धर्माणामस्मि सन्यासः क्षेमाणामबहिर्मतिः ।
गुह्यानां सूनृतं मौनं मिथुनानामजस्त्वहम् ॥२६॥
भूतां अभयदान उपक्रमू । सर्वां भूतीं मी आत्मारामू ।
हा संन्यासाचा मुख्य धर्मू । तो धर्म पुरुषोत्तमू स्वयें मी म्हणे ॥२१०॥
भूतांसी काया वाचा मनें । दुःख नेदूनि सुख देणें ।
या नांव संन्यासधर्म म्हणणें । तो धर्म मी म्हणे गोविंद ॥११॥
अंतरीं शुद्ध नाहीं बोध । दांत चावोनि साहतां द्वंद्व ।
ते क्षमा नोहे शुद्ध । ऐके विनोद क्षमेचा ॥१२॥
अंतरीं ठसावलें परब्रह्म । बाह्य सर्वा भूतीं जाहला सम ।
ते क्षमा मी म्हणे पुरुषोत्तम । द्वंद्वाराम बाधिना ॥१३॥
असत्य पापी सकळ सृष्टीं । असत्यांमाजीं पापकोटी ।
असत्याची खोटी गोठी । जो तो पोटीं सांडीना । ॥१४॥
उभय लौकिकीं खोटेपणें । असत्यबहिर्मुख नाणें ।
तें मनींहूनि जेणें सांडणें । तो म्यां श्रीकृष्ण वंदिजे ॥१५॥
ते गुह्यामाजीं अतिगुह्य जाण । सत्य वाचा कां मनींहूनि मौन ।
तें मी म्हणे मधुसूदन । सत्य प्रिय जाण निजगुह्य ॥१६॥
स्रष्ट्याचे देह द्विधा जाण । मनू शतरूपा मूळमिथुन ।
तें मी म्हणे नारायण । मनुष्य सृजन सद्भावें ॥१७॥