श्लोक-
नमुनि गणपतीतें सद्गुरु कृष्णनाथा ॥
चरणकमलिं भावें न्यासिला पूर्ण माथा ॥
प्रणति करुनि हस्तें श्रोतयां सज्जनांसीं ॥
कथन करितसें मी सत्कथा आदरेंसीं ॥१॥
असे पांडवां पूर्ण ती कृष्ण भक्ति ॥
तशी त्यांवरी प्रीति त्याचीहि पूर्ती ॥
सदां संकटीं द्रौपदी त्या हरीतें ॥
मनीं आठवीतां करी साह्य तीतें ॥२॥
ओंवी-
द्रौपदी आणि अर्जुन ॥ मनी भाविती ऐसें पूर्ण ॥
आम्हीं करितांचि हरीचें स्मरण ॥
धांवुनी धांवण्या येतसे ॥३॥
तैसें या वृकोदरास कांहीं ॥ भक्तिलक्षण लेशही नाहीं ॥
हा खादाड आळशी जडदेही ॥ तारतम्य तेंही असेना ॥४॥
दिंडी-
असें गर्वाचें मनी वसे ठाणें ॥
हरि अंतर्बाह्य तें सर्व जाणे तयालागीं लोटतां काळ कांहीं ॥
पुढें आला धनराशिला रवीही ॥५॥
तया मासीं चित्रान्न भास्करातें ॥
चालवीला नैवेद्य महीकांतें ॥
एके दिवशीं मानसीं धर्म आणी ॥
असावा तो पंक्तीस चक्रपाणी ॥६॥
आर्या-
पाचारणार्थ देवा द्वारवती धाडि भूप नकुळांला ॥
सांगे घेऊन ये त्या जो हरितो दैत्य दुर्जनकुळाला ॥७॥
प्रार्थी नकुळ हरीतें आणों धर्में तुम्हांस पाठविलें ॥
आठविलें देवें तैं ज्यांहीं गर्वा मनांत सांठविलें ॥८॥
छंद-
श्रीहरी म्हणें ऐक संप्रती ॥ सवड बा नसे यावयाप्रती ॥
गुंतलों असें काजिं थोरसा ॥ कथिं नृपास तूं विनति या अशा ॥९॥
नकुळ येउनी शीघ्र मागुती ॥ कळवि बंधुतें त्याचिये रिती ॥
धाडितां सहदेवही तसें ॥ श्रीहरी पुन्हां तें कथीतसे ॥१०॥
साकी-
अर्जुनजीकों कहे युधिष्ठर आवत नहिं गिरिधारी ॥
अब तो कैसा बिचार करना रुठे भये बलहारी ॥११॥
प्रभुबिन भोजन अब न करोंगे साच सुनो मेरी भय्या ॥
बिजय कहे तब हात जुरा कर सुनो मेरि बात बलय्या ॥१२॥
द्वाराबतको आपनि आग्या लेकर मै जाओंगा ॥
प्रभुजीकों परभात सभे सो बिनति कर लेआओंगा ॥१३॥
श्लोक-
बोलुनी असें हरीपुरीस शीघ्र पातला ॥
श्रीहरीपदीं प्रणाम दंडसाच घातला ॥
बद्धपाणि राहुनी उभा करीच प्रार्थना ॥
दीनबंधु दीनभक्त पालका जनार्दना ॥१४॥
अनाथांसीं आम्हां तुजविण गमेनाचि सहसा ॥
जसें मातेवीणें शिशु मनिं झुरे रात्रदिवसा ॥
ययालागीं स्नेहें करुनि तुज धर्में झडकरी ॥
असे पाचारिलें द्रुत मजसवें चालचि तरी ॥१५॥
ओंवी-
पार्थ विनवी जोडूनि हस्त ॥ मी धर्माजवळी जाण सत्य ॥
पण करुनि आलोंसें त्वरित ॥ घेऊनी येतों देवासी ॥१६॥
अंजनीगीत-
यास्तव माझा तूं अभिमान ॥ धरुनी देईं शब्दा मान ॥
जननी तूं मी बाळासमान ॥ म्हणवुनी विनवीतों ॥१७॥
ऐसें प्रार्थित करुणावाणी ॥ तव तो बोले रथांगपाणी ॥
माझा सुभक्त एक निर्वाणीं ॥ बाहातसे मातें. ॥१८॥
ओंवी-
तिकडे जाणें असे शीघ्र मजला ॥ ऐसें बोलून निघता झाला ॥
म्हणे माझी विनंति सांग धर्माला ॥ निकट दास मी तुझा असें ॥१९॥
पद-
अरे मी दूर कधींच नसें ॥ सर्वांतर्यामीच वसें ॥ अरे मी० ॥ध्रु०॥
भासे कुजनशरीरहि शवसें ॥ तद्भाषण बेचवसें ॥अरे मी० ॥१॥
नाना दैवतें पावति नवसें ॥ जंबुकराजिवसें ॥अरे मी० ॥२॥
जप तप यागहि करिती हवसें ॥ भक्तिविना नच गवसें ॥अरे मी० ॥३॥२०॥
साकी
रुठे भगवत कसहि तर्हेसो समजत नही पछाना ॥
बिजय सहासे आकर नृपको कह दे सबहि किराना ॥२१॥
दिंडी-
सचिंत चित्तें ऐकुनी धर्म झाला ॥ सुचेनाशी उद्योग लेश त्याला ॥
अशा वृत्ता परिसोन याज्ञसेनी ॥ वदे धर्मासीं तदा गर्ववाणी ॥२२॥
आर्या-
मजवांचुनि शीघ्र दुजा स्तवुनी आणील कोण त्या हरिला
स्मरतांच पूर्विं जेणें धांवुनि मम ताप संकटीं हरिला ॥२३॥
ऐशा गर्वोक्तीनें वदुनी पण करित ते विलंघ सती ॥
तुलसी वृंदावनिं मग आसन घालून जाहली बसती ॥२४॥
छंद-
द्वारकेकडे करुनि आनना ॥ ध्यातसे मनीं प्रभु दयाघना ॥
नेत्र झांकुनी जोडल्या करीं ॥ आर्जवें बहू विनवण्या करी ॥२५॥
पद-
प्राणसख्या झडकरि येईं । धांवुनि बा यादवराया ॥ध्रु०॥
बा सभेंत दुर्जनिं पिडितां धांवलासि वस्त्राहरणीं ॥
पुरविलीं वसनें तेव्हां करुनीयां अद्भुत करणी ॥
चाल-
तैसाच धांवुनीं आजी ॥ करिं सत्य प्रतिज्ञा माझी ॥
धरितें मी दृढतर पाया ॥ प्राण० ॥१॥
वनीं छळणा दुर्वासातें ॥ कौरवांहीं पाठवीलें ॥
मध्यरात्र झाली असतां ॥ तुजला मीं आठवीलें ॥
चाल-
त्वां धांवुन त्या समयासी ॥ पुरविलें अन्न तयांसीं ॥
प्रगटुनियां त्याची ठाया ॥ प्राण० ॥२॥
वाढितां मी कौरवपंक्ती ॥ सुटली ना कुंचकि गांठी ।
तैं मजला चौभुज करुनी ॥ राखिलीस सखया पाठी ॥
चाल-
म्हणविसी भगिनी मजला ॥ म्हणुनी ही लज्जा तुजला ॥
तरि माझी न सोडीं माया ॥प्रा० ॥३॥२६॥अंजनी०
ऐशी केवीलवाणी पाहीं ॥ नानापरी ती विनवीतांही ॥
प्रभु नयेची केल्या कांहीं ॥ निराश ये सदनीं ॥२७॥
श्लोक-
तेव्हां धर्म सचिंत होउनि बसे पात्रीं मुखम्लानसा ॥
त्यातें देखुनियां वृकोदर म्हणे कां खेद जी मानसा ॥
बोले धर्म कथून कारण तुला कायी फलादेशरे ॥
जें पार्थादिक याज्ञसेनिस नव्हे तें केविं तूतें सरे ॥२८॥
नमुनि पायां वृकोदर तो म्हणें ॥ मज करें न घडे तरी सांगणें ॥
नृप वदे मन वांछित पंक्तितें ॥ हरिसहित सुभोजन आजि तें ॥२९॥
आर्या-
भीम म्हणे इतकेंची असुनीयां स्वल्प कार्य कां अडला ॥
घडलाच योग समजा ऐसें आर्षासमान बडबडला ॥३०॥
हंसती पार्थादिक ते द्रौपदिसह त्याचिया वचालागीं ॥
म्हणती आर्ष न लागति शब्द ययाचे अचावचा लागीं ॥३१॥
धर्म म्हणे बा अवधी नसतां झोंकिसि करुन आ बात ॥
