वामन पंडित - भागवत रामायण - अध्याय २
कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.
मृतां राक्षसांची वधू - वृंद सेना
रडे आफळे अंत दुःखा दिसेना
स्त्रिया आणि मंदोदरी शोक - रीती
निघोनी पुरींतूनि भारी करीती ॥१॥
मेले सुमित्राऽत्मज सायकानीं
आलिंगुनी त्यांसहि बायकानीं
केला बहू शोक अनेक रीती
उच्च - स्वरें रोदन ज्या करीती ॥२॥
रडति दशमुखाच्या त्यास हा नाथ नाथा
तुज - विरहित लंका आणि आम्हीं अनाथा
नगरिवरि रुसोनी वीर सेजें निजावें
तरि शरण पुरीनें आजि कोणास जावें ॥३॥
होउनी वश तुवां मदनातें
आणिली प्रभु - वधू सदनातें
क्षोभली जनकराज - कुमारी
तो प्रभावचि असा तुज मारी ॥४॥
लंका स्त्रियांसहित ते विधवाच केली
गृध्राऽन्नते तनुहि जे विषयीं भुकेली
सद्वंश - भूषणहि तूं नरकासि जासी
केला अनर्थ सकळा तनुजाऽनुजांसीं ॥५॥
पुसोनि रामास विभीषणानें
क्रिया मृतांच्या कुळ - भूषणानें
केल्यास्व - शास्त्रें पर - लोक - रीती
तिळोदकीं लोक जसें करीती ॥६॥
देखे रघूत्तम अशोक - वनांत सीते
नेत्रीं स्ववे विरह - शोक - वनां तसी ते
नाहींच बिंदु भरिही जळ जात कंठीं
कंठी तसे दिन असी जळजांत कंठी ॥७॥
पावली स्व विरहें तनु कंपा
राम तीवरि करी अनुकंपा
होय तोचि सुख - वासर सीते
मग्न राम सुखवास रसी ते ॥८॥
जवळी अनुज सीता राम बैसे विमानीं
कपि - पति - सह ज्यातें बंधुतें जेविं मानी
दशमुख - अनुजा दे उत्तम - श्लोक लंका
पवन - ज - सह यानीं घे तया निष्कलंका ॥९॥
प्रभु करि चिरजीवी शत्रुच्या सोदरासी
रवि - शशि - गगनीं तों राज्य दे मोद - रासी
रघुपति परते हो तें सुरां सौख्य वाटे
स्तविति कुसुम वर्षे त्या विमानांत वाटे ॥१०॥
गो - मूत्र - पक्क जव भक्षूनि वाट पाहे
येणें तदऽर्थ भरतावरि हो कृपा हे
कीं स्थडिलावरि निजे क्षण कल्प कंठी
जो प्राण देउनि असे बसला स्व - कंठीं ॥११॥
श्रवणि भरत ऐके राम आला अयोध्यें
अभिमुख विभुतें ये येति आमात्य योध्ये
पुर - जनगुरुसंगें पादुका मस्तकांऽतीं
करिति रवि - शशीच्या ज्या अहो ध्वस्त कांती ॥१२॥
वसे नदिग्रामीं परि त्दृदय रामीं भरत तो
विनां त्याचे पाय त्रिभुवनिं न जो लाभिं रत तो
सवे वेदाऽध्यायीं धरि इतर ठायीं न मन तो
करी वाद्यां - गीतां - सहित पद - पद्या नमन तो ॥१३॥
कनक - मय पताका वृंद चित्र - ध्वजांचे
रथ चपळ तुरंगीं स्वर्ण - सन्नाह ज्यांचे
कवच - सहित योद्धे मुख्य मुख्य प्रजांचे
प्रभु अभिमुख येती दास पादांऽबुजाचे ॥१४॥
चिन्हें महा विभव - राजविलास - मुद्रा
आणी पुढें भरत त्या करुणा - समुद्रा
प्रेमें पदावरि पडे विसरुनि देहा
आलिंगनें प्रभु भुजा पसरुनि दे हा ॥१५॥
प्रथम शिरिंहुनी त्या पादुका पादपद्मा
जवळी भरत ठेवी ज्या पदीं नित्य पद्मों
मग चरणिं पडेल्या क्षेम दे सु - स्वभावा
प्रभु नयन - जळीं सप्रेम न्हाणी स्वभावा ॥१६॥
ब्राह्मणांस करि वंदन पादीं
हें मला प्रिय असें उपपादी
