समस्तांहुनी थोर गोविंद ऐसें कळे जेरिती बोलिला धर्म ऐसें
तथाचेच ते चौघही दूत आतां असें धर्म बोलों पहातो स्वदूतां ॥१॥
तिहीं मोडिलें तूझिया संयमाला असें बोलिले दूत जे कां यमाला
वदाया तया गोष्टिच्या उत्तरातें पुन्हा वर्णितो धर्म सर्वेश्वरातें ॥२॥
सगुणनिर्गुण एक रमापती म्हणुनि वर्णितसे यम त्या प्रती
सगुण इच्छितसें नकळे कसें कथिल पद्ययुगें पहिलें तसें ॥३॥
मी धर्मराज सुरराज दिशाधिराजे
ब्रम्हादिदेव ऋषि आणिकथोर जेजे
नेणों तदिच्छेत नजाणति तत्त्ववेत्ते
ऐशास जाणति कसे जन आणि ते ते ॥४॥
सगुणचेष्टित हें न कधीं कळे अगुण तो कवणासहि नाकळे
म्हणुनियां वर संयमनीपती अकळ निर्गुण वर्णिल त्यांप्रती ॥५॥
प्राणोंद्रियादि सकळांसहि जो कळेना
वाचेस आणिकमनासिहि आकळेना
शुद्धें मनें अनुभवाप्रति ये तथापी
तेव्हां पतंग मन होय चिदात्मदीपीं ॥६॥
ऐसा अतर्क्य हरि त्या प्रभु माधवाचे
ते दूत होतिल म्हणे यमधर्म वाचे
श्लोकद्वयें करुनि हेंचि वदेल आतां
टीकामुखें करुनि होइल सौख्य संतां ॥७॥
तुम्हि मनोहर जे नर देखिले निजसुखात्मरसें करिं रेखिले
मज गमें बहुतेक रमापती जवळि ते असणार महामनी ॥८॥
हरिगुण हरिरुपें दूत ते माधवाचे
हरिमयजग दृष्टीं पाहती नामवाचे
सुरवर शिरिं त्यांच्या वंदिती पायधूळी
त्रिभुवनिहरिभक्तां रक्षिती सर्वकाळीं ॥९॥
जगिं अदृश्यपणें जन लक्षिती भगवदीक्षणमात्र अपेक्षिती
हरि - जनासि कधीं न उपेक्षिती मजहिपासुनिये रिति रक्षिती ॥१०॥
नारायणा म्हणुनियां म्हणतांचि वाचे
ते छेदिले तिहिंच तैं दृढ पाश त्याचे
कानीं मुखांत नरकांतक नाव जेथें
कैंचें उरे नरकदुर्गति - दुःख तेथें ॥११॥
वाटे तयांधर्म समस्त जाणों नामप्रतापास किमर्थ नेणों
येथें पहा येविषयीं स्वदूतां श्लोकत्रयें वर्णिल काय आतां ॥१२॥
श्रीभद्भागवतांत भक्त हरिचे सप्रेम वारवाणिनी
जे साक्षाद्भगवन्मुखें प्रगटलें कोण्ही तयां नेणती
ते श्रीभागवताख्यधर्म कळती कैसे तुम्हाला अरे
जो बाराजणमात्र जाणत असों ऐका तयातें बरें ॥१३॥
ब्रम्हा शंभु कुमार नारद शुक प्रर्हाद किंवा बळी
की वैदेहि मनु स्वयंभुस्कत जो कीं कौरवाचे कुळीं
जो गंगासुत भीष्म आणि कपिल प्रख्यात की मी स्वयें
जाणों वैष्णवधर्म जो कळलिया प्राणीत्तरे निश्वयें ॥१४॥
हा श्रीभागवतारव्यधर्म इतुक्यां बाराजणा ठाउका
कां तो गुप्त असा म्हणाल तरि तें सांगेन मी आइका
जो कां गुह्य निजात्म बोध गुरुच्या भक्तीविणें नाकळे
तो हा वैष्णवधर्म विष्णुकरुणें वाचूनि कैसा कळे ॥१५॥
विज्ञान जें अतिरहस्य विशुद्धवेदीं
तेथेंचि भागवतधर्म न भक्ति भेदीं
ज्याकारणें प्रिय कलत्र सुतादि वित्तें
तेव्हांचि भक्ति जरि तो उमजेल चिनें ॥१६॥
म्हणविती बहु वैष्णव आपणा परि न जाणति भक्तिचिया खुणा
हरि असें दुसरें जरि नावडे तरिच ते हरिभक्ति तयां घडे ॥१७॥
