जयजय श्रीबलभीमा , मारुति अंजनिच्या नंदना हो ।
राक्षसकुळ हानना, अनाथनाथा करुणाघना हो ॥धृ०॥
सीता विरहें दुःखित, सीता सीता आक्रंदत हो ।
पंपातीर्थ तटाकिं, रघुविर पाहिला अवचित हो ।
तो प्रभु सद्गुरु केला, भावें होऊनि शरणांगत हो ।
निश्चय पण आदरिला, सीता शुद्धीचा संकेत हो ।
दक्षिणपंथें उडाला, टाकुनि मागें प्रभंजना हो ॥जय० ॥१॥
शोध सितेचा केला, क्रोधें जाळुनि लंकापुर हो ।
रामेश्वर लिंगापुढें, जाणों लाविला कापूर हो ।
राक्षस वधितां वहाती, तद्रक्ताचे तुंबळ पुर हो ।
नादें अंबर गर्जे, बहु भय वाटे दिग्गज मना हो ॥जय० ॥२॥
क्षणमात्रें शतकोटी, पर्वत उपडी बाहूबळें हो ।
फाटे धरणी तटाटे, हालवी ब्रह्मांड लांगुलें हो ।
राक्षस म्हणती भक्षक शिक्षक झाली गोलांगुलें हो ।
आत्मा कुलक्षय पाहुनि, रावण मोडित शत अंगुलें हो ।
प्राणमित्र म्हणे टाकुनि, अहिमहि गेले यमसदना हो ॥जय ३॥
पडतां रणिं लक्षूमण, वेगें द्रोणागिरी आणिला हो ।
चार वेळ रात्रींतून, गेला आला गेला अला हो ।
सीता हरतां मरतां, भरतां सरतां जय पावला हो ।
राम सिता सौमित्रा मारुति सप्राण भावला हो ।
भवबाधेची तोडी, विष्णूदासाची कल्पना हो ॥जय० ४॥