|
अ.क्रि. भरारी मारणें ; आकाशमार्गे गमन , संचार करणें ( पक्षी वगैरेंनीं ). आघात प्रत्याघातादि कारणानें स्थान सोडणें ; मूळ स्थानापासून अन्यत्र जाणें , वर बाजूस उडी मारणें . चेंडू जसा वेगानें आपटाल तसा वर उडेल . तोंडावर वस्त्र धरुन बोल , नाहीं तर हुसर्याचे अंगावर थुंका उडतो . उल्लंघन करणें ; ओलांडून जाणें ; वरुन उडी मारुन जाणें . आडमार्गे उडोनि भिंती . - मुविराट ४ . २४ . उंचावरुन खालीं उडी मारणें . झडप , झेंप घालणें ; तुटून पडणें ; रागानें , आवेशानें चालून जाणें . नाहींसें होणें ; निघून जाणें ; संपणें . ते रात्री येतां सूर्यापुढें । स्वकार्येसी सगळी उडे । - एभा २० . २८१ . मनीं निश्चयो सर्व खेदें उडाला । - राम ६२ . एकदम अदृश्य होणें ; दिसेनासें होणें . दिवस बुडाला , मजूर उडाला . कोमेजणें ; निस्तेज होणें ; रंग विटणें ; अस्पष्ट होणें ; फिक्का होणें . या चित्राचे रंग उडाले आहेत . खपणें ; खलास होणें ; खर्च होणें ( द्रव्य , जिन्नस ); त्याचा सर्व पैसा चैनबाजींत उडाला . ( कोशाच्या ) दरवर्षी लाखों प्रती उडत असल्यामुळें ते ( ठसे ) झिजून जातात . - नि ६७७ . खुंटणें ; ( धैर्य , धीर ) सुटणें ; ( पाणी वगैरे ) आटणें . मन विटणें ; तिटकारा येणें ; प्रेम नाहीसें होणें . तिचा आज जीवच उडून गेला होता . - अस्तंभा १८८ . दुभतें जनावर दूध देत नाहींसें होणें ; कोरडें पडणें ; भाकड होणें . हल्ली आमची गाय उडाली आहे . बंदुक , तोफ पेटणें ; गोळी सुटणें ; स्फोट होणें ; फुटणें . युध्द , भांडण वगैरे जुंपणें . मजा , गंमत , दुष्काळ , अरिष्ट , भांडणतंटा , अव्यवस्था वगैरे उत्पन्न होणें , सुरु होणें , वाढणें , माजणें . चालिले उडत गर्जत - दावि २६८ . बळावर , आशेवर काम करणें ; अवलंबून कार्य करणें ( द्रव्य , सत्ता , वचन वगैरेवर ). कशाच्या बळावर उडतोस ? संभोगार्थ उडी मारणें - चढणें ( पशु वगैरेंच्या बाबतींत - नर पशूनीं माद्यांवर ) ( ल . ) गर्व करणें ; मद येणें ; ताठा चढणें . ज्यांच्या बळें उडसि ते तिकडेचि मनेंहि तुजकडे देहें । - मोउद्योग ४ . १०९ . ( ल . ) वर मान करणें ; भरभराटणें . सत्कीर्ति न दे उडों नवसुधेतें । - मोमंभा २ . ४० . भरधांव पळणें ( घोडा वगैरे ); वेगानें जाणें . एखाद्याची चाकरी , रोजगार सुटणें .
|