चेतविला महाअग्न ॥ प्राण द्यावयासी अर्जुन ॥ सिद्ध जाहला ते काळीं ॥३६॥

वृत्तांत ऐकोनि सर्वेश्वर ॥ पार्थाजवळी आला सत्वर ॥ कपिध्वजें वृत्तांत समग्र ॥ श्रीरंगासी सांगितला ॥३७॥

मग दिव्य रथ सजवूनि परिकर॥ श्रीकृष्णें आणविला सत्वर ॥ त्यावर कमलावर सुभद्रावर ॥ बैसोनियां चालिले ॥३८॥

पवनवेगें रथ जात ॥ पृथ्वीमंडळ उल्लंघी त्वरित ॥ सप्तसमुद्र अद्‌भुत ॥ क्रमूनि मागें टाकिले ॥३९॥

सप्तावरणें भेदून ॥ जेथें वसे आदिनारायण ॥ तेथें नेऊनि अर्जुन ॥ उभा केला श्रीकृष्णें ॥१४०॥

कोटि सूर्याची प्रभा जाय लपोन ॥ ऐसा शेषशायी नारायण ॥ त्याचि पदअंगुष्ठावरुन ॥ ब्रह्मांडचि ओंवाळिजे ॥४१॥

तें स्वरुपतेज अपार ॥ नेत्रीं पाहूं न शके मित्र ॥ त्याचें स्वपदीं वसुदेवपुत्र ॥ मिळोनि गेला एकत्वें ॥४२॥

परम घाबरा जाहला अर्जुन ॥ पाहे तंव जवळी नाहीं श्रीकृष्ण ॥ अद्‌भुत तेज न लक्षवे पूर्ण ॥ झांकी नयन भयें तेव्हां ॥४३॥

नयन झांकूनि पंडुसुत ॥ श्रीकृष्णा नामें हांक देत ॥ म्हणे कैवारिया धांव त्वरित ॥ कां मज येथें सांडिलें ॥४४॥

मंगळधामा राजीवनेत्रा ॥ पुराणपुरुषा स्मरारिमित्रा ॥ मन्मथजनका देवकीपुत्रा ॥ धांव सत्वर मजलागीं ॥४५॥

जलजोद्भवजनका मधुसूदना ॥ पांडवरक्षका भक्तजनरंजना ॥ समरधीरा दानवभंजना ॥ काढीं मज येथूनि ॥४६॥

कासावीस जाहला पार्थ ॥ मग प्रकटला कृष्णनाथ ॥ दिव्य चक्षु तयासी देत ॥ म्हणे पाहें अद्‌भुत तेज माझें ॥४७॥

मग पार्थें उघडिलीं नेत्रकमलें ॥ दिव्य स्वरुप न्याहाळिलें ॥ तंव तेथें नवही बाळें ॥ ब्राह्मणाचीं खेळती ॥४८॥

मग स्तवूनि आदिनारायण ॥ नवही बाळें घेतलीं मागोन ॥ रथीं बैसोनि कृष्ण अर्जुन ॥ आले परतोन द्वारकेसी ॥४९॥

अर्जुनाजवळी नवही बाळें ॥ श्रीकृष्णें दिधलीं तये वेळे ॥ मग ब्राह्मणासी बोलाविलें ॥ स्त्रीसहित तेधवां ॥१५०॥

उभयतांसी पूजूनि पार्थ ॥ समर्पिले नवही सुत ॥ ब्राह्मण आनंदें बहुत ॥ यश वर्णीत पार्थाचें ॥५१॥

ब्राह्मण गेला गृहासी ॥ मग अर्जुन म्हणे हृषीकेशी ॥ तुझी लीला ब्रह्मादिकांसी ॥ पाकशासनासी अगम्य ॥५२॥

श्रीकृष्ण म्हणे पार्था ॥ सर्व स्वरुपें मीच धरिता ॥ येथें दुजयाची नाहीं वार्ता ॥ कर्ता हर्ता मीच पैं ॥५३॥

असो आज्ञा घेऊनि अर्जुन ॥ इंद्रप्रस्थासी गेला परतोन ॥ सकळ अभिमान गळून ॥ कृष्णस्मरणीं वर्ततसे ॥५४॥

श्रीधर श्रोतयां विनवीत ॥ संपत आला हरिविजयग्रंथ ॥ परी एक अनुसंधानीं संमत ॥ पद्मपुराणींचें सुचलें ॥५५॥

