वामन पंडित - भागवत रामायण - अध्याय १
कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.
करिति चरण तुझे जे शिळा दिव्य रामा
हरुनि दुरित माझे हो तुतें सेव्य रामा
भ्रमर मन पदाऽब्जीं पाववी त्य विरामा
भव - हर भव - चाप - ध्वंस विश्वाऽऽभिरामा ॥१॥
जगीं तूं असा कीं घटीं एक माती
गुण श्लोक - कोटींत तूझे न माती
निरुपीन त्या सिं धुच्या बिंदु - मात्रा
पुरे तेचि संसार - रोगास मात्रा ॥२॥
महां औषधांतूनि थोडेंच कांहीं
करी सेवितां नाश वातादि कांहीं
पुरे आमुची हे अविद्या मराया
तुझें एकलें नाम जी राम राया ॥३॥
जर्ही नाशिली आमुची जी अविद्या
जितां ही दिली मुक्ति देऊनि विद्या
तुझी कीर्ति मुक्ती हुनी गोड वाटे
शुकादीकही चालती याच वाटे ॥४॥
ह्नणोनि जे भागवतीं शुकानें
लीला तुझी वर्णिली कौतुकानें
टीका तिची मी क्षिति - लोक - वाणीं
करीन जेथें न सुखासिवाणी ॥५॥
बहू वृद्धी ग्रंथा न करुनि वदावी यश - सुधा
प्रति - श्लोकीं जे कां करि अमृत संतृप्त वेसुधा
सम - श्लोकीं टीका ह्नणुनि करितों जी रघुपती
जिला मंत्र - प्राय स्मरति वदती लोक यजिती ॥६॥
निजाश्रमा राघव कौशिकानें
नेली कथा तेथुनि हे शुकानें
आरंभिली मंगळ तीस गातें
गाधीमुनी उद्धरीतो जगातें ॥७॥
चाले वना - प्रति पुलस्ति - सुतासि मारी
पाळी स्व कोसेल - धरा - सह भू - कुमारी
या मंगळा - चरण - पद्य - रसें श्रुकानें
संक्षिप्त वर्णिलि कथा अति कौतुकानें ॥८॥
टाकी ताताऽर्थ राज्या वन वन विचरे त्या पदीं ज्यांस वाटे
सीता - हस्ताऽब्ज भारी अनुज कपि पती सेविती नित्य वाटे
बोले निर्नाशिकेच्या असुर जनक - ज्याने तंई क्रोध लेशें
बांधे दापूनि सिंधू वधि रिपु - कुळ त्या रक्षिलें कोशलेशें ॥९॥
अहो विश्वामित्रें दशरथनृपा प्रार्थुनि तई
स्वयज्ञातें नेला प्रभु असुर मारुनि विजई
तया - संगे जातां करुण मिथुळाग्राम - गमनी
शिळा शापें मार्गी करि पद - रजें हंस गमनी ॥१०॥
सीता - स्वयंवर - गृही भवचाप हातीं
भंगी मुख क्षितिप वीर अहो पहाती
लीले - करुनि गज - बाळक इक्षु दंड
मोडी तसा भय करी ध्वनि तो उदंड ॥११॥
जिंकोनि ने स्व - गुण - रुप - वयें समाना
सीता रमा स्व - त्दृदया - वरिलब्ध - माना
निःक्षत्रिया क्षिति करी हरि गर्व वाटे
त्याच्या जयास नृप - बीज असात्द्य वाटे ॥१२॥
जो स्त्रीस लंपट सकाम तथापि त्याची
माथां धरुनि करि गोष्टि खरी पित्याची
राज्याऽदिकें त्यजुनि जाय वना सदार
प्राणावरी जितचि मुक्त तसा उदार ॥१३॥
लंका - पती - भगिनिच्या सुख दुषणातें
केलें वधी मग तया खरे दूषणातें
मारी चतुर्दश - सहस्त्रहि चाप - हातीं
कोदंड चड वनिं कष्ट मुनी पहाती ॥१४॥
सीता कथा परिसतां स्मर - विव्हळानें
जो निर्मिला दश - मुखें मृग हो खळानें
मारीच तो वधि तया प्रभु कार्य - दक्षा
जाऊनि दूरि शिव संहरी जेविं दक्षा ॥१५॥
तो राक्षसा धम हरी जनकाऽत्मजातें
नेतां तृकें जसि अजा अति दीन जातें