लक्ष्मएग क्षिति - सुतंसह पाई
लोक वंदिति जयासि उपाईं ॥१७॥
कोसलाऽधिपति कोसल लोकीं
देखिला बहु दिसां अवलोकीं
नृत्य वस्त्र उडऊनि करीती
पुष्प - वृष्टि वरि कौतुक रीती ॥१८॥
पृथ्वीछंद - धरी भरत पादुका व्यजन चामरें विंजिती
विभीषण कपींद्रजे निज सुखें तयाच्या जिती
सुधाऽकर धरी मरुत्सुत सिताऽतपत्रा कृती
प्रवेश करि राघव स्व - नगरीं पवित्राऽकृती ॥१९॥
श्लोक - धरुनि सधनु भाते दास्य शत्रुघ्न मानीं
धरि करिं जळ - झारी राम - कांता विमानीं
धरियलि असिचर्मे अगटें ऋक्ष - पाळें
विभव नगरलोकां दाविलें हें कृपाळें ॥२०॥
रघुपति अति शोभे पुष्पकीं व्योम - वाटे
द्विज - गुरु - सह नेत्रा - उत्पली सोम - वाटे
नटति युवति गाती कीर्ति बंदी विमानीं
प्रियतम - जन आत्मा आपुला जेविं मानीं ॥२१॥
रचित कुसुम - रत्नें श्री अयोध्या पुरी ते
जन - अमृत - रसाच्या वाहती त्या पुरी तें
नृप - गृहिं गुरु - पल्या माउली त्यांस भावी
नमन करि जयांतें तोषिलें बंधु - भावीं ॥२२॥
वंदिलें अवघियां वडिलां हो
धाकुट्यां स्वपद - वंदन लाहो
राम - लक्ष्मण - धरा - तनयांहीं
घेतलें पुजूनि पूजन यांहीं ॥२३॥
वसे नंदिग्रामीं जननिहि विना - राम नयनीं
न पाहे शत्रुघ्ना - सह भरत जो भूमि - शयनीं
म्हणोनी चौघांही भिजविति तिघी एक समयीं
तनु - प्राण - न्यायें नयन - जळिं माया - रस - मयी ॥२४॥
मग उकलि जटांतें राम कोदंड - पाणी
कुळ गुरु जई न्हाणी घे चतुः सिंधु - पाणी
त्रिदेश - गुरु सुरेंद्रा ये रिती रामचंद्रा
द्विज वडिलहि देती मान वंशाऽब्धिचंद्रा ॥२५॥
सुस्त्रात होउनि असा करुणांऽबुराशी
अंगी करी मग विभूषण अंबेराशीं
प्रार्थूनि दे भरत बंदुनि आसनातें
घेतो पद - प्रद सुरां कमळाऽसनातें ॥२६॥
प्रजा स्ववर्णाऽश्रम - धर्म - वाटे
लाबी जयां बापचि राग वाटे
प्रजा गमे संतति त्य पित्याला
स्पर्शो न दे दुःख कदापि त्यांल ॥२७॥
त्रेतायुगीं कृतयुगा - परि काळ जाला
देखूनि राज्य करितां रघुवंश जाला
धर्मज्ञ राम सुख दे सकळां प्रजांला
प्रेमें प्रजा भजति त्या भरताऽग्रजाला ॥२८॥
वनें नद्या पर्वत सर्व खंडें
द्वीपां - समुद्रां सहितें अखंडे
हे काम धेनू सकळां प्रजांला
देखूनि होती भरताऽग्रजाला ॥२९॥
बहु भिन यम लोका श्रीवरा रामराया
जन मरण न पावे जो न बैसे मराया
वळखति न जराऽधि - व्याधि - शोकादिका या
श्रम भय असुखांतें नेणती लोक - काया ॥३०॥
रघुपती निज एक वधु व्रता
शिकवि हो जन - चित्त मधुव्रता
स्फुट करी गृह - धर्म समस्त कीं
धरुन लोक कथा - रस मस्तकीं ॥३१॥
करि जनक - कुमारी नित्य निर्व्याज सेवा
तुह्मिं हि जन मनीं हो तो महाराज सेवा
सगुण सलज सीता भाव जाणे पतीचे
मन हरिति पतीचें प्रेम संलाप तीचे ॥३२॥
राम वृत्त कथिलें यमकांनीं
गाति त्यांस न पडे यम कानीं
भिन्न अर्थ रचना - समजावी
काव्य - रीती चतुरीं समजावी ॥३३॥
N/A
References : N/A
Last Updated : July 04, 2009
TOP