मार्कंडेयाख्यान - कीर्तन पूर्वरंग निरुपणम

कीर्तनासंबंधी ज्ञान संपादन करून, नंतर स्वार्थ वा परमार्थ संपादन व्हावा या उद्देशाने कीर्तन करून लोकांस ज्ञान सांगण्यासाठी कीर्तनकार आख्यान लावतात.


श्रीगणेशायनमः ॥ श्रीगुरुभ्योनमः ॥

स जयति सिंदुरवदनो देवो यत्पादपंकजस्मरणम् ॥

वासरमणिरिव तमसां राशिं नाशयति विघ्नानाम् ॥१॥

इत्यादि नमनम् ॥

पद-

मना ध्यायी बा पांडुरंगा ॥

काळ हा निष्ठुर करितसे दंगा ॥ हो मना ध्यायी बा० ॥ध्रु०॥

निशिदिन नाम हें स्मरोनि अंतरीं ॥

धरीं प्रीति तूं संतसंगा ॥हो मना ध्यायीं बा० ॥१॥

मानुनि शाश्वत धन सुत जाया ॥ कां करितोसी व्यर्थ ढंगा ॥हो मना० ॥२॥

कृष्णदास म्हणें जाईल निश्चयें ॥ भवभय हें जाण भंगा ॥हो मना० ॥३॥१॥

भजन-

जयगुरु नारायण हरी ॥

अभंग-

नको नको मना गुंतूं मायाजाळीं ॥

काळ आला जवळीं ग्रासावया ॥१॥

काळाची या उडी पडेल बा जेव्हां ॥

सोडवीना तेव्हां मायबाप ॥२॥

सोडवीना राजा देशींचा चौधरी ॥

आणिक सोयरीं भलीं भलीं ॥३॥

सोडवीना भाऊपाठीची भगिनी ॥

शेजीची कामिनी दुरच्या दुरीं ॥४॥

तुका म्हणे तुला सोडवीना कोणी ॥

एका चक्रपाणी वांचोनीयां ॥५॥२॥

आदौ कीर्तनारंभीं सत्पुरुषांची वाणी तुकाराम महाराज साधकांप्रत हितोपदेशार्थ आपले मनास बोध करिताहेत. हे मना, रे बापा, धनसुतजायादि मायापाशांत गुंग होऊं नको. भक्षणाकरितां काळ जवळ आला असें समज ॥

नित्यं संनिहितो मृत्युः ॥ निरंतर मृत्यु सन्निधच आहे. केव्हां ग्रासील याचा भरंवसाच नाहीं

अभंग-

टपत उंदीरा नेऊं पाहे बोका ॥ तेवीं काळ लोकां नेत असे ॥

जसा उंदीर धरण्यास बोका टपून बसतो, अथवा मेंढरुं धरण्यास जसा लांडगा टपतो, बकरें ओरडलें म्हणजे तें ऐकून तात्काळ उचलून नेतो, त्याप्रकारें कवि म्हणतात.

श्‍लोक-

दारा इमे मे तनया इमे मे गृहा इमे मे पशवस्त्विमेमे ॥

एवं नरो मेषसमानरुपो मे मे कृतः कालवृकेण नीतः ॥३॥

माझी स्त्री, माझा पुत्र, माझें घर, माझे पशु, इत्यादि मे मे माझें माझें असें मेंढरासारखें मे मे नरानें केलें म्हणजे त्यातें वृक एतल्लक्षण काळ नेत आहे ॥ वामनपंडित म्हणतात.

श्‍लोक-

काळ चोर घिरटया घरिं घाली ॥

पामरा निज कशी तुज आली ॥

जाग जाग स्वरुपी लवलाहें ॥

जातसे वय अमोलीक पाहे ॥

प्राणधन हरण्यास काळ हाच कोणी चोर शरीर-गृहाभोंवत्या घिरटया घालीत आहे. यास्तव आत्मस्वरुपाचे ठायीं जागृत रहा. अमोलिक आयुष्य व्यर्थ जात आहे, घटका पळें आयुष्य व्यर्थ चाललें. रामदास स्वामी म्हणतात.

पद-

घटका गेली पळें गेलीं तास वाजे झणाणा ॥

आयुष्याचा नाश होतो राम कांरे म्हणाना ॥ध्रु०॥

एक प्रहर दोन प्रहर तीन गेले ॥

चार प्रहर संसाराचे चावटीनें मेले ॥घटि० ॥१॥

झोंप कांहीं रात्र कांहीं स्त्रियेसंगें गेली ॥

ऐशी आठ प्रहरांची वासलाद झाली ॥घटि० ॥२॥

म्हणतो सदा रामदास सकळां स्मरण देतो ॥

क्षणक्षणां म्हणवोनि तास झणाणितो॥ घटिका गेली० ॥३॥५॥

असें आयुष्य व्यर्थ चालले तथापि आशापाश सुटत नाहीं. शंकराचार्य म्हणतात.

श्लोक-

चर्पटपंजरी-दिनमपि रजनी सायं प्रातः शिशिरवसंतौ पुनरायातः ॥

कालः क्रीडति गच्छत्यायुस्तदपि न मुंचत्याशावायुः ॥

भज गोविंदं भज गोविं० ॥६॥

असे दिवसांचे दिवस, वर्षांचीं वर्षें व्यर्थ चाललीं. कालक्रीडा सहज होते, पण आयुष्य व्यर्थ जातें. जसें ’मांजराचे ख्याल पण उंदराचे हाल’ अशी म्हण आहे. बा मना, आयुष्य व्यर्थ जातें. जसें ’मांजराचे ख्याल पण उंदराचे हाल’ अशी म्हण आहे. बा मना, आयुष्य तरी पुष्कळ असेल तर तेंही नाहीं. कवि म्हणतात.

श्लोक-

आयुर्वर्षशतं नृणां परिमितं रात्रौ तदर्धं गतं ॥

तस्यार्धस्य तदर्धमर्धमपरं वालत्ववृद्धत्वयोः ॥

शेषं व्याधिवियोगदुःखसहितं सवादिभिर्नीयते ॥

जीवे वारितदंगबुब्दुदसमे सौख्यं कुतः प्राणिनां ॥७॥

नराचे आयुषयची परिमिती शंभर वर्षें, त्यांतून अर्ध म्हणजे पन्नास रात्रीचे ठायीं गेलीं. त्याचे अर्धाचें अर्ध पंचवीस वर्षें बालत्व आणि वृद्धत्व यांत गेलीं. शेष पंचवीस, त्यांत नाना आधिव्याधि, वियोग, दुःखें, तशींच उदरनिर्वाहार्थ सेवादि उद्योगांत गेलीं. इतकेंही असून पाण्यावरील तरंगाचे बुडबुडयाप्रमाणें हा जीव तस्मात् प्राण्यास आत्मसुख कोठून प्राप्त होणार ? रामजोशी म्हणतात.

पद-

लावणी ॥ कृता त्रेता द्वापरीं होती आयुष्याची बहु भरती ॥

कलिमाजीं शत वर्षें नेमिलीं तींहि न भरति पहा पुरतीं ॥

बारा चौदा पंधरा सोळा पंचविसांमधिं किति मरती ॥

मागें मेले पुढें मरणार कोण करिल त्यांची गणती ॥

आजा मामा काका मेला याची साक्ष घे चित्तीं ॥

त्याचे शोकें दुःखित मानस शेवट तुमची तीच गती ॥

देह आपुला जाइल यास्तव धरा कांहीं सोय झटकन्‌ ॥

समय पातल्या उशिर न लागे काळ येउनी गिळि गटकन्‌ ॥

खुप समजा ॥ अमोल काया ॥ जाइल वायां जशी कांच कीं फुटे ॥

फटकन् उभा काळ सन्निध लक्षितो वेळीं होय सावध झटकन् ॥८॥

याकरितां तुकोबा मनास बोध करितात.

अभंग-

नको नको मना गुंतूं मायाजाळीं ॥ काळ आला जवळीं ग्रासावया ॥

मना रे, माय, बाप, भाऊ, बहीण, स्त्री, किंवा राजा हीं काळाचे हातून सोडविण्यास समर्थ नाहींत. वामन म्हणतात.

श्लोक-

कृतांताच्या दूतां मरण समयीं कोण फिरवी ॥

कृतांताच्या दूतां मरण-समयीं साधु फिरवी ॥

विधात्याची रेषा कवण नर तो लेश नुरवी ॥

विधात्याची रेषा जगिं गुरु-कृपा लेश नुरवी ॥९॥

काळाचे हातून सत्पुरुष सोडवितींल. ब्रह्मदेवानें भाळीं लिहिलेलें खातें सद्गुरुवांचून दुसर्‍याचे हातून पुसवलें जाणार नाहीं. सग्दुरु निःशेष पुसतील. या प्रकारें ज्यांहीं निःशेष मायापाश तोडिला, ते काळाचे हातून सुटतील. पुत्र दारा धनादिकीं गुंतणें व्यर्थ होय, अंतीं याचा कांहीं उपयोग नाहीं.

श्लोक-

धनं च भूमौ पशवश्च गोष्ठे कांता गृहद्वारि जनः स्मशाने ॥

देहश्चितायां परलोकमार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः ॥१०॥

अर्थ-

भूमींचे ठायीं द्रव्य राहतें, पशू गोठयांत राहतात,

भार्या गृहद्वारापर्यंत सोबंती, तसेंच स्वजनादिक स्मशानापर्यंत सोबती होत. जन्मापासून पोशिला वाढविला असा जो देह तोही चितेचे ठायीं राहतो. परलोकमार्गी शुभाशुभ कर्मानुसंगें एकला जीव जातो. सर्व जागचे जागी राहतें. यास्तव स्त्रीपुत्रादि मायाजाळांत न पडावें म्हणून तुकोबा मनास बोध करितात.

अभंग-

नको नको मना गुंतूं मायाजाळी ॥ तुकोबांनीं मनास बोध करायचें कारण काय म्हणावें ? तर योग्यच कारण आहे.

श्लोक-

मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः ॥

भवाशीं बद्ध आणि भवबंधापासून मुक्त होण्यास मनुष्याचें मन हेंच कारण मुख्य आहे. परंतु हें अति चंचळ. एक ठिकाणीं स्थिर होणें दुस्तर. अर्जुन म्हणतात.

श्‍लोक-

चंचलं हि मनः कृष्ण प्रमाथी बलवदृढं ॥

तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करं ॥११॥

अर्थ-

पार्थ म्हणतो हे कृष्णा, हें मन परम चंचल, दृढ बलवत्तर आहे याचा निग्रह होणें परम दुर्घट जसा वायु आवरण्यास दुष्कर तसें मन स्थिर होण्यास दुष्कर होय. मुक्तेश्वर म्हणतात

ओंवी-

आकाशाची करवेल चौघडी ॥ महामेरुची बांधवेल पुडी ॥

शून्यची मुरडवेल नरडी ॥ परी मनाच्या ओढी अनिवार ॥१२॥

मोरोपंडित म्हणतात. मन हें कसें आहे ?

आर्या-

मन हें ओढाळ गुरुं परधन परकामिनीकडे धांवे ॥

यास्तव विवेकपाशें कंठीं वैराग्य-काष्ठ बांधावें ॥१३॥

मन हें ओढाळ गुरासारखें परस्त्री आणि परधनाकडे धांवतें ॥ भागवतकार म्हणतात.

श्लोक-

वेधा द्वेधा भ्रमं चक्रे कांतासु कनकेषु च ॥

तासु तेष्वप्यनासक्तः साक्षाद्भर्गो नराकृतिः ॥१४॥

या जगताचे ठायीं ब्रह्मदेवानें कांता आणि कनक या भ्रमचक्रांत सर्व विश्व लोटिलें आहे. त्यांतून जो पुरुष या दोन वस्तूंचे ठायीं अनासक्त तो साक्षात् नराकृति ईश्वर होय, पंत म्हणतात.

आर्या-

जो या मानवलोकीं मानितसे कनक कामिनी वमन ॥

तो सत्पुरुष म्हणावा धन्य तयाचे पदीं असो नमन ॥१५॥

या मनुष्यलोकीं कांती आणि धन वमनतुल्य जो मानितो तो सत्पुरुष भगवत्सवरुप धन्य होय. त्याचे चरणीं नमस्कार असो. या दोन गोष्टींतून एकाचा तरी त्याग हें मन करील तरी पुरे. पंत म्हणतात

आर्या-

हें मन हे मन चिंती जरि हरिभजनासि होउनी रत रे ॥

तरि मग नामस्मरणें भवसिंधूचें अगाध नीर तरे ॥१६॥

अर्थ-

द्रव्याचें चिंतन हें मन न करील तर नामस्मरणें करुन भवसिंधूतें तरुन जाईल, परंतु कलियुगांत तर द्रव्याशा सुटणें कठिण. याविषयीं पंतांचें वचन.

आर्या-

मोठा लाभ मनुष्या कलिरायाच्या युगांत कनकाचा ॥

व्यवहारीं मान तसा निर्धनजन राखतात धनिकाचा ॥१७॥

कलियुगांत धनवान् पुरुष कसाही अवगुणी असला तरी तो श्रेष्ठ.

श्‍लोक-

यस्यास्ति वित्तं स नरः कुलीनः स पंडितः सः श्रुतवान् गुणज्ञः ॥

स एव वक्ता स च दर्शनीयः सर्वे गुणाः कांचनमाश्रयंति ॥१८॥

अर्थ-

ज्याचे जवळ द्रव्य तो कुलीन, पंडित, श्रुतवान्, गुण जाणता, तसाच वक्ता आणि रुपवान्‌. एवं सर्व गुण कांचनाचे आश्रयें करुन राहतात. परंतु ज्यापाशीं द्रव्य विशेष, तो बहुधा कृपणही फार असतो. याजवर गोष्ट-कोणी एक गृहस्थ विपुल द्रव्यवान्, परंतु अतिशय कृपण ! पैसा खर्चेंल म्हणून खेडेगांवीं रहात होता. कधी तीथमीथ दानधर्म स्वप्नांतही ज्यानें केला नाहीं. संतानरहित स्त्री व आपण उभयतां वृद्ध झाली. स्त्री साध्वी होती, पण त्याचेपुढें तिचा इलाज चालेना. युक्तीनें तिनें एके समयीं महायात्रेस जाण्याचा आग्रह धरुन त्याचे समवेत बाराणशींत उभयतां आलीं, आणि भागीरथींचे स्नानास गेलीं. तेथें तीर्थोपाध्याय संकल्प सांगण्यास आला. त्यास दक्षणा दिली पाहिजे. पैसा व्यर्थ जाणार असें जाणून स्त्रीस म्हणतो येथेंच स्नान केलें तर भागीरथी आहे. नाहीं तर दुसरे ठिकाणीं पुर्वसमुद्रापर्यंत नाहीं काय ? असें बोलून तिजला समागमें घेऊन भागीरथीचे तटाकानें हिंडत कोठें मनुष्य नसेल तेथें स्नान करावें, म्हणून दहा पांच कोस दूर गेला. आणि निर्मनुष्य जागा पाहून स्नानार्थ गंगोदकीं प्रवेश करुन बुचकळी मारुन वर डोकें काढिलें तो स्वतः विश्वेश्वरानें त्याचा अंत पाहण्यास ब्राह्मणाचे रुपानें प्रगट होऊन हांक दिली. महाराज, आपण यजमान मी उपाध्याय. मला आपल्यास संकल्प सांगणें अवश्य आहे. गृहस्थ म्हणतो मजपासून पैशाची प्राप्ति होणें नाहीं. ब्राह्मण म्हणतो, संकल्पावांचून मी कोणास स्नान करुं देत नसतों. असा त्याचा अटकाव पाहून गृहस्थ म्हणतो, आम्हांजवळ येथें पैसा नाहीं. आमचे गांवीं येशील तर दोघांच्या स्नानाचे दोन पैसे तेथें देईन. तें विश्वेश्वरानें मान्य केलें व संकल्प सांगून जाता झाला. गृहस्थ सभार्य स्नान करुन मजल दरमजल पंधरा दिवसांनीं घरीं आला. उपरांत एक महिन्यानें आपले पैसे वसूल करण्याकरितां विश्वेश्वर ब्राह्मणवेषानें त्याचे गांवीं जाउन घरीं आले. तो गृहस्थ त्यास पाहून स्त्रीस म्हणतो, काय हो हा ब्राह्मण लोभिष्ट आहे. दोन पैशांस्तव शंभर कोस आला, आपण कृपण हें न जाणतां ब्राह्मणासच शब्द लावून म्हणतो. काय चिंता आहे ! मी नांवाचा खरा कृपण होईन तर यास कवडीही देणार नाहीं. असें बोलून त्यास न भेटतां घरांत येऊन निजला. आणि स्त्रीचे मुखानें त्यास सांगितलें कीं, यजमान वाखानें अत्यवस्थ आहेत. येथून दोन कोसांवर ब्राह्मणवस्ती आहे. सत्वर जाऊन भोजनाची तजवीज पहावी. संध्याकाळ झाली. लौकर उठून जावें, दोन पैसे बुडाले तर बुडूं द्या. ब्राह्मण म्हणतो माझें भोजन झालें आहे. थकलों आहें, यास्तव प्रातःकाळीं जाईन. गृहस्थानें जाणिलें, हा असा जात नाहीं. पुनः स्त्रीकडून सांगविलें कीं, यजमानाचा काळ झाला. असें सांगून तिजला रुदन करण्यास सांगितलें. या प्रकारें पुरती संपादणी पाहून ब्राह्मण गृहस्थाचे स्त्रीस म्हणतो. आतां याचे सार्थकास दुसरा ब्राह्मन कोणी नाहीं. ’ब्राह्मणस्य ब्राह्मणो गतिः" असें वचन आहे. यास्तव त्याचें सार्थक करणें मला अवश्य आहे. असें म्हणून त्यानें स्मशानांत तात्काळ चिता रचिली. आणि त्या गृहस्थानें मेल्याचें सोंग घेतलें होतें त्यास उचलून नेऊन सरणावर घातला आणि अग्नि द्यावा तों तेथें तेहतीस कोटी देव येऊन विश्वेश्वरास प्रार्थिते झाले कीं, महाराज आपण समर्थ, कृपावंत या मूर्ख कृपणाचा अंत किती पहावा. आतां यास सोडून चलावें. असें ऐकून अग्नि शांत करुन विश्वेश्वर निघाले. तेव्हां तो गृहस्थ उठून म्हणतो कीं, तुझे पैसे फिटले, आतां मी देणार नाहीं !!" कृष्ण रामा रामा रामराया राघोबारे रामा ॥ तात्पर्य - द्रव्यवानाची वृत्ति बहुधा कृपण असते. ज्याजपाशीं द्रव्य नाहीं त्याची दुर्दशा फार, याविषयीं

श्‍लोक-

निर्द्रव्यः पुरुषो विपल्लवतरुः सर्वत्र मंदादरो ।

नित्यं लोकविनापराधकुपितो दुष्टं च संभाषणं ॥

भार्या रुपवती च मंदमनसस्नेहान्न चालिंगते ।

तस्मात्‌द्रव्यमुपार्जय शृणु सखे द्रव्येण सर्वे वशाः ॥१९॥

अर्थ-

निर्धन पुरुष पत्ररहित वृक्षासारखा, सर्व ठिकाणीं अनादर, अपराधावांचून लोक त्यास शिव्या देतात. भार्या स्नेहेंकरुन त्यास आलिंगन देत नाहीं. हे सखे, तस्मात् सर्व द्रव्याधीन आहे. दरिद्रतेपेक्षां मृत्यु बरा, याविषयीं गोष्ट-कोणी एक धनहीन पुरुष दारिद्रयानें अत्यंत गांजलेला असा स्मशानांतून जात असतां तेथें एक शव पडलें होतें, त्याजवळ जाऊन म्हणतो,

श्‍लोक-

उत्तिष्ठ क्षणमेकमुद्वह सखे दारिद्रयभारं मम ॥

श्रांतस्तावदिदं चिरान्मरणजं सेवे त्वदीयं सुखं ॥

इत्युक्तं धनवर्जितस्य वचनं श्रुत्वा स्मशाने शवो ॥

दारिद्रयान्मरणं वरं वरमिति ज्ञात्वैव तूष्णीं स्थितः ॥२०॥

अर्थ-

हे सखे, मला दारिद्रयाचा भार झाला आहे. हा क्षणभर मी विश्रांति घेईंपर्यंत त्वां उठून घ्यावा. मी क्षणैक विसांवा घेऊन परत येईन. उपरांत सुखेंकरुन आपलें मरण स्वीकारावें. याप्रकारें धनवर्जितांचें भाषण ऐकून प्रेत समजलें कीं, बापा नकोरे नको. दरिद्रतेपेक्षां मरण हेंच श्रेष्ठ होय असें जाणून तें निचेतन पडतें झालें. तात्पर्य-द्रव्य हें सर्वांत विशेष होय. पुत्र आप्तादिक सर्व पैशाचीं होत. कबीर म्हणतात.

दोहरा-

मा कहे मेरे आवत पूत, बहन कहे मे रे आवत भय्या ॥

काकी नानी सब घरदार खुसाली लेत बलय्या ॥

जब लछमींसें ब्रीद घटे तब छंड चले सब जात दुन्हया ॥

सो एक बडो जग मानस है के जिसके सफेत रुपय्या ॥२१॥

ज्यापाशीं द्रव्य त्यास सर्व लोक चाहतात. परंतु तें तरी स्थिर आहे काय ? नाहीं. दोन प्रहरचे छायेसारखी क्षणिक संपदा आहे. तथापि धनमदानें अंधत्व येतें आणि तो धनांध दीन दुबळ्यांचें दुःख जाणत नाहीं. कवि म्हणतात.

श्‍लोक-

दीनदुःखं न जानाति धनांधो लाभमिच्छति ॥

यथा गर्दभवाही च गृण्हीते तच्छंम वृथा ॥२२॥

अर्थ-

दीनाचें दुःख न जाणतां त्याजपासून लाभाची इच्छा कृपण धनांध करितो. जसा गाढव वाहणारा त्यास पोटासही न घालतां त्याचें दुःख मनांत न आणून त्याचे श्रम व्यर्थ घेतो. धनादि अस्थिर असून मदेंकरुन स्थिर मानतो. त्यास कवि म्हणतात.

श्‍लोक-

आपद्गतं हमसि किं द्रविणांधमूढ लक्ष्मीः स्थिरा न भवतीति किमत्र चित्रम् ॥

त्वं किन्न पश्यसि घटान् जलयंत्रमध्ये रिक्ता भवंति भरिताः पुनरेव रिक्ताः ॥२३॥

अर्थ-

हे द्रविणांध मूढा, तुझी आपदा गेली म्हणून दुसर्‍या दरिद्रयास किमर्थ हंसत आहेस. उदकांत राहाटमालिकेचे घट रिते ते भरतात, भरलेले रिते होतात याप्रकारें लक्ष्मी स्थिर नाहीं, असें असून शाश्वत मानितोस याहून काय आश्चर्य सांगावें. याप्रकारें धन क्षणिक, यास्तव त्याचे ठायीं मन आसक्त न होईल तर तो प्राणी नामस्मरणेंकरुन भवसिंधु तरुन जाईल. म्हणून पंतांचें म्हणणें.

आर्या-

हें मन हे मन चिंती जरि हरिभजनास होउनी रत रे ॥

यास्तव तुकोबा मनास बोध करितात कीं, कनक आणि कांता त्या प्रकारेंच स्त्रीपुत्रादि मायाजाळांत गुंतू नको ॥ नको नको मना गुंतूं मायाजाळीं ॥ एका सर्वेश्वरावांचून स्त्रीपुत्रादिक कोणीही अंतीं सोडविण्यास समर्थ नाहींत. काळाचे हातून सर्वेश किंवा साधु सोडवितील. मार्कंडेयास शंकरांनीं काळाचे हातून सोडविलें याविषयीं कविजन कथा निरुपण करितात.

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP