श्लोक-
वंदूनियां कृष्णपदांबुजातें ॥ गाईन मी भक्तकथामृतातें ॥
जें सेवितां प्रीति करुनि भावें ॥ जाती महा दोष ल्या स्वभावें ॥१॥
साकी-
गजपुरवासी भूप यवन जो नामें अकबर जाणा ॥
त्याचा सेवक कुशल नहावी नाम जयाचें सेना ॥२॥
त्याची वृत्ती वडिलोपार्जित नापिकपण तें पाहे ॥
सेवा करुन भूपाळाची सदनीं सुखरुप राहे ॥३॥
प्रपंच जाणुनी मिथ्या सर्वहि वागे उदास वृत्ती ॥
श्रीहरिपूजा नामस्मरणीं पूर्ण जयाची प्रीति ॥४॥
ओंवी-
चतुर्भुज मनोहर साजिरी ॥ कृष्णमूर्तिं स्थापूनि मंदिरीं ॥
सद्भावें त्रिकाळ पूजा करी ॥ प्रेम अंतरीं धरुनियां ॥५॥
गीता भागवत पुराण श्रवण ॥ अखंड हरीचें नामस्मरण ॥
प्रपंची अलिप्त वागे पूर्ण ॥ जळीं पद्मदळ ज्यापरी ॥६॥
दिंडी-
एक दिवशीं श्रीहरी पूजनातें ॥ गृहीं सेना बैसला स्वस्थचित्तें ॥
तनू मन तें वेधिलें कृष्णध्याना ॥ नाठवीची लेशही देहभाना ॥७॥
तदाकार जाहली पूर्ण वृत्ती ॥ मीतूंपण उडुनियां गेली भ्रांती ॥
असें होतां मध्यान्हीं सूर्य आला ॥ राजसेवे जावया उशिर झाला ॥८॥
साकी-
पादशहा तब कहे मिरधेको हजाम क्यौं नहि आया ॥
कैसी नौकरी करते मगरुर इतना देर लगाया ॥९॥
घुस्सा आकर एक ढालाइत वाके घरकुं पठाया
सो आ पूछत उस जोरुको हजाम कहां बे गय्या ॥१०॥
छंद-
ऐकतां असें वाक्य कामिनी ॥ वल्लभाप्रती सांगे येउनी ॥
नृपतिनें तुम्हालागिं न्यावया ॥ धाडिलें वदा उत्तरा तया ॥११॥
विघ्न पातलें कृष्णपूजनीं ॥ क्षोभला बहू म्हणुनियां मनीं ॥
कामिनी प्रती तेधवा म्हणे ॥ गृहिंच तो नसे म्हणुनि सांगणें ॥१२॥
ओंवी-
कांता वदे सेवका ॥ गृहीं नाहींत स्वामी ऐका ॥
तेणें येउनी नरनायका ॥ तसेंचि जाणा कथियेलें ॥१३॥
रायें पुनः दोन वेळ ॥ बोलावूं धाडिलें उतावेळ ॥
तितुकेंही परतवितां भूपाळ ॥ क्षोभला प्रबळ अंतरीं ॥१४॥
आर्या-
तों दायाद तयाचा सांगे नृपतीस जाउनी चुगली ॥
फुगली गोष्ट न साहे पोटीं ते मक्षिका जशी उगली ॥१५॥
कथि खळ सदनीं असतां नाहीं वदतो असत्य सेना तो ॥
पूजा करीत बसला कोणा अंतर्गृहीं दिसेना तो ॥१६॥
क्षत लक्षुनि काक जसा हर्षें घांवे त्वरेंचि उकराया ॥
सुजन-न्यून तसें खल कळवी द्याया तयासि अकराया ॥१७॥
साकी-
सुनकर बाच्छा हुकम करे तव अरबको अबि जावो ॥
हजाम मग्रुर हरामखोर है उसको बंध ले आवों ॥१८॥
श्लोक-
परिसुन नृप आज्ञा यापरी तीक्ष्णतेची ॥
अनुचर मग वेगें धांवले नष्ट तेची ॥
शमनगणचि जाणो पातले नेउं प्राणा ॥
हरिजन सदनातें घेरिलें तेविं जाणा ॥१९॥
छंद-
भक्तसंकटा जाणुनी हरी ॥ क्षण न लागतां काय तो करी ॥
धरुन रुप त्या सेनिया परी ॥ ठाकला त्वरें राजमंदिरीं ॥२०॥
श्लोक-
कांसे लेवुन चोळणा कशियला कांच्या वरी तांतडी ॥
पागोटें शिरिं घातलें जुनटसें अंगावरी घोंगडी ॥
पायीं घालुन वाहणा अडकवी कक्षेप्रती धोंकटी ॥
ऐसा नापिकवेष तो घरि हरी दासाचिये संकटीं ॥२१॥
आर्या-
भक्ताच्या गृहिंचें घे सर्वहि सामान धोकटीस हित ॥
नटुनी सेनाच तसा जाय करायासि देव दासहित ॥२२॥
साकी-
ब्रह्म शंकर वंदित ज्याकों गुणका अंत न सेसा ॥
सो बाच्छाको साम्ने खडा ठहरत करे कुरनीसा ॥२३॥
दिंडी-
होत देवाची भेटि नृपालागीं ॥ शांत झाला क्रोध तो जाण वेगीं ॥
बैसवूनी सन्मूख नृपाळातें ॥ करी स्वांगें श्रीहरी मुंडनातें ॥२४॥
कला कौशल्य चातुर्य हरी अंगीं ॥ सौख्य जीवीं वाटलें नृपालागीं ॥
राव बोले सेनिया गुणी होसी ॥ सर्वकाळीं राहणें मजपाशीं ॥२५॥
छंद-
श्रीहरी म्हणे निकट मी असें ॥ सततही परी ना तुम्हां दिसें ॥
कोंदलों असें सर्व अंतरीं ॥ नेणतीच हें कोणिही परी ॥२६॥
श्लोक-
मुंडूनियां शीर सुगंध तेला ॥ लावी नृपांगाप्रति शांततेला ॥
वाटींत ज्या तेल सुगंध होतें ॥ त्यामाजिं पाहे नृप कौतुकातें ॥२७॥
मुगुट शिरिं विराजे कुंडलें दिव्य कर्णीं ॥ तनु अति सुकुमारा साजिरी श्यामवर्णी ।
नयन कुमुदपत्रें पीत तें चीर कांसे ॥ कमलवदन तेजःपुंज तैं त्यास भासे ॥२८॥
दिंडी-
अशा रुपा देखिलें महीकांतें ॥ मनामाजीं तो करी विस्मयातें ॥
वरी दृष्टी करुनियां पुन्हां पाहे ॥ तंव तो सेना मर्दना करीत आहे ॥२९॥
वाटिमाजीं मागुती पाहतांची ॥ मूर्तिं देखे लोचनीं माधवाची ॥
प्रतिबिंब हें म्हणूं सेनियाचें ॥ तरी ऐसें ना दिसे रुप त्याचें ॥३०॥
ओंवी-
इंद्रियांसहित अंतःकरण ॥ झालें स्वरुपीं अत्यंत लीन ॥
नाठवे लेशही भूक ताहान ॥ देहभान हरपलें ॥३१॥
लोक म्हणती बादशहासी ॥ संचार झाला निश्चयेंसी ॥
मग म्हणती उठा स्नानासी ॥ अस्ताचलासि रवि गेला ॥३२॥
सेन्यातें नृप दीनोत्तरीं ॥ म्हणे संनिध बसें क्षणभरी ॥
तूं जाशील गृहातें जरी ॥ तरी मी देईन निजप्राणा ॥३३॥
छंद-
श्रीहरी म्हणे जाउनी घरीं ॥ याच पाउलीं येत सत्वरीं ॥
नृपतिनें तदा प्रीतिनें बहू ॥ होन दीधले त्या शतें नऊ ॥३४॥
धोंकटींत ते घालुनी हरी ॥ पावला त्वरें सेनिया घरीं ॥
वस्त्रभूषणें सर्व काढुनी ॥ जेथिंच्या तिथें देई ठेवुनी ॥३५॥
श्लोक-
खुंटीवरी ठेवुनि धोंकटीला ॥ झाला हरी गुप्तचि तद्घटीला ॥
कोणा परी तें नकळेची जाणा ॥ ऐसा बहू लाघवि देवराणा ॥३६॥
साकी-
इधर भया अहवाल सूनो तब होगय भूप दिवाना ॥
सब सब कह्यत सब लोकनके मुजकुं दिखावो सेना ॥३७॥
उसकि मुलाखत नै होवे तों जायेगी मेरि जान ॥
खाना पीना सब कुछ छोर लगगय वोही ध्यान ॥३८॥
ओंवी-
इकडे काय झाला वृत्तांत ॥ सेनिया घरीं पातले राजदूत ॥
त्यांहीं त्यास बद्ध करुनी त्वरित ॥ राजसभेसी चालविला ॥३९॥
तंव चोपदार येऊनि मार्गांत ॥ सेनिया केला तात्काळ मुक्त ॥
येरु धोंकटी घेऊन भीत भीत ॥ राजद्वारीं पातला ॥४०॥
म्हणे आजी प्राणांत असे ॥ म्हणूनी खळखळां रडतसे ॥
रायें त्यासी देखतांची सरिसें ॥ उभा ठाकला भेटावया ॥४१॥
दिंडी-
मनीं सेना भावीत जाण ऐसें ॥ भूप अंगें ताडना ठाकलासे ॥
ढळढळांची तो रडे म्हणूनीयां ॥ वारिं वारिं सांकडें देवराया ॥४२॥
साकी-
भूप कएह तुम अबी आयाथा चेहरा बनावनेकों ॥
नादर स्वरुपा तबहि दिखाया सो अब दिखाव मुजकों ॥४३॥
इतना कहकर बडे प्रेमसों उहके पाद लगय्या ॥
प्यालेमे फिर तेल डालकर उसके पास धरय्या ॥४४॥
उस्में वाच्छा देख लखी तो नै दिखता गिरिधारी ॥
हजाम माफक रुप दिखाया रोय लगे दिलजारी ॥४५॥
विस्मय पाकर हजाम अज कह्यत व्हां नै हम आया ॥
माफ करो तकसीर यही अब हमरी सूध यमाया ॥
सो तब कह्यत सबकों पूछो चेहरा बनवा तुमने ॥
दिलखुष होके तुमकों सों होन दिया है हमने ॥४७॥
ओंवी-
सेना चकित झाला पूर्ण ॥ धोंकटींत प्रत्यक्ष देखिले होन ॥
ते तात्काळ विप्रांस वांटून ॥ झाला सद्गद अंतरीं ॥४८॥
म्हणे भक्तसखा दीनवत्सल ॥ निजजना भिमानी तमालनील ॥
तेणें मज दीनास्तव हा खेळ ॥ केला कृपाळें निश्चयें ॥४९॥
पद-
गहिंवर दाटूनियां कंठीं ॥ म्हणे बापा जगजेठी ॥
नीच काम हें माझेसाठीं ॥ कां गा त्वां केलें ॥१॥
भूपति घेता माझा प्राण ॥ तरि मज नव्हता त्याचा शीण ॥
परि तूं कष्टलासी जाण ॥ दुःख हें बहुत ॥२॥
विधि हर लागती तुझे पायीं ॥ तो तूं घेऊन धोंकटि घाईं ॥
केली यवनाची बा डोई ॥ नवल हें मोठें ॥३॥
धन्य धन्य तो भूपति ॥ दर्शन दिधलें तयाप्रती ॥
मी तों अभागी निश्चितीं ॥ म्हणुनी मज त्यजिलें ॥४॥
ऐसें बोलुन वारंवार ॥ रडे आक्रोशें अनिवार ॥
तेव्हां प्रगटुनि मुरहर ॥ भेटतसे दासा ॥५॥५०॥
ओंवी-
सद्गदित होऊनी नृपती ॥ सेनियाचे पदीं लागे प्रीतीं ॥
म्हणे तुझ्या संगतीनें मजप्रती ॥ कृष्णदर्शन जाहलें बा ॥५१॥
मग तो अखंड लागला भजनीं ॥ सेना संतुष्ट जाहला मनीं ॥
कृष्ण दास प्रार्थी श्रोतयां लागुनीं ॥ परिसा चरित्र रसाळ हें ॥५२॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
या प्रकारें सेना न्हाव्यासारखे पांडुरंगाचे दास झाले तेच जन्मास आले.
श्लोक-
पूर्वींचा-त एव जाता लोकेषु प्राणिनो धन्यजीविनः ॥
ये पुनर्नेह जाताः स्युः शेषा जरठगर्दभाः ॥१॥
पांडुरंगास शरण जाऊन ’पुनर्जन्म न विद्यते’ असें ज्यानें केलें तोच जन्मास आला. यासाठीं तुकोबा म्हणतात. मूळ
अभंग-
तरीच जन्मा यावें ॥ दास विठ्ठलाचें व्हावें ॥
यास्तव साधूंच्या वचनानुसार वर्तणूक करुन प्रभूजवळ हेंच मागावें ॥
हेंचि दान देगा देवा ॥ तुझा विसर न व्हावा ॥
मंगलारति ॥ पुंडलीकवरदे हरिविठ्ठल ॥ पार्व० हर हर० ॥ सीताकांतस्म० जय०॥