श्रीमन्महागणाधिपतये नमः॥इत्यादि नमनं ॥
पद-
दीनदयाळा पूर्ण कृपाळा कृष्णा लवकर येईं रे ॥
पतितपावन ब्रीद साच हें करुनी दर्शन देई रे ॥दीन० ॥ध्रु०॥
अनाथ दुर्बल पतित तयांसी तूंची मायबापरे ॥
करुणाभरित अंतर तूझें वारिसि सर्वहि तापरे ॥दीन० ॥१॥
निजदासावर सदैव तूझी पूर्ण कृपेची छायारे ॥
अंतर्बाह्य रक्षुन अवघी करिसी दूर मायारे ॥दीन० ॥२॥
लोळे चरणीं शरणागत हा भावें कृष्णदास रे ॥
हीन दीन मी म्हणुनी सखया न करीं माझा त्रासरे ॥दीन० ॥३॥
भजन -
देवकिनंदन गिरिधरलाल ॥ करुणासागर दीनदयाळ ॥
अभंग-
जाणे भक्तीचा जिव्हाळा ॥ तोचि दैवाचा पूतळा ॥१॥
आणिक नये माझ्या मना ॥ हो कां पंडित शहाणा ॥२॥
नामीं रुपीं जडलें चित्ता ॥ दास त्याचा मी अंकित ॥३॥
भक्ति जाणे नवविध ॥ तुका म्हणे तोचि सिद्ध ॥४॥
पुंडलीक० ॥पार्वती० ॥सीताकांत० ॥
आदौ प्रथमारंभी सत्पुरुषाची वाणी, सकल जगताचे कल्याणार्थ तुकोबा महाराज साधकांप्रत हितोपदेश करितात. बाप हो, या भवसागरापासून तरुन जावें अशी इच्छा असेल तर पूर्णब्रह्म सच्चिदानंद गोपालकृष्ण याची भक्ति करावी. ज्या पुरुषानें भक्तीचा जिव्हाळा जाणला तो या त्रैलोक्याचे ठायीं धन्य होय. भक्तीचा जिव्हाळा म्हणजे भगवंतीं अत्यंत प्रेमा, चरणारविंदीं दृढतर लक्ष, कूपांत पाण्याचा जिव्हाळा असेल तरच तो कूप उत्तम. नाहीं तर व्यर्थ होय. कोणी गृहस्थानें मार्गावर दहा हजार रुपये खर्च करुन विहीर बांधली; पण त्यांत पाण्याचा जिव्हाळा लेशही न लागल्यामुळें पैसा आणि श्रम वायां गेले. विहीर मोठी असून व्यर्थ झाली. त्या प्रकारें भक्ति जिव्हाळ्यावांचून व्यर्थ, जिव्हाळ्याची भक्ति जाणेल तो दैवाचा पुतळा धन्य होय, यास दुसरा दृष्टांत--जसा कांहीं मायेचा ममतेचा जिव्हाळा.
अभंग-
शिक्षा करी माय बाळा ॥
परी अंतरीं कळवळा ॥१॥
कोणी गृहस्थ आपल्या गृहापुढें दगडाची पोंवळी रचीत होता. वैशाखाचा महिना, दिवसा दोनप्रहरीं उन्हाचा भर झाला असतां त्याच्या मातोश्रीनें त्याचे श्रम पाहून तिचें मन कळवळलें, आणि ती त्या पुत्रास म्हणूं लागली कीं, ऊन फार झालें, आतां काम राहूं दे. लौकर घरांत ये. असें पांचचार वेळ सांगितलें तरी तो ऐकेना; तेव्हां तिनें त्याचें लहान मूल दोनतीन वर्षांचें होतें, तें बाहेर उन्हांत नेऊन त्याच्या समीप ठेविलें. तें उन्हानें कासावीस झालें, तें पाहून तो गृहस्थ मातोश्रीला रागें भरला आणि मुलाचे कळवळ्यास्तव म्हणतो कीं, हें मूल उन्हांत तळमळतें यास लौकर घरांत घेऊन जा. मातोश्री म्हणते, तूं ममतेच्या जिव्हाळ्यास्तव आपले मुलाची कींव करुन बोलतोस तशीच मींही मायेच्या जिव्हाळ्यानें तूं माझें मूल म्हणून दोन घटिका हांका मारीत आहें. तात्पर्य, मायेचा जिव्हाळा तसाच भक्तीचा जिव्हाळा, गुजराचे घरचें मनुष्य नष्ट झालें असतां रडण्याकरितां मोलकरी करितात. त्या मोलकर्यांचे मनांत मायेचा लेशही नसतो. मायेचा जिव्हाळा निराळाच आहे. यदर्थीं गोष्ट---कोणी गृहस्थ स्त्रीचे बुद्धीनें वर्तणारा होता, त्याची माता घरांत होती. ती सुनेस नीतीविषयीं बोलत असे. त्याजवरुन त्या दुष्टेनें वृद्धेस मारण्याविषयीं भर्त्यास सांगितल्यावरुन त्या मूर्खानें मातेस जिवें मारुन व तिचे तुकडे तुकडे करुन ते मोटेंत बांधिले. ती मोट गांवाबाहेर टाकण्यास नेत असतां कोतवालानें त्यास पकडून कोणास मारिलेंस तें सांग, असें विचारतां तो पापात्मा कबूल होईना तेव्हां त्यास झाडाशीं बांधून फोकांचा मार चालविला. त्यासमयीं त्याचे मातेस पुत्राचे ममतेस्तव कळवळा येऊन तिचे मांसाची मोट बांधिली होती, ती गडबडां लोळत येऊन शिपायाचे पायांवर लोळण घालती झाली. तो चमत्कार पाहून मोठें आश्चर्य करीत होत्साते ते त्या कृतघ्नास म्हणतात हे मूर्खा, तुला जिंवत सोडितों, पण खरा मजकूर सांग. तेव्हां तो म्हणतो कीं, ही माझी माता आहे. स्त्रीचे वचनावरुन मी इजला मारिलें. असें ऐकून अवघ्यांचे नेत्रीं अश्रु येऊन म्हणतात कीं, चांडाळा; काय सांगावें, तुझे मातेची ममता तुजवर किती सांगावी. ती मृत झाली तथापि तिचा अस्थींसह मांसाचा गोळा मायेच्या जिव्हाळ्यास्तव तुला ताडण न करावें म्हणून आमचे पायां पडत आहे. अशा माउलीचा तूं प्राण घेतलास असा तूं चांडाळाहून चांडाळ आहेस. असो; तात्पर्य सांगण्याचें कारण, याप्रकारें मायेचा जिव्हाळा तसाच भक्तीचा जिव्हाळा ज्याचे ठायीं तो धन्य होय. म्हणून तुकोबा म्हणतात ’जाणे भक्तीचा जिव्हाळा.’ भक्तीचे जिव्हाळ्यावांचून भगवत्प्राप्ति नाहीं. याविषयीं पंत म्हणतात.
आर्या-
भक्तिविना वश नोहे वीण्यानें वा मृदंगनादानें ॥
कन्यादानफलातें कैसा पावे मृदंगना-दानें ॥
अर्थ-
मृत्तिकेची अंगना करुन तिचें दान केलें असतां कन्यादानाचें फळ कसें प्राप्त होईल ? ’अपितुन’ होणार नाहीं. तद्वत भक्तीवांचून भगवान् वीणावादनानें किंव मृदंगाचे नादानें वश होत नाहीं. एकेका योगानें एकेक वश होतें.