पद्मपुराणीं पांडुर्म्गमाहात्म्य ॥ तेथें ही कथा आहे उत्तम ॥ श्रोतीं परिसिजे सप्रेम ॥ अत्यादरेंकरुनियां ॥५६॥

शची शक्राची अंगना ॥ ती एकदां गेली विष्णुभुवना ॥ तों देखिला वैकुंठराणा ॥ लक्ष्मीसहित ते वेळां ॥५७॥

करुनियां हरीसी नमन ॥ उभी ठाकली कर जोडून ॥ परी शचीचें इच्छी मन ॥ अर्धांगीं बैसेन हरीच्या ॥५८॥

हा परमात्मा आदिनारायण ॥ जरी मी याच्या अर्धांगीं बैसेन ॥ तरी भाग्य परिपूर्ण ॥ मग जगज्जीवन बोलत ॥५९॥

हरि म्हणें ते अवसरीं ॥ शची तुवां जें इच्छिलें अंतरीं ॥ साठी सहस्त्र वर्षें तप करीं ॥ हिमगिरिपाठारीं मजलागीं ॥१६०॥

पुढें मी धरीन कृष्णावतार ॥ गोकुळीं करीन लीलाचरित्र ॥ तूं राधा होऊनि सत्वर ॥ प्रकटें मग व्रजातें ॥६१॥

तेथें मी तुज वरीन ॥ मग मी कंसवधासी जाईन ॥ ते वेळे तूं गुप्त होऊन ॥ द्वारके येईं वेगेंसी ॥६२॥

ऐसा वर पावोनि ते अवसरीं ॥ इंद्राणी निर्धारें तप करी ॥ प्रकटली गोकुळा भीतरी ॥ भोगिला मुरारी कुंजवनीं ॥६३॥

मग मथुरेसी जातां हृषीकेशी ॥ वियोग न साहवे राधेसी ॥ गुप्त होऊनि हिमाचळासी ॥ मागुती तपासी ते गेली ॥६४॥

मग ते दिव्य तप करुनी ॥ तेचि आली द्वारकेलागूनीं ॥ श्रीकृष्णें राधेसी देखोनी ॥ आलिंगूनि अंकीं बैसविली ॥६५॥

अद्यापि द्वारकेसी जाण ॥ श्रोतीं पहावें जाऊन ॥ होतें राधाकृष्णपूजन ॥ सर्व जन देखती ते ॥६६॥

असो अर्धांगी राधा घेऊनी ॥ बैसला असतां चक्रपाणी ॥ तेथें आली रुक्मिणी ॥ हरिचरण पहावया ॥६७॥

जरी सोळा सहस्त्र गोपिका असती ॥ सत्यभामादि सकळ युवती ॥ परी त्याही येतां रुक्मिणी सती ॥ न बैसती हरिअंकीं ॥६८॥

रुक्मिणी येतांचि सकळा ॥ उभ्या राहती गोपबाळा ॥ सर्वांदेखतां चित्काळा ॥ हरिअर्धांगीं बैसत ॥६९॥

सर्वांदेखतां बैसे रुक्मिणी ॥ परी तिजदेखत न बैसे कोणी ॥ हे ज्ञानकळा पट्टराणी ॥ इची सरी कोणी न पावत ॥१७०॥

असो रुक्मिणी आली जों एकदां ॥ तों हरीचे अर्धांगीं बैसली राधा ॥ न धरी रुक्मिणीची मर्यादा ॥ चढली क्रोधा भीमकी ॥७१॥

पुढील भविष्य जाणूनी ॥ तात्काळ रुक्मिणी गेली रुसोनी ॥ दक्षिणदिंडीरवनीं येऊनी ॥ तप करीत बैसली ॥७२॥

दिंडीरवन तेचि पंढरी ॥ भीमातीरीं भीमकी तप करी ॥ मज येथें पहावया येईल मुरारी ॥ द्वारकेहूनि आपणचि ॥७३॥

मग दिंडीरवनांत ॥ भीमककन्या तप करीत ॥ तों द्वारकेसी कृष्णनाथ ॥ काय करिता जाहला ॥७४॥

रुक्मिणी जातां द्वारकेहूनी ॥ कळाहीन सकळ कामिनी ॥ ते सर्व सौभाग्यखाणी ॥ गेली रुसोनी भीमतटा ॥७५॥