प्रिय हरी सकळांहुनि जाणती परि जयास्तव ते प्रिय नेणनी
भजति कीं सुख दे हरि आपणा प्रियतयीं निजजीव हरी उणा ॥१८॥
निजसुरवार्थ धनादि जसीं प्रियें प्रिय हरी स्वसवार्थचि निश्वयें
धन सुताहुनि आवडि आपुली नसिहईहुनी भक्ति नव्हे भली ॥१९॥
भजनि मुक्तिनिमिन हरी - जरी निजनिमित्त नदर्थ नव्हे तरी
भजति मानधनार्थ नृपा जसे हरिस मुक्तिनिमित्तक हे तसे ॥२०॥
जरि न मुक्ति - निमित्तही सेविनी तरि किमर्थ उपास्य रमापती
जगिं वृथाचि न मंदहि वर्तनी बदति शास्त्र -विशारद येरिती ॥२१॥
प्रयोजना - वांचुनि मूर्ख ते ही प्रवर्तती न त्रिजगांत देही
शात्रज्ञ होऊन्मि वृथा हरीला कां सेवितां हे समजोनि बोला ॥२२॥
म्हणाल आतां गुण गोड भारी याकारणें आडवतो मुरारी
सुधा बहू गोड सुरेंद्र - लोकीं ऐकोनि तीतें न भजाचि कां कीं ॥२३॥
स्वभक्ता न जाणे सुधा आणि कांहीं कृपाळू हरी - सारिखी होत नाहीं
असें बोलती ते तयाला पुसावें कृपा घेउनी काय सांगा करावें ॥२४॥
कोण्या प्रकारें निजदुःख नाशी नासूनि दुःखा करि सौख्यराशी
या कारणें तो प्रिय देव जेव्हां स्वप्रीतिदेवाहुनि थोर तेव्हां ॥२५॥
निजसुखार्थ हरी प्रिय जेधवां अधिक आपुलि आवडि तेधवां
हरिहुनी प्रिय आणिकही असी निगम - संमत - भक्ति घडे कसी ॥२६॥
मैत्रेयीप्रति याज्ञयल्क्य निगमीं विस्तारहा बोलिला
कीं ज्यालागिं समस्त ही प्रिय असा आत्माच हा आपला
जो कां आवडतो निमित्त नसतां तो जाणसी जेधवां
कांहीं ही तुज जाणणेंचि न उरे सर्वज्ञ तूं तेधवां ॥२७॥
जें जें लौकिक - सौख्य वैदिकहि जें ज्या आपणा कारणें
वाटे आवडतें तसा प्रियतम स्वात्गाचि जो आपणे
ज्याची आवडि निर्मिमित्त हरिही ज्याकारणें आवडे
तोचि श्रीहरिसा कळे तरिच हे सद्भक्ति ठाई पडे ॥२८॥
आत्मा सर्व - जड - प्रकाशक असें लोकीं बहू जाणती
जाणोनि श्रुत - कीर्तनादि सगुण - प्रेमा मनीं नेणती
कोण्ही ते सगुणींच निष्ठ परि हा आत्मा प्रिय श्रीहरी
ऐसें भक्ति रहस्य नेणति न हे सद्भक्ति दोहीं परी ॥२९॥
म्हणतसे श्रुति की पशु तुल्य तो इतर मानुनियां हरि सेवितो
म्हणुनि आत्मपणें हरि सेवणें परम - वैष्णव तो तरि बोलणें ॥३०॥
श्रुत्यर्थ तो स्पष्टचि दीसताहे न भेद हा वैष्णव - धर्म साहे
ऐवयेंचिजें कां भजणें हरीचें तेथेंचि हें भागवतत्व साचें ॥३१॥
गुरुमुखें कळली स्वचिदात्मता तदुपरांतिक जो गुरु देवता
उभयभक्ति निजात्मपणें करी सकळ होय कृपा गुरुची तरी ॥३२॥
ऐसेंचि बोले श्रुति यस्य देवे म्हणुनियां अर्थ इचे पहावे
धरुनि येथें स्फुट या श्रुतीतें यथामति व्याकरिजेल तीतें ॥३३॥
श्रुत्यर्थ कीं तत्वमसीति वाक्यें देवीं जसि भक्तिनिजात्म ऐक्यें
जैसीच देवीं गुरुभक्ति जेव्हां तैसी करी सिद्धि तयासि तेव्हां ॥३४॥
आत्मा - नात्म - विवेक मात्र गुरुच्या तेव्हां कृपेनें कळे
