मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|भक्त लीलामृत|

भक्त लीलामृत - अध्याय ३६

महिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.


श्रीगणेशाय नमः ।

भवाब्धि तारावया कारणें । साधक करिती अनुष्ठान ।

मी निजभक्ताचे गुण वर्णिन । कांहींच नेणें या परते ॥१॥

एकी देह आशा सोडोनि स्पष्ट । हिमाचळाची धरिली वाट ।

मी तरी संतांचा होऊनि भाट । पवाडे स्पष्ट गातसें ॥२॥

कोणी बैसलें योगसाधनीं । कोणी भ्रमती तीर्थाटणी ।

मज संतांच्या चरित्रा वांचोनी । कांहींच मनीं नावडे ॥३॥

कोणी आर्जवें मेळवूनियां धन । योगयाग करिती नाना प्रयत्‍नें ।

म्यां हेंचि इच्छा धरिली मनें । करावें स्तवन भक्‍ताचें ॥४॥

कोणी सत्कर्मीं धरोनि प्रीती । पंच महायज्ञ नित्य करिती ।

कोणी अध्यात्म ग्रंथ पाहती । मग अर्थ आणिती ध्यानांत ॥५॥

कोणी करोनि प्राणायाम । सर्वां भूतीं पाहती सम ।

कोणी मानसपूजेचा धरोनि नेम । लाविलें प्रेम तें ठायीं ॥६॥

कोणी देहींच विदेहस्थित । कोणी बैसेल अरण्यांत ।

कोणी पढोनि अध्यात्म ग्रंथ । ज्ञान सांगत जनासी ॥७॥

कोणी करोनि सद्गुरु भक्ती । मग इच्छित सायुज्य मुक्ती ।

म्यां हेचि कामना धरिली चित्तीं । वर्णावी कीर्ति संतांची ॥८॥

याजविण कांहीं असेल हेवा । तरी अंतरसाक्ष तूं जाणासी देवा ।

केला पण तो सिद्धीसि न्यावा । आश्रम जीवां आमुच्या तूं ॥९॥

मागिल्या अध्यायी कथा सुंदर । तुकयासि छळिले रामेश्वरें ।

उदकांत वह्या बुडविल्या समग्र । त्या करुणाकरें रक्षिल्या ॥१०॥

सिद्धच्या शापें रामेश्वर । देह दुःख पावलें फार ।

धरणें घेतांचि ज्ञानेश्वरे । स्वप्नीं सविस्तर सांगीतलें ॥११॥

मग परम अनुताप धरोनि पोटीं । देहूसि चालिले उठाउठी ।

अर्धमार्गावरी येतांचि शेवटीं । झाल्या भेटी परस्परें ॥१२॥

पुढें आळंदीसि येऊनि तूका । दृष्टीसीं ज्ञानदेव पाहिला सखा ।

सत्कीर्ति कळतांचि सकळ लोकां । दर्शनासि देखा ते येती ॥१३॥

कोरडया वह्या उदकांत । देशोदेशीं प्रगटली मात ।

भाविक लोक दुरोनि येत । दर्शन घेत तुकयाचें ॥१४॥

मग ज्ञानदेवासि पुसोनि सत्वर । देहूसि येतसे वैष्णववीर ।

सवें षट्‌शास्त्री रामेश्वर । तो नव्हेचि दूर सर्वथा ॥१५॥

विद्यारुप कुळाभिमान । पुत्र-कांता संपत्ति धन ।

मान्यता प्रतिष्ठा सांडोन । धरिले चरण सद्गुरुचे ॥१६॥

हें अनगडशा बावासि वर्तमान । परस्परें कळळें जाण ।

कीं रामेश्वराचें शापमोचन । केलें तुकयानें निश्चित ॥१७॥

म्हणे आम्हांसि न येतांचि शरण । आरोग्य केलें तुकयानें ।

तरी आतां जाऊनि घ्यावें दर्शन । चमत्कार पाहणें तो कैसा ॥१८॥

ऐसें म्हणवोनि तो महंत । पुण्यातूनि निघाला त्वरित ।

मार्गीं चिंचवड ग्राम लागत । तेथें वसती भक्त गणपतीचे ॥१९॥

देवाचेंद्वारीं जावोनि सत्वर । भिक्षा आणा म्हणतसे फकीर ।

साहनक घेतली निजकरें थोर । म्हणे भरोनि सत्वर हे द्यावी ॥२०॥

त्यांचे कारभारी कोठी होते । ते शिधा आणूनि घालिती बहुत ।

परी साहनक न भरेंच निश्चित । मग विस्मितचित्त सकळांचें ॥२१॥

देवघरांत बैसले चिंतामणी । त्यांजवळ सांगती जाउनि ।

एक फकीर आलासे अंगणीं । साहनक घेउनी हातांत ॥२२॥

उदंड शिधा घातला त्यांत । परी ते न भरेचि किंचित ।

चिंतामणी तयांसि आज्ञा करित । विमुख अतीत दवडूं नका ॥२३॥

जितुकें धान्य असेल घरीं । तितुकें घाला त्याचें पात्रीं ।

ऐसी आज्ञा होताचि सत्वरी । काय कारभारी करिताती ॥२४॥

जितुकें साहित्य होतें घरीं । तितुकें घातले त्याचें पात्रीं ।

परी साह न भरे ते अवसरीं । मग पेवें सत्वरी काढिती ॥२५॥

खंडयाचखंडया वोतिल्या त्यांत । परी तें फकिराचे पात्रीं मात ।

चिंतामणीं देव बाहेर येत । मग सिद्धी करीत उभ्या तेथें ॥२६॥

त्यांनीं निजकरें भरिलें पात्र । मग तेथूनि निघत फकीर ।

देहुग्रामासि येऊनि सत्वर । प्रवेशे मंदिर तुकयाचें ॥२७॥

अवली स्वयंपाक करी मंदिरीं । तों फकीर बाहेर हांका मारी ।

माझें पात्र भरोनि सत्वरी । पीठ लवकरी आण माते ॥२८॥

अवली म्हणे ते अवसरीं । कोण मेला आला भिकारी ।

मग त्यांनीं पाठ घेतली बरी । धान्य तों घरीं असेना ॥२९॥

गंगा तान्ही कन्या जाण । तिनें पीठ घेतले मूठ भरोन ।

अवली हातासि झोंबतसे जाण । पाडिले त्यांतून पीठ कांहीं ॥३०॥

आधींच लेंकुराचा लहान हात । मातेनें हिरोनि घेतलें त्यांत ।

फकीर बाहेर उभा राहत । कौतुके पहात दृष्टीसी ॥३१॥

गंगा कन्या बाहेर येत । किंचित पीठ तयासि घालीत ।

पात्र भरोनि आलें वरते । अगडशा विस्मित मानसीं ॥३२॥

आपुली करामत दाखवीत पाहीं । ते न चलें तये ठायी ।

मग परम आश्चर्य करोनि जीवी । मुलीस लवलाही पुसतसे ॥३३॥

तुकोबा नांव तुझेचि कायी । ऐकोनि म्हणे गंगाबायी ।

वेडियासारिखें बोलसी पाहीं । विदित नाहीं तुजलागीं ॥३४॥

प्रातःस्नान करोनि तत्त्वतां । देउळीं बैसला माझा पिता ।

अनगडें ऐकोनि हे वार्ता । म्हणे दर्शन आतां घेऊ त्याचें ॥३५॥

अनगड होऊनि प्रेम भरित । घातलें साष्टांग दंडवत ।

दोन दिवस राहोनि तेथ । श्रवण करित हरिकथा ॥३७॥

कीर्तन होतां चारी प्रहर । तोंवरी तिष्ठे समोर ।

अनगडाचा सन्मान आदर । वैष्णववीर करीतसे ॥३८॥

तुकयाच्या ऐकोनि गोष्टी । फकीर संतोष पावला चित्तीं ।

तुकयासि पुसोनि आपुले मठीं । उठाउठी तो गेला ॥३९॥

नित्य देहूंत कीर्तन गजर । श्रवणासि यात्रा येतसे फार ।

तों एक परस्त्री सुंदर सुकुमार । कामातुर अंतरी ॥४०॥

कीर्तन होतांचि निश्चितीं । तुकयासि सांपडविले एकांती।

म्हणे माझ्या हेत उपजला चित्तीं । कीं तुम्हांसी रती करावी ॥४१॥

बहुत दिवस जपतां निश्चित । तों आजि फावला एकांत ।

ऐसें ऐकोनि विष्णुभक्त । थरथरां कांपत तेधवां ॥४२॥

जैसी रंभा देखोनि नयनीं । शुकयोगींद्र त्रासला मनीं ।

तैसेंच जाहलें तुकयालागोनी । बैसे उठोनी सत्वर ॥४३॥

मग दोन अभंग बोलोनि जाण । उपदेशिले तिजलागुन ।

परस्त्री मज मातेसमान । अन्यथा वचन हें नव्हे ॥४४॥

षड्‌वैरी जे कां असती देहीं । ते ठेविले विठोबाचे पायीं ।

महासिद्धि त्यजिल्या सर्वही । तेथें पाड काय प्रकृतीचा ॥४५॥

आतां सत्वर जाय वो माते । उगेच सायास करिशील व्यर्थ ।

ऐसें बोलोनि वैष्णवभक्त । जावोनि बैसत एकांतीं ॥४६॥

सप्रेम भावें भजन करी । तो उदयासि पातला तमारी ।

यात्रा मिळाली विष्णु मंदिरीं । जयजयकारी नामघोष ॥४७॥

तों लोहगांवकरी एके दिवसीं । तुकयासि आले न्यावयासी ।

बहुत प्रयत्‍नें प्रेमळासी । घेऊनि ग्रामासी ते गेले ॥४८॥

तुकयाच्या सवे वैष्णवजन । श्रेष्ठ निधडे असती कोण कोण ।

रामेश्वर पंडित थोर ब्राह्मण । जो न जाय परतोन गृहासी ॥४९॥

तुक्या धाकुटा सहोदर जाण । कान्होबा त्याचें नामाभिदान ।

गंगाजी मवाळ तिसरा ब्राह्मण । जो न जाय परतोन गृहासी ॥४९॥

तुक्या धाकुटा सहोदर जाण । कान्होबा त्याचें नामाभिदान ।

गंगाजी मवाळ तिसरा ब्राह्मण । कीर्तन गायन करुं लागे ॥५०॥

आणि संताजी तेली बहुत प्रेमळ । अभंग लिहित बैसे जवळ ।

धन्य त्याचें भाग्य सबळ । संग सर्वकाळ तुकयाचा ॥५१॥

हे प्रथम मुख्य चौघे असती । आणिकही पुढें बहुत मिळती ।

कीर्तनामाजी धृपद धरिती । सप्रेमगती करोनिया ॥५२॥

असो आतां प्रेमळ भक्त । लोहगांवा समीप जात ।

नगरवासी सामोरे येत । घालिती दंडवत सद्भावें ॥५३॥

तुकयाचें कीर्तन ज्याचें घरीं । परम उल्हास त्याचें अंतरीं ।

दिव्यान्नें करोनि नानापरी । ब्राह्मण मंदिरीं जेवविती ॥५४॥

ज्याची जैसी शक्ति जाणा । तैसी घालिती समाराधना ।

धनवंत घालोनि सहस्त्र भोजना । मग तुकयाच्या कीर्तना ते करिती ॥५५॥

गांवांत भाविक जाहले सकळ । परी एक शिवाजी कांसार महाखळ ।

तो निंदक कुटिळ कृपण केवळ । याहीवरी दुर्बळ संसारीं ॥५६॥

तुका सांगतेस सकळ जनां । शिवाजी कीर्तनीं बोलावूनि आणा ।

परी तो सर्वथा नयेचि जाणा । अपशब्द हेळणा करितसे ॥५७॥

तंव एक ब्रह्मस्वासाठीं ब्राह्मण । अळंकापुरीं बैसला धरणें ।

दहा सहस्त्र कर्ज त्याजकारणें । त्यजिलें अन्न यासाठी ॥५८॥

षण्मास लोटतां साचार । दृष्टांती सांगे ज्ञानेश्वर ।

तूं तुकयापासीं जाय सत्वर । तो ब्रह्मस्व सत्वर वारील तुझें ॥५९॥

मग तो धुंडित द्विजवर । लोहगांवासि आला सत्वर ।

तुकयासि बोले उत्तर । मज ज्ञानेश्वरें पाठविलें ॥६०॥

त्याचे मनींचा गुह्यार्थ । न सांगतां जाणे प्रेमळभक्त ।

मग गांविंच्या लोकांसि सांगत । देशावर यातें करुन द्या ॥६१॥

शिवाजी कांसारापासूनि जाणा । भीड खर्चोनि कांहीं जाण ।

न मोडवे तुकयाच्या वचना । गेले सदना तयाच्या ॥६२॥

परम बळात्कारें त्यानें । ढबू पैसे दीधले दोन ।

मग तुकयानें खडा उचलोन । त्यांजकारणें घासिला ॥६३॥

तंव ते सुवर्ण तत्काळ झाले । धरणे करीयाचे हातीं दीधले ।

तो म्हणे इतुके न वहिले । कर्ज फिटलें न जाय ॥६४॥

कांहीं तांबें असेल देकां । ऐसें बोलतां वैष्णव तुका ।

आश्चर्य वाटले गांविच्या लोकां । संसार सुखा भुलले जे ॥६५॥

मग गवाळ्यांतील उपकरण । तुकयासि दाखवित ब्राह्मण ।

सत्वर खडा लावोनि जाण । केलें कांचन तयाचे ॥६६॥

मग संतोष पावोनि अंतरीं । आळंदिस गेला धरणेकरी ।

तुकयानें खडा उचलोनि सत्वरी । बरवे माझारी टाकिला ॥६७॥

शिवाजी कांसावर अभक्तखळ । आश्चर्य करी तये वेळ ।

म्हणे परीस आहे तुकयाजवळ । म्हणोनि भक्तीस तत्काळ लागला ॥६८॥

म्हणो याचे सेवेसि लागोनि तत्त्वतां । दरिद्र विच्छिन्न करावें आतां ।

यास्तव ऐके कथावार्ता । परी चित्तीं आस्था आणिकची ॥६९॥

जैसे वृंदावन कडुवट अंतरी । परी मोहोर वाळुक दिसतें वरी ।

तैसा कामनिक अनुष्ठान तीव्र करी । परी फळाशेवरीं चित्त त्याचें ॥७०॥

एक संवत्सरापर्यंत जाण । त्याणें ऐकिले हरिकीर्तन ।

तो प्रसन्न जाहला रुक्मिणीरमण । तेही कारण अवधारा ॥७१॥

कथील आणावया मुंबईतें । छत्तीस बैल धाडिले होते ।

गुमास्ते खेप भरोनि येत । तों रुपें समस्त ते झालें ॥७२॥

ज्या जपासी खरीद केले होतें । परतोनि बैल पाठविले तेथें ।

सावकार आपला हिशोब पाहात । म्हणे आमुचे निश्चित हें नोहे ॥७३॥

तैसेच बैल भरिले पाही । परतोनि आणिले लोहगांवी ।

शिवजीस आश्चर्य वाटले जीवीं । मग तुकयासि लवलाही पुसतसे ॥७४॥

सद्गुरु म्हणती तये क्षणीं । तुझ्या दैवें आलें घडोनी ।

तुज पावले चक्रपाणी। तरी सत्कारणीं लावी कां ॥७५॥

बारवत्याने बांधिली थोर । तिजला म्हणती कांसार विहीर ।

अन्नदानें केली फार । दानें द्विजवर तोषविले ॥७६॥

तैपासोनि तो कांसार । चित्तीं विरक्‍त जाहला फार ।

त्यजिलें घरदार आणि संसार । निरंतर तुकयापासी ॥७७॥

तयाची पत्‍नी साचार । तुकयाचा द्वेष करितसे फार ।

म्हणे वेडा करोनि माझा भ्रतार । निरंतर बैसविला ॥७८॥

अहोरात्र कीर्तन करी । निजावयासी येऊं नेदी घरीं ।

तुकयासि मारावया निर्धारीं । उपाय अंतरी योजिला ॥७९॥

चार हंडे कढतपाणी । तावोनि तिने ठेविलें सदनी ।

घरी तुकयासि आडी घेउनी । कपटपाणी कळेना ॥८०॥

जोत्या खाली वैष्णववीर । तिने बैसविला पिढयावर ।

करुनि रिचविले कढत नीर । पोळले अंतर तुकयाचें ॥८१॥

मग म्हणे देवां धांवा देवाधिदेवा । माझ्या कायेसि लागला वणवा ।

एक अभंग बोलिले तेव्हां । तो आला विसावा भक्ताचा ॥८२॥

कढत पाणी होतें जळत । तेचि तुकयासि शीतळ लागत ।

स्नान जालिया फराळ घालित । परी सोमल आंत मेळविला ॥८३॥

निज भक्तासि सुखदुःखें होती । ती निजांगें सोशीत रुक्मिणीपती ।

तुकयाची तो विदेह स्थिती । विष त्याजप्रती बाधीना ॥८४॥

तेथूनि जातां प्रेमळभक्त । तिजवरी क्षोभला पंढरीनाथ ।

गळित कुष्ट जाहला त्वरित । प्राण होत कासाविस ॥८५॥

शिवाजी कांसार घरासि येतां । तों व्याकुळ पडली असे कांता ।

पुष्पहार मांडवासि घातला होता । ओळखे तत्त्वतां दृष्टीसीं ॥८६॥

म्हणे रात्रीं होतां कीर्तन गजर । तुकयाच्या गळां होता हार ।

इणें आणोनि वैष्णववीर । केला प्रकार छळणेचा ॥८७॥

मग रामेश्वर भट्टी सांगीतलें जाण । जेथें तुकयासि घातलें स्नान ।

तेथिंचा चिखल अंगासि लावणें । आरोग्य तेणें होईल ॥८८॥

सांगीतलें करिती धरोनि भाव । मग तीस सत्वर पावला देव ।

गळित कुष्ठ गेला सर्व । तेव्हां आराम जीव पावला ॥८९॥

त्या दिवसापासोनि पाही । तिचीही भक्ति जडली पायीं ।

कीर्तन ऐके सर्वदाही । द्वेष सर्वही टाकिला ॥९०॥

असो तुकयाचीं चरित्रें फार । बहुतांसि आले साक्षात्कार ।

वह्या बुडविल्या रामेश्वरें । त्या रुक्मिणीवरें रक्षिल्या ॥९१॥

ऐसी सत्कीर्ति ऐकोनि श्रवणीं । शिवाजी राजा विस्मित मनीं ।

म्हणे तुकयासि येथें बोलावूनी । कीर्तन कानीं ऐकावें ॥९२॥

मग छत्री घोडा कारकुन पाही । बोलावूं पाठवित लोहगांवीं ।

वैष्णवभक्तासि ते समयीं । निरोप सर्वही सांगीतला ॥९३॥

कीं तुमचे भेटीचा धरोनि हेत । राजा बहुत आर्तभूत ।

तेथवर येऊनि निश्चित । करावें सनाथ त्यालागीं ॥९४॥

ऐसा निरोप ऐकोनियां । परम अनुताप जाहला तुकया ।

म्हणे देवाधिदेवा पंढरीराया । गोंविसी कासया मज येथें ॥९५॥

दंभ मान चेष्ठा पूर्ण । हे तों सूकर विष्ठेसमान ।

तूं दयासागर चैतन्य घन । माझें सोडणें धाव आतां ॥९६॥

ऐशा रीतीं वैष्णवभक्त । चार अभंग लेहोन देत ।

कारकून परतोनिया जात । तुका बोलत काय त्यासी ॥९७॥

घोडा पाठविला आम्हांतें । याजवरी तुम्हीं बैसा त्वरित ।

तो म्हणे हा जहाल बहुत । बैसो न देत कोणासी ॥९८॥

ऐसी गोष्टी ऐकोनि त्याची । पाठ थापटिली अश्वाची ।

घोडा सौम्य जाहला तेव्हांची । लीला संताची अद्भुत ॥९९॥

कारकून सांगतां वर्तमान । राजा आश्चर्य करीत मनें ।

चार अभंग दीधले लेहोन । तेही वाचोन पाहिले ॥१००॥

निरपेक्ष देखोनि स्थिति । काय म्हणतसे भूपती ।

आपण तेथवर जाऊनि प्रीतीं । तुकोबासि निश्चितीं भेटावें ॥१॥

वस्त्रें भूषणें अळंकार । आणिक पूजा उपचार ।

मोहरा होन बरोबर । घेऊनि नृपवर निघाला ॥२॥

सवें प्रधान थोर थोर लोक । लोहगांवांत आले देख ।

तों तेथिंचे जन अवघे भाविक । सप्रेम सुख भोगिती ॥३॥

मथुरेंसि कृष्ण जन्मला पाहीं । परी गोकुळींच्या सुखास पार नाहीं ।

तैसा तुकयाचा प्रेमा सर्वही । लोहगांवीं लुटिला ॥४॥

रात्रीं ऐकती श्रीहरीलीला । दिवस उगवतां गोपाळ आला ।

पार नसेचि त्या सुखाला । प्रेम कळवळा जे ठायीं ॥५॥

असो शिवाजी नृपनाथ । तुकयाच्या भेटीसि आला त्वरीत ।

साष्टांग घातले दंडवत । प्रधानां समवेत तेधवां ॥६॥

बुका तुळसी सुमनहार । राजा वाहतसे आपुल्याकरें ।

सुवर्ण मुद्रा तबकभर । पुढें नृपवर ठेवितसे ॥७॥

तें राज्यद्रव्य देखोनि नयनी । तुकां कंटाळे तये क्षणीं ।

मग काय बोले प्रसादवाणी । ते सादर कर्णी ऐकिजे ॥८॥

कासया पाहीजे द्रव्य ठेवा । एक विठ्ठलचि आम्हां व्हावा ।

त्याजवांचोनि आमुच्या जीवां । आणिक हे वासनेची ॥९॥

तुमची बहुत ऐकिली कीर्ती । आज उदारत्व कळलें नृपती ।

आम्हां वैष्णवा नावडे चित्तीं । तें देसी प्रीतीं कासया ॥११०॥

जरी भास्कराच्या जावें भेटीं । तेथें कासया पाहिजे दिवटि ।

समुद्रावरि मेघ करितां वृष्टी । परी आर्तपोटीं त्या नाहीं ॥११॥

हिमाचळासि विंजणवारा । कासया पाहिजे नृपवरा ।

चंदनचर्चि जे रोहिणीवरा । तरी त्याच्या अंतरां आर्त नाहीं ॥१२॥

क्षीरसागरासि दुधाळ गाय । देतां संतोष वाटेल काय ।

कनकाद्रीसि कांचन वाहिलें पाहे । तरी संतुष्ट काय होईल तो ॥१३॥

तुवां भेटीसि आणिलें धन । हें आम्हां गोमांस समान ।

आतां तुमचें जेणें समाधान । तरी तेंही कारण सांगतों ॥१४॥

तुम्हीं कंठीं मिरवा तुळसी । व्रत करावें एकादशी ।

या विरहित धनवित्त देशी । तें मृत्तिका ऐसी मज भासे ॥१५॥

आमुचें चित्तीं इतुकीच आस । म्हणवा विठोबाचा दास ।

ऐकोनि तुकयाच्या वचनास । राजा संतोष पावला ॥१६॥

तुकयासि द्यावया आणिलें धन । तें ब्राह्मणांसि वांटी नृपनंदन ।

रात्रीं ऐकिलें हरिकीर्तन । प्रसादिक वचन तुकयाचें ॥१७॥

प्रथमारंभीं मंगळाचरणीं । हरिस्मरणें गर्जवी वाणी ।

टाळ विणे मृदंगध्वनी । नाद गगनीं कोंदला ॥१८॥

आवडीचेनि सुखें निश्चित । परमानंदें गात नाचत ।

टाळ्या चुटक्या वाजती बहुत । रंग अद्भुत वोडवला ॥१९॥

कीर्तन रंगीं हेचि वार्ता । विठ्ठल आमुची मातापिता ।

विठ्ठल बंधु सखा चुलता । त्याजविण ममता मज नाहीं ॥१२०॥

विठ्ठल मित्र सखा सज्जन । विठ्ठल माझें संपत्ति धन ।

विठ्ठल माझें गुप्त ठेवणें । जिवलग प्राणविसांवा ॥२१॥

विठ्ठल माझा एकांत जाण । विठ्ठल माझा लोकांत पूर्ण ।

विठ्ठलावांचोनि देखे न आन । तरी जातील फुटोन नेत्र माझे ॥२२॥

विठ्ठलावांचोनि आणिकाच्या स्तवना । करितां तत्काळ झडेल रसना ।

त्याजविण आणिक आवडे मना । तरी मानखंडना हो माझी ॥२३॥

पंढरीच्या मार्गी न चालतां पाहे । तरी तत्काळ पांगुळ होतील पाय ।

विठ्ठलापायीं अर्पिला देह । संसार सोय सांडिली ॥२४॥

विठ्ठलावांचोनि ब्रह्मज्ञानी । वायांच शब्द वेंचिती वाणी ।

तरी ते बोल संतसज्जनी । न ऐकावे कानीं सर्वथा ॥२५॥

श्रोतयांसि म्हणे ते अवसरा । नाशवंत संसार जाईल खरा ।

तुम्हीं विठोबाचें भजन करा । तरीच भवतरा बापानों ॥२६॥

ऐसें म्हणवोनी ते अवसरीं । नामघोषें गर्जना करी ।

गुप्तरुपें सुरवर अंबरीं । कौतुक नेत्रीं पाहताती ॥२७॥

विठ्ठल श्रोतावक्ता निश्चिती । म्हणवोनि सर्वत्र गाती ऐकती ।

ऐसें कीर्तन ऐकोनि भूपती । चित्तीं विरक्ती बाणली त्या ॥२८॥

म्हणे राज्य टाकोनि येच क्षणीं । वनांत बैसावें श्रीहरि भजनीं ।

मग नृपवर शिरस्त्र काढोनी । ठेवित धरणी तत्काळ ॥२९॥

अरुणोदय होतांचि निश्चिती । मग उजळिली मंगळारती ।

तुकयासि नमस्कार करोनि भूपती । अरण्यांत एकांतीं बैसला ॥१३०॥

मग सांगत प्रधानादिकां । मजजवळ सर्वथा येऊं नका ।

राजा विरक्‍त होऊनि देखा । सप्रेम सुखा तो भोगी ॥३१॥

दिवसां बैसोनि अरण्यांत । रात्रीं कीर्तनासि गांवांत येत ।

मग प्रधान साकल्य वृत्तांत । लेहोन पाठवित मातेसी ॥३२॥

जिजाबाई ऐकोनि तत्त्वतां । धाय मोकली सर्वां देखतां ।

तुकयानें राज्य बुडविलें आतां । उत्तम वार्ता हे नव्हे ॥३३॥

मग शिबिकेंत बैसोनि ते अवसरीं । लोहगांवासि येत सत्वरी ।

तुकयासि देखोनि धरणीवरी । नमस्कार करी साष्टांग ॥३४॥

मग पदर पसरोनियां जाण । अश्रुपातें भरले लोचन ।

म्हणे एक पुत्र तो तुझ्या कीर्तनें । विहेही होऊन बैसला ॥३५॥

त्याच्याही पोटीं नाहीं पुत्र । कोण चालवील राज्यभार ।

ऐकोनि जिजाईचें उत्तर । वैष्णववीर काय म्हणे ॥३६॥

शिवाजी येईल कीर्तनासी । मग चार गोष्टी सांगूं त्यासी ।

तुम्ही स्वस्थ राहावें मानसीं । विठोबासी भजावें ॥३७॥

ऐकोनि तुकयाचें वचन । जिजाबाई पुढती करी नमन ।

म्हणे मज देशील पुत्रदान । तरी होऊं उत्तीर्ण कैसेनी ॥३८॥

रात्रीं मांडितां हरिकीर्तन । श्रवणासि आला नृपनंदन ।

मग कर्मकांडींचें निरुपण । प्रसंग पाहून लावितसे ॥३९॥

म्हणे भवाब्धि तरावया कारणें । एक सत्कर्मचि प्रधान ।

ज्याचा स्वधर्म आचरावा त्यानें । उपाय आन असेना ॥१४०॥

दुसरियाचा धर्म उत्तम होय । म्हणवोनि आचरे लवलाहें ।

तरि तेणें न होयचि तरणोपाय । धर्मशास्त्रीं आहे निर्णय हा ॥४१॥

पाणी सांडोनियां मासा । तुपांत निघतां वांचेल कैसा ।

पक्षियांनीं सोडूनि आकाशा । बिळांत सहसा रिघों नये ॥४२॥

घुसी उंदीर धांवा आंत । बाहेर निघतां न वाचती सत्य ।

सर्प भक्षितां अन्नातें । तरी प्राणांत त्यातें तोच कीं ॥४३॥

तरुवरासि तों चालतां नये । उगवल्या ठायीं वाढताहे ।

तैसाचि मानव राहील काय । चंचल देह तयाचा ॥४४॥

आरबी घोडा असला जर । तरी तयासि वोढितां नये नांगर ।

शिपायी बैसला बैलावर । तरी युद्ध साचार नोहेच कीं ॥४५॥

नानापरीचीं दृष्टांत वचनें । बोलावयासि काय कारण ।

कीं आपुला स्वधर्म टाकिला ज्यानें । दुस्तर मरण तेंच कीं ॥४६॥

ईश्वरें सृष्टि निर्मूनियां । ज्याचें कर्म सांगीतले तया ।

उत्पत्ति सांगितले ब्रह्मया । पालन आपुलियाकडे लावी ॥४७॥

शेषानें उचलोनि धरावी धरणी । वसुकीनें हालो न द्यावी मेदिनी ।

समुद्रे पृथ्वीसि वेढा घालोनी । मर्यादा धरोनि असावें ॥४८॥

भास्करें तीव्र तपोनि थोर । प्रकाश पाडावा जनावर ।

शीतळत्वासि नेमिला चंद्र । वर्ते साचार त्या रीती ॥४९॥

शीत उष्ण पर्जन्यकाळ । आपुलाल्या समयीं होती प्रबळ ।

आयुष्य सरतांचि तत्काळ । दंडितसे काळ देहासी ॥१५०॥

हे ईश्वराची आज्ञा निश्चिती । नेमिल्या ऐसेंच अवघे वर्तती ।

श्रुतिवचन जे उल्लंघिती । ते तत्काळ जाती अधःपाता ॥५१॥

विप्राचें हे कर्म साचार । ब्रह्मचर्ये घोकावें अक्षर ।

गृहस्थाश्रम केलियावर । षट्‌कर्म विचार तयासि ॥५२॥

वानप्रस्थ तो जाणा साचार । विषय जिंतावे दिवसरात्र ।

संकल्प त्यागे संन्यास थोर । शास्त्रीं विचार बोलिला ॥५३॥

कुळधर्म याति नाठवे निःशेष । तोचि जाणावा परमहंस ।

हे श्रुतिवाक्य ब्राह्मणास । आज्ञा असे श्रीहरीची ॥५४॥

आतां क्षत्रियाचे आचरण । तेंही सांगतों करा श्रवण ।

शत्रूंसि संमुख जिंतोन । स्वधर्म पालन प्रजांचे ॥५५॥

जैसें आपुले अवयव पोशितां पाहे । विलासी परसुखी होय ।

कां कुटुंबवत्सला घरासि जाय । मग परिवार पाहे प्रीतीनें ॥५६॥

तशाच परी प्रजेच्या सुखें देख । राय चित्तीं मानी हरिख ।

त्याहूनि पुण्य नसेचि अधिक । सद्विवेक ज्या अंतरीं ॥५७॥

ईश्वर प्राप्तीस्तव जाण । क्षत्रियांनीं करावीं दानें ।

काया वाचा आणि मनें । न वंचणें सर्वथा ॥५८॥

मुख्य आदि करुनि द्विजवर । क्षत्रिय वैश्य चौथा शूद्र ।

आणिक नाना याति इतर । तिहीं स्वधर्मी तत्पर असावें ॥५९॥

समस्तां धरोनि चित्तांत । भूतीं पाहिजे भगवंत ।

न करावा कोणाचा घात । आणि भजनीं प्रीत असावी ॥१६०॥

आपुलाला करिती व्यापार । परी असत्य बोलों नये उत्तर ।

असत्यापरीस पाप थोर । नसे साचार दुसरें ॥६१॥

सर्वांभूतीं दया असावी पूर्ण । क्षुधार्तासि द्यावें अन्न ।

असत्य न बोलावें वचन । आणि हरिस्मरण सर्वदा ॥६२॥

ऐसी स्थिती धरोनि बरी । मग सुखें असावें संसारीं ।

कासया जावें वनांतरीं । घरींच श्रीहरी भेटे तया ॥६३॥

ऐसी तुकयाची उपदेशवाणी । सकळ श्रोते ऐकती श्रवणीं ।

राजा तटस्थ जाहला मनीं । अश्रुपात नयनीं वाहतीं ॥६४॥

मग हरिनामें गर्जोनि प्रीतीं । उजळिली मंगळारती ।

ओवाळूनि रुक्मिणीपती । दंडवत प्रीतीं घातलें ॥६५॥

सकळ श्रोतयांसि निश्चिती । प्रसाद वांटिला खिरापती ।

जाणोनि तुकयाची मनोवृत्ती । वस्त्रें भूपतीं घे तेव्हां ॥६६॥

मग शिवाजीराजयाची आजी । तुकोबाच्या लागतसे पायीं ।

म्हणे तुमचें उतरायी व्हावें कायी । तो पदार्थ कांहीं दिसेना ॥६७॥

आणिक चार दिवसपर्यंत जाण । तेथें राहिला नृपनंदन ।

तों आणिक चरित्र वर्तलें गहन । तें ऐका सज्जन भाविकहो ॥६८॥

एक नावजी माळी तये ठायीं । परम भाविक होता पाहीं ।

कीर्तन होतां एके समयीं । तुकयासि कायीं बोलतसे ॥६९॥

क्षणएक उभे राहतों आम्ही । तुम्हीं विसांवा घ्यावा स्वामी ।

मग प्रेमभरित होऊनि नामीं । मनोधर्मी नाचतसे ॥१७०॥

विठ्ठल नामाचे छंदें । नाचत तेव्हां परमानंदें ।

टाळ्या वाजवितसे आनंदें । वेधलें गोविंदें मन तेव्हां ॥७१॥

चार घटिकापर्यंत पूर्ण । कीर्तनीं नृत्य केलें त्याणें ।

स्वेद निथळत आंगातून । मग निःशक्‍त होऊन बैसला ॥७२॥

मग तुकाराम उठती कीर्तनीं । रंग वोडवे अनंतगुणी ।

नावजी माळी तेंपासुनी । दिवसां जाऊनी काय करी ॥७३॥

सूत कांतोनि गोवरीवर । पुष्पाच्या माळा करितसे फार ।

कीर्तनीं बैसती द्विजवर । तयांसि हार ते घाली ॥७४॥

नावजी कीर्तनासि येतसे जेव्हां । म्हणे आला आमुचा प्राणविसांवा ।

ऐसें बोलतां भक्त वैष्णवा । आश्चर्य तेव्हां लोक करिती ॥७५॥

सेवकानें चवाळें करोनि सत्वर । तुकयाचे हातीं देतसें पदर ।

पचंग घालोनियां सत्वर । वैष्णवासमोर नाचतसे ॥७६॥

द्वारकेचे केणें निश्चित । पंढरीरि आलें चोजवित ।

ऐसें अवघड नयेचि त्यातें । मग चोजवित म्हणत तेधवां ॥७७॥

ऐकोनि नावजीचें वचन । गदगदां हांसती सर्वत्र जन ।

नावजी अधिक संतोषमान । प्रेमें करोन नाचतसे ॥७८॥

तंव तेथील सुज्ञ होता ब्राह्मण । तो तळ्यांत गेला करावया स्नान ।

नावजीस फजीत केलें त्याणें । म्हणे अबद्ध वचन बोलसी तूं ॥७९॥

द्वारकेचें केणें चोदवित । पंढरीसि आलें म्हणसी नित्य ।

येणें दोषें अधोगत । होईल निश्चित तुजलागीं ॥१८०॥

ऐसें ऐकोनि ते अवसरीं । नावजी काढीतसे नाक दुरी ।

म्हणे आजपासोनि हें न करीं । दीधली बरी शिकवण ॥८१॥

ऐसा विकल्प घालोनि अंतरी । ब्राह्मण गेला आपुलें घरीं ।

तों त्याची वाचा खुंटली सत्वरी । कांहींच वैखरी न बोलवे ॥८२॥

जाहलें वर्तमान ते अवसरीं । लेहोनि दीधलें पाटीवरी ।

आश्चर्य करोनि रामेश्वरीं । तुकयासि सत्वरी सांगीतलें ॥८३॥

तो इतुकियांत एका कुणबीयानें । कोंवळें वाळुक आणिलें जाण ।

मनांत इच्छा धरिली त्याणें । कीं हें तुकयानें भक्षावें ॥८४॥

जाणोनि तयाचें अंतर । निजांगें चिरीत वैष्णववीर ।

चार फाक करोनि निजकरें । तीन सत्वर भक्षिल्या ॥८५॥

एक खालीं राहिली जाण । मग रामेश्वर भट बोलती वचन।

सर्वत्रांसि प्रसाद कांहीं देणें । मग काय म्हणे विष्णुदास ॥८६॥

हें तुम्हां योग्य नसेचि देख । यास्तव भक्षिलें सकळिक ।

वाचा गेली त्यासि अर्धं फांक । देतांचि कौतुक काय झालें ॥८७॥

तुकयाचा प्रसाद भक्षितां वदनीं । बोलों लागला तयेक्षणीं ।

राहिले फांकेचे भाग करोनि । सर्वां लागोनी दीधले ॥८८॥

मुखासि लावितां निश्चित । कुसमुसिती आंतच्या आंत ।

आड लपोनि थुंकोनि टाकित । कडू बहुत म्हणोनि ॥८९॥

असो रात्रीं कीर्तन मांडत । तों नावजी माळी आला तेथ ।

तुकयापासीं सांगीतली मात । कीर्तन निश्चित न करीं मी ॥९०॥

तुका तयासि बोले वचन । हें आम्हीच चुकलों होतों जाण ।

तुझें शुद्ध प्रेमाचें बोलणें । देवा कारणें आवडे ॥९१॥

ऐकोनि तुकयाची वाणी । नावजी हर्षला बहु मनीं ।

मग चार घटिका टाकोनि कीर्तनीं । प्रेमें करोनी नाचला ॥९२॥

असो चार दिवसपर्यंत । शिवाजी राजा राहिला तेथ ।

कीर्तनघोष श्रवण करित । प्रेमयुक्त नित्य काळीं ॥९३॥

स्वस्थाना जावया निश्चिती । आज्ञा मागावया येतसे भूपती ।

मनकामना धरोनि चित्तीं । प्रसाद इच्छिती काय तेव्हां ॥९४॥

आमुचें राज्य सुटेल जर । तरी स्वामी देतील आजि भाकर ।

पोटीं संतान असेल होणार । तरी देतील नारळ मजलागीं ॥९५॥

जाणोनि तयाचें मनोगत । भाकर नारळही तयासि देत ।

घालोनि साष्टांग दंडवत । निघे नृपनाथ ते समयीं ॥९६॥

कोंडभट पुराणीक सर्वकाळ । राहे तेव्हां तुकयाजवळ ।

आणि रामेश्वर पहिले होते खळ । भक्त प्रेमळ ते झाले ॥९७॥

हे उभयतां दोघे ब्राह्मण । वेदांतवक्ते असती पूर्ण ।

आणिक चौदा वैष्णवजन । संसार त्यजून राहिले ॥९८॥

कोणासि न पुसतां निश्चिती । तुकाराम ज्या गांवासि जाती ।

तिकडे अवघे धुंडीत येती । श्रवणीं निजप्रीती लावोनियां ॥९९॥

श्रीभक्तलीलामृत ग्रंथ सुंदर । हाचि क्षीराब्धिपूर्ण सागर ।

शेषशयनीं लक्ष्मीवर । ये स्थळीं निरंतर पहुडला ॥२००॥

सभाग्य श्रोते प्रेमळ निश्चिती । तेचि विबुध दर्शनासि येती।

संतचरित्रें सुधारस । नित्य सेविती प्रीतीनें ॥२०१॥

त्याच्या योगें करोनि निश्चित । जन्ममरणांपासूनि मुक्त ।

सर्वथा नाहीं पुनरावृत्त । सायुज्य भोगित पद जें कां ॥२॥

जो अनाथबंधु करुणाकर । भक्तवत्सल कृपासागर ।

तो महीपतीसि देऊनि अभय वर । वदवीत अक्षरें ग्रंथार्थी ॥३॥

स्वस्ति श्रीभक्तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।

प्रेमळ परिसोत भाविक भक्त । छत्तिसावा अ०गो०॥२०४ अ०॥३६॥ओ० ॥२०४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP