श्रीगणेशाय नमः ।
जय लीलाविग्रही पुरुषोत्तमा । सगुण मेघश्यामा ।
श्रीजगद्गुरु आत्मायारामा । नेणवेचि महिमा पैं तुझां ॥१॥
तुवां भानुदास वंशीं साचार । प्रतिष्ठानीं घेतला अवतार ।
प्रगट करोनि नाना चरित्र । खळांसि चमत्कार दाविला ॥२॥
आपणचि होऊनि देवभक्त । नाममहिमा वाढविला अद्भुत ।
द्वेषें अथवा निज भावार्थे । उद्धरिले बहुत जड जीव ॥३॥
तुझी अनुपम लीला निश्चिती । न वर्णवेचि वैकुंठपती ।
जेथें शेषाच्या जीवाचि रती । तेथें मी किती मशक ॥४॥
जैसी तैसीं आरुष उत्तरें । वदोनि ग्रंथीं लिहितो अक्षरें ।
हीं अंगीकारावीं करुणाकरें । निज कृपावरें आपुल्या ॥५॥
मी माझे वक्तृत्व म्हणतों आता । हाही अपराध पंढरीनाथा ।
बुद्धीचा चालक तूं तत्त्वतां । नसेचि सत्ता आणिकाची ॥६॥
किंचित चित्त होतां व्यग्र । तेव्हां न मिळेचि एक अक्षर ।
तूं आठवण देतोसि वारंवार । यास्तव विस्तार ग्रंथासी ॥७॥
मजवरी निमित्त देवोनि श्रीपती । तूं आपली प्रख्यात करिवतोसि कीर्ती ।
ऐसा निश्चय बाणला चित्तीं । अन्यथा मति हे नसे ॥८॥
सकल वक्तयां माजी देख । मी नेणता असें एक ।
ऐसें जाणती सकळ लोक । तूं करिसी कौतुक पांडुरंगा ॥९॥
तान्हें बालक बोबडया वचनीं । बोलतां कौतुक मानित जननी ।
तैशाच रीतीं कैवल्यदानी । मज आश्वासुनी गौरवावें ॥११०॥
मागिले अध्यायीं कथा अद्भुत । विद्याभिमानी हरीपंडित ।
श्रीनाथाचे पात्र काढित । तो सहस्त्रावत निघालीं ॥११॥
परमश्रमीं जाहला मग । धर्मे दाटलें सर्वांग ।
मग निरभिमानी होऊनि अंगें । घालीत साष्टांग नमस्कार ॥१२॥
नाथासि विनवी जोडोनि हात । म्हणे तुम्ही विष्णु अवतार साक्षात ।
जेथे असेल शुद्ध भावार्थ । भोजनासि तेथें जा स्वामी ॥१३॥
आणि तुम्ही आपुले स्वमतें करुनी । प्राकृत ग्रंथ वदला वाणी ।
तें वाचित जावे प्रतिदिनीं । म्हणोनि चरणीं लागला ॥१४॥
ऐसें बोलतां निज पुत्र । घरासि सत्वर पातले नाथ ।
दोघां वांचुनि तिसर्यासि निश्चित । चरित्र विदित हें नसे ॥१५॥
तों ब्राह्मणी जेविलीं निजमंदिरीं । मग उच्छिष्ट पात्रें सहस्त्रावरी ।
बांधोनि घेतसे आपुलें शिरीं । गंगातीरी मग आली ॥१६॥
ते स्थळीं लोक प्रतीष्ठानवासी । चरित्र निवेदन केलें त्यांसी ।
मग गंगाप्रवाही पत्रावळीसी । निज करेंसी सोडित ॥१७॥
भाविक भक्त जे त्याजकारणें । बहुत संतोष जाहला मनें ।
म्हणती आतां नाथाचें होईल पुराण । आणि ऐकावें कीर्तन धनवरीं ॥१८॥
ऐसें परस्परें लोक बोलत । मात प्रगटलीं नगरांत ।
हरि पंडित धरोनि भावार्थ । स्वयें पितृभक्त तो होय ॥१९॥
श्रीनाथमुखीचें पुराण । एकाग्र बैसोनि करीत श्रवण ।
बहुत मिळती भाविकजन । हरिकीर्तन ऐकावया ॥२०॥
जयजयकारें पिटोनि टाळी । आनंदली भक्त मंडळी ।
हरिबाचे नेत्रकमळीं । अश्रु तेवेळी येताती ॥२१॥
टाळ विणा मृदुंग घोषें । नादब्रह्माचि आलें मुसें ।
नाममहिमा वर्णिला विशेष । श्रवणेंचि मानस सुखावे ॥२२॥
हरि पंडित म्हणतसे मनीं । मागें चरित्रें जाहलीं पैठणीं ।
तेव्हां आज्ञान होतों बाळपणीं । परि कृपा स्वामींनीं आज केलीं ॥२३॥
श्रीनाथ ऐश्वर्य नेणोनि थोर । विद्याभिमानें भुललो फार ।
या जगद्गुरुसि टाकोनि साचार । काशीपुर वसविलें ॥२४॥
जैसा द्वापार युगीं अर्जुनभक्त । श्रीकृष्णासि सोयरा म्हणत ।
मग विश्वरुप दाखवितां त्यातें । चित्तीं भासत जगदात्मा ॥२५॥
हरिबासि तैसेंचि झालें तत्त्वतां । कीर्तनीं बैसत धरोनि आस्था ।
जाणोनि नाथाच्या मनोगता । सेवा स्वहितार्थ करीतसे ॥२६॥
आणिक चरित्रें रसाळ गहन । तीं सादर ऐका भाविकजन ।
गंगातीरीं एक कुग्राम जाण । ते स्थळीं ब्राह्मण एक होता ॥२७॥
ग्रामलेखक त्याची वृत्ती । दुर्बळ असे सर्वार्थी ।
पोटीं उदंड जाहली संतती । परी भक्षावया प्रती अन्न नाहीं ॥२८॥
शेवटीं कुमर जाहला देखा । तो तरी वेडा बागडा मुका ।
गावबा नाम ठेविती बायका । तरी चरित्र ऐका तयाचें ॥२९॥
तो दिवसेदिवस जाहला थोर । पोरांत खेळे निरंतर ।
आठा वर्षांत आला कुमर । परी स्पष्ट उत्तर बोलेना ॥३०॥
निदान जाणोनि पितयानें । तेव्हां व्रतबंध केला जाण ।
न म्हणे केशव नारायण । गायत्री उच्चारण मग कैंचें ॥३१॥
म्हणती पूर्व प्राक्तन साचार । शेवटील मुका जाहला पुत्र ।
अन्न जेवितो पोटभर । परी एकही उत्तर न बोले ॥३२॥
पदरीं दुरिताच्या होत्या कोटी । यास्तव समंध उपजला पोटीं ।
यासि कोण पोशील शेवटीं । चिंता पोटीं मायबापां ॥३३॥
पूर्व पापाचेनि योगें देख । पोटीं पुत्र होतसे मूर्ख ।
त्याचेनि वडिलांसि कैंचे सुख । दुःखदायक तो येणें ॥३४॥
तो कोणे एके दिवसीं जाण । ब्राह्मणे घरीं केला सण ।
घरीं घालोनियां पुरण । पोट भरोन जेविला ॥३५॥
दुसरें दिवसीं तये वेळीं । गावजी मातेसी मागें पोळी ।
तिणें ठेविली होती शिळी । काहाडोनि तत्काळीं देतसे ॥३६॥
तेही रात्र लोटलीयावर । गावजी न खाय भाजी-भाकर ।
खुणावोनि दाखवीत करें । म्हणे पोळी सत्वर मज देयीं ॥३७॥
माता झाली क्रोधायमान । पुत्रासि स्वहस्तें करी ताडण ।
म्हणे करंटया पोटासि येऊन । खावयासि मिष्टान्न मागतोसी ॥३८॥
गावजी रडत लोळे धरणीं । मागुती उठला तये क्षणीं ।
मग मातेपासीं सत्वर जाउनी । पोळी खुणावोनी मागतसे ॥३९॥
जननीसि करुणा आली पाहे । म्हणे याच्या छंदास करुं काये ।
बाळासि हातीं धरोनि पाहे । पैठणासि लवलाहें ते आली ॥४०॥
जावोनि एकनाथाचें घरीं । सद्भावें स्वामीस नमस्कार करी ।
गावजीस घातलें पायांवरी । म्हणे यासि अंगिकारी दयाळा ॥४१॥
हा नव वर्षांचा झाला पाहे । तरी एकही शब्द बोलतां न ये ।
खावयासि मिष्टान्न मागताहे । कोणता उपाय करावा ॥४२॥
आम्ही दुर्बळ अनाथ ब्राह्मण । कुग्राम वस्तीसि राहतों जाण ।
येथें नित्य होतसे संतर्पण । मिष्टान्न ब्राह्मण जेविती ॥४३॥
तुझें दयाळुपण ऐकोनि श्रवणीं । येथें आलें यासि घेउनी ।
श्रीनाथ बोलती अमृतवाणी । असोंदे सदनीं आमुच्या ॥४४॥
मग गिरिजाबाईस एकनाथ । स्वमुखें तेव्हां आज्ञा करित ।
याचा प्रतिपाळ करावा नित्य । लोभ चित्तांत धरोनि ॥४५॥
श्रीनाथ आज्ञेनें निश्चिती । गावजांस उदक दिधलें स्नानाप्रती ।
पात्र वाढोनि प्रीतीं। भोजनाप्रती बैसविला ॥४६॥
गावजीची माता ते समयीं । परम संतोष मानित जीवीं ।
श्रीनाथ श्रीनासि पुसोनि लवलाही । मग आपुले गांवीं तें आली ॥४७॥
भ्रतारासि सांगतसे देखा । नाथासि निरवूनी आलें मुका ।
आतां आपण ममता टाकूनि ऐका । लोभ लटका न करावा ॥४८॥
त्याचे चांगलें जन्मांतर । यास्तव उत्तम लाधलें घर ।
ऐशापरी मातापितर । संतोष थोर मानिती ॥४९॥
इकडे गावजीस एकनाथें । वस्त्रें दिधलीं आपुल्या हातें ।
तो दोहीं सांज भोजन करित । आणि मुलांत खेळत सर्वदा ॥५०॥
मायबापांचा न होय आठव । ये स्थळीं रमला त्याचा जीव ।
मिष्टान्न मिळतसे अपूर्व । यास्तव अवयव पोसले ॥५१॥
तंव एके दिवसीं एकनाथ । एकांतीं बैसले देवघरांत ।
गावजीस बोलावूनियां तेथ । जप सांगत रामाचा ॥५२॥
परी तो मुका मूढ फार । वदनीं एकही नये अक्षर ।
मग एकनाथ बोलती उत्तर । नाम साचार काय आमचें ॥५३॥
तों तत्काळ तयासि फुटली वाणी । एकनाथ ऐसें बोले वचनीं ।
तोचि जप सांगती त्याजलागोनी । कृपे करोनी आपुल्या ॥५४॥
मग सुतळी आणोनियां फार । तयासि गांठी दीधल्या करें ।
म्हणती हाचि जप त्वां साचार । निरंतर करावा ॥५५॥
गावजीस भेटला सद्गुरुसखा । तैहूनि तयासि लागला चुटका ।
खेळ खेळूं विसरला देख । सप्रेम सुखा तो भोगी ॥५६॥
आणिक शब्द न बोलेचि कांहीं । मुकाचि असे सर्वांविषयीं ।
परी एकनाथाचा त्यासि पाहीं । छंद जीवीं लागलासे ॥५७॥
रसनाविषय होता फार । तोही जिंतिला साचार ।
अल्पचि सेवेनियां आहार । दिवस रात्र भजन करीं ॥५८॥
ऐसी देखोनि त्याची स्थिती । गांवींचे लोक आश्चर्य करिती ।
म्हणती नाथकृपा होतांच निश्चिती । पालटली वृत्ती पैं याची ॥५९॥
गावजीची मातापिता । एक वेल समाचारासि येतां ।
परी त्यांची न धरीच लोभ-ममता । न पाहे सर्वथा त्यांजकडे ॥६०॥
ऐसे दिवस लोटतां कांहीं । तों चरित्र वर्तलें ते समयीं ।
एकनाथ आपुले देवगृहीं । ध्यानस्थ पाहीं असती ॥६१॥
तों श्रीराम प्रगट होवोनि तेथें । नाथासि स्वहस्तें सावध करित ।
मन नेत्र उघडोनि जंव पाहत । तों जानकीकांत देखिला ॥६२॥
अष्टभावें वोसंडत । प्रेमें चरणीं मिठी घालित ।
हृदयीं आलिंगिला रघुनाथ । प्रेमभरित तेधवां ॥६३॥
मग आज्ञा करीत रघुनंदन । श्रीवाल्मीकिकृत रामायण ।
त्यावरी करी प्राकृत लेखन । स्वमुखें करुन आपुल्या ॥६४॥
ऐसें सांगतां आयोध्यापती । एकनाथ तयासि करी विनंती ।
सप्तकांड तुमची सत्कीर्ती । माझिये मतीं आकळेना ॥६५॥
तथापि शब्द बोलीलों आर्ष । तरी आयुषय अवधी थोडीच असे ।
कैसा ग्रंथ जाईल सिद्धीस । संशय चित्तास वाटतो ॥६६॥
यावरी बोले रघुनंदन । स्नान संध्या नित्य नेम जाण ।
तावन्मात्र अल्पचि करुन । ल्याहावें रामायण सर्वदा ॥६७॥
तुझा सद्भाव प्रेमा अद्भुत । तीं मज वचनें आवडती सत्य ।
यास्तव भावार्थ रामायण त्यातें । नाम त्वरित ठेवावें ॥६८॥
तुझ्या हृदयीं बैसोनि घननीळ । आठवण देईन सर्वकाळ ।
तुझिये स्वाधीन कळिकाळ । चिंत्ता अळुमाळ न करावी ॥६९॥
ऐसें म्हणताचि रघुनंदन । मग एकनाथें वंदिले चरण ।
म्हणे तुझी आज्ञा मज प्रमाण । जोडया विण आन नसे ॥७०॥
इतुकें सांगोनि आयोध्यापती । अंतर्धान पावलें सत्वरगती ।
कीं एकनाथाचें हृदयीं निश्चिती । धरिली वस्ती रामचंद्रे ॥७१॥
यावरी सुमुहूर्त पाहूनि भला । रामायणासि आरंभ केला ।
भक्त भाविक प्रेमळांला । आनंद वाटला चित्तांत ॥७२॥
जितुका ग्रंथ होतसे नित्य । तितुका प्रत्यही श्रवण करित ।
अमृताहोनि रस उपजत । ऐकतां विसरत देहभान ॥७३॥
वाल्मिकिकृत श्लोक ग्रंथीं । त्यावरीं महाराष्ट्र टीका लिहिती ।
ऐकतांचि श्रोते तन्मय चित्तीं । सप्रेम होती जड मूढ ॥७४॥
प्रथमारंभी बाळकांड निश्चित । तें समातें केलें एकनाथें ।
यावरी अयोध्याकांड आरंभित । तेही सिद्धितें पावविलें ॥७५॥
त्यावरी अरण्यकांड जाण । वनवासा गेले रघुनंदन ।
किष्किंधाकांड पूर्ण । ग्रंथ संपूर्ण तो झाला ॥७६॥
त्यावरी सुंदरकांड निश्चिती । हनुमंतें अद्भुत केली ख्याती ।
सीता शुद्धी आणोनि निश्चिती । मग गेले रघुपती लंकापुरा ॥७७॥
मग युद्धकांडासि प्रारंभ निश्चित । स्वये केला श्रीएकनाथें ।
त्याचे चव्वेचाळीस अध्याय समाप्त होत । तों प्रयाणसमय सन्निध ये तेव्हां ॥७८॥
म्हणे आमुचा प्रयाण समयो तत्वता । संनिध पातलासे आतां ।
ऐसें एकनाथें सांगतां । भाविकांसि चिंता उद्भवली ॥७९॥
म्हणे स्वामीं मुखें करोन जाण । संपूर्ण व्हावें रामायण ।
युद्धकांडाची समाप्ति पूर्ण । झाली अजून नसे कीं ॥८०॥
यावरी उत्तरकांड राहिलें समूळ । यास्तव वाटते हळहळ ।
तरी ग्रंथ सिद्धीसि नेऊनि समूळ । मग प्रयाणकाळ नेमावा ॥८१॥
ऐसी सद्भक्त करितां विनंती । मग तयांसि श्रीनाथ उत्तर देती ।
जे देहीं काळें नेमिली वस्ती । तरी ते निश्चिती चुकेना ॥८२॥
तंव श्रोते देती प्रति वचन । कृष्णदास लोल्या येतां शरण ।
त्याचें अकरा दिवस तुम्हीं चुकवोनि मरण । युद्धकांड संपूर्ण करविलें ॥८३॥
तैशाच रीती थांबवूनि काळा । ग्रंथ सिद्धीची दाखविजे सोहळा ।
स्वामींची ऐकोनि प्रेमकळा । संतोष सकळां होईल ॥८४॥
श्रीनाथ म्हणती ऐका वचन । काळासि शिक्षा करोनि जाण ।
आपुलें कवित्व सिद्धीसि नेणें । हें अश्लाघ्य वाणें दिसतसे ॥८५॥
युद्धकांडाची पूर्णता । आणि उत्तरकांड तत्त्वतां ।
गावजी सिद्धीसि नेईल आतां । यासि अन्यथा असेना ॥८६॥
ऐसी श्रीनाथाची वैखरी । वदतां लोकांस आश्चर्य अंतरीं ।
म्हणती गावजी तो मुका जन्मवरी । कोणासि उत्तर न बोले ॥८७॥
तो कैसा वदेल रामायण । हे असत्य वाटे आम्हांकारणें ।
श्रीनाथें गावजीस बोलावून । कृपादान मग करिती ॥८८॥
मस्तकीं हस्त ठेवोनि प्रीतीं । आपुली लेखणी तयासि देती ।
म्हणती आमुचे देहीं कवित्वस्फूर्ती । ते तुजप्रती असो कीं ॥८९॥
ऐसा होतांचि कृपावर । त्याचे बुद्धीसि तत्काळ झाला विस्तार ।
गावजीनें हातीं घेऊनि पत्र । ग्रंथीं अक्षरें लिहितसे ॥९०॥
जैसें श्रीनाथाच्या ओवीचें मांडणें । तैसेंचि असे त्याचें बोलणें ।
एक अध्याय सिद्ध होतांचि जाण । भाविक जन ऐकती ॥९१॥
म्हणती नाथकृपेनें तत्काळ । मुकाही जाहला वाचाळ ।
बोलणेही वाटे अति रसाळ । तरी ग्रंथही सकळ करील हा ॥९२॥
एकनाथाच्या देखतां जाण । एक अध्याय केला असे त्याणें ।
वरकड ग्रंथ मागून । सिद्धीसि संपूर्ण तो नेला ॥९३॥
असो फाल्गुन वद्य पंचमीचे रातीं । श्रीनाथें कीर्तन केलें निगुती ।
मग लोकांसि वाटूनि खिरापती । म्हणती आमुची विनंती एक ऐका ॥९४॥
उदईक आमुचें प्रयाण । तुम्हीं समस्तीं यावें करोनि स्नान ।
गंगेपर्यंत बोळवून । मग पुढती येणें मंदिरांत ॥९५॥
ऐसी श्रीनाथाची वदंती । ऐकोनि भाविक खेद करिती ।
म्हणती अवतार होतसे समाप्ती । यास्तव चित्तीं उद्विग्न ॥९६॥
दुसरे दिवशीं प्रातःकाळीं । वाडियांत मिळाली सर्व मंडळी ।
श्रीनाथ व्याकुळ तये वेळीं । पडिले तत्काळीं मूर्च्छित ॥९७॥
ऐसी अवस्था देखोनि जाण । भाविकांसि खेद उपजला मनें ।
आसुवें भरलें त्यांचें नयन । श्रीनाथवदन विलोकिती ॥९८॥
निंदक कुटिळ ते दुर्मती । ते दुरुत्तर काय बोलती ।
म्हणती चरित्रें दाखविलीं नानारीतीं । परी मरण गती तों सारखींच ॥९९॥
मागें चमत्कार दाखविले फार । परी आतां प्राणांत ओढवला थोर ।
शेवटीं लोकांच्या खांद्यावर । नाथाचें शरीर जाईल कीं ॥१००॥
ऐसी निंदकाची वदंती । ऐकोनि भाविकांस खेद चित्तीं ।
मग एकनाथाची चरित्र ख्याती । जीवीं आठविती आपुल्या ॥१॥
म्हणती जगदुद्धार व्हावया कारणे । यास्तव तुझा अवतार सगुण ।
लोकां ऐसें तुज मरण । नसावें म्हणून हेत वाटे ॥२॥
ऐसें भाविकांचें मनोगत । ऐकोनि श्रीनाथ सावध होत ।
जैसा निद्रिस्त उठोनि बैसत । तैसीच रीत ते झाली ॥३॥
ऐसें देखोनि ते वेळी । जयजयकारें पिटिली टाळी ।
विठ्ठलनामें गर्जना केलीं । भाविक मंडळी उल्हासे ॥४॥
मग उद्धवासि आज्ञा करीत नाथ । स्नानासि उदक आणी त्वरित ।
स्नान करोनि प्रयोगयुक्त । धौत वस्त्रें नेसत स्वहस्तें ॥५॥
मग आसनीं बैसोनियां आपण । द्वादश टिळे गोपीचंदन ।
लावोनि गळां तुळसीभूषण । निज प्रीतीनें घातलें ॥६॥
जनार्दनाचें नामस्मरण । तारकमंत्र उच्चारण ।
मनोमय करिती आपण । मग विठ्ठलस्मरणें गर्जती ॥७॥
स्कंधीं विणा घेवोनि नाथ । श्रीहरीचे गुण वर्णित ।
नमस्कारोनि पांडुरंगातें । रुप ध्यानांत धरियेलें ॥८॥
नामस्मरणें गर्जोनि वाणी । वाडियांतूनि निघती तये क्षणीं ।
लोक पूजिती प्रीती करोनि । धन्य अवनी पवित्र ते ॥९॥
बुका सुमनें तुळसीहार । पदोपदीं पूजा उपचार ।
करीत असती नारीनर । आरत्या प्रकार नानाविध ॥११०॥
श्रीनाथस्वरुप आणोनि ध्यानीं । आसुवें येती त्यांचे नयनीं ।
पुन्हां दर्शन दुर्लभ म्हणोनी । आले दुरोनी लोक फार ॥११॥
दिंडया पताकांचे भार । क्षणक्षणां होत नामोच्चार ।
मार्गी दाटी जाहलीसे फार । नादें अंबर कोंदलें ॥१२॥
गांवाबाहेर वाडेकोडें । मिरवत येती निज निवाडे ।
मनुष्य दाटी मागें पुढें । दर्शनासि वाट असेना ॥१३॥
गंगेमाजीं लक्ष्मीतीर्थ । ते स्थळीं आले मिरवत ।
तंव देव विमानी बैसोनि येत । पुष्पें वर्षत नाथावरी ॥१४॥
नीलोत्पल पुष्पें ते वेळीं । असंख्यात पडलीं असती भूतळीं ।
तीं जन देखती नेत्रकमळीं । मग हरिनामें टाळीं वाजविती ॥१५॥
धन्य ते समयीचें लोक । दृष्टीसी पाहती कौतुक ।
गुप्तरुपें वृंदारक । पाहती कौतुक नेत्रकमळीं ॥१६॥
असो गंगेच्या वाळवंटी येतां जाण । श्रीनाथ आज्ञा करिती जनां ।
आतां स्वस्थ करुनियां मना । श्रीहरिगुणा ऐकिजे ॥१७॥
ऐसें श्रीनाथाचें उत्तर । ऐकोन संतोष वाटला थोर ।
सकळ बैसती नारीनर । रुप समोर लक्षूनियां ॥१८॥
विठ्ठलनामें करोनि गर्जना । आरंभिलें हरिकीर्तना ।
अद्भुत वर्णिलें भक्तिमहिमाना । आणि स्मरणा प्रतिवादी ॥१९॥
कलियुगीं तरणोपाय कांहीं । नामाविरहित आणिक नाहीं ।
सर्वाभूतीं दया असों द्यावी । हें वचन जीवीं धरा सर्व ॥१२०॥
तुमच्या हितास्तव जाण । मृत्युलोकीं आम्हांसि येणें ।
येर्हवीं मायातीत परिपूर्ण । चैतन्यघन मी असें ॥२१॥
ऐसें श्रीनाथाचें कीर्तन । ऐकतां सज्जनीं केला प्रश्न ।
आणिक आतां पुढती अवतार घेणें । स्वामीकारणें घडेल ॥२२॥
ऐसी आस्था सकळाप्रती । तरी तो सांगिजे करुणामूर्ती ।
ऐकोनि श्रोतयांची श्रोक्ती । मग अभंग बोलती श्रीनाथ ॥२३॥
तो ग्रंथी लिहितों ये अवसरीं । सादर ऐकिजे भक्तचतुरीं ।
जीं प्रासादिक वचनें निर्धारीं । ऐकतांचि अंतरीं बोध होय ॥२४॥
अभंग ॥ जैं धर्माची वाट मोडे । अधर्माची सीग चढे ।
तैं आम्हां येणें घडे । संसार स्थिती ॥१॥
नाना मतें आणि पाखंडे । कर्मठता अति बंडें ।
त्याची ठेंचावीं तोंडें । हरि भजनें करुनियां ॥२॥
जें जें हरिलीला चरित्र । तें तें माझेंचि स्वतंत्र ।
देव भक्त एकत्र । भेद नाहीं दोघांतें ॥३॥
जो जो अवतार हरी धरी । तो तो मीच अवधारी ।
हरिनामें करितों गजरी । जगदुद्धारा कारणें ॥४॥
सर्वांभूतीं भगवद्भावो । हा भक्तीचा निज निर्वाहो ।
धर्माचा अनुग्रहो । वाढवावा यालागीं ॥५॥
सर्वाभूतीं दयाशांती। प्रतिपाळावी वेदोक्ती ।
हेंचि एक निश्चिती । करणें आम्हां लागतें ॥६॥
लीलाविग्रही भगवंत । तया म्हणती नित्य मुक्त ।
ते दावी काय तेथ । वेगळेंची असोपां ॥७॥
विश्वरुपीं सृष्टी । अर्जुना ते दावी दिठी ।
भिन्न भेदाची गोष्टी । बोलों नये सर्वदा ॥८॥
वत्साहरणीच चरित्र । वत्स गोवळे स्वतंत्र ।
पावे पायतन कटिसूत्र । आपणची जाहला ॥९॥
एकाजनार्दनी । विश्वरुप गोविंदमानी ।
भेद धरितो मनीं । निंद्याहुनी अति निंद्य ॥१०॥
ओव्या ॥ हा श्रीनाथाचा अभंग जाण । प्रयाण समयींचें प्रसाद वचन ।
उद्धवें हातीं पत्र घेऊन । ठेविला लेहून ते समयीं ॥२५॥
मग विठ्ठलनामें हरिगजर मेळीं । सकळा हातीं वाजविलीं टाळी ।
आरती बोलिले तयेवेळीं । तेचि सकळीं ऐकिजे ॥२६॥
आरती ॥ अवलोकितां जन दिसे जनार्दन । भिन्नभिन्न तेथें दावी अभिन्न ।
अनेक एकत्वें दिसे परिपूर्ण । ठकली मन बुद्धी तेथें कैंचे गुणागुण ॥१॥
जयदेव जयदेव जय जनार्दना । परमार्थे आरती अभिनव भावना ।
॥धृपद०॥ ज्योतीची ही ज्योती उजळोनीयां दीप्ती । तेणें तेजें केली सतेज आरती ।
पाहतां पाहतेंपण पाहावया स्थिती । नुरेचि वेगळेपण देहभान स्फूर्ती ॥२॥
उजळी ते उजळण उजळाया लागीं । वेगळेपण कैंचें नुरेचि ते भोगी ।
अंगें अर्पीलें अंगीचे अंगीं । जीव शीवपण गेलें हरपोनि वेगीं ॥३॥
पाठी ना पोटीं अवघा निघोट । सर्वांचा देखणा सर्वांवरिष्ठ ।
इष्ट न अनिष्ट गुप्त ना प्रकट । अहंसोहं सगत भरिला घोट ॥४॥
सर्वदा दिसे परी ना कळे मना । जें जें दिसे तें तें दर्शना जाणा ।
अभाव भावेंसीं गिळिली भावना । अभिनव आरती एका जनार्दना ॥५॥
ओव्या ॥ ऐसी आरती तये क्षणीं । श्रीनाथें स्वयें गायिली वदनीं ।
नामघोषें गर्जोनि वाणी । नमस्कार धरणीं घातला ॥२७॥
श्रीनाथें घालोनि दंडवत । लोकांसि विनवी जोडोनि हात ।
आतां कृपा असोंद्या समस्त । केला प्रणिपात मग पुन्हा ॥२८॥
ऐसी ऐकतांचि वाणी । सकळांसि अश्रुपात आले नयनीं ।
जयनाथ एकनाथ म्हणोनी । नमस्कार तें क्षणीं घालिती ॥२९॥
मग गंगेच्या जळीं एकनाथ । गेले निजांगें चालत ।
नाभिस्थानीं जों उदक लागत । उभे तेथ राहिले ॥१३०॥
गिरागजरीं हरिस्मरण । सर्वांमुखीं करविलें जाण ।
मग कुडींतूनि सोडिले प्राण । देव सुमनें वर्षती ॥३१॥
जितुके पाहावया आले लोक । तेही निजप्रेमें करिती शोक ।
मग देहासि अग्नि दीधला देख । जैसा लौकिक या रीतीं ॥३२॥
ऐसें नाथाचें निर्वाण । पाहोनि घरासि गेले जन ।
शोकें करोनि विव्हळ जाण । ते समयीं सर्वत्र जायले ॥३३॥
पुत्रासहित दुसरे दिवसीं । पातले राखसावडावयासी ।
तों दहनात उगवली कृष्ण तुळसी । आणि अश्वत्थरोपासी देखिलें ॥३४॥
कोंवळा लसलसित हिरवा पाला । देखोनि जनांसि आनंद झाला ।
म्हणती अश्वत्थरुपेंचि प्रगटला । श्रीनाथ अवतरला पुढती ॥३५॥
मग मध्यें अश्वत्थ राखोनि जाण । ते स्थळीं बांधलें वृंदावन ।
देउळीं श्रीनाथ पादुका स्थापून । अद्यापि स्थान जागृत असे ॥३६॥
नरनारी क्षेत्रवासी बहुत । ते स्थळीं सर्वदा सेवा करीत ।
तयांच्या मनींचे मनोरथ । पुरवीत श्रीनाथ कृपाळू ॥३७॥
जयाच्या चित्तीं जैसा भाव । तैसाचि होय देवाधिदेव ।
होतसे षष्ठीचा उत्सव । अति अपूर्व पैठणीं ॥३८॥
अश्वत्थरुपें श्रीएकनाथ । जनासि प्रत्यक्ष दर्शन देत ।
तेथें आणिक चमत्कार अद्भुत । तो ऐका निज भक्त भाविकहो ॥३९॥
भग्न होईल वृंदावन । यास्तव अश्वत्थ तितुकाचि लहान ।
श्रीनाथाचें लाघवपूर्ण । नेणवेंचि जाण ब्रह्मादिकां ॥१४०॥
धन्य ते लोक क्षेत्रवासी । सर्वदा दर्शन होतसे त्यांसी ।
पादुका दर्शनें पतितांसि । असंख्य जीवासी उद्धार ॥४१॥
श्रीनाथ निर्याण ऐकतां जाणा । त्यासि अंतसमयीं न होती यातना ।
तयासि तुष्टोनि वैकुंठराणा । आपुल्या स्थाना पाववी ॥४२॥
श्रीपांडुरंग आज्ञेनें साचार । ग्रंथीं लिहिलीं अरुष उत्तरें ।
येर्हवी संत चरित्राचा पार । मी नेणेंचि पामर मूढमती ॥४३॥
पुढिले अध्यायीं कथा सुगम । वैष्णव भक्त तुकाराम ।
त्याचें चरित्र अति निःसीम । श्रोतीं संपूर्ण ऐकिजे ॥४४॥
जो दीनदयाळ रुक्मिणीवर । अनाथ बंधु कृपासागर ।
तो महीपतीसि देऊनि अभयवर । सद्गुण चरित्र वदवीतसे ॥४५॥
स्वस्ति श्रीभक्तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।
प्रेमळ परिसोत भाविक भक्त । चोविसावा अध्याय रसाळ हा ॥१४६॥
अ० २४॥ओ० १४६॥ अभंग व आरती मिळून ॥१६॥ एवं संख्या ॥१६२॥