|
पु. - रंग , रुप वगैरे जाणण्याचे इंद्रिय ; नेत्र ; दृष्टि ; नयन ; नेत्रेंद्रियाचे स्थान .
- दृष्टि ; नजर ; लक्ष ; कटाक्ष .
- लहान भोंक ; छिद्र ( कापड , भांडे इ० चे ).
- मोराच्या पिसार्यावरील डोळ्याच्या आकाराचे वर्तुळ ; नेत्रसदृशचिन्ह ; चंद्र ; चंद्रक.
- अंकुर , मोड फुटण्याची , येण्याची जागा ( बटाटा , ऊंस नारळ इ० स ).
- पायाच्या घोट्याचे हाड ; घोटा .
- गुडघ्याच्या वाटीजवळ दोन खळगे असतात ते प्रत्येक .
- माहिती सांगणारा ; ज्ञान देणारा ( माणूस , विद्या इ० ); बातमीचा , ज्ञानाचा उगम ( शास्त्र , कागदपत्र , हेर , गांवचा महार इ० ). धर्माधर्म ज्ञान समजण्याचा डोळा धर्मशास्त्र . पांढरीचे डोळे महार .
- माशाच्या पाठीवरील खवला ; सीताफळ , रामफळ , अननस इ० फळावरील खवला , नेत्राकार आकृति .
- ( खा . ) १६ शेराचे माप ; परिमाण , एकतृतीयांश पायली ( ४८ शेरांची ). १२ डोळे = एक माप व ६० मापे = एक साठ ).
- कुंभाराच्या चाकांतील एक खांच .
- (सोनारी ) जिन्नसाच्या इतर अंगापेक्षा तोंडाशी किंचित वाटोळा व डगळ असणारा भाग .
- दुर्बिणीचे आपल्याकडे असलेले भिंग .
- जात्याचे तोंड .
- मोटेस बांधावयाचे लाकण .
- ( विटीदांडू , कर ). आर डाव ; वकट , लेंड इ० मधील डोळ्यावरुन विटी मारण्याचा डाव . ( क्रि० मारणे . ) [ देप्रा . डोल ] ( वाप्र . )
डोळा उघडत नाही एखाद्या , गर्विष्ठ मगरुर माणसाबद्दल किंवा पाऊस एकसारखा पडत असल्यास म्हणतात .
डोळा ओळखणे दुसर्यास मनाचा कल समजणे , आशय , अभिप्राय ताडणे . डोळा काणा असावा मुलूक काणा असू नये दृष्टीला अंधत्व असले तरी चालेल परंतु अव्यवस्था असू नये . डोळा घालणे - मारणे - डोळा मिचकावून खूण करणे .
- आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी एखाद्या ( बाई ) कडे पाहून डोळे मिचकावणे .
डोळा चुकविणे दृष्टीस न पडणे ; भेट घेण्याचे टाळणे ; नजरेला नजर भिडू न देणे. डोळा ठेवणे एखाद्या वस्तूच्या प्राप्तीची इच्छा करणे . डोळा जाणणे - समजणे - ताडणे मनांतील गोष्ट जाणणे . डोळा देणे बारीक नजर ठेवणे . गृध्रासम डोळा दिधला . - संग्रामगीते ४१ . डोळा न फुटे काडी न मोडे या रीतीने करणे अगदी लक्षपूर्वक , कौशल्याने काम करणे . डोळा पाहणे डोळे वटारुन पाहणे . डोळा प्राण ठेवणे डोळ्यांत प्राण ठेवणे पहा . माझी माता शोके करुन । डोळा प्राण ठेवील की । डोळा बांधणे दुसर्या झाडाच्या फांदीला सालीमध्ये खांच करुन निराळ्या झाडाचा डोळा कापून बसविणे . डोळाभर झोप चांगली झोप . डोळे उगारणे - गुरकावणे डोळे वटारणे . डोळे उघडणे आपले कर्तव्य , हिताहित वगैरेकडे लक्ष वेधणे ; सावध होणे . अनुभवाने ;
चट्टा बसल्याने ; नुकसान झाल्याने शहाणे होणे . आता तरी याचे डोळे उघडले
असले म्हणजे पुष्कळच चांगले झाले म्हणायचे . - उषःकाल . डोळे उरफाटणे - फिरणे - चढणे ( श्रीमंतीमुळे ) मदांध होणे . डोळे ( मोठे , केवढे ) करणे डोळे वटारणे ; रागावून पहाणे . मी नुसते त्याचे नांव घेतले मात्र तो
बाईसाहेबांनी केवढे डोळे केले ते तू पाहिलेस ना ? - फाल्गुनराव . डोळे खाणे पेंगणे ; डुलकी घेणे . डोळेगांवची कवाडे लागणे ( मी , तो इ० ) अंध होणे . डोळे चढणे ( दारुने , जाग्रणाने , उन्हाने , रागाने ) डोळे उग्र दिसणे . डोळे चढवून बोलणे रागाने बोलणे . डोळे जळणे द्वेषामुळे बरे न पाहवणे ; जळफळने. डोळे जाणे अंधत्व येणे . डोळे झांकणे , ढापणे - मरणे .
- दुर्लक्ष , हयगय करणे ; कानाडोळा करणे ; डोळझांक करणे .
- डोळे मिटणे ; प्राण सोडणे .
डोळे टळटळीत भरणे अश्रूंनी डोळे भरुन येणे . डोळे तळावणे - खुडकणे डोळे लाल होणे , उष्णतेने बिघडणे . डोळे तांबडेपिवळे करणे रागाने लाल होणे ; उग्र नजरेने , डोळे फाडून पाहणे . डोळे निवणे , निवविणे - थंड होणे एखादी ईप्सित प्रिय वस्तु पाहून समाधान पावणे ; कृतकृत्य होणे . कृष्णा
म्हणे निवविले डोळे त्वां बा यदूत्तमा माजे । - मोऐषिक ३ . ३१ . डोळे पठारास , पाताळांत जाणे आजार , अशक्तता इ० मुळे डोळे खोल जाणे . डोळे पांढरे करणे - ( डोळे पांढरे होईपर्यंत ) अत्यंत क्रूरपणाची शिक्षा देणे .
- मृत्युपंथास लागणे .
डोळे पापी डोळ्यांना नेहमी विलासी , विषयी , कामुक असे मानण्यात येते ; प्रथम पाप करतात ते डोळेच . डोळे पाहून वागणे - चालणे एखाद्याच्या मनाचा कल पाहून वागणे ; तब्येत ओळखणे . डोळे पिंजारणे - फिंदारणे - फाडणे ( रागाने ) डोळे वटारणे ; क्रूर मुद्रा करणे ; डोळे पुसणे - रडावयास लागणे ; वाईट वाटणे .
- सांत्वन करणे .
डोळे पोंढळणे डोळे खोल जाणे . डोळे फाटणे - आशा जास्त जास्त वाढणे ; महत्त्वाकांक्षी बनणे .
- आश्चर्यचकित होणे .
डोळे फोडणे - रागावणे ; डोळे वटारुन पाहणे .
- अंतकाळी डोळे निश्चळ उघडे ठेवणे ; डोळे थिजणे .
डोळे फिरणे - घेरी , चक्कर येणे .
- ( ल . ) मगरुर , उन्मत्त होणे .
- (मरणसमयी ) डोळे फिरवू लागणे .
- ( करारासंबंधी ) बेत फिरणे ; मत
बदलणे ; माघार घेणे .
डोळे फिरवणे ( रागाने ) डोळे वटारणे ; चेहरा उग्र करणे ; अवकृपेने पाहणे . डोळे फुटणे - अंध होणे ; डोळे जाणे .
- दुसर्याचा उत्कर्ष पाहून मत्सरग्रस्त होणे .
डोळे फोडून वाचणे लक्षपूर्वक वाचणे . डोळे बांधणे - भारणे ; नजरबंदी करणे ( जादूटोणा इ० नीं ).
- डोळ्यात माती फेकणे ; फसविणे .
डोळेभर - डोळ्यांभर पाहणे , डोळे भरुन पाहणे तृप्ती होईपर्यंत एखादी वस्तु पाहणे . डोळे मिटणे मरणे ; डोळे झांकणे . आदिमाये , माझ्या डोळ्यांनी हे पाहण्यापूर्वी माझे डोळे का मिटले नाहीत . - बाय ५ . २ . डोळे मुरडणे - वांकडी नजर करुन , संशयित नजरेने पाहणे .
- काण्या डोळ्याने पाहणे ;
एके बाजूस पाहणे . डोळे मुरडुनि सहज बघे ती । - शाकुंतल अंक २ .
डोळे मोडणे - मारणे - डोळे मिचकावणे ; डोळ्याने खुणा करणे . डोळे मोडूनि वांकुल्या दावी ।
घुलकावित मान पै ।
- ऐटीने , चोखंदळपणाने डोळे उचलणे , वर करणे ;
नखर्याने पाहाणे .
डोळे येणे अंधत्व जाऊन दृष्टि प्राप्त होणे . डोळे येणे - विणे डोळ्यांस रोग येणे . डोळे लवणे डोळ्याच्या पापणीचे स्फुरण होणे . ( शुभाशुभसूचक ). पुरुषांचा उजवा व बायकांचा डावा डोळा लवणे हे शुभसूचक लक्षण समजतात . डोळे लाल करणे - वटारणे - रागावणे .
- एखाद्यावर उलटणे .
डोळे होणे माहिती होणे - सावध होणे ( कामधंदा , अभ्यास इ० संबंधी ). डोळ्याआड नजरे पलीकडे , पाठीमागे डोळवस पु . डोळसपणा . आत्मा स्वयंप्रकाश । जेणे जन होय डोळस । तया डोळ्या डोळवस । विपु ७ . ११६ . डोळ्यांचा अंधार करणे उजेडांत चुकणे ; धडधडीत चूक करणे . डोळ्यांची खोगरे - डोळ्यांच्या खाचा - डोळ्यांची भिंत होणे काही एक दिसेनासे होणे ; दृष्टि जाणे . डोळ्यांचे पारणे फिटणे - होणे उत्कंठेने अपेक्षिलेली वस्तु पहावयास मिळणे ; फार दिवस इच्छिलेली गोष्ट घडून येणे . डोळ्यांच्या वाती करणे डोळे ताणणे ; डोळ्यांनी जास्त काम करणे . डोळ्यांत कुरुप - कुरुंद असणे असूया वाटणे ; एखाद्याविषयी मत्सरग्रस्त असणे . डोळ्यांत खुपणे - सलणे - डोळ्यांस वेदना होणे .
- ( ल . ) मत्सरग्रस्त होणे ;
द्वेषबुद्धीयुक्त , कलुषित मन असणे ( दुसर्याचे गुण , धन इ० पाहून )
डोळ्यांत गंगाजमना येणे - डोळे भरुन येणे रडू येणे . डोळ्य़ांत जहर उतरणे दुसर्याचे वैभव इ० पाहून हेवा वाटणे ; डोळ्यांत सलणे , खुपणे . डोळ्यांत तेल घालून जपणे सूक्ष्म नजरेने पाहणे ; पाळत ठेवणे ; बारीक चौकशी करणे . डोळ्यांत धूळ , माती घालणे - फेकणे फसविणे ; नजरबंद करणे . डोळ्यात पाणी असणे लाज वाटणे ; विनय , मर्यादा असणे . डोळ्यात पाणी नसणे लाज न वाटणे ; आदर न वाटणे ; निर्लज्ज बनणे . डोळ्यात प्राण ठेवणे एखादी गोष्ट पाहिल्यावर मग मरावयास तयार असणे ; मरणापूर्वी एखाद्या गोष्टीची इच्छा धरणे . डोळ्यात प्राण येणे - उरणे - मरणाच्या द्वारी असणे .
- इच्छित वस्तु ( माणूस इ० ) पाहण्या - मिळण्याकरताच केवळ फक्त प्राण गुंतलेले असणे .
डोळ्यात बोट घातले तरी दिसत नाही अतिशय निबिड काळोख पडला असता म्हणतात . डोळ्यात भरणे - दृष्टीला आनंद , संतोष देणे .
- पटणे ; मान्य होणे .
डोळ्यात माती पडणे - मत्सर वाटणे ; द्वेष करणे . डोळ्यात वात घालून बसणे ताटकळत , वाट पहात मार्गप्रतीक्षा करणे . डोळ्यात शरम नसणे निर्लज्ज बनणे . डोळ्यात हराम उतरणे एखाद्याच्या दृष्टीने वाईट असणे . डोळ्यातील काजळ चोरणे पाहता पाहता चोरी करणे . डोळ्यातून उतरविणे अपमान करणे . डोळ्यातून पाणी काढणे रडणे , अश्रू गाळणे . असे वारंवार डोळ्यांतून पाणी काढत राहू नये . - रत्न ४ . ४ . डोळ्यांनी उजेडणे सारी रात्र जागून काढणे . डोळ्यांनी मारणे प्रेमकटाक्षांनी प्रहार करणे ; प्रेमकटाक्ष टाकणे . डोळ्यांनी रात्र - दिवस काढणे एकसारखे जागत बसून रात्र - दिवस घालविणे . डोळ्याने भुई दिसेनाशी होणे उन्मत्त होणे ( संपत्ति इ० नीं ). डोळ्यापुढे काजवे चमकणे भोवळ येण्याची भावना होणे ; घेरी येणे . आले डोळयाला बहु वर्षाकाली जसे नदी पाणी । - मोशल्य ३० . २० . डोळ्यांवर कातडे ओढणे - एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे .
- बेदरकारपणे ; बेफामपणे वागणे .
डोळ्यांवर धूर येणे - धूराने डोळे भरणे (अधिकार , संपत्तीने ताठणे ; फुगून जाणे . गर्वाने कोणास न जुमानणे . डोळ्यांवर येणे - डोळ्यांत सलणे .
- ( कीर्ति , पैका यांनी ) पूर्णपणे फुगून जाणे ; धुंद होणे .
डोळ्याशी डोळा मिळविणे - भिडविणे ( एकमेकांकडे पाहणे ) नजरेशी नजर भिडविणे ; उद्धटपणाने टक लावून पाहणे . डोळ्याशी डोळा लागणे झोप येणे , झोपेने डोळे मिटणे . डोळ्यांस टिपे येणे डोळ्यात अश्रू येणे . डोळ्यांस पाटा ( पट्टा ) बांधणे डोळे मिटणे ; कानाडोळा करणे ; न पाहिल्यासारखे करणे . डोळ्यांस पाणी लावणे अनुकूल करुन घेणे ; संतोषविणे . आताशा उगेच बाबाच्या डोळ्यांस पाणी लावण्यासाठी इकडे येते . - रत्न ३ . ३ . डाव्या डोळ्याने - तिरस्काराने . डाव्या डोळ्याने तुमच्याकडे पाह्यचेसुद्धा नाहीत . - झांमू ६१ .
- चोरुन , वाकड्या नजरेने
दोहो डोळ्यांची मुरवत राखणे एखाद्याकडे पहावयास , नजर भिडवावयास भिणे , कचरणे . दुसर्याच्या डोळ्यांत बोट टपकन जाते - शिरते दुसर्याचे दोष चटकन कळतात . दोषैकदृष्टीबद्दल वापरतात . रुप्याचे डोळे होणे डोळे पांढरे होणे ; मरणोन्मुख होणे . वांकड्या डोळ्याने पाहणे कानाडोळा करुन पाहणे . भीतभीत पण उत्कट इच्छेने पाहणे . म्ह०
- दोन डोळे शेजारी भेटत नाही संसारी = शेजारी राहत असूनहि क्वचितच भेटत
असलेल्या मित्रांसंबंधी योजतात .
- डोळ्यात केर व कानांत फुंकर = रोग एक व
उपाय भलताच !
- फुटका डोळा काजळाने साजरा = व्यंग झांकण्याचा प्रयत्न .
डोळुला पु . सामाशब्द ( लडिवाळपणे ) डोळा . वाटुली पाहता सिणले डोळुले । दाविसी पाउले कै वो डोळा । - तुगा ८२९ . डोळे उजेडी क्रिवि . - दिवसा उजेडी ; अंधार पडण्याचे पूर्वी ; उजेड आहे तो .
डोळेउजेडी घरी ये .
- स्पष्टपणे ; उघड ; तोंडावर ; आड पडदा न ठेवता .
तुझे मनात काय ते डोळेउजेडी सांग . [ डोळा + उजेड ]
डोळे झांक - की स्त्री . मुद्दाम दुर्लक्ष ; कानाडोळा ; हयगय ; उपेक्षा . [ डोळे + झांकणे ] डोळे झांकणी , डोळे झांकण्याचा खेळ स्त्रीपु . एक खेळ . डोळे झांकणे - झांपणी - ढाळणे - ढांपणे - बांधणे नस्त्री . बैलाच्या डोळ्यांवरची झांकणी ; ढापणी . डोळे फुटका वि . दृष्टी गेलेला ; आंधळा . डोळेफोड स्त्री . - बारीक पाहणी , चौकशी ; तीक्ष्ण नजर .
- डोळे त्रासले
जावयाजोगी किचकट कामामध्ये मेहनत .
वि . - डोळे त्रास देणारे (
कलाकुसरीचे , बारीक काम ).
- डोळ्यास हिडिस दिसणारी ; ओंगळ ( वस्तु ).
- डोळ्यात भरणारी पण निरुपयोगी सुंदर पण टाकाऊ . ही गाय डोळेफोड मात्र
दिसते पण दूध तादृश नाही . [ डोळा फोडणे ]
डोळे भेट स्त्री - शेवटची भेट ( मुलाची व मरणोन्मुख आईबापाची भेट ); नुसते
एकदा शेवटचे डोळ्यांनी पाहणे .
- ओझरती , उभ्या उभ्या भेट ; घाईची भेट .
- नजरानजर ; दृष्टीस पडणे . डोळेभेट तरी दुरुन देत जा नको करु हयगय ।
होला १५१ .
डोळे मिचका - मिचक्या वि . डोळे पिचक्या ; डोळे मिचकावणारा . डोळेमोड स्त्री . नेत्रसंकेत ; डोळे मिचकावणे . डोळेमोडणी वि . डोळे मोडणारी ( मूढ होऊन ); डोळे फिरविणारी . चौघी डोळेमोडण्या । लाजोनिया तटस्थ । - ह ३ . ५ . डोळेलासु वि . डोळ्यांत अंजन घालणारा ; वठणीवर आणणारा . साभिमानिआ देवां डोळेलासु । - शिशु १५६ . [ डोळा + लासणे = डाग देणे ] डोळ्याचा त्रास - दाब पु . डोळ्याने भीति घालणे ; दाबणे ; भेदक नजर . डोळ्याचा मद पु . डोळ्याची लाली , लालबुंदपणा ( मद्यपान , क्रोध , गर्व इ० मुळे ). डोळ्याचा पडदा पु . डोळ्यावरचे आवरण ; नेत्रदोष . डोळ्याची खूण स्त्री . नेत्रकटाक्ष , संकेत . तुमच्यापैकी कोणी तरी बाईने डोळ्याची
खूण करुन त्याला तेथून बाहेर काढला असेल . - बाय २ . १ . डोळ्याची जीभ स्त्री . पापण्यांच्या आतील बाजूस अस्तराप्रमाणे असणारी त्वचा . डोळ्यांतले काजळ चोरणारा - नेणारा पु . वस्ताद ; अट्टल चोर . वि . अतिशय कुशल ; हुषार ; धूर्त . डोळ्यादेखत - डोळ्यादेखतां , डोळ्यापुढे क्रिवि . डोळ्यांसमोर ; प्रत्यक्ष ; स्वतः पाहिल्यापैकी ; स्वतःच्या
आयुष्यातील , अनुभवातील ; जिवंतपणी . म्हातारीचे डोळ्यादेखत पोराचे
लग्न होते म्हणजे बरे . डोळ्यांभर क्रिवि . डोळे भरुन ; अवलोकनाने नेत्र तृप्त करुन ( पाहणे ) दृष्टी संतुष्ट करुन . डोळ्यांमागे - पर - भारे क्रिवि . पाठीमागे ; गैर हजेरीत ; अप्रत्यक्ष
|