तेव्हां वनीं रघुपती अति शोक दावी
कीं स्त्री - प्रियास गति सेवटिं हे वदावी ॥१६॥
झाल्या स्व कार्य मृत - देह कवंध मारी
जे मित्र होति कपि शोधुनि भू - कुमारी
वाळी - वधा - उपरि सांगाति तेच वेळे
ये विश्व - वंद्य मग यां - सह सिंधु - वेळे ॥१७॥
सक्रोध लोचन भयेंचि पडे समुद्रा
आंदोळतां जळचरें अति मौन्य - मुद्रा
झाला समूर्त्त शिरिं घेउनि पूजनातें
ये पाय वंदुनि वदे भव - भंजनातें ॥१८॥
जो तूं अनंत समजोन कुबुद्धि त्यातें
कूटस्थ आदिपुरुषा जग - पाळिल्या तें
देव प्रजाऽधिपति भूत - पति क्रमानें
माया - पति स्त्रजिसि सत्व - रजें - तमानें ॥१९॥
माने तसें जलधितें अजि लंधि मातें
श्री पाव मारुनि पुलस्ति - सुताऽधमातें
पाषाण तारि पसरे यश जेविं लोकीं
गातील कीर्ति नृप सेतु पथा विलोकीं ॥२०॥
सुग्रीव नीळ हनुमंत कपींद्र सेना
ते आणितांख गिरि - शिखा नभ तें दिसेना
त्या सेतुनें रघुपती कपि - दग्ध - लंका
देखे विभीषण वदे मति - निष्कलंका ॥२१॥
वेष्टूनि ते नगरि वानर ते निघाले
लंकेंत घालिति गृहादि - वरुनि घाले
हस्ती जसे ढवळिती - हदिनी - जळाला ॥२२॥
पुत्र प्रहस्त अतिकाय विकंपनाऽदी
धूम्राक्ष दुर्मुख दिशा भरिती स्व नादीं
सर्वास त्यांस सह - कुंभ - निकुंभ धाडी
तो कुंभकर्णहि उठे जग झोडि धाडी ॥२३॥
येतां निशाचर चमू अति वीर्य - शक्ती
हातीं धनुष्य शर तोमर शूल शक्ती
सुग्रीव लक्ष्मण मरुत्सुत ऋक्ष नीळ
या अंगदादि सह ये प्रभु मेघ - नीळ ॥२४॥
त्या अंगदादि रघुनायक वानराची
शस्त्रीं गदा गिरि तरु शर तोमरानी
ते मारिली निघनिघों चतुरंग - सेना
सीताऽपहारक - दळीं शुभ तें दिसेना ॥२५॥
लंकेश लक्षुनि बळ - क्षय कोप - तापें
ये वाहनावरि चढोनि महा - प्रतापें
तों ये सुरेंद्र - रथ त्या - वरि राम - राया
हाणे शर त्रिशत राम शरें मराया ॥२६॥
बोले रघूत्तम खळा मळ राक्षसांचा
तूं श्वान शून्य गृह - भोजन भक्षसाचा
सीताऽपरोक्ष हरिसी तुज निस्त्र पातें
मी काळ मारित अमोघ - बळास्त्र - पातें ॥२७॥
जों घे दशानन असा व्यवसाय कानीं
दापूनि त्यास रघुनायक सायकानीं
भेदूनि ऊर वधि आननिं रक्त नाकीं
जैसा व्यये सुकृत - संचित - रिक्त नाकीं ॥२८॥
रघुपति विजयी त्या रावणानें व धूनीं
शुक मग विभुलीला दिव्य जो तीस वर्णी
स्व पितृ - कृत वदे हे श्लोक बत्तीस वर्णी ॥२९॥
श्लोक - वृत्त कथिलें यमकानीं
गातित्यास न पडे यम कानीं
पावतील रघुनाथ - पदातें
जे सदां स्मरति नाथ - पदाते ॥३०॥
अष्टाक्षरी चरण तो यमकीं न साजे
लीलाच त्यांतिल सुखा वह मानसा जे
न प्रासही दिसति ज्यास वरे कदापी
कीं काळ - मृत्युस तदर्थचि एक दापी ॥३१॥
समश्लोकी - मध्यें रघुपति करीतो नियमकीं
कथावे श्लोकार्थ स्वगुण - रचना युक्त यमकीं
अनुष्टुप पद्यातें म्हणुनि विषद - छंद - निकरीं
करी तो रामाचे चरण शिरिं ते वंदुनि करीं ॥३२॥
N/A
References : N/A
Last Updated : July 04, 2009
TOP