हरिविजय - अध्याय १६
श्रीधरांसारखा भगवंताच्या भक्तिप्रेमात न्हाऊन गेलेला अजोड कवी, गोपालकृष्णाच्या अति गोड लीलांचे वर्णन करतो, तेव्हा काय बहार येते.
श्रीगणेशाय नमः ॥
या श्रीरंगाचें करितां स्मरण ॥ यातुल्य तप दुजें आन ॥ नसे शोधितां त्रिभुवन ॥ परम पावन नाम देखा ॥१॥
आणिक अष्टादश पुराणें ॥ बोलिलीं सत्यवतीहृदयरत्नें ॥ परी नामाहूनि विशेष साधनें ॥ सर्वथाही नव्हेती ॥२॥
पापतल्लक्षणहस्ती ॥ याची तोंवरी जाणिजे मस्ती ॥ नामसिंहप्रतापकीर्ती ॥ ऐकिली नाहीं जोंवरी ॥३॥
ऐकतां नामसिंहप्रतापा ॥ पळ सुटे मत्तमातंगपापा ॥ लपावया न मिळे खोपा ॥ गतप्राण होती तेव्हांचि ॥४॥
पाप जाळावया समस्त ॥ हरिनामाग्नि धडाडत ॥ क्षणें दुरितकाष्ठें जाळीत ॥ प्रताप अद्भुत न वर्णवे ॥५॥
नामाग्नीनें न जळे ॥ ऐसें पाप कोणीं नाहीं केलें ॥ वाल्मीकें बहुत पाप जोडिलें ॥ परी नाहीं उरलें नामापुढें ॥६॥
गणिका आणि अजामिळ ॥ इंहीं केले दोषकल्लोळ ॥ परी नामाचें अद्भुत बळ ॥ जाळी सकळ क्षणार्धें ॥७॥
ऐसा ज्याच्या नामाचा महिमा ॥ वर्णितां देव पावले उपरमा ॥ तो गोकुळीं अवतरला जगदात्मा ॥ रुपनामातीत जो ॥८॥
असो पंचदशाध्यायीं कथा जाहली ॥ नग्न गोपी कदंबातळीं ॥ त्यांचीं वस्त्रें देऊनि वनमाळी ॥ सुख सर्वांसी दीधलें ॥९॥
श्रीकृष्ण पूर्णावतार ॥ लीलावतारी निर्विंकार ॥ दाविला पराक्रम थोर ॥ गोकुळामाजी सर्वांतेम ॥१०॥
पूतना तृणावर्त शकट मारिला ॥ अघ बक केशिया संहारिला ॥ द्वादश गांवें अग्नि गिळिला ॥ अचल धरिला नखाग्रीं ॥११॥
इंद्र देवांसहित उतरला ॥ सर्वांदेखतां हरि पूजिला ॥ वत्सहरणीं शरण आला ॥ कमलोद्भव आपण ॥१२॥
ऐसाही प्रताप जाणोन ॥ गोकुळींचे समस्त ब्राह्मण ॥ निंदेसी प्रवर्तले अज्ञान ॥ निर्गुणा गुण लाविती ॥१३॥
म्हणती या कर्मभ्रष्टें कैसें केलें ॥ गोकुळ अवघें चौढाळिलें ॥ सकळ सोंवळें ओंवळें ॥ केलें गोवळें एकचि ॥१४॥
स्नानसंध्या यज्ञ आचार ॥ बुडवूनि केला अनाचार ॥ भ्रष्टविलें गोकुळ समग्र ॥ जावें सत्वर येथूनियां ॥१५॥
उरों नेदी कोठें अनसुट ॥ परद्वारी हा क्रियाभ्रष्ट ॥ आम्ही ब्राह्मन कर्मनिष्ठ ॥ थोर अरिष्ट आम्हांसी हें ॥१६॥
आम्ही ब्राह्मण उंचवर्ण ॥ सोंवळें विशेष सर्वांहून ॥ आमचे दीक्षेनें सर्वजण ॥ पाहोनियां वर्तती ॥१७॥
कैसे भुलले ब्राह्मण ॥ पूर्ण ब्रह्मानंद श्रीकृष्ण ॥ नेणोनि धरिला अभिमान ॥ ज्ञातृत्वाचा अपार ॥१८॥
हृदयीं नोळखतां इंदिरावर ॥ आचार तितुका अनाचार ॥ कर्म तोचि भ्रम थोर ॥ पिशाच नर तोचि पैं ॥१९॥
प्रत्यया न येतां कमलोद्भवपिता ॥ सर्व साधनें गेलीं वृथा ॥ भक्ति तेचि अभक्ति तत्त्वतां ॥ कैंची मुक्तता तयासी ॥२०॥
तेणें केलें वेदपठण ॥ करतलामलक शास्त्रपुराण ॥ परी तें मद्यपियाचें भाषण ॥ हरीसी शरण न रिघतां ॥२१॥
जाणे चतुःषष्टि कळा ॥ परी त्या अवघ्याचि विकळा ॥ हृदयीं नोळखतां तमालनीळा ॥ विद्या विकळा चतुर्दश ॥२२॥
तेणें केलें तीर्थाटन ॥ यमनियमादिक साधन ॥ तेणें केलें जें कीर्तन ॥ तें जाण गायन गोरियाचें ॥२३॥
जैसी मुग्धा बत्तीसलक्षणी ॥ परम सुंदर चातुर्यखाणी ॥ परी मन नाहीं पतिभजनीं ॥ तरी सर्वही व्यर्थ गेलें ॥२४॥
खरपृष्ठीं चंदन देखा ॥ परी नेणे तो सुवाससुखा ॥ षड्रसां फिरविजे दर्वी पाका ॥ रसस्वाद नेणेचि ॥२५॥
गणिका राम म्हणतांचि तरली ॥ इंहीं शास्त्रपुराणें अभ्यासिलीं ॥ तरी न तरती कदाकाळीं ॥ न ये वनमाळी प्रत्यया ॥२६॥
कृपा न करितां क्षीराब्धिजावर ॥ व्यर्थ काय चाटावा तत्त्वविचार ॥ त्याचें ज्ञान तें व्यर्थ करकर ॥ जैसे कीर अनुवादती ॥२७॥
विगतधवेचें नवयौवन ॥ गर्भांधाचे विशाळ नयन ॥ कीं कोल्हाटियाचें शूरत्व पूर्ण ॥ कीं तत्त्वज्ञान धनलुब्धाचें ॥२८॥
कीं जाराचा व्यर्थ आचार ॥ अदात्याचें उंच मंदिर ॥ कीं नपुंसकाचें लिंग थोर ॥ तैसे ते नर व्यर्थ पैं ॥२९॥
ग्रामथिल्लरींचें निर्मळ नीर ॥ कीं अंत्यजाचें रम्यमंदिर ॥ कीं वेश्येचें मुख सुंदर ॥ तैसे अपवित्र नर तेचि ॥३०॥
कीं यात्रेंसी मैंद आले ॥ कीं वाटपाडे निरंजनीं बैसले ॥ कीं कंटकवृक्ष दाट लागले ॥ आंत कोणा न रिघवे ॥३१॥
कीं नटांमाजील कामिनी ॥ कीं तममय कुहूची यामिनी ॥ कीं अजाकंठींचे स्तन दोनी ॥ तैसे प्राणि व्यर्थ ते ॥३२॥
आतां असो हें बहुभाषण ॥ मिळाले सकळ ब्राह्मण ॥ गोकुळ टाकोनि दूर अरण्य ॥ कृष्ण भेणें सेविलें ॥३३॥
कुटुंबांसहित विप्र ॥ तिंही वसविलें घोर कांतार ॥ जवळी लक्षूनि यमुनातीर ॥ मख थोर आरंभिला ॥३४॥
तृणाचे मांडव ते वेळां ॥ घालोनि केल्या पाकशाळा ॥ यज्ञशाळा रचिल्या विशाळा ॥ विप्रमेळा बैसावया ॥३५॥
करुनि राजयाचें उपार्जन ॥ द्रव्यें आणिलीं मेळवून ॥ परी अंतरले हरिचरण ॥ पामरें पूर्ण नेणती ॥३६॥
हरिस्वरुप कदा न कळे ॥ यज्ञकुंडें फुंकिती बळें ॥ व्यर्थ धुरें भरिले डोळे ॥ काय केलें सार्थक ॥३७॥
वर्हाडी जैसे वराविण ॥ कीं नासिकावांचून सुंदरपण ॥ तैसें हरिकृपेविण ॥ यज्ञ व्यर्थ सर्वही ॥३८॥
यज्ञभोक्ता श्रीकरधर ॥ त्यासी नोळखती पामर ॥ स्वर्गनिमित्त साचार ॥ क्रतु थोर मांडिला ॥३९॥
श्रीकृष्णाचा संचार नाहीं ॥ ऐसें वन वसविलें त्यांहीं ॥ असो यावरी क्षीराब्धीचा जांवई ॥ काय करिता जाहला ॥४०॥
एके दिनीं प्रातःकाळीं ॥ वनासी निघाला वनमाळी ॥ गाई सोडोनि सकळी ॥ परमवेगें निघाला ॥४१॥
शिदोरी न घेतां श्रीरंग ॥ तैसाचि चालिला सवेग ॥ हरि गेला तो लक्षूनि मार्ग ॥ गोपवृंद चालिले ॥४२॥
हरीविण कोण न राहे मागें ॥ यालागीं धांवती लागवेगें ॥ शिदोर्या विसरले अवघे ॥ परमवेगें धांवती ॥४३॥
दूरी अंतरला जगन्मोहन ॥ आड येईल मायाविघ्न ॥ हें कृष्णदास जाणोन ॥ वेगेंकरोन धांवती ॥४४॥
पूर्वी हरीसी टाकूनि पुढें गेलों ॥ कालियाविषा वरपडलों ॥ अघासुराच्या मुखीं सांपडलों ॥ श्रीकृष्ण दूरी राहतां ॥४५॥
यालागी कमलदलाक्षाचे पाय ॥ अंतरतां बहु विघ्न आहे ॥ म्हणोनि गोपाळ लवलाहें ॥ हरीमागें धांवती ॥४६॥
हरि पावला यमुनातीर ॥ चहूंकडोनि मिळाले गोभार ॥ गोपांहित यादवेंद्र ॥ वनीं क्रीडा करीतसे ॥४७॥
विशाल तमाल चंदन ॥ चूत कदंब बदरी कांचन ॥ केळी नारळी रातांजन ॥ गेले गगन भेदीत ॥४८॥
अशोक पारिजातक चंपक ॥ मोगरी जाई जुई कोविदारक ॥ बकुल शतपत्रकमळें सुरेख ॥ सकळ वृक्ष सदा फळती ॥४९॥
धन्य धन्य ते तरुवर ॥ करिती विश्वास उपकार ॥ कीं ते तप करिती ऋषीश्वर ॥ कृष्णप्राप्तीकारणें ॥५०॥
गोप गुंफोनि वनमाळा ॥ घालिती जगद्वंद्याचे गळां ॥ वृक्षच्छायेसी सांवळा ॥ ठायीं ठायीं क्रीडतसे ॥५१॥
वृक्षपल्लव सुकोमळ ॥ तुरे खोंविती शिरीं सकळ ॥ तों जाहला माध्यान्हकाळ ॥ क्षुधेनें गोपाळ व्यापिले ॥५२॥
ज्ञान ध्यान श्रवण मनन ॥ क्षुधेपुढें पळती उठोन ॥ क्षुधाराक्षसी दारुण ॥ छळी पूर्ण सकळ जीवां ॥५३॥
पेटतां क्षुघानळ थोर ॥ नावडती वस्त्रें अलंकार ॥ गीत नृत्य विलास समग्र ॥ क्षुधेपुढें पळती पैं ॥५४॥
नाना विद्या युक्ती कळा ॥ क्षुधेपुढें अवघ्या विकळा ॥ असो गोपाळ वेळां ॥ घनसांवळा विनविती ॥५५॥
म्हणती जगत्पालका श्रीपती ॥ क्षुधा लागली सकळांप्रती ॥ आतां कैसी करावी गती ॥ शिदोर्या सर्वही विसरलों ॥५६॥
मग सखयांसी म्हणे यादवेंद्र ॥ पैल यज्ञशाळा दिसती दूर ॥ तेथें आमुच्या गांवींचे विप्र ॥ क्रतु थोर करिताती ॥५७॥
यज्ञमंडपद्वारीं निश्चित ॥ जो कां उभा राहे अतीत ॥ त्यास अन्न देवोनि मनोरथ ॥ पुरवावा सर्वथा ॥५८॥
अतिथि विन्मुख जातां ॥ यज्ञफळ गेलें वृथा ॥ म्हणोनि गोपासी म्हणे जगत्पिता ॥ तुम्हीं जाइंजे तेथवरी ॥५९॥
ते न करिता अनमान ॥ तुम्हांसी देती उत्तम अन्न ॥ म्हणावें बळिराम आणि श्रीकृष्ण ॥ क्षुधाक्रांत जाहले ॥६०॥
शिदोर्या आलों विसरोन ॥ द्यावें सकळांपुरतें अन्न ॥ ऐसें ऐकतां हरीचें वचन ॥ गोप तेथूनि धांवले ॥६१॥
नाना रंगांचीं घोंगडीं ॥ पांघरले जगद्वंद्याचे गडी ॥ डांगा घेऊनि धांवती तांतडी ॥ विप्रांजवली पातले ॥६२॥
तों चंडकिरणकन्यातीरीं ब्राह्मण ॥ बैसले करीत अनुष्ठान ॥ एक प्राणायाम करुन ॥ नासिक धरुनि बैसले ॥६३॥
रेचक पूरक कुंभक ॥ सवेंचि सोडिती त्राहाटक ॥ नेणती वैकुंठनायक ॥ वृथा कटकट करितातीं ॥६४॥
एक इंद्रातें उपासिती ॥ परी इंद्रपद नाशवंत नेणती ॥ इंद्राचा इंद्र गोकुळपती ॥ त्यासी न भजती मंदभाग्य ॥६५॥
एक उपासिती चंडांशा ॥ आयुष्य मागती देहआशा ॥ परी न भजती रमाविलासा ॥ आशापाशांमाजी पडले ॥६६॥
एक म्हणती हो बहुत धन ॥ यालागीं करिती श्रीऔपासन ॥ नाशवंत धन दारा यौवन ॥ मूर्खपणें नेणती ॥६७॥
सांडोनि सर्व भजनाचार ॥ श्रीचाच करिती परमादर ॥ श्रियेचा पति जो श्रीधर ॥ त्यासी अभागी न भजती ॥६८॥
एक उपासिती दृढ शक्ती ॥ परी अनंतशक्ती ज्यापुढें राबती ॥ तो महामायेचा निजपती ॥ त्यासी न भजती पामर ॥६९॥
एक धातुमूर्ति काढूनि ॥ करिती श्रौततांत्रिकमिश्र पूजन ॥ प्रत्यक्ष वृंदावनी जगन्मोहन ॥ त्यासी ब्राह्मण नोळखती ॥७०॥
जो सप्तधातुविरहित ॥ सच्चिदानंद अमूर्त मूर्त ॥ त्यासी नेणोनियां भ्रांत ॥ धातु पूजिती दांभिकत्वें ॥७१॥
एका वैष्णवपणाचा अभिमान ॥ एक म्हणती आम्ही शैव निर्वाण ॥ एक म्हणती आम्ही सौरसुजाण ॥ आमुचें भजन विशेष पैं ॥७२॥
शाक्त म्हणती आम्ही श्रेष्ठ ॥ गाणपत्य म्हणती वरिष्ठ ॥ परी नेणती श्रीवैकुंठ ॥ जो विशेष सर्वांसी ॥७३॥
विष्णु ज्याचें अंतःकरण ॥ अहंकार ज्याचा उमारमण ॥ विरिंचि ज्याची बुद्धि पूर्ण ॥ त्यासी न भजोन नाडले ॥७४॥
नेत्र ज्याचे चंडकिरण ॥ अत्रितनय ज्याचें मन ॥ यम दाढा परम तीक्ष्ण ॥ त्यासी न भजोन नाडले ॥७५॥
पाणी ज्याचे शचीनाथ ॥ मुख ते जातवेद निश्चित ॥ असो देवताचक्र समस्त ॥ आश्रयें ज्याच्या वर्ततसे ॥७६॥
त्यास न भजोनि विप्र ॥ जे वेदांचा ताठा थोर ॥ धरुनि बैसले समग्र ॥ यमुनातीरीं सर्वही ॥७७॥
तों आले कृष्णदास समस्त ॥ धरामरांसी नमन करीत ॥ सांगितला सर्व वृत्तांत ॥ परम विनीत होवोनियां ॥७८॥
बळिराम आणि जगज्जीवन ॥ आम्ही समस्त थोर लहान ॥ आलों शिदोर्या विसरोन ॥ म्हणोनि अन्न मागतों ॥७९॥
हरि बहुत क्षुधाक्रांत ॥ कदंबातळीं वाट पहात ॥ हा साक्षात् वैकुंठनाथ ॥ माना वचनार्थ तयाचा ॥८०॥
ऐसें बोलतां गोवळी ॥ वसुधामर सर्व कोपले ॥ म्हणती येथेंही भ्रष्ट आले ॥ छळावया आम्हांतें ॥८१॥
एकाकडे एक पाहती ॥ नेत्रसंकेतें खुणाविती ॥ यांसी अन्न न द्यावें निश्चितीं ॥ प्राणांत जाहलिया ॥८२॥
यांसीं करिताम संभाषण ॥ आम्ही करितों सचैल स्नान ॥ आम्ही सोंवळे सुजाण ॥ यांचें अवलोकन न करावें ॥८३॥
भ्रष्टांमाजी श्रेष्ठ थोर ॥ तोचि हा नंदाचा किशोर ॥ कर्मरहित हीनाचार ॥ अन्न अणुमात्र देऊं नये ॥८४॥
अवघे नेत्र वटारिती ॥ सक्रोध गोपांतें विलोकिती ॥ अन्न न देऊं म्हणती ॥ अहंमतें भुलोनियां ॥८५॥
एक म्हणती झालें शूद्रदर्शन ॥ म्हणोनि करिती पुन्हां स्नान ॥ तें कृष्णभक्तीं देखोन ॥ अंतःकरणीं जाणवले ॥८६॥
नेत्रवक्त्रांचे विकार ॥ त्यांवरुनि समजे अंतर ॥ सुमनें देखतां आमोद सत्वर ॥ वृद्ध चतुर जाणती ॥८७॥
बोलावरुनि कळे चित्त ॥ आचरणावरुनि पूर्वार्जित ॥ क्रियेवरुनि वर्णाश्रम सत्य ॥ परीक्षक जाणती ॥८८॥
रहाणीवरुन कळे परमार्थ ॥ शब्दापशब्दी कळे पंडित ॥ प्रेमादरावरोनि भक्त ॥ परीक्षक जाणती ॥८९॥
दानावरुनि कळे उदार ॥ रणीं समजे प्रतापशूर ॥ लक्षणांवरुन नृपवर ॥ जाणती चतुर परीक्षक ॥९०॥
वास येतां कळे काष्ठ ॥ स्वरावरोनि समजे कंठ ॥ तैसें द्विजांचें अंतर स्पष्ट ॥ कृष्णदासां कळलें पैं ॥९१॥
निराशा देखोनि ते वेळे ॥ कृष्णउपासक परतले ॥ जैसे साधुसंत घरासी आले ॥ छळोनि दवडिले अभाग्यें ॥९२॥
नेणतां परिस गोफणिला ॥ सुधारस उकिरडां ओतिला ॥ सुरतरु तोडोनि घातला ॥ कूपकंटकवृक्षातें ॥९३॥
घरासी कामधेनु आली ॥ ते शुष्क काष्ठें वरी मारिली ॥ चिंतामणि फोडोनि केली ॥ पायरी जैसी अभाग्यें ॥९४॥
पायीं ताडिलें ज्योतिर्लिंग ॥ केला विष्णुपूजेचा भंग ॥ तैसे ते पामर अभाग्य ॥ विष्णुमहिमा नेणती ॥९५॥
असो गोपाळ सकळ परतले ॥ जगज्जीवनाजवळी आले ॥ सर्व वृत्तांत श्रुत केले ॥ हांसो आलें रमारंगा ॥९६॥
म्हणे माझी माया दुर्धर ॥ जाणतेचि मूढ केलें विप्र ॥ मागुती क्षीराब्धिविहार ॥ सखयांप्रती बोलतसे ॥९७॥
अविद्यावेष्टित ब्राह्मण ॥ नोळखतीच मज लागून ॥ तुम्ही विप्रस्त्रियांस जाऊन ॥ मागा अन्न ममाज्ञें ॥९८॥
ऐसा ऐकतांचि हरिवचनार्थ ॥ आणिका वाटे गोप धांवत ॥ जैसे कुमार्ग टाकोनि सद्भक्ता ॥ सुमार्गेंचि चालती ॥९९॥
विप्रा न कळतां गोवळे ॥ पाकशाळेजवळी आले ॥ तों तृणाचे कूड घातले ॥ माजी बैसल्या पतिव्रता ॥१००॥
पाकक्रिया सारोनि समस्त ॥ धूम्रही सकळ झाला शांत ॥ हृदयीं आठवला रमानाथ ॥ वृंदावनविहारी जो ॥१॥
सांडोनि सकळ कर्मजाळ ॥ संत स्वरुपीं होती निश्चळ ॥ तैशा यज्ञपत्न्या सकळ ॥ हृदयीं घननीळ चिंतिती ॥२॥
