सेना न्हावी आख्यान - कीर्तन पूर्वरंगनिरुपण

कीर्तनासंबंधी ज्ञान संपादन करून, नंतर स्वार्थ वा परमार्थ संपादन व्हावा या उद्देशाने कीर्तन करून लोकांस ज्ञान सांगण्यासाठी कीर्तनकार आख्यान लावतात.

श्रीमन्महागणाधिपतये नमः ॥

स जयति इत्यादि नमनं ॥

पद-

त्यागुनि सर्वहि संग रे ॥ मना घ्याई श्रीरंग ॥ त्यागु० ॥ध्रु०॥

अज्ञानाभ्रें ज्ञानप्रकाश लोपला ॥ जेवीं लोहा जंग रे ॥ मना ध्याई श्री० ॥१॥

चैतन्य नटलें विश्व हें मिथ्या ॥ जेवीं तोयतरंग रे ॥मना ध्या० ॥२॥

कृष्णदास म्हणे पावेल निश्चयें ॥ भवभय सर्वहि भंग रे ॥मना० ॥३॥१॥

भजन-

भक्तजनां सांभाळी दयाळा ये रे वनमाळी ॥ये रे व० ॥

अभंग-

तरीच जन्मा यावें ॥ दास विठ्ठलाचें व्हावें ॥१॥

नाहीं तरी काय थोडीं ॥ श्वान सूकरें बापुडीं ॥२॥

जन्मा आलियाचें फळ ॥ अंगा लागों नेदीं मळ ॥३॥

तुका म्हणे जावें ॥ संतकीर्तनीं बरवें ॥४॥२॥

आदौ प्रथमारंभाचे ठायीं सत्पुरुषाची वाणी तुकोबा महाराज मुमुक्षुप्रभृति साधकांप्रत हितोपदेश करीत आहेत. बाप हो, परब्रह्म सच्चिदानंद गोपालकृष्ण यास शुद्ध, सात्विक, एकविध भक्तिपूर्वक अनन्य शरण होऊन त्याचा दास व्हावें तरच मनुष्याचे जन्मास यावें. पांडुरंगाचे दास न होतां जे प्राणी मनुष्यजन्मास आले ते नरपशूच जाणावे. यदर्थी बुधजनाचें वाक्य ॥

श्‍लोक-

येषां न विद्या न तपो न ज्ञानं दानं न शीलं न गुणो न धर्मः ॥

ते मर्त्यलोके भूवि भारभूता मनुष्यरुपेण मृगाश्चरंति ॥३॥

अर्थ-

ज्या पुरुषांचे ठायीं विद्या, तप, ज्ञान, दान, शील, गुण, धर्म इत्यादि लक्षणें नाहींत ते पुरुष केवळ पशूच. मनुष्यरुपानें पृथ्वीस भारभूत होऊन फिरतात असें जाणावें. यासाठीं तुकाराम म्हणतात॥

’तरीच जन्मा यावें ॥ दास विठ्ठलाचें व्हावें’ ॥१॥

याप्रकारें करुन नर न करील तर-नाहीं तर काय थोडीं ॥श्वान सूकरें बापुडीं ॥२॥

कुत्रीं, मांजरें डुकरें इत्यादि पृथ्वीवर थोडीं आहेत काय ? त्यांतीलच तो मनुष्य जाणावा. ज्यांनीं ’पुनर्जन्म न विद्यते’ पुनः जन्मच नाहीं असें केलें तेच धन्य होत आणि तेच खरे जन्मास आले. त्यांचे विरहित जे मनुष्य ते वृद्ध गर्दभासमान जाणावे. याविषयीं राजा परीक्षितीप्रत शुकयोगींद्र सांगतात.

श्‍लोक-

त एव जाता लोकेषु प्राणिनो धन्यजीविनः ॥

ये पुनर्नेह जाताः स्युः शेषा जरठगदर्भाः ॥४॥

अर्थ-

या लोकाचे ठायीं तेच मनुष्य जन्मास आले, तेच प्राणी धन्य होत, कीं जे पुनः जन्मास न आले. म्हणजे ज्यांनीं जन्ममृत्यूच्या घिरटया चुकविल्या तेच कृतकृत्य व धन्य होत. बाकी अवशिष्ट ते वृद्ध गर्दभासमान होत. यास्तव तुकोबा महाराज म्हणतात. ॥’तरीच जन्मा यावें ॥ दास विठ्ठलाचें व्हावें । जन्मास मूळ कारण पातक होय. साधु म्हणतात.

अभंग-

जन्म घडे तरी पातकाचे मुळें ॥ संचिताचें फळ आपुलिया ॥१॥

संचितानुरुप पापाचे योगानें प्राण्यास जन्म होतो. ’पुनः करोति पापनि’ पुनः पाप करुन मृत्यु पावून आणीक जन्मास येतो. शंकराचार्य म्हणतात.

चर्पटपंजरी - पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनं ॥

इह संसारे भवदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे ॥

भज गोविंदं भज गोविंदं भज गोपालं मूढमते ॥५॥

पुनः जन्मास यावें, पुनः मरावें, पुनः मातेच्या उदरीं यावें, त्या उदरांत किती अडचण व किती दुःख आहे तें काय सांगावें ? जननीच्या विटाळाचें रक्त, त्यांत पित्याचे रेताचा बिंदु, एक समयांत संयोग झाला म्हणजे दोहींचा मिलाफ होऊन घट्ट होतो, आणि दिवसेंदिवस वृद्धि पावतो. प्रथम महिन्यांत त्यास अवयव प्राप्त होतात. तिसरे महिन्यांत नख लोमादिक प्राप्त होतात. पांचवे महिन्यांत चलनवलन होऊन क्षुधा लागते. सातवे महिन्यांत मातेस डोहाळे होतात. ती कडु, तिक्ष्ण आंबट पदार्थ सेवन करिते, त्याचे तीक्ष्ण रस त्या गर्भास झोंबतात.

ओंवी-

गर्भ उदरीं जंव हाले ॥ तंव मातेसी होती डोहाळे ॥

कडु आम्ल तीक्ष्णें अंग पोळे ॥ तया बालकाचें ॥६॥

नवमास पूर्ण झाले म्हणजे उदरांतील कारागृह दुःखानें त्रास पावून त्यांतून मुक्त होण्याचे इच्छेनें जगदीश्वरास अनन्य शरण होऊन म्हणतो.

कटाव-

सोहं सोहं हा निजध्यास ॥ वैराग्याचा बहु हव्यास ॥

मनास घेउन ॥ वनास जाईन ॥ ताप साहिन ॥

क्षुधेस खाइन ॥ तृषेस लाविन ॥ आपुल्या वाटे ॥

झाडिन वासनेचे कांटे ॥ तोडिन सर्वहि कर्मकचाटें ॥

हरिनामाचें घेईन पेटें ॥ उतरुन भवनदि जाइन नेटें ॥

इत्यादि प्रकारें प्रभूजवळ कबूल करुन प्राणी काकुलतीस येतो. त्या समयीं करुणाघन दीनवत्सल प्रभू त्या प्राण्यास बाहेर येण्याचा मार्ग दाखवून उदरांतून मुक्त करितो. उपरांत प्रभू त्या प्राण्यास म्हणतो कीं, त्वां जें जें कबूल केलेंस त्याचें स्मरण आहे का ? तेव्हां प्राण्यास बाहेरचा वारा लागून भगवंताजवळ तात्काळ नाकबूल होतो. लागलाच कोऽहं कोऽहं म्हणूं लागतो. या प्रकारें गर्भवासांतील यातना आणि जन्मकाळीचें दुःख भोगून पुढें संसाराब्धींत निमग्न होतो. वामनपंडित म्हणतात.

श्लोक-

आला आला प्राणि जन्मासि आला ॥

झाला झाला वाढला थोर झाला ॥

केला केला व्याप तो सर्व केला ॥

गेला गेला बापुडा व्यर्थ गेला ॥८॥

शंकराचार्य म्हणतात,

चर्पटपंजरी- बालस्तावत् क्रीडासक्तस्तरुणस्तावत्तरुणीरक्तः ॥

वृद्धस्तावञ्चिंतामग्नः परे ब्रह्माणि कोऽपि न लग्नः ॥

भज गोविंदं भज गोविंदं भज गोपालं मूढमते ॥९॥

याप्रकारें बालत्व, तारुण्य व वृद्धत्व अशा तिन्ही अवस्था व्यर्थ जाऊन मृत्यु पावतो. मरणकाळीचें तरी दुःख आणि यातना थोडया आहेत काय ? नानाव्याधींनीं ग्रस्त केलें असतांही अनेक प्रकारच्या प्रापंचिक चिंता वाहतो. मरणोन्मुख समयीं देहादिकाचें भान विसरतो. तथापि क्लेश चुकत नाहींत एतदर्थी ॥

कटाव-

तंद्री लागून गरगर नयना ॥ फिरवी रगडित करकर दशना ॥

टरटर उकले वांकुडि रसना ॥ घरघर कंठी वक्री वदना ॥

गात्रें वितंड कांपति थरथरा ॥ दंडधराचे प्रचंड किंकर ॥

दडदड येती उदंद भरभर ॥ चंड भयानक गर्जति धरधर ॥

तडतड हाणिति दंडें दुर्धर ॥ चळचळ कांपे न चले गडबड ॥

फळफळ मूत्रा सांडी भळभळ ॥ खळखळ ढाळी अश्रु लडबड ॥

तळमळ डळमळ करीत बडबड ॥ चटचट अंतरीं मानी हळहळ ॥

यमभट बळकट पाशें कळकळ ॥ बांधुनि उर्मट ओढिती घळघळ ॥

काळ सन्मुखीं नेतां लटलट ॥ कर्म तयाचें अचाट पटपट ॥

चित्रगुप्त ते काढुनि खटपट ॥ तदनुसार तात्काळीं कीं ॥

घालिति जन्मा मृत्युलोकीं ॥तदनु० ॥१॥१०॥

या प्रकारें दुस्तर जन्ममरणाच्या घिरटया चुकविण्यास उपाय भागवतकार सांगतात.

श्लोक-

संसारसारमतिदुस्तरमुत्तितीर्षोर्नान्यः प्लवो भगवतः पुरुषोत्तमस्य ॥

लीलाकथारसनिषेवणमंतेरणं पुंसो भवेद्विविधतापदवार्दितस्य ॥११॥

समुद्र एतल्लक्षण हा संसार कसा आहे ? अति दुस्तर, तरुन जाण्यास अशक्य. तथापि उतरुन पैलपार जाण्यास युक्ति आहे. समुद्र तरण्यास नोका असतां पारंगत होतो. तशी या संसाराब्धींत नौका एक आहे. ती कोणती म्हणाल तर पुरुषोत्तम भगवान् जो त्याच्या लीला व त्याच्या ज्या कथा त्यांचें श्रवणपठणादि सेवन. जन्ममृत्यु द्विविध दुःखेंकरुन जो पीडित त्यातें या नौकेव्यतिरिक्त ’अन्यः प्लवः न ’ दुसरी नौकाच नाहीं. पांडुरंगाचें दास्यत्व करुन त्याच्या लीला सेवन कराव्या, तरच जन्मास यावें. म्हणून तुकोबा म्हणतात. ॥

अभंग-

तरीच जन्मा यावें ॥ दास विठ्ठलाचें व्हावें ॥

जन्म होण्याचें कारण साधु म्हणतात ॥

अभंग-

जन्म घडे तरी पातकांचे मुळें ॥ संचिताचें फळ आपुलीया ॥१॥

संचित, क्रियमाण, जें जें असेल तें तें भोगल्यावांचून सरणें नाहीं. वामन म्हणतात ॥

श्लोक-

कर्म तेंहि न चुके परमेष्ठी ॥ हिंडतांहि वलयांकित सृष्टी ॥

देश टाकुनि वनाप्रति जाणें ॥ कर्म त्याहुनि पुढें करि पेणें ॥१२॥

पहा पहा मोठमोठयांनाही कर्म चुकलें नाहीं. चंद्रमा एवढा समर्थ, अमृताचा अंश, ज्यास केवढे केवढे समर्थ आश्रय ! कवि म्हणतात ॥

श्लोक-

तातः क्षीरनिधिः स्वसा च कमला भ्राता च कल्पद्रुमः ।

सौजन्यं सहविष्णुना किमपरं मौलौ धृतः शंभुना ॥

इत्थं शीतकरस्तथाप्यनुदिनं क्षीणो हि संदृश्यते ॥

प्रायः प्राक्तनजन्मकर्म बलवत् कः किन्तु कर्तुं क्षमः ॥१३॥

संचित बलवत्तर होय. यास्तव त्याचें कोण मार्जन करील ? तसाच शंखही पहा, ज्यास मोठा आश्रय तथापि दारोदार हिंडतो. वामन म्हणतात.

श्लोक-

लक्ष्मी जयासि भगिनी जरि तात सिंधू ॥

श्रीकृष्ण शालक सखा आणि इंदु बंधु ॥

ऐसे असून जगिं शंख फिरे भिकारी ॥

प्रारब्धहीन असतां विधि कोण वारी ॥१॥

भर्तृहरी म्हणतात. इतरांची काय कथा सांगावी ? हरिहरांसही हें कर्म चुकलें नाहीं. एतदर्थीं

श्लोक-

ब्रह्मा येन कुलालवन्नियमितो ब्रह्मांडभांडोदरे ।

विष्णुर्येन दशावतारगहने क्षिप्तो महासंकटे ॥

रुद्रो येन कपालपाणिपुटके भिक्षाटने योजितः ।

सूर्यो भ्राम्यति नित्यमेव गगने तस्मै नमः कर्मणे ॥१५॥

धात्यानें त्या कर्मामुळें सृष्टिकर्म कुंभारासमान करावें. विष्णूनें दशावतार घिरटया घालाव्या. शंकरानें नरकपाल घेऊन भिक्षा मागावी. सूर्यानें अहोरात्र भ्रमण करावें. असें कर्म दुस्तर ! त्यातें नमस्कार असो. ॥

श्‍लोक-

हरिणापि हरेणापि ब्रह्मनापि सुरैरपि ॥

ललाटे लिखिता रेषा परिमाष्ठुं न शक्यते ॥१६॥

ललाटीं लिहिलेली रेषा हरिहरांच्यानेंही पुसवली जाणार नाहीं. वामन म्हणतात.

श्‍लोक-

विधात्याची रेषा कवण नर तो लेश नुरवी ॥

विधात्याची रेषा गुरु निज-कृपें लेश नुरवी ॥१७॥

द्वापाराचे अंतीं युधिष्ठिर राज्य करीत असतां एका ब्राह्मणाचे पांच पुत्र उपजतांच सटावून मृत झाले. तेव्हां तो ब्राह्मण अत्यंत दुःखित होत्साता श्रीकृष्णभक्त प्रियसखा जो अर्जुन त्याजपाशीं येऊन कर्मंकथा सांगूं लागला. सांप्रत माझी स्त्री सहाव्यानें प्रसूत होणार, यास्तव तूं साधु असून प्रतापवान आहेस, यास्तव बालकाचें रक्षण करावें. असें ऐकून पार्थानें रक्षणाविषयीं प्रतिज्ञा केली कीं, माझ्यानें रक्षण न होईल तर मी अग्निकुंडांत उडी टाकून प्राण देईन. याप्रमाणें प्रतिज्ञा करुन त्या ब्राह्मणाचे घरीं येऊन सर्व घरावर बाणांचा कोट करुन वायूचाही रिघाव आंत न व्हावा असा बंदोबस्त केला. आणि धनुष्यबाण घेऊन सूतिकाद्वारांत जागत असतांही ब्राह्मणास पुत्र झाला तो सटवाई येऊन ललाटरेषेप्रमाणें त्याचा प्राण नेती झाली. तेव्हां स्त्रीसहित तो ब्राह्मण दुःखाक्रांत होऊन अर्जुनाचा धिक्कार करिता झाला. तेव्हां अर्जुन विस्मित होत्साता आपले प्रतिज्ञेप्रमाणें अग्निकुंड सिद्ध करुन त्यांत उडी टाकण्यास सिद्ध झाला. श्रीकृष्णाचें स्मरण करुन उडी टाकावी तों कृष्ण धांवत येऊन त्याचा हस्त धरुन म्हणतात कीं, भवितव्यास उपाय नाहीं. ललाटीं लिहिल्याप्रमाणें निश्चयेंकरुन व्हावयाचेंच. त्वां व्यर्थ प्राण देऊं नये. अर्जुन म्हणतो, म्यां प्रतिज्ञा केली आहे. भगवान् म्हणतात, होणार तें झालेंच. परंतु तें मूल कोठें गेलें तें जर तुला पाहिजेच असेल तर मी दाखवितों. असें बोलून त्यास समागमें घेऊन क्षीरसागरीं गेले. तेथें त्या ब्राह्मणाचीं सहाही मुलें खेळत आहेत असें दाखविलें. तेव्हां तीं सर्व मुलें अर्जुनानें घेऊन ब्राह्मणास आणून दिलीं. तात्पर्य - ललाटींची रेषा कोणाच्यानें चुकत नाहीं. व हरिहरांच्यानेंही पुसवली जाणार नाहीं. साधु म्हणतात.

पद-

जें जें होणें जे जे काळीं , तें तें न चुके कदाकाळीं ॥

होणार्‍या प्रारब्धासीं ॥ लेशहि यत्‍न न चाले ॥

एके समयीं कोणी एक शिष्य व्यास गुरुजवळ येऊन पुसता झाला कीं, माझें मरण कधीं तें सांगा. व्यास म्हणतात, यमास जाऊन विचारुं. मग त्या शिष्यास घेऊन यमाकडे आले; आणि विचारिलें कीं, या शिष्यावर तुमची स्वारी कधीं होणार ? तो म्हणाला हें मृत्यूस विचारावें. मग त्यासही समागमें घेऊन तिघेही मृत्यूकडे गेले, आणि त्यास विचारतां तो म्हणतो कीं, हें पुढील सांगणें भविष्याकडे आहे. मग त्यासही घेऊन चौघे भविष्याकडे जाऊन त्यास प्रश्न करितात तों इतक्यांत शिष्य मरण पावला. हें पाहून व्यासांनीं आश्चर्य पावून भविष्यास विचारिलें. त्यानें सांगितलें कीं, याचें भविष्य असेंच होतें. व्यास, काल, मृत्यु, आणि भविष्य हीं एक ठिकाणीं शिष्यासह होतील तेव्हांच हा मरणार असें होतें. त्याप्रमाणें होतांच तो मरण पावला. सूत शौनकादिकांस सांगतात.

श्लोक-

यदा व्यासश्च दासश्च यमेन सह मृत्युना ॥

भवितव्यगृहं यांति तदा दासो मरिष्यति ॥

या प्रकारें ललाटीं लिहिलें असेल तदनुसार निःसंशय घडावयाचें, तें चुकविण्यास कोणी समर्थ नाहीं. तथापि उत्तम क्रिया असावी, तेणेंकरुन जन्म झालें तरी उत्तम प्रकारेम भगवद्भक्ति प्राप्त होते. कबीर म्हणतात.

दोहरा-

भक्तबीज पलटे नहीं जो जाय जुग अनंत ॥

ऊचा नीचा जन्म धरे अखर संतका संत ॥

तुकोबा म्हणतात. जन्म आला तरी चिंता नाहीं. हजारों वेळां जन्मास यावें, परंतु असें यावें ॥

तरीच जन्मा यावें ॥ दास विठ्ठलाचें व्हावें ॥

जे प्राणी नरकाहून मनुष्यजन्मास आले त्यांचीं चिन्हें कविजन सांगतात.

श्‍लोक-

कार्पण्यवृत्तिः स्वजनस्य निंदा दुःशीलता नीचजनेषु संगः ॥

अतीव रोषः कटुता च वाचि, नरस्य चिन्हंअ नरकागतस्य ॥१॥

अर्थ-

कृपणवृत्ति, स्वजनांची निंदा, दुराचरणी शील, नीचजनांचा संगप्रिय, अत्यंत क्रोध, ---अति कोपिष्टाची गोष्ट. कोणी एक एकांडया बारगीर करडा शिपाई होता. त्याचे घरासमोर कोणी वाणी रहात होता, तो प्रत्यहीं दुकानाचे ओटयावर बसून तोंड धूत असे. एके दिवशीं शिपाई आणि वाणी यांची तोंड धुण्याची वेळ एकत्र आली, व समोरासमोर बसले असतां वाण्यानें तोंड धुतांना सहज मिशा वर चढविल्या, तें शिपायानें पाहून त्यास मोठा राग येऊन म्हणतो, वाणगट मजवर मिशा चढवितो, यास ठार मारावें. पण त्यानें कदाचित्‌ मला मारिल्यास माझी स्त्री तो घेईल, असें मनांत आणून तरवारीनें अगोदर स्त्रीस मारिलें. नंतर वाण्यास जाऊन म्हणतो कीं, मजवर तूं मिशा चढविल्यास याजकरितां तुजला मीं मारितों. वाणी म्हणतो बाप्पा, माझ्या मिशा या पहा मीं खालीं केल्या. असें बोलून घरांत जाऊन दार लाविलें. शिपाई क्रोधाचे स्वाधीन होऊन स्त्रीस मारुन संकटांत पडला. तात्पर्य-नरकाहून आलेले. मनुष्यास अति क्रोध असतो. आणि त्याची वाणी कठोर असते, इत्यादि चिन्हें त्याचे ठायीं असतात. आतां स्वर्गाहून च्युत होऊन जे प्राणी या मृत्युलोकीं आले त्यांचीं लक्षणें.

श्लोक-

स्वर्गच्युतानामिह जीवलोके चत्वारि चिन्हानि वसंति तत्र ॥

दानप्रसंगो मधुरा च वाणी देवार्चनं ब्राह्मणभोजनं च ॥१९॥

अर्थ-

सर्वकाळ दानप्रसंग, वाणी मधुर आणि हितकारक; देव, ब्राह्मण, संत, गुरु यांचें अखंड अर्चन आणि नित्य ब्राह्मणसंतर्पण हीं चार लक्षणें साहजिक स्वर्गाहून च्युत झालेले जे प्राणी मनुष्यजन्मास आले त्यांचे ठायीं असतात. या प्रकारें उत्तम चिन्हें असावीं, तरच जन्मास यावें. म्हणून तुकोबा हेंच म्हणतात. ॥

’तरीच जन्मा यावें ॥ दास विठ्ठलाचें व्हावें ॥१॥

नाहीं तरी काय थोडीं ॥ श्वान सूकरें बापुडीं’ ॥२॥

पांडुरंगाची भक्ति ज्यास नाहीं तो नर पशुसमान होय. पशूच्या ठिकाणीं चार ज्ञानें असतात. आहार, निद्रा, मैथुन भय याप्रकारें त्या नरपशूचें ज्ञान जाणावें. अहर्निशीं विषयांचें चिंतन करणारा, त्यास वामान. पंडित म्हणतात.

श्लोक-

ईश्वरें तुज दिली नरकाया ॥ साधनें करिशि तूं नरका या ॥

सेविसी निशिदिनीं विषयांतें ॥ मानिसी न मनिं तूं विष यातें ॥२०॥

ज्या पुरुषांनीं विषवत्‌ विषय मानिले तेच जन्मास आले. मोरोपंडित म्हणतात.

आर्या-

विषयां विषसम मानी ज्ञानी संसार घोरतर वारी ॥

कामादिक षड्‌वैरी वधिले जेणें विरागतरवारीं ॥१॥

अर्थ-

ज्यानें घोरतर विषय विषतुल्य मानून वैराग्य एतल्लक्षण तरवारीनें षड्रिपु वधिले तोच धन्य व तोच ज्ञानी जाणावा. विषयवासना ही परम दुस्तर. याविषयीं मोरोपंत म्हणतात

केकावलि-

तुझ्या गुणकथा महा सुरभि त्यांत ही रासभी ।

शिरे विषयवासना जशि शुका अहीरास भी ॥

तशी न इतरांस भी इस सदंडही हा किती ।

तथापि बहु लाथडी मग अदंड भी हाकिती ॥१॥

या प्रकारें ही विषयवासना अति दुर्धर. इचा त्याग करुन पांडुरंगाचा दास आला तोच मनुष्य जन्मास आला.

अभंग-

तरीच जन्मा यावें ॥ दास विठ्ठलाचें व्हावें ॥१॥

पहा पहा तो सेना व्हावी जातीचा असून पांडुरंगाचा दास झाला. त्याच्या भक्तीस्तव त्याचें रुप धरुन त्याजवरील संकट दुर करण्यास्तव प्रभूनें यवन बादशहाची श्मश्रू केली, ती कथा कविजन निरुपण करितात.

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP