अध्यायीं तिसर्या मुरारिचरणप्रेमें महा - निश्वयें
दूतांतें यमधर्मराज वदतो नामप्रताप स्वयें
ऐसें गुह्य कसें अहो प्रकटलें श्रोत्यांस हें विस्मयें
होती यास्तव वर्णितो मुनि नृपप्रश्नास पद्म - द्वयें ॥१॥
राजा पूसतसे स्वसेवकजनीं हें वर्णिल्याऊपरी
त्यांसी तो यमधर्म त्या अवसरीं बोले कसी वैखरी
आज्ञा मोडुनि पाश तोडुनि बळें वैकुंठिंच्या किंकरीं
पापी सोडविला असें परिसतां बोले कसें त्यावरी ॥२॥
स्वामी हा यम - दंड - भंग कवणापासूनि आम्ही असा
नाहीं आइकिला तुम्ही कथियला नामप्रतापें जसा
हे इत्यादिक लोक - संशय जगीं छेदी असा दूसरा
नाहीं यास्तव धर्म काय बदला तो वाद सांगा बरा ॥३॥
मुनि बरासि असें धरणीश्वरें चरित हें पुसतां अति आदरें
अजित - नाम - महत्त्व - सुधा - रसें निववितो शुक मागुति या गिसें ॥४॥
शुक म्हणे नृपती हरि - किंकरीं फिरविले यमकिंकर यापरी
सकळ सांगति सूर्य - सुताप्रती स्वपति जो यम संयमनीपती ॥५॥
कृतांतासही ऐकतांक्षोभ व्हावा धरुनी अशा बोलती दुष्ट भावा
असें बोलतां सप्तपद्यें विचित्र स्वयें सांगतो राजया व्यासपुत्र ॥६॥
शुक म्हणे यमदूत यमापुढें वदति कोपकरें वचनें दृढें
म्हणति शासनकार अहो किती त्रिभुवनीं वद संयमनीपती ॥७॥
करिति दंड उदंडहि जेधवां नियमभंगचि कीं मग तेधवां
सरलिया वय आणविशी जया इतर येउनि सोडविती तया ॥८॥
करिति दंड अनेक असे जई प्रभुपणें अवघेचि नृथा तई
सकळ मंडळनाथनृपासनें जसिं परस्पर मोडिति शासनें ॥९॥
तुजचि आजिवरी प्रभु लेखिलें न कधिं शासन आणिक देखिलें
नवल आजिच हें जनिं वर्त्तलें परमदुर्धर शासन पर्तलें ॥१०॥
पतित केवळ जो नृपलीपती द्विज तुझ्या वचनें नरकाप्रती
धरुनि चालवितां वरि सांवळे पुरुष चारि चतुर्भुज पावले ॥११॥
तिहिं असें तव शासन मोडिलें पतितबंधन तें दृढ तोडिलें
कवण ते प्रभु सांग बरें परी श्रवण योग्य असे असिले तरी ॥१२॥
आकर्षिला पतित घालुनि पाश जेव्हां
नारायणा म्हणुनि मारिलि हाक तेव्हां
चौघांचिही उडि तया समयांत आली
आलों झणी भिसि असी ध्वनि दीर्घ बोली ॥१३॥
महाराज ते सांग हे कोण वाचे यमातें असें पूसती दूत त्याचे
असें ऐकतां त्या यमें काय केलें शुकें हें वदायास आरंभियेलें ॥१४॥
शुक म्हणे यमकिंकर ये रिती पुसति ऐकुनि संयमनीपती
हरिपदांबुज हें स्मरला मनीं मग वदे हदयीं सुख मानुनी ॥१५॥
यम म्हणे स्वमनीं यमकिंकरा मजविणें न दिसे प्रभु दूसरा
म्हणुनि जो अखिलेश रमापती प्रथम वर्णिल त्यास तयांप्रती ॥१६॥
प्रभु मजविण मोठा ज्याचिया चित्स्वरुपीं
स्थिर - चर - जग ऐसें अंबरें - तंतु - रुपीं
स्थिति भव लय तीन्हीं अंशमात्रें करीतो
रविसुत म्हणतो कीं स्वामि माझा हरी तो ॥१७॥
स्वयें विष्णुरुपें करी जो स्थितीतें जगत्कर्तृता त्याच लक्ष्मीपतीतें
करी सृष्टितो ब्रम्हरुपें मुरारी तसा रुद्ररुपेंचि सं हारकारी ॥१८॥
वृषभ - नासिकिं घालुनि वेसनी वश करुनि जसा फिरवी धनी
सकळलोक जया वश येरिति अवधियांहुनि थोर रमापती ॥१९॥
ऐसेंच तत्व तरि टाकुन वासुदेवा
शास्त्रज्ञ ही करिति कां पर अन्यसेवा
ऐसे कथीं म्हणति ते परधर्म आतां
याचें रह स्यहि वदेल तयां स्वदूतां ॥२०॥
लोकीं द्विपाद पशु सर्व - मनुष्य झाले
दुर्वासना मय - वनांत पळों निघाले
बांधोनि त्यांस सकळांसहि उद्धरावें
केलें तदर्थ निजवेखरिरुप दावें ॥२१॥
तद्वैखरी निगम रुपचि थोर दावें
जेथें अनेक गळबंधन देवनावें
तेथें असो पालतिया गळबंधनी तो
कैसा तरी निगम - दाम - निबद्ध होतो ॥२२॥
दाव्यांत वद्व - पशु जे तितुक्यांस चारा
घाली धणी म्हणुनि धांउनि येतिदारा
येऊनियां धरितसेपशु आपलाला
थारा तथा पिहिन जाणति त्या धण्याला ॥२३॥
या कारणें निगम सर्वहि थोर दावें
इंद्रादिरुपगळबंधन त्यांत नावें
कोण्या मिसेंकरुनि वैदिककर्म केल्या
स्वर्गादिसद्गतिन दुर्गति त्यास मेल्या ॥२४॥
यज्ञादि सर्वहि फळें हरि तोचि देतो
इंद्रादि सुख्य म्हणऊनि यजी जरी तो
हे अस्पदादिक असीं निगमांत नावें
मूढा जनासि गळबंधन हेंच दावें ॥२५॥
आम्हासि आहुति समर्पिति आणि पूजा
आम्हीं शिरीं धरुनि पाववुं देवराजा
दाळ्यांत बद्धपशुवन् गळबंधनेहीं
आम्ही उपास्य परि बाद्य जसे विदे ही ॥२६॥
आम्हास सर्व अधिकारहि वासुदेवें
हे दीधले विविध नेमुनि देवदेयें
हीं शासनें शिरिं धरुनि भितों तथाला
आम्हा स्वतंत्रपण केविं घडेल बोला ॥२७॥
यमास सर्वोत्तमनात याचे जे बोलिले दूत सकोपवाचे
यमें दिलें उत्तर हें तयांतें स्मरोनि सर्वेश्वर विष्णु चित्तें ॥२८॥