|
पु. १ मनोधर्म किंवा पदार्थाचा धर्म ; त्यांतील बल ; तेज ; सत्त्व ; अंत : स्थित धर्म ; विद्या , कला , सत्य , शौर्य इ० धर्म . एवं गुण लक्षण । - ज्ञा १७ . १३१ . २ ( न्यायशास्त्र ) रूप , रस , गंध , स्पर्श , संख्या , परिमाण , पृथकत्व , संयोग , विभाग , परत्व , अपरत्व , गुरुत्व , द्रवत्व , स्नेह , शब्द , बुध्दि , सुख , दु : ख , इच्छा , दोष , प्रयत्न , धर्म , अधर्म , संस्कार हे २४ धर्म . ३ सृष्टा , उत्पन्न केलेल्या वस्तूंचा धर्म . हे गुण तीन आहेत ; सत्व , रज , तम . हे ब्रह्मा , विष्णु . शिव यांचें अनुक्रमें लक्षण दर्शवितात . गुणीं देवां त्रयी लाविली - ज्ञा १८ . ८१७ . ४ उत्कृष्टता ; योग्यता ; व्यंगापासून अलिप्तता ; निर्दोषता . ५ उपयोग ; फायदा ; नफा ; फल ; लाभ . ६ निघालेलें फल , वस्तु , परिणाम , निपज ; उत्पन्न . ७ ( अंकगणित ) गुणून आलेलें फळ ; गुणाकार . ८ दोरी ; रज्जू . हें कर्माचे गुणीं गुंथलें । - ज्ञा १३ . ११०२ . मुक्तमोती लगसंपूर्ण । गुणेविण लेइलासे ॥ - एरुस्व १ . ३९ . ९ प्रत्यंचा ; धनुष्याची दोरी . गेला लक्ष्मण किष्किंधेतें गुण जोडुनि चापातें । - मोरामा १ . ५११ . १० ( समासांत ) - पट ; प्रमाण ; गुणाकार . जसें - अष्टगुण = आठपट ; सप्तगुण , इ० . शतकोटिगुणें तदधिक गमला शर निकर विखरितां पार्थ । - मोभीष्म ३ . ५६ . ११ उतार ; कमीपणा ( रोगाचा ). १२ ( अंकगणित ) गुणक . १३ ( भूमिति ) वर्तुळखंडाची ज्या . १४ दिव्याची वात . पै गुणुतेतुला खाय । - ज्ञा १३ . ७१९ . १५ परीक्षा उतरण्यासाठीं ठरविण्यांत आलेले संख्यांक ; ( इं . ) मार्क . १६ ( व्याक . ) संधि करतांना वगैरे स्वराच्या रूपांत होणारा फेरफार . [ इचा ए , उचा ओ , ऋचा अर , लृचा अल ] १७ वधुवरांचें घटित पाहण्याचे अंक . हे ३६ असतात . १८ ( ल . ) रोग ; व्याधि . म्ह० अठरा गुणांचा खडोबा . १९ प्रभाव ; परिणाम . संपत्ति हें एका तर्हेचें मद्य आहे , तें आपला गुण केल्याखेरीज बहुधा सोडणार नाहीं . - नि ५३ . [ सं . ] ( वाप्र . ) ०आठविणें ( मृत , गैरहजर मनुष्याच्या ) चांगल्या गोष्टी स्मरणें ; त्यांचा उल्लेख करणें . ०उधळणें पसरणें पाघळणें - स्वाभाविक वाईट , दुष्ट स्वभाव बाहेर पडणें ; वाईट गुणांचें आविष्करण करणें . पत्र पुरतें झाल्यावर सदाशिवराव म्हणाले हे आपल्या मातोश्रींनीं कसे गुण उधळले पहा । - रंगराव . ०काढणें १ दुर्गुण काढून टाकणें . २ यथेच्छ झोडपणें . बोलाचालीनंतर त्यांचे गुण चांगलेच बाहेर काढले . ०घेणें देणें - पिशाचादि बाधा न व्हावी म्हणून देवादिकांपासून कौल घेणें , देणें . ०दाखविणें गुणावर येणें - खरा स्वभाव दाखविणें . ०शिकविणें मारून शहाणा करणें ; गुण काढणें ०सोडणें विसरणें - सन्मार्ग सोडून वाईट मार्गास लागणें . गुणाची चहा करणें होणें - सदगुणावर प्रीति करणें , असणें ; चांगल्या गोष्टींचा सन्मान करणें . गुणाची माती करणें - सदगुणांचा , बुध्दीचा दुरुपयोग करणें ; अंगच्या चांगल्या गोष्टी , बुध्दि नासणें . गुणा येणें - सगुण होणें . गुणा आला विटेवरी । पीतांबर धारी सुंदर जो । - तुगा ७ . गुणास येणें पडणें - १ लागू होणें ; फळणें ; इष्ट परिणाम होणें . २ चांगल्या रीतीनें वागणें . म्ह० १ ढवळया शेजारीं बांधला पोंवळा वाण नाहीं पण गुण लागला . २ गुणा ; पूजास्थानम । = गुणामुळें माणसाला आदर प्राप्त होतो ; जेथें गुण तेथें आदर . सामाशब्द - गुणक गुणकांक - पु . ( गणित ) ज्या संख्येनें गुणतात ती संख्या . गुणक - वि . १ हिशेब ठेवणारा ; गणना करणारा . २ मध्य गुणक ; विशिष्ट शक्तीचें , गुणाचें मान दाखविणारा वर्ण , जात . [ सं . ] ०कथा स्त्री. १ ईश्वराच्या गुणांचें कीर्तन , प्रशंसन . गुणकथा श्रवणादि साधनें । करुनि सेवटीं आत्मनिवेदन . २ ( सामा . ) गुण , ईश्वरी देणगी , स्वधर्म इ० विषयीं स्तुति . गुणकप्रमाण - न . ( गणित ) गुणाकारानें वाढणारें संख्येचें प्रमाण . १ . ४ . ८ . १६ . इ० प्रमाण ; ( इं . ) रेशिओ . ०कर कारक कारी गुणकारीक - वि . ( अशुध्द ) १ गुणावह ; गुण करणारें , देणारें . २ परिणामी ; प्रभावी . गुण गुणकर - वि . ( काव्य ) गुणसंपन्न ; बुध्दि , सुलक्षण , सदगुण यांनीं युक्त ( मूल ). ०गंभीर वि. चांगल्या गुणांनीं युक्त . उदारधीर गुणगंभीर । [ सं . ] ०गहिना स्त्री. गुणवती व रूपवती स्त्री . जेव्हां जिवाला वाटेल तुमच्या आतां पाहिजे गुणगहिना । - सला ६ . ०गान गाणें - न . गुणांचें स्तवन , गायन , प्रशंसा , प्रशस्ति ; गुणकथा . [ सं . ] ०ग्रहण न. गुण ओळाखणें ; गुणाची चहा ; गुणीजनांचा परमर्ष , आदर करणें - उमगणें . [ सां . ] ०ग्राम निधि पात्र राशि सागर गुणासर गुणाची रास खाण - वि . सर्वगुणसंपन्न ; सुलक्षणी ; सदगुणी ; अनेककलाकोविद . ०ग्राहक ग्राही - वि . गुणांचा भोक्ता , चहाता ; गुणांचें चीज करणारा ; गुण ग्रहण करणारा ; दुसर्याचे गुण ओळखून संतोष मानणारा . [ सं . ] ०घाती वि. गुणदूषक ; निंदक ; हेटाळणी करणारा . [ सं . ] ०ठेली स्त्री. गुणांची थैली ; गुणखनि . सुतारुण्यें तारुण्य गुणठेली । - आपू १० . [ सं . गुण + स्था - थैली ] ०गुणत क्रिवि . गुणाप्रमाणें ; गुणानुरोधानें . [ सं . ] : क्रिवि . गुणाप्रमाणें ; गुणानुरोधानें . [ सं . ] ०त्रयविरहित वि. वरील तीनहि गुणांविरहित असा ( ईश्वर ); निर्गुण . गुणत्रयविरहित अगम्य तूं । [ सं . ] ०दोष पुअव . चांगले वाईट गुणधर्म ; सुलक्षणें आणि कुलक्षणें . नको माझे कांहीं । गुणदोष घालू ठायीं । ०दोषपरीक्षा स्त्री. गुणदोषांची चौकशी , छाननी , तपास . ०धर्म पु. गुणलक्षण , स्वभाव ( बरा किंवा वाईट ; गुण अर्थ १ पहा . गुणन - न . १ गुणाकार ; मोजणी ; गणना . गुणनिधान , निधी - न . गुणांचा साठा ; गुणग्राम पहा . त्याची कन्या चिद्रत्न लावण्यागुणें गुणनिधान । - एरुस्व ३ . ४६ . गुणनीय - वि . गणण्यास , गुणण्यास योग्य . ०पंचक न. आधिभौतिक वस्तूंचा मूळभूत पांच गुणांचा समाहार ( पृथ्वी , आप , तेज , वायु व आकाश , किंवा शब्द , रूप , रस , गंध व स्पर्श ). गुण पंचकें धरित्री आथिली । ०परिणाम पु. मूळ वस्तूचें तात्त्विक स्वरूप कायम राहून त्यास दुसरें नांव - रूप प्राप्त होणें . उदा० काथ्याची दोरी होणें , दुधाचें दहीं होणें - गीर २३९ . ०परिणामवाद पु. त्रिगुणात्मक प्रकृतींतील गुणांच्या विकासानें किंवा परिणामानें व्यक्त सृष्टि निर्माण होते असें मत ( सांख्य मत ). - गीर २३८ . ०भूत वि. १ गौण ; दुय्यम प्रतीचें . २ वरून , पासून निघणारें ; अनुकल्पित . ०माया स्त्री. त्रिगुणांनीं युक्त असलेली माया . मुळीं झाली तें मूळ माया । त्रिगुण झाले ते गुणमाया । - दा ११ . १ . ९ . - भज ३५ . ०वचन वाचक - न . गुण दाखविणारें वचन , शब्द , विशेषण . ०वंत वान - वि . गुणसंपन्न . ०विशेषण न. ( व्या . ) विशेषणाचा एक प्रकार ; हा नामाचे गुण दाखवितो . ०वेल्हाळ वेल्हाळी - विपुस्त्री . ( काव्य . ) गुणांनीं आकर्षिलेला , आकर्षिलेली ; मोहित ; परितुष्ट . ०वेषम्य न. गुणत्रयांचें ( सत्व - रज - तम ) विषम मिश्रण . याच्या उलट गुणसाम्य . ०सुशीळ वि. ( काव्य . ) गुणी व शीलवान ; चांगल्या गुणांचा , स्वभावाचा . पतिसेवे सदा अनुकूल । सत्य वचनीं गुणसुशीळ । ०स्तुति स्त्री. गुणांची प्रशंसा . ०हीन वि. १ गुणविरहित ; गुणाशिवाय . २ दुर्गुणी . ०क्षोभणी क्षोभिणी माया - स्त्री . माया ; त्रिगुणाची साम्यावस्था मोडणारी ( माया ); मूळ मायेंतील गुप्त असलेले त्रिगुण जेव्हां स्पष्ट होतात तेव्हां तिला गुणक्षोभिणी म्हणतात . पष्ट होती संधी चतुरी । जाणावी गुणक्षोभिणी । - दा ९ . ६ . ६ . गुणज्ञ - वि . गुणग्राहक . जाणता ( विद्यादि गुणांचा ) पहा . गुणांक - पु . ( गणित ) गुणाकार . गुणांकभागोत्री - स्त्री . १ गुणाकार व भागाकार . २ ( व्यापक ) अंकगणित ; गणित . तुझा पंतोजी कांहीं गुणांकभागोत्री शिकवतो कीं नाहीं ? गुणाकार - पु . १ गुणांक ; गुणनाचें फळ ; गणिताचा एक प्रकार ; गुणकांकाने गुण्यांकास गुणणें . याचे कांहीं प्रकार :- कोष्टकी - धांवरा - बैठा - विविध गुणाकार इ० कपटसिंधु पहा . २ गुणणें ; गुणाकार करणें . [ सं . गुण ; म . गुणणें ] गुणा गुणाकारक गुणाकारी - वि . गुणकारक - कारी पहा . गुणागुण - पु . गुण आणि अवगुण ; गुणदोष . गुणाचा - वि . भलेपणा , चांगले गुण अंगीं असणारा ; विविध गुणांचा . गुणांचें गुणपात्र लेंकरू - न . ( ल . उप . ) अट्टल लुच्चा ; लबाड ; सोदा . गुणाचें गुणपात्र हातीं फुलपात्र . गुणाढय - वि . १ गुणसंपन्न . २ एक प्रसिध्द कवि . बृहत्कथेचा कर्ता . [ सं . ] गुणातीत - व . गुणविरहित ; निर्गुण . ( ईश्वर ) गुणानुवाद - पु . गुणांची वाखाणणी ; गुणकीर्तन ; प्रशंसा . गणानुवादकीर्तन - न . गुणांचें स्तवन . गुणावह - वि . गुण देणारें ; गुणकारक ; परिणामी ; प्रभावी ( औषध वगैरे ). गुणांश - पु . १ गुणकारीपणा ; प्रभाव ; सुपरिणाम . हा जें औषध सांगतो त्याचा गुणांश केवढा ? २ परिणाम ; फळ ; यश . त्या औषधानें अद्यापि गुणांश आला नाहीं . गुणित - वि . ( गणित ) गुणलेलें . गुणेंगोविंदें गुण्यागोविंदें गुणेंगोविंदानें गुण्यागोविंदानें - क्रिवि . १ शांततेनें ; भांडणतंटा न करितां ; मुकाटयानें ; आनंदानें ; स्वेच्छेनें . पक्षीही लहान । घरटीं बांधुन । गुण्यागोविंदानें मला दहा वेळ पलंगावर पालवा । - प्रला ३ चांगल्या प्रकारानें , रीतीनें . गुणोत्कर्ष - पु . गुणांचें वैपुल्य , विकास , वाढ . गुणोत्कीर्तन - न . गुणांचें कीर्तन ; गुणानुवाद ; प्रशंसा . गुणोत्तर - न . ( गणित ) संख्यांची , दोन परिमाणांची पट , हिस्सा , प्रमाण ; भूमितिश्रेणींतील पदांमधील गुणोत्तर निघतें गुण्य - क्रि . १ जिला गुणावयाचें ती संख्या . २ गुणण्यास , गणण्यास योग्य . [ सं . गुण = मोजणें ] गुण्यांक - पु . गुण्य संख्या .
|