मग रुक्मिणीकारणें कृष्णनाथ ॥ सर्व उर्वीमंडळ शोधीत ॥ तों गोकुळासी आला त्वरित ॥ बाळवेष धरी तेव्हां ॥७६॥

सवें गाईगोपाळ घेऊनी ॥ दक्षिण दिशे आला चक्रपाणी ॥ शोधीत वनीं उपवनीं ॥ ते रुक्मिणी चित्कळा ॥७७॥

गोरक्षणाचा वेत्र करीं ॥ तोचि दंड धरी पूतनारी ॥ शंख तो कमंडलु निर्धारीं ॥ संन्यासी हरि जाहला असे ॥७८॥

श्रीवत्सांकित मनोहर ॥ मुकुट कुंडलें मकराकार ॥ नीलजीभूतवर्ण श्रीधर ॥ बाळ दिगंबर जाहला ॥७९॥

शोधीत शोधीत हृषीकेशी ॥ आला लोहदंडक्षेत्रासी ॥ दिंडीरवन म्हणती त्यासी ॥ तेथें द्वारकावासी प्रवेशला ॥१८०॥

मागें टाकूनि गाईगोपाळ ॥ त्या वनांत प्रवेशे घननीळ ॥ तो तेथें बैसली वेल्हाळ ॥ तप करीत एकांतीं ॥८१॥

अंकांतरीं धरुनि वेत ॥ दोन्ही कटीं ठेवूनि हस्त ॥ रुक्मिणीचें वदन विलोकीत ॥ उभा राहिला तेथेंचि ॥८२॥

म्हणे पद्मनेत्रे कामिनी ॥ कां बैसलीस येऊनी॥ मज न गमे तुजवांचूनी ॥ म्हणोनि धांवूनि येथें आलों ॥८३॥

म्हणे प्रिये तुजवांचून ॥ मज युगासमान वाटे क्षण ॥ मग रुक्मिणी बोले वचन ॥ तूं कोण आहेसी सांग पां ॥८४॥

चोरटियासारखा अकस्मात ॥ उभा ठाकलासी या वनांत ॥ परांगनेसीं बोलावया मात ॥ काय कारण तुज असे ॥८५॥

परनारीसी प्रिया म्हणसी ॥ मज ऐसें वाटतें मानसीं ॥ बहुतक परद्वारी आहेसी ॥ बाळपणापासूनि ॥८६॥

ऐकोनि भीमकीचें वचन ॥ हास्य करीत मधुसूदन ॥ मग हृदयीं दृढ आलिंगून ॥ केलें समाधान तियेचें ॥८७॥

तों पुढें पुंडलीक भक्त ॥ मातापितयांची सेवा करीत ॥ तेणें तोषला जगन्नाथ ॥ जाऊनि तेथें उभा ठाके ॥८८॥

हरि म्हणे धन्य धन्य पुंडलीका ॥ वर मागें भक्तटिळका ॥ येरें वीट टाकिली वैकुंठनायका ॥ बैसावयाकारणें ॥८९॥

त्या विटेवरी पद जोडूनी ॥ दोन्ही कर कटीं ठेवूनी ॥ उभा राहिला मोक्षदानी ॥ पुंडलिकासी न्याहाळीत ॥१९०॥

मातापितयांची सेवा करुनी ॥ हरीसमीप आला पुंडलीक मुनी ॥ प्रेमें लागला दृढ चरणीं ॥ मग मोक्षदानी बोलत ॥९१॥

पुंडलिका वर मागें येचि क्षणीं ॥ येरु म्हणे जैसा आहेसी चक्रपाणी ॥ तैसा चिरकाळ ये स्थानीं ॥ उभा राहें भगवंता ॥९२॥

जे तुझ्या दर्शनासी येती ॥ ज्ञानहीन मूढमती ॥ त्यांसी दर्शनें व्हावी मुक्ती ॥ हेचि विनंति माझी असे ॥९३॥

आणि या क्षेत्राचें नाम पंढरीनगर ॥ दक्षिणद्वारका नाम साचार ॥ रुक्मिणीसहित तूं सर्वेश्वर ॥ राहे स्थिर येथेंचि ॥९४॥

विठ्ठलनाम अभिधान ॥ चालवावें आतां येथून ॥ मज कोठें न जावें सोडून ॥ कृपाळुवा सर्वेशा ॥९५॥

म्हणून दक्षिणद्वारका पंढरीं ॥ जे विख्यात भूमंडळावरी ॥ सकळ द्वारकेची संपदा मुरारी ॥ आणीत तेव्हां पंढरीये ॥९६॥