पात्रें वाढिलिं असती स्वस्थ बसें बा उगाचि आबांत ॥३२॥
भीम म्हणें देवातें श्रेष्ठस्थानीं सुपात्र मांडावें ॥
वाढावें अविलंबें व्यर्थ कुतर्का तुम्हीं न काढावें ॥३३॥
तों तों अधिकचि हंसती मानुनि विक्षिप्त त्यांस चट सारे ॥
तेव्हां भीम उठोनी गेला बाहेर तूर्ण झटसा रे ॥३४॥
साकी-
अंगनमो तब जाकर प्रभुको मनमों धर रहे ध्याना ॥
अपने हातकी गदा जोरसे फेंकदियो असमाना ॥३५॥
नीचे अपना सीस घराके भगवत्सोहि पुकारे ॥
अनाथवत्सल नाम दीनके गरजत नाम तुमारे ॥३६॥
अपना बीरद साच करनकों चीत पवनके बेगा ॥
पाछे त्यजकर पहुंचे गा तुम तबही प्रान बचे गा ॥३७॥अंजनी० ॥
सकळीकांहीं या समयासीं ॥ लावियलें पूर्ण कसासी ॥
त्यांहीं धरितां निष्ठुरतसा ॥जाइल लाज तुझी॥३८॥
नक्रें धरिलें गजेंद्रासीं ॥ तेव्हां धावुनियां आलासी ॥
बहुतां ठायीं प्रर्हादासी ॥ त्वरित वांचविलें ॥३९॥
मस्तक चूर्ण व्हाया पाही ॥ अवधी क्षणही नसेच कांहीं ॥
तोंवरि धांवुनियां लवलाहीं ॥ रक्षावें दीना ॥४०॥
श्लोक-
विनवणि बहु ऐशी ऐकतां देवराणा ॥
कळवळुन मनीं तो धांवला शीघ्र जाणा ॥
मुगुट शिरिं कशाचा वस्त्रही सांवरेना ॥
लगबग बहु झाली देहही आंवरेना ॥४१॥
असा तो त्यागूनी मनपवन वेगांसि परता ॥
त्वरें आला पाहीं क्षण लव न तें एक भरतां ॥
पडावी जों माथां सुचपल गदा तों निजकरीं ॥
धरुनी ते भीमा हृदयिं कवळी वत्सल हरी ॥४२॥
ओंवी-
धर्म पार्थादि द्रौपदी सहित ॥ तेथें धांवत येऊनि त्वरित ॥
हरीतें साष्टांग प्रणिपात ॥ करुनी स्तविती सप्रेम ॥४३॥
गर्वरहित झाले सर्व ॥ म्हणती भीमभक्ति अभिनव ॥
मग देवातें पंक्तीस धर्मराव ॥ घेउनी सारी भोजना ॥४४॥
दिंडी-
धर्मरायें त्यावरी श्रीनिवासा ॥ राहवून घेतलें धनुर्मासा ॥
प्रातःकालीं दुसरिये दिनीं प्रीतीं ॥ समारंभा योजिलें नृपें चित्तीं ॥४५॥
रविउदयीं सत्वरीं भोजनासी ॥ सिद्ध असणें कळविलें समस्तांसीं ॥
भीमसेना कळविलें तये वेळीं ॥ उठावें त्या शीघ्रसें उषकाळीं ॥४६॥
आर्या-
खोळंबा तुजसाठीं व्हावा नच मी म्हणून सांगतसें ॥
मागतसें मज जें प्रिय करिशिल कीं तूंहि सत्य सांग तसें ॥४७॥
श्लोक-
सदा बाधि तूतें क्षुधा आणि निद्रा ॥
जसा त्रासितो वाडवाग्नी समुद्रा ॥
नसे लेशही धर्म सत्कर्मि भक्ति ॥
अती आळसी नाहीं तार्तम्य युक्ति ॥४८॥
आर्या-
उषसीं उठून सत्वर पार्थादिक सर्व नित्य कर्मातें ॥
आले सारुन कळविती भीम न आला म्हणून धर्मातें ॥४९॥
दशमुखबंधुप्रिया जी विगतधवा मानिजे दरा सतिनें ॥
निर्भय असे विहारें पुनरपि वरिलें वृकोदरास तिनें ॥५०॥
तीतें आवरितांही सहसा ऐके न भीमदासासी ॥
प्रियकर धन्यासहि जशी पावुनियां ते न भी मदा दासी ॥५१॥
चौपगी-
करत पंगतीसो थाट ॥ धरत चंदनके पाट ॥
चौकींपर सुनेके ताट ॥ कटोर्या रत्नजडित है ॥५२॥
डाले रंगोलिया सुरंग ॥ बीज भात भातके रंग ॥
वेलबुटिया चोख ॥ जंग मन दंग देखसों ॥५३॥
श्लोक-
पात्रें मांडिति तों तया अवसरीं तेथें हरी पातला ॥
तांबूला करि चर्वणास वदनीं धर्में असा देखिला ॥
त्यातें भूप म्हणे तुम्हांस्तव हरी मोठा खटाटोप हा ॥
झालें भोजन भासतें श्रम तरी हे व्यर्थ माझे अहा ॥५४॥
हरी बोले तेव्हां परिस वचना सत्य कथितों ॥
असे केला भीमें पुजुन मज सत्कार अति तो ॥
तदा सोपस्कारें विविध बहु अन्नें रुचिकरें ॥
स्वहस्तेंची वाढी करुनि बरवें तो निजकरें ॥५५॥
ओंवी-
तुम्ही घाई करितां स्नानार्थ ॥ त्यासी त्वरा झाली बहुत ॥
खिचडी अग्नीवरी होती तप्त ॥ तैशीच मजसी वाढिली ॥५६॥
तेणें अत्यंत पोळलें वदन ॥ न त्यागवे भक्तीचें सुग्रास अन्न ॥
ऐसें अतिरिक्त झालें भोजन ॥ तांबूल सेवन आलों पहा ॥५७॥
तों सकल म्हणती अद्याप ॥ भीम स्वस्थपणें घेतसे झोंप ॥
देवाचे बोलण्याची थाप ॥ वृथाचि दिसे निश्चयें ॥५८॥
दिंडी-
देव बोले रुक्मिणीसहित मातें ॥ आजि भीमें घातलें भोजनातें ॥
अजुनि त्याचे मंदिरीं रमा आहे ॥ जाउनीयां सत्य कीं अनृत पाहें ॥५९॥
श्लोक-
भीममंदिरांत देखती समस्त ईक्षणीं ॥
रुक्मिणीसहीत थाटमाट सर्व ते क्षणीं ॥
भीम झोंप गाढ घेत फार तेंहि देखती ॥
धर्म पार्थ द्रौपदीहि विस्मयास मानिती ॥६०॥
छंद-
सकळिकांसही जाण या परी ॥ माव दावुनी भीममंदिरीं ॥
क्षण न लागतां तेहि मागुति ॥ पाववी लया तो जगत्पती ॥६१॥
साकी-
धर्मवैसे ग्यानी थासो समजे भगवत् माया ॥
मानसपूजा करसे भोजन वानें प्रभुसो दीया ॥६२॥
वैसी भक्ती वृकोदरनकी जानी पूरन सबनें ॥
जिनके मनमो गरब थयासो परहारा भगवतनें ॥६३॥
भगवद्भाक्ति ऐसि पुरानमो व्यास मुखानें गाई ॥
किसनदास कहे श्रोते जनसों सुनो प्रेमसे भाई ॥६४॥
या प्रकारें अंतर्निष्ठभक्तीच्या योगानें भीमसेनावर भगवान् संतुष्ट होत्साते पूर्ण कृपा करिते झाले. यास्तव तुकोबा म्हणतात कीं, सर्व साधनांत भक्तीचें प्राधान्य होय. त्या भक्तीचा जिव्हाळा ज्यानें जाणिला तोच देवाचा पुतळा. त्यासच दैववान् म्हणावें. संतति किंवा संप त्यादियुक्त सुखरुप नांदणारा त्यास दैववान् म्हणावें असें नाहीं, तर भक्तिज्ञानादिकरुन जो युक्त तोच दैववान् असें जाणावें. ’जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोच दैवाचा पुतळा’ यास्तव साधूंच्या वचनावर विश्वास ठेवून प्रभूजवळ वारंवार हेंच मागणें मागावें. हेंचि दान देगा देवा०॥मंगलारती॥पुंडलीक वरदे०॥पार्वतीपते०॥ सीताकांतस्मरण०॥