|
न. उसनी दिलेली , परत यावयाची रक्कम , प्राप्ति . घेणें - देणें पहा . सामाशब्द - स.क्रि. १ स्वीकारणें ; अंगीकारणें ; ( आपल्या ) हातांत येईलसा करणें . त्यांत घेऊं ये तितुकें घ्यावें । - दा १५ . ९ . ३२ . घेयीं तूं मधुपर्क पावन बरें सध्देमपात्रीं असे । - निमा १ . १३ . २ धरणें ; पकडणें ; हिसकणें ; झोंबाडणें . जे घेय हातीं बरवी विपंची । - सारुह १ . २ . ३ लागणें ; बसणें ; मिळणें ( मार इ० ). तेथें गेलास तर मार घेशील . ४ समजणें ; मानणें . येथ दुजें नाहींचि घेई । सर्वत्र मी गा । - ज्ञा १५ . ४११ . ५ ऐकणें . वाक्य घेऊनि हरुषली आई । - दावि १६० . तुवां सजणे हा समाचार घेतां - र ११ . ६ समाविष्ट , प्रविष्ट , अंतर्भूत करणें ; आंत येऊं देणे . त्या माणसास जातींत घेतलें . ७ कवटाळणें ; कैवार घेणें ; पत्करणें ; स्वीकारणें ; अंगीकारणें ; उचलणें ( पक्ष , बाजू , धर्म इ० ). त्यानें ख्रिस्ती धर्म घेतला . ८ कबूल , मान्य करणें ; मान्यता देणें ; संमति , अनुमोदन देणें ; ग्राह्य समजणें . त्या आशंकेचें ह्यानें समाधान केलें तें तुम्ही घेतलें काय ? ९ योग्यता , किंमत जाणणें ( गुणांची ); आदरणें ; चांगलें लेखणें ( गुणाबरोबर उपयोग ). १० मनांत आणणें . बाळगणें , ठेवणें ( शंका , संशय , तिरस्कार इ० ). मागें हांसति गौळणी हरिपुढें ह्या घेतलीसे भ्रमें । - आकृष्ण ३८ . ११ आविर्भाव आणणें ; पांघरणें ; बळेनें धारण करणें ( वेड , सोंग इ० ). १२ ( भय , रोग , मोह इ० कांच्या ) ताब्यांत जाणें ; ( ज्वर , भय , मोह , दुखणें इ० कांनीं ). घेरलें जाणें ; व्यथित होणें आणि तेणें आपुलेपणाचेनि मोहें । तुम्ही संत घेतले असा बहुवें । - ज्ञा ९ . १७ . नुघडि नेत्र घे भीतिला । - केका १० . १३ मुकवणें ; हरण करणें ; नाश करणें ; बुडविणें ( प्राण , शील इ० ). १४ छाटणें ; तोडून टाकणें ; कापणें . तुझें नाक - कान घेईन . ह्या भाताचें शेंडे चार चार बोटें घेतले म्हणजे पडणार नाहीं . १५ लागणें ; आवश्यकता असणें ; खर्ची पाडणें ; खपवणें ; अटवणें ; खाणें ( वेळ , स्थळ , शक्ति ). हें काम दोन वर्षे घेईल . हें गांठाळ लांकूड फोडण्यास फार बळ घेतें . १६ खडकावणें ; खडसणें ; ठोक देणें ; मारणें . मी त्याला भल्लें घेतलें . १७ विशिष्ट आचरण , वर्तन , कृति करणें ( उ० शोध , वाद , गांठ , लढाई , माप घेणें ); शोध घेणें = तपास करणें ; चौकशी करणें ; वाद , लढाई , माप घेणें = वाद , लढाई उपस्थित करणें ; माप घेणें = मोजणें ( लांबी , रुंदी इ० मध्यें ); उडी घेणें = उडी टाकणें ; गांठ घेणें = बांधणें इ० . १८ हस्तगत करणें ; मिळवणें ; पैदा करणें ; शोधून , मिळवून आणणे ; संपादन करणें ( खबर , बातमी , चाहूल , पायरव ) १९ हातानें देणें ; उचलून देणें ; जवळ नेणें . ( ह्या अर्थी नेहमीं आज्ञार्थीच प्रयोग होतो ). ती दौत इकडे घ्या . २० जोडणें ; मिळविणें ; स्वत : वर आणणें ; ओढून घेणें ( उपहास , निंदा , मार ); विषय होणें ( निंदा , मार इ० चा ). अरे पोरा दाटीमध्यें तुडवून घेशील . मारून , हांसून , घांसून , नागवून घेशील . २१ पलीकड जाणें ; ओलांडणें ( डोंगर , विशिष्ट स्थिति ); संपविणें ; शेवटास नेणें ; सिध्दीस नेणें ( प्रवास , मजल इ० ). त्यानें दहा कोसांची मजल घेतली . २२ जोडणें ; सामील करणें ; वाढविणें . हा ओटा फार अरुंद झाला , आणखी दोन हात घे . २३ स्वत : स जोडणें ; जडवून घेणें ; लावून घेणें ( संवय , खोड , व्यसन ). २४ आणणें ; घालणें ; माथीं मारणें ; अंगाला चिकटविणें ( आरोप , आळ , बालंट , तुफान ). २५ ( एखाद्या वस्तूनें दुसर्या वस्तूचा स्वत : वर ) परिणाम होऊं देणें ; विकार पावणें ; परिणाम लागू करून घेणें . ओलें लांकूड आग घेत नाहीं . तेलकट वस्त्र पाणी घेत नाहीं . २६ जवळ येऊं देणें , पाजणें . ती गाय वासरूं घेत नाहीं . २७ मारणें ; बळी घेणें ; नाश करणें . ही नदी , हें तळें , ती विहीर वर्षात एक माणूस घेते . माझा भाऊ भुतानें घेतला . २८ जाणें ; पळून जाणें ; एखाद्याचा आश्रय करणे . काळयवन भेणें थोर । तेणें घेतलें गिरिकंदर । २९ स्थापणे ; ठेवणें ; आदरानें स्पर्श करणें . येऊनि तुजजवळीं । चरण घेतिल तव भाळीं । - रत्न १७ . ३० वळणें ; कल होणें ; एखादी गोष्ट करावयास तयार होणें ( मन इ० नी ). त्यामुळे ह्याचा शब्दश : अर्थ करण्यास आमचें मन घेत नाहीं . - मसाप २ . ११७ . ३१ ( बुध्दिबळांचा खेळ ) एकानें दुसर्याचें मोहरें मारणें . ( कित्येक वेळीं क्रियापदाच्या पुढें घेणें याचें रूप मन सोक्तपणें लावतात . अशा ठिकाणीं तें कारक हा क्रियेचा कर्ता आहे असें दाखवितें ; तर कांहीं ठिकाणीं शब्दावर जोर देण्याकरितां त्याचा उपयोग करतात ; विशेषत : कर्त्याविषयीं जोरानें बोलावयाचें असल्यास क्रियापदास जोडून घेणें याचा प्रयोग करतात . परंतु सामान्यत : अशा वाक्यरचनेनें विशेष अर्थ ध्वनित होत नाहीं व वाक्य चांगल्या रीतीनें पुरें करण्याकरतांच केवळ याचा उपयोग करतात . पोरानें हात पाळून घेतला . कांहीं वेळां एखादी क्रिया आटोपून , उरकून टाकणें या अर्थी पूर्वकालवाचक धातुसाधितास घेणें हा शब्द जोडतात . उ० स्नान करून घ्या ; मी भात शिजवून घेतों ; हें तुम्ही शिजवून घ्या . इतक्या ब्राह्मणांस गंध लावून घेतों आणि वाटी स्वाधीन करतों ). घेऊं देणें - या शब्दसंहतीचा उपयोग पूर्वकालवाचक धातुसाधितांना जोडून करतात . अशा वेळीं त्याचा अर्थ एखाद्यास एखाद्या क्रियेचा विषय , त्या क्रियेच्या आधीन होऊं देणें किंवा एखाद्यानें स्वत : करतां एखादी गोष्ट करणें असा होतो . जसें - रडून - जेवून - पिऊन - बसून - उठून - धुवून - घेऊं दे . घे म्हटाल्या , घे म्हटल्यावर - क्रिवि . ( जी जी गोष्ट , कृत्य करतां येईल ती ती गोष्ट , कृत्य करण्याला जे धडकावतात अशा अडदांड व तापट लोकांच्या रीतीला अनुलक्षून हा विशिष्ट प्रयोग रूढ झाला आहे ) उतावीळपणानें ; एकदम ; विचार न करतां . तो घे म्हटल्या शिव्य देणार नाहीं . घ्या - क्रि . इकडे पहा ; हं पहा ( लक्ष्य वेधण्याकरतां याचा उपयोग करतात ) ( घेणें ह्या क्रियापदाचे निरनिराळया संबंधांत अनेक प्रयोग होत असल्यानें ह्या स्थळीं सर्व देतां येणें शक्य नाहीं ). उत्थापन - घर - चालीवर - जागा - शेवट - तोडीवर - त्वरेवर - घाव - परीक्षा - पाठ - रान - इ० अनेक शब्दांना जोडून घेणें या क्रियापदाचा प्रयोग होतो . त्याचप्रमाणें देणें ; टाकणें ; मारणें ; घालणें व पाडणें या धातूंप्रमाणें अनेक धातुसाधितांना जोडूनहि घेणें शब्दाचा प्रयोग करतात . उ० आटोपतां - कांकरतां - चालतां - काढतां - घेणें . श्वास , रजा , सूड इ० शब्दांना जोडूनहि घेणें या क्रियापदाचा उपयोग होतो . शिवाय उपयोग करणें ; गिळणें ; सहन करणें ; सोसणें ( रोग , व्यसन इ० ); जडवून घेणें इ० अनेक अर्थ होतात . म्ह० घेऊं जाणतो , देऊं जाणत नाहीं . [ सं . ग्रह ; प्रा . गेण्ह ; झें . गेरेप ; गॉ . ग्रेइप ; जर्म , ग्रेफ ; लिथु . ग्रेब्जु ; स्ला . ग्रॅबल्जु ; हिब्रू ग्रबैम ; ग्रो . ग्रीफॉस ; लॅ . गेरो ; पोलि . गार्निआक ] ०करी दार - वि . १ सावकार ; धनको ; कर्जदार . २ कांहीं एक काम न करतां जो पोटभर खाण्यास मिळण्याचा हक्क सांगतो तो ( नातेवाईक मनुष्य , आजारी नोकर ). [ घेणें + करणें ; घेणें + फा . दार ] ०देणें न. १ उसनें देणें व घेणें ; देवघेव ; व्यवहार ( एखाद्याशीं करण्याचा ). मग सुखानुभूतीचीं घेणीं देणीं । मंदावों लागती । - ज्ञा १६ . १२ . २ व्यापार ; दळणवळण ; उदीम . [ घेणें + देणें ]
|