श्रीगणेशायनमः ॥
छंद-
प्रथम वंदुनीं विघ्नकंदना ॥ ध्यायिलें गुरु नंदनंदना ॥
नमुनि श्रोतयां कीर्तिं शंभुची ॥ कथितसें मनीं धरुनियां रुची ॥१॥
साकी-
मृकंड नामक महा तपस्वी मुनिवर सत्पथगामी ॥
असतां त्याची कांता त्यातें प्रार्थीं निजसुखधामी ॥२॥
श्रोते परिसा हो, वदनीं शिव हर हर गा हो ॥श्रोते०॥ध्रु०॥
संतानाविण जिणें मज भासे व्यर्थ पसारा ॥
यास्तव स्तवुनी गौरीशा सुत मागा कुलउद्धारा ॥३॥
आर्या-
पुत्राविणें न सद्गति आकुर्णनि भाषणा अशा स्त्रीचा ॥
मानी ऋतु मुनि यास्तव न वदे हें आश्रयें अशास्त्रींचा ॥४॥
दिंडी-
प्रियेचीया हृद्गता जाणुनीयां ॥ तपा गेला तो वनीं निघूनीयां ॥
शीत उष्णा सोसुनी दुःख भारी ॥ अनुष्ठानीं बैसला निराहारी ॥५॥
षडक्षरी शंभुच्या मंत्र कोटी ॥ जप होतां पावला ईश तुष्टी ॥
मुनी सन्मुख येउनी शूलपाणी ॥ वरं ब्रूही बोलता होय वाणी ॥६॥
आर्या-
परिसुनि महेशवचना मागितलें त्या मृकंड-संतानें ॥
संतानेच्छा पुरवुनि निरसावें दुःख जें असतानें ॥७॥
सांगे प्रभु गुज ऐके मूर्ख शतायू कुरुप सुत पाहे ॥
अल्पायु साधु धीमान् कवण रुचे यांत सांग सुतपा हें ॥८॥
ओंवी-
ऐकुनी मुनी झाला तटस्थ ॥ दोहींकडेही वेधलें चित्त ॥
प्रभूतें विनवी जोडुनी हस्त ॥ अवधि किंचित् मज द्यावी ॥९॥
कोणता पुत्र कांतेलागुनी ॥ मानवे तो येतों विचारुनी ॥
ऐसें बोलून स्वाश्रमीं येउनी ॥ स्त्रीतें साकल्य कथियेलें ॥१०॥
छंद-
वंदुनी सती प्राणनायका ॥ वदत मूर्ख तो सुत नका नका ॥
उपल या जगीं थोर बहुदिशीं ॥ काक घूक ते दीर्घ आयुषी ॥११॥
व्यर्थ कायसें हीन तें जिणें ॥ डाग सत्कुला मूर्खतागुणें ॥
म्हणुन सांगतें सत्य आइका ॥ मूर्ख अवगुणी सुत नका नका ॥१२॥
साकी-
साधू सुंदर सुगुणी ज्ञाता जरी तो अल्प वयाचा ॥
मंगलकारक तरि वंशातें ठेवा सत्यसुखाचा ॥१३॥
सत्कर्मातें आचरितां तो त्याची पुण्यप्रभावें ॥
गिरिजावल्लभ पावून तुष्टी वारिल विघ्न स्वभावें ॥१४॥
दिंडी-
ऐकुनीयां यापरी प्रियावाणी ॥ त्वरें आला ज्या स्थळीं शूलपाणी ॥
म्हणे देवा देईजे सुत ज्ञाता ॥ शंभु अस्तु बोलुनी होय जाता ॥१५॥
आर्या-
स्वाश्रमिं मुनि मग येउनि रमतां वनितेशिं तो स्वभावानें ॥
अंतर्वत्नी झाली सति ईशाच्या वरप्रभावानें ॥१६॥
नव मास पूर्ण भरतां प्रसवलि सत्पुत्र ती मुनिप्रमदा ॥
पाहुनि पुत्रमुखा तो हर्षे पावे परी न विप्र मदा ॥१७॥
उत्तम योग सुवेळीं प्रसवलि मुनिकामिनी सुपुत्रास ॥
मातापितरां तेव्हां वाटे सुख तें उणें अपुत्रांस ॥१८॥
मार्कंडेय असें त्या दिधलें सप्रेम नाम जनकानें ॥
परिसुनि बालवचोमधु हर्षति मातापिताहि जन कानें ॥१९॥
ओंवी-
पंच वर्षें लोटतां साचार ॥ मुनीनें केला द्विजन्मसंस्कार ॥
चतुर्दश विद्या कळा समग्र ॥ वेदशास्त्रें अभ्यासिलीं ॥२०॥
ज्याची प्रज्ञाप्रभा अंतरीं झळके ॥ श्रवणेंचि सर्व आकळी तर्कें ॥
पुराणें इतिहास कथानकें ॥ झाला प्रवीण सकळिकीं ॥२१॥
आर्या-
यापरि सुखांत जातां पळ घडि दिन रात मास काळ जितें ॥
शंकरवचना स्मरुनी करिती मातापिताहि काळजितें ॥२२॥
साकी-
षोडश वर्षें पुत्रवयातें सन्निध आलीं भरत ॥
जाणुनि वृद्धें निशिदिनिं दुःखें रुदती अपार गुप्त ॥२३॥
अहा अहा रे दैवा म्हणुनी शोकें बडविति भाळा ॥
अल्पायु सुत कशास दिधला अमुतें त्रिभुवनपाळा ॥२४॥
अंजनीगीत-
आतां आम्ही काय करावें ॥ संसारीं या केविं तरावें ॥
वत्सा वत्सा म्हणून मरावें ॥ बसल्याचि ठायीं ॥२५॥
संतानाविण इतका पाही ॥ नव्हता आम्हां खेद कदाही ॥
सांप्रत वाहतों दुःखप्रवाहीं ॥ पावुनी पुत्रातें ॥२६॥
साकी-
रोदन कारण कळतां तनया मानिल भय तो भारी ॥
यास्तव हृदयीं निशिदिनिं झुरती न कळत त्या परभारीं ॥२७॥
दिंडी-
तथापि तें ना कदा दुःख झाके ॥ सर्व इंद्रियिं शोकअब्धि फांके ॥
अश्रुधारा लोचनीं बळें येती ॥ देखुनीयां शंकीत पुत्र चित्तीं ॥२८॥
म्हणे कायी कारण रोदनासी ॥ तदा दुःखें माय ती कथी त्यासी ॥
अरे बाळा सोळाचि वत्सरांनीं ॥ तुला जाणें निश्चयें मृत्युयानी ॥२९॥
म्हणूनीयां काळजी फार वाटे ॥ कसें मोठें हें विघ्न वहीवाटे ॥
सांगुनियां गुह्य तें तया कंठीं ॥ स्फुंदस्फुंदोनी तदा घाली मिठी ॥३०॥
पद-
कशी तरी गत बा करुं ॥ वत्सा कशी तरी गत बा० ॥ध्रु०॥
त्यजितां तूं वपु प्राणसख्यारे ॥ निश्चयें आम्ही मरुं ॥
वत्सा कशी तरी गत बा० ॥१॥
या तव दुर्घट वियोगदुःखा । सांग कशानें हरुं ॥
वत्सा कशी तरी गत बा० ॥२॥
दुस्तर अति हा भवाब्धि आतां ॥ तुजविण केविं तरुं ॥
वत्सा कशी तरी गत बा करुं ॥३॥३१॥
आर्या-
आकर्णुनि वृत्तांता वंदुनि बोले सुतोक वचनासी ॥
स्मरतां पद दुःखशरा लेववुनी शिवकृपाकवच नासी ॥३२॥
मग उभयां नमुनी तो निघता झाला विचारुनी मूल ॥
नश्वर सर्वहि जाणुन आश्रयि मनिं दृढ जगल्लतामूल ॥३३॥
मृत्युंजयाविणें हें कोण जगीं या अशेष भय नाशी ॥
ऐसा निश्चय जाणुन तत्पर झाला तदीय भजनासी ॥३४॥
स्वीकारुनि शिवदीक्षा पंचाक्षर मंत्र अंतरीं जपतो ॥
रुद्राक्ष भस्मधारण करुनीयां काळवंचना जपतो ॥३५॥
ओंवी-
ऐसा शिवभजनीं सदा निरत ॥ मृकंडात्मज निष्ठावंत ॥
यात्रामिसें अवनीं हिंडत ॥ कावेरीतटीं पावला ॥३६॥
त्याच दिनीं यमदंड समजुनी ॥ निमग्न झाला पार्थिवपूजनीं ॥
अंतरीं शिवपदाब्ज धरुनी ॥ पद्मासनीं बैसला ॥३७॥
आर्या-
जो प्राण्यातें शासन कर्ता निवडुनि सत्य न्यायातें ॥
तो निज अनुचर धाडी मार्कंडेयासि शीघ्र न्यायातें ॥३८॥
ओंवी-
अंतकाज्ञेनें यथाकाळीं ॥ दूत धांवा घेती तात्काळीं ॥
आले गर्जत क्ष्मातळीं ॥ भ्यासुर बळी विक्राळ ॥३९॥
पाश खेटक गदापाणी ॥ धांवतां वसुंधरा दणाणी ॥
ओढा विदारा ऐशी वाणी ॥ बोलती कर्कश भयानक ॥४०॥
साकी-
पार्थिव हस्तीं शिवध्यानीं रत देखुनी सर्वहि भ्याले ॥
धीमंताहि बळी पळूं पहातीं म्हणती युक्ति न चाले ॥४१॥
भ्याले समजुन शिवपूजेतें गर्जें नाम भवाचें ॥
तेणे न चले बळ तें कांहीं लेशहि यमदूताचें ॥४२॥
पूजा सरतां आकळूं म्हणूनी तिष्ठतिच सन्निधानी ॥
जाणुन मुनि हें वर्म भवाच्या रतला अधिकचि ध्यानीं ॥४३॥
सवाई-
देखुनि दंग मुनींद्र अभंग ते जाति विहंग तसे यमधामा ॥
चार समस्त विचारकथीति कीं फार हटेंचि जपे शिवनामा ॥
पार्थिव चंड करीच अखंड भजे कलभंड तनू स्थिर भावी ॥
बोलुन यापरी ते नमिती करी यावरी चाकरी काय करावी ॥४४॥
आर्या-
परिसुन किंकरवचना घालाया यम जपूनि घाला हो ॥
महिषारुढ स्वागें होउनियां क्रुद्धसा निघाला हो ॥४५॥
संगे घेउन निजगण आला कावेरिच्या तटाकीं तो ॥
विषधर क्रोधें जैसा श्वसोच्छ्वासाहि अमित टाकीतो ॥४६॥
मुनिच्या कंठीं घाली पाश तदा आकळावया शमन ॥
शमन कराया त्याचे प्रार्थी मुनि तुष्टवून महेशमन ॥४७॥
ईशासहितहि पडतां पाश गळां मुनि भवास हाकारी ॥
धांव विभो करुणाकर दीनाचा म्हणविशी साहाकारी ॥४८॥
साकी-
दुर्धर अतिशय संकट पडलें काय तरि करुं आतां ॥
कृपाघना या समयीं तुजविण अन्य नसेचि त्राता ॥४९॥
पद-
शिव शिव सांब सदाशिव सांब ॥
हर हर धांव विभो ॥शिव शिव० ॥ध्रु०॥
कंठीं घालुन कृतांतपाश ॥ ओढितसे कीं नचि अवकाश ॥
करितां उपेक्षुनी निराश ॥ होईल नाश प्राणासी ॥१॥
अखिल जगाचा तूं यजमान ॥ तुजला दीनाचा अभिमान ॥
तरी बा न करितां अनुमान ॥ सोडवीं मान यमकरिंचि ॥शिव शिव० ॥२॥
रक्षिलें संकटिं बहुतांस ॥ म्हणुनी लागली मजला आस ॥
त्यजुनि मागें मनपवनांस ॥ विनवी दास घाल उडी ॥शिव शिव० ॥३॥५०॥
साकी-
करुणा ऐशी परिसुनि अंतरिं भोलानाथ निवाला ॥
लिंगापासून भव्य विकट तैं सायुध प्रगटहि झाला ॥५१॥
हास्यमुखें बहु रोषोत्कर्षें हाणुनि लत्ता काला ॥
महिष पाडितां दूत पळाले सर्वहि दाहि दिशांला ॥५२॥
मृकंडबाळा करुणाघन प्रभू स्नेहें हृदयीं धरित ॥
म्हणे बा वत्सा कृतांत निकरें श्रमलासी गा बहुत ॥५३॥
दिंडी-
सुप्रसन्न होऊनी शंभु भोळा ॥ चिरंजीव अक्षयी त्यास केला ॥
तदा ब्रह्मादि देव बद्धपाणी ॥ स्तवूनीया बोलती नम्र वाणी ॥५४॥
त्वांचि वर्षें षोडश नेम केला ॥ म्हणुनी यातें अंतकें घेरियेला ॥
नसे त्याचा अन्याय यांत कांहीं ॥ क्षमा करुनी तरि कृपा-दृष्टि पाहीं ॥५५॥
ओंवी-
ऐकतां सुरवाक्य शूलपाणी ॥ संतोषोनी वदे नीतिवाणी ॥
जे मद्भजनीं रत सदा प्राणी ॥ काळभीति तयां नसे ॥५६॥
षोडशाब्देंचि मद्गिरा सत्य ॥ परी जो काळ जाय मद्भजनांत ॥
तो न होय उणा मद्गणतींत ॥ वर्म निश्चित जाणिजे ॥५७॥
मग उठवूनि अंतकातें ॥ गेले सकळहि स्वस्थळातें ॥
कृष्णदस म्हणे निज जनातें ॥ रक्षी गौरीश यापरी ॥५८॥
या प्रकारें करुन त्या काळाचे हातून मार्कंडेयास सर्वेश्वरानें सोडविलें. माता, पिता, सोयरे धायरे कोणीही सोडविण्यास समर्थ झाले नाहींत. यासांठीं तुकोबा मनास बोध करितात.
अभंग-
नको नको मना गुंतूं मायाजाळीं ॥ काळ आला जवळीं ग्रासावया ॥१॥
तुका म्हणें तुला सोडवीना कोणी ॥ एका चक्रपाणी वांचोनियां ॥२॥
एका सर्वेश्वरावांचून दुसरा त्राता नाहीं यास्तव त्या प्रभूतें अनन्य शरण होऊन हेंच मागणें मागावें.
हेंचि दान दे गा देवा ॥ तुझा विसर न व्हावा ॥१॥
गुण गाईन० ॥ मंगलारती ॥ पुंडलीक वरदे हरि विठ्ठल ॥पार्व० हर० ॥जानकी० जय ० ॥