श्लोक-
भावेन देवं कलया नरेंद्रं धनेन कांतां कपटेन शत्रुं ॥
सत्येन मित्रं कृपया च पुत्रं ज्ञानेन मोक्षं वशमानयंति ॥४॥
अर्थ-
भक्तिभावें करुन देव वश होतो. कौशल्यानें राजा, धनेंकरुन कांता, कपटानें शत्रु, सत्यपणानें मित्र, कृपेनें पुत्र, ज्ञानानें मोक्ष, या प्रकारें करुन एकेकानें एकेक वश होतें. भक्तीवांचून दुसरे साधन, विद्या, गुण इत्यादि यांचे योगानें भगवान संतुष्ट होत नाहीं. या अर्थी
श्लोक-
’व्याधस्याचरणं ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्त्य का,
का जातिर्विदुरस्य यादवपतेरुग्रस्य किं पौरुषं ॥
कुब्जायाः कमनीयरुपमधिकं किं तत्सुदाम्नो धनं,
भक्त्या तुष्यति केवलं नतु गुणैर्भक्तिप्रियः श्रीपतिः ॥४॥
अर्थ-
आचरणें करुन भगवान् संतुष्ट होतील म्हणावें तर व्याधाचें आचरण कोणतें चांगलें होतें ? तो व्याध वयस्कर असल्यानें वश झाले असतील म्हणावें तर ’ध्रुवस्य च वयो’ ध्रुव तर पांच वर्षांच्या वयाचें मूल होतें. तो राजपुत्र विद्वान् असेल, त्याचे विद्येनें वश झाले म्हणावें तर ’विद्या गजेंद्रस्य का’ गजेंद्र केवळ पशु त्यास विद्या कशाची, त्याची ज्ञाति उत्तम असल्यानें वश झाले म्हणावें तर ’का जातिर्विदुरस्य ’ तो तर दासीपुत्र होता. पराक्रमानें त्यास वश झाले म्हणूं तर, ’यादवपतेरुग्रस्य किं पौरुषं’ यादवांचा जो पति उग्रसेन त्याचा पराक्रम लेशही नाहीं. तो रुपवान् असल्यानें वश झाले असतील म्हणावें तर ’कुब्जायाः कमनीयरुपमधिकं’ कुब्जा आठ ठिकाणीं वांकडी होती तिचे जवळ धन असल्यामुळें वश झाले म्हणावें तर ’किं तत्सुदाम्नो धनं’ सुदामा तर अत्यंत अकिंचन होता. तस्मात् ’नतु गुणैः’ गुणेंकरुन परमात्मा संतुष्ट होत नाहीं. ’भक्तिप्रियः श्रीपतिः’ भक्ति आहे प्रिय ज्यास असा जो श्रीपति तो ’भक्त्या तुष्यति’ केवळ भक्तीकरुनच संतुष्ट होतो. यास्तव तुकोबा म्हणतात कीं, ’जाणे भक्तीचा जिव्हाळा ॥तो०’॥ भगवद्गीतेंत श्रीकृष्ण अर्जुनाप्रत सांगतात.
श्लोक-
पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति ॥
तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः ॥५॥
अर्थ-
जो मला भक्तीनें पत्र तसेंच पुष्प किंवा फळ, त्याप्रमाणेंच उदक अर्पण करितो तें मी भक्षून संतुष्ट होतों. द्रौपदीचें भाजीचें पान, गजेंद्राचें पुष्प, शबरीचें फळ, बलीचें दानोदक, भक्तीनें अर्पण केलेले चार पदार्थ चौघांचे अत्यंत अल्पही जरी होते, तथापि ते ग्रहण करुन मी संतुष्ट झालों. मला कोणी अभक्तीनें उत्तम पदार्थ विपुल दिले तथापि त्यांपासून संतोष होत नाहीं. या प्रकारें प्रभूचें वाक्य. यास प्रमाण ज्या काळीं भगवान्, पांडवांकडून कौरवांकडे शिष्टाईस गेले, त्यासमयीं राजा दुर्योधन प्रभूस भोजनास राहवीत होता. तेव्हां त्याचा तिरस्कार करुन तिकडे न जातां प्रभु उद्धवास म्हणूं लागले; ॥
पद-
चलो बिदुर घर जाय्ये ॥ उधोजी चलो बिदुर घर० ॥ध्रु०॥
दुर्योधनका मेवा त्यागो ॥ बिदुरकी कनिया पाय्ये ॥उधो०॥१॥
शबरिके बोर सुदामजिके चुरवे ॥ रुचि रुचि भोग लगाय्ये ॥उधो०॥२॥
काजति हारो दधिमाखन सब ॥ तुम गरीब समुझाय्ये ॥उधो०॥३॥
या प्रकारें उद्धवाप्रत बोलून त्यास समागमें घेऊन विदुराचे घरीं आले. विदुर बाहेर गेले होते. विदुरांची स्त्री घरीं होती. ती नग्न नाहात असतां भगवान् दारीं आले असें ऐकल्याबरोबर भक्तिप्रेमानें सद्गद होऊन देहभान विसरली आणि तशीच नग्न सामोरी येऊन तिनें भगवंतास उत्तमासनीं नेऊन बसविलें, आणि प्रभु क्षुधित आहेत असें जाणून घरांतून पिकलेले केळ्यांचा घड घेऊन आली. आणि सन्मुख बसून सप्रेमयुक्त गोष्टी करीत असतां एकेक केळें सोलून भगवंताचे हातीं साली देऊन गड्डा आपले मुखांत टाकिती झाली. देव तिच्या भक्तीस भुलून वेडा होत्साता मोठया प्रीतीनें सालि चघळीत आहे, तों इतक्यांत शिलोंछवृत्ति करुन विदुर तेथें प्राप्त झाले, त्यांनीं केळ्यांचें तें विपरीत कर्म पाहून स्त्रीस हांक मारिली. तेव्हां ती सावध होऊन सलज्ज होत्साती घरांत गेली आणि वस्त्र परिधान करुन पुनः बाहेर येऊन, राहिलेलीं केळीं सोलून देवाचे हातीं गड्डे देती झाली. तेव्हां भगवान् म्हणतात. प्रेमभावानें ज्या साली दिल्या त्यांची गोडी या गड्डयांस नाहीं. विदुर म्हणतात तूं जगाचा बाप, तुजपुढें नग्न बसल्याचें मनांत कांहीं नाहीं. पण आपण गड्डा खाऊन देवा तुजला साली देत होती हें आश्चर्य वाटलें. भगवान् म्हणतात, प्रेमभक्तीनें मला कोंडा दिला तरी साखरेपेक्षां गोड आहे. असो. उपरांत विदुरानें धान्यकण वेंचून आणिले होते, त्यांची पेज करुन त्यांत पंचमहायज्ञ करुन उद्धवास आणि देवास ती पेज व कण्या वाढिल्या त्या मोठया आवडीनें मिटक्या देत प्रभूंनीं सेवन केल्या. दुर्योधनाचीं पक्वान्नें गोड वाटलीं नाहींत. तात्पर्य; प्रभूला भक्तियुक्त पत्र; पुष्प अर्पण केलें तथापि परमात्मा संतुष्ट होतात. मिराबाई म्हणते
पद-
भक्तीं आकळिला ॥ कृपाघन भक्तीं आकळिला ॥ध्रु०॥
पार्थरथीं सारथ्य करी जो ॥ निज पद दे बळिला ॥
कृपाघन भक्तीं आकळिला ॥१॥
प्रल्हादास्तव प्रगटुन स्तंभीं ॥ दानव निर्दळिला ॥कृ०॥२॥
गोंवळ संकट जाणुनि स्वमुखें ॥ दावाग्नी गिळिला ॥कृ०॥३॥
रुक्मिणीनें एका तुळसिदळानें ॥ गिरिधर प्रभु तुळिला ॥कृ०॥४॥
या प्रकारें भक्तांनीं भक्तिपाशेंकरुन भगवंतास बद्ध केलें. यास्तव तुकोबा म्हणतात ’जाणे भक्तीचा जिव्हाळा’ शुद्ध सात्विक भक्ति नऊ प्रकारची आहे.
श्लोक-
श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवन्म अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनं ॥६॥
आतां एकेक भक्ति एकेकानें अनन्यतेनें केली याविषयीं.
श्लोक-
श्रीकृष्णश्रवणे परीक्षितिरभूद्वैयासकिः कीर्तने प्रल्हादः
स्मरणे तदंघ्रिभजने लक्ष्मीः पृथुः पूजने ॥
अक्रूरस्त्वभिवंदने कपिपतिर्दास्ये च सख्येऽर्जुनो
देवस्यात्मनिवेदने बलिरभूत्सर्वस्वसंपूजने ॥७॥
अर्थ-
परीक्षिति राजानें श्रवणभक्ति केली. अर्जुनाचा नातू परिक्षिति राजा, ज्यानें युधिष्ठिराप्रमाणेंच कलियुग असतांही कलीस बंधन करुन धर्मन्यायानें राज्य केलें. एके समयीं तो मृगयेस वनांत गेला असताम एक ऋषि ध्यानस्थ बसला होता, त्याचे कंठीं परीक्षितानें मृतसर्प घातला. तें त्याच पुत्रास कळल्यावरुन त्यानें शाप दिला कीं, ज्यानें माझ्या बापाच्या गळ्यांत सर्प घातला असेल त्यास सर्पदंश होऊन तो सातवे दिवशीं मृत्यु पावेल. याप्रकारें शापवचन परीक्षितीस कळल्यावरुन अत्यंत भयभीत होत्साता देहाचें सार्थक व्हावें म्हणून शुकयोगींद्रास शरण गेला. तेव्हां त्याचे मस्तकीं कृपाहस्त ठेवून शुक म्हणतात-
श्लोक-
मृत्योर्बिभेषि किं राजन् मृत्युर्भीतं न मुंचति ॥
तस्मात्सर्वप्रयत्नेन कुरु यत्नमजन्मनि ॥८॥
अर्थ-
हे राजा, मृत्यूस कशास्तव भितोस ? मृत्यूची भीति धरिल्यानें तो दूर होणें नाहीं.
श्लोक-
अद्य वाब्दशतांते वा मृत्युर्वै प्राणिनां ध्रुवः ॥९॥
अर्थ-
आज किंवा वर्षशतांतीं तरी निश्चयेंकरुन जन्मास आलेल्या प्राण्यास मृत्यु आहेच. यास्तव सर्व प्रयत्नेंकरुन पुढें जन्मच होणार नाहीं असा उपाय कर. याप्रंआनें त्याचे भीतीस दूर करुन एका लोहस्तंभावर निर्भय मंदिर करुन तेथें श्रीशुकांनीं राजास श्रीमद्भागवत सांगितलें. तें श्रवण करुन राजा परीक्षिती सायुज्यपद पावला. या प्रकारें श्रवणभक्ति परीक्षितीनें केली. तशीच शुकानें कीर्तनभक्ति केली; स्मरणभक्ति प्रर्हादानें केली. प्रर्हादाला मारण्याकरितां हिरण्यकशिपूनें अनेक उपाय केले. तितकेही व्यर्थ झाले. पंत म्हणतात,
आर्या-
न मरे यास्तव नेला पर्वत-शिखारासि लोटिला खोलीं ॥
परि तो निर्भय चित्तीं वाहे नारायणासि लाखोली ॥१०॥
अभंग-
अग्निकुंडामाजीं घातला प्रर्हाद ॥
परी तो गोविंद विसरेना ॥१॥
अग्निरुप माझा सखा नारायण ॥
प्रर्हाद गर्जुन मारी हांका ॥२॥
तुका म्हणे अग्नि झालासे शीतळ ॥
प्रतापें सबळ नामाचीया ॥३॥
याप्रकारें नामस्मरणभक्तीच्या योगानें प्रर्हाद तरला. पादसंवाहन भक्ति लक्ष्मीनें केली. पूजनभक्तीनें पृथुराज तरला. वंदनभक्तीनें अक्रूर तरला. हनुमंतानें दास्यभक्ति केली. अर्जुनानें सख्यभक्ति केली. आणि आत्मनिवेदनभक्तीनें सर्वस्व अर्पून बलिराजा तरला. या प्रकारें नवविध भक्तीनें एकेक तरला.
अभंग-
भक्ति जाणे नवविध ॥ तुका ह्मणे तोची सिद्ध ॥
यासाठीं तुकोबानें प्रथम पद घातलें.
अभंग-
जाणे भक्तीचा जिव्हाळा ॥ तोची दैवाचा पुतळा ॥
भक्तीवांचून जो पुरुष तो माझ्या मनास येत नाहीं.
अभंग-
आणिक नये माझ्या मना ॥ हो कां पंडित शाहाणा ॥१॥
चोदा विद्या चौसष्ट कळा जाणता शाहाणा जरी पुरुष असेल तरी तो माझे मनास येत नाहीं. ज्ञानेश्वा म्हणतात.
ओंवी-
अगा वेदविद् जरी झाला ॥ तरी मातें नेणतां वायां गेला ॥
कणु सांडोनी उपणिला ॥ कोंडा जैसा ॥२१॥
भगवान् म्हणतात अर्जुना, धान्यकण सांडून कोंडाच उपणणारा जो पुरुष असेल त्याचे श्रम व्यर्थ तसा मातें न जाणतां वेदाचा अर्थ जाणणार पुरुषही वायां गेला असें जाणावें.
श्लोक-
समोऽहं सर्व भूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः ॥
ये भजंति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहं ॥१३॥
अर्थ-
मी सर्व भूतीं समान आहें माझा कोणी द्वेषी नाहीं आणि प्रियही नाहीं, तथापि जे प्रेमभक्तीनें मजला भजतात ते माझे ठायीं राहतात, आणि मीं त्यांचे ठायीं राहतों. हा माझ्या भक्तीचाच महिमा होय. पंत म्हणतात,
आर्या- मी भक्तांचे हृदयीं माझे हृदयीं सदैव भक्त वसे ॥
भक्ति-रहित जन केवळ मातें सप्राण भासती शवसे ॥१४॥
अर्थ-
मीं भक्तांच्या हृदयांत राहतों आणि माझे हृदयांत भक्त राहतात. भक्तीवांचून इतर पुरुष सप्राण होत्साते मला शवासारखे भासतात. यास्तव तुकोबा म्हणतात---’जाणे भक्तीचा जिव्हाळा’ ॥ भक्ति आणि अभक्ति यांविषयीं अशी गोष्ट आहे. कोणी एक ब्राह्मण गंगातीरीं स्नान करुन संध्या करीत असतां प्राणायामसमयीं आपलें नाक दाबिता झाला. तें एका शूद्रानें पाहून तो औत (नांगर) सोडून ब्राह्मणाजवळ येऊन त्यास पुसूं लागला कीं, नाक धरल्यानें काय लाभ होतो. ब्राह्मण मनांत म्हणतो. ब्राह्मणकर्माचें कारण त्यास सांगून काय उपयोग ? आणि याचा समजही होणार नाहीं. असें मनांत आणून त्यास झकविण्यासाठी म्हणतो कीं, नाक धरुन प्राण आवरुन धरिला असतां देव भेटतो. या प्रकारें ब्राह्मणाचें भाषण ऐकून त्याच्या वचनावर शूद्राचा भाव बसला. नंतर तो ब्राह्मण तेथून गेल्यावर शूद्र गंगेंत स्नान करुन तीराचे ठायीं येऊन बसला. आणि नाक व तोंड धरिता झाला. तेणें करुन वायु सर्व शरीरांत कोंडला. प्राण जाण्याचा समय आला, तथापि तो ब्राह्मणाचे वचनावर विश्वास व भाव ठेऊन नाक न सोडितां अत्यंत व्याकुळ होत्साता पडला. प्राण निघून जाणार इतकी त्याची अवस्था पाहून दीनदयाळु भक्तवत्सल प्रभु गोपालकृष्ण करुणेनें सद्गद होऊन त्याचे अग्रभागीं मूर्तिमंत चतुर्भुज पीतांबरधारि असा हरि प्रगट होऊन त्यास म्हणतो कीं, हे गृहस्था, देव भेटण्यास्तव तूं नाक धरिलें आहेस, तो मीं देव तुला भेट देण्यास आलों आहें. आतां नाक सोड. त्यास तें खरें वाटेना. तथापि बोलल्याविना उपयोग नाहीं. यास्तव तो नाक सोडून त्यास म्हणतो. तूं देव, किंवा गुरव, किंवा भूत आहेस हें मी कशावरुन समजावें ? यास्तव त्या भटजीबावास आणितों. तो सांगेल तर मग खरें मानीन देव म्हणतो याचेसाठीं अभाविक ब्राह्मणास दर्शन देणें आलें. मग शूद्रास सांगतात कीं, त्यास घेऊन ये. तो म्हणतो ही मसलत चांगली ! मी येथून गेलों म्हणजे त्वां पळून जावें आणि माझे श्रम व्यर्थ व्हावेत, असा तुझा मतलब दिसतो. देव म्हणतो. तर बाबा तुझें म्हणणें काय ? शूद्र म्हणतो तुला बांधून ठेवून जाईन. देव भक्तींनें वश होत्साता, बरें आहे म्हणतांच देवाला चर्हाटानें झाडाशीं बांधून त्या ब्राह्मनास तेथें आणिलें. तो अभाविक व पापी असल्यामुळें देव त्यास दिसेना. शूद्र देवास म्हणतो तूं कोणी लबाड आहेस ब्राह्मणाचे दृष्टीस पडत नाहींस. यास्तव या आसूडानें तुझी पाठ फोडीन. असें ऐकून त्याचे भक्तीस्तव ब्राह्मणास देवानें दर्शन दिलें. त्यानें हाच देव म्हणून सांगितलें. तेव्हां त्याचा समज झाला. तात्पर्य; भक्तिभावानें देव वश होतो, तसा कोणतेही योगनें वश होत नाहीं. बाह्य भक्तीपेक्षां अंतर्निष्ठ भक्ति विशेष. याविषयीं जैमिनीभारतांतील कथा कविजन निरुपण करीत आहेत.