हा भीमातीरविहारी दिगंबर ॥ आदिपुरुष परात्पर ॥ आनंदसांप्रदाय थोर ॥ तेथूनिया वाढला ॥९७॥

मूळ गुरु आदिनारायण ॥ प्रथम शिष्य चतुरानन ॥ आपुलें जें गुह्य ज्ञान ॥ ठेविलें पूर्ण त्यापासी ॥९८॥

तेंचि ब्रह्मवंद्य निजज्ञान ॥ अत्रीसी दिधलें प्रीतीकरुन ॥ त्याचें पोटीं परब्रह्म पूर्ण ॥ दत्तात्रेय अवतरला ॥९९॥

अवतार उदंड होऊनि गेले ॥ परी दत्तात्रेयरुप आहे संचलें ॥ अत्रीनें ज्ञान ठेविलें ॥ दत्तात्रेयीं सर्व ते वेळां ॥२००॥

त्या दत्तात्रेयापासून॥ सदानंदीं बिंबलें ज्ञान ॥ तेंचि रामानंदी ठसावोन ॥ परिपूर्ण पसरलें ॥१॥

तेथूनि अमळानंद यतीश्वर ॥ जो गंभीरपणें जैसा सागर ॥ तेथूनि ज्ञानसमग्र ॥ ब्रह्मानंद अवतरले ॥२॥

तेथूनि सहजानंदमुनी ॥ ज्याची समाधि आहे कल्याणीं ॥ तेथूनि पूर्णानंद पूर्णपणीं अवतरला यतिराज ॥३॥

तेथूनि दत्तानंद तत्त्वतां ॥ जो श्रीधराचे पितयाचा पिता ॥ तो दत्तात्रेयचि मागुता ॥ अवतरला सहजस्थितीं ॥४॥

तेथुनि ब्रह्मानंद सद्‌गुरु ॥ जो ज्ञानाचा महामेरु ॥ श्रीधरवरद निर्विकारु ॥ भीमातीरविलासी जो ॥५॥

शालिवाहन शके सोळाशेंचोवीस ॥ चित्रभानु नाम संवत्सरास ॥ शुद्ध द्वितीया मार्गशीर्षमास ॥ ते दिवसीं ग्रंथ संपला ॥६॥

श्रीपांडुरंगवरेंकरुन ॥ पंढरीसी ग्रंथ जाहला निर्माण ॥ एकदां श्रवण करितां परिपूर्ण ॥ पापें दारुण भस्म होती ॥७॥

तीन आवर्तनें वाचिता पवित्र ॥ कुळीं होय दिव्य पुत्र ॥ तो भक्तराज महाचतुर ॥ होईल ऐसें जाणिजे ॥८॥

एक आवर्तन करितां ॥ हरे घोर संकटचिंता ॥ शत्रुपराजय तत्त्वतां ॥ श्रवण करितां हरिविजय ॥९॥

काम क्रोध मद मत्सर ॥ हेचि शत्रु अनिवार ॥ यांचा पराजय होईल साचार ॥ श्रवण करितां भावार्थें ॥२१०॥

हरिविजय करितां श्रवण ॥ हरेल सकळ ऋण अथवा रोग दारुण ॥ आपण प्रकटोनि श्रीकृष्ण ॥ संकटें त्यांचीं निरसील ॥११॥

छत्तीस अध्याय ग्रंथ तत्त्वतां ॥ प्रीतीं पावो पंढरीनाथा ॥ या ग्रंथासी मूळकर्ता ॥ पंढरीनाथ जाणिजे ॥१२॥

जें जें विठ्ठलें कर्णीं सांगितलें ॥ तें तें येथें पत्रीं लिहिलें ॥ न्यून अथवा आगळें ॥ त्याचें तोचि जाणे पैं ॥१३॥

दशम आणि हरिवंश ॥ पद्मपुराणींच्या कथा विशेष ॥ त्याचि हरिविजयीं सुरस ॥ श्रोतीं सावकाश परिसाव्या ॥१४॥

छत्तीस अध्याय हरिविजय ॥ पांडुरंगासी परम प्रिय ॥ हा ग्रंथ संग्रहितां तें घर निर्भय ॥ सदा विजय होइजे ॥१५॥

हरिविजयग्रंथ भांडार ॥ छत्तीस कोठडयांचें परिकर ॥ माजी रत्‍नें भरलीं नानाप्रकार ॥ जोहरी संत परीक्षक ॥१६॥

