तीघे तयांसि म्हणती यमशासनाला
उल्लंघणार तुम्हि कोठिल कोण बोला
सांगा तुम्ही अमर कीं उपदेव किंवा
गंधर्व सिद्ध करणार सुरेंद्रसेवा ॥१॥
कोठें हो असतां अपूर्वदिसतां हेमांबरें नेसतां
अम्लाना कमळांचिया अळिकुळीं माळा गळां घालितां
चौघांही भुज चारि पीन सरळे श्रीचंदनें चर्चिले
चौघे रत्न - हिरण्य - भूषण - वरीं सर्वत्रही अर्चिले ॥२॥
शस्त्रास्त्रें धरितां समान तरुणे चौघे तुम्ही सांबळे
डोळे भाळ विशाळ पुष्ट बरवे रुपें बळें आगळे
नेजें आपुलिया दिगंत - तमही दुरुनि संहारितां
दूतांला यमधर्मराजविभुच्या आम्हांसि कां वारितां ॥३॥
शुक्र म्हणे यमकिंकर येरिनी वदति विष्णुनिदेशकरांप्रति परिसनां हरिपार्श्वग हांसिले घनरवें मग गर्जत बोलिले ॥४॥
धर्मदूत तरि हे म्हणवीती पापहीन नरकाप्रति नेती भाव हा धरुनि आंत विनोदें पूसती हरिसभासद मौदें ॥५॥
धर्मराजविभुचे तुम्हि जेव्हां धर्म जाणत असा तुम्हि तेव्हां
पूसनों म्हणुनि एक तुम्हांला धर्मतत्त्व तुम्हि सत्वर बोला ॥६॥
कर्त्ते सर्वहि दंड योग्य अथवा जीवांमध्यें नेमिले
कीं तें पाप असो नसो परि तुम्ही दंडार्हते लेखिले
ऐसे तत्परिहास दास हरिचे हांसोनियां बोलिले
कीं निष्पातक जो तयासि नरका हे न्यावया पातले ॥७॥
विनोंदे असें दूत सर्वोत्तमाचे पुसों लागले दूत त्यांतें यमाचे
प्रवृत्तिप्रवाहें यथाशास्त्र रीती बरीं उत्तरें मृत्युचे भृत्य देती ॥८॥
तीं वर्णिलीं मुनिवरें निवडोनि जेथें
संक्षेप त्यामधुनही बदिजेल येथें
वैकुंठनाममहिमा श्रवणानिमित्तें
उत्त्कंलिते तदमृतार्थ तुषार्त्त - चित्तें ॥९॥
म्हणति विहित वेदीं धर्म त्याला म्हणावें
स्मृति - निगम - निषिद्धें ते अधर्म स्वभावें
शुभ अशुभहि कर्मे जीं करी जीव जेथें
तनु त्दृदयिं पहाती देव सूर्यादि तेथें ॥१०॥
देवांत साक्षि यमधर्महि त्यांत आहे
पाप्यास तों तदनुरुपचि दंड पाहे
जीवांसि पानकफळें सकळांसि देतो
धाडूनि दूत निरयाप्रति त्यांस नेतो ॥११॥
प्रस्तूत हा द्विज अजामिल शुद्ध पूर्वी
संपन्न सर्व सुगुणीं अति - मान्य सर्वी
आणावयास समिधा कुश पुष्प पानें
रानासि विप्रवर पाठविला पित्यानें ॥१२॥
परततां समिधा कुश घेउनी तरुण सुंदर देखिली कामिनी
पुरुष एक तिसीं रत देखिला पिउनि मद्य मदें बहु मातला ॥१३॥
उपवनिं नरनारीद्वंद्व उन्मत्तभारी
कुसुमशरविहारी युग्म दिग्वस्त्रधारी
स्मर त्दृदय विदारी देखतां या प्रकारीं
द्विज जरि बहु वारी नावरे चित्तहारी ॥१४॥
मनासिज द्विजमानस या मिसें खवळुनी करि तीकरितां पिसें बहुहि आवरितां मन नावरे त्दृदयिं तो मकरध्वज वाबरे ॥१५॥
मग तिच्या सदनाप्रति जाउनी धन तिला तदपेक्षित देउनी रतिरसें वरि लंपट होउनी विचरला अधरासव सेवुनी ॥१६॥
पित्यानें बहू अर्जिलें वित्त होतें दिल्हें द्रव्य तें या द्विजें सर्व तीतें महा मोहला नीच - कांतांऽग - संगें स्वधर्मासही टाकिलें त्याप्रसंगे ॥१७॥
तिच्या स्नेहपाशें जसा बद्ध झाला न ते आवडे धर्मपत्नी द्विजाला तिला टाकिलें टाकिली मायबापें तिसीं आचरुं लागला सर्वपापें ॥१८॥
तिच्या पोषणा तोषणाच्या निमित्तें बहू मेळवूं लागला पाप - बित्तें तिला ध्यानसे सर्वदा दुष्ट चित्तें असा कंटिला काळ येणें प्रमत्तें ॥१९॥
या कारणें द्विजकुळाधम शीघ्र तेथें
नेऊं असे धरुनि दंड कृतांत जेथें
भोगील दुष्कृतफळा नरकासि जेव्हां
हे पापभोग अवघे सरतील तेव्हां ॥२०॥
शुक म्हणे यमकिंकर ये रिती वदति धर्म अनेक तयांप्रती
श्रवणिं ऐकुनि या वचनास ते हरि हरी म्हणती हरिदास ते ॥२१॥
तो तों अजामिळ तिहीं द्विज सोडवीला
त्याच्या हिनार्थ उपदेश तयासि केला
नामप्रताप कथिला मग त्याप्रसंगें
नामें अमोघ हरिचीं जनपापभंगें ॥२२॥
नें उत्तर - प्रकरणीं जगदात्मबंधू
बोलेल वामनमुखें करुणेकसिंधू
स्कंधांत या प्रथम हाचि महापुराणीं
अध्याय दिव्य वदली मुनिवर्य - वाणी ॥२३॥
अध्याय जैसा पहिलाच तेथें तैसाच हा नामसुधतें येथें भावार्थ गूढार्थ यथार्थ - रुपें निरुपिला श्रीहरिच्या प्रतापें ॥२४॥
द्वितीयापासूनी धरुनि सकळा व्यासवचना
हरी टीकाकर्त्ता तदुपरि महाराष्ट्र रचना
तथापि श्लोकाचें प्रति पद न भाषेंत मिरवे
जसे देहीं डोळे दिसतिल तसे श्लोक बरवे ॥२५॥