हरिकृपेचें अंजन ॥ नेत्रीं ज्यांच्या शोभायमान ॥ निढळीं सौभाग्य निजकल्याण ॥ कुंकुम सुरंग शोभतसे ॥३॥
श्रवणीं हरिगुणश्रवण ॥ मुक्तघोष झळकती भूषण ॥ वदनीं गाती हरिगुण ॥ कंठीं कृष्णवर्ण गळसरी ॥४॥
असो श्रवणीं वदनीं ध्यानीं ॥ सदा लेइला चक्रपाणी ॥ तों ते गोप कुडाआडोनी ॥ बोलतां श्रवणीं ऐकती ॥५॥
गोपांनीं करुनि नमस्कार ॥ म्हणती सत्या तो ऐका सादर ॥ जवळी आला यादवेंद्र ॥ वृंदावनी उभा असे ॥६॥
क्षुधाक्रांत जगन्मोहन ॥ मागावया पाठविलें अन्न ॥ आम्हां ब्राह्मणीं दडविलें छळून ॥ आलों म्हणोन तुम्हांपासीं ॥७॥
ऐकतां ऐसिया वचना ॥ सद्गदितं जाहल्या विप्रांगना ॥ म्हणती हरि त्रिभुवनभूषणा ॥ कृपा केली आम्हांवरी ॥८॥
एकीप्रति एक बोलती ॥ विप्र भुलले कीं अहंमती ॥ पूर्णब्रह्म वैकुंठपती ॥ त्यासी नेणती आश्चर्य हें ॥९॥
भुलले हे वसुंधरामर ॥ श्रीकृष्ण पूर्ण अवतार ॥ त्यासी अन्न न देती साचार ॥ मायेनें विप्र व्यापिले ॥११०॥
ज्याकारणें करिती यज्ञ ॥ ज्यालागीं करिती अनुष्ठान ॥ तो वृंदावनीं उभा नारायण ॥ त्यासी न भजोनि भूलले ॥११॥
अध्ययन पूजन तीर्थाटन ॥ व्रतें नेम तपाचरण ॥ करुनि पाविजे ज्याचे चरण ॥ तो नारायण नोळखती ॥१२॥
जो क्षीरसागरविहार ॥ जो वैकुंठपीठींचा सुकुमार ॥ जो आत्माराम निर्विकार ॥ तो हा श्रीधर अन्न मागे ॥१३॥
जो मृडानीपतीचें हृदयरत्न ॥ ज्यासी शरण येती विधि शचीरमण ॥ तो हा अघबककालियामर्दन ॥ स्वमुखें अन्न मागतसे ॥१४॥
जें कां चहूं वेदांचें सार ॥ जें षट्शास्त्रांचें जिव्हार ॥ ज्याचें पुराणीं वर्णिती अवतार ॥ तो श्रीकरधर अन्न मागे ॥१५॥
म्हणती आतां संसारा घालूं पाणी ॥ परी अन्न देऊं चक्रपाणी ॥ पूर्णब्रह्मानंद मोक्षदानी ॥ त्याचे चरण दृढ धरुं ॥१६॥
पूर्वीं प्रर्हादें पित्राज्ञा मोडून ॥ दृढ धरिले हरीचे चरण ॥ बळीनें शुक्राज्ञा मोडून ॥ केलें पूजन वामनाचें ॥१७॥
बिभीषण न मानूनि रावणा ॥ शरण रिघाला रघुवीर चरणा ॥ भरतें मातेची मोडोनि आज्ञा ॥ नंदिग्रामीं बैसला ॥१८॥
भक्तिकाजीं अवरोधिती पाही ॥ त्यांची आज्ञा मोडितां दोष नाहीं ॥ म्हणोनि उठिल्या लवलाही ॥ अन्न घेवोनि तेधवां ॥१९॥
षड्रस अन्नांचे भरोनि हारे ॥ यज्ञपत्न्या निघती त्वरें ॥ कूड मोडूनियां द्वारें ॥ ठायीं ठायीं पाडिलीं ॥१२०॥
एक पहावया वनमाळीं ॥ श्रवणद्वारें सत्वर चालली ॥ एक कीर्तनपंथें ते वेळीं ॥ निघती जाहली सत्वर ॥२१॥
एक स्मरणाचिये वाटे ॥ एक चरण सेवेचे नेटें ॥ एक अर्चनाचेनि घाटें ॥ निघाल्या जाहल्या सुंदरा ॥२२॥
एक वंदनाचेनि द्वारें ॥ एक दास्यपंथें जाती त्वरें ॥ एक सख्यत्वाचें एकसरें ॥ हरि पाहों चालिल्या ॥२३॥
एक करिती आत्मनिवेदन ॥ एक मननजळीं जाहल्या मीन ॥ एक निजध्यासीं निमग्न ॥ होवोनियां चालिल्या ॥२४॥
एक निजसाक्षात्कारें ॥ चालिल्या आत्मरुपीं मोहरें ॥ भक्तिअन्नाचे भरुनि हारे ॥ जाती त्वरें कृष्णभेटी ॥२५॥
जैशा समुद्रासी भेटाया ॥ भरुनि सरिता जाती लवलाह्यां ॥ कृपा सिंधु यदुवर्या ॥ पुण्यगंगा मिळों जाती ॥२६॥
पिताबंधुपतींची आज्ञा ॥ मोडूनि चालिल्या सकळललना ॥ आवडी लागलीसे नयनां ॥ कृष्णवदन पहावया ॥२७॥
श्रवण म्हणती करुं श्रवण ॥ रसना कीर्तनीं गेलीं रंगोन ॥ हरिपदपद्ममकरंदीं जाण ॥ नासिक वेधे सर्वदा ॥२८॥
पाणी अर्चनाची वाट पाहती ॥ चरण हरिपंथें शीघ्र जाती ॥ या प्रकारें सरळ युवती ॥ समीरगती चालिल्या ॥२९॥
ऐशा यज्ञपत्न्या गेल्या सकळी ॥ तों एक क्षणभरी मागें राहिली ॥ अन्न घेवोनि जों निघाली ॥ तों कर्म आड ठाकलें ॥१३०॥
तिचा पति अकस्मात ॥ पावला पाकशाळेआंत ॥ तयासी कळला वृत्तांत ॥ गेल्या समस्त कृष्णभेटी ॥३१॥
विप्र परम क्रोधायमान ॥ करी आपुले स्त्रियेसी ताडण ॥ परम भ्रष्ट गोवळा कृष्ण ॥ त्यासी कां अन्न देतां गे ॥३२॥
कोणे शास्त्रीं आहे लिहिलें ॥ कीं स्त्रियांहीं पूजावे गोवळे ॥ यज्ञब्राह्मण नाहीं पूजिले ॥ विटाळिलें अन्न कैसें ॥३३॥
वेद देव अग्नि ब्राह्मण ॥ तुझ्या बापें साक्ष करुन ॥ माझ्या हस्तीं तुजलागून ॥ दिधलें जाण शतमूखें ॥३४॥
माझी सांडूनियां भक्ती ॥ पूजों जासी गोवळ्याप्रती ॥ म्हणोनि स्त्रियेसी शीघ्रगती ॥ बांधिता जाहला ब्राह्मण ॥३५॥
मग ती बोले ते अवसरीं ॥ तूं या देहाचा पति कीं निर्धारीं ॥ तरी तो देह ठेवीं आपुलें घरीं ॥ जतन करुनि साक्षेपें ॥३६॥
समस्त गेल्या देखोन ॥ सद्गदित आंसुवें भरिले नयन ॥ अंतरीं रेखिलें कृष्णध्यान ॥ मुखीं स्मरण नामाचें ॥३७॥
गोविंदा गोपाळा माधवा ॥ वैकुंठविलासिया रमाधवा ॥ ऐसें बोलोनियां तेधवां ॥ प्राण सोडिला सतीनें ॥३८॥
सकळ विप्रां जाहलें श्रुत ॥ कीं स्त्रिया गेल्या समस्त ॥ धांवले पाकशाळेआंत ॥ जपानुष्ठान टाकोनि ॥३९॥
एक बोले क्रोधेंकरुनी ॥ स्त्रिया आलिया परतोनी ॥ शिक्षा करुं तेचि क्षणीं ॥ ऐसें दुसरेनी न करिती त्या ॥१४०॥
एक म्हणती रहावें कासयास ॥ जाऊनि आतां घेऊं संन्यास ॥ एक म्हणती आम्ही वृद्ध बहुवस ॥ म्हणोनि गेल्या टाकोनि ॥४१॥
ज्यानें स्त्री बांधिली खांबाशीं ॥ तो हर्षें सांगे समस्तासी ॥ म्यां बांधिलें आपुले दारेसी ॥ अवरोधोनि ठेविली ॥४२॥
तिजजवळी आला परतोन ॥ सोडोनि करी समाधान ॥ तुज मी अलंकार घडीन ॥ उघडीं नयन एकदां ॥४३॥
तों ते न बोले कांहीं वचन ॥ श्वासोछ्वास पाहे ब्राह्मण ॥ तों गेला निघोनि तिचा प्राण ॥ शोक दारुण ब्राह्मण करी ॥४४॥
सकळ म्हणती कासया रडसी ॥ प्रेत तरी डोळाम पाहसी ॥ आम्ही स्त्रिया अर्पिल्या गोवळ्यासी ॥ कदा न येती माघार्या ॥४५॥
हरिलागीं जिणें प्राण सोडिला ॥ लिंगदेह तिचा निघोनि गेला ॥ वृंदावनीं भोंवों लागला हरीपाशीं ॥४६॥
जे अंतकाळीं मति निश्चितीं ॥ तैशीच होय पुढें गती ॥ सतीची हरीरुप जाहली मती ॥ रमापति जाणे सर्व ॥४७॥
कृपाळु तो जगज्जीवन ॥ तेथेंचि केला तिचा देह निर्माण ॥ षड्रस अन्न निर्मून ॥ पात्र भरुनि दीधलें ॥४८॥
तिचा हेत राहिला होता ॥ कीं अन्न द्यावें कृष्णनाथा ॥ सर्वांपुढें तेच तत्त्वतां ॥ हरीजवळी उभी ठाके ॥४९॥
सकळ सत्या बोलती ते वेळीं ॥ आम्हांपुढें कैसी हेचि आली ॥ हे भ्रतारें होती राखिली ॥ अवरोधोनि साक्षेपें ॥१५०॥
सकळ सत्यांनीं ते वेळे ॥ देखिलें परब्रह्म सांवळें ॥ जें निर्विकार आकारलें ॥ भक्तजन तारावया ॥५१॥
समीप देखोनि यादवराया ॥ अन्नपात्रें उतरोनियां ॥ दृढ लागल्या हरीच्या पायां ॥ विसरोनियां देहभावा ॥५२॥
मनीं सकळ भाविती ॥ डोळा देखिला यादवपती ॥ जन्मसार्थक जाहलें म्हणती ॥ आनंद चित्तीं न समाये ॥५३॥
हरिचरणपंकजकेसरीं ॥ द्विजपत्न्या जाहल्या भ्रमरी ॥ कीं वदोनारायण निर्धारीं ॥ वेदश्रुतीं वेष्टिला ॥५४॥
मग उठोनियां विप्रललना ॥ अन्नें अर्पिती राजीवनयना ॥ तृप्त जाहला यादवराणा ॥ रामगोपाळांसहित पैं ॥५५॥
यज्ञनारायण जाहला तृप्त ॥ मखाचें फळ त्यांस जाहलें प्राप्त ॥ संतोषिनि कमलाकांत ॥ काय बोले तेधवां ॥५६॥
तयांसी म्हणे वैकुंठपती ॥ माझ्या पदाप्रति याल अंतीं ॥ पतींस तुमच्या जन्मपंक्ती ॥ पुढें आहेत असंख्य ॥५७॥
जा आतां आश्रमाप्रती ॥ वाट पाहात असती पती ॥ यज्ञ पावों द्या समाप्ती ॥ कांहीं खंती करुं नका ॥५८॥
नग पाहतां जैसें सुवर्ण ॥ तैसा त्रिजगद्रूप मी नारायण ॥ मद्रूप चराचर पाहून ॥ तुम्ही व्हा लीन मजमाजी ॥५९॥
माझे ठायीं ठेवूनि चित्त ॥ प्रपंचकार्य करा समस्त ॥ जैसा कृपण जनीं वर्तन ॥ ठेवणां चित्त ठेवूनि ॥१६०॥
चित्त ठेवोनि तान्हयापासीं ॥ माता जाय स्वकार्यासी ॥ तैसें मज धरुनि मानसीं ॥ प्रपंचासी चालवा ॥६१॥
आत्मरुपीं विश्व पहावें ॥ सत्कर्मीं अंतर पडों न द्यावें ॥ वेदाज्ञेनें वर्तावें ॥ अहंकृति टाकोनियां ॥६२॥
घागरीं आणि रांजणीं ॥ बिंबला एक वासरमणी ॥ तैसें पुरुष आणि कामिनी ॥ मी चक्रपाणी व्यापलों ॥६३॥
ऐसें बोलतां यदुपति ॥ सकळ झाल्या सद्गद चित्तीं ॥ विमलांबुधारा नेत्रीं स्त्रवती ॥ काय बोलती तेधवां ॥६४॥
आतां पति घेती प्राण ॥ आम्हीं न सोडूं तुमचे चरण ॥ कृपासागर तूं जगन्मोहन ॥ हरि दारुण पति हे ॥६५॥
संसारदुःखरुप सकळी ॥ खदिरांगाराची शेज रचिली ॥ यावरी सुखनिद्रा वनमाळी ॥ कैसी लागेल सांग पां ॥६६॥
संसारविषवल्लीचें वन ॥ कीं वृश्चिकांनीं भरलें सदन ॥ काळसर्पें पसरिलें वदन ॥ उडी कोणा घालवे ॥६७॥
आम्हीं सकळांची आज्ञा मोडून ॥ दृढ धरिले तुझे चरण ॥ तूं माघारें देसी लोटून ॥ हिरोनि मन आमुचें ॥६८॥
सोडितांचि तुझे चरण ॥ तात्काळ जाईल आमुचा प्राण ॥ पति आमुचे परम दारुण ॥ सदना जाऊं न देती ॥६९॥
आपुल्या हातें जगजेठी ॥ कृतांत भगिनीर्हदीं लोटीं ॥ संसारतापें जाहलों कष्टी ॥ करीं गोष्टी येवढी तूं ॥१७०॥
हांसोनि बोले वैकुंठराणा ॥ नवल पहा जावोनि सदना ॥ पति वंदितील तुमच्या चरणां ॥ तुमच्या गुणा वानिती ॥७१॥
तुम्ही शरण आलिया माझ्या पदा ॥ ते तुमच्या करितील आपदा ॥ मग उणें येईल माझिया ब्रीदा ॥ पहा एकदाम जावोनि ॥७२॥
हरिवचनीं विश्वास ठेवूनी ॥ परतल्या सकळ द्विजकामिनी ॥ हरीस प्रदक्षिणा करुनी ॥ पुढती चरणीं लागती ॥७३॥
जिणें कृष्णालागीं त्यजिला प्राण ॥ ती हरिरुपीं गेली मिळोन ॥ जैसें सागरीं ऐक्य जाहलें लवण ॥ नाहीं परतोन आलें तें ॥७४॥
गोविंदाची लीला गात ॥ द्विजपत्न्या परतल्या समस्त ॥ ब्रह्मानंदें त्या डुल्लत ॥ दृश्य पदार्थ दिसेना ॥७५॥
हरिनामाचा ऐकूनि गजर ॥ अनुतापले सकळ विप्र ॥ म्हणती कृष्ण पूर्णावतार ॥ वेदश्रुती बोलती ॥७६॥
मूढ आम्ही दुरभिमानी ॥ नेणों अवतरला कैवल्यदानी ॥ नुपजे अनुताप कदा मनीं ॥ गेलों भुलोनि मायेनें ॥७७॥
स्त्रियांनीं घेतलें कृष्णदर्शन ॥ व्यर्थ काय आम्ही पढोन ॥ षड्वैरी नागवलों पूर्ण ॥ जगज्जीवन नोळखों ॥७८॥
लोकां सांगों करा भजन ॥ आम्हीं मंद भाग्य भजनहीन ॥ पूर्णब्रह्मानंद श्रीकृष्ण ॥ त्या न भजोनि नाडलों ॥७९॥
स्त्रियांसी म्हणती धन्य तुमचें जिणें ॥ तुम्हांवरी कृपा केली नारायणें ॥ व्यर्थ काय करुनि शास्त्र भाषणें ॥ अभिमानें पूर्ण नागवलों ॥१८०॥
भाविकालागी भगवंत ॥ दर्शन देतो हें यथार्थ ॥ अभाविका न दिसे सत्य ॥ कोटि वर्षें शोधितां ॥८१॥
गर्व देखोनि आमुचा ॥ दुरावला सोइरा निजाचा ॥ पाठिराखा अंतकाळींचा ॥ जो दीनांचा सहाकारी ॥८२॥
द्रव्यमदें जे सदा मत्त ॥ त्यांसी नाटोपे भगवंत ॥ विद्यामदें मुसमुशीत ॥ रमानाथ त्यांस कैंचा ॥८३॥
एका भावार्थावांचूनी ॥ वश नव्हें शारंगपाणी ॥ भोगींद्र महिमा जाणोनि ॥ शय्या जाहला हरीचा ॥८४॥
श्रीकृष्ण परब्रह्म सांवळें ॥ त्यासी स्वमुखें आम्हीं निंदिलें ॥ निर्मळा मळ लाविले ॥ निर्गुणा ठेविले गुणदोष ॥८५॥
कृपा न करितां श्रीरंग ॥ व्यर्थ काय कोरडा याग ॥ वश न होतां भक्तभवभंग ॥ भवशोक न तुटेचि ॥८६॥
जाहले सद्गदित ब्राह्मण ॥ नयनी वाहे अश्रुजीवन ॥ म्हणती कैसें कर्म गहन ॥ जवळी असोनि हरि नेणों ॥८७॥
एक म्हणती उठाउठीं ॥ चला घेऊं हरीची भेटी ॥ घालूं हरीचरणीं दृढ मिठी ॥ प्रेम पोटीं न समाये ॥८८॥
तों कंसाचे दूत हिंडतीं ॥ वनीं उपवनीं झाडा घेती ॥ गो विप्र शोधूनी मारिती ॥ एक हा सांगती समाचार ॥८९॥
भय वाटे परम मना ॥ यालागीं वना न जाती कृष्णदर्शना ॥ एक म्हणती आम्ही नारायणा ॥ तुझ्या चरणा अंतरलों ॥१९०॥
एक उठोनि उभे ठाकती ॥ म्हणती चला पाहो श्रीपती ॥ एक म्हणती दैत्य हिंडती ॥ वाटे चित्तीं भय फार ॥९१॥
आडवे आलें मायाजाळ ॥ दूरी अंतरला घननीळ ॥ एक म्हणती धन्य वेल्हाळ ॥ जिणें हरिलागीं प्राण दिधला ॥९२॥
धन्य धन्य तेचि सती ॥ चुकविली जिनें पुनरावृत्ती ॥ देह ठेवोनि श्रीपती ॥ पाहावया धांविन्नली ॥९३॥
धन्य धन्य तेचि नारी ॥ प्राण देवोनि घेता पूतनारी ॥ मायानदीचे पैलतीरीं ॥ तेचि निर्धारीं पावली ॥९४॥
नाहीं केलें तिनें अनुष्ठान ॥ नाहीं केलें पुरश्चरण ॥ नाहीं आचरली तप दारुण ॥ कैसी नारायणा पावली ॥९५॥
नाहीं तरी आम्ही पढलों व्यर्थ ॥ स्वमुखें निंदिला वैकुंठनाथ ॥ वेडे जाहलों जाणत जाणत ॥ श्रीअच्युत नेणोनि ॥९६॥
हरिविजय ग्रंथ थोर ॥ हाचि केवळ क्षीरसागर ॥ आत्माराम यादवेंद्र ॥ शेषशायी पहुडला ॥९७॥
तीं क्षीरसागरींचीं चौदा रत्नें ॥ भक्ताची दिधलीं नारायणें ॥ येथें दृष्टांत साहित्य भाषणें ॥ दिव्य रत्नें झळकती ॥९८॥
तेथें राज्य करी उपमन्य ॥ येथींचे नृपवर भाविक धन्य ॥ ते श्रीहरीसी परममान्य ॥ सात्विक प्रेमळ भक्त जे ॥९९॥
ब्रह्मानंदा यदुवीरा ॥ त्रिभुवनवंद्या ज्ञानसमुद्रा ॥ अक्षय अभंगा श्रीधरा ॥ भक्तोद्धारा सर्वेशा ॥२००॥
इति श्रीहरिविजय ग्रंथ ॥ संमत हरिवंशभागवत ॥ परिसोत सद्भक्त पंडित ॥ षोडशाध्याय गोड हा ॥२०१॥
श्रीकृष्णार्पणमस्तु॥अध्याय॥१६॥ओंव्या २०१॥
N/A
References : N/A
Last Updated : January 21, 2008
TOP