छत्तीस तत्त्वें हीं साचार ॥ कीं छत्तीस खणांचें दामोदर ॥ कीं छत्तीस गंगा मिळोनि समग्र ॥ हरिविजयसमुद्र भरलासे ॥१७॥

कीं छत्तीस कोहळीं धन ॥ दिधलें ब्रह्मानंद दावून ॥ कीं छत्तीस खणांचें वृंदावन ॥ निजभक्त संपूर्ण तुळसी वरी ॥१८॥

कीं हरिविजयग्रंथ राजेंद्र ॥ हे छत्तीस जाणा त्याचे महावीर ॥ करिती सकळ पापांचा संहार ॥ प्रतापधीर महायुद्धीं ॥१९॥

हरिविजय हेंचि आकाश ॥ तेथें हे छत्तीस चंडांश ॥ ब्रह्मांड भेदूनि प्रकाश ॥ पलीकडे जाय पैं ॥२२०॥

कीं छत्तीस वृक्षांचें वन ॥ कीं छत्तीस क्षेत्रें पिकलीं पूर्ण ॥ कीं हें पदक देदीप्यमान ॥ छत्तीस रत्‍नांचें जडियेलें ॥२१॥

कीं हा प्रयागराज थोर ॥ भावमास अतिपवित्र ॥ स्नान करी पुण्यवंत नर ॥ अर्थीं बुडी देऊनियां ॥२२॥

कीं हा भवरोगावरी दिव्य रस ॥ बुद्धिमंदासी होय मतिप्रकाश ॥ शुक सांगे परीक्षितीस ॥ वारंवार गौरवूनि ॥२३॥

प्रथमाध्यायीं मंगलाचरण ॥ गणेशसरस्वतीसंतवर्णन ॥ गुरुमहिमा सांगोन ॥ प्रथमाध्याय संपविला ॥२४॥

दैत्य पृथ्वीवरी माजले ॥ म्हणोनि देव क्षीरसागरासी गेले ॥ स्तवन करुनि सुरवर परतले ॥ ऐसें हें कथिलें द्वितीयाध्यायीं ॥२५॥

देवकीवसुदेवांचें लग्न ॥ अवतरले शेषनारायण ॥ गोकुळासी गेले जगज्जीवन ॥ हें निरुपण तिसर्‍यांत ॥२६॥

गर्गें वर्णिलें जातक ॥ पाळणां निजविला वैकुंठनायक ॥ पूतना शोषिली निःशंक ॥ चौथ्यांत हें कथिलें असे ॥२७॥

पांचव्यांत तृणावर्त येऊन ॥ श्रीकृष्णासी नेलें उचलोन ॥ नाना क्रीडारस दावून ॥ मोहिलें मन सर्वांचें ॥२८॥

सहाव्यांत वनमाळी ॥ चोरीकर्मे केलीं गोकुळीं ॥ गोपींनीं गार्‍हाणीं सांगीतलीं ॥ कौतुकें करुनि यशोदेसी ॥२९॥

सातव्यांत हें कथन ॥ दहावतारलीला पूर्ण ॥ गोपींसी दावी श्रीकृष्ण ॥ सांगती पूर्ण यशोदेसी ॥२३०॥

आठव्यामाजी कथन ॥ पद्मपुराणींचें संमत पूर्ण ॥ राधेनें कृष्ण घरासी नेऊन ॥ खेळविला बहुसाल ॥३१॥

नवव्यांत हेचि कथेची प्रौढी ॥ कृष्णें केल्या बहुत खोडी ॥ माया उखळीं बांधी तांतडी ॥ यमलार्जुन उद्धरिले ॥३२॥

दहाव्यांत गोपाळकाला करुन ॥ वनक्रीडा करी नारायण ॥ कमलोद्भवें केलें वत्सहरण ॥ करी स्तवन प्रीतीनें ॥३३॥

अकराव्यांत कालियामर्दन ॥ बाराव्यांत गोवर्धनोद्धारण ॥ तेराव्यांत कंसदूत मर्दून ॥ गोरक्षण केलें पैं ॥३४॥

चौदाव्यांत अघासुरमर्दन ॥ नंद यमुनेंत गेला बुडोन ॥ तो माघारा आणिला नारायणें ॥ वरुणापाशीं जाऊनियां ॥३५॥

पंधराव्यांत हेंचि कथन ॥ कृष्णें घेतलें देवकीचें वाण ॥ वनांत मागे राधेसी हरि दान ॥ तेंचि वर्णन बहुत असे ॥३६॥

सोळाव्यांत यज्ञपत्‍न्यांनीं येऊन ॥ हरीसी समर्पिलें अन्न ॥ रासक्रीडासंपूर्ण ॥ सत्राव्यांत कथियेली ॥३७॥

अठराव्यांत निरुपण ॥ अक्रूर कृष्णासी गेला घेऊन ॥ एकोनविंशति अध्यायीं कंस वधून ॥ राज्य दिधलें उग्रसेना ॥३८॥

विसावा अध्याय अतिसुरस ॥ श्रीकृष्ण शरण सांदीपनास ॥ अद्‌भुत कथिला ज्ञानरस ॥ गुरुशिष्यलक्षणें ॥३९॥

एकविसाव्यांत उद्धवें येऊन ॥ गोपींसीं कथिलें ब्रह्मज्ञान ॥ बाविसाव्यांत जरासंध पराभवून ॥ काळयवन भस्म केला ॥२४०॥

तेविसावा चोविसावा सार ॥ येथें कथिलें रुक्मिणीस्वयंवर ॥ पंचविसाव्यांत सर्वेश्वर ॥ जांबुवंती पर्णूनि आणीत ॥४१॥

सविसाव्यांत कृष्णनायिका ॥ आणिल्या षोडशसहस्त्र गोपिका ॥ सत्ताविसाव्यांत रुक्मिणी विनोद देखा ॥ आणि प्रद्युम्न उपजला ॥४२॥

अठ्ठाविसाव्यां उखाहरण ॥ भुजा छेदूनि त्रासिला बाण ॥ एकुण तिसाव्यात दरिद्रहरण ॥ सुदामयाचें पैं केलें ॥४३॥

तिसाव्यांत सत्यभामेचा विनोद ॥ नारदासी दान दिधला गोविंद ॥ एकतिसाव्यांत गरुडाचा गर्वमद ॥ हनुमंताहातीं हरियेला ॥४४॥

बत्तिसाव्यांत सुभद्राहरण ॥ नारदासी घरोघरीं कृष्णदर्शन ॥ तेहतिसाव्यांत राजसूययज्ञ ॥ जरासंधा मारविलें ॥४५॥

चौतिसाव्यांत कथा निश्चितीं ॥ वाढीत असतां दौपती सती ॥ बिरडें सुटतां श्रीपती ॥ चतुर्भुज करी तेव्हां ॥४६॥

पस्तिसावा अध्याय मयस भावर्णन ॥ शिशुपाळ वक्रदंत वधून ॥ विजयी जाहला मधुसूदन ॥ हेंचि कथा असंभाव्य ॥४७॥

छत्तिसाव्यांत ग्रहणयात्रा करुन ॥ भेटले गोकुळींचे जन ॥ याउपरी पंढरीसी आला श्रीकृष्ण ॥ हेंचि निरुपण शेवटीं ॥४८॥

ऐसा छत्तीस अध्याय हा ग्रंथ ॥ हरिविजय यथार्थ ॥ सदा अवलोकोत भक्तसंत ॥ विवेकदृष्टीकरुनियां ॥४९॥

पंढरीहून चार योजनें दूर ॥ पश्चिमेसी नाझरें नाम नगर ॥ तेथील देशलेखक साचार ॥ ब्रह्मानंद पूर्वाश्रमीं ॥२५०॥

पुढें पंढरीसी जाऊन ॥ मग केलें संन्यासग्रहण ॥ त्यावरी भीमातीरींच संपूर्ण ॥ समाधिस्त निजसुखें ॥५१॥

तो ब्रह्मानंदमहाराज पिता ॥ सावित्री नामें माझी माता ॥ श्रीधरें वंदूनीं उभयतां ॥ हरिविजय संपविला ॥५२॥

सकळ श्रोतीयांसी आदरें ॥ साष्टांग नमूनि श्रीधरें ॥ ब्रह्मानंदेंकरुनि निर्धारें ॥ हरिविजय विलोकिजे ॥५३॥

इति श्रीहरिविजय ग्रंथ ॥ संमत हरिवंशभागवत ॥ सदा परिसोत प्रेमळ पंडित ॥ षट्‌त्रिंशत्तमाध्याय शेवटींचा ॥२५४॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥अध्याय॥३६॥ओंव्या॥२५४॥

॥ इति श्रीहरिविजय समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP