मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय सोळावा|

एकनाथी भागवत - श्लोक ७ व ८ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


ज्ञात्वा ज्ञातिवधं गह्यं अधर्मं राज्यहेतुकम् ।

ततो निवृत्तो हन्ताहं हतोऽयमिति लौकिकः ॥७॥

स तदा पुरुषव्याघ्रो युक्त्या मे प्रतिबोधितः ।

अभ्यभाषत मामेवं यथा त्वं रणमूर्धनि ॥८॥

केवळ राज्यलोभाकारणें । गुरुगोत्र पितृव्य वधणें ।

हें अतिनिंद्य मजकारणें । नाहीं झुंझणें प्राणांती ॥८॥

लौकिक धर्मप्रवृत्ती । मी मारिता हे मरती ।

हे महामोहाची भ्रांती । उपजली चित्तीं अर्जुना ॥९॥

राज्य भोगाचें धरोनि वर्म । ज्ञातिवधाचें निंद्य कर्म ।

हा केवळ मज अधर्म । धर्माचा स्वधर्म बुडेल ॥११०॥

ज्यांचें तीर्थ घ्यावें प्रतिदिनीं । जे पूजावे वरासनीं ।

ते खोंचूनि तिखट बाणीं । भोगावी अवनी स्वगोत्र रुधिरें ॥११॥

स्वगोत्र रुधिराचा पूर । पृथ्वीवरी वाहेल दुस्तर ।

तेणें आम्हीं होऊं राज्यधर । हें कर्म घोर न करवें मज ॥१२॥

कुळीं सुपुत्र वांछिले जिंही । बाण खोंचावे त्यांचे हृदयीं ।

यापरी पूर्वजांसी पाहीं । झालो उतराई मानावें ॥१३॥

ज्यांचे करावें श्राद्धतर्पण । त्यांचे बाणवरी घ्यावे प्राण ।

भलें पूर्वजां झालों उत्तीर्ण । आली नागवण निजधर्मा ॥१४॥

संमत श्लोक ॥ हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् ॥

युद्धीं निमालिया स्वर्गगती । जयो आलिया राज्यप्राप्ती ।

दोन्ही नश्वरें गा श्रीपती । कोणे हितार्थी झुंझावें ॥१५॥

ऐसेनि अनुतापें जाण । सांडूनिया धनुष्यबाण ।

शोकाकुलित अर्जुन । म्लानवदन रणरंगीं ॥१६॥

ते काळीं म्यांची जाण । तो महावीरपंचानन ।

नाना युक्तिं केलें समाधान । तेंही लक्षण अवधारी ॥१७॥

अर्जुना देह तितुका नश्वर । मळमूत्रांचे कोठार ।

करितां नाना उपचार । मरणतत्पर समीप ॥१८॥

जीव निज नित्य निर्मळ । अज अव्यय अचळ ।

अच्छेद्य अभेद्य अमळ । अचंचळ निजांगे ॥१९॥

अर्जुना ऐक साचें । तुझेनि प्रयत्‍नें न वांचे ।

जीव तुझेनि मारिला न वचे । पातक हत्येचें अहंभावे ॥१२०॥

हो कां त्वां असते केले । तरी तुझेनि जातें मारिलें ।

मी मारिता येणे बोले । तुजसि गोंविलें अभिमानें ॥२१॥

जो देहाचा निर्माणकर्ता । तोचि तयाचा संहर्ता ।

तूं करण्यामारण्या परता । व्यर्थ अहंता कां घेसी ॥२२॥

जरी हे अहंता तूं न सांडिशी । तरी सकळ हत्येचिया राशी ।

साचचि आल्या तुजपाशी । दोषी झालासी अर्जुना ॥२३॥

ऐक पां बापा पार्था । देहादि कर्मांची अहंता ।

जो घे आपुले माथां । तो दोषी सर्वथा तिहीं लोकीं ॥२४॥

हो कां स्वधर्मचि तूं पुसशी । तरी ऐक क्षत्रियाच्या क्षात्रधर्मासी ।

समरांगणीं पित्यापुत्रांसी । वधिता क्षत्रियासी दोष नाहीं ॥२५॥

युद्ध म्हणजे स्वधर्मतीर्थ । समरांगणीं निमे तो नित्यमुक्त ।

जें तुज निजभाग्यें प्राप्त । तें तूं अहित मानिसी ॥२६॥

कर्ता दोष अहंतेच्या माथां । ते जो नातळे देह‍अहंता ।

तोचि कर्म करूनि अकर्ता । भोगूनि अभोक्ता तोचि एक ॥२७॥

तोचि संगामाजीं निःसंग । अवघें जग तो एकला सांग ।

जो निरभिमानी अव्यंग । तो सौरा चांग समरंगीं ॥२८॥

अर्जुना अभिमान सांडितां । तूं माझी पावशी समसाम्यता ।

तेव्हां सकळ पापाची वार्ता । तुज सर्वथा स्पर्शेना ॥२९॥

म्हणशी केवीं जाय अहंता । तरी मज लक्षूनि तत्त्वतां ।

स्वधर्मकर्मातें आचरितां । चित्तशोधकता तेणें होय ॥३०॥

निर्मळत्व आलिया चित्ता । तो लागे माझिया भक्तिपंथा ।

भजनें माझिया समरसता । माझिया निजभक्तां तत्काळ ॥३१॥

अर्जुना सांडावया अभिमान । तूं नाइकसी माझें वचन ।

तरी जन्ममरणांचे भूषण । सकळ दोष जाण भोगासी ॥३२॥

तूं नित्यमुक्त अज अव्ययो । हा बुडेल तुझा सद्‍भावो ।

मग जन्ममरणांचा निर्वाहो । अविश्रम पहा हो भोगिसी ॥३३॥

यालागीं करणें न करणें दोन्ही । प्रकृतीचे माथां ठेवूनी ।

तूं कायावाचामनींहूनी । मजलागुनी शरण रिघें ॥३४॥

यापरी गा तत्त्वतां । मज सद्‍भावें शरण येतां ।

तुज सकळ कर्मांची वार्ता । मी सर्वथा शिवों नेदी ॥३५॥

यालागीं गा कोदंडपाणी । मरतें मारितें सांडूनि दोन्ही ।

सौरा होयीं रणांगणीं । मी तुजलागोनी उद्धरीन ॥३६॥

तूं एक येथें कर्म करिता । मी एक तूतें उद्धरिता ।

ऐसे भिन्नत्व गा पार्था । माझ्या शरणागता असेना ॥३७॥

मज अनंता शरण येणें । आणि जीवत्वें वेगळे उरणें ।

तें गुळदगडा ऐसें जिणें । अनन्यपणें नव्हे शरण ॥३८॥

सरिता सागरा शरण गेली । ते समुद्रचि होऊनि ठेली ।

पुढती परतावया मुकली । समरसिली सिंधुत्वें ॥३९॥

गंगा पावोनि सिंधुत्वासी । मागील यावा वंचीना तिसीं ।

तेवीं सबाह्य आत्मसमरसीं । शरण अहर्निशीं अखंडत्वें ॥१४०॥

दीप दावाग्नी भेटों गेला । तो तेव्हढाची होऊनि ठेला ।

तेवीं मजलागीं जो शरण आला । तो मीचि झाला अर्जुना ॥४१॥

पार्था परिस पा चिन्ह प्राप्ताचें । हें भूताकार मज अच्युताचें ।

ऐसें सद्‍भावें जो देखे साचें । त्यासी ब्रह्मसायुज्याचें साम्राज्य लाभे ॥४२॥

मज आत्मयाचे निजस्थितीं । संसार मुळीं मुख्य भ्रांती ।

तेथ मारिता मी हे मरती । कोणें हे युक्ती मानावी ॥४३॥

मृगजळ जेथें नसे । तेथें तव कोरडेंचि असे ।

मा जे ठायीं आभासे । तेथ तर्‍ही असे वोल्हांशु कायी ॥४४॥

तेवीं संसाराचे रूप नाम । ठेविती तेथें निखळ ब्रह्म ।

हाचि ज्याचा स्वभाव परम । तें चालतें ब्रह्म वर्ततां देहीं ॥४५॥

देहा जडत्वें न बाधी कर्म । आत्मा नातळे धर्माधर्म ।

हें ज्यासी कळलें वर्म । तें चालतें ब्रह्म वर्ततां देहीं ॥४६॥

देही वर्ततां तो विदेह । विदेह तेंच त्याचें देह ।

हें माझें परम गुह्य । अर्जुनासी पाहीं सांगितलें ॥४७॥

यापरी म्यां नानायुक्तीं । युद्धीं बोधिला सुभद्रापती ।

तेणेंही मज करोनि विनंती । पुशिल्या विभूती तुझ्याऐशा ॥४८॥

ज्या सांगितल्या अर्जुनासी । त्याचि मी सांगेन तुजपाशीं ।

ऐसें पुरस्करूनि उद्धवासी । निजविभूति त्यासी सांगत ॥४९॥

उद्धवा ज्या पुशिल्या विभूती । त्या माझ्या मज न गणवती ।

मी जगदात्मा त्रिजगतीं । संख्यासंस्थिती गणी कोण ॥१५०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP