यागाच्या पूर्वी अन्वाधान केलेल्या अग्नीचा नाश होईल तर
"अयाश्च०"
या मंत्राने पूर्वीप्रमाणे अग्नि उत्पन्न करून पुन्हा अन्वाधान करून
"भूर्भुवः स्वः"
असे उपस्थान करून सर्व प्रायश्चित्तहुति देऊन स्थालीपाक करावा. अन्वाधानानंतर प्रयाण प्राप्त होईल तर
"तुभ्यंत अंगिरस्तम"
या मंत्राने अग्नीला आज्याची आहुति देऊन सर्व प्रायश्चित्ताहुति देऊन अग्नीचा समारोप करून प्रयाण करावे. समारोप केलेल्या समिधेचा नाश झाला तर पुन्हा आधान करणे इष्ट आहे. कुंड सारवणे, वगैरे करून नष्टाग्नीच्या प्रायश्चित्ताचा व पुनराधानाचा संकल्प करून आधानाला सांगितलेली सामुग्री आणून अग्नीची प्रतिष्ठा करावी.
"अयश्चा०"
या मंत्राने स्रुवाज्यहुति व सर्व प्रायश्चित्ताहुति द्यावी. याप्रमाणे पुनराधान करावे. दुसर्याचा अग्नि आपला आहे या भ्रमाने त्याचे यजन केले असता अथवा आपल्या अग्नीच्या ठिकाणी दुसर्याने यजन केले असता
"पथिकृत्स्थालीपाक करिष्ये"
असा संकल्प करून चरु करावा, अथवा
"पथिकृत्स्थाने पूर्णाहुति होष्यामि"
असा संकल्प करून स्रुचिपात्रामध्ये बारा वेळ अथवा चार वेळ आज्य घेऊन
"अग्नये पथिकृते स्वाहा"
या मंत्राने आहुति द्यावी. विवाहानंतर अथवा आधानानंतर पौर्णिमेला स्थालीपाकाचा आरंभ करावा. प्रतिपदेचे दिवशी यागाचे अतिक्रमण होईल तर पुढे येणार्या पर्वतिथींचे ठिकाणी, चतुर्थ, नवमी, चतुर्दशी, द्वितीया, पंचमी व अष्टमी वर्ज करून करावा. या कालातिक्रमाबद्दल प्रायश्चित्त नको. अन्वाधानानंतर प्रतिपदेची इष्टि न केल्यास तृतीया, इत्यादि तिथींचे दिवशी सर्वप्रायश्चित्ताहुति देऊन पुन्हा अन्वाधान याग करावा. दुसरे पर्व प्राप्त होईल तर करावयाची राहिलेली इष्टि पथिकृत्स्थालीपाक अगोदर करून पर्वदिवशी करावी. तेव्हाही अतिक्रमण होईल तर दुसर्या प्रतिपदेचे दिवशी लुप्त झालेल्या इष्टीचे पादकृच्छ्र प्रायश्चित्त करून प्राप्तकाल याग करावा. पुढे येणार्या तिथीचे ठिकाणी दुसर्या यागाचाही लोप होईल तर त्या पर्वदिवशी पादकृच्छ्र व पथिकृत्स्थालीपाक करून दुसरा याग करावा. तेव्हाही अतिक्रम होईल तर प्रतिपदेचे दिवशी दोन यागांबद्दल अर्धकृच्छ्र करून प्राप्तयाग करावा. उक्त तिथीला अर्धकृच्छ्र व पथिकृत्स्थालीपाक अगोदर करून तिसरा याग न केला तर अग्निनाश होतो; याकरिता पुनराधान करावे. या पुनराधानाचे स्वरुप- सामुग्री संपादन केल्यानंतर
"अयाश्च०"
या मंत्राने स्तुवा पात्राने आज्याहुति द्यावी. असे अन्वाधान केलेल्या समिधेचा नाश झाला असता पूर्वी सांगितलेच आहे. पुनराधान हे विवाहहोमादि रूप आहे व पुनराधेयाहून भिन्न आहे. कुंडाच्या बाहेर पण छत्तीस अंगुळांच्या आत अग्नि पडेल तर
"इदंत एकं०"
या ऋचेने तो अग्नि कुंडात ठेवून सर्व प्रायश्चित्ताहुति द्यावी. पर्वदिवसी व्रतलोप होईल तर व्रतपति अग्नीला चरु अथवा पूर्णाहुति द्यावी. पर्वदिवशी दंपतीपकी कोणाला अश्रुपात होईल तर व्रतस्वामी अग्नीला चरु अथवा पूर्णाहुति द्यावी. पवित्राचा नाश होईल तर पवित्रस्वामी अग्नीला चरु अथवा पूर्णाहुति द्यावी. अन्वाधानेष्टीमध्ये चंद्रग्रहण आले असता
"अत्राह गो०"
या मंत्राने चंद्राला आज्याहुति देऊन
"नवो नवो०"
या मंत्राने उपस्थान करावे आणि इध्माधानादि याग करावा. सूर्यग्रहण आले असता
"उद्वयं०"
या मंत्राने सूर्याला आज्याहुति देऊन
"चित्र देवानां०"
या मंत्राने उपस्थान करावे. अन्वाधानानंतर स्वप्नामध्ये रेतोत्सर्ग होईल तर
"इमं मे वरुण०", तत्त्वायामि०"
या दोन मंत्रांनी वरुणाला दोन आज्याहुति देऊन रवीची पूजा करून
"पुनर्मामा०"
या सूर्यमंत्राचा जप करावा. बुद्धिपूर्वक रेतोत्सर्ग होईल तर व्रतपति अग्नीला चरु द्यावा. इतर प्रसंगी स्वप्नात रेतोत्सर्ग होईल तर सूर्याला तीन नमस्कार करावे. इध्माधानानंतर हविर्दोष उत्पन्न झाल्यास दोषस्थानी आज्याचा प्रतिनिधि करून याग समाप्त केल्यावर दोषयुक्त हविर्द्रव्य जलामध्ये टाकावे आणि अन्वाधानापासून त्याच देवतेच्या उद्देशाने पुन्हा याग करावा. इध्माधानापूर्वी हविर्दोष उत्पन्न होईल तर त्या देवतेचा हवि पुन्हा आणून याग करावा. स्विष्टकृताच्या हविर्द्रव्याला दोष होईल तर आज्याने स्विष्टक्रुत करावे. अंगभंग हविर्द्रव्याला दोष उत्पन्न होईल तर पुन्हा आज्य घ्यावे.