जीवेशैक्य उपाधिते निरसितां शिष्यास तें आकळे
देवीं आत्म - गत प्रियत्व उमजें तैसें गुरुचे स्थळीं
ऐसी भक्ति करील चित्त - लहरी तेव्हां मुरे चिज्जळीं ॥३५॥
चित्ताची लहरी चिदंबुधिजळीं त्याची मुरे जेधवां
चैतन्यास जडांत तंतुवसनीं देखे असें तेधवां
ज्ञानाचा परिपाक होय परिहें सर्वात्मभावीं जयीं
भक्ति श्रीगुरुदेवपादकमळीं याची ठसावे तयीं ॥३६॥
सहज आवडिजे निजिचा निजीं जितुकि भक्ति मुकुंदपदांऽबुजीं
श्रवणकीर्तन आवडिनें असा न करि वैष्णव तों वरितो कसा ॥३७॥
गुरुमुखें कळल्यावरि आत्मता सगुणभक्ति निरर्थक तत्त्वता
म्हणति वैष्णव तेहिनसर्वथा वदति अद्वय शास्त्र वृथा कथा ॥३८॥
श्रवणकीर्तनभक्ति न जोंवरी मनन तों सगुणीं स्थिरता घरी
निज चिदात्मकता कळली जरी न हरि - भक्ति - विणें स्थिरता तरी ॥३९॥
म्हणुनियां म्हणते श्रुति कीं जयीं गुरु - रमापति - भक्ति घडे तयीं
गुरुवरें कथिले निगमार्थ ते अनुभवीं करिताति कृतार्थने ॥४०॥
सहज आत्मपणें हरि आवडे सगुणभक्ति तया वरि हे घडे
अनुभव स्थिर होय तया नरा तरिच केवळ वैष्णव तो खरा ॥४१॥
म्हणुनि वैष्णव दुर्लभ या जगीं इतर वैष्णवना मिरवे उगीं
म्हणुनि वैष्णवधर्महि धर्म हा अकळतत्व तयासि वदे पहा ॥४२॥
वाराजणासि हरि - भक्ति - रहस्य ठावें
ब्रम्हादि ते कथियले यमधर्मदेवें
ते थोर सिद्ध इतरां अधिकार तेथें
नाहीं म्हणाल तरि धर्म वदेल येथें ॥४३॥
मनुष्यलोकांत मनुष्यलोकी मनुष्यमात्रासहि धर्म हा कीं
श्रीवासदेवीं निजभक्तियोगें आत्मत्वभावें भजणें असंगें ॥४४॥
हा भक्ति योग घडणार कसा मनुष्यां
बोलेल तो यम उपाय तयां स्वशिष्यां
श्लोकांत या चरणि शेवटिल्याच पाहा
भक्तीस साधन उपाय वदेल जो हा ॥४५॥
हरिगुण - श्रवणें हरि आवडे भजन त्यावरि आवडिनें घडे
परि न प्रातकि या श्रवणीं रिती परमसाधन नाम असे रिती ॥४६॥
कोण्या - मिसें ये हरिनाम वाचे जळोनि जाती अति दोष त्याचे
घे चित्त जेव्हां श्रवणादि गोडी गोडी हरीची मग त्या न सोडी ॥४७॥
श्रोते हो यमधर्म वाक्य वदला हें सूक्ष्म दृष्टीं पहा
कीं नामग्रहणादिकीं करुनियां सद्भक्तिचा योग हा
तेंही कीर्तन हें नव्हें ग्रहण हें जें कां मुखीं उच्चरे
श्रीमन्नाम तसें करी ग्रहण तें पापाऽब्धि जेणें तरे ॥४८॥
कोण्यासिसेंही हरिनाम वाचे येईल भाग्येंचि करुनि याचे
श्रद्धा तया ऊपरि कीर्तनाची ते तों कृपा श्रीमधुसुदनाची ॥४९॥
जेथें निदर्शन अजामिळ पुत्रनावें
नारायणा म्हणुनिही म्हणतां स्वभावें
झालाचि मुक्त म्हणऊनि यम स्वदूतां
श्लोक - द्वयेंकरुनि हेंच वदेल आतां ॥५०॥
उच्चारमात्रेंचि अजामिळाला प्रसन्न नामें जगदीश झाला
हा एक पद्यें महिमा स्वदूतां बोलेल आधीं यमधर्म आतां ॥५१॥
मुखीं नाम तन्नाम - काच्याच भावें असें कीर्तन श्रीपतीचें म्हणावें
म्हणे नाम जाणोनि तन्नामकाला नजाणोनि तो नाम उच्चार झाला.
नामोच्चारण विप्र मात्र करितां कैसा पहा सूटला
जो दुर्भेद्य कृतांत - पाश तुमचा तोही कसा तूटला
नामोच्चार - महत्व - धर्म वदतां प्रेमा मनी दाटला
दूतांला यम पुत्र हो म्हणतसे स्नेहाब्धि तो लोटला ॥५३॥
पृ० छंद - पहा नवल पुत्र हो यम म्हणे स्वदूतां कसें
नजाणतहि ये मुखा सहज नाम तेंही असें
अजामिळहि सूटला इतुकियाच मात्रें त्वरें
म्हणूनि हरि - भक्तिचीं प्रथम साधनें हीं अरे ॥५४॥
सहज नामहि नाशक पातकां स्मरणकीर्तनरुप तयासि कां
परम भक्ति रमापतिकीर्तनें प्रथम यास्तव नामचि साधनें ॥५५॥
बोलेल ऐसें यमधर्म आतां नामप्रतापासि तथां स्वदूतां
तीं आयका हो वचनें विचित्रें पीयूषरुपें निजकर्णपात्रें ॥५६॥
पृ० छं- म्हणे यम तयांप्रती अद्य हरावयाकारणें
समर्थ हरि कीर्तनें म्हणुनि काय हें बोलणें
उगेंचि म्हणतां मुखें निजसुतासि नारायणा
पहा परम मुक्तिही कसि अजामिळा ब्राम्हणा ॥५७॥
जळति अग्निकणेंचि तृणें जरी तरि तयां प्रबळाऽनळ कांपरी
भल तसें हरिनाम अघें हरी श्रवणकीर्तन कां तरि त्यावरी ॥५८॥
चित्तीं नाम म्हणे स्मरे स्वःहदयीं तें नाम ज्याचें तथा
ऐसा तो जप आणि उच्च म्हणणें तें नाम जाणोनियां
तें संकीर्तन आणि नाम म्हणणें नेणोनि तन्नामका
तो उच्चार अजामिळासि फळला कैंसा पहा कौतुका ॥५९॥
नारायणा म्हणुनि केवळ आत्मजाला
आकोशतां द्विज अजामिळ मुक्त झाला
यालागिं काय म्हणणें अघमात्र नाशी
संकीर्तनें जिहिंकरुनि सुखांऽबुराशी ॥६०॥
अजर अमर होती ज्या सुधेच्याच पानें
प्रथम सहज नाशे क्षुत्तृषा - दैत्य त्यानें
क्षुधित तृषित मानी लाभ तो तोचि भारी
अघहर फळ नामीं वर्णिती या प्रकारीं ॥६१॥
नामद्रुमीं फळ चतुर्विध मुक्ति जेथें
तें पापतापहरणें तरि पुण्य तेथें
जें वीर - सैन्य भुवनत्रयराज्य साधी
मार्गी तृणेंरगडिती चरणेंचि आधीं